बाबा आमटे

बाबा आमट्यांना आदरांजली....

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन

आनंदवन,
मटा ऑनलाइन प्रतिनिधी

कुष्ठरोग्यांसाठी आपलं आयुष्य वेचणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे आज पहाटे चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांना कर्करोग होता.

वर्ध्यातील हिंगणघाट येथे श्रीमंत जहागीरदार कुटुंबात जन्मलेल्या बाबा आमटे कायद्याचे पदवीधर होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथे त्यांनी वकिली सुरू केली, मात्र सभोवतालची गरिबी आणि दारिद्र्याने पिचलेली माणसे पाहून त्यांनी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. ऐहिक सुखांची पर्वा न करता कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी स्वत : ला वाहून घेतले. चंद्रपूरमधील आनंदवन हेच त्यांचे सर्वस्व झाले.

राष्ट्रीय एकात्मकतेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. भारतभरात शांतता नांदावी आणि पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून ‘ भारत जोडो ’ आंदोलनाद्वारे कन्याकुमारीपासून काश्मीर आणि गुजरात ते अरूणाचल प्रदेशपर्यंत त्यांनी जनजागृती केली होती. नर्मदा आंदोलनातही स्थानिकांवर झालेल्या अन्यायविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता.

पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे अशा अनेक पुरस्कारांनी पुरस्कारांनी गौरवण्यात अत्यंत साधी रहाणी असलेल्या बाबांना १९७८ साली पद्मश्री तर १९८६ साली पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले.

Comments

बाबांना माझी आदरांजली!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
बाबांसारख्या थोर समाजसेवकाच्या जाण्याने गरीब,पिडीत आणि कष्टकरी लोकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. तसेच आजच्या स्वार्थी युगात आपल्या सेवाभावी वृत्तीने दीपस्तंभासारखा इतरांना मार्गदर्शक ठरणारा प्रेरणेचा स्त्रोत अनंतात विलीन झालाय. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही.
बाबांना माझी मनःपूर्वक आदरांजली.

भारतमातेचे खरेखुरे सुपुत्र

बाबांना माझी मनःपूर्वक आदरांजली.

त्यांचे कार्य, त्यांची मुल्ये यांचा भारतात दिवसेंदिवस प्रभाव वाढो ही मनापासुनची इच्छा.

नम्र आदरांजली

त्यांचे कार्य त्यांच्या पाठीमागे प्रेरणा देत राहील.

माझीही!

नम्र आदरांजली! त्यांचे कार्य त्यांच्या पाठीमागे प्रेरणा देत राहील.

सहमत आहे.

आदरांजली

वाचून फार वाईट वाटले. या थोर प्रेरणादायी पुरुषास मनःपुर्वक आदरांजली.

त्यांना भारतरत्न जिवंतपणीच मिळायला हवे होते असे मात्र राहून राहून वाटते आहे

(दु:खी) ऋषिकेश

आहे ते बरं आहे

मुळात बाबांनी पद्मश्री आणि पद्मविभूषण परत केलेले आहेत. ते हयात असताना नर्मदा आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांनी तसे केले होते. अजूनही तो प्रश्न सुटलेला नसल्याने शासनाकडून त्यांनी नवा पुरस्कार स्विकारला असता की नाही अशी शंका वाटते. सरकारनेही त्यांच्या भूमिकेचा आदर करून त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची बळजबरी करू नये.

अभिजित...

आदरांजली

आदरांजली व्यतिरिक्त दुसरे काय करु शकतो? बाबा आम्हाला देवदूतच वाटत. त्यांच्या ठायी असलेली प्रेरणा ही चिरंतन कशी टिकली ? याचे मला नेहमी कोडेच वाटत आले.
नतमस्तक
प्रकाश घाटपांडे

असेच

बाबा आमट्यांना आदरांजली.

हेच

आदरांजली व्यतिरिक्त दुसरे काय करु शकतो? बाबा आम्हाला देवदूतच वाटत. त्यांच्या ठायी असलेली प्रेरणा ही चिरंतन कशी टिकली ? याचे मला नेहमी कोडेच वाटत आले.

अगदी मनातले बोललात!

त्यात आजच मोटरसायकल डायरीज नावाच्या चित्रपटात कुष्ठरोग्यांच्या आश्रमात जाऊन काम करणारा नायक तर मला बाबा आमट्यांचा रुपातच दिसत होता.

आपला
गुंडोपंत

आदरांजली

बाबांना मनःपूर्वक आदरांजली.
इतरांसाठी सगळे आयुष्य खर्ची घालणार्‍या या महामानवाला त्रिवार अभिवादन.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आदरांजली

बाबांना मनःपूर्वक आदरांजली.

सामाजिक युवाकंप घडण्याची भूमी

बाबा आमटे यांचा मटाच्या वर्धापन दिनी लिहीलेला एक लेख देते आहे. आधी एक छायाचित्रांचा संग्रह -
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/2769046.cms

सामाजिक युवाकंप घडण्याची भूमी: बाबा आमटे

भांडवलशाहीला महाराष्ट्रातला एक फार मोठा वर्ग साथ देऊ लागला आहे. कारण , त्याला माहिती आहे की हे ' कन्स्ट्रक्शन ' म्हणजे ' क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन ' आहे , तरीही त्याची चांगली बाजू ' क्रिएटिव्हिटी ' ही नाकारता येत नाही. नैसगिर्क आपत्ती -जसे धरणीकंप , ज्वालामुखी- यांपासून होणाऱ्या नुकसानाबरोबरच त्याची एक चांगली बाजूही असते ; नद्यांचे प्रवाह बदलून गाळाच्या सुपीक जमिनींची निमिर्ती होणे किंवा लाव्हारसाच्या पसरण्यातून अत्यंत सुपीक प्रदेश निर्माण होणे , या चांगल्या बाजू नैसगिर्क आपत्तीमागे दडलेल्या असतात. तसेच आधुनिकीकरणाची चांगली बाजू निश्चितच आहे... ज्याची जाणीव महाराष्ट्रातल्या आजच्या तरुण पिढीला आता होत आहे. त्यामुळेच ती त्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

महाराष्ट्रात जातीच्या बरगड्या खिळखिळ्या झालेल्या दिसतात. ही सामाजिक प्रगतीची नवी जाण आहे. महाराष्ट्राची चांगल्या विचाराचे बाळसे धरणारे राष्ट्र म्हणून ख्याती आहे. जातीयतेचे , धर्मांधतेचे पापुदे आज गळून पडले आहेत. ' मायावती फॅक्टर ' जो देशात आलेला आहे , तो सामाजिक जीवनाला एक नवा चेहरा देईल ही जाणीव आज समाजात रुजते आहे. जशी कोंबडीची पिल्ले लहानपणी आईबरोबर उकिरडे उकरत फिरताना हळूहळू मोठी होतात व मग ढिगावर उभी राहून बांग देतात तशी आजची तरुण पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात जागृतीच्या बांगा देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवेल.

महाराष्ट्रातल्या सर्वच थरांतील लोकांना व्यथेची आच लागलेली मला स्पष्ट दिसत आहे. ज्यामुळे कोंडलेल्या जाणिवेचा पक्षी पिंजऱ्यातून मुक्त होतो , असे शिक्षणच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवेल. म्हणून महाराष्ट्राला अन्य राज्यांपेक्षा चांगले दिवस येतील असे मी मानतो. जसे दु:खाला जातीपातीचे वावडे नसते तसे प्रगतीलाही याबाबतीत रस नसल्यामुळे तिची पोषकता सातत्याने वाढत जाते.

अशा तऱ्हेने विचार करणारे समूह अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहेत. त्यामुळे ' सामाजिक युवाकंप ' जर देशात आज कुठे होईल तर तो महाराष्ट्रातच , याची मला खात्री आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची आथिर्क राजधानी आहे. म्हणून आज सामाजिक प्रगतीची जाणीव जनमानसात कमी दिसत असली तरी , भविष्यात नव्या प्रगतीचे मोहोळ उडून ते वेगवेगळ्या प्रवृत्तींवर बसून त्यांचा विकास घडवताना दिसेल.

भारतीय खेड्यांच्या गर्भाशयात राष्ट्राची वाढ होत असते. वेगवेगळ्या समाज क्षेत्रात झोकून देणाऱ्या संस्थांची संख्या महाराष्ट्रात सातत्याने वाढते आहे. खेड्यांच्या सबलीकरणातून प्रगत आणि संपन्न राष्ट्रांची निमिर्ती होते. याबाबतीत अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्र फार पुढे आहे.

' आकाराचा मोह पण दिशेची निश्चिती असलेले ' असे राष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा गौरव होईल. आज मावळतीच्या सूर्याला पाहताना समाधानाची , तृप्तीची भरलेली घागर घेऊन मी भविष्यातील लोभस महाराष्ट्राचे दर्शन घेतो आहे.

मूळ लेख -

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2768742.cms

बाबा, खरंच जिंकलेत...!

या चर्चेत प्रतिक्रीया देताना, जर कुठला चांगला लेख वगैरे मिळाल्यास/आवडलेला असल्यास आपापल्या प्रतिसादात चिकटवावा असे सुचवावेसे वाटत आहे.

बाबा, खरंच जिंकलेत...!

(मेधा पाटकर)
"नर्मदा बचाओ'च्या कार्याबाबत, या आंदोलनाच्या कार्यप्रणालीबाबत अनेकदा माध्यमांतून प्रश्‍न विचारले जायचे. कधी निमित्त भूमिकेचं असायचं, तर कधी पैशाचं. माझ्यावर, या आंदोलनावर संपूर्ण विश्‍वास ठेवणारा माणूस म्हणजे बाबा आमटे. ते माझे परीक्षक होते. आंदोलनाच्या प्रत्येक वळणावर त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांवर अक्षरशः वरदहस्त ठेवला. कधीही कुठला बडेजाव नाही, साऱ्यांवर नितांत प्रेम अन्‌ श्रद्धा. कुठल्याही वेळी बाबांना ओ द्यावी आणि बाबांकडून उत्तर आलंच म्हणून समजावं. .......
आम्हा कार्यकर्त्यांचं काही चुकलं तर ते रागवायचेही; पण त्यांच्या पोटात कायम माया असायची, कळकळ असायची. घाटीतली गावं डुबखाली जात असताना कधी उपोषण; तर कधी जलसमाधीसाठी बसले की बाबा रागवायचे, या आंदोलनास तुझी गरज आहे, असं अगदी आतून सांगायचे. "नर्मदा बचाओ'मधून गेल्यानंतरही ते अनेकदा सांगायचे, "मेधे स्वतःला जप. कधी तरी रात्री-अपरात्री तू जलसमाधी घेतेस, असा भास होतो....' एका कार्यकर्त्यांच्या जीवासाठी बाबांचे असणारे प्रेम आणि व्यक्तिगत पातळीवरील स्नेह मला नेहमीच बाबांकडून मिळाला. साधनाताई आणि बाबा या दोघांना तर कधीच वेगळं काढता येणार नाही. ताईंनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं असलं तरीही बाबांनी मात्र मला नेहमी मैत्रिणीसारखंच वागवलं. नर्मदेकडे पाहिल्यावर मोक्ष मिळतो, असं आपण नेहमी ऐकतो. बाबा म्हणायचे, नर्मदा माझी प्रेयसी आहे.. निसर्गाचं आणि त्याच वेळी जागतिक बाजारपेठेचं त्यांना प्रचंड आकर्षण होतं. नर्मदेकाठून गेल्यानंतर जेव्हा-जेव्हा त्यांच्याशी बोलणं होई, तेव्हा तेव्हा ते म्हणत, "...बघितलंस मेधा, नर्मदेच्या काठी होतो तोवर मी अगदी ठणठणीत होतो, माझ्या प्रेयसीपासून दुरावलो अन्‌ आजारी पडायला लागलो!' बाबांनी नर्मदेला आपल्या कवितांच्या शब्दरूपात बांधलं. सांगायला संकोच वाटतो; पण तरीही बाबांनी माझ्यावर लिहिलेल्या काही ओळी हा माझा सन्मानच होता!

बाजारपेठेतील अर्थकारण, जगाच्या परिघावर त्यांचा होणारा प्रभाव याचे अगदी अचूक ज्ञान त्यांना होते. त्यांनी स्वतःमधला विद्यार्थी कायम जागा ठेवला होता. समाजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींचा त्यांच्यातला कार्यकर्ता नेहमीच वेध घेत असे. नर्मदा सोडून आंदोलनातील इतर प्रश्‍नांच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा मी बाहेर जात असे तेव्हा, माझं नर्मदेकडे लक्ष नाही अशी ओरडही होत असे. मात्र त्या वेळी बाबा माझ्या पाठिशी उभे राहत. आज घाटीत कोणतीही अडचण आली, तर रात्री अपरात्री मेधा तिच्या हातातलं काम टाकून धावत येईल, अशी समज ते ओरड करणाऱ्यांना देत. बाबांना शासन, राज्यकर्ते, त्यांची धोरणं याविषयीही पूर्ण माहिती होती. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाविषयी त्यांनी कधीही मौन बाळगलं नाही. आपल्या रोखठोक शैलीत त्यांनी नेहमीच त्याचा समाचार घेतला. बाबा नर्मदा आंदोलनातून बाहेर पडले तेव्हा तिथल्या व्यवहारांस कंटाळले, अशीही ओरड झाली; पण बाबांनी आंदोलनावरचा स्नेह कायम ठेवला. एकेका कार्यकर्त्यावर असलेलं त्यांचे लक्ष आम्हाला अनेकदा अचंबित करून जायचं. संजय संघवईने खूप दिवस काही लिहिलं नाही की ते त्याला बोलावून घ्यायचे. आई पट्टी घेऊन मुलाला अभ्यासाला बसवते तसा शब्दाभ्यास ते संजयकडून करून घ्यायचे.

बाबांचे नर्मदेतील ज्या गावांत वास्तव्य होते, त्या गावात फूट पाडण्याचे प्रयत्न जोरात होते. बाबा आमच्यासोबत आंदोलनात उतरले तेव्हा सीमेवरच गुजरात सरकारकडून त्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. या गावातील माणसांमध्ये फूट पाडण्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत होते. आंदोलनातील इतर कार्यकर्ते हट्टी आहेत; मात्र बाबांना गुजरात सरकारची बाजू कळेल. त्यामुळे त्यांनी चर्चा करावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते; पण बाबांनी मात्र त्या वेळी हे सारे प्रयत्न हाणून पाडले. शरीर अस्वस्थ असतानाही ते मणिबेलीला गेले. तेथील आदिवासींना मायेने जवळ घेऊन त्यांच्याशी ते बोलले. आंदोलनाबाबत आमची जी भूमिका होती, त्यात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही; मात्र जगातील वेगवेगळ्या आंदोलनांच्या रणनीती त्यांनी समजून घेतल्या.

त्यांच्या कृतीत अन्‌ उक्तीत कधीही फरक नसायचा. बोले तैसा चाले... ही त्यांची कार्यप्रणाली होती. संघर्ष आणि निर्माण हा आंदोलनासाठी असणारा समन्वय त्यांच्या कार्यात वेळोवेळी जाणवला. ते जितके गांधीविचारांचे होते तितकाच त्यांच्यावर आंबेडकरांचाही प्रभाव होता. त्यांनी उभारलेलं काम कधीही संपणार नाही. त्यांनी समाजकार्याचा निव्वळ ढाचा उभारला नाही, तर जीवाचं रान करून कार्य करणारी माणसं उभी केली. कुठे तरी रस्त्यांवर राहून आयुष्यभर काम करायचं, असाही बाबांचा कधीच आग्रह नव्हता. कार्याला दिशा, माणसांना आयुष्य या न्यायाने ते कायम झिजले. इतिहासात थोडंसं डोकावून पाहिलं, तर असं दिसतं समाजकारण्यांचे कार्य पुढच्या पिढीने खंदेपणाने चालू ठेवले अशी माणसं खूपच कमी. पण बाबांच्या वटवृक्षाच्या छायेत पुढील दोन पिढ्या आहेत... नेटाने बाबांची कार्ययात्रा पुढे नेत आहेत.

बाबा, खरंच जिंकलेत...!

- मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
(शब्दांकन - शर्मिला कलगुटकर)

ॠषीतुल्य व्यक्तिमत्व.

बाबांचा जीवन बघितला तर ॠषींचे जीवन कसे असावे याचा अंदाज येतो. बाबांना तसे दिर्घायुष्य मिळाले. अश्या व्यक्ती कधीही मरत नसतात. त्यांचे विचार आणि आचरण आपणा सर्वांना निश्चितच प्रेरणा देत राहतील.

अभिवादन

बाबांनी स्वतःचे जीवन हे सामान्य माणसांठी वेचले, तसेच दूरदृष्टीने आपले कार्य पुढे नेण्यासाठी माणसे व संस्था उभ्या केल्या. बाबांच्या सेवाभावाला व दूरदृष्टीला माझे विनम्र अभिवादन

दलाई लामा

दलाई लामा

"At the time I could not help feeling that here was someone who was truly compassionate. In fact, I told him at the time that whereas my compassion is just so much talk, his shone through everything he did, including his work for creating greater awareness about the protection of our environment."


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चांगले

चांगले काही वाचायला मिलाले.
लेखकांना धन्यवाद.

शिवानी

 
^ वर