च्यामारी नक्की कोण कोण? ;)

बरं का मंडळी,

आता मी तुम्हा सर्वांना एक कोडं घालतो. या कोड्याचं उत्तर मध्येच सुटल्यासारखं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की 'अरेच्च्या! आपलं काही चुकलं तर नाही ना?' ;)

आपण तर साला हैराण झालो विचार करकरून! तुम्हाला बघा सुटतंय का?

आमचं कोडं असं आहे की, 'उपक्रमच्या प्रशासकीय कारभारात च्यामारी नक्की कोण कोण मंडळी आहेत?!' ;)

१) शशांकवर तर साला आपण पयल्यापासनंच डाउट खाऊन आहे! ;)

२) चित्तोबा जणू काही आपण प्रशासनाच्यावतीनेच बोलत आहोत असा भास व्हावा असा मध्येच एखादा प्रतिसाद आम्हाला लिहितात!

'प्रिय विसोबा' असं आम्हाला प्रेमाने संबोधून काही लिहू लागतात तेव्हा आमच्या डाउटची सुई चित्तोबांच्या दिशेने हेलकावे खाऊ लागते! (वा! काय सालं आपलं भाषावैभव आहे! ;)

३) सर्कीट महोदय तिकडे अमेरिकेत बसून 'उपक्रम - अमेरिका विभाग' सांभळतात की काय असाही आम्हाला एक डाऊट आहे! ;) सर्कीट तसा लई डेंजर मानूस बरं का! अन् हुश्शार पन! ;)

४) ओंकार जोशी, किंवा नीलहंस हा आमचा मनोगतातला एक जुना मित्र! पण त्याचं ते गमभन का काय ते वापरून 'तात्या, उपक्रम नांवाची आपण एक नवी साईट काढतोय बरं का!' असं हा पठ्ठ्या मला कधी चुकूनही बोलला नाही! ;) पण तोही हमखास असणार या उपक्रमच्या गँगमध्ये! ;) आपण साला काहीही हरू!

बोला तर मंडळी, आपले डाऊट कितपत खरे आहेत ते सांगा पाहू! ;)

आदरणीय उपक्रमराव,

१) 'व्यवस्थापन', 'विरंगुळा' आणि 'हे संकेतस्थळ' असे चक्क तीन विषय या चर्चेकरता फिट्ट्, घट्ट्, नी तट्ट् बसले आहेत. तेव्हा आमचा हा चर्चातंबू कृपया इकडून उखडू नका! ;)

२) माझ्या काही मित्रांची नांवे मी येथे घेतली आहेत. परंतु त्यात व्यक्तिगत चिखलफेक, हेवेदावे वगैरे वगैरे काहीही काहीही नाही असे मी आपल्याला कळकळीने सांगू इच्छितो! तेव्हा 'व्यक्तिगत लेखन नको!' असा नियम दाखवून आमच्या या चर्चेची बोळवण करू नका! ;)

३) निखळ मनोरंजनत्मक चर्चा व्हावी, घटकाभर चार शिळोप्याच्या गप्पागोष्टी व्हाव्या असा आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश येथे ही चर्चा टाकण्यामागे आहे!

आपलाच,
तात्या.

Comments

अशक्य नाही..

एकाहून अधिक व्यवस्थापक/प्रशासक असणे अशक्य नाही. त्याने त्याच्या वतीने/पद्धतीने तपास करून उत्तर/उत्तरे मिळवले/ली आहेत. शोधा म्हणजे सापडेल!
~ तो ~

कोणीही चालेल.पण...

मला तर वाटते,कोणीही असावे,पण आपला लेख यशस्वीरीत्या निर्मित. मात्र तो लेख , लेखन अजुन कोमात आहे,असे म्हणनारा नसावा.

तात्या टच्

:) लेखनाला टिपीकल तात्या टच् आहे.

पल्लवी

अज्ञात राहणे

कोणताही उपक्रम् करताना कर्त्याने अज्ञात राहणे गरजेचे आहे काय? यातून पारदर्शकता नसल्याचा प्रत्यय येत नाही काय? मटा मध्ये मारे लेख छापून आलाय पण उपक्रमावर चर्चा काय चालू आहे? नील वेबरने हे पाहीलं तर त्याला काय वाटेल? एक दोन चर्चेचे विषय सोडले तर उपक्रम् म्हणजे कोण आणि त्याची धोरणे काय? आणि पुढे काय आणि मागे काय? फक्त कवितांच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍याला इथे वाव नाही. का? तर फक्त त्या स्वरचित कविता म्हणून. मग उत्तर असे मिळते की मायबोली आहे, मनोगत आहे यासाठी. मग मायबोलीवर् सगळंच करता येतं की. नाही का? मग उपक्रमाचा उपयोग काय? मला वाटलं होतं की चला आता एक मराठी केंद्रीत सर्वंकष वेबसाईट चालू झाली. सुटसुटीतही आहे. लवकरच नियमांची बंधने दिसू लागली. नियम तर हवेतच. पण नियम माणसासाठी की माणूस नियमासाठी हे विसरत चाललो आहोत. या सर्व गोंधळात खरोखर गांभिर्याने केल्या जाणार्‍या चर्चा मागे पडत चालल्या आहेत. नुसत्या माहितीपर चर्चा तर तेवढंच सही. पण ते तरी नीट करू. एकदाचं हे घोषित करून टाका म्हणजे इतर वायफळ वादविवाद नकोत.

आपला,
अतृप्त आभ्या

देव त्यांच भलं करो

ह्म्म्म्म्म्म्

त्रागा! / हम होंगे कामयाब! ;)

आभ्या तुझा त्रागा मी समजू शकतो, पण तूर्तास तरी आपण आपली चर्चा 'च्यामारी नक्की कोण कोण?;)' ह्याच विषयापुरती मर्यदित ठेवुया, ही विनंती.

आणि 'काव्यविभागाचं ' टेन्शन नको घेऊ बॉस. एक ना एक दिवस उपक्रमावर काव्यविभाग नक्की सुरू होणार याची मला खात्री आहे. मन मै है विश्वास, पुरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन! ;)

आपण काही काळ (वर्ष-सहा महिने) वाट पाहू. नाहीतर पुन्हा आपला लढा नव्या दमाने सुरू करू. तोपर्यंत जरा कंपूतली मंडळी वाढवायचं बघू! :))

मीदेखील आत्तापर्यंत या विषयावर बराच भांडलो आहे. (साला नव्या ठिकाणी तडातडा भांडलो नाही तर उद्या देवगडात तोंड दाखवायला जागा उरणार नाही!;)

एव्हाना उपक्रमकर्त्यांनी आपल्या 'काव्यविषयक' लढ्याचं गांभिर्य लक्षात घेऊन त्यासंबंधी काही विचारविनिमय सुरूही केला असेल. तेव्हा तूर्तास आपण थांबू. माझ्या जातीपुरतं बोलायचं झालं तर मी आता चारचा आकडा करून आंब्याच्या वाडीतल्या एखाद्या कोपर्‍यात निवांतपणे बसावं असं म्हणतोय! ;)

ही चर्चा 'च्यामारी नक्की कोण कोण?;)' ह्याच विषयापुरती मर्यदित रहावी आणि खेळीमेळीने चालावी अशी पुन्हा एकदा विनंती!

तात्या.

मी नाही.

मी नक्कीच नाही. पण नक्की कोण हे कीबोर्डातून एकही शिवी न हासडता जाणून घ्यायला आवडेल.
---मी

हेहे

मला वाटतं, प्रशासक कोण? हा खेळ खेळायला तात्याला भारी आवडतं त्यामुळे उद्या हा न्यू यॉर्कच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात जरी गेला तरी पहिला प्रश्न विचारील, " ते तुमचं महापालिका वगैरे ठीक आहे हो, पण च्यामारी तो फोकलीचा प्रशासक कोण आहे तुमचा?"
--(महापौर!)अदिती

मस्त! ;)

" ते तुमचं महापालिका वगैरे ठीक आहे हो, पणा च्यामारी तो फोकलीचा प्रशासक कोण आहे तुमचा?"

अदिती, छानच हाणलं आहेस हो मला! ;)

असो, तुला उपक्रमावर पाहून बरं वाटलं!

आता काव्याला वाहिलेला एखादा समुदाय बनवून लिही पाहू एखादी झकासशी कविता!

तात्या.

नंदन?

मला तर अधनंमधनं नंदनचीही शंका येते! ;)

आपला,
(शंकेखोर!) तात्या.

तात्या?

हेच उपक्रमराव म्हणून वावरत असावेत. अन्यथा संकेतस्थळाच्या संचालकांबद्दल चार चांगले शब्द बोलायचे एका कोकणी माणसाला कारणच काय?

(ह.घ्या.)

-एक उपक्रमी

शक्यता आहे! तात्याच असला पहिजे!

आरे देवगड तात्या विंचू!
खरं काय ते सांगुन टाक!

नाय तर विंचू गायब करु तुझा!

आपला
(विषारी ) अण्णा

कोन असा ...............................

गँगचो नायक कोन ते लवकर् कळाक व्हया. माका वाटात्यान गँगचो नायक तात्याच असा.
तात्या काय ती कबुली देऊन टाका.
आपला
शंकाखोर (कॉ.विकि)

धुमसट!/सांगता/उपक्रमला मनापासून शुभेच्छा..

वरील एका प्रतिसादात आमचे बिरुटे साहेब लिहितात,

मात्र तो लेख , लेखन अजुन कोमात आहे,असे म्हणनारा नसावा.

अगदी योग्य बोललात बघा बिरुटे साहेब!

बघा, आता हळूहळू सर्व सभासदांची धुसमट बाहेर पडत आहे! पण 'प्रशासकीय अनुमती' च्या विरोधात सर्वप्रथम बंड करून तात्या तेवढा वाईट ठरला. इतर मंडळी न बोलून शहाणी ठरली अन् तात्या तेवढा तोंडफाट्या ठरला! चालायचंच!!

खोडसाळरावांच्या अनुदिनीवरील http://khodsal.blogspot.com/2007/04/blog-post_6789.html हा लेखदेखील हीच धुसमट दर्शवतो!

आम्ही आमच्या अनुदिनीवर ह्या विरोधात फार आधीपासूनच बोंबाबोंब केली होती. पण माफ करा बिरुटेसाहेब, तेव्हा आपणही गप्प होतात. असो.. आमच्या मनात आपल्या विरुद्ध कुठलाही गिला शिकवा नाही!

बिरुटेसाहेब, आमच्या आग्रहावरून आपणही येथे उपक्रमावर दाखल झालात याचा आनंद वाटतो. उपक्रमाची सदस्य संख्या हळूहळू वाढत आहे, याचेही समाधान वाटते. आता इथे सर्वजण सुखासमाधानाने एकत्र नांदू! तिथेही नांदत होतो, पण कुठलिही हुकमशाही फार काळ टिकून राहू शकत नाही असे आम्ही वारंवार म्हणत होतो त्याचा उपक्रमच्या वाढत्या सभासद संख्येवरून प्रत्यय येतो.

उपक्रमच्या निमित्ताने सभासदांना 'प्रशासकीय अनुमतीचा' दहशतवाद नसलेलं, मोकळा श्वास घेता येण्याजोगं, आणि सभासदांच्या म्हणण्याची योग्य ती दखल घेणारं संकेतस्थळ मिळालं याचा आनंद वाटतो.

'आपलं लेखन ताबडतोब प्रसिद्ध होउन लगेच त्यावर वाचकांच्या काय अश्या मोठ्या उड्या पडणार आहेत?' अश्या काहीश्या अर्थाचा प्रतिवाद करून 'प्रशासकीय अनुमतीचं' समर्थन करणारी मंडळीही आता आम्हाला उपक्रमावर दिसतात, शिळे का होईना, पण आपले लेख उपक्रमावरही प्रसिद्ध करतात हे पाहून आनंद होतो! ;)

आम्ही मात्र आमचं ताजंतवानं, First Hand लेखन सर्वप्रथम उपक्रमावरच प्रसिद्ध करू! त्यावर वाचकांच्या उड्या पडोत, अथवा न पडोत! साला कुछ फिकीर नही..

'च्यामारी नक्की कोण कोण?' ही चर्चा हा केवळ एक गंमतीचा अन् विरंगुळ्याचा भाग समजावा. चर्चाप्रवर्तक या नात्याने मी माझ्याकडून या चर्चेची सांगता झाली, असे जाहीर करतो! खरंच, उपक्रम प्रशासनावर कुणीही असो, एक सामान्य सभासद म्हणून मला त्याच्याशी खरंच काही देणंघेणं नाही. सर्व सभसदांच्या म्हणण्याची येथे योग्य ती दखल घेतली जावी, आणि प्रशासकीय अनुमती नसावी एवढीच माझी इच्छा!

'नांदा' नव्हे, नांदुया सौख्यभरे! ;)

आपला,
तात्या अभ्यंकर,
देवगड.
(सध्या वास्तव्य-ठाणे)

प्रति-मनोगत?

उपक्रम म्हणजे प्रति-मनोगत नसावे. मनोगतावर किंवा इतर कुठल्याही संकेतस्थळविषिष्टावर शेरेबाजी साठी उपक्रमाचा वापर होऊ नये असे वाटते.
~ तो~

वाटणे..

'त्या'च्या वाटण्यावरुन 'तो'ही प्रशासनात असावा असे वाटते.. :-)

विनंती

अवांतर, वैयक्तिक लिखाणामुळे, टिपण्यांमुळे ठराविक सदस्यांचे मनोरंजन होते. पण इतर सदस्यांना आणि पाहुण्यांना ते तेवढे रुचतेच असे नाही. ह्या संकेतस्थळाच्या निर्मितीमागच्या भूमिकेशी सुसंगत असे सकस, दर्जेदार वैविध्यपूर्ण लेखन इथे अपेक्षित आहे. सर्व सदस्यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि सकारात्मक सहभाग वाढवा, ही विनंती.

 
^ वर