येते वर्ष .... काही आडाखे , काही अंदाज.

"उपक्रमा"वर २००७ वर्षाच्या संस्मरणीय घटनांविषयी एक माहितीपूर्ण अशी चर्चा घडते आहे. सरणार्‍या वर्षाच्या सायंकाळी जसे गेलेल्या काळाबद्दलचे स्मरणचिंतन चालते तसे येत्या वर्षाबद्दल आपण व्यक्तिगत आशा-आकांक्षांचे पुनरावलोकन करतो. "येणारा काळ कसा असेल ?" या सर्वसाधारण विचाराला १ वर्षाचा कालखंडाच्या संदर्भात चालना देण्याचा प्रकार कदाचित मनोरंजक होऊ शकेल.

आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलचे आणि आपल्या आयुष्याला स्पर्श करणार्‍या विविध बाबींविषयी आपले अंदाज आणि आडाखे यांचा लेखाजोखा घेता येईल.

- २००८ अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक. दोन्ही पक्षातील अंतर्गत चढाओढ शीगेला पोचते आहे. सर्व प्रमुख उमेदवारांची धोरणे एकमेकांपेक्षा वेगळी , त्यांच्या पद्धती वेगळ्या आणि अर्थातच त्यांचा मतदार वर्गही.

ओबामा यांची भाषणे आणि काही वादविवाद मी २००७ मधे पाहिले आणि त्यांच्या वक्तृत्वाच्या आणि व्यक्तित्वाच्या प्रेमात पडलो होतो. ते अध्यक्ष व्हावेत असे मला वाटते. अजूनही त्यांची लोकप्रियता खूप आहे. पण एकूण अमेरिकेतील वंशाधारित मतांची विभागणी लक्षात घेता, ते मुख्य निवडणुकीत टिकणार नाहीत असा माझा अंदाज आहे. जर ते उपाध्यक्ष झाले आणि क्लिंटनबाई अध्यक्ष झाल्या तर अमेरिकेच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना ठरणार. येते काही महिने खूपच उत्कंठावर्धक असतील.

- इराक युद्ध : अमेरिकास्थित सर्वांच्या मनात हा विषय असणार. ४ वर्षे उलटली आणि सद्दाम पडून आणि नवी राजवट येऊन काही वर्षे झाली तरी एकूण चित्र काही फार आशादायक नाही. सॅमकाका इराकमधे २००८ साली बिलकुल हलणार नाहीसे वाटते. कळीचा प्रश्न उरतो : इराणवर कुर्‍हाड कोसळणार काय ? अमेरिकन कॉंग्रेसचे पारडे फिरण्याआधी तर अशी हवा होती. पण असे घडेलसे वाटत नाही.

- भारतीय नव-अर्थव्यवस्थेच्या काही बाबी : जागांचे भाव कडाडलेले आणि शेअरबाजार सुद्धा एकदम तापलेला. या दोन्ही बाजारामधे १९९० च्या दशकाच्या मध्यावर झालेली घसरगुंडी मला आठवते. असे काहीतरी २००८ मधे सुद्धा घडेल अशी मला अटकळ वाटते खरी. शेअरबाजारामधे कुणा सामान्य गुंतवणूकदाराचे जन्माचे नुकसान होऊ नये असे मला मनापासून वाटते. मात्र जागांच्या बाबतीत किमती थोड्यातरी खाली याव्यात असे मला वाटते. भारतातील जे आप्तजन आहेत त्यापैकी ज्यांचा व्यवसाय नव्या अर्थव्यवस्थेशी संलग्न नाही त्याना या भडकलेल्या किमतीनी अगदी जेरीस आणले आहे. अनेक लोक केवळ या गोष्टीमुळे स्वतःच्या घरात जाऊन राहू शकत नाही आहेत. एकूणच महागाईची झळ तिथल्या सामान्य लोकाना पोचतेय् , त्यातून थोडा तरी विसावा त्याना मिळो असे वाटते. मात्र परिस्थिती या एका बाबतीत फारशी आशादायक नाही खरी.

- अमेरिकेची अर्थव्यवस्था (माझ्या माफक समजुतीप्रमाणे) काहीशी नाजूक , चिंताग्रस्त वाटते. शेअरबाजारतले बाळसे २००७च्या अखेरी उतरल्यासारखे दिसतेय्. आणि जागांच्या किमती , त्याना नसणारा उठाव, आणि लोकांच्या क्रयशक्तिपेक्षा कितीतरीपट दिलेल्या/घेतलेल्या कर्जांचे दुष्परिणाम या रोजच्या बातम्या झाल्यात. एका वर्षात या सर्व आघाड्यांवर नाट्यमय असा सकारात्मक बदल होईल असे वाटत नाही. दहशतवाद , इराक आणि कर्जवसुली या आघाड्यांवर आहे त्यापेक्षा काही वाईट घडले तर मात्र अर्थव्यवस्थेचे आरोग्य अचानक बिघडण्याचा धोका संभवतो.

- क्रिकेट : ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावरील पहिल्या कसोटीत बोर्‍या वाजला. २००८ साली बाकी अब्रू सांभाळली म्हणजे परवडले.

२००७ मधे नक्की घडतील अशा काही गोष्टी :

-"दुब्या" (एकदाचे !!) जाणार. ( शॅंपेन आणा !)
- चीनमधील ऑलिंपिक. त्यानिमित्त घडणारे शक्तिप्रदर्शन. लेट् द गेम्स् बिगिन् !

लिहिण्यासारखे अजून बरेच काही असेल. मी आपले माझ्या वकूबाप्रमाणे माझ्या आजूबाजूला दिसले/अनुभवले ते लिहिले. इतरांच्या मतांचे आणि अंदाजांचे स्वागत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अजून काही..

आपले वरील सर्व आडाखे/अंदाज पटणारे आहेत. (फक्त "२००७ मधे नक्की घडतील अशा काही गोष्टी " म्हणताना, मला वाटते एरर झाली आहे तेथे २००८ पाहीजे, जरी "दुब्या" २००७ मधेच बाहेर पडलेला चालणार असला तरी :-) ..)

अमेरिकेच्या निवडणूका: जानेवारीच्या शेवटापर्यंत चित्र जास्त स्पष्ट होईल की दोन्ही पक्षाचे उमेदवार कोण ते. त्यात जर रिपब्लीकन पक्षाकडुन माइक हकबी अथवा रॉमनी उमेदवार म्हणून आले, तर येथील "रीलीजियस कॉन्झर्वेटीव्हज् ना " उभारी येण्याची शक्यता आहे जी हिलरी अथवा ओबामाला त्रास देऊ शकेल. येथील कॉन्झर्वेटीव्हजना काही झाले तरी हिलरी उमेदवार म्हणून येयला नको आहे कारण त्यांना भिती आहे की ती नक्की निवडून येईल. सार्वत्रीक (फायनल) निवडणूकीत अजून एक "वाईल्ड कार्ड" आहे ते म्हणजे: माईक ब्लूमबर्ग जो स्वतःचे पैसे घालून कदीही उडी मारेल. तो जिंकणार नाही पण तो निवडणूकीत आल्याने कुणाला तरी तोटा नक्की होइल - जसा सिनियर बुशला पेरो मुळे आणि ऍल गोरला राल्फ नेडर मुळे तोटा झाला होता तसा. फक्त गंमत इतकीच की ब्लूमबर्ग हा आधी डेमोक्रॅट होता, नंतर रिपब्लिकन झाला आणि आता इंडेपंडंट आहे.

इराक युद्धः इराणविरुद्ध युद्ध चालू होईल असे वाटत नाही, कारण बूश एकतर आता कमकुवत होत जाणार - डक गव्हर्नमेंट...

भारतीय अर्थव्यवस्था: जो पर्यंत आपण परकीय भांडवलावर (पुर्वी कर्जावर आता भांडवलावर) अर्थव्यवस्था बळकट करायचा प्रयत्न करत आहोत तो पर्यंत तो डोलारा एकखांबी तंबूसारखा उभा असल्यात जमा आहे - थोडक्यात जागतीक घडामोडीवर त्याचे चांगले-वाईट अस्तित्व राहील. अंतर्गत अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ बळकट जो पर्यंत होत नाही तो पर्यंत हे फोफसे बाळसे होऊ शकेल असे वाटते. बाकी मुक्तसुनीत यांनी म्हणल्याप्रमाणे आर्थिक विषमतेचे गंभिर परीणाम हे सामाजीक जडणघडणीवर वेगवेगळ्या पातळीवर होऊ शकतात. जागेचे भाव जितके जोरात सूज आल्यासारखे वर जात आहेत तसे ते खाली येऊ शकतील. सबळ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्याचे परीणाम हे उर्जा, पाणी, रस्ते - यावर वाढू शकतात.

अमेरिकन अर्थव्यवस्था: अमेरिकन भांडवल हे देखील परकीय भाग-भांडवलावर अवलंबून असते. डॉलरच्या आणि राजकीय शक्तीमुळे तमाम राष्ट्रांना येथे पैसा गुंतवणे हे "सेफ" वाटते. पण ते चित्र हळू हळू बदलत आहे. चीनने अमेरिकेतील स्वतःची गुंतवणूक कमी करून युरो आणि पाउंड मधे चालू केली आहे. तेच इतर परकीय वित्तसंस्थापण करू लागल्या आहेत. हे साधारण गेल्या मार्च मधे चालू झाले त्यानंतर आज आर्थिक चित्र कसे आहे ते अमेरिकेत राहणारे विशेष करून पाहात आहोतच. त्यामुळे उतरलेल्या डॉलरच्या भावाचे परीणाम भारतीय माहीती-तंत्रज्ञानतील कंपन्यांना पण कमीअधीक प्रमाणात भोगावे लागत आहेत. यामुळे अमेरिकेचे देश म्हणून काही नुकसान होण्याची शक्यता नाही पण डेमोक्रॅट्स आले तर सरळ आणि रिपब्लि़न्स आले तरी कुठल्यातरी पद्धतीने मुक्त अर्थव्यवस्थेवर स्वतःच्या (राष्ट्रीय/सामाजीक) स्वार्थासाठी लागणारी बंधने आणतील आणि येथे रोजगार-उत्पन्न वाढवतील. बाकी चीनपण अमेरिकेवर अवलंबून असल्यामुळे आणि २००८ चे ऑलींपिक्स सुखकर पार पाडण्यासाठी अजुन जास्त गडबड करील असे वाटत नाही.

क्रिकेट व्यतिरीक्त इतर खेळांना आणि खेळाडूंना पण जर "चक दे" अनुभवायला मिळाले तर त्याचे सामाजीक परीणाम पण चांगले होतील. पैशाचा ओघ जरा विभागला जाईल, वेगवेगळ्या आवडी नविन पिढ्यात लागतील आणि क्रिकेटच्या खेळाडूंचा माज जरा कमी होइल (त्यांना पण ते चांगले ठरेल!)

जॉर्ज बूश ऑफिशियली २० जाने २००९ ला जाणार तो पर्यंत काय होते ते पाहूया.

भारताला काळजी आहे ती पाकीस्तानची आणि स्वतःच्याच देशातील प्रसिद्धीमाध्यमांची... पाकीस्तान मधे तर आता "बिगिनिंग ऑफ एन्ड" चालू आहे. याचा अर्थ ते राष्ट्र म्हणून कोसळायला लागले आहे. ही भारतीय म्हणून मोठी काळजी आहे. पाकीस्तानचे अस्तित्व जसे आहे तसे टिकवणे महत्वाचे नसून त्याला योग्य आकार देऊन अतिरेक्यांच्या (आणि चीनच्या) हातात जाणार नाहीना यावर नियंत्रण ठेवणारे भारतीय नेत्रूत्व लागेल. ते एका नेत्याचे अथवा पक्षाचे अथवा राजकारण्याचे नसून संपूर्ण सामाजीक मानसिकतेचे लागणार आहे. कुठल्याही टोकाच्या अतिरंजीत विचाराने कृती न करणारे आणि स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ बघणार्‍यांपेक्षा स्वतःच्या देशाचा स्वार्थ बघणारे ... कारण देश टिकला आणि सर्वार्थाने बळकट झाला तरच आपला स्वार्थ आपल्याला हवा तसा टिकणार आहे.

रंजनात्मक

२००८ एक रंजन:
(हे केवळ अंदाज आहेत भविष्य नाही ;) )

भारतीय राजकारणः
काँग्रेसला बसलेल्या एकामागुन एक धक्क्या नंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहवर्धनासाठी राहुलची पूर्णवेळ नेता म्हणून एंट्री होईलसे वाटते. राहुल आणि सोनिया मिळून देशभर सभा घेऊन पुढील २००९ च्या निवडणूकीचे शंख फुंकतीलसे दिसते. मायावतींचा हत्ती यंदा पडण्यासाठी लढून अस्तित्व दाखवल्यावर २००८ मध्ये देशभर "पाडण्यासाठी" लढेल. भाजप नरेंद्र मोदींची विकासकाम आणि त्याबरोबर धर्माचा सरळ वापर न करता तिरका वापर करण्याची हातोटी जास्त ठळकपणे वापरू लागेल. कम्युनिस्टांना बहुतेक (धाकपटशहाच्या जोरावर नेहेमीप्रमाणे) पंचायत निवडणूकांत यश मिळेल. आणि त्याच धुंदीत ते लोकसभेला जायच्या भाषा करतील.
ऍटोमिक करार होईल का हा मात्र प्रश्नच आहे. मायावती क्षीण होत जातील कारण त्यांनी अजूनही कोणतीही लोकरंजक घोषणा केल्याचे ऐकीवात नाही. कर्नाटकात परत त्रिशंकु विधानसभा येईल नी सत्तेच्या वाटमार्‍यांना उत येईल.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर "पुणे पॅटर्न" यावा असे अनेकांना वाटेल पण "पहले आप, पहले आप" करता करता ही वेळ यंदा तरी येणार नाही. राणेंच्या बंडामुळे देशमुखी बंद होईल पण राणेशाही येणार नाही. पुढच्या निवडणूकीत राष्ट्रवादी जास्त जागांवर हक्क सांगेल.

संरक्षणः
याबाबतीत भारताला खूप काळजी घ्यावी लागेलसं दिसतंय. जेव्हा जेव्हा शेजार अशांत झाला आहे आपल्याकडे घुसखोरी वाढली आहे.
त्याच बरोबर, वाढत्या चंगळवादामुळे देशांतर्गत गुन्हे वाढतील त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढेल.

इतरः
वाढत्या मॉल्समुळे मॉलची नवलाई संपून स्पर्धा चालू होईल.
रिलायन्सच्या जीन्समुळे रु.२०० मधे जिन्स मिळू लागतील व मुंबईच्या हवेत जिन्सच्या अतिरेकामुळे त्वचारोगाचे प्रमाण वाढेल. ;)
बेस्ट अजून एका बसचे मॉडेल आणेल
रेल्वे बर्‍याचशा नव्या असतील. बोरिवलीच्या पुढे चौपदरी रेल्वे चालू झाली असेल. बर्‍याचशा नव्या गाड्या प.रे. ला मिळतील. म. रे. वाले दरवर्षी प्रमाणे प्. रे.च्या कडे असुयेने बघतील ;)
मुंबईमधे बिहारी चित्रपटगृहे उघडतील
धारावी पुनर्वसना वरून एक मोठं आंदोलन वगैरे होईल जे पुढे कोणीही लक्षात ठेवणार नाही
पुन्हा चित्पावन संमेलन होईल पण यंदा अर्धी गर्दीही जमणे कठीण होईल
तिन साहित्य संमेलने आणि दोन नाट्य संमेलनांची भर पडेल
अ. भा. साहित्य संमेलनाची पुढची निवडणूक कोर्टातच होईल ;)
भारततील एकमेव खेळ क्रिकेटमधे काहिही होऊ शकते
एकुणच समाजातील अशांतते मुळे बुवा, बाबा, माई, ताई यांचे स्तोम वाढेल.
घरांत फेंगशुई, वास्तुशास्त्र, यांना इतर कशाहीपेक्षा महत्व येईल
कोणतीही मालिका संपण्याचं सुख मिळणं कठीण दिसतय
भारत ऑलिंपिकमधे ३ पदके (एकही सुवर्ण नाही) मिळवण्याची शक्यता निर्माण होईल व शेवती २नच मिळतील
१ लाखातील गाडी आल्याने गाड्या वाढतील पण पेट्रोल भरण्यासाठी २ तास वेगळे काढुन ठेवावे लागतील

२००८ मधील नक्की घटना:
वर्षात ३६६ दिवस असतील

काही प्रश्न

सर्वप्रथम , २००७-२००८ च्या नजरचुकीबद्दल क्षमस्व !

>>> त्यात जर रिपब्लीकन पक्षाकडुन माइक हकबी अथवा रॉमनी उमेदवार म्हणून आले, तर येथील "रीलीजियस कॉन्झर्वेटीव्हज् ना " उभारी येण्याची शक्यता आहे जी हिलरी अथवा ओबामाला त्रास देऊ शकेल.

२००४ साली नेओ-कॉन्स् (नव-पुराणमतवादी ! :-) ) असा एक वाक्प्रयोग सर्व विश्लेषणामधे आढळायचा. हे लोक म्हणजे , थोडक्यात , स्वतःची स्वतंत्र अशी मते नसणारे , पण ज्याना रिपब्लिकन पक्षाने आपल्या कार्यक्रम आणि धोरणाकडे खेचले असे लोक. या वर्गामुळे एकंदरीत समतोल वाटणारे पारडे बुशकडे झुकले असा एक मतप्रवाह आहे. यंदा या वर्गाचा काही परिणाम होईल काय ?

>> क्रिकेट व्यतिरीक्त इतर खेळांना आणि खेळाडूंना पण जर "चक दे" अनुभवायला मिळाले तर त्याचे सामाजीक परीणाम पण चांगले होतील.

अशा प्रकारची मते (विशेषतः क्रिकेटमधील पराभवाच्या नाजूक क्षणाना )मांडल्यामुळे आप्तस्वकीयांचे आणि मित्रांचे जोडे आम्ही खाल्ले आहेत. असे काही इतक्यात घडेल अशा प्रकारची कसली चिन्हे आता तरी दिसत नाहीत. इतर खेळांचा गळा घोटणारी सार्वत्रिक उदासीनता हीच सध्याची स्थिती दिसते.

>> रेल्वे बर्‍याचशा नव्या असतील. बोरिवलीच्या पुढे चौपदरी रेल्वे चालू झाली असेल. बर्‍याचशा नव्या गाड्या प.रे. ला मिळतील. म. रे. वाले दरवर्षी प्रमाणे प्. रे.च्या कडे असुयेने बघतील ;)
चौपदरी रेल्वेबद्दलच्या अंदाजामुळे फार आनंद झाला. हा तुमचा अंदाज कितपत खरा ठरेलसे वाटते ? बाकी म.रे. ही केवळ मरेस्तोवर अंत पाहणारी हे खरेच.

एप्रिल ९, २००८

एप्रिल ९, २००८

भारताचे चंद्रयान १ - चंद्रावर स्वारी करून तेथील भौगोलीक, खनीज आणि पाण्याची पहाणी करणार, जीआयएस वगैरे तयार करणार! त्याला मनःपूर्वक शुभेच्छा! फक्त त्याचबरोबर तसेच काम या भूतलावर भारतवर्षातही २०१८ पर्यंत होवोत ही (वेडी) आशा!

पॅट्स्

फूटबॉल करता २००८ हे वर्ष ब्रेडी-बेलिचिक यांचे दिसते. .....

१६-०

ब्रेडी -बेलिचिक पेक्षा ब्रेडी -मॉस असे अधिक गाजणार!

एन पी आर

वर अँडी बोरोविट्झने व्यक्त केलेले मजेशीर अंदाज येथे ऐकता येतील. मोनिका ल्युविन्स्कीने अध्यक्षपदासाठी रिंगणात उडी घेणे पासून चीनने वेगळ्या स्वरुपात (कपकेक्स) अमेरिकेत उंदराचे विष पाठवणे इ. चा यात समावेश आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

चीन

चीनने वेगळ्या स्वरुपात (कपकेक्स) अमेरिकेत उंदराचे विष पाठवणे...
हे अगदी सहज शक्य आहे कारण २००८ हे चीनी व्रषांच्य संकल्पनेप्रमाणे "इयर ऑफ रॅट" (वू झी) आहे!

खि खि खि

ऍबसर्ड्....मला ओनियन् डॉट् कॉम या साईटची आठवण झाली .....

हिलरी

हिलरीच नक्की येईल यात शंका नाही!
यांना रुपर्ड मरडॉकचा पुर्ण पाठींबा आहे.
आजवरच्या इतिहासानुसार रुपर्टला ज्या देशात जे प्यादे हवे असते तेच येते!!!!

आयोवा

आयोवा मध्ये ओबामाने आघाडी घेतली आहे! मतदान उद्या.

राजकीय डावपेच

>>>आयोवा मध्ये ओबामाने आघाडी घेतली आहे! मतदान उद्या.

मी काही माहीतगारांकडून ऐकल्याप्रमाणेकाही राज्यांमधे (आयोवाचे विशेष करून माहीत नाही पण तेथे पण शक्य आहे): काही रिपब्लिकन/डेमोक्रॅट्स संलग्न जनता ऑफिशियली इन्डीपेन्डट राहते आणि तात्पुरते विरुद्ध पक्षाच्या नावाने मत देयला अशा ठिकाणी जातात आणि त्यातल्या त्यात को कमकूवत उमेदवार असेल त्याला पक्षाचे तिकीट मिळेल यासाठी प्रयत्न करतात. आज रिपब्लीकन्सना सार्वत्रीक निवडणूकीत ओबामापेक्षा हिलरीची भिती जास्त आहे. त्यामुळे असले गेम्स खेळले गेले तर आश्चर्य वाटायला नको. विशेष करून जर जॉन मॅकेन "रिबाउंड" होत असेल तर...(ओबामाला हरवणे सहज शक्य होईल).

डावपेच

कुणाचे काय डावपेच आहेत हे त्या येशूलाच ठाउक :)... पण आयोवा मध्ये तरी अनपेक्षीतरित्या ओबामा आणि हक् बी निवडून आले!.

क्लिंटन

कुणाचे काय डावपेच आहेत हे त्या येशूलाच ठाउक :)... पण आयोवा मध्ये तरी अनपेक्षीतरित्या ओबामा आणि हक् बी निवडून आले!.

हिलरी क्लिंटनला हरण्यात तुर्तास एक समाधान म्हणजे, बिल क्लिंटन हा आयोवात आणि न्यू हँमशायर मधे हरला होता. अर्थात आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. काल वॉशिंग्टन पोस्टचा संपादक (तरूणपणात ज्याने वॉटरगेट प्रकरण शोधले) बॉब वुडवर्ड्स काहिसा आवाक झालेला वाटला.

बाकी रॉमनीच्या राज्यातले अनुभव असल्याने त्याच्या "मॉर्मन" असण्यापेक्षा - तोच असण्याच्या मी विरुद्ध आहे. राज्यकर्ता म्हणून तो चांगला वाटत नाही...त्यामुळे तो (सीएनएन च्या राजकीय अंदाजाप्रमाणे) आयोवा हरल्यामुळे न्यू हँमशायरपण हरेल अशी आशा व्यक्त करतो.

किती महत्व ?

एका कॉकस् ला कितपत महत्त्व देता येईल ? मला असे वाटते आयोवाचे महत्त्व पहिली कॉकस् असल्याने आहे हे खरे ; पण दिल्ली बहुत दूर आहे.

क्लिंटनबाईना "बाई" होण्याचा फायदा विशेष मिळाला नाही. आयोवाच्या केवळ ३५% महिला डेमोक्रॅट्स् नी त्याना मते दिली...

विकास रावाना एक विनंती : या निवडणुकीचा एक वेगळा थ्रेड् सुरू करा .....

१०० डॉलरला एक डबडे !!

तेलाने कमाल केली राव ! काय चाललय् काय ?!

(एस् यू व्ही घेणे कायमचे विसरायला हवे !! ) :-(

डाऊ

तेलाच्या डबड्याने स्टॉक मार्केटचे देखिल कंबरडे मोडले आहे.. अवघड आहे!
(हायब्रीड एस् यू व्ही घेऊ शकता !!)

 
^ वर