अर्थसंकल्प - महत्त्वाच्या घोषणा आणि परिणाम

अर्थमंत्री पलणीअप्पन चिदंबरम यांनी शुक्रवारी २००८/०९ चा अर्थसंकल्प सादर केला. या सरकारचा हा शेवटचा संपूर्ण वर्षासाठीचा अर्थसंकल्प आहे असे म्हणतात. त्यात बर्‍याच घोषणा झाल्या आणि वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी त्यावर बराच कीसही पाडला.

तर सदर अर्थसंकल्पातील:

  • महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?
  • कुठल्या तरतुदी चांगल्या कोणत्या वाईट?
  • कोणकोणत्या क्षेत्रावर आणि कसे कसे परिणाम होतील?

यावर जालनिवासी मराठी लोकांचे (म्हणजे इथे उपक्रमींचे ;)) मत जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू करत आहे.

चर्चेच्या सोयीसाठी या अर्थसंकल्पात महत्त्वाचे वाटलेले असे दोन मुद्दे इथे देत आहे.

कृषीक्षेत्र
शेतकर्‍यांना दिलेली कर्जमाफी ही या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा होती. याविषयी कृषीक्षेत्राला नवसंजीवनी मिळेल इथपासून बॅका/वित्तीय संस्थांचे प्रचंड नुकसान होईल इथपर्यंत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. अर्थमंत्र्यांनी ही 'अम्नेस्टी' नसून 'साउंड इकॉनॉमिक्स' आहे असे विधान नुकतेच केले. (कर्जमाफी नक्की कोणाच्या प्रयत्नाने झाली याचे श्रेय लाटण्याचे प्रकार लगेच सुरू झाले पण तो या चर्चेचा विषय नव्हे.)

कररचना आणि दर
वरील घोषणेनंतर सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेली घोषणा म्हणजे नोकरदार वर्गाला प्रचंड दिलासा देणारी कररचना आणि दर! (या घोषणेचे मी व्यक्तिशः स्वागत करतो :) रोख रक्कम काढण्यावरील करही रद्द केल्याचे वाचले. छोट्या आणि हायब्रीड गाड्यांवरील करातही कपात! (म्हणजे नॅनोचा दर आणखी कमी होणार!:)

या मुद्द्यांविषयी आणि इथे न दिलेल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी अधिक माहिती/मते द्यावीत ही विनंती.

Comments

कर्ज माफी

६० हजार कोटी हे तुमच्या आमच्या खिशातूनच जाणार आहेत याची जाणीव प्रत्येकाला आहेच. ही एक प्रकारच्या सबसिडी सारखेच आहे. यात लाभार्थी नेमके कोण? म्हणजे पेपरवर कोण? आणि प्रत्यक्षात कोण अस विचारतोय मी. काही लोक निश्चित असे असणार आहेत कि ते गरजू आहेत आणि त्यांना दिलासा मिळाला असेल. पुन्हा प्रश्न किती टक्के?
प्रकाश घाटपांडे

११%

गृह कर्ज व्याज दर ११% परवडेना होइल असा अंदाज आहे. मग भरमसाठ कर्ज घेतलेल्यांच्या आत्महत्या सुरू होतील आणि लवकरच गृहकर्ज माफ होइल. कर्ज माफ करून घ्यायचे असेल तर आत्महत्या कराव्यात असा कायदा आता व्हायला काही हरकत नाही.
हा ६०००० कोटीचा आकडा आला कसा आणि जुन पुर्वी हे सगळे काम पुर्ण कसे होणार याची उत्तरे सुद्धा कुठे ही नाहीत.

गृहकर्ज आणि आत्महत्या

गृहकर्ज घेऊ शकणार्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असे वाटते. (घराच्या किंमती खूप कमी झाल्या आणि/किंवा आयटी आणि संबंधित व्यवसाय डबघाईला आले तरच हे शक्य आहे आणि या दोन्हीही गोष्टींची; किंवा या दोन्ही गोष्टी एकदम होण्याची शक्यता कमी आहे) गृहकर्जावरील व्याजदर लवकरच कमी होणार असे म्हणतात.

रियल इस्टेटचा बुडबुडा ...

बेंगळूरू आणि नोयडा मध्ये घरांच्या किमती १० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्या अशी बातमी मध्ये आली होती. मुंबई-पुण्यात असे झाले नाही आणि होईल असे वाटत नाही. पुण्यातल्या बिल्डर लोकांनी तर अक्षरशः मनाला येईल ते दर ठरवले आहेत. (री-सेल बाजारात दलालांनी बिल्डरांनाही लाजवेल असा हावरटपणा चालवला आहे) त्यात अर्थसंकल्पात सिमेंट आणि स्टील उद्योगाला फारसे काही न मिळाल्याने भाव वाढून बिल्डर लोकांना दर वाढवण्याचे आणखी एक निमित्त मिळेल असे वाटते. हा बुडबुडा फुटेल का आणि कधी?

सकाळमधले लेख

अर्थसंकल्पाचा आढावा घेणारे सकाळमधले काही लेख येथे देत आहे.

ऑटो आणि औषधे
शिक्षण
मध्यमवर्ग

तसेच कॉर्पोरेट टॅक्स कमी केलेला नाही. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर् १५ % टॅक्स लावलेला आहे.

शनिवारचा सकाळ आणि टाइम्स जपून ठेवले आहेत. पुढच्या वर्षी परत बघण्यासाठी. रेल्वे बजेटात म्हणे मागच्या वर्षी ज्या सवलती दिल्या होत्या त्या प्रत्यक्षात अमलात आल्याच नाहीत.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

गाड्या, औषधे, कॉ.टॅ.

दुव्यांबद्दल धन्यवाद अभिजित! दुचाकी आणि छोट्या चारचाकी गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. औषधेही स्वस्त होतील असे म्हणतात. कॉर्पोरेट टॅक्स मध्ये काही बदल केला नाही ही कॉर्पोरेट क्षेत्राची मोठी तक्रार आहे.

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आधीही होता ना? तो वाढवला असे दिसते. पण हा नक्की काय प्रकार आहे?

शॉर्ट टर्म

समजा एक शेअर तुम्ही आज घेतला आणि एका वर्षाच्या आत विकला तर त्यावर होणार्‍या नफ्यावर लागणारा कर म्हणजे लघु मुदतीच्या भांडवली फायद्यावरील कर (मराठी माणसांसाठी: शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स ;-)).

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

वचनपूर्ती.

सध्या पुण्यात जागोजागी वचनपूर्ती च्या नावाखाली अनेक फलक झलकलेले दिसतात. त्यात प्रामुख्याने श्री शरद पवार यांची छबी झलकलेली दिसते. त्याच बरोबर अनेक नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्तेही फलकावर दिसतात.

कृषक हे सर्वसाधारणपणे खेड्यात असतात असे ऐकले होते. शहरात असे फलक दाखविण्यात काय बरे हेतू असेल बरे?

आता जर ७ जूनला पाऊस पडला तर कृषीमंत्र्यांची वचनपूर्ती असे फलक दिसतील असेही वाटते.

शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि महाराष्ट्र

आता जे काही बाहेर येत आहे त्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा महाराष्ट्र आणि विशेषकरून विदर्भास (तेथील शेकर्‍यांना) फायदा होणार नाही आहे. आंध्र-तामिळनाडू मधे मात्र याचा फायदा अधिक आहे. याबद्दल अधिक माहीती असल्यास येथे प्रतिक्रीया द्यावी ही विनंती.

केंद्रातील पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने घेतलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे; मात्र त्याचा विदर्भाला फायदा झाला नसल्याचे सांगून मुख्यमंत्री, म्हणाले, ""त्यामुळेच बागायत आणि कोरडवाहू शेतकऱ्यांत फरक करावा. पाच एकरांची कर्जमाफीची मर्यादा रद्द करून ५० हजारांपर्यंतचे कर्ज माफ करावे, असे श्रीमती गांधी आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांना मी सांगितले आहे. त्यांनीही या मताशी सहमती दर्शविली असून, याबाबत सरकार लवकरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवेल.'' बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या खासगी सावकारांवर कारवाई करणे कठीण असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. (दुवा)

कर्जमाफी आणि सहकार

असे वाचनात आले की पैसा थेट बँकांकडे जाणार आहे. आता कर्ज देणार्‍या प्रमुख बॅंक या सहकारी असतात. त्या खास करून राजकिय पक्षांचा प्रभावाखाली असतात. महाराष्ट्रात सहकारात कोणाचा वरचष्मा आहे हे सांगण्याची गरज सुज्ञ वाचकांसाठी तरी नाही.

 
^ वर