आपण मराठी माणसे कुठे चुकतो?

सध्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधांत जी भूमिका घेतली आहे त्यासंदर्भांत थोडे आत्मपरीक्षण

१) आपण व्यापार, उद्योगधंदे यांत मागे आहोत याचा नको इतका न्यूनगंड आपल्याला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या बलस्थानांचा विसर पडतो. आपल्यांत स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, शिक्षण तज्ज्ञ आहेत, समाजसुधारक आहेत, शिवाय कला, विज्ञान, तंत्रज्ञान व सिनेक्षेत्रांतही अनेक मराठी माणसे आघाडीवर आहेत या गोष्टी आपल्या लक्षांतच येत नाहीत.
२) उत्तर भारतीयांच्या तुलनेंत आपण शारीरिक बल व चिकाटी यांत कमी पडतो.
३) आपल्यांत हजरजबाबीपणाचा अभाव असल्यामुळे इतरांच्या बेधडक खोट्या विधानांना आपण तिथल्या तिथे प्रत्युत्तर देऊ शकत नाही व नंतर चरफडत बसतो.
४) चांगली वेषभूषा व राहणीमान परवडत असूनही त्याबाबतींत आपल्यांत नको इतका साधेपणा आहे. यामुळे मराठी माणसे इतरांना दखलपात्र वाटत नाहीत.
५) त्याशिवाय अन्यायाविरुद्ध लढतांना आपल्याला राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना करायची फार संवय आहे. त्याऐवजी फारसा गाजावाजा न करता नियोजनबद्ध प्रयत्न करून आपल्याला आपले इप्सित सहज साध्य करता येईल.

योग्य दिशेने प्रयत्न करून वरील सर्व दोष आपल्याला काढून टाकता येतील.

आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

अतिसामान्यीकरण

प्रथमदर्शनी हे स्वीपिंग जनरलायझेशन (सरसकट सामान्यीकरण) वाटते. मात्र विचार करून काही मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा करता येईल.

-- आजानुकर्ण

मागे पडत असलो तरी..

मराठी माणूस मागे का पडतो ह्यात एक अध्यार्‍हुत असे आहे की आपण मागे पडलो आहे. आजच्या घडीला ती महाराष्ट्रात आणि ती देखील विशेष करून शहरात वस्तुस्थिती वाटण्यासारखी परिस्थिती असली तरी एकच मुद्दा मांडावासा वाटतो:

जर आपण इतरप्रांतियापेक्षा जर कमी असलो - उ.दा. पूर्वी दाक्षिणात्यांपेक्षा इंग्रजीत, आता उत्तर भारतीयांपेक्षा शारीरीक बल आणि चिकाटीत वगैरे तरी वस्तुस्थिती काय आहे तर या सर्वांना स्वतःचे प्रांत नीट नसल्यामुळे ते महाराष्ट्रात येत आहेत. साठ वर्षे स्वातंत्र्य मिळून झालेली असली तरी त्यांची अवस्था काही फार सुधारलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. जर हे सारे परप्रांतीय इतके चांगले उद्यमशील आहेत तर असे "स्थलांतर (डिसप्लेसमेंट" या अर्थी) का करावे लागते? अपवाद केवळ आय टी क्रांतीमुळे झालेला आहे की जेथे लोकांना "डिसप्लेस" नाही तर कंपन्यांच्या जागांमुळे "रीलोकेट" व्हावे लागत आहे (बंगलोर, हैद्राबाद वगैरे).

आपला न्यूनगंडाचा मुद्दा मान्य.

बाकी इतर बरेच काही लिहिता येईल... विचार करून बघतो.

काही मुद्दे

चांगला विषय आहे आणि लिहीण्यासारखे बरेच आहे (ह घ्या) इथे दिलेले सर्व गुण सर्व मराठी माणसांना लागू होतीलच असे नाही. उलट माझे बरेच मित्र-मैत्रिणी मराठी असूनही त्यांनी हे दोष प्रयत्नपूर्वक टाळले आहेत. दुसरे म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपण आघाडीवर आहोत हे ही खरे आहे. (सिलिकॉन व्हॅलीमधली मराठी नावे पाहिल्यास हे सहज कळते.)

आपण व्यापारात मागे आहोत याचा न्यूनगंड आहे असे मला वाटत नाही. आपल्यामध्ये ही बरीच मोठी आणि जाणवणारी उणीव आहे म्हणून तिचा उल्लेख वारंवार होतो. परत तेच उदाहरण देतो आहे त्याबद्दल क्षमस्व. पण इतकी वर्षे पुण्यात राहूनही मला न सुटलेले कोडे म्हणजे चितळेबंधू. त्यांच्याजागी एखादा मारवाडी असता तर त्याने आपले नाव इतके खपते आहे हे पाहून दिवसातले अठरा तासतरी दुकान चालू ठेवले असते. मला वाटते ही वृत्ती आणि पुणेकरांचे प्रसिद्ध अगत्य यांचा बराच संबंध असावा. आलेल्या गिर्‍हाईकाला कसे वागवले म्हणजे तो परतपरत आपल्याकडे येईल हे कळायला फारशी हुषारी लागते अशातला भाग नाही. प्रश्न वृत्ती बदलण्याचा आहे.

दुसरा जाणवणारा अभाव म्हणजे नवीन अनुभव घ्यायला नकार. चाकोरीबाहेर जाणे आपल्याला सहसा पसंत नसते. उदाहरण द्यायचे झाले तर बंगाली/तमिळ चित्रपट या बाबतीत बरेच समृद्ध असल्याचे जाणवते. कदाचित त्याच्याशीच निगडीत मुद्दा म्हणजे व्यापक दृष्टीने विचार होत नाही. आपल्या राजकारण्यांची धोरणे पाहिल्यास हे लगेच लक्षात येते. (हे काही अंशी राष्ट्रीय आहे.) आपण बरे आपले काम बरे ही वृत्ती यामागे असावी असे वाटते.

कदाचित लहानपणापासून फाडफाड कोकाटे इंग्रजी आलेच पाहिजे असा मारा झाल्यामुळेही असेल पण एक न कळणारी वृत्ती म्हणजे आपली मातृभाषा बोलायला कमीपणा वाटणे. या बाबतीत परप्रांतीयांचे उदाहरण घ्यावे असे वाटते.

खोटे बोलण्यात मराठी माणूस इतरांपेक्षा कमी पडतो असे वाटत नाही. :-)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमती

खोटे बोलण्यात मराठी माणूस इतरांपेक्षा कमी पडतो असे वाटत नाही. :-)

या मुद्द्यावर कुणाचे मतभेद नसावेत. इथ कुणाच्याही प्रांतिक,भाषिक,जातीय अस्मिता आड येवु नयेत.
प्रकाश घाटपांडे

मागे पडणे वगैरे

अजानुने म्हटल्याप्रमाणे प्रथमदर्शनी हे स्वीपिंग जनरलायझेशन (सरसकट सामान्यीकरण) वाटते परंतु काही मुद्द्यांवर व्यक्तिगत मते मांडता येतील.

चर्चेत मांडलेले ५ ही मुद्दे मला सरळसोट झाडून टाकता आले नाहीत त्यात थोडेफार तथ्य वाटते.

राहीली परप्रांतीयांची चिकाटी आणि मेहनत तर मला असे वाटते की जेव्हा एखादा माणूस आपला मुलूख सोडून जातो तेव्हा (अगदी आयटीतले सुखासुखी अमेरिकेला पोहोचले तरीही) डोळ्यासमोर काही निश्चित उद्दिष्टे ठेवून जातो. एखाद्याला श्रीमंत व्हायचं असतं, एखाद्याला कुटुंबाची सोय लावायची असते, नाव कमवायचं असतं, प्रसिद्धी मिळवायची असते. त्यामुळे आपसूक कष्ट जास्त होतात. त्यातून परमुलूखात आपली माणसे, मित्र कमी असतात. करण्यासारखे खूप काही अवांतर नसते. त्यामुळे माणूस आपला वेळ कामात रमवतो. परदेशांतील अनेकजण इथे आहेत आणि मराठीच आहेत त्यांनी सांगावे की ते आपापल्या ऑफिसांत कामचुकारी करतात म्हणून. उलट दिसेल की ते २-३ माणसांचे काम करत असतात.

माझी एक अमेरिकन मैत्रिण मला म्हणते की तुम्ही भारतीय अमेरिकेत आल्यावर ५-६ वर्षांत मोठी मोठी घरं कशी घेऊ शकता? याचे कारण असे असते की कमावलेला पैसा खर्च करायला राहणी अमेरिकन नसते, विचार अमेरिकन नसतात, नातेवाईक-मित्रमंडळ खूप नसते, ऑफिस संपल्यावर गोल्फ खेळायला जायचे नसते. हेच परप्रांतीयांचे मुंबईला आल्यावर होते.

असो, प्रश्न दुसर्‍याचे उत्तर म्हणून हा एक मुद्दा सोडला तर,

३) आपल्यांत हजरजबाबीपणाचा अभाव असल्यामुळे इतरांच्या बेधडक खोट्या विधानांना आपण तिथल्या तिथे प्रत्युत्तर देऊ शकत नाही व नंतर चरफडत बसतो.

म्हणजे इतर बेधडक खोटे बोलतात तेही आपल्याला करता येत नाही म्हणूनही आपण चरफडत असतो पण हे आपल्याच आईवडिलांनी दिलेले संस्कार असतात. त्यांचे काय करावे हा प्रश्नच आहे. मला स्वत:ला थोडाफार खोटेपणा करता येतो ज्याला डिप्लोमसी असे गोड नाव देता येते पण दुसर्‍याचा केसाने गळा कापायची हिम्मत होणार नाही आणि असे संस्कार मुलांनाही द्यावेसे वाटणार नाहीत.

४) चांगली वेषभूषा व राहणीमान परवडत असूनही त्याबाबतींत आपल्यांत नको इतका साधेपणा आहे. यामुळे मराठी माणसे इतरांना दखलपात्र वाटत नाहीत.

मी २०१% सहमत आहे पण हे फक्त मराठी माणसांचेच नाही तर बरेचसे दाक्षिणात्यही या साधेपणात येतात. उत्तर भारतीय आपल्या छानछौकीने छाप मारतात हे सतत पाहिले आहे. चांगली वेषभूषा, राहणीमान आणि त्याकरता खर्च करण्यात मला वावगे वाटत नाही आणि हा प्रकार मराठी माणसांना बदलता येईल. फॅशन करणे, चांगले रहाणे, इतरांवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करणे यात काहीही गैर नाही. असो, हे माझे माझ्या अनुभवांवरून झालेले व्यक्तिगत मत आहे, जनरलायझेशन करण्याचा हेतू नसला तरी तसे दिसत असल्याने क्षमस्व!

५) त्याशिवाय अन्यायाविरुद्ध लढतांना आपल्याला राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना करायची फार संवय आहे. त्याऐवजी फारसा गाजावाजा न करता नियोजनबद्ध प्रयत्न करून आपल्याला आपले इप्सित सहज साध्य करता येईल.

अपनी गलीमें कुत्ता शेर अशी आपली गत आहे. या गर्जना बिर्जना आपापल्या बालेकिल्ल्यांत पोरासोरांनाही करता येतात. तोच वेळ आपलं काय चुकतंय हे पाहण्यात घालवायला धाडस लागतं.

याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे, उत्तर भारतीयांचं इतरांशी गोड आणि जिव्हाळ्याने बोलण्याचा गुण शिकण्यासारखा आहे. ते कदाचित तुमच्यासाठी पैशाचं काम करणार नाहीत पण गोड बोलून मन जिंकून घेतील. तेच मराठी लोक करून सवरून तुसड्या शब्दांनी सर्व घालवून बसतात असा अनुभव आहे.

देणी

माझी एक अमेरिकन मैत्रिण मला म्हणते की तुम्ही भारतीय अमेरिकेत आल्यावर ५-६ वर्षांत मोठी मोठी घरं कशी घेऊ शकता? याचे कारण असे असते की कमावलेला पैसा खर्च करायला राहणी अमेरिकन नसते, विचार अमेरिकन नसतात, नातेवाईक-मित्रमंडळ खूप नसते, ऑफिस संपल्यावर गोल्फ खेळायला जायचे नसते. हेच परप्रांतीयांचे मुंबईला आल्यावर होते.

हे खरे आहे थोडेफार, फक्त काही महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात. एक म्हणजे असे की बहुतांश अमेरिकन लोकांना शिक्षणानंतर नोकरी लागल्यावर (शिक्षित) शिक्षणासाठी घेतलेली कर्जे द्यायची असतात. अजून एक म्हणजे आईवडिलांसोबत एकत्र रहाण्याची पद्धत नसल्याने एका एका व्यक्तीला सर्व खर्च करावे लागतात- अर्थात हा मुद्दा बाहेरून आलेल्या भारतीय लोकांच्या बाबतीतही तसाच आहे - शिक्षणासाठी घेतलेली कर्जे सोडून देऊन. तसेच अमेरिकेत आलेले भारतीय एकतर (नव्या परिस्थितीत) कामासाठी येतात किंवा (पारंपारिक रित्या) स्कॉलरशिप मिळवून ग्रॅजुएट शिक्षणासाठी येतात - त्यामुळे नंतरचा झगडा कमी होतो. त्यानंतर स्थैर्य लगेच मिळते. घरादाराच्या बाजूनेही बाकीचा आधार (शारिरीक/मानसिक) खूप असतो. पण अमेरिकन लोकांना ह्यापैकी प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागते असे दिसते.

बाकी मराठी लोकांबद्दल केलेल्या बर्‍याचशा निरीक्षणांशी बरीचशी सहमत आहे.

गुणदोष

हे दोष ? ह्यांना तर गुण म्ह्टले तरी चालेल. काय ?

हे गुणधर्म काही ठीकाणि 'गुण' असतात तर काही ठीकाणि तेच 'दोष्' गंणले जातात.
प्रकाश घाटपांडे

महाराष्ट्र मेला तरी...

हे दोष ? ह्यांना तर गुण म्ह्टले तरी चालेल. काय ?

जेंव्हा मराठी माणसाचे यश हे इतरांच्या डोळ्यात जाण्या इतके मोठे होईल तेंव्हा आपोआप आज ज्यांना दोष म्हणले जात आहे त्यांनाच उद्या गूण म्हणले जाईल. अपयशात योग्य गोष्टींचे वाभाडे आणि यशामधे चुकांचे पण पोवाडे गायले जातात ही स्थल-काल- व्यक्ती निरपेक्ष वस्तुस्थिती आहे. ती कुणालाच चुकलेली नाही तर मराठी माणसाला का म्हणून चुकणार?

आपण वर स्वातंत्र्यसैनीकांची नावे घेतलीत त्यावरून अजून काही सुचवावेसे वाटले: भारतातील प्रत्येक विचारांच्या संघटनेस आकार देणारे:

१८५७चे स्वातंत्र्य युद्ध - तमाम मराठी नेतृत्व
सशस्त्र क्रांतीचे पहीले प्रयत्न - चाफेकर, नंतर सावरकर
काँग्रेस चालू करण्यात हातभार - तेलंगांपासून रानडे-गोखले-टिळकांपर्यंत
स्त्रीमुक्ती वगैरे - आगरकर, कर्वे
कम्युनिस्ट चळवळ - डांगे, कोल्हटकर आदी
बहूजन समाज चळवळ - शाहू महाराज, म. फुले, वि.रा.शिंदे
हिंदूत्व - सावरकर, डॉ. हेडगेवार, गोळवळकर गुरूजी
दलीत चळवळ आणि भारतीय घटना - डॉ. आंबेडकर

तेच चित्रपटाबाबत - चित्रसॄष्टीतील भारतरत्न कुणाच्या नावाने? - दादासाहेब फाळके

वगैरे.

हे सर्व कायम आठवते. पण नंतर अजून एका १७व्या शतकातील मराठी माणसाच्या ओळी आठवतात (कोण ते समजेलच):

आपलीआप करे स्तुती, परदेशी भोगी विपत्ती
सांगे वडीलांची किर्ती, तो येक मूर्ख || (!)

थोडक्यात जर परत "प्रॉमिनंट" होयचे असेल तर, आपल्यातल्या "स्ट्रेंग्थ्स" आपण ओळखूनसेनापती बापटांचे म्हणणे लक्षात ठेवले पाहीजे:

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले।
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा।।

म्हणजे आपण बैल

मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले।

हो ना... म्हणजे आपण बैल... नि बाकीच्या राष्ट्राने मजेत त्या गाड्यावर बसून मुंबईत "कैसन् हो भाई?" असं विचारत फिरायचे!

आपला
गुंडोपंत

देवो दुर्बलघातकः ।

फक्त एखाद्या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे म्हणून अधिक योग्यतेच्या व्यक्तींना डावलून यांना संधी मिळावी असे म्हणणे अन्यायाचे आहे. ज्या लोकांकडे योग्यता आहे, स्पर्धेला तोंड देऊन पुढे जाण्याचे सामर्थ्य आहे ते तरतील, उरलेले नाही. आम्हाला जमत नाही म्हणून आम्हाला सवलत द्या असे म्हणणे पळपुटेपणाचे लक्षण आहे.
आपला
(स्वाभिमानी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

पण जेंव्हा उलटे होते तेंव्हा काय?

फक्त एखाद्या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे म्हणून अधिक योग्यतेच्या व्यक्तींना डावलून यांना संधी मिळावी असे म्हणणे अन्यायाचे आहे.

पण जेंव्हा उलटे होते तेंव्हा काय? पुर्वीच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्ट मधे, बीएआरसी मधे झाले. मधे रेल्वेच्या परीक्षांच्या वेळेस झाले. काही संध्या ह्या गुणवत्तेच्या आधारीत असतात. उ.दा. मुंबई आय आय टी त कोणी मराठी माणसाला प्राधान्य द्या असे म्हणत नाही...पण काही गोष्टी या सामान्यांसाठी असतात. जेंव्हा तेथे अन्याय होतो तेंव्हा जास्त बिनसते. हुषार माणसे गाव/प्रांत/देश सोडून संधी मिळेल तेथे जाऊ शकतात पण सामान्यांना तसे करणे शक्य नसते (अनलेस आपल्यालापण लोंढे पाठवायचे असले तर!) . जेंव्हा सामान्यांना काही राहात नाही तेंव्हा नैराश्य वाढते त्यातून गुन्हेगारी वाढते. गिरणी कामगार संपातूनच म्हणून एका कामागाराचे पोर पुढे "अरूण गवळी" झाले हे विसरता येत नाही.

दुसरा भाग भाषेला महत्व - रिस्पेक्ट या अर्थी देण्याचा. त्यावर बरेच लिहीता येईल...

हे सर्व विचार

वातानुकूलित खोलीमध्ये खुर्चीवर बसून म्हणणे आपल्या (म्हणजे तुम्ही व मी) सारख्याला ठीक आहे.

पण तृतीय व चतुर्थ श्रेणी कामासाठी जर मनुष्यबळ एखाद्या ठिकाणी उपलब्ध असेल तर बाहेरून लोक आणण्याची गरज आहे का? दक्षिण रेल्वे जी प्रामुख्याने दक्षिणेतील चार राज्यांमध्ये धावेल तिथे रेल्वे आल्यावर झेंडा हलवणे व सिग्नल देणे असे काम करण्यासाठी बिहारमधून येणारा कामगार "राष्ट्रीय एकात्मतेच्या" नावाखाली घेणे ठीक आहे. पण ज्याची नोकरी गेली तो स्थानिक मनुष्य कुठे जाणार? की त्यालाही देशोधडीला लावायचे. जर एकाच प्रदेशातील लोकांना नोकर्‍यांसाठी घ्यायचे असेल तर सगळी नोकरभरती पाटणा किंवा लखनऊ वरून का करत नाहीत निदान नोकरभरतीचा फार्सतरी बंद करता येईल.

ज्या कामासाठी विशिष्ट कौशल्य लागते व जे उपलब्ध नाही त्यासाठी बाहेरून कामगार आणणे ठीक आहे. अगदी शिवाजी महाराजांनी गुजरात व राजस्थानातून व्यापारी रायगडावर आणले होते. पण असे करताना इथल्या लोकांच्या पोटावर पाय येत नाही ना हे पाहणेही आवश्यक आहे.

-- आजानुकर्ण

हे महत्वाचे

ज्या कामासाठी विशिष्ट कौशल्य लागते व जे उपलब्ध नाही त्यासाठी बाहेरून कामगार आणणे ठीक आहे. अगदी शिवाजी महाराजांनी गुजरात व राजस्थानातून व्यापारी रायगडावर आणले होते. पण असे करताना इथल्या लोकांच्या पोटावर पाय येत नाही ना हे पाहणेही आवश्यक आहे.

खर आहे. सर्व बेरोजगारांना काम देणे शक्य आहे काय? प्राधान्यक्रम ठरवताना डावे उजवे केले जाणारच. एका व्यक्तीला रोजगार मिळाला म्हणजे एका कुटुंबाला रोजगार मिळाल्यासार्खे असते.

प्रकाश घाटपांडे

पात्रता?

फक्त एखाद्या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे म्हणून अधिक योग्यतेच्या व्यक्तींना डावलून यांना संधी मिळावी असे म्हणणे अन्यायाचे आहे. ज्या लोकांकडे योग्यता आहे, स्पर्धेला तोंड देऊन पुढे जाण्याचे सामर्थ्य आहे ते तरतील, उरलेले नाही. आम्हाला जमत नाही म्हणून आम्हाला सवलत द्या असे म्हणणे पळपुटेपणाचे लक्षण आहे.
मला वाटते आपल्याला मराठी माणसावर जरा जास्तच आकस दिसतो. राज यांच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर त्यांना सरसरकट गुंड ठरवणारी प्रसारमाध्यमे हिंदी होती हे आपणास माहीत नाही काय? बरं तीच प्रसारमाध्यमे अबू आझमी अथवा अमरसिंह किंवा लालू यांच्याबद्दल काहीच बोलत नाही.ह्या नाकर्त्या नेत्यांमुळेच परप्रांतीय माणूस नोकरी शोधत महाराष्ट्रात येतो आहे,त्याचे काय? त्यांच्या भूमीत त्यांच्याकरिता नोकर्‍या नसाव्या? आणि यांच्या नोकर्‍यांकरिता महाराष्ट्राने का झिजावे?

आयकर' भरतीत ...

हे असले प्रकार जेंव्हा होतात (आणि ते कायम होत असतात) तेंव्हा योग्यतेपेक्षा स्वतःचा प्रांतिक-राजकीय स्वार्थ इतर राजकारणी जोपासतात आपले मात्र दुर्लक्ष करतात....

"आयकर' भरतीत भूमिपुत्रांना डावलले

मुंबई, ता. १२ - घटनेतील तरतुदीनुसार भूमिपुत्रांना नोकरी-व्यवसायात प्राधान्य मिळायलाच हवे, असे सांगत आयकर विभागात झालेल्या "टॅक्‍स असिस्टंट'पदाच्या भरतीविरोधात तीव्र निदर्शने करून शिवसेनेने आपला "मराठी बाणा' पुन्हा एकवार दाखवून दिला.
ही भरती रद्द करावी वा त्या उमेदवारांना त्यांच्या राज्यात सामावून घ्यावे, अशी मागणी करीत तसे न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने त्यांचे "पार्सल' परत पाठवून देईल, असा इशारा स्थानीय लोकाधिकार समितीने दिला आहे.

आयकर विभागात अलीकडेच करण्यात आलेल्या ४०३ टॅक्‍स असिस्टंटपदाच्या भरतीत केंद्रातील हिंदी भाषक लॉबीने जाणीवपूर्वक मराठी तरुणांना डावलल्याचा आरोप करीत शिवसेनाप्रणीत लोकाधिकार समितीने आज येथील आयकर कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. विभागाने ही भरती तत्काळ रद्द करावी वा त्या पदांवरती भरती केलेल्या उमेदवारांना त्यांच्या राज्यात त्याच विभागात सामावून घ्यावे, अशी जोरदार मागणी समितीच्या वतीने गजानन कीर्तिकर यांनी या वेळी केलेल्या भाषणात केली.

या विभागातील ४०३ पदे महाराष्ट्रात भरावयाची असतानाही त्याची जाहिरात दिल्लीतील एका साप्ताहिकात प्रसिद्ध करण्यात आली होती अशी माहिती देत, यामागे केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांची हिंदी लॉबीच याला कारणीभूत असल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले. महाराष्ट्रात पदे भरताना यापुढे होणाऱ्या परीक्षांमधून मराठी भाषांतर अनिवार्य करण्याची व किमान ८० टक्के मराठी उमेदवारांची भरती करण्याची मागणी करण्यात आली. घटनेप्रमाणे देशातील कोणाही माणसाला कुठेही राहण्याची परवानगी असली तरी त्याच घटनेच्या तरतुदीनुसार भूमिपुत्रांवर होणारा अन्याय शिवसेना खपवून घेणार नाही, केंद्रातील मंत्र्यांनी यावर तोडगा काढला नाही, तर परप्रांतीयांचे "पार्सल' शिवसेना स्टाईलने परत पाठविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्याच आठवड्यात शिवसेनेने रेल्वेतील भरतीविरोधात छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात निदर्शने केली होती. त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मेळाव्यातही परप्रांतीयांना इशारा देण्यात आला होता. मंगळवारी आयकर भवनासमोर निदर्शने करून पुन्हा एकदा शिवसेनेने आपला "मराठी बाणा' जागा केला आहे.

सहमत..

मी शरदरावांशी बराचसा सहमत आहे..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

कोर्डकाका

हद्दपार झाला मराठी माणूस मुंबईतून. आता काय उपयोग.
आपल एक बर असते मराठी माणूस आपल्या अस्मितेविषयी बोलू लागला की आपलाच मराठी बंधू त्याला तुमच्यासारखे प्रश्न करू लागतो असे का ?
आपला
कॉ.विकि

पुन्हा एकदा....खेकडा

विकी,
याला कारण मराठी माणसाची खेकडा वृत्ती...मराठी माणूस खेकडा आहे म्हणतात ते उगीच नाही. आख्ख्या मुंबईत जेमतेम २३ टक्के उरलेली मराठी जमात उद्या देशातून नामशेष झाल्यास आश्चर्य वाटू नये. कारण आपल्याच मराठी बांधवाला अस्मीतेसाठी लढणारा मराठी माणूस खपत नाही.

(कट्टर मराठी) -इनोबा

खेकडा प्रवृत्ती

आपण खेकडा प्रवृत्तीचे आहोत हे ऐकून असे लक्षात आले की भारतात वेगवेगळ्या तर्‍हेचे खेकडेच खेकडे राहातात.

येथे श्री एम् थॉमस म्हणतात की नवी मुंबईचे मल्याळी लोक खेकड्यांसारखे आहेत (दुवा) - (शीर्षकात मराठी लोकांबद्दलही पुळका आहे, पण लेख मल्याळी लोकांबाबतच.)

तमिळ लोक (दुवा)

२२ डिसेंबर २००४ तारखेला एक गृहस्थ मणिपुरी लोकांबाबत म्हणतात की ते खेकडे आहेत (दुवा).

येथे अमित माथुर हर्षद मेहतांच्या संदर्भात विचारतात की आपण सर्व भारतीय खेकड्यांसारखे का आहोत (दुवा)?

येथे तर कर्नाटकाच्या भूतपूर्व राज्यपाल श्रीमती व्ही. एस्. रमादेवी पूर्ण भारतालाच खेकडे करतात (दुवा)

येथे अमेरिकेतील पाईन रिज जमातीतील लोकांबद्दल (दुवा), अपाचे जमातीबद्दल (दुवा), क्रो जमातीबद्दल (दुवा) सर्व खेकड्यांसारखे. म्हणून कदाचित येथील जमातींना "इंडियन" म्हणतात.

इथे युरोपातील जिप्सी लोक खेकड्यासारखे (दुवा). हे मूळ भारतातून सर्वत्र गेले.

रघुराम राजन हे सर्व विकसनशील देशांतील लोकांना खेकडे म्हणतात (दुवा) राजनसाहेब भारतातले.

हं......................................
पण इथे पुढे मात्र दूरान्वयेही संबंध लागत नाही.

ऑस्ट्रेलियन लोक हेही खेकड्यांसारखेच (दुवा).

बुकर टी वॉशिंगटन ने खेकडे असल्याचे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांबाबत म्हटलेच आहे.

त्यामुळे ऑस्ट्रेलियन लोक आणि बुकर टी वॉशिंगटन हे मूळचे भारतीय होते हा शोध मला वर्तकांच्या आधी लागला आहे.

किंवा मल्याळी मणिपुरी आणि तमिळ लोक हे मूळचे मराठी होते. मुंबई-बेळगाव-तंजावर-सकट संयुक्त महाराष्ट्र (खेकड्यांचे राज्य म्हणून) झालाच पाहिजे.

अजून एक...

बॉस्टनमधे माझा एक गुजराथ मधला गुजराथी मित्र म्हणायचा की तुम्ही मराठी लोकं कसे एकमेकाला सांभाळून एकत्र राहता, नाहीतर आम्ही गुजराथी! मी लगेच विचारले की कुठे आहेत हे (असले) मराठी लोकं? तो म्हणाला बडोद्यात! ह्यात तथ्य आहे का केवळ वन पॉइंट एक्स्ट्रापोलेशन (त्याला आलेला अनुभव या अर्थी) आहे ते माहीत नाही. पण मी गुजराथ्यांमधे पण बरीच भांडणे पाहीली आहेत.

अजून एक+

बॉस्टनमधे माझा एक गुजराथ मधला गुजराथी मित्र म्हणायचा की तुम्ही मराठी लोकं कसे एकमेकाला सांभाळून एकत्र राहता, नाहीतर आम्ही गुजराथी!

असं माझीही एक मल्याळी मैत्रिण मला म्हणते. म्हणजे, तुम्ही मराठी लोक पहा मराठी मंडळाच्या निमित्ताने भेटता, मैत्री राहते, एकमेकांकडे येता जाता. नाहीतर आम्ही केरळी.

मला वाटतं, हा प्रत्येकाला येणारा स्वानुभव असतो. खाली राजेंद्र म्हणतो तसे, दुरून सर्वच डोंगर हिरवेगार दिसत असावेत.

असो,

धनंजयचा प्रतिसाद अतिशय माहितीपूर्ण वाटला. :)

सुंदर

खेकडा-संदर्भ आवडले. थोडक्यात शेजारच्या टेबलावरचा मेन्यू जास्त चांगला, शेजार्‍याची बायको जास्त सुंदर तसेच इतर संस्कृतीमधली माणसे जास्त चांगली.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

वा वा

जबरा प्रतिसाद.

-- आजानुकर्ण

मेधा पाटकर

मेधा पाटकरांना अबु आझमींच्या विरुद्ध पण तक्रार कराविशी वाटली असती तर त्यांची कृती आणि वृत्ती समतोल वाटली असती ....पण एक नक्की घटनेच्या हक्काचा उपयोग करून आता तमाम जनतेने आदीवासी-वनवासी (राखीव न समजता) भागात पण जायला हवे. त्यावर त्यांचे म्हणणे काय ते समजून घेयला आवडेल ...

राज ठाकरे यांच्याविरोधात मेधा पाटकर यांची तक्रार

मुंबई, ता. १४ - राज ठाकरे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर भारतीयांविरोधात केलेले आंदोलन घटनेने दिलेल्या अधिकारांचे हनन करणारे असून, राज्य सरकारनेही योग्य वेळी प्रतिबंधात्मक कारवाई न करता कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज राज्य मानवी हक्‍क आयोगाला सादर केलेल्या याचिकेत केला आहे.
"नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मूव्हमेंट', "आवास', "युवा' आदी २० संघटनांतर्फे मेधा पाटकर यांनी आज राज्य मानवी हक्‍क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती क्षितीज व्यास यांची भेट घेऊन मनसेने केलेल्या हिंसक आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली.

घटनेने देशातील नागरिकांना कुठेही जाण्याचे, राहण्याचे, काम करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेले आंदोलन या अधिकारांचे हनन करणारे आहे, निषेधार्ह आहे, असे पाटकर म्हणाल्या. राज यांनी आंदोलन सुरू करताच सरकारने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केली असती, तर पुढे आठवडाभर राज्यभरात सुरू राहिलेला हिंसाचार टळला असता, असेही त्यांनी नमूद केले.

या आंदोलनात ज्यांचे नुकसान झाले, त्यांना राज्य सरकारने भरपाई द्यावी, आंदोलनाच्या वेळी बघ्याची भूमिका घेऊन हिंसेला अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्या पोलिसांची गृह खात्याने चौकशी करावी, असा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी विनंती याचिकेत आयोगाला करण्यात आली आहे.

आणि

आता लालू इथे येऊन छटपूजा करणार आहे. प्रसिद्धिची संधी आहे ना. निष्पन्न काहीच होणार नाही, फक्त आणखी निरपराध बळी आणि मालमत्तेचे नुकसान.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

लालू

आता लालू इथे येऊन छटपूजा करणार आहे.

त्यात अजून एक "हाईट" म्हणजे लालू या संदर्भात म्हणतात की "मी गुंडगिरीच्या विरोधात हे करत आहे". म्हणजे मग बिहारमधे हे कोणाच्या बाजूने असतात असे म्हणायचे?

मानवी हक्क

तरी म्हटलं मानवी हक्क आयोग अजून कुठेच कसा आला नाही.

मेधाजी धन्यवाद.

राज यांनी आंदोलन सुरू करताच सरकारने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केली असती, तर पुढे आठवडाभर राज्यभरात सुरू राहिलेला हिंसाचार टळला असता,

असं म्हणणं म्हणजे जर-तर ची भाषा आहे. तात्काळ अटक झाली असती तर उलट दंगे भडकले असते. मुळात राज्यभरात हिंसाचार सुरु नव्हताच. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आधी मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि दुसर्‍या फळी(!)तल्या नेत्यांना अटक केली. जामीन मिळवून त्याच दिवशी बाहेर येणे फार अवघड नव्हते.

एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक स्थलांतर घातक आहे हे न कळण्याइतक्या त्या बालबुद्धी आहेत का? तो प्रश्न त्या का उठवत नाहीत?

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

साधेपणात काय वाईट आहे?

आपण सारखे चुकतोच असे का वाटते?
साधेपणात काय वाईट आहे असे वाटते?
छान्छौकी म्हणजेच बरोबर असे तरी कसे काय् म्हणता?
हजरजबाबीपणात आचार्य अत्रेंच्या नावापुधे कुणी आहे का? मी तर केती तरी चटपटीत हजरजबाबी मराठी लोकं पाहते. मला काही पटले नाही.
हा न्युनगंड मागच्या पीढीला होता आता कुनाला फारसा आहे असे वाटते. आजची मराठी पीढी यातुन बाहेर आली आहे.

शिवानी

विद्या बालन विरुद्ध उर्मिला मातोंडकर

साधेपणात काय वाईट आहे असे वाटते?
छान्छौकी म्हणजेच बरोबर असे तरी कसे काय् म्हणता?

साधेपणत वाईट काहीच नाही हो शिवानीताई पण तो साधेपणा तुम्हाला परवडणारा आहे का तो बघा. गांधिजींचा साधेपणा ही भयंकर महाग गोष्ट होती असं मी ऐकून आहे.

आता तुमच्या सहज लक्षात येईल असे सांगतो,

हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमवायचे असेल तर विद्या बालनसारखे रूप, अप्रतिम हास्य आणि अभिनय यायला पाहिजे. या तीनही गोष्टी असल्याने तिला अद्याप कमी कपड्यांत वावरायची गरज पडलेली दिसत नाही पण मग हाताला येणारे चित्रपटही थोडके आहेत. ती त्यात समाधानी असेल तर ठीक आहे पण एखादीला झटकन उंची गाठायची असेल, शिखरावर राहायचे असेल तर उर्मीला मातोंडकर होणे भाग आहे. याचा अर्थ उर्मीलाकडे रूप, हास्य, अभिनय नाही यातला भाग नाही, पण या सर्वांसोबत मागणी तसा पुरवठा याकडे तिने लक्ष दिले.

तेव्हा तात्पर्य इतकेच की ज्या देशात राहायचे त्या देशवासियांप्रमाणेच रहावे लागते...व्हेन इन रोम, डू ऍज द रोमन्स डू.

(विद्या बालनप्रेमी) राजीव.

अवांतर

तिला अद्याप कमी कपड्यांत वावरायची गरज पडलेली दिसत नाही

तुम्ही सलाम-ए-इश्क "नीट" पाहिलेला दिसत नाही!!

 
^ वर