मराठीचा अवैध प्रचार
येथे परदेशातल्या भारतीय दुकानांमध्ये हिंदी, तेलगू, तमीळ चित्रपटांच्या तसेच गीतांच्या तबकड्या खचाखच भरून पडलेल्या आपण पाहतो, बंगाली, मल्याळी, पंजाबी सुद्धा कधी-कधी दिसतात. अन आपल्या मराठी मनाला वाटते की कधीतरी आपल्या तबकड्या सुद्धा एक दिवशी येथे ओसंडून वाहू लागतील. गेल्या काही वर्षांत मृतवत झालेला मराठी सिनेमा पुन्हा एकदा चमकायला लागला आहे तसा आशेचा किरण मनात सुस्पष्ट होताना दिसतो आहे. पण अजूनही इथल्या चित्रपट वितरकांना मराठी सिनेमे निघतात याची माहितीच नाही. असो.
बाकीच्यांना दोष देऊन काय उपयोग? आपल्याला काय करता येईल ते पहावे म्हणून मी आणखी एक उपक्रम अशात सुरु केला. मराठी लोकांशी मराठीतूनच बोलने, घरात मराठी शब्दांतूनच मराठी बोलणे याव्यतिरिक्त केवळ मराठी सिनेमे पाहने, गाणे ऐकने व ईतरांना ऐकायला घालने असा हा बेत. मराठी गाण्यांच्या तबकड्या तयार करून त्या मी मित्रांना देऊ लागलो (अर्थात, चकटफू मिलालेला माल चकटफू देतो). त्यामागच्या साधा सरळ विचार हा की आज जसा हिंदी-तेलगू-तमीळ प्रेक्षक फुकटात गाणे ऐकतो, चित्रपटे पाहतो अन त्यातून स्वतःला त्या-त्या भाषेतील चित्रसंगिताची सवय लावून घेतो तसेच मराठीचे सुद्धा करु. लोकांना नवीन चांगली चित्रपट गिते ऐकायची सवय लागल्यावर आज फुकटात यू-ट्यूबवर, राजश्रीच्या अथवा कुठल्यातरी साईटवर चित्रपट पाहणारा येथील मराठी प्रेक्षक उद्या मराठी सिनेमे चित्रपटगृगात बघायला जाण्यासाठी तेलगू-तमिळांसारखा दीड-दोनशे मैलांवरच्या बोस्टन-न्यूयार्कला जायला लागेल.
पण मराठी माणूस म्हणजे वल्ली आहे हे काल एका प्रसंगातून सिद्ध झाले. नव्या मराठी गितांना अवैध प्रकारे उतरवून घेऊन त्याच्या अवैध (विनापरवाना) तबकड्या बनवून प्रसारीत करीत आहे हे कळल्यावर आमच्या एका मित्राने मला खडसावले. म्हणे असे चोरीचे धंदे तुम्हाला शोभत नाहीत! बोंबला. मी त्या सदगृहस्थाला सांगितले की रे बाबा मी ज्यांना या तबकड्या देत आहे त्यांनी कधी मराठी तबकड्या विकत घेतलेल्या नाहीत आणि घेण्याची शक्यताही नाही. त्यामुळे मी कोणाही संगित बनवणार्या लोकांवर अन्याय करत नाहिये. किंबहुना या गाण्यांची आवड निर्माण झाल्याने ते भविष्यात खिश्याला भोक पाडून सिनेमे पाहतील, ओरिजिनल तबकड्या विकत घेतील. पण ह्या महाशयांचे म्हणने की त्या वितराकांना त्यांच्या तबकड्या लोकांपर्यंत कशा पोचयच्या हे त्यांना ठरवू देत. त्यामुळे आपण का अवैध धंदे करायचे?
तर उपक्रमिंनो, मी हा निवाडा तुमच्या कोर्टात ठेवत आहे. आपण सर्वजन मराठीवर प्रेम करता. येथे लिहून मराठीच्या प्रसारात हातभार लावता. तेव्हा तुम्ही काय तो न्याय निवाडा करावा ही विनंती.
Comments
हाच तो विषय
याच विषयावर मी एक सुंदर लेख सकाळ किंवा लोकसत्ता मध्ये दोन् तीन वर्षांपुर्वी वाचला होता. नेहमीप्रमाणे नाव आठवत नाही. कटींग पण केले नाही.पण त्यात पायरसीवर सर्वांगिण विचार मांडला होता. काही दिवसांनी "इथीकली पायरेटेड" असा शब्द प्रचारात आल्यास नवल नाही. एखादी गोष्ट "कायदेशीर" आहे म्हणून "नैतिक" आहे असे नाही. तसेच एखादी गोष्ट "बेकायदेशीर" आहे म्हणून् "अनैतिक" आहे असेही नाही. त्यामुळे काही गोष्टी 'योग्य' नसल्या तरी 'क्षम्य' मानण्यात अपराधगंड असू नये. असे माझे व्यक्तिगत मत आहे. शेवटी हे ठरवणार कोण? आपली सदसदविवेकबुद्धी ना!
प्रकाश घाटपांडे
पुर्णतया योग्य
भास्करराव,
उत्तम प्रकल्प!! एकदम 'फूल टू' पाठींबा :)
कारण लोकं कोणी काही करत असेल तर अडवतात आणि स्वतःही काही करत नाहीत.
मी स्वतः अनेक मराठी सोडाच पण अमराठी मित्रांना त्यांच्या वाढदिवशी मराठी अभंगांच्या सिडिज राइट करून भेट म्हणून दिल्या आहेत. (त्यांना त्या आवडल्याही.) तेव्हा जोपर्यंत कोणी आपल्याला हे सुचवत नाही की हि गोष्ट यापेक्षा चांगल्या मार्गाने कशी करता येईल तोपर्यंत असंच् चालू ठेवावे हे माझे आग्रही मत आहे. कारण काहीच न करता बोलणार्यांपेक्षा हे फारच उत्तम आहे
ऋषिकेश
हं
जरा बॉर्डरलाइन केस आहे. वरवर पहाता मन मोठं केल (दुर्लक्ष??) तर माफ करता येण्यासारखी स्थिती आहे पण "ज्याचं जळत त्याला कळतं" हे पाहीले पाहीजे. म्हणजे तामीळ, हिंदी आदी कलाकार मंडळी कमालीचा पैसा मिळवतात. काही मराठी कलाकार पण असतील मिळवतं तेवढा पैसा आता, पण सगळेच नसतीलं. तर मग त्यातल्या त्यात बघून म्हणजे काही तबकड्या बनवून तर जे पैशाने साधे कलाकार आहेत त्यांची तबकडी खरेदी करुन.. :-)
आपल्या हातुन कमी देणं (दान) होतयं ही एक टाचणी टोचत असते अधुन मधून तेव्हा मी ठरवले की जिथे शक्य आहे तिथे घासघीस नाही व असे तबकडी / पुस्तके / वस्तु पैसे खर्च करुन घेणे व ती दुसर्याला भेट म्हणून देणे हे देखील, एखाद्या संस्थेला/कार्याला एक स्वतंत्र चेक फाडण्यासारखेच ("दान") आहे.
पण तरीही परदेशी असलेल्यांना (म्हणजे जरा सुखवस्तु ह्या अर्थाने हा!!) ज्यांना हे परवडले पाहीजे त्यांना बहूदा अवैध मार्गाने देणं तितकसं पटत नाही. का तर मराठीवरच्या "तुमच्या" प्रेमासाठी व "तुम्हाला" अपेक्षीत असलेल्या "मनोरंजनात्मक" मराठी प्रसारासाठी?.. :-|
उद्या तुम्ही म्हणाला तसे "दीड-दोनशे मैलांवरच्या "ठीकाणी परत मनोरंजनासाठी जाणे म्हणजे ग्लोबल वॉर्मीग जे आत्ता होत नाही ते होणार?? नको ते नकोच.... :-)
असो सारांश - जमेल तिथे पैसे खर्च करुन ती वस्तू द्या, आणी / किंवा तुम्ही लोकांना तो आंतरजालावरचा दुवा द्या, पुढचे पुढे लोकं बघतील. निदान परदेशातील लोकांना....
सवय...
पण तरीही परदेशी असलेल्यांना (म्हणजे जरा सुखवस्तु ह्या अर्थाने हा!!) ज्यांना हे परवडले पाहीजे त्यांना बहूदा अवैध मार्गाने देणं तितकसं पटत नाही.
-- पटत तर नाहीच हो, पण येथे मिळत नाहीत त्याला काय करणार. मी स्वतः पुण्याहून येताना डझनभर तबकड्या विकत घेऊन आलो होतो. पण नवीन आलेल्यांचे काय? त्या कशा मिळवाव्यात. जर या मित्रांना गाडीत मराठी गाणे ऐकायची सवय लागली तर उद्या त्यांना त्या विकतही घ्यायची सवय लाऊ शकतो.
ग्लोबल वॉर्मीग जे आत्ता होत नाही ते होणार?
--हा हा हा... आवडले.
तुम्ही लोकांना तो आंतरजालावरचा दुवा द्या.
--अनेक वेळा देऊन बघितला. पण त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसला नाही. तबकड्या मात्र बरेच जण कारमध्ये ऐकतात असे लक्षात आले.
आपला,
(स्नेहाभिलाषि) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
चालू ठेवा.
भास्करराव,
तुमचा कथित 'बेकायदा', 'अनैतिक' धंदा चालू ठेवा. इतरांना काहीही म्हणू द्या. थोडा मनस्ताप व इतर काही (जनहितयाचिकेसारखा) त्रास होण्याची शक्यता विचारांत घेऊन तो सोसायची तयारी ठेवा. हा इतरांच्या दृष्टीने आत्मघातकी मूर्खपणा ठरण्याची शक्यता आहे. पण कुठलाही समाज हा अशा झपाटलेल्या आत्मघातकी लोकांमुळेच टिकून राहतो. (मोंगलांशी कपटाने वागणारे शिवाजी महाराज व मराठी लोकांना हक्काचे भाषिक राज्य मिळावे म्हणून केंद्रांतील अर्थमंत्रीपद सोडणारे सी.डी. देशमुख अशांसारख्या आत्मघातकी मूर्खांमुळेच आज आपली थोडीफार अस्मिता शिल्लक आहे.)
जय महाराष्ट्र.
मराठी सिनेमे, मराठी वाहिन्या
आजकालचे ९९.९९ टक्के मराठी सिनेमे आणि मराठी मालिका ह्या हिंदी सिनेमाची/मालिकांची कॉपी असतात. मराठी नाटकांना हिंदी नावे, नाटकांमध्ये १० टक्के हिंदी डायलॉग असतातच. मी सध्या पाहिलेल्या प्रत्येक मराठी चित्रपटातील किमान १ गाणे हे संपूर्ण हिंदी होते. उदा. जत्रा, अगबाई अरेच्चा वगैरे. मग हिंदीच चित्रपट बघितलेले (किंवा खरे तर मराठी आणि हिंदी दोन्ही न बघितलेले) काय वाईट?.
मराठी वाहिन्यांच्या नावाखाली सरळसरळ हिंदी चित्रपटांच्या "माहितीचा" रतीब गेले १५ दिवस चालू आहे. "ओम शांती ओम" आणि "सावरिया" या चित्रपटांचे प्रदर्शन व नंतरचा त्यांचा परफॉर्मन्स याविषयी महाराष्ट्रातील जनतेला इतके आकर्षण आहे हे तर अशा मराठी बातम्या पाहूनच कळते.
बाय द वे, महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाची "महाराष्ट्र अनलिमिटेड" ही जाहिरात कोणी पाहिली आहे का? "मॅडम पहले ही कलर बोल देना... बाद मे चेंज करके नही मिलेगा" वगैरे महाराष्ट्राच्या राजभाषेतील डायलॉक खूप आवडले.
असो.
आम्हाला येथे भेट द्या.
जिवंत राहणे
मराठी सिनेमे आणि मराठी मालिका ह्या हिंदी सिनेमाची/मालिकांची कॉपी असतात.
-- मान्य. तरी पण त्यातल्या त्याच चांगले, मनोरंजनात्मक व नवीन प्रयोग करणारे जे सिनेमे/मालिका आहेत त्यांना आपण प्रतिसाद दिला पाहिजेच. कारण मराठी श्रोता जिवंत ठेवणे आवश्यक आहे. मागणी असेल तर चांगली निर्मिती सुद्धा होईल. कॉपी बद्दलच म्हणायचे तर हिंदीतला शोले हा सुद्धा मग्निफिसीअंट सेवन (हॉलिवूड) तसेच सेवन समुराय (जपानी) या चित्रपंटांवरून घेतलेला आहे. तरी त्याने इतिहास घडवलाच.
मला मागच्या वर्षभरात आलेले अर्धा डझन मराठी चित्रपट चांगले वाटले. बाकीच्यांची कीव आली. पण मराठी चित्रपटांतील चांगल्यांचे खराबांसोबतचे प्रमाण हिंदी-तेलगू-तमीळ यांच्या सारखेच आहे हे सुद्धा लक्षात घ्या.
आपला,
(कॉपी वाला) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
मराठी चित्रपट, मराठी वाहिन्या
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. आजानुकर्ण यांचे : "मग हिंदीच चित्रपट बघितलेले (किंवा खरे तर मराठी आणि हिंदी दोन्ही न बघितलेले) काय वाईट?." हे वाक्य मला अतिशय आवडले. त्यांची प्रशंसा करावी असे वाटले. पण शुद्ध मराठीत वाखाणणी कोणत्या शब्दांत करावी हा प्रश्न पडला. "वाहवा ! क्या बात है !बहोत अच्छा " असे लिहिले तर ते मराठी नाही. को़णाची तोंडभरून स्तुती करण्यासाठी मराठीत सब्दच नाहीत काय?
हा प्रश्न
यनावालासाहेब?
हा प्रश्न चक्क तुमच्या कडून???
(डॉ.तुम्ही च्या धर्तीवर...)
यनावाला तुम्हीसुद्धा...?
आपला
चकित
गुंडोपंत
मी तुमच्या बरोबर आहे!!
केन्डे साहेब,
मी तुमच्या बरोबर आहे...
बिन्धास कॉप्या करा नि द्या त्या सिडीज मित्रांना.
मी तर म्हणतो कॅननच्या त्या एका प्रिंटरवर सिडी कव्हरही प्रिंट होते तसे एकदम परफेक्ट करून द्या. पेन ने नाव घातलेल्या सिडीपेक्षा छान दिसते!
आकर्षक कव्हर असले, तर अजून ऐकण्याची शक्यता वाढेल.
शिवाय त्या सिडी च्या कव्हर मध्ये मायबोली सारख्या 'मराठी गोष्टी विकत मिळणार्या' स्थळांचीही एक यादी- चिट्ठी देत जा!
काही कुणाच्या विचारांना बळी पडू नका... आपले कार्य जोमाने सुरू ठेवा.
आपल्याला शुभेच्छा!
मीही काही मदत लागली तर नक्की करेन.
आपला
गुंडोपंत
मस्त कल्पना
पंत,
'मराठी गोष्टी विकत मिळणार्या' स्थळांचीही एक यादी तसेच सिडी कव्हरची प्रिंट या दोन्ही कल्पना मस्तच आहेत. नक्की उपयोग करू या.
आपला,
(प्रभावित) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
येथे
ही घ्या!
कॅनन च्या 'त्या' प्रिन्टर ची माहीती येथे आहे.
आपला
गुंडोपंत
प्रोत्साहना बद्दल
घाटपांडे साहेब, ॠषिकेश, कोर्डे साहेब, तसेच गुंडोपंतांचा आमच्या उपक्रमाला असणारा ठाम पाठिंबा घेत हा निवाडा "तबकड्या वाटणे घालू ठेवावे" अशा निर्णयाकडे झुकताना दिसत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहना बद्दल आभार.
सहजराव तसेच अजानुकर्णाने "नारो वा कुंजो वा" केले असल्याने त्यांचा आमच्या "चोरी-माल-दाना"ला विरोध आहे असे स्पष्ट होत नाही.
कोर्ट यापुढील मतांच्या प्रतिक्षेत आहे.
आपला,
(वादी/प्रतिवादी) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
प्रतिचा दर्जा
मूळ गाण्याची एम्.पी. ३ केली तरी त्याच्या दर्जाबाबत हेच म्हणता येईल (मूळ प्रतिच्यापेक्षा कॉंप्रेस्स्ड् प्रतिचा दर्जा हलका). मग त्याच्याही बाबतीत हेच लागू होईल का?
दोन्ही सूचना
चांगल्या आहेत. पण मग मला वाटते मी उअतरवलेल्या बर्याच गाण्यांचा मूळ दर्जा राखला गेलेला नसल्याने मी केले ते बेकायदा ठरत नाही.
आपला,
(कायदेशीर) भास्कर
आम्ही येथे वसतो.
गैरसमज
माझी ही सूचना नव्हती, तर सर्किट ह्यांना हा प्रश्न होता. कारण प्रतिच्या दर्जाचा विचार कॉपीराईटच्या संदर्भात होत असेल, हे मला पटत नाही. ह्याबाबतीत त्यांनी अधिक खुलासा करावा.
माझे थोडेसे
भास्करराव, आपला मराठी सी. ड्या. मराठी मित्रांना फुकटात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम चांगल्या हेतूने चालवला असला, तरी मला त्याच्या परिणामकारकतेविषयी खूप् शंका आहे. माझा स्वतःचा ह्या बाबतीतला अनुभव व् एकंदरीत निरीक्षण असे आहे की लोकांना असे काही फुकटात मिळाले तर त्यांना त्याची किंमत नसते. ज्यांना ज्यांना आपण अशा सी. डी.ज् दिल्यात त्यांना आपण थोडेसे हळूवारपणे (subtly) विचारलेत की त्या सी. डी.ज् त्यांनी ऐकल्या का, व ऐकल्या तर त्यांतील त्यांना काय काय आवडले, तर मलातरी वाटते, पदरी निराशाच पडेल. खरे तर ज्यांना मराठी पुस्तके वाचाण्याची, मराठी गाणी ऐकण्याची खरोखरच इच्छा असेल, तर त्या व्यक्ति भारतात जातात, तेव्हा मुद्दामहून त्या वस्तू विकत घेऊन आणतील. मीतरी हे नियमीतपणे करतो. आम्हाला (आशियातच रहाणार्यांना) तर एकॉनॉमीतून् प्रवास करतांना २० किलोचे वजनाचे बंधन असते. त्यात बरेचदा खाद्यपदार्थ घ्यावे लागतात, कारण ते येथे चांगल्या प्रतिचे मिळत नाहीत. हे सविस्तर लिहीण्याचे कारण असे की अमेरिकेत रहाणार्यांना ही दोन्ही बंधने लागू नाहीत. तेव्हा असे थोडेसे काहीतरी भारतभेटीत आणणे त्यांना सहज शक्य आहे. 'इथे मिळत नाही ना, मग कसे ऐकणार, अथवा कसे वाचणर?' ह्या मलातरी सबबी वाटतात. खरे तर, एक आच लागली पाहिजे आपली भाषा वाचण्याची, आपल्या भाषेतील गाणी ऐकण्याची. [थोडे अवांतरः दोन वर्षांपूर्वी दादरच्या मॅजेस्टिक बुक डेपोच्या अनिल कोठावळेंशी ह्या बाबतीत बोलत होतो. त्यांनी सांगितले की 'बृ. म्. परिषदेला' ते व अन्य मराठी प्रकाशक पुस्तके विकण्यासाठी घेऊन गेले होते, आणि फार निराशा झाली. विक्री अत्यल्प झाली, शेवटी येतांना उगाच बरोबर वजन नको, म्हणून उरलेली सर्व पुस्तके तिथेच फुकटात द्यावी लागली].
पुस्तकांच्या बाबतीत तरी माझे निरीक्षण असे की समोर दिसल्यावर लोक उगाच 'अरे, ते हे पुस्तक का? कोण, जी. ए.? नाव ऐकलय् वाटतं, जरा घेऊन जातो' असे म्हणून घेऊन जातात. तुम्ही ते पुस्तक मुद्दामहून संग्रही असावे, म्हणून आणलेले असते. पण् समोरच्या व्यक्तिला त्याचे काहीच मोल नसते. मग ते पुस्तक वारंवार आठवण करूनसुद्धा आपल्याला परत मिळत नाही. तेंडुलकरांचे 'शांतता' काही वर्षांपूर्वी मला परत वाचावेसे वाटले, म्हणून बरीच शोधाशोध करून शेवटी एक जुनाट कॉपी कशीबशी मिळवली. इथे आणल्यावर एका 'आपल्याला नाटकांत इंटरेस्ट आहे' असे वाटणार्या एका बाईंनी ते माझ्याकडून् नेले. मग परत करायचे नाव नाही. काही महिन्यांनंतर् विचारणा केल्यावर 'ते ना, ते त्या 'क्ष' ने माझ्याकडून् नेले' हे ऐकावे लागले. तेव्हापासून मी माझा संग्रह कोणाच्याही नजरेत पडू न देण्याची खबरदारी घेतो.
जे पुस्तकांचे, तेच सी. डी.ज चे ही. इथे प्रत दिल्यावर ती परत मिळण्याची यातायात् नाही, हे मान्य. पण घेणारे ती ऐकतात किती, हा प्रश्नच आहे.
पटले पण
विचारलेत की त्या सी. डी.ज् त्यांनी ऐकल्या का, व ऐकल्या तर त्यांतील त्यांना काय काय आवडले, तर मलातरी वाटते, पदरी निराशाच पडेल.
-- हो. मी हे विचारतो. जर ऐकत नाहीत असे लक्षात आले तर त्यांच्याकडून त्या इतरांना देण्यासाठी म्हणून काढून घेतो. पण मी या तबकड्या दिलेले मित्र मराठी गाण्यांचे शौकीन नसले तरी श्रोते आहेत. त्यामुळे ते ऐकतात. तुम्ही म्हणता तशी निराशा कधी कधी पदरी येते. पण उगी कोणालाही तबकड्या वाटत न बसता निवडक लोकांना दिल्यास तसेच देताना त्याबद्दल दोन शब्द बोलून दिल्यास परिणाम जाणवतात.
तेव्हापासून मी माझा संग्रह कोणाच्याही नजरेत पडू न देण्याची खबरदारी घेतो.
--उलट मी माझा संग्रह लोकांना दाखवतो. इच्छा असेल तर त्यातील कोणतेही पण एक पुस्तक त्यांना काही दिवसांनी परत देण्याच्या अटीवर घेऊ देतो. व ते परत घेतोच. त्यासाठी फोन व इमेल दोन्हींचा प्रभावी वापर करता येतो. कधी कधी पुस्तके गहाळ होतात हे मान्य. त्यामुळे आपल्याला खूप महत्वाचे असणारे पुस्तक न देणे इष्ट.
आपला,
(फीडबॅक वाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
प्रदीप शी सहमत
माझाही अनुभव तोच आहे. ज्योतिषात ज्योतिषाने दक्षिणा घ्यावी याचे कारण हेच सांगितले आहे. एखादी गोष्ट सहज आणि फुकट उपलब्ध झाली कि त्याची किंमत रहात नाही.
( कळतय तरी वळत नसलेला)
प्रकाश घाटपांडे
फुकटातल्या वस्तू
मला फुकटात मिळालेल्या ध्वनिफिती किंवा संहत तबकड्यांपैकी फारच थोड्या मी एखादवेळा ऐकल्या-पाहिल्या असतील. बहुतेक पडून आहेत. त्यामुळे फुकट वाटण्याने प्रचार होईल असे समजू नये. फक्त चटक लावण्यापुरती एखादी वस्तू किफायतशीर किंमतीत देऊन बाकीच्या वस्तूंची सूची द्यावी. अवैध मार्गाने छापलेली इंग्रजी पुस्तकेच आम्हाला परवडतात. साताठशे रुपये देऊन हॅरी पॉटरचा एक भाग आम्ही घेऊ? भारतातल्या नव्वद टक्के घरात विन्डोजची चोरआवृत्ती असते. आमच्याकडे अमेरिकेसारखे प्रकाशित झाल्यापासून एक महिन्याने पुस्तके १.९९ ला मिळत नाहीत. मराठी पुस्तकांच्या जेव्हा चोरआवृत्या निघतील तो दिन भाग्याचा! --वाचक्नवी
चकटफू
मला फुकटात मिळालेल्या ध्वनिफिती किंवा संहत तबकड्यांपैकी फारच थोड्या मी एखादवेळा ऐकल्या-पाहिल्या असतील.
--आम्हाला सावध केल्याबद्दल आभारी आहोत. :)
आपला,
(सावध) भास्कर
आम्ही येथे वसतो.
चुकीचा मार्ग
माझ्या मते हा चुकीचा मार्ग आहे. मी यातल्या नैतिकतेबद्दल (किंवा हेतूच्या प्रामाणिक पणा बद्दल्) बोलत नाही आहे तर् परिणामकपणाबद्दल् बोलत् आहे.
तुम्हाला जे करायचे आहे (आणि ते जर् योग्य आहे असे तुम्हाला वाटत् असेल्) तर् एकदा हे करून् पहा. त्या मित्राना काही दिवस तुमच्या तब़कड्या तात्पुरत्या उसनवारीवर् देऊन् पहा. जर् तुमच्या मताप्रमाणे किमत हेच् कारण असेल तर तुमचा त्याच्यात आवड निर्माण केल्याचा हेतु साध्य व्हायला हवा आणि तस्करीचा मार्ग् अवलंबण्याचे कारणही नाही. बरोबर्?
मला असे वाटते की तरीही काही फरक पडणार नाही आणि आताही तुमच्या मार्गाने पडत नसावा.
फक्त नैतिकेतेच्या दृष्टीने विचार केला तर असा युक्तिवाद करता येईल, की जी व्यक्ती एवीतेवी ती तबकडी घेणारच नव्हती त्या व्यक्तीला मी अशी तबकडी देऊन कुणाच्या नफ्यात फरक पडत नाही कारण तो त्याना मिळणारच नव्हता.
पण तस्करीचा समाजावर् अजून एक दूरगामी परीणाम होत् असतो. खरे तर तस्करीपेक्षा कुठलीही गोष्ट फुकट (किंवा अति कमी किमतीत) उपलब्ध झाल्याने होत असतो. तो कधी चांगला असू शकतो कधी वाईट.
तो परिणाम म्हणजे एखाद्या वस्तूला किती किंमत द्यायची , याची ग्राहकाची मनाची तयारी बदलत जाते.
जर एखाद्या विक्री प्रक्रीयेतला मध्यस्थ काढून टाकल्यामुळे किंमत कमी झाली असेल तर सहसा हा परिणाम चांगला समजला जातो. कारण उत्पादकाला त्याचे मूल्य मिळते. ग्राहकाला कमी किमतीत वस्तू मिळते आणि हळूहळू मागणी वाढून सुष्टचक्र चालू होऊ शकते. जो पर्य्ंत उत्पादकाला मूल्य मिळते तो पर्य्ंत अजून् वस्तू तयार करण्याचा उत्साहही राहतो.
पण या विक्रीप्रक्रियेत काही कारणाने उत्पादकाला मूल्य मिळाले नाही तर अधीक वस्तू तयार करण्याचा त्याचा उत्साह टि़कून् राहू शकत नाही. इतकेच नाही तर् ग्राहकाला इतर् सगळ्याच वस्तू हळूहळू कमी किमतीत किंवा फुकट मिळाव्या असे वाटु लागते आणि त्याचा एकूण अर्थकारणावर दुष्टचक्रासारखा परिणाम होतो. १०० रू ची एक आणि १० रूच्या ५० तबकड्या असतील तर हळू हळू १० च्या तबकड्या पहायची सवय लागते. किंवा तोच तर्क पुढे फुकट तबकड्याबद्दल लावता येतो. मग माझ्याकडे १ तास् वेळ आहे तो मी फु़कट तबकडी बघण्यात घालवू की ४०० रु चे एक् पुस्तक घेऊन वाचण्यात घालवू असा विचार करण्यात होतो. आणि मग एकूणातच त्या त्या वस्तूंचे अर्थकारण कोलमोडण्यात् होते.
आज आपल्याला ७०० रु चे एक पुस्तक जे आपल्याला कितीतरी जास्त् काळ आन्ंद देऊ शकते ते तितके मोलाचे वाटत नाही. पण् ८०० रु. दोन् तासात एका हॉटलात जाऊन खाल्ले तर त्याचे काही वाटत नाही. म्हणजे ग्राहकाकडे क्रयशक्ति नाही असे नाही पण त्या खाण्याचे मूल्य त्या ग्राहकासाठी (मग ते कुठ्ल्याही कारणाने असो) पुस्तकापेक्षा जास्तिचे झाले आहे. आणि तस्करी वाढली तर् पुस्तकाचे हे मनातले मूल्य अधिकाधिक् कमी होत् जाणार आहे.
परदेशात इतर भाषांच्या इतक्या तबकड्या दिसतात याचे मुख्य कारण म्हणजे त्या त्या भाषिकांची असणारी मोठी संख्या, त्या अनुषंगाने येणारी मोठी मागणी आणि मोठ्या मागणीमुळे सोपे झालेले अर्थकारण हे आहे. मराठीसाठी ती मागणी तस्करीमुळे कमी होणार आहे वाढणार नाही. उलट् जर् एखादी गोष्ट फुकट मिळण्याची सवय झाली तर् ग्राहक प्रत्येक वेळेसच ती फु़कट् मिळेपर्यत वाट पहायची तयारी ठेवतील.
कन्नड आणि मराठी भाषिकांची संख्या उत्तर् अमेरिकेत जवळपास सारखी आहे. तुमच्या परिचयातल्या कन्नड मित्राला विचारून् पहा त्यांच्याही़कडे मराठीसारखीच बोंब आहे. सगळया दाक्षिणात्य भाषा कानाला सारख्या वाटतात म्हणून आपण बर्याचदा सगळ्याना एकत्र समजतो.
सहमत आहे
मी स्वतः जीएंचे "माणसे:" चे काही भाग एका संकेतस्थळावर फुकटात अवैध रीतीने उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार मला नाही. पण तुमचे म्हणणे योग्य आहे. फुकटात काही देणे म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारून टाकण्यासारखे आहे.
कन्नड चित्रपटसृष्टी व गाण्यांविषयी तुमचे म्हणणे खरे आहे. मात्र कन्नड चित्रपटांना/गाण्यांना खाजगी एफएम द्वारे, थिएटरांद्वारे मदत करण्यासाठी तिथे लोकांचा सरकारवर दबाव असतो. महाराष्ट्रात मात्र सगळीच लाज सोडून दिली आहे. अर्थात याला सरकार जबाबदार नसून आपणच जबाबदार आहोत.
गेल्या काही वर्षात प्रत्येक मराठी माणसाने किती मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिले आहेत हा प्रश्न स्वतःला विचारला तरी याचे उत्तर मिळेल.
आम्हाला येथे भेट द्या.
जितेन यांस
जर् तुमच्या मताप्रमाणे किमत हेच् कारण असेल तर तुमचा त्याच्यात आवड निर्माण केल्याचा हेतु साध्य व्हायला हवा आणि तस्करीचा मार्ग् अवलंबण्याचे कारणही नाही. बरोबर्?
बरोबर. पण त्यासाठी काही काळाने मला परिक्षण करावे लागेल. ते मी करीनच. आणि हो, मी हे दान-व्रत काही आजम्न करणार नाहीये.
मला असे वाटते की तरीही काही फरक पडणार नाही आणि आताही तुमच्या मार्गाने पडत नसावा.
--बघू या काय होते ते.
बाकी आपले उर्वरीत सगळे मुद्दे पटले. त्यावर माझे उत्तर एकच (जे वर दिले आहे) की मी हे दान-व्रत काही आजम्न करणार नाहीये. तेव्हा पाहू या काय परिणाम साध्य होतो ते.
आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.
मलाही पटले
मुद्दे पटले.. आणि ऑडियो कॅसेट/ एम्पी३ चा पर्यायही आवडला.
मी आधी म्हंटलेच होते. (हे बोलणं म्हणजे गिरे तो भी टांग उपरचा प्रकार नाही. ;) ही खरेच् म्हंटले होते) जोपर्यंत कोणी पर्याय सुचवत नाही तो पर्यंत चालू ठेवा. आता उपक्रमींनी सुचवलेले काही व्यावहारीक पर्याय उबलब्ध आहेत तेव्हा आपला सल्लाही मागे घेतो! (खरंतर अस्मादिकांचा सल्ला तसाही कोणी मनावर घेत नाहीच ;) तरीहि..)
-ऋषिकेश
मुद्दे पटले
वा जितेन,
मुद्दे पटले मलाही!
चला मी पण माझा सल्ला मागे घेतो... केन्डेसाहेब, तुम्ही माझा सला काही मानू नका बॉ... माझाही विचारांचा कल जितेनचा प्रतिसाद वाचून जरा बदलला आहे असे म्हणायला हरकत नाही.
पण त्यात असा बदल करता येईल. की भेटीत तुम्ही नवीन काय वाचले/ऐकले/पाहिले याचा उल्लेख करणे व ते कुठे व केव्हढ्याला मिळाले याची माहिती देणे.
यामुले उत्सुकता जागृत होण्यास तरी मदत होईल.
शिवाय 'त्या दुकानदारांकडे' मराठी सिडीज साठी विचारणा करत राहणे - मागणी नोंदवणे असेही करता येईलच!
आपला
गुंडोपंत
चर्चेचा सूर
उत्तरार्धात चर्चा वेगळे वळण घेत आहे असे वाटते आहे.
चर्चेच्या रोखाचा मान ठेवत आम्ही आतापर्यंतच्या केलेल्या उपद्व्यापाचा अगोदर आढावा घेऊ. जर परिणामकारकता जाणवली तरच पुढे काही काळ हा उपक्रम आम्ही चालवू अन्यथा बंद करू. तसेच परिणामकारकता जाणवलेल्या मित्रांना यापुढे तबकड्या विकत घ्यायला प्रवृत्त करु. तबकड्या-दान प्रकल्प पुढे चालवायचा झाल्यास तो नव-नवीन लोकांपर्यंत पोचत राहील व त्याच-त्याच लोकांना चकटफूची सवय लागणार नाही याची दक्षता घेऊ.
आपला,
(अज्ञाधारक) भास्कर
आम्ही येथे वसतो.