म. वा. धोंड यांचे निधन

म.टा. मधील बातमी

एका अभ्यासू, चिकित्सक , मार्मिक समीक्षा लिहिणार्‍या माणसाचे निधन. मर्ढेकरांवरचे त्यांचे लिखाण चरित्रात्मक समीक्षेच्या (काहीशा वादग्रस्त) अंगाने जाणारे होते ; पण त्यातील अर्थाच्या मागे शिकारी कुत्र्याप्रमाणे जाऊन शोध घेण्याच्या गुणाबद्दल , आणि नवनवीन शक्यतांच्या विचार करण्याच्या निर्मितीक्षम लिखाणाबद्दल ते नेहमीच आदरास पात्र ठरले.
अनेक लिखाणांतील ऐतिहासिक बाबींच्या नेमकेपणाबद्दल त्यानी संशोधन केले , चुका दाखवून दिल्या. म्हणून आम्ही गमतीने त्याना "मराठी साहित्यातील धोंड" असे गमतीने म्हणत असू याची आठवण येते.

लेखनविषय: दुवे:

Comments

माहीती

म.वा. धोंड ह्यांचे नाव माहीत असले तरी जास्त वाचले नसल्यामुळे अधिक माहीती सांगितली तर वाचायला आवडेल.

अनेक लिखाणांतील ऐतिहासिक बाबींच्या नेमकेपणाबद्दल त्यानी संशोधन केले , चुका दाखवून दिल्या. म्हणून आम्ही गमतीने त्याना "मराठी साहित्यातील धोंड" असे गमतीने म्हणत असू याची आठवण येते.

मराठी साहित्यातील म्हणायच्या ऐवजी राठी वाड्मयातील धोंड म्हणले तर म. वा. धोंडच होईल !

+१

>>म.वा. धोंड ह्यांचे नाव माहीत असले तरी जास्त वाचले नसल्यामुळे अधिक माहीती सांगितली तर वाचायला आवडेल.
असेच म्हणतो

त्यांची काही पुस्तके

त्यांची काही पुस्तके
त्यांचे काही अभ्यासविषय

"मराठी वाड्मयातील धोंड" हेच त्यांचे नामाभिधान ! मी चुकून साहित्य लिहीले :-)

मराठी लावणी

मराठी लावणी - म. वा. धोंडाचे हे एकमेव पुस्तक कोणाच्या तरी संशोधनाच्या निमित्ताने आम्ही चाळले होते, त्यांच्या लावणीविषयक मतांचा अनेक साहित्यिकांनी खरपूस समाचार घेतलेला आहे, त्यांची मते या पुस्तकातही वादग्रस्त अशीच आहेत, इतकेच आम्हाला माहित. त्यांच्या लेखनाविषयी अधिक वाचायला आम्हालाही आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुकारामाचे निर्याण

ह्या शीर्षकाचा लेख धोंडांनी ह्या वर्षीच्या दीपावलीच्या दिवाळी अंकात लिहीला आहे. गेल्या चार वर्षात त्यांनी तुकारामासंबंधी काही संशोधन केले, व ते तीन लेखांतून आपल्यासमोर मांडले. सदर लेख हा त्यांपैकी तिसरा (व आता असे म्हटले पाहिजे की शेवटचा).

ह्यात धोंड तुकारामाच्या निर्वाणाबद्दल काही वेगळेच अनुमान आपल्यासमोर ठेवतात. मला स्वतःला ह्याबाबत काहीच खोल माहिती नाही. धोंडानी जे त्यांच्या लेखात लिहीले आहे त्याचा गोषबवारा इथे मी लिहीतो:

ते म्हणतात की तुकाराम सदेह वैंकुंठात विमानात बसून गेले, ही त्यांच्या वारसांनी पसरवलेली निव्वळ भाकडकथा आहे. तसेच ह्या लेखात धोंडानी अजून एका 'लॉबी'च्या [माझा शब्द, त्यांनी त्यांना 'ब्राम्हणेतर चळवळीचे प्रचारक' असे उद्बबोधले आहे] थियरीचाही परामर्ष घेतलेला आहे. ह्या लोकांच्या मते गावातल्या ब्राम्हण मंडळीने तुकारामांना जंगलात नेऊन त्यांचा खून केला.

धोंडांच्या निष्कर्षानुसार झाले असे की तुकारामांना आचरणातला जो आदर्श अभिप्रेत होता (मनाच्या व्यवहारातील शिस्त वगैरे) त्याच्या बरोब्बर उलट त्यांचा भाऊ कान्होबा, त्यांची दुसरी पत्नि, जिजाऊ व त्यांच्या स्वतःचा पुत्र वागत होते. ह्याचा त्यांना उबग आला. तसेच कीर्तन वगैरे करून ते जे समाजप्रबोधन करत होते, त्यात गावातील विघ्नसंतोषी लोकांनी खोडे घालण्यास सुरूवात केली. कीर्तन चालू असता उगाच 'परचक्र आले आहे' अशी बातमी तेथे पाठवून ते उधळून लावणे, कीर्तनाच्या मंडपाला आग लावणे इत्यादी प्रकार होऊ लागले होते. तेव्हा तुकोबांनी त्यांच्या काही निवडक अनुयायांबरोबर पंढरपुरी जायचे ठरवले. ते जातांना गरुडासदृश्य पालखीतून् गेले (हेच ते 'विमान' होय !). पंढरपुरी पोहोचल्यावर त्यांनी विठोबामाउलीचे पाय धरले. त्या रात्री इतर मंडळी भोजनाची व्यवस्था करण्यात गुंगली असताना त्यांनी भिकार्‍याचा वेश परिधान केला, व सर्वांचा डोळा चुकवून ते तेथून निघून गेले. ते परागंदा झाले, त्यानंतर ते कुणासच कधीही दिसले नाहीत, ना त्यांचे शव कुणाला सापडले. धोंडांच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व त्यांच्या वारसांना लाजिरवाणे होते, म्हणून त्यांनी ती 'विमानात बसून निर्वाण' केल्याची 'भाकड'कथा रचली.

लेखात धोंड तुकारामच्या अनेक अभंगाचे सविस्तर दाखले देतात. अत्यंत वाचनीय असा हा लेख आहे.

संत तुकाराम...

धोंडांनी मांडलेले तुकारामाच्या निर्वाणाविषयीचे विचार हे "लॉजिकल" वाटतात. गरूडावर बसून वगैरे गेले हे केवळ दंतकथा म्हणून ऐकाय्चे. त्यांचा शेवट कसा झाला ह्यावर त्यांच्या वाड्मयाचे मुल्य ठरत नाही.

यावरून थोडे अवांतरः आठवते त्याप्रमाणे संत तुकाराम या प्रभातच्य चित्रपटात एक मार्मिक गोष्ट घेतली होती. चित्रपटलेखाचीच (कोण ते माहीत नाही) कल्पना असणार! तुकारामाची पत्नी जिजाऊ ह्या भजन किर्तनाने त्रासली होती (कारण संसारात लक्ष नसल्याने प्रापंचीक हाल). जेंव्हा तुकारामाला सदेह वैकुंठास नेण्यास गरूडाचे विमान इंद्रायणीकाठी आल्यावर तुकाराम जाण्यास निघतात आणि बायोकोस म्हणतात, की मी वैकुंठास जायला निघालो आहे, चल माझ्या बरोबर. बायको वैतागून (आणि काही तरी ते तंद्रित बोलताहेत समजून) म्हणते की, "तुम्ही व्हा पुढं, माझि म्हस व्यालीय, तिचे बाळंतपण करून म्या येते!"

इतर काही स्त्रिया

विकास यांच्या पोस्ट् वरून या प्रकृतिच्या इतर काही स्त्रियांची आठवण येते :

सॉक्रेटीसची बायको झांटिपे
सुनीताबाई देशपांडे

:-)

सुनिताबाई

पु. लंच्या निरागस व काहीश्या भोळ्या स्वभावामुळे त्यांना त्रास होई इथपर्यंत सुनिताबाईंची व तुकारामाच्या जिजाऊची तुलना ठीक आहे. त्यापुढे त्यांची तुलना अजिबात करता येणार नाही.

 
^ वर