जॉनी गद्दार - एक धमाल बिनडोक करमणूक

'डोके घरी विसरुन आल्यास धमाल मजा येईल' हे वाक्य आता कुठल्याही हिंदी चित्रपटाला लागू होईल. ('ओम शांती ओम' पाहिलात?) जेम्स हॅडली चेस (किंवा सुहास शिरवळकर, बाबा कदम, गुरुनाथ नाईक, एस.एम.काशीकर, बाबुराव अर्नाळकर अशी न संपणारी यादी) वाचताना (आणि हल्ली तर काही मराठी संकेतस्थळे चाळताना) हाच प्रत्यय येतो. याच जेम्स हॅडली चेसच्या एका कादंबरीवरुन सरळसरळ चोरलेला - दुसर्‍यांदा - पहिल्यांदा हाच प्लॉट 'परवाना' त चोरला होता- आणि ते लपवण्याचा कुठेही प्रयत्न न केलेला 'जॉनी गद्दार' हा चित्रपट पाहिला. मजा आली. नावापासूनच सगळे उथळ, सोपे ठेवायचे, प्रेक्षकाला विचार वगैरे करायला लावायचा नाही - अशा दिग्दर्शकाच्या कल्पना स्वच्छ आहेत. प्रेक्षकाला सगळे खरे ते काय माहिती असते, पण प्रत्यक्ष सिनेमातल्या पात्रांना ते माहिती नसते (एरवी उलटे असते) अशी काहीशी ही गंमत आहे. सगळे दुय्यम दर्जाचे नट- नट्या -, या गर्दीत धर्मेंद्र कसा काय ते समजत नाही, पण इथे तो 'मेट्रो' पेक्षा अधिक सुसह्य आहे- त्यातच नायक विक्रमचे काम करणारा एक देखणा नवीन चेहरा, चटपटीत संवाद, जबरदस्त वेगवान आणि बांधीव कथा - आता चोरलेलीच म्हणजे निम्मे काम वाचले- थोडक्यात एका थ्रिलरचा सगळा आवश्यक मसाला, असा हा प्रकार आहे. शेवटचा पंचही अनपेक्षित - मला भलतेच वाटले होते!
असा हा 'जॉनी गद्दार'. फटक्यात माणसात आणणारा. आता त्यातून बाहेर पडायचे तर लवकरच 'दस कहानियां' किंवा तत्सम काहीतरी पहावे लागणार!

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

लिव्ह फ्री: डाय हार्ड हा चित्रपट देखिल आम्ही कालच बघीतला आणि त्याचे परिक्षण देखिल 'डोके घरी विसरुन आल्यास धमाल मजा' ह्या मथळ्याखाली इथे लिहिलेले जसे च्या तसे खपेल :)

(दस कहानियाच्या परिक्षणाच्या प्रतिक्षेत) कोलबेर

दस कहानिया

दस कहानिया बद्दल बरेच ऐकले आहे. २ तासाच्या अवधीत १० गोष्टी कशा सांगितल्या त्याची उत्सुकता आहे. मात्र या १० गोष्टींमध्ये समतत्त्व-समान सूत्र एकही नाही असे ऐकून आश्चर्य वाटले. असे असल्यास कितीही चांगल्या १० गोष्टी असल्या तरी चित्रपट माध्यम अशा साठी योग्य आहे का?

मस्त! :)

राव साहेब,

मस्त लिहिलंय!

(किंवा सुहास शिरवळकर, बाबा कदम, गुरुनाथ नाईक, एस.एम.काशीकर, बाबुराव अर्नाळकर अशी न संपणारी यादी)

वरीलपैकी बाबा कदम हे आमचे आवडते कादंबरीकार आहेत असे इथे नमूद करू इच्छितो..:)

आणि हल्ली तर काही मराठी संकेतस्थळे चाळताना)

असं? काय सांगताय काय??!! कुठली हो मराठी संस्थळं? तिथे जाऊन काहीतरी धमाल धमाल मलाही वाचलंच पाहिजे! :)

असो, आपल्याकडून अजूनही अश्याच काही लेखांच्या प्रतिक्षेत,

तात्या.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

काळे केसाळ कुत्रे

'काजळमाया' ला मिळालेले साहित्य अकादमीचे पारितोषिक, त्या निमित्ताने 'काजळमाया' त्या पारितोषिकाला पात्र आहे की नाही यावरुन निर्माण झालेला वाद, जी. एं. ना झालेला प्रचंड मनस्ताप, स्वाभिमानी जी.ए.कुलकर्णींनी ते पारितोषिक आणि त्याची रक्कम परत करण्याचा निर्णय यावरुन जयवंत दळवींनी जी.एं. नी खिजवणारे एक पत्र लिहिले होते. 'ते' पाच हजार रुपये अद्यापही तुमच्या खात्यात व्याज ओढत पडले आहेत, असे ऐकतो वगैरे. दळवी जी.एं.चे जुने मित्र. पण दळवींचा हा विनोद जी.एं. ना आवडला नाही. त्यांनी दळवीना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, "तुम्ही कधीही आलात तर तुमचे स्वागतच आहे, पण तुमचे ते घाणेरडे काळे केसाळ कुत्रे तुमच्याबरोबर कधीही आणू नका..."
सन्जोप राव

मलाही कळले नाही

मलाही समजले नव्हते. पण फक्त मलाच कळले नसावे ह्या भितीने हे अज्ञान प्रदर्शन संजोप रावांच्या खरडवहीत केले. ;-)

केसाळ कुत्रे

हा हा हा.... भन्नाट. आवडले.

आपला,
भास्कर

मराठी मालिकेत सुद्धा

वा सन्जोप राव छान लिहीलत
पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि सिनेमाच कां तर आता तर मराठी मालिका पण डोकं विसरून पहायची वेळ आली आहे, काही वर्षा पूर्वी वाटत होतं कि कमीतकमी मराठी मालिका तरी चांगल्या आहेत, पण गेल्या काही मालिका तर अगदी "एकता कपूर" चे मराठी संस्करणच हो... काय ते "या दुखानों या..", काय ती ओरडणारी आणि मूर्ख पात्र असलेली "वहिनीसाहेब" आणि काय ती कधी न संपणारी "अधुरी कहाणी"... येथे मप्र मधे केबल वाले मराठी चैनल्स नीट दाखवत नाही म्हणून "डिश" बसवून घेतली, पण आता पश्चाताप होतोय... तर भाऊ हिन्दी असो किंवा मराठी,, सिनेमा/मालिका आणि मूर्खता याचा घनिष्ठ सम्बन्ध रहाणारच... :)

http://sureshchiplunkar.blogspot.com

मराठी मालिका

या लाजिरवाण्या घरात आणि फार दिवस सासूचे सारख्या मालिका बघून काय होणार. हास्यसम्राट बघावे. (डोके टेबलावर काढून ठेवून)

मालिका

हिन्दी असो किंवा मराठी,, सिनेमा/मालिका आणि मूर्खता याचा घनिष्ठ सम्बन्ध रहाणारच... :)

हॅ हॅ हॅ काय मर्मी बोललात! पण हल्ली पुण्यात प्रायोगिक रंगभूमीला परत चांगले दिवस आलेत. खुद्द श्रीराम लागूंनी त्यांच कौतुक केलं. पुल, जीए, सुनितीबाई या पार्श्वभूमीवर " प्रा. दत्ता दंडगे लिखित सोहम् कोहम् च्या गोष्टी खुपच सुंदर आहे.
पुण्यात सुदर्शन रंगमंच , अहिल्यादेवी शाळेजवळ शनिवार पेठ पुणे येथे या प्रायोगिक नाटकांसाठी असलेल्या रंगभुमीवर चांगली नाटके बघायला मिळतात.
प्रकाश घाटपांडे

मुकेश

त्यातच नायक विक्रमचे काम करणारा एक देखणा नवीन चेहरा

हा प्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. चूभूद्याघ्या.

 
^ वर