पु.ल. आणि कालौघ ....

Disclaimer (मराठी शब्द हवा ) : प्रस्तुत लिखाण पूर्वी एकदा "तीव्र म" वर केले होते. येथील बहुतांशी लोकांनी ते पाहिले नसेल या समजुतीने आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे हा विषय अजून थोडा छळतो म्हणून पुन्हा एकदा ते मांडावेसे वाटले ...
------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्राचे अत्यंत लाडके लेखक पु . ल. देशपांडे यांना जाऊन गेल्या जून मध्ये सात वर्षें होऊन गेली.

गेल्या सात वर्षांत त्यांच्या स्मरणार्थ , त्यांच्या एकूण कारकीर्दीचा मागोवा , आढावा घेणारी , त्यांचा आठवणींना उजाळा देणारी , त्यांच्या अप्रकाशित लेखनाची अनेक पुस्तके आली आणि ही सर्व पुस्तके उत्तम खपली. पु. लं. ची कितीतरी जुनी पुस्तके , गाणी , नाटके या गेल्या सात वर्षांत अगदी चांगली खपली ; आणि हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे नाहीत.

पु. लं. ची हिमालय-सदृष्य सावली गेल्या शतकाच्या शेवटच्या चार -पाच दशकांवर पडली. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य उणीपुरी पन्नास वर्षे ते हयात असतानाच तळपत होता. हा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.

आज सात वर्षांनी , ही सावली दूर गेल्यानंतर , त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या त्यांच्या प्रेमाच्या पुराची लाट किंचितशी ओसरल्यासारखी झाल्यानंतर त्यांच्या आपल्या आताच्या आयुष्याशी राहिलेल्या नात्याबद्दल आपल्याला काहीशा समतोलपणे बोलता येईल असे वाटते. त्यांच्याबद्दलचा "रेव्हरंस" लोपलेला नाही ; परंतु त्यांच्या "रिलेव्हन्स" बद्दल बोलावे इतपत काळ उलटला आहेसे वाटते.

माझ्या विचारांची दिशा थोडीशी तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित आहे. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. पण "तुझे आहे तुजपाशी" सारख्या कृतींतून उघडउघड तर अन्य ललित लिखाणांतून प्रच्छन्नपणे त्यांच्या जगण्यबद्दलच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे. मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील.

स्मरणरंजन : इंग्रजीत ज्याला नॉस्टाल्जिया म्हणतात त्याचे दर्शन पुलंच्या जवळजवळ प्रत्येक लिखाणात दिसेल. त्यांच्या लेखक म्हणून ऐन बहरात असण्याच्या कालात या मुद्द्याचे अपील खूप मोठे होतेच ; पण ऐंशी-नव्वदीच्या दशकात जेव्हा पुलंनी जवळजवळ लेखनाच्या मुख्य प्रवाहापासून संन्यास घेतला होता, त्या काळातील पिढ्यांवर सुद्धा , या स्मरणरंजनाचा प्रभाव कमी नव्हता. बालगंधर्व, पुलंचे आजोबा, अगदी बोरकरसुद्धा ..... या साऱ्यांना कधीही न पाहिलेली मंडळी त्याना पहात होती पुलंच्या चष्म्यातून. वसंतराव देशपांडे , केसरबाई केरकर यांसारख्यांना या पिढीतील लोकांनी ओझरते पाहिले असेलही ; पण ते त्यांच्या उतारवयात , कारकीर्द आटोपताना. पण त्यांची व्यक्तिचित्रे अगदी अलिकडील पिढ्यांमढ्ये लोकप्रिय होती.

पुलंच्या अस्तानंतर या स्मरणरंजनाची जादू लोप पावत असल्यासारखी का वाटत असेल? माझ्या मते, त्याचे एक उत्तर असे असेल की, पुलंच्या अस्तानंतर जवळजवळ लगेच, त्यांना पाहिलेल्यांची, त्यांच्याबरोबर काम केलेल्यांची , त्यांचे कर्तृत्त्व घडताना ते अनुभवणाऱ्यांची पिढीच काळाच्या पडद्याआड गेली. हे संक्रमण जास्त जाणवले ते पुलंच्या एक्झिटमुळे. याचा अर्थ या पिढीतील सर्वच्या सर्व माणसे इतक्या थोड्या कालावधीत देवाघरी गेली, असा कुणी शब्दशः अर्थ काढू नये. पण ही पिढी जीवनाच्या क्रीडांगणातून निवृत्त होत गेली आणि पुलंच्या लिखाणातील स्मरणरंजनाच्या एका मोठ्या भागाचे संदर्भ विरल्यासारखे झाले असे मला वाटते.

त्यांच्या लिखाणाकडे मागे वळून पहाताना, आपल्या सध्याच्या जगण्याच्या संदर्भात पु. ल. कुठे उभे आहेत असे तुम्हाला वाटते ? त्यांच्या लिखाणातील काय काय अजूनही आवडते ? काय काय मार्मिक वाटते ? "ओल्ड रेलीक" वाटावा असा कुठला भाग वाटतो ? एकंदर जगण्याबद्दलचे त्यांचे कुठले विचार चिरकाल टिकून आहेत असे वाटते ? आणि जर का त्यांचा ठसा पुसट होत असेल तर , त्यांनी स्वीकारलेल्या जगण्याबद्दलच्या दृष्टिकोनातील कुठला भाग कालातीत होता काय ?

लेखनविषय: दुवे:

Comments

अनुभवांचा धागा

मला वाटतं, नव्वदीपर्यंत तरी थोडीबहुत चाळ-संस्कृती टिकून होती. परदेशगमनाचे अप्रूप होतं, पुणेकर पुणेरी होते (ह. घ्या.). या सार्‍या गोष्टींशी आणखीन पन्नास वर्षांनी जन्माला येणार्‍या पिढीला आयडेंटिफाय करणे अवघड जाणार आहे. थोडंसं विषयांतर होईल, पण दिलीप प्रभावळकरांनी बोक्या सातबंडे लिहिल्यानंतर लहान मुलांसाठी विशेष काही लिहिलं नाही; याचं कारण देताना आजच्या शहरी पिढीतील मुलांना आपलंसं वाटेल असं लिखाण करणं अवघड आहे हे कारण दिलं होतं. थोडंफार याच फरकाने, ढोबळमानाने पुलंच्या किंवा एकंदरीतच मागल्या पिढीतील लेखनाबद्दल होऊ शकेल अशी भीती वाटते. लंपन आवडण्यामागे त्यावेळी आपण जसा मॅडसारखा विचार करायचो, हे आठवतं किंवा त्याच्या आजोळाचे वर्णन वाचताना आपला गाव जसा आठवतो; तसंच आणखी काही पिढ्यांनी होणार नाही हे उघड आहे. अर्थात, ते अपरिहार्यही आहेच. शिवाय, या दशकात तर बदलाचा वेग भोवंडून टाकेल इतका वाढला आहे.

पण ह्या ढोबळ फरकावर मात करुन पुलंच्या लेखनातला एकंदरीतच मनात कुठलंही किल्मिष न ठेवता आनंदी वृत्तीने जगण्याचा, जे जे आपल्याला भावलंय ते ते चार लोकांना सांगण्याचा असा आनंदयात्री (किंवा त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर खेळिया वृत्तीचा) प्रभाव तरी टिकून राहील, त्यांच्या लेखनातून जाणवत राहील असं वाटतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर, नारायण बोहलं झाडतो म्हणजे काय करतो किंवा लग्नात नवरा हातरुमाल हवेत म्हणून का अडून बसतो; हे जरी पुढच्या पिढीला नीट उमगलं नाही, तरी त्यातील शेवटचा भाग (काळा झालेला लाडू मुठीत धरून झोपी गेलेला मुलगा, मुटकुळी करून नोकरांसोबत झोपलेला नारायण) समजण्यात तरी काही अडचण येऊ नये.

त्यामुळे, तुम्ही म्हणता तसे रिलेव्हन्स थोडा कमी झाला तरी रेव्हरन्स कमी झालेला नाही. रिलेव्हन्स कमी होण्यामागे मागल्या पिढीतली कर्तृत्ववान मंडळी काळाच्या पडद्याआड गेली (अथवा निवृत्त झाली); याबरोबरच पिढ्यांतील बदलांचा वेग वाढला हेही असावं असं मला वाटतं.

[डिस्क्लेमर = श्रेय अव्हेर, हे मनोगतावर वाचल्याचे आठवते.]

आपले

दोन्ही मुद्दे १००% पटले.

काळ इतका झपाट्यानं बदलत आहे की प्रभावळकरांनाच काय अगदी तिशीतल्या लेखकांना सुद्धा आजच्या मुलांच्या मनातले लिहिता येणे कठीण आहे. (म्हणून तर आम्ही असे काही लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही ... ह. घ्या ).

आपला,
(सहमत) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

पुलं

पन्नास वर्षांनंतरची पिढी सोडा. दहा वर्षानंतरच्या पिढीतही खूपच थोडा रिलेव्हन्स राहील असे वाटते. कारण स्पष्ट आहे "या दशकात तर बदलाचा वेग भोवंडून टाकेल इतका वाढला आहे."

नंदनने सांगितल्याप्रमाणे त्यांचा आनंदयात्री स्वभाव आवडतो. पण काय आहे सध्या जीएंचे "पुलंनी व्यक्तिचित्रणामध्ये लेखाच्या तिसर्‍याच वाक्याला हुंदका दिला पाहिजे." असे वाक्य मनात रुतले आहे. पुन्हा एकदा पुलंचे सगळे साहित्य वाचून आता ते तसे आवडते का? आणि का आवडले होते याची उत्तरे शोधण्याची उबळ आली आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

"मूल्यपमापन"

हा शब्द मोठा झाला खरा ; पणा आपण त्या लिखाणाच्या संदर्भात कुठे आलो आहोत हे तपासावे असे वाटते खरे.

तत्कालीन

एकंदर जगण्याबद्दलचे त्यांचे कुठले विचार चिरकाल टिकून आहेत असे वाटते ?

सत्य सुद्धा त्रिकालाबाधित नसतं, तिथ विचार कसे असतील? काळाच्या प्रवाहात तुम्ही आम्ही सगळेच तत्स्कालीन. कमी अधिक प्रमाणात.
प्रकाश घाटपांडे

टिकतीलच याची खात्री आहे.

मी पु.लंना प्रत्यक्ष न पाहीलेल्या कमनशिबी लोकांपैकी एक आहे. पण त्यांचं लिखाण माझ्यासाठी 'कसं जगावं' हे शिकवणारी शाळा आहे. त्यांनी आपल्या बर्‍याच लेखनात ज्या काळचं वर्णन केलं आहे त्या काळी माझा जन्मही झाला नव्हता. पण तरिही जे काही लिहिलं असतं ते पटतं.. नुसतं पटतच नाही तर मनाला भिडतं.. भावतं..
त्यामुळे मला वाटतं नाही की हे लेखन प्रभावी असण्यामागे केवळ नॉस्टॅल्जिआचा भाग आहे. (मी कशाला ते ट्राम आणि मॉजिनिजचं वर्णन वाचून नॉस्टॅल्जिक होऊ)... त्यांचं 'आनंदयात्री' म्हणून जगण्याचं तत्व या प्रभावाच्या मुळाशी आहे. आणि माझ्या मते त्यांचे अनेक विचार टिकण्यासारखे आहेत आणि टिकतीलच याची खात्री आहे.

-(पुलमय) ऋषिकेश

वर्तमान

मित्रांनो , तुमच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. इथे एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करायला हरकत नाही की, पु.ल. हे एक आनंदाचे निधान आहेत, न वठणारा कल्पवृक्ष आहेत याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा किंतु नाही. पण ते गेल्यानंतर आपल्याबरोबर काय घेऊन गेले , आपल्याकरता काय ठेऊन गेले याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे म्हणाना ...

कालचक्र

पुलंच्या साहित्यातील काही प्रकार इतरांपेक्षा जास्त आवडतात. उदा. गाळीव इतिहाससारखे लेखन कालातीत व्ह्यायला बराच काळ जाइल असे वाटते. (हा शिलालेख तिसर्‍या, सातव्या अथवा नवव्या शतकातील आहे.) त्यामानाने त्यांचे असामीअसामी सारखे लेखन आज तितके रेलेव्हंट वाटत नाही. बहुधा त्यात रंगवलेला मध्यमवर्गीय कारकून आताच्या मल्टीनॅशनल जमान्यात थोडाफार कालबाह्य होतो आहे की काय अशी शंका येते.
माझे बरेच मित्रमंडळ पुलंचे फ्यान आहे. पहिल्यांदा पुल वाचल्यानंतर काही वर्षे त्या प्रभावाखाली होतो. आता असे जाणवते की तेव्हा नकळत जगाकडे बघण्याची दृष्टी पुलंसारखी करायचा प्रयत्न चालू होता. पहिल्या परदेशवारीआधी पूर्वरंग आणि अपूर्वाई वाचून मग परदेशात गेल्यावर त्याच तर्‍हेने सर्व अनुभवण्याचा प्रयत्न केला. नंतर लक्षात आले की हे बदलायला हवे. पुल महान लेखक आहेत यात वादच नाही, पण जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन त्यांच्यासारखाच असला पाहिजे असे का? याचा अर्थ त्यांचे आवडणारे गुण घ्यायला हरकत आहे असा नाही. पण सर्वच बाबतीत असे होउ नये. मग इतर (विशेषकरून इंग्रजी) लेखक वाचल्यानंतर लक्षात आले की अनुभवांचे क्षितिज रुंदावण्यासाठीवासे होण्याची गरज आहे.
मला पुलंचे गंभीर लेखनही फार आवडते. कधीकधी त्यांनी विनोदाकडे न वळता वंगचित्रेसारखे लेखन केले असते तर काय झाले असते असा विचार मनात येतो.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

जरूर वाचेन

राजेन्द्र, तुम्ही ते लेखन पुन्हा एकदा वाचा, ही विनंती.

सर्किटराव, याहून चांगला गृहपाठ शाळेच्या कुठल्याही वर्षात मिळाला नव्हता. :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वाचनीय..

मिसळपाव डॉट कॉम या संस्थळावरील मिपा संपादकीय या सदरात नंदनरावांचा पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण हा अग्रलेख हा सदर चर्चेच्या संदर्भात वाचनीय ठरावा..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

जाहिरात

इथे येउन सतत मिसळपावची जाहिरात केल्याबद्दल उपक्रमाने तात्याकडून पैसे घ्यावेत.

 
^ वर