साहित्य संमेलन २००८

२००८ च्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा धुरळा आतापासूनच उडू लागलेला दिसतो आहे. हातकणंगलेकरांचा अधिकृत विजय जाहीर होतो न होतोय् तोंच प्रभूबाईंनी कोर्टाकडे धाव घेतल्याची बातमी. आणि राजन खान या तिसर्‍या क्रमांकाच्या उमेदवाराची एकूण प्रक्रियेबद्दल संशय आणि संताप व्यक्त करणारी वक्तव्ये .... ज्याचे वर्णन इंग्रजीत "स्नाफु" करता येईल अशी एकूण परिस्थिती... साहित्यनिर्मिती, विचारांचे आदानप्रदान या कशाकशाशीही आंघोळीपुरता संबंध नसणारे लोक आणि त्या "सभासदांनी" मिळून घातलेला घोळ. दुर्दैवाने हातकणंगलेकरांसारख्या विद्वान, तपोवृद्ध व्यक्तिला या सर्वातून जावे लागणार ...
प्रभू यांच्या "साहित्या"बद्दलची माझी छद्मी मतें क्षणभर बाजूला ठेवून असे म्हणावेसे वाटते की, बाईंनी एकूण हातकणंगलेकरांच्या कर्तृत्वाचा पोच तरी ठेवायला हवा होता.

प्रस्ताव लेखकाच्या सुचवणीनुसार संपादित केला आहे - उपसंपादक

लेखनविषय: दुवे:

Comments

'छद्मी' मते

मी संपूर्ण सहमत हे आधी सांगते. पण 'छद्मी' मते कुठे बाजूला ठेवलीयेत तुम्ही?! "नवर्‍याच्या पैशावर केलेल्या मौजमजेच्या प्रकारांवर लिहिलेली गुळगुळीत चोपडी " हा: हा: हा:!
सकाळ मस्त सुरू झाली एकदम!
- मेघना भुस्कुटे

हे वाचा

http://loksatta.com/daily/20071110/lokma.htm
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

---वाचक्‍नवी

हातकणंगलेकरांचे अभिनंदन !

साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडणूकीच्या निमित्ताने प्रत्येकवर्षी कोणता तरी वाद असतो, त्यामुळे त्या वादात काय होत आहे, होणार आहे, यापेक्षा म.द.हातकणंगलेकरच्या साहित्य विचारावर कोणी मराठीच्या अभ्यासकांनी विवेचन केले असते,त्यावर चर्चा घडवून आणली असती तर एक वाचक म्हणून आम्हाला ते अधिक आवडले असते !

सांगली येथे होणा-या ८१ व्या अभामसासं च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल म.द.हातकणंगलेकरांचे आम्ही अभिनंदन करतो !

ता.क. :- 'कृष्णाकाठच्या तपस्व्याचा सन्मान' दै. सकाळचा अग्रलेख वाचण्यासारखा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपणच लिहा

यापेक्षा म.द.हातकणंगलेकरच्या साहित्य विचारावर कोणी मराठीच्या अभ्यासकांनी विवेचन केले असते,त्यावर चर्चा घडवून आणली असती तर एक वाचक म्हणून आम्हाला ते अधिक आवडले असते !


सहमत!

आपणच लिहा ना एक लेख या निमित्ताने.

आपला
गुंडोपंत

आम्हाला काय येतं राव !

कालपासून प्रयत्न करुनही काय जमले नाही !
म्हणून तर कोणी तरी लिहावे म्हणतो !
अरे 'नंदन' कुठे आहे ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्ण

डॉक्टरसाहेब, मीही फार नाही वाचलेलं त्यांचं लेखन. जी.एं.वरचे काही लेख आणि मर्ढेकरांवर वृत्तपत्रांत केलेलं काही लेखन एवढंच. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, या न्यायाने कर्णाला सांगू लिहायला. तो सध्या हातकणंगलेकरांचेच आत्मचरित्र वाचतो आहे :)

ब्लर्ब

उघडझाप या पुस्तकातले काही आत्मनिवेदनात्मक उतारे इथे देण्याची जबाबदारी माझी :०

(टायपिस्ट) आजानुकर्ण


आम्हाला येथे भेट द्या.

छे!!

त्यांचे वागणे कसेही असले तरी,
नवर्‍याच्या पैशावर केलेल्या मौजमजेच्या प्रकारांवर लिहिलेली गुळगुळीत चोपडी
यातला नवर्‍याच्या पैशांवर हा उल्लेख काही बरा वाटत नाही.
मला तरी पटला नाही.

तुम्हाला काही लिहायचे तर त्यांच्या लिखाणावर/विषयी लिहा (ते काही फार चांगले किंवा वाईट आहे असे मी म्हणत नाही भर मात्र नक्कीच घातली आहे मराठी मध्ये त्यांनी!) आणी शिवाय मौजमजेचे लिखाण करूच नये की काय?
अशी वैयक्तिक चिखलफेक का करता?
माझ्या माहीती प्रमाणे त्यांनी लेकीच्या पैशांवरही चीन ची सफर केली व पुस्तक लिहिले आहे. मग त्याचा ही उल्लेख करायचा का?

आपल्या लिखाणात आपण हातकलंगणेकरांची अजून ओळख करून दिली असती तर अजून आवडले असते.

आपला
गुंडोपंत

प्रभुकृपा

नवर्‍याच्या पैशावर केलेल्या मौजमजेच्या प्रकारांवर लिहिलेली गुळगुळीत चोपडी
यातला नवर्‍याच्या पैशांवर हा उल्लेख काही बरा वाटत नाही.
मला तरी पटला नाही.

मीना प्रभुंचा ईजिप्तायन वरचे स्लाईड शो कृत व्याख्यान मी ऐकले आहे .त्यात नवर्‍या विषयी "प्रभुकृपेमुळे" हे भटकणे शक्य झाले आहे असा उल्लेख त्यांनी मिष्किलीने केला होता.
प्रकाश घाटपांडे

मान्य

भावनेच्या भरात थोडे आततायीपणे लिहिले गेले खरे. पोस्ट् एडिट् करायची सोय असती तर बरे झाले असते. (अन्य काही फोरम्सवर ती तशी असते.)

अभिनंदन

सध्याच्या "उमेदवारांपैकी" हातकणंगलेकर हे सर्वात क्वालिफाईड होते. ऋषीतुल्य तपस्वी हा शब्द त्यांच्यासाठी योग्यच आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

बाईंनी एकूण हातकलंगणेकरांच्या कर्तृत्वाचा पोच तरी ठेवायला हवा होता.

या वाक्याशी सहमत


आम्हाला येथे भेट द्या.

सहमत

आहे. हातकणंगलेकरांना हा बहुमान मिळाला, हे योग्यच झालं. निवडणूक घ्यावी लागलीच, तरी त्यात राजकारण्यांसारखे आरोप-प्रत्यारोप (पैसे चारणे वगैरे), कोर्टात जाऊन स्थगिती मिळवणे वगैरे असू नयेत, एवढी किमान अपेक्षा वाचकांची असली तर ती अवास्तव म्हणता येणार नाही.

हातकणंगले

हातकणंगले गावावरून पडलेले नाव (हातकलंगणेकर नसून) हातकणंगलेकर असावे.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

'तो' फक्त शिर्षकच वाचतो की काय ?

'तो' ने ता.क बरोबर,कधी कधी संपूर्ण प्रतिसादही वाचला पाहिजे असे वाटते ! :)

आम्ही केलेल्या चूकीची दुरुस्ती संपादक मंडळाने वेळीच केल्याबद्दल, प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना संपादक मंडळाचे कौतुक वाटते ! :)

मूळ लेख

मूळ लेखात व बहुदा गुंडोपंतांच्या एका प्रतिसादात नाव हातकलंगणेकर असे दिसले. हा प्रतिसाद त्यांना होता. नाव चुकले हे कळले आपल्या प्रतिसादावरून. नाव चुकले म्हणणार्‍या आपल्या प्रतिसादात नाव बरोबर असल्यान गोंधळलेल्या त्याने गुगलून हा माहितीपूर्ण व दुवायुक्त प्रतिसाद टाकला.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

गुंडोपंतांनी

गुंडोपंतांनीही
नाव 'वरून' कॉपी केले होते ;))

असो,
आता तरी काही माहीती द्या हो...

आपला
गुंडोपंत

इथे माहिती आहे !

पंत,
आजच्या मटात आपण वाचले असेल पण तरीही म. द. हातकणंगलेकर आणि इतर मंडळींची सर्व अंगाने माहिती तिथे उपलब्ध आहे ! :)

गुंडोपंतांनीही
नाव 'वरून' कॉपी केले होते ;))

आम्हीही ते नाव पंताच्या प्रतिसादातून कॉपी केले होते ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सध्या 'हे' वाचत आहेत

हात का लंगडा?

आपल्यातला एखाद्याला कदाचित माहीत नसेल म्हणून लिहितो. हातकणंगले या नावाचे इंग्रजी स्पेलिंग बहुधा अजूनही Hatkalangada असे आहे. माणूस पायानेच नाही तर हाताने पण लंगडा असू शकतो हे सिद्ध करणारे नाव. एखाद्या कर्तबगार माणसाने संस्थेच्या काराभारातून हात काढून घेतला की संस्था कशी लंगडी होते तसा काहीसा हा प्रकार? मला वाटते, सध्या हातकणंगले म्हणवले जाणारे गाव एकेकाळी हातकलंगडे असावे, हातकलंगणे नाही. . (चू.भू.द्या.घ्या.)--वाचक्‍नवी

साधे गणित

खरं तर हे मांडण्याचा नैतिक अधिकार नाही. तरी पण उर्मी स्वस्थ बसू देत नाही. बाकीचे उमेदवार त्यामानाने तरुण आहेत. त्यांच्यासाठी नंतरही संधी उपलब्ध आहे. अशी भूमिका मतदारांची असते.
दुसरा प्रकार असाही असतो कि मिडियाला हाताशी धरुन आपणच कसे लायक उमेदवार आहोत हे इतरांकरवी पसरवायचे. आपण मात्र ते "नम्रपणे" नाकारायचे. अहो निवडणूक आली म्हणजे राजकारण आलं! केवळ गुणवत्तेच्या जोरावर निवड होत नसते. "संख्याबळाचे" पण गणीत जमावे लागते ना!
रा.ग. जाधव ज्यावेळी संमेलनाध्यक्ष झाले त्यावेळी आम्ही त्यांचे भाकित अंतस्थ वर्तुळात वर्तवले होते. याला इतरांना पटेल असा पुरावा काही नाही.
(कुतर्क ज्योतिषी)
प्रकाश घाटपांडे

नाटके!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
ह्या वर्षीच्या नाट्य संमेलन आणि साहित्य संमेलन ह्या दोन्हींच्या अध्यक्षीय निवडणुका जरी गाजल्या असल्या तरी पण त्यातही एक फरक आहे. निवडणुकीच्या निकालानंतर रंगणारे साहित्यिकांचे "रंगीत मानापमान" मात्र प्रथितयश नटांनाही झेपले असते असे नाही वाटत. त्यांनी बहुमताने निवडून आलेल्या अध्यक्षांचे खिलाडूपणे अभिनंदन केले आणि नंतरच्या नाटकावर समंजसपणे पडदा पाडला.
निवडणुकीच्या आधी मात्र दोघांनीही नाटक चांगलेच रंगवले होते. नट मंडळींनी प्रयोग आटोपशीर रीतीने सादर केला पण साहित्यिकांच्या नाटकाचा कळसाध्याय अद्यापी बाकी असावा! त्यामुळे पडदा पडूनही अजून काही जण तोंडावरला रंग उतरवायला तयार दिसत नाहीयेत.

अजब प्रकार - निषेध

नवर्‍याच्या पैशावर केलेल्या मौजमजेच्या प्रकारांवर लिहिलेली गुळगुळीत चोपडी यांच्या बळावर त्यांनी आधी एकतर साहित्यसंमेलनावर मुळात दावा सांगावा, आणि अधिकृतरीत्या निवडून आलेल्या एका ऋषितुल्य माणसावर चिखलफेक करावी ... सगळा प्रकार मोठा अजब आहे म्हणायचा.

नवर्‍यासाठी रोज स्वयंपाक बनवतात पण मोबदला देत नाही हो श्रमाचा! मागायला हवा बायकांनी मग त्यांना स्वतःच्या पैशांवर मौजमजा करता येईल.

पोस्ट एडिट करण्याची सोय देण्यापेक्षा लिहिताना आपण भान राखून लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटते.

बाकी चालू दे. मूळ विषयाशी असहमती नाही.

"प्रभूकृपा"

असा आपल्या सफरींच्या स्पॉन्सरशिपचा उल्लेख दस्तुरखुद्द लेखिकेने केलेला आहे. तशा प्रकारचे उल्लेख त्यांच्या इतर् लिखाणातूनही मिळतातच. तस्मात्, मी जे लिहिले ते असत्य ठरत नाही. हां , थोडे कटु आहे खरे. पोस्ट् एडिट् करण्याच्या इचछेमागे आहे ते सौजन्य. पश्चात्ताप नव्हे याची नोंद करायला हरकत नाही.

थोडा वेळ हवा आहे !

असा आपल्या सफरींच्या स्पॉन्सरशिपचा उल्लेख दस्तुरखुद्द लेखिकेने केलेला आहे. तशा प्रकारचे उल्लेख त्यांच्या इतर् लिखाणातूनही मिळतातच.

खरेच तसे आहे का ? असावे का ? नव-याच्या मिळाले पैसे म्हणून त्यांनी साहित्यलेखन केले का ? त्यांचे साहित्य लेखन पाहता दहाएक पुस्तकात तरी तसा उल्लेख येईलच ? तेव्हा देता आले तर आपण संदर्भ द्यावा म्हणजे आपल्या मताची पुष्टी होण्यास मदत होईल असे वाटते ? आणि आम्हा वाचकांनाही त्याबाबत खुलासा होईल, आम्हीही याबाबत काही संदर्भाचा शोध घेता येतो का, शोधतो आणि मग मत मांडतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गहजब नको

प्रियाली
http://mr.upakram.org/node/807#comment-13182
ही पोस्ट वाचलीत ना? त्या नवरा बायकोत सामंजस्य चांगले आहे या बाबतीत. मिळून सार्‍या जणी ंच्या त्या अनौपचारिक कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. हा काही स्त्रीवाद नाही. त्या अतिशय मोकळेपणाने बोलल्या होत्या.
मला तरी त्यांचा 'प्रभुकृपा' हा शब्द मिश्किल, प्रामाणिक, अधिकार, प्रेम, आदर, सामंजस्य यांच मिश्रण वाटला.

पोस्ट एडिट करण्याची सोय देण्यापेक्षा लिहिताना आपण भान राखून लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटते.

शब्द हे मागे घेता येत नाहीत. It is irreversible process. रसायनशास्त्रातील जशी आहए तशी.तरी त्यातला उस्फुर्त पणा हा मान्य करावा लागतो. शब्द हे शस्त्र आहे असे म्हणतात ते उगीच नाही. संवेदनाशील माणसाला त्या वेदना कायम त्रास देतात. त्याच्या खपल्या निघतात.अश्वत्थामा जसा दुर्गंधी युक्त जखमा घेउन फिरतो तसं आहे शब्दांच्या जखमांच. शारिरिक जखमा बर्‍या होतात. फार तर व्रण राह्तो. आपल्या तोंडातुन असे शब्द आयुष्यात कधी बाहेरच पडणार नाही अशी खात्री कोण देउ शकतो? भान सुटल हे प्रामाणीकपणे मान्य करणे हेच विवेकाच भान.
( विवेकाची भीती वाटणारा)
प्रकाश घाटपांडे

क्षमस्व!

मला तरी त्यांचा 'प्रभुकृपा' हा शब्द मिश्किल, प्रामाणिक, अधिकार, प्रेम, आदर, सामंजस्य यांच मिश्रण वाटला.

प्रश्न मीना प्रभू काय बोलल्या तो नसून चर्चाप्रस्तावकाने ते वाक्य वैयक्तिक आकसापोटी लिहिले हे येथे सहज कळते.

आपल्या तोंडातुन असे शब्द आयुष्यात कधी बाहेरच पडणार नाही अशी खात्री कोण देउ शकतो?

खरंय! मी गहजब केला असे आपल्याला वाटल्याने जाहीर माफी मागते परंतु आज या लेखिकेसाठी असे शब्द बाहेर पडले उद्या मराठी संकेतस्थळांवर सातत्याने प्रवासवर्णनांची लेखने करणार्‍या बायकांबद्दल ते बाहेर पडणार नाहीत याचीही खात्री कोणी देऊ शकत नाही.

निदान अशाप्रकारचे सदस्य वावरणार्‍या संकेतस्थळांवर नवर्‍याच्या पैशावर मौजमजा करून प्रवासवर्णन लिहावे की नको याबाबत मी नक्कीच विचार करेन.

धन्यवाद!

अजिबात नाही!!!

निदान अशाप्रकारचे सदस्य वावरणार्‍या संकेतस्थळांवर नवर्‍याच्या पैशावर मौजमजा करून प्रवासवर्णन लिहावे की नको याबाबत मी नक्कीच विचार करेन.
अजिबात नाही!!!
एका व्यक्तीने असे म्हंटले तर आम्हाला एक लेखिका गमवायची नाहीये!

त्या आधी याची उत्तरे महत्वाची आहेत -
१. या व्यक्तीची समीक्षक म्हणून पात्रता काय?
२. या व्यक्तीचे स्वतःचे लेखन काय?
३. प्रवासवर्णन हा लेखनाचा गौण प्रकार ही व्यक्ती कशा वरून व का ठरवणार?
४. कुणी कुणाच्या पैशाने प्रवास करावा यावर हा टिप्पणी करणारी ही व्यक्ती कोण ?
५. या व्यक्तीने आपल्या आयुष्यात इतर कुणाच्या ही पैशावर कधी प्रवासच केला नाहीये का? (असणारच! किमान आईने तरी लहानपणी तिकिट काढलेच असेल).
६. कुणाच्या तरी पैशाने प्रवास झाला म्हणून; हा प्रवास कसा झाला या विषयी त्या व्यक्तीची ने कधीच कुणापाशीही अवाक्षरही काढले नाही का?

या सर्वांचा विचार करावा.

शिवाय समीक्षक काय म्हणतील म्हणून लेखकाने लेखनावर परिणाम घडवायचा नसतो. लेखक वाचकांसाठी नि त्याही पेक्षा स्वतःसाठी लिहितो/ते/तात. (असे मला वाटते!;)) ).
तेंव्हा असे म्हणण्याने कृपया आपल्या लेखनावर परिणाम घडू देवू नका.
उद्या तुम्ही एखादे पुस्तक लिहीले तर त्यवर तर काहीही प्रतिक्रिया येतील मग आपण परत् पुस्तकच लिहिणार नाही का?

(असा घडल्यास आपल्या दुसर्‍या अर्ध्यासही असा विचार केल्या बद्दल वाईट वाट्णार नाही का? तेंव्हा हाविचारच चुकीचा आहे... व त्याकडे दुर्लक्ष केले उत्तम राहील!)

मला व्यक्तीशः मीना प्रभुंचे काही लेखन आवडले आहे. त्यांचे इजिप्तायन हे घैसास नावाच्या एका लेखकाच्या पुस्तकापेक्षा हजार ट्क्क्यांनी सरस आहे. (मग आता घैसासांनी लेखन थांबवायचे का? ;) )
दक्षिण अमेरिकेविषयी तर त्यांच्यामुळेच मला इतके काही मराठी मध्ये वाचायला मिळाले.
मीना प्रभुंचे लेखन काही वाईट आहे असे वाटत नाही मला.

जगात त्यांच्या पेक्षा जास्त पैसा असलेले अनेक मराठी लोक आहेत, त्यांच्या पेक्षा जास्त फिरलेलेही अनेक लोक आहेत. पण मराठी मनाला जग प्रवासाला घेवून जाणार्‍या, नुस्ता प्रवासच नाही तर त्यापलिकडे इतिहासाचीही ओळख करून देणार्‍या मात्र फक्त त्याच आहेत यात शंका नाही.
(किर्लोस्कर मासीकाच्या किर्लोस्करांनीही असा प्रयत्न केलाय पण तो 'मी कसा फिरलो' असा आहे!)

आशा आहे माझ्या मुद्द्यांचा आपण मनापासून विचार कराल व या चर्चेतली मते त्रास होणारी मते झुरळासारखी झटकून मोकळ्या व्हाल.

आपला
(व्यथीत, )
गुंडोपंत

क्षमा करा

एरव्ही अशा मेलेल्या घोड्याला मी परत दामटले नसते ; पण आमच्या मातोश्रींना यामध्ये आणण्याचे सत्कृत्य तेव्ह्ढे तुम्ही केले नसते तर बरे झाले असते. असे पहा , मी स्वतःला ना समीक्षक म्हणवून घेतले ना माझे स्वतःचे काही लेखन आहे. मात्र अशा नवीन सदस्याचा अस्मिताभंग करण्याची या "स्थळा"वरची रीत दिसते. "व्यक्तिगत आकसा"च्या नावाने जे बोलतात त्यांनी गुंडोपत या येथे चांगल्या मुरलेल्या सदस्याचे वरील पोस्ट् वानगीदाखल जरूर लक्षांत घ्यावे.

अवश्य

"व्यक्तिगत आकसा"च्या नावाने जे बोलतात त्यांनी गुंडोपत या येथे चांगल्या मुरलेल्या सदस्याचे वरील पोस्ट् वानगीदाखल जरूर लक्षांत घ्यावे.

अवश्य लक्षात घेतले. मेलेल्या घोड्याला दामटण्याची इच्छा मलाही नाही पण आपण मला उद्देशून बोललात म्हणून हा प्रतिसाद लिहिते. गुंडोंनी त्यांच्या प्रतिसादात फक्त प्रश्न विचारले. तेही आले कारण आपण मूळ चर्चेत आक्षेपार्ह विधान टाकलेत, नाहीतर उठून कोणालाही चर्चा सोडून इतर काही लिहिण्याची गरज वाटत नाही. आपल्या मातोश्रींचा उल्लेख आपल्याला आवडला नाही. गुडोपंतांनी तो केवळ संदर्भ दिला, हिणकस टिप्पणी किंवा आय-माय नाही तरीही आपण ते केले नसते तर बरे झाले असते असे लिहिलेत. हे लिहिताना बाईंच्या नवर्‍याला, त्याच्या पैशांना ओढून आणायची गरज नव्हती हा विचार आपल्या मनाला शिवला असेलच.

मात्र अशा नवीन सदस्याचा अस्मिताभंग करण्याची या "स्थळा"वरची रीत दिसते.

हे म्हणून आपण कोणतेही कारण नसताना संपूर्ण संकेतस्थळाला बदनाम करता आहात. उपक्रम हे संकेतस्थळ म्हणजे प्रियाली आणि गुंडोपंत हे दोन सदस्य नक्कीच नाहीत आणि येथील सर्वच सदस्य आपल्यावर आक्षेप घेत असतील (जे दुरापास्त आहे) तर आपण आपला अस्मिताभंग का होतो यावर विचार करालच.

"मीच खरा, पडलो तरी नाक उप्पर" हा मराठी बाणा तुम्ही आम्हीही दाखवत असू तर मीना प्रभूंनी दाखवले तर इतका आकस ठेवायचे कारण कळले नाही.

व्यक्तिशः मला चकचकीत वेष्टणात चिखल गुंडाळून इतरांना सादर करणार्‍या प्रवृत्तींपेक्षा गुंडोपंतांसारखे सरळसोट लिहिणारे परवडतात.

अवांतरः खाली काही प्रतिसादांत नेहमीप्रमाणे स्त्रीमुक्तीवादावर घसरणार्‍या प्रतिसादांबद्दल असे म्हणावेसे वाटते की 'माझ्या पैशावर बायको मौजमजा करते' अशा जोखडातून पुरुषांची मुक्ती होण्याची गरज आहे. स्त्रियांची नाही. भारतात सध्या पुरुषमुक्तीवादाची जेवढी गरज आहे तेवढी स्त्रीमुक्तीवादाची नाही आणि पुरुषमुक्ती बायकांपासून अपेक्षित नसून पुरुषांच्या मनातील अहंगंडापासून अपेक्षित आहे. मला दोहोंविषयी समान आस्था आहे. संबंधीतांनी कृपया नोंद घ्यावी.

आणि ..

मागील पानावरून पुढे चालू .... चालू द्यात.

बहुतांशी सहमत

गुडोपंतांशी बहुतांशी सहमत आहे.
वासंती घैसास यांनी केलेले लेखन कुणाला आवडो न आवडो पण प्रवासवर्णावर त्या सातत्याने स्वानुभवात्मक, काहीसे मार्गदर्शक असे लिह्त गेल्या. त्यांचा अनुभव पाठीशी घेउन काहींना प्रवासाचा आनंद लुटता आला. त्या काळात वासंती घैसासां व्यतिरिक्त अन्य कुणाचे ताजे लेखन प्रवासवर्णन या प्रकारात उपलब्ध नव्हते. किमान वाचकांपर्यंत तरि पोहोचले नव्हते. प्रवास वर्णन हा सुद्धा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
अन्यथा गोडसे भटजींचे " माझा प्रवास" हे पुस्तक नव्याने प्रकाशित झाले नसते.[ मी अद्याप ते वाचले नाहि]
मला व्यक्तिशः मीना प्रभुंचे लेखन व सदिप व्याख्यान आवडते. तरी देखील साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सद्यस्थितीत त्यांची निवड झाली नाही हे योग्यच आहे असे देखिल माझे व्यक्तिगत मत आहे.

प्रकाश घाटपांडे

नो रिग्रेट्स्.

असो.

मीना प्रभू

मीना प्रभूंबाबत मुक्तसुनितांच्या भूमिकेशी सहमत. 'नवर्‍याच्या पैशावर' या शब्दांनी जो धुरळा उडाला आहे, त्यात मूळ विषय बाजूला पडल्यासारखा वाटतो. मीना प्रभूंची बरीचशी पुस्तके मी वाचली आहेत. वामकुक्षीआधी चाळावयाची पाने यापलीकडे त्यांचे मला महत्व वाटत नाही. माहिती काय, आंतरजालावरही मिळते. हा अर्थ बाजूला ठेवून चर्चेला स्त्रीमुक्तीवादाची जी फोडणी दिली आहे, ती अनावश्यक वाटते.
अवांतरः हातकणंगलेकर ऐंशी वर्षांचे आहेत. या वयात निवडणुका लढवणे वगैरे अशी आसक्ती शिल्लक राहू शकते का हा विचार अस्वस्थ करुन जातो...
सन्जोप राव

आसक्ति ...

अवांतरः हातकणंगलेकर ऐंशी वर्षांचे आहेत. या वयात निवडणुका लढवणे वगैरे अशी आसक्ती शिल्लक राहू शकते का हा विचार अस्वस्थ करुन जातो

आसक्ति , लालसा या गोष्टींचे आवाहन हातकणंगलेकरांना आता (केवळ वयामुळेच नव्हे तर एरव्हीच्या त्यांच्या विरक्तिसदृश वृत्तीमुळेसुद्धा ) पोचत असेल का याबद्दल मी साशंक आहे. याचा अर्थ त्यांच्या निवडणूक लढविण्यामागची भूमिका मला समजली आहे असे नव्हे ; परंतु त्या पदाची लालसा हे ते कारण नसावे असे वाटते खरे.

हाहाहा!

याचा अर्थ त्यांच्या निवडणूक लढविण्यामागची भूमिका मला समजली आहे असे नव्हे ; परंतु त्या पदाची लालसा हे ते कारण नसावे असे वाटते खरे.

म्हणजे आपला उमेदवार आहे म्हणून तो किती चांगला असे का? भारतात निवडणुका "थेरड्यांनीच" लढवाव्यात हे देखील कटु सत्य आहे.

-राजीव.

माहिती मिळाली नाही

मीना प्रभूंची बरीचशी पुस्तके मी वाचली आहेत. वामकुक्षीआधी चाळावयाची पाने यापलीकडे त्यांचे मला महत्व वाटत नाही. माहिती काय, आंतरजालावरही मिळते.

मी आताच मराठीतून शोधून पाहिले, फारशी माहिती मिळाली नाही त्यामुळे मराठीतून माहिती आंतरजालावर मिळते हा गैरसमज दिसतो. तसेच, भारतात आजही प्रत्येकजण आंतरजालावर येऊन शोधण्याइतपत पुढारलेला नाही. माझे आई-वडिल तर नाहीच नाहीत पण परदेशगमन करण्याची त्यांची क्षमता आहे आणि त्याआधी मराठीत काही वाचायला मिळाले, तेही पुस्तकरुपात तर ते आवडेलच त्यांना.

आंतरजाल चित्रपटांच्या परिक्षणांनीही भरलेले आहे तरी आपण आपल्या शब्दांत इतर संकेतस्थळांवर ते करता. - हा व्यक्तिगत रोख नाही. मला ती वाचायला आवडतात. कोणी काय लिहावे आणि ते अमुक ठीकाणी आहे म्हणून त्याला महत्त्व नाही हे सांगण्याची आवश्यकता वाटली नाही.

उपेक्षित जागा, किल्ल्यांची वर्णने, प्रवास मराठीत यायलाच हवे. झोप काय हो, प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.जीए वाचूनही येते अनेकांना.

-राजीव.

पुर्ण सहमत

पुर्ण सहमत. कित्येकदा सहली प्लॅन करताना छापिल 'नेटिव' माहितीपेक्षा हे अनुभव फार मदत करतात.

एकच न्याय

झोप काय हो, प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.जीए वाचूनही येते अनेकांना.
हो ना? मग झाले तर! जशास तसे! कुणाचा निद्रानाश मीना प्रभूंमुळे जातो - कदाचित त्यांच्या लेखनातील मसाज करणार्‍या पुरुषाने आपल्याला 'सिड्यूस' करण्याचा कसा प्रयत्न केला या अत्यंत माहितीपूर्ण लेखनाने - तर कुणाचा जी ए वाचून - मग या आपल्या प्रतिसादाचे प्रयोजनच काय?
हा व्यक्तिगत रोख नाही.
असे? वैयक्तिक लिखाणाचे उल्लेख. जी एं. चाही. तरीही हा वैयक्तिक रोख नाही? मग वैयक्तिक रोख कसा असतो बरे?
सन्जोप राव

राजीव, आमच्या भावना दुखावल्या ;)

झोप काय हो, प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.जीए वाचूनही येते अनेकांना.

अरे राजीव,
जीवनाचा शोध घेण्यात जी.ए. ची लेखणी रमते. आपल्याला आलेले लोकविलक्षण अनुभव प्रतिमा व रुपकांच्या माध्यमातून ते चित्रित करतात त्यांची 'सोडवण' 'बळी' 'विदुषक''वस्त्र' या कथा मात्र अविस्मरणीय आहेत असे म्हणतात ! (वाचू रे कधी तरी आपणही )

बाकी झोपेचे म्हणाल तर जी.ए. चे पुस्तक दिसल्यावर आम्हालाही जांभया का येतात कोणास ठाऊक ! ;)

अवांतर ;) जी.ए.च्या वि शिष्ट वाचकांच्या भावना दुखावल्यामुळे, या पुढे जी.ए.वर केलेल्या टीप्पणी (भल्या असो की बु-या)आम्ही वाचायला आणि जांभया द्यायला येथे येणार नाही ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो सर!

बाकी झोपेचे म्हणाल तर जी.ए. चे पुस्तक दिसल्यावर आम्हालाही जांभया का येतात कोणास ठाऊक ! ;)

हेच तर सांगतोय. गणितं करायला बसलो तरी झोपा यायच्या. यांत गणितांचा दोष नाही हो!

तुमचे अवांतर मात्र अगदी खरे. मीना प्रभूंना त्यांच्या प्रवासात एकदा दोनदा जीएंची आठवण झाली असती तर त्यांची आठवण परपुरुषाकडून सिड्यूस आणि मसाज करून घेणारी बाई येवढीच काही वि शिष्ट वाचकांना राहिली नसती.

काय असतं की माणसं आपल्या आवडीप्रमाणे गोष्टी लक्षात ठेवतात.

प्रभूबाईंना संमेलनाचे अध्यक्षपद द्या असे कोणी सांगत नाही पण म्हणून चर्चेत जी बरळाबरळी चालली आहे ती मजेशीरच आहे.

अवांतरः विदूषक आणि बळी वाचली आहे. एकदा मुंबईहून सहल काढून येतो तुमच्याकडे. प्रवास करण्याआधी प्रवासवर्णन वाचायला मिळाले तर मराठवाड्याविषयी माहितीही कळेल. तुम्ही मराठवाड्यातीलच ना? नाहीतर आमचा होरा इथेच चुकलेला असायचा.

-राजीव.

मराठी साहित्यसंमेलन

मुक्तसुनीत महोदय,

मराठी साहित्यसंमेलन हा मराठी संस्कृतीचा आणि मराठी अस्मितेचा महत्त्वाचा घटक आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल मतभेद होत असतील तर ते नैसर्गिक आहेत. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात तिथे मतभेद असणे हे प्रगल्भतेचे, जागरुकतेचे द्योतक आहे. नीरक्षीरविवेकाने इच्छुक उमेदवारांपैकी योग्य उमेदवार निवडला जावा अशीच मराठी वाचक म्हणून आमची अपेक्षा आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल अधिक माहिती देता आल्यास चांगले.

या चर्चेदरम्यान व्यक्त झालेले मतभेद हे इथल्या सदस्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचे आणि आक्षेप, मतभेद व्यक्त करण्यातल्या मोकळेपणाचे निदर्शक आहेत. पण दुर्दैवाने हे मूळ चर्चाप्रस्तावाशी संबंधित नसल्याने चर्चा मूळ पदावर, विषयावर यावी असे वाटते. आवश्यकता असेल तर संपादन मंडळाने काही बदल करून चर्चा "मराठी साहित्यसंमेलन" या विषयावर आणली तर बरे होईल.

आपला
(विवेकवादी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

साहित्य संमेलनांविषयी

एकूणच साहित्यसंमेलनांचे एकूण वा.ड्मयव्यवहारातील स्थान , कालपरत्वे त्यांचे बदलत गेलेले स्वरूप , त्यांची आवश्यकता याबद्द्लचा उहापोह येथे उचित होईल.

संमेलनाबद्द्ल बोलताना "दरवर्षी भरणारी जत्रा" अशी एक उपमा मनात येते. त्याच्या सर्वसमावेशक अशा स्वरूपामुळे त्याचे "जनां"मध्ये जसे कुतुहलाचे स्थान आहे , त्याच कारणांमुळे "अभिजनां"मध्ये त्याबद्दल एकंदर नाक मुरडण्याची वृत्ती दिसते. दुर्दैवाने , संमेलनाच्या काही परंपरा पाहता हे नाक मुरडणे समजण्यासारखे आहे असे कधीकधी म्हणावेसे वाटते.

संमेलनातील एक "पेटंट्" प्रकार म्हणजे कविसंमेलन. अक्षरशः शेकड्याने येणारे हौशे, नवशे, गवशे कवडे येऊन आपल्या पाट्या टाकून जातात. ना त्या कवितांमधे कसली निवड असते, ना कसला धरबंध. मराठीमधे "कॅप्टिव्ह् ऑडीयन्स्" ला काय म्हणतात ते माहित नाही , पण कणभरसुद्धा ज्यांची संवेदना शिल्लक आहे अशी व्यक्ति क्षणभरसुद्धा टिकणार नाही असला हा प्रकार असतो.

संमेलनातील चर्चा/परिसंवाद अतिशय उथळ असतात. एकदम "कामगार विश्व" छाप मुलाखतकार अतिशय बालिश विषयांवरचे प्रश्न घेऊन "मान्यवरांना" प्रश्न विचारतात. (पुलंनी या प्रकाराची अशक्य खिल्ली उडवली आहे : "आजकालची मराठी स्त्री ही मराठी आहे काय ? किंवा ती स्त्री आहे काय ?" ) जर परिसंवाद घडवूनच आणायचे तर निदान त्यामागे थोडा विचार , थोडे प्लानिंग् , योग्य त्या व्यक्तिंची नेमणूक या गोष्टी आवश्यक असतात , याची कसलीही जाणीव त्यामागे असल्याचे चिन्ह दिसत नाही.

संमेलनाबद्दल केवळ छिद्रान्वेषण करणे हा हेतू नाही. पण उपरोक्त गोष्टी या अगदी ढळढळीतपणे आहेत आणि वर्षानुवर्षे कसलाही बदल त्यात नाही. मला वाटते इतरांनी त्यांचे मतप्रदर्शन करून प्रस्तुत चर्चा चालू ठेवावी.

नवर्‍याचा पैसा.

बायकांनी नवर्‍याच्या पैशावर मजा करायची नाही तर आणखी कुणाच्या? मीना प्रभूंनी तसे केले असेल तर त्यात काहीही वावगे नाही. आमच्या शेजारी एक दक्षिणी भारतीय बाई रहात. नवरा मोठ्या पगारावरचा सरकारी अधिकारी, ही बाई पाच सहा 'बुकं' शिकलेली, पण अतिशय चलाख, तल्लख बुद्धीची, व्यवहारचतुर आणि मार्मिक बोलण्यात हुशार होती. नवरा काही महिन्यांकरिता जपानला गेला आणि जाऊन स्थिर झाल्यावर ही एकटी जपानला त्याच्याकडे गेली. प्रवासात कुठलीही अडचण आली नाही. इंग्रजी भाषा कधीही न बोललेली ही बाई जपानच्या बाजारात जाऊन कापडचोपड आणि हिरेमाणकांची किफायतशीर खरेदी करून यायची. जपानी बायकांना तिने नऊवारी साड्या नेसायला शिकवले. आपल्या एकदोन साड्या भेटपण दिल्या. अशी बाई नवर्‍याला म्हणायची: "तुमचा पैसा खर्च करण्याकरिताच मी तुमच्या घरात आले आहे. मी नसते तर तुमचा पैसा बॅंकेत कुजला असता, तो मी सत्कारणी लावते आहे." आहे की नाही पटण्याजोगा मुद्दा!

आता साहित्यसंमेलनाविषयी. अशा संस्थांचे अध्यक्षपद हे उतारवयातच मिळाले तर ते शोभून दिसते. राजन खान फारच तरुण, त्यांनी अतिरथी महारथींपुढे अगोदरच माघार घ्यायला हवी होती. त्यांना विसाइतकी कमी मते मिळून त्यांचा जो अपमानास्पद पराभव झाला तो टळला असता. वसंत आबाजी डहाके यांच्याबद्दल वाईट वाटते. कुणाचातरी पराभव होणारच होता आणि त्याबद्दल वाईट वाटणारच होते, ते डहाकेंबद्दल झाले. . मीना प्रभूंची माझं लंडन, दक्षिणायन, मेक्सिकोपर्व, ग्रीकायन, इजिप्तायन, चिनी माती ही सर्व पुस्तके मी वाचली आहेत. मला त्यांचे लिखाण अतिशय आवडते. तरीसुद्धा त्या पडल्या याबद्दल मला फारसे दु:ख होत नाही.
हातकणंगलेकरांचे इंग्रजी अणि मराठी समीक्षेत मिळून एकंदर १५ पुस्तकांचे लेखन. त्यातील ' साहित्याची अधोरेखिते ', ' साहित्याचे सोबती ', ' मराठी कथा रूप आणि परिसर ' तसेच ' साहित्य विवेक ' ही पुस्तके विशेष गाजली. तसेच जी. ए. कुलकर्णी यांच्या 'डोहकाळिमा ' कथासंग्रहाचे संपादन. पॉप्युलर प्रकाशनातर्फे ' मराठी वाङ्‌मयातील प्रेरणा आणि प्रवाह:१९५० ते ७५ ' याचे सहसंपादकत्व. १९८६ मध्ये ' उगवाई ' नियतकालिक सुरू. ' सत्यकथे ' तून सातत्याने लेखन. ' उघडझाप ' हे आत्मचरित्र. धारवाड येथे जी. ए. कुलकर्णी स्मृतिसदनाची स्थापना. साहित्य संस्कृति मंडळ , विश्वकोश निमिर्ति मंडळ आणि साहित्य अकादमी , ज्ञानपीठ समिती , कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये कार्य वगैरे वगैरे. आता असा माणूस पडला नाही याबद्दल हायसे वाटायला नको?--वाचक्‍नवी

जी. एं. च्या पत्रांचे संपादन

हातकणंगलेकरांच्या साहित्ययादीतून जी. ए. कुलकर्णींच्या निवडक पत्रांच्या चार खंडांचे (श्री. पु. भागवत आणि सु. रा. चुनेकर यांच्याबरोबर) संपादन हे महत्वाचे कार्य निसटलेले दिसते...
सन्जोप राव

सहमत !

पहिल्या उता-याशी सहमत. दुस-या उता-याच्या बाबतीत आमच्या द.ता. भोसले यांच्या बद्दल दोन शब्द आले असते तर पहिल्या उता-याइतकाच आनंद दुसरा उतारा वाचतांना झाला असता ! :)

आपला.
भोसलेंच्या पार आणि शिवारावर प्रेम करणारा
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्द

शब्द महत्वाचे असतातच, पण ते कुणी, कुठल्या तर्‍हेने म्हटले आहेत हे ही महत्त्वाचे असते. बायकोने "मी तुमचा पैसा खर्च करायलाच आले आहे" म्हणणे वेगळे आणि नवर्‍याने "तुझी उधळपट्टी कायम चालूच असते" म्हणणे वेगळे. आणि कुणी तिसर्‍यानेच "तुमची मिसेस फार खर्चिक आहे बुवा" म्हणणे अजूनच वेगळे. नुसते शब्द काय आहेत यावर जाऊ नये. ते कुठल्या संदर्भात आहेत ते ही बघावे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बहुमत हेच कारण असावे

हातकणंगलेकर जे लिखाण करतात ते आणि मीना प्रभू करतात ते, पूर्ण वेगळ्या स्वरूपाचे आहे. त्यामूळे त्यांच्या लिखाणाची तुलना करण्याची गरजच नाही. कारण ही तुलना वाचकाच्या रुचीसापेक्ष आहे. प्रश्न आहे की अध्यक्ष म्हणून कोणाची निवड व्हावी आणि प्रभुंची भुमिका योग्य आहे का?... (आणि हा मुद्दा चर्चा मांडणार्‍याने वापरलेल्या वादजन्य शब्दांमुळे भरकटला गेला असं वाटलं)

माझ्या मते याच साधं उत्तर आहे जो बहुमताने निवडला गेला आहे त्याची निवड व्हावी..
मीना प्रभुंनी हातकणंगलेकर वयस्क आहेत, वैचारिक लेखन करणारे आहेत किंवा अनुभवाने ज्येष्ठ आहेत वगैरे असल्या कारणांसाठी नव्हे तर ते बहुमताने निवडले गेले आहेत म्हणून (आणि खरतर फक्त म्हणूनच) या अंकाचा पडदा पाडायला हवा होता

नवर्‍याचा पैसा

बायकोचे "मी तुमचा पैसा खर्च करायलाच आले आहे" म्हणणे नवर्‍याला आवडत असेल तर आपण कोण मध्ये नाक खुपसणारे 'काजी'?
नवर्‍याने "तुझी उधळपट्टी कायम चालूच असते" असे म्हटले तर तो त्यांचा खासगी मामला आहे. आपल्याला त्यावर टीकाटिप्पणी करायचा अधिकार नाही. आणि आणि कुणी तिसर्‍यानेच "तुमची मिसेस फार खर्चिक आहे बुवा" असे म्हटले तर नवर्‍याने या तिसर्‍याला झापायला पाहिजे. "माझी बायको हवे तसे पैसे खर्च करेल, तुम्ही कोण माझ्याकडे तिच्याबद्दल तक्रार करणारे?" असे बोलणारा असेल तर तोचि (खरा) नवरा ओळखावा! पति तेथेचि जाणावा!!--वाचक्‍नवी

प्रश्नोत्तर

तुमची मिसेस फार खर्चिक आहे बुवा"
असे म्हणणारा तिचा मित्र असेल तर ?

"माझी बायको हवे तसे पैसे खर्च करेल, तुम्ही कोण माझ्याकडे तिच्याबद्दल तक्रार करणारे?"
असे म्हणणारा त्याचा शत्रू होतो काय?

प्रकाश घाटपांडे

हेच

म्हणतो. वाक्य कुणी आणि कसे म्हटले आहे त्यावर सगळे अवलंबून आहे. नवरा-बायकोंनी एकमेकांना काहीही म्हणावे, त्यात कुणाही तिसर्‍या 'काजीला' काहीही म्हणायचा हक्क नाही.
केवळ एका वाक्यात आदर्श नवर्‍याची व्याख्या करता येते याची कल्पना नव्हती.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

नवरा-बायको

नवरा-बायकोंनी एकमेकांना काहीही म्हणावे, त्यात कुणाही तिसर्‍या 'काजीला' काहीही म्हणायचा हक्क नाही.
अगदी बरोबर! नवरा-बायकोंनी एकमेकांना काहीही म्हटले आणि ते परस्परांना चालत आणि आवडत असेल तर, तिसर्‍या 'काजी'ला मध्ये पडायचे काहीही कारण नाही.
केवळ एका वाक्यात आदर्श नवर्‍याची व्याख्या करता येते याची कल्पना नव्हती.
नाही, ही आदर्श नवर्‍याची व्याख्या नाही. आदर्श नवर्‍यात आणखी बरेच गुण असावे लागतील; पण बायकोला आवडेल असे बोलणारा नवरा आणि तसेच करणारी बायको हे या विवक्षित बाबीसाठी आदर्श पति-पत्‍नी समजले जातील.
तुमची मिसेस फार खर्चिक आहे बुवा"
असे म्हणणारा तिचा मित्र असेल तर ?

एकमेकांच्या सहमतीने, संगनमताने, संमतीने किंवा अपेक्षित पाठिब्याच्या बळावर जेव्हा बायको खर्च करते, 'तेव्हा तुमची बायको फार खर्चिक आहे ' असे म्हणणारा मित्र, मित्र नाही. त्याला कळलाव्या नारद म्हणतात.
"माझी बायको हवे तसे पैसे खर्च करेल, तुम्ही कोण माझ्याकडे तिच्याबद्दल तक्रार करणारे?"
असे म्हणणारा त्याचा शत्रू होतो काय?
एवढ्या किरकोळ गोष्टीने शत्रू करणारा नवरा हलक्या कानाचा समजला जातो. --वाचक्‍नवी

 
^ वर