गावरान (देशी) बाजरी नष्ट झाली

बाजरीच्या एका कणसात शेकडो फुले असतात. त्या फुलांवरील परागकण (नाव बरोबर आहे ना?) दुसर्‍या फुलांवर पडले की बाजरीच्या दाण्यांची वाढ सुरु होते. हे परागकणांचे वहन वार्‍याने होत असते. एका शेतातल्या बाजरींचे परागकण दहा-पंधरा किलोमिटरपर्यंत दूर असणार्‍या दुसर्‍या शेतात सहजपणे वापरले जातात. असे घडणे हे नित्याचे आहे. सुगीच्या काळात असे वेगवेगळ्या पिकांवरचे, तणांवरचे करोडो परागकण आपल्या आवती भोवती आपल्या नकळत दरवळत असतात. त्यांच्या या दरवळण्याने वातावरणात एक प्रकारचे चैतन्य, आल्हाददायकता असते. पण या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना बाजरीच्या बाबतीत एक फार वाईट घटना घडत गेली आहे. परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापिठात तसेच राजस्थानातल्या कृषी विद्यापीठात यावर संशोधन चालू आहे.

हरितक्रांतीच्या पर्वात उत्पन्न वाढवण्याच्या सपाट्यात शेतकर्‍यांनी संकरीत (हायब्रीड) बियानांचा सर्रास वापर सुरु केला. त्यात पूर्वापार चालत आलेले नैसर्गिक बियाणे वापरणे बंद होऊ लागले. पण या संकरीत बाजरीची चव थोडीशी कडवट असल्याने काही शेतकरी तरीही त्यांच्याजवळचे पारंपारिक बियाणे वापरुन स्वतःला खाण्यापुरती बाजरी पिकवत. आम्ही पण त्यातलेच. संकरीत बियाणांमुळे दहा मनाच्या ऐवजी आमच्या शेतात साठ-सत्तर मन बाजरी व्हायला लागली होती. त्यात इतर नवीन पिके तर वेगळीच. या वाढलेल्या उत्पन्नामुळे आम्ही शेतकरी आनंदी होतो. पण...

गावरान (देशी) बाजरीच्या अरुंद पाट्यालगत दूरदूर पर्यंत संकरीत बाजरीची पिके जोमाणे घेतली जात होती. त्यांच्या परागकणांनी देशी बाजरी संकरीत होत होती. पाहता पाहता देशी बाजरी साधारणतः २००१-२००२ पर्यंत नामषेश झाली होती. :(

काय गमावले:
१. गावरान बाजरीचे तोंडाला पाणि सोडणारे आता ते रुचकर पदार्थ इतिहासात जमा.
२. आयुर्वेदात सांगितलेले बाजरीचे गुणधर्म बदलेले असल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून बाजरी बाद होण्याची भिती. बाजरी सोबत या गटात अनेक भाज्या, फळे, कडधान्ये असू शकतात. उदा. केळी पित्तनाशक असते. पण पुण्याच्या एका आयुर्वेदाचार्यांच्या रुग्णांच्या तक्रारीनंतर त्यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की खते, किटकणाशके, वगैरे रसायणे वापरल्याने पुण्यात मिळणारी बहुतांश केळी पित्तवर्धक आहे. (त्या आयुर्वेदाचार्यांचे नाव विसरलो.)

लेखनविषय: दुवे:

Comments

गंभीर

अरेरे! हे योग्य झाले नाही...
म्हणजे हरीत क्रांती जेमतेम ३०-४० वर्षात कोलमडते आहे की काय?

याचा जैव शृंखलेवरही काय परिणाम होतो आहे याचा कुणीतरी अभ्यास करत असेल अशी आशा आहे.
किटकांवर याचा प्रमुख्याने प्रभाव असाणार आहे. (एंटोमोलॉजीवर काम करणारे कुणी आहे का येथे?
तेच सांगु शकतील. किंवा किमान बि एस्सी बायो वाले तरी?)

अतिशयच गंभीर परिणाम दृष्य स्वरूपात दिसून येत आहेत तुम्हाला.
पण म्हणजे आपल्या लेखाचा अर्थ असा काढायचा की, "संकरित बियाण्यांमुळे नैसर्गिक बाजरी मेली."
म्हणजे माँसेंटो (व इतर कंपन्यांनी) ने बाजरीची एक जातच नष्ट केली आहे. (हा खुपच गंभीर आरोप आहे. सिद्ध झाल्यास संपुर्ण देशाला मोबदला देता देता कंपनी दिवाळखोरीत जाऊ शकेल इतका मोठा! इतर मानवतेच्या विरुद्धचे खटले वेगळे)

"आमचे बियाणे वापरायचे की नाही हे तुम्हाला आधी कळायला पहिजे होते" असे म्हणून ही लोकं पळून जातील... पण शेतकरी कुठे जाणार आपली जमीन घेवून? (ती ही धरणातून वाचलेली उरलीसुरली जमीन)

संकरित बियाण्यांसाठी समाज प्रबोधन कसे झाले होते?
कुणी केले होते हे पण पाहिले पाहिजे. (म्हणजे नक्की कुणाला यात 'इंटरेस्ट' होता हे कळेल) शिवाय सध्या सगळ्यात जास्त खपणारे संकरीत बियाणे कुणाचे हे ही पाहिले पाहिजे. तसेच नैसर्गिक बाजारीची लावणी करून ती वाचवता कशी येईल याचे काही मार्ग असणारच असेही वाटून गेले.

त्या शिवायही वार्‍याने संकरणाची प्रक्रिया ही नैसर्गिकरित्या कायम युगानुयुगे चालूच असणार ना? मग तीच प्रक्रिया जरा जोरात घडवली तर इतके काय बिघडले?
जर संकरण घडतच होते तर मग 'ती' चव पण बदलतीच होती असे नाही का वाटत?
या नियमाने तसे खरंच काही हरवले आहे का याचा विचार पण व्हायला हवा.

आपला
(शेतीतला अज्ञ)
गुंडोपंत

कृषी विद्यापीठे

काय करत होती? तेथील संशोधन? म्हणजे निदान चांगल्या गोष्टी नष्ट होऊ न देणे इतके तर त्यांनी नक्कीच करायला पाहीजे होते. कोणास ठावूक जरा शोध घेतला तर कुठे तरी हे बियाणं सापडू शकेल.

नुस्ता बाहेरच्या किंवा खाजगी कंपन्यांना दोष देऊन चालणार नाही. कारण संकरीत बियाणे ही काळाची गरज होती, तसे नसते तर लोकसंख्या बरीच घटली असती. "अमुक लोक अन्नपाण्यावाचून मृत्युमुखी" हे वाक्य आंदोलने, सत्ताबदल करते व "बाजरी आता तशी राहीली नाही" हे वाक्य ......(हुशार* लोकांच्यात चर्चा घडवते) तसेही बहुसंख्य लोक हा फरक (बाजरची चव) नक्की ओळखु शकतील का शंकाच आहे. निदान मी तरी नाही. उलट काही पदार्थांच्या चवीची इतकी सवय झाली असते की त्या पदार्थाची वेगळ्या प्रांतातील वेगळी चव आली की तितकी पसंत नसते. :-) भले ती वेगळी चव असलेला पदार्थ जास्त पौष्टिक असेल. तसेही पौष्टिक म्हणजे चवीला मार खाणारा(जीभेला नापसंद असलेला) हे समीकरण झाले आहे. :-)

मागे काही वर्षांपूर्वी वंदना शिवा ह्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या होत्या की आता भारतात शेतकर्‍यांनी (नक्की कूठे माहीत नाही) धान्यपेढी सुरू केली आहे की वेगवेगळे ग्रेन्स जमा करतात व लागवडीच्या वेळी शेतकरी घेऊन जातात. बियाणे कंपन्यांची सत्ता नको की चालबाजी नको. (असे काहीसे ऐकले होते चू.भू.दे.धे.)

विना सहकार नाही उद्धार हे खरेच!

म्हणजे मी बाहेर

(आता हुषार लोकांत चर्चा म्हणजे गुद्दागुद्दीवाला गुंडोपंत नीट बाहेरच म्हणा की...)
असो, तरी घुसतोच ;))

ती पेढीची क्ल्पना मस्तच आहे बरं का...
मी पण मागे टीव्ही वर पाहिले होते काहीतरी असलेच पण आता विसरलो ५ वर्षांपुर्वी वगैरे असावे...
आपले म्हणणे पटले... नाहीतर उपासमारच झाली असती...
(मग् कोण येणार व्यायाम शाळेत? असु देत हो भास्कर राव...जरा कडु भाकरी खावी लागली तर काही बिघडत नाही बरं ;)) )

आपला
गरम भाकरी नि वांग्या-बटाट्याच्या मसालेदार भाजीची चव जीभेवर रेंगाळत असलेला
गुंडोपंत

मराठवाड्यात भरपूर बाजरी.

(आता हुषार लोकांत चर्चा म्हणजे गुद्दागुद्दीवाला गुंडोपंत नीट बाहेरच म्हणा की...)
असो, तरी घुसतोच ;))

आम्हीही घुसतोच या विषयात...! आजकाल संधीच नाही मनातलं खरडायला..!
कृषी विद्यापीठाचे काय संशोधन चाललेली असतील आपल्याला काही माहित नाही बॉ
पण, आमच्या सुदैवाने मराठवाड्यात अजूनही गावरान बाजरी भरपूर उपलब्ध आहे.
मटनाचा रस्सा, आणि राहू माश्याबरोबर....कडक बाजरीची चुल्हीवर शेकलेली भाकर काय लिहू त्याच्याबद्दल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठवाड्यात सुद्धा नाही

डॉक्टर साहेब,

मी सुद्धा मराठवाड्यातलाच शेतकरी आहे. मराठवाड्यात जी गावरान बाहरी म्हणून विकली हाते ती सुद्धा संकरीत झाली आहे. आमच्या घरचे गावरान बाजरीचे बेणे पिढ्यानपिढ्या तेच आहे पण बाजूच्या शेतातल्या बाजरीच्या परागकणांमुळे ते सुद्धा संकरीत झालेली आहे. अगदी दुकाणातल्या बंद पिशवीतून मिळालेल्या बेण्यापासून मिळणार्‍या बाजरीपेक्षा या घरच्या बेण्यापासून मिळवलेली बाजरी खूप जास्त चवदार लागते हा भाग निराळा. मुठभर बाजरीच्या दाण्यांत किती वेगवेगळ्या आकाराचे अन रंग-भिन्नतेचे दाणे मिळतात याचे निरिक्षण करा मग लक्षात येईल मी काय म्हणतो आहे ते. बालपणी मी अशी निरिक्षणे सगळ्याच धान्यांच्या बाबतीत केलेली आहेत. तेव्हाची गावरान बाजरी म्हणजे अगदी लहान-लहान हिरवत पण बुडाला किंचित पिवळसर असनारे दाणे. मराठवाड्यात हिरवा बाजरा मिळतो ना तसे पण त्या बाजर्‍याच्या दाण्यांपेक्षा खूप लहान.

आपला,
(मराठवाडी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

माहिती खूप आहे

तुम्हाला खूपच माहिती दिसते आहे, तुमच्या अनुभवांवरून जरूर लिहा, वाचायला आवडेल.

काळजी करण्यासारखे आहे

वर सहज यांनी म्हणल्याप्रमाणे कृषी विद्यापिठे आणि परवाना देणारे सरकारी अधिकारी काय करत होते हा एक प्रश्नच आहे...आपली काळजी आपल्यालाच ठेवावी लागते हा साधा नियम आपण पाळत नाही.

या संदर्भात आधीपण चीनच्या युद्धाच्या वेळेस दिला गेलेला कमी प्रतीचा गहू, मका आठवले. मोन्सँटो काही करू शकत असला तर ते स्लो युनियन कार्बाईड ठरू शकेल.

एकदा ऐकल्याप्रमाणे, पुर्वी रशियापण कसला तरी रासायनीक उद्योग उभा करायला मदत करत होती. पण जागा निवडली ती हरीद्वार का अशा ठिकाणि की जिथून प्रदुषित पाणी अजूनच गंगेला प्रदुषित करेल...

असे म्हणतात की बेडकाला गार पाण्यात ठेवले आणि ते हळू हळू गरम केले तर पटकन फरक समजत नाही आणि नंतर पाणि उकळू लागले की वेळ राहीलेला नसतो आणि त्यातच तो मरून जातो. पर्यावरणाकडे आपल्याकडे "यात काय आहे"म्हणत जे दुर्लक्ष चालले आहे त्यामुळे ही काळजी वाटते...

जे जे बाहेरचे ते सर्व चांगले हा

जे जे बाहेरचे ते सर्व चांगले हा विचार घातक आहे. आधुनिकता म्हणजे बाहेरचे सर्व अंगिकारणे नव्हे!
यात अनेकदा घात होवू शकतो. किंवा होतो आहे हे दिसतेच.

या संदर्भात आधीपण चीनच्या युद्धाच्या वेळेस दिला गेलेला कमी प्रतीचा गहू, मका आठवले. मोन्सँटो काही करू शकत असला तर ते स्लो युनियन कार्बाईड ठरू शकेल.
हे कळले नाही?

आपला
गुंडोपंत

शाळेत यावर धडे पाहिजे.

भास्कररावांची काळजी योग्य आहे. या विषयावर प्राथमिक अभ्यासक्रमात धडे पाहिजे.

दशमी

आमच्या घरात कायमच बाजरीची "दशमी "केली जायची . दशमी म्हणजे बाजरीच्या पीठात पाण्या ऐवजी दूध घालून तयार केलेली भाकरी. ताज्या भाकरीवर तूप टाकून खाल्ले जायचे. पण मला मात्र शिळी दशमी प्रिय. कारण ती कुस्करता येते.दूध-दशमी-गूळ, दूध-दशमी-केळं, तूप-दशमी-गुळ , तुप-दशमी हा प्रकार फक्त ताजी असेल तरच. भात हा फक्त सणावारीच केला जायचा. त्यामुळे मी भाज्या आमटी खात नसे. मग कधी कधी आमटी दशमी बळेच खायला लागायची. दशमीला पापुद्रे यायचे, भाकरीला नाही. प्राथमिक शाळा घराच्या (वाडा) मागच्या दारातून जवळ तर माध्यमिक शाळा घराच्या पुढच्या दारातून जवळ. त्यामूळे दुपारचे जेवण घरी. इतर वाड्या वस्त्यांवरील मुल. भाकरी, चटणी. कांदा, लोणचं फडक्यात गुंडाळून आणत. तोच त्यांचा डबा असे. एखाद्या कडे कोड्यास असले तर मजाच. [ कोड्यास- कोरड्यास काही तरी ओले हवे या गरजेतून निर्माण झालेला शब्द, कालवण या अर्थाने] बाजरी हेच पीक तिथे सार्वत्रिक असल्याने गावरान "बेनं "( बियाण या शब्दाचा अपभ्रंश) हे जाणीव पुर्वक जतन केले जायच. जोंधळा (ज्वारी) हे २ नं चे पीक होते. तेव्हा सुटीत पुण्यात आल्यावर पण मामीला माझ्यासाठी बाजरीचे पीठ करुन आणावे लागे.
हायब्रीड चालू झाल आन् ती चवच हळू हळू नष्ट झाली.
प्रकाश घाटपांडे

हायब्रीड

शेतकीत जेवढे संशोधन होते त्यातून काय बाहेर पडते? कमी पाण्यावर, कमी दिवसात, भरपूर रासायनिक खतांवर , चिक्कार कीटकनाशके मारल्यावर कीड न पडणारी, जास्त उत्पन्‍न देणारी धान्याची बेचव जात. अशा धान्याचे पोषणमूल्य कितीही असले तरी आमच्या दृष्टीने ज्याला चव नाही त्याची किंमत शून्य! दुर्दैवाने चव मोजण्याचे अजून यंत्र निघाले नाही. त्यामुळे जोपर्यंत जुनी माणसे शिल्लक आहेत तोपर्यंत चांगल्या चवींच्या धान्याचे नमुन्यापुरते का होईना उत्पादन, निदान कृषिविद्यापीठांनी काढायलाच पाहिजे.
आता चांगल्या वासाचा भोर-नसरापूरचा आंबेमोहोर संपला. गोल बाणेरी बोरे दुर्मीळ झाली. मिळतात ती लांबडी भलीमोठी बेचव अहमदाबादी बोरे. परदेशी सफरचंदे इतकी वाईट लागतात की एकदा खाल्यावर पुन्हा घेण्याची इच्छा होत नाही. डेहराडून-काश्मीरची सफरचंदे हळूहळू कमी होत जाणार. वेळीच उपाय केला नाही तर आपला सुफला सस्यशामला देश तसा नाही असे सांगायची पाळी येईल.--वाचक्‍नवी

एकदम पटणारे

वेळीच उपाय केला नाही तर आपला सुफला सस्यशामला देश तसा नाही असे सांगायची पाळी येईल.

मोजक्या शब्दात एकदम पटणारे...

 
^ वर