सेन्सॉरशीप आणि स्वातंत्र्य
हा चर्चा विषय सुचण्याची चालना मला गणेशरावांच्या ह्या लेखामुळे आणि त्यातील माझ्यासकट अनेकांच्या प्रतिक्रीयांमुळे आली...
उपक्रमाच्या संपदकांनी आजतागायत एकंदरीत त्यांनी ठरवलेल्या लेखनाच्या सीमेत कुठलेही लिखाण मान्य करताना दिसतात (अर्थातच म्हणून काव्य नाही, ललीत लेख नाहीत वगैरे). जेंव्हा केंव्हा टिका व्यक्तिगत होते अथवा अपशब्द, सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत तेंव्हा तसे तेथे लिहून असले लिखाण उडवले जाते. थोडक्यात संपादक "सेन्सॉरशीप" करत असले तरी अतिशय मर्यादीत अर्थाने आणि संयम ठेवून अखेरचा पर्याय म्हणून करतात. अपवाद म्हणून, नियम म्हणून नाही.
कदाचीत अमेरिकेत राहात असल्यामुळे आणि त्यात अनुभव घेतला असल्याने असेल पण ह्या बाबतीत मी "लिबरल" असणे जास्त योग्य मार्ग समजतो...याचा अर्थ खाली येईलच...
आपण गणेशरावांच्या मूळ लेखनाचा विचार केल्यास लक्षात येईल की माझ्यासकट अनेकांना तो तेथे असू नये असे वाटले आणि त्यामुळे तो तिथून उडवावासा वाटला, जरी मी सेन्सॉरशीपच्या बाजूचा नसलो तरी. आता परत विचार करताना काय दिसते की अशी सेन्सॉरशीप या लेखाबाबत केली नसली तरी त्यामुळे अगदी उद्देश हा चिथावणी करण्याचा असला (कदाचीत नुसत्याच अपरीपक्व भावना पण असू शकतात) तरी तो सफल व्हायचे लांब राहीले उलट लेखकाच्या लक्षात आले की इकडे काही उपयो होणार नाही, म्हणूनच नंतर गाडी दहशतवादावर वळली (जेथे त्यांचे विचार हे पक्षपाती आहेत असे मला वाटते तरी). पण अशा चर्चेतून एक गोष्ट नक्की होउ शकते ती म्हणजे जर कोणीतरी केवळ भावनीक होऊन लिहीत असला तर अशी व्यक्ती निदान विचार करू शकेल की आपल्याला काय म्हणायचे आहे अथवा आपण जे काही वाचतोय आणि सांगतोय (कारण तो लेख कुठल्याशा सनातनी संकेत स्थळावरील होता), त्यात आपण बदल करायची गरज आहे.
आता मी जरा माझ्या सुरवातीच्या "लिबरल" शब्दावरून लिहीतो: अमेरिकेत (सामाजीक) जे काही मी पाहीले आणि अनुभवले त्यावरून असे वाटते की येथे विचारस्वातंत्र्य आणि भाषणस्वातंत्र्याचा अतिरेक होतो. यांचे "लेट नाईट शोज्" (चुकीचा अर्थ घेउ नका! सध्यस्थितीवर मार्मीक भाष्य करणारे कार्यक्रम) अथवा "सॅटरडे नाईट लाईव्ह" सारखे कार्यक्रम पाहीले तर समजेल की हे वाट्टेल त्यांची वाट्टेल तशी थट्टा करतात. कधीतरी माझ्या दृष्टीने असभ्यतेचा अतिरेक होतो... तसेच कलेच्या नावाखाली कुठलीही चित्र काढली जातात ज्यात कुणाच्याच धार्मीक भावनांचा विचार केला जात नाही. त्यावर अर्थातच येथले सनातनी- कॉन्झर्वेटीव्ह्ज ख्रिश्चन्स चिडलेले असतात, त्याला विरोध करतात पण तरी देखील एकंदरीतच असले स्वातंत्र्य आहे हे त्यांना मान्य असते आणि त्या "स्वातंत्र्या"च्या विरोधात ते देखील नसतात. परीणामी भावनीक नाजूकपणा आणि त्यातील चिथावणी ही हळू हळू कमी झालेली असते.
आपल्याला एखाद्या आवडत नसलेल्या गोष्टीस बंदी आणली तर त्यात आपण समाजाला आंजारत-गोंजारत त्यांच्यातील दरी नकळत वाढवतो, त्यापेक्षा जे काही प्रदर्शीत करायचे ते करा(अर्थात सभ्यतेच्या मर्यादा न सोडता - रस्त्यावर नंगानाच करा असा याचा अर्थ नाही!) . ज्यांना आवडले नाही ते वैयक्तिक अथवा संघटीत विरोध करू शकतात, वाद घालू शकतात इत्यादी. काळाच्या कसोटीवर असले लिखाण जेंव्हा समान स्वातंत्र्य असते आणि ते वापरले जाते तेंव्हा टिकत नाही हा अनुभव आहे.
येथे बर्याचदा हिंदू देव-देवतांची आपल्याला (हिंदूंना) विटंबना वाटेल असले प्रकार पाहीले आहेत. त्याला विरोध करावा का यावर चर्चापण केल्या आहेत. काहीजण सह्यांच्या मोहीमा करतात, अपमान वगैरे म्हणून ओरडतात. पण नीट विचार केल्यावर लक्षात येते की असली विटंबना करणारे या देशातील बहुसंख्य ख्रिश्चन धर्माच्याबाबतीत पण फार काही वेगळे वागत नाहीत. मग आपण याला विरोध न करता जर दुर्लक्ष केले तर त्यांना मिळणारी प्रसिद्धीपण मिळत नाही आणि काळाच्या ओघात ते टिकतही नाही...(म्हणून मी याचा येथे उल्लेख केला असला तरी तसल्या संकेतस्थळांचे दुवे येथे देत नाही आहे!) . अर्थात जेंव्हा वाईट लेख ह्तूपुर्स्पर लिहीले गेले, चुकीचे संदर्भ तयार केले गेले तेंव्हा त्या बुद्धीवादाला बुद्धीवादाने सातत्याने तोंड दिले गेले आणि आजही दिले जाते. पण एकंदरीत जे काही वाईट सांगीतले गेले (अगदी योगासने म्हणजे चेटूक!) त्याचा ना हिंदू धर्माला ना येथील हिंदूंना तोटा झाला. उलट या वर्षी अमेरिकन सिनेटपासून अनेक राज्यांच्या अधिवेशनारंभी हिंदू प्रार्थनेने सुरवात झाली - हिंदू लोकप्रतिनिधी नसताना! योगासनांच्या बाबतीत तर विचारूच नका आज काय पेव फुटलयं ते!
आता विचार करा, आपल्याकडे भराभर सेन्सॉरशीप करतात आणि काय होते ते:
- खोमेनींचा आवडता लेखक होता सलमान रश्दी! त्याचे सेटानीक व्हर्सेस पुस्तक जगात सर्वत्र छापले गेले. त्याच्यात इस्लामचा कथीत अपमान आहे. त्या आधीच्या पुस्तकात त्याने शंकराबद्दल पण वाट्टेल ते लिहीले होत्ते. पण त्या पुस्तकावर बंदी घातली गेली नव्हती. तर सेटानीक व्हर्सेस वर सर्वात प्रथम बंदी कुठे घातली गेली तर या सेक्यूलर भारतात! पुढची कथा सर्वांनाच माहीत आहे जी सलमान रश्दी आजही जगतोय!
- तीच कथा आंबेडकरांच्या "रीडल्स" ची ज्यात रामाला नावे ठेवली होती
- तसेच अरूण शौरींच्या आंबेडकरांच्या पुस्तकाबद्दल
- जेम्सच्या पुस्तकामुळे संभाजी ब्रिगेडने केलेले भांडारकर प्राच्यविद्यासंस्थेचे ऐतिहासीक नुकसान हे अक्षम्य आहे - सामाजीक अपराध आहे.
- आणि त्या उलट झकीर नाईक ची वाट्टेल ती भाषणे सार्वजनीक ठिकाणी चालू शकतात आणि यूट्यूबवर उपल्ब्धही होऊ शकतात.
थोडक्यात असली सेन्सॉरशीप ही सोयीच्या राजकारणाने होते आणि त्याचा झालाच तर तोटाच होतो ह्या निर्णयाप्रत यावे लागते. म्हणून योग्य अथवा अयोग्य बुद्धिवादावर, कले-वर, विशेषकरून कुणाच्या तरी भावना दुखावतोय म्हणून सेन्सॉरशीप आणणे हे पटत नाही. त्यापेक्षा समाजाला सांगायची वेळ आली आहे की आता परीपक्व हो, व्यक्ती तितक्या प्रकृती या असणारच, बुद्धीवादाला बुद्धीवादाने उत्तरे द्या. हे संपूर्ण समाजाला लागू करा - कुठलेही बंधन नको - जात-पात, पंथ, धर्म. सुरवातीला पचायला अवघड जाईल पण यातूनच एकमेकांच्या विरोधातील विचार मान्य करायची आणि तरीपण एकत्र राहण्याची वृत्ती वाढेल असे वाटते.
निदान हिंदू इतिहासाचा विचार केला तर धर्माच्या बाबतीत चार्वाक, बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ आणि कळस करणारे तुकारामही झाले, ज्या सर्वांनी प्रस्थिपितांविरुद्ध बंड पुकारले आणि कालानुरूप हिंदूधर्माला घडवले. या आणि अशा अनेकांचे आपण वारस आहोत. त्यामुळे अमेरिकन अर्थाने नाही तरी स्वातंत्र्य हे सर्वार्थाने मानले पाहीजे आणि हळूहळू आचरणात आणले पाहीजे असे वाटते.
Comments
गोबेल्स तंत्र प्रणाली
मान्य. पण जेव्हा आपल्याला मुद्द्यांचा प्रतिवाद करणे कठीण जाते त्यावेळा गाडी गुद्दयांवर येते. ही मुस्कटदाबी प्रत्येक क्षेत्रात होत असते. मग स्वातंत्र्याची अभिव्यक्तीचा मुद्दा येतो. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार' याचा खरा अर्थ म्हण्जे आपल्याला मान्य नसलेले मुद्दे समोरच्या व्यक्तीला व्यक्त करण्यास प्रतिबंध होत असेल, त्याची गळचेपी केली जात असेल तर त्यालाही विरोध करायला हवा. पण तसे क्वचित घडताना दिसते. चाणक्यनितीला ते मान्यही नसते. सत्य हे काही डिजीटल भाषेत ० किंवा १ या बायनरी संकेतात मांडता येत नाही. पण तर्काचा आधार घेउन 'एखादी गोष्ट सत्य नसेल तर ती असत्य असली पाहिजे' [किंवा या उलट]या संगतीवर मांडली जाते. पण अर्धसत्य किंवा अंश सत्य हा भाग असु शकतो . मग सत्याचा अंश असलेला भाग असत्यासोबत असा काही प्रकाशात आणायचा कि तो जर तपासला तर तो सत्यच असेल. किंबहुना तो तपासला जावाच असा आग्रही सूर आपणच लावायचा.मग उर्वरित भागही सत्यच असला पाहिजे असा समज होतो.[ शितावरुन भाताची परिक्षा] मग एकदा जनमत अनुकुल झाले की उर्वरित असत्याचा मारा केला कि तोही सत्याचाच एक भाग बनुन जातो. जनरल गोबेल्स ने याचा प्राथमिक वापर हिटलरसाठी केला. म्हणुन गोबेल्स तंत्रप्रणाली. बेटा व्हर्जन. त्यात तर सत्य दडवुन ठेउन केवळ असत्याचा सातत्याने असा काही मारा करणे कि कालांतराने सत्य पुढे आले तरी ते असत्य म्हणुन गणले जाईल. अशा अवस्थेत ती प्रणाली होती. आजही ती कालबाह्य आहे असे नाही.
पण गुद्द्यांचा स्वस्त व जवळचा पर्याय उपलब्ध असताना बुद्धिवादाला बुद्धिवादाने उत्तर हा महाग व लांबचा मार्ग कोण स्वीकारतो? भांडारकरसंस्थेवर प्रत्यक्ष हल्ला करणारे हे भाडोत्री होते. एक क्वार्टर व वडापाव एवढ्या शिदोरीवर काम करणारे बेरोजगार युवक आज सहज उपलब्ध आहेत. त्यांना नंतर सोडवुन आणण्याची सोय केली म्हणजे झाले. पुढच्या हल्ल्याला ते उपयोगाला येतात.
प्रकाश घाटपांडे
सहमत
विकास ह्यांच्या विचारांशी, उपक्रमाच्या संदर्भात मी सहमत आहे.
वैय्यक्तिक हल्ले, अपशब्द, सभ्यतेच्या मर्यादा उल्लंघून केलेले लिखाण एव्हढे सोडून येथे सर्व प्रकारचे लिखाण येऊ द्यावे. ज्या लेखाच्या संदर्भावरून विकासांनी हा चर्चाप्रस्ताव मांडला आहे, त्या लेखावर झालेली चर्चा अत्यंत समतोल होती. ती संपूर्ण चर्चा तशीच राहू द्यावी. येथील सभासदांच्या परिपक्वतेचा तो एक चांगला नमुना आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.
अशा स्थळांनी उदारमतवादी (लिबरल) धोरण स्वीकारणे सोयिस्कर. तेथील सभासद जर परिपक्व असतील-- आणि उपक्रमाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत इथले सभासद असे आहेत असे मलातरी दिसून आले---, तर आपसूकच टोकाच्या चर्चांना तेच सयुक्तिक प्रत्युत्तर देतील. तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टींचा भावनिक बाऊ नको. जे चालले आहे, ते तसेच संपादकांचा फारसा हस्तक्षेप न होता चालू द्यावे.
सहमत
बर्याच अंशी सहमत आहे. सेन्सॉरशिपने काहीही साध्य होत नाही असे माझे मत आहे. ख्रिस्त धर्माबद्दलही सहमत आहे. याची राजधानी असलेल्या इटलीमध्ये पोप, धर्मगुरू यांच्यावर रोज विनोद होत असतात पण त्यामुळे कुठेही जाळपोळ होताना दिसत नाही. (दा विंची कोडमुळे भारतातील ख्रिस्ती लोक दुखावतात, पण इथे काही होत नाही.) प्रक्षोभक वक्तव्ये अथवा कृती यामुळे होणारी जाळपोळ किंवा विध्वंसक प्रकार यांचे प्रमाण भारतात फार मोठे आहे. इथे प्रस्तुत लेखाच्या संदर्भात अजून एक मुद्दा आहे. लेखकाला आपल्या मतांबद्दल इतरांशी चर्चा करायची इच्छा असल्याचे दिसत नाही. यामागचे कारण ज्याचे त्याने शोधावे. आणि लेखाला आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर म्हणून मूळ लेखाची गाडी वेगळ्या दिशेने वळवणे यापलिकडे लेखकाने दुसरे काही केलेले दिसत नाही. उपक्रमावर सेन्सॉरशिप नको, पण एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांचा बदला घ्या अशा सरळ शब्दांतील घोषणा असू नयेत असे वाटते. याचा अर्थ उपक्रमी त्यामुळे प्रभावित होतील असे नाही. पण उगीच यांना मारा, कापा वगैरे लिहील्याने काही साध्य होते असे वाटत नाही. (फक्त काही सदस्यांना आपण शूर आहोत असे वाटू शकते, त्यापलिकडे काही नाही.)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
प्रश्न केवळ सेन्सॉरशिपचा नाही
गणेश तांब्यांच्या (बहुधा हेच त्यांचे योग्य नाव असावे, नसल्यास क्षमस्व!) ज्या लेखाला माझा आक्षेप होता तो सेन्सॉरशिप वगैरे बद्दल नाही. उपक्रमाने जी धोरणे बनवली त्या धोरणांत स्पष्टपणे तो लेख येत नाही, परंतु अशा सवंगतेची (मला तो लेख सवंग वाटला) उपक्रमाला गरज आहे काय हा प्रश्न आहे. उपक्रमावर कितीही नाही म्हटले तरी सेन्सॉरशिप आहे आणि माझ्यामते प्रत्येक खाजगी स्थानाला, व्यक्तीला, समाजाला पुढे जाण्यास जर एखाद्या मार्गाची गरज असेल आणि ते करताना काही गोष्टी गैरलागू वाटत असतील तर त्यांनी हव्या त्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत आणि नको त्या टाकून दिल्या पाहिजेत. अर्थातच, या घेण्या-टाकण्यांत खोमेनी किंवा तालीबानी स्टाईल सेन्सॉरशिप मोडत नाही आणि ती आपल्यापैकी कोणालाच नको आहे हे मान्य. पण अतिशय मर्यादित स्वरूपातील सेन्सॉरशिप सर्वत्र गरजेची वाटते. जशी, अमेरिकन चित्रपटांना लागू असते. शाळांत लागू असते, ऑफिसात लागू असते. प्रत्येक स्थानाचा एक "कोड" असतो, त्याला वेगळ्या शब्दांत सेन्सॉरशिपच म्हणावे लागेल पण तो असावा असे माझे मत आहे.
असो. याच बरोबर, तसे लेख येथे असल्याने त्या प्रकारचे सहमतीदर्शक विचार मांडणार्या व्यक्तींना येथे वाव मिळेल, किंवा उद्या उपक्रमाबाबत गैरप्रसिद्धी होईल असे वाटते. त्या लेखावर ज्यांनी मतप्रदर्शन केले ते आपण अतिशय थोडके उपक्रमी आहोत, पण गणेशरावांच्या विचारांनी आकर्षित होऊन त्यांच्या विचारांचे अधिकजण उपक्रमावर वळले आणि उपक्रमाचा वापर त्याच अजेंड्याखाली होऊ लागला तर आपण सतत विरोध करणार्यातले नाही हे मान्य करावे लागेल. तेव्हा येथले मूठभर उपक्रमी काय करतील? आणखीन दुसरे संकेतस्थळ मिळते का पाहतील, जसे तालीबानींच्या राज्यात मवाळ लोकांनी जीव वाचवण्यासाठी स्थलांतरे केली तशी? थोडा हटके विचार करून पहा, आपल्यापैकी बर्याचजणांनी एका जुन्या संकेतस्थळावरील काही लोकांची मुजोरी, धोरणांची अस्पष्टता, विचारांना पूरक असे खाद्य न मिळाल्याने उपक्रमाच्या दिशेने आपली पावले वळवली आहेत.
मला वाटतं, अशा लेखांना प्रसिद्धी दिल्याने उपक्रमाची अवस्था उद्या एखाद्या सायंकालीन वृत्तपत्र किंवा टॅब्लॉईडसारखी होऊ नये.
या राजेंद्रच्या म्हणण्याशी १००% सहमत.
धन्यवाद आणि सहमत
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
आपल्या सर्वांशीच सहमत आहे आणि आपण फार कोणी वेगळे काही बोलतो आहोत असे वाटले नाही. राजेंन्द्रने म्हणल्याप्रमाणे आणि प्रियालीने अनुमोदन दिल्याप्रमाणे माझापण भडक मथळ्यांनाआअणि एकंदरीतच त्या पद्धतीच्या भाषेला विरोधच आहे.
मी हा चर्चा-लेख वास्तवीक त्या चर्चेच्या बाबतीत लिहीला नव्हता, अर्थात ती चर्चखे लिहीण्याला कारणीभूत नक्कीच झाली. त्यावरील साडपडसाद बघत असताना मी वरील मूळ चर्चा-लेखात ज्या काही भारतीय घटना मी उल्लेखल्या (रश्दी, आंबेडकर, शौरी, जेम्स इत्यादी) त्या आणि त्यावर होणारा "राडा" आठवला. पण त्याच प्रकारचे प्रसंग जेंव्हा अमेरिकेत घडतात आणि आता मला वर राजेंद्रच्या प्रतिसादातून कळले त्याप्रमाणे इटलीतही घडतात त्या विचारात घेतल्या तर सामाजीक आणि राजकीय प्रतिक्रीया मध्ये असणार्या परीपक्वतेत आणि आपल्याकडील त्याच प्रकारातील फरक जाणवतो.
थोडक्यात चर्चेचा सूर हा त्या संदर्भात होता की आपण पटकन कुठलीही "रीऍ़क्शन" देताना भावनात्मक होण्याची गरज नसते. (अर्थात हे मी पण अनुभवातूनच शिकलो आहे, जरी कधी हातात दगड घेतला नाही अथवा कुणाच्या हातातला दगड झालो नसलो तरी!) . त्या अर्थी जे काही तांबेसाहेबांच्या चर्चेची "फलश्रुती" झाली ती प्रदीप यांनी म्हणल्याप्रमाणे मॅच्यूरीटी दाखवते.
आता राहता राहीला प्रश्न प्रियालींनी म्हणल्याप्रमाणे , "..त्यांच्या विचारांचे अधिकजण उपक्रमावर वळले आणि उपक्रमाचा वापर त्याच अजेंड्याखाली होऊ लागला तर ..." हा प्रश्न नक्कीच आहे. त्यावर मात्र उपक्रम संपादकांनी समजावणीच्या सुरात येथे (त्या चर्चेत) लिहायला हवे असे वाटते आणि परीणाम पण सांगावे असे वाटते.
अवांतरः माझ्या आत्ता लक्षात आले म्हणून ... माझा आणि उपक्रमसंपादकांचा/मंडळाचा काही संबंध नाही. मला व्यक्तीगत यातील कोणी माहीतही नाहीत आणि ते शोधण्याच्या मी (चांगल्या अर्थे) भानगडीतही पडत नाही! त्यामुळे मी चर्चेत जर काही त्यांचे "ऍप्रिसिएशन" केले असेल तर ते केवळ मला तसे जे काही निरीक्षणांती वाटले तेव्हढेच होते!
पॅराडॉक्स
काहीही कारण नसताना माझे प्रतिसाद उडवल्याच्या चर्चेत, निव्वळ 'मी इथे नविन आहे' आणि 'मला संपादक कसे काय माहीत?' ह्यावर तोंडसुख घेणारे इथले सभासद ह्या चर्चेत मात्र सेन्सॉरशीप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हिरीरीने मतं नोंदवताना पाहून आश्चर्य वाटले.
शेवटी अभिव्यक्ती आणि सेन्सॉरशीप म्हणजे ज्याची त्याची सोय हेच खरे!
खुलासा
शेवटी अभिव्यक्ती आणि सेन्सॉरशीप म्हणजे ज्याची त्याची सोय हेच खरे!
माझा मूळ चर्चा-लेख आणि नंतरचा त्यातीलच माझा प्रतिसाद तसेच इतरांचेही प्रतिसाद वाचल्यास लक्षात येईल की ही चर्चा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चाललेली नाही आहे तर एकंदरीतच दुसर्याच्या भावना दुखावतील या भितीने लेखनावर आणि विचारांवर सेन्सॉरशीप आणण्यावर आहे. त्यात स्वातंत्र्याबरोबर येणारी सभ्यतेची जबाबदारी ही गृहीत धरली आहे. त्यासंदर्भात आपल्याला काय वाटते ते समजून घेयला आवडेल.
...काहीही कारण नसताना माझे प्रतिसाद उडवल्याच्या चर्चेत, ...
आपण नक्की काय लिहीले होते ज्याचे संपादन केले गेले याची मला कल्पना नाही. पण तो विषय हा आपल्याला आलेल्या व्यक्तिगत अनुभवांचा आणि त्यावरील आपल्या अनुमानाचा असल्याने या चर्चेच्या संदर्भात वेगळा ठरतो असे वाटते.
ज्युरी ही कल्पना कशी वाटते?
नमस्कार.
मूळ लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचले.(ज्याचा "भडक" म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. )
एक छोटीशी गोष्ट सुचवाविशी वाटली:-
असे लेख योग्य वाटत नसल्यास(पूर्वी फौज दारी खटल्यांमध्ये सल्ला देण्यास असणारे) "ज्युरी" ही संकल्पना अमलात आणायला जमेल काय?
म्हणजे ,आपल्यातीलच काही जुने,जाणते ,अनुभवी आणि परिपक्व मंडळी निवडायची,
आणि त्यांचा सल्ला घ्यायचा.(आणि त्या सल्लयावर त्यापुढे अधिक विचार/चर्चा नकोत.)
शक्यतो सल्ला अमलात आणला जावा.
पहा.आला मनात विचार.टाकला खरडून.
पण काही तथ्यांश वाटला तर सुरु करायला हरकत काय आहे ?
जन सामान्यांचे मन
(मनातील विचारांना व्यवहार्यतेचे बन्धन नसते.
मन लावते "उपयुक्त" शोध.
तेच शोध पुढे कालांतराने व्यवहार्य होतात.)