'प्रायव्हेट ट्रीटिज्'

वृत्तपत्रामध्ये एखादी गोष्ट छापून आली म्हणजे ती खरी आहे असे समजणारे अनेक लोक आहेत. अन्य (ईलेक्ट्रॉनिक)माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रे अजूनपर्यंत तरी अधिक विश्वासार्ह मानली जात असत (किंबहुना मानली जातात). या विश्वासार्हतेला आता हळूहळू तडे जाऊ लागले आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र प्रकाशित करणार्‍या बेनेट कोलमन व कंपनी लिमिटेड या माध्यम समुहाने 'प्रायव्हेट ट्रीटिज्' हा अभिनव प्रकार सुरू करुन वृत्तपत्र जगतात खळबळ उडवून दिली आहे. खरंतर २००४ सालीच याची सुरुवात झाली आहे, परंतु आता याचा व्याप व परिणाम दृश्य स्वरुपात जाणवू लागला आहे. या आधीही टाईम्सने 'मेडियानेट' हा स्वतंत्र विभाग बातम्यांच्या विक्रिसाठी सुरु करुन 'पेड कंटेन्ट' ची प्रथा भारतात रुजू केली. अगदी याचे अधिकृत रेट कार्ड सुद्धा उपलब्ध आहे.

आज टाईम्स समुहाची जवळपास सर्वच क्षेत्रात विविध प्रकाशने आहेत. आपल्या वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, मोबाईल व आऊटडोअर या माध्यमांचा लहान वा नव्याने भांडवली बाजारात उतरु पाहणार्‍या कंपन्यांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी व्यावसायिक वापर करुन त्याबदल्यात अशा कंपन्यांचे समभाग (प्रायव्हेट इक्विटी) मिळविण्याच्या प्रकाराला "प्रायव्हेट ट्रीटिज्" असे नाव दिले आहे. साधारणतः १ ते १५ % इतका भांडवली वाटा याद्वारे टाईम्स समुह घेत असून अशा ४५ कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. आजमितीस सुमारे १४० कंपन्यांमध्ये अशा प्रायव्हेट ट्रीटिज् च्या माध्यमातून मिळालेल्या भांडवलाचे मूल्य अंदाजे ५००० कोटी इतके आहे, जे टाईम्स समुहाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक आहे.

जरी टाईम्स समुहाने याची सुरुवात केली असली तरी अन्य समुह काही मागे नाहीत. एचटी मिडिया, नेटवर्क १८, एनडीटीव्ही यांनी सुद्धा यामध्ये आघाडी घेतली आहे.

वृत्तपत्र हे कदाचित एकमेव असे उत्पादन असावे, जे त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीला विकले जाते. साहजिकच जाहिरात हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत राहिला आहे, ज्याच्या जोरावर शक्य त्या कमी किंमतीला वृत्तपत्र वाचकांना उपलब्ध करुन दिले जाते. बदलत्या काळानुसार स्पर्धेत तरुन वा टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करणे स्वाभाविक आहे.
असे करणे नैतिक की अनैतिक या प्रश्नापेक्षाही वाचकांना यामध्ये ग्रहित धरले जात आहे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. रंगीत पुरवण्यांमधुन केल्या जाणार्‍या जाहिराती ओळखणे सोपे आहे, पण काळ्या शाईच्या बुरख्या आडून केल्या जाणार्‍या छुप्या प्रसिद्धीला ओळखणे कठीण आहे. माध्यम समुहांनी अशा प्रायोजित व अप्रायोजित बातम्यांमधील अंतर ठळकपणे वाचकांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे.

जाता जाता हे सूचक उदगार पहा.

"मी माझे वृत्तपत्र संपूर्णपणे मार्केटींग एक्झिक्यूटिव्हजच्या जोरावर चालवू शकतो. पत्रकारांची गरज नाही" - समीर जैन (मालक, टाईम्स समुह)

"माझ्या दृष्टीने वृत्तपत्र हे एक उत्पादन (प्रॉडक्ट) आहे" - विनीत जैन (मालक, टाईम्स समुह)

------------------------------------------
संदर्भः १) मिन्ट २) सूचेता दलाल . कॉम ३) रेडीफ . कॉम ४) प्रायव्हेट ट्रीटिज् . कॉम

Comments

गंभिर प्रकार...

आपण वर दिलेल्या माहीतीतील एकंदरीत प्रकार गंभीर आहे. पत्रकार असतानापण आपले विचार त्यांना हवे तसे घडवण्याचे अथवा बिघडवण्याचे काम चालते. या अशा व्यवस्थेत काय होईल कोणास ठाऊक! म्हणूनच जेथे संवाद होवू शकतो परस्परविरोधी विचारांवर वाद-विवाद होवू शकतो असे इंटरनेटचे माध्यम आणि त्याचा डोळस वापर अधिकच महत्वाचा वाटतो!

या संदर्भात "ऍन ऍसल्ट ऑन रीझन" हे ऍलगोअरचे पुस्तक वाचण्यासारखे आहे.

परिणाम

टाईम्स ग्रूपचे एकूण स्वरूप देहविक्रेतीप्रमाणे झालेले असले तरी हीच वृत्तपत्रे सर्वात जास्त खपतात (कोटींमधे). त्यामुळे जेव्हा "ईटी" मधे अशा पैसे देऊन छापलेल्या "बातम्या" येतात की "अमुक अमुक कंपनी इज् स्वीपींग दी अमुक अमुक फिल्ड्", की झाले . हजार रुपये हातात असलेला पानवाला किंवा हमाल निघाला ते पैसे घेऊन "अमुक अमुक" कंपनीचे शेअर घ्यायला. टाइम्स ग्रुपला काय हो, कुणाचे पैसे बुडताहेत का काय, काय फरक पडतो ?

आणि तुम्ही सांगा, टाटा मोटर्स् किंवा इन्फि सारख्या कंपन्या कशाला बोंबलायला या "ट्रीटीज्" च्या फंदात पडतील ? तिकडे जाणार "महाबुल्" कंपन्याच ! म्हणजे सामान्य गुंतवणूकदाराचा कपाळमोक्ष अगदी ग्यारंटीड् !

भ्रम

मी माझे वृत्तपत्र संपूर्णपणे मार्केटींग एक्झिक्यूटिव्हजच्या जोरावर चालवू शकतो. पत्रकारांची गरज नाही" - समीर जैन (मालक, टाईम्स समुह)

असे टाईम्सचे मालक बोलले असल्यास ते सध्या पत्रकारांना का रोजगार देतात हे पाहिले पाहिजे.

लेखाचा विषय महत्त्वपूर्ण आहे. प्रसिद्धीमाध्यमे प्रचार आणि धूळफेक यात गुंतलेली असतात. त्यांचे अंतर्गत संबंधही याला कारणीभूत असतात. सूज्ञ माणसांनी समजून जनजागृतीची कामे केल्यास प्रसिद्धीमाध्यमांच्या अनिर्बंध प्रचाराचे परिणाम कमी होऊ शकतील.

आश्चर्य ते काय?

टाईम्स ग्रुपच्या बातम्या कधीच विश्वासार्ह वाटत नव्हत्या. आपल्या अर्थकारणी माहितीपिपासूपणाला त्यांनी अधिकृत रूप दिले इतकाच काय तो फरक.

-- आजानुकर्ण

ह्यांना

हे फक्त ट्रीटीज मध्येच असे कुठाय हे तर राजकारणात पण आहेतच. यांना हवे ते जनमत तर ते नक्की बनवू शकतात.

ह्यांना हाणून पाडणे उत्तम!
पण कसे?

पण कोणतीही शक्ती असो, एक दिवस सायंकाळ बघावीच लागते हीच आशा आहे!

आपला
गुंडोपंत

अँटीइन्कन्बन्सी

ह्यांना हाणून पाडणे उत्तम!
पण कसे?

आपण पडलो आणि विरोधी पक्ष निवडून आला तर म्हणायचे अँटीइन्कन्बन्सी . आपण निवडून आलो कि म्हणायचे जनादेश.

प्रकाश घाटपांडे

बाजारू

मिडिया हे दुधारी हत्यार आहे आणि त्याचा आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करायचा हे आता राजकारणी आणि उद्योगपतींना चांगलेच समजले आहे. टाइम्स ग्रुप तर पक्का बाजारू आहे.

राहिलेच!

लेख चांगला आहे हे सांगायचे राहिलेच! :प
असेच आणखी वाचायला आवडेल.

 
^ वर