आपण किती नियम आणि शिस्त पाळतो?
"मेहंदी लावली म्हणून" या चर्चेतील शाळेच्या निर्णयाला अनुकुल असलेले काही प्रतिसाद, हे मुलांना शिस्त लावणे आणि पालकांनी नियम पाळणे या गोष्टींना महत्व देण्याचे कारण देतात आणि कडकपणा कसा गरजेचा आहे हे सांगतात. नियम काय असावेत आणि ते न पाळल्यास काय शिक्षा असावी याबद्दल माझी आणि अजून काही लोकांची भिन्न मते आहेत. पण त्यावर विचार करत असताना, एक मजेशीर विचार डोक्यात आला म्हणून हा चर्चेचा प्रस्ताव. कृपया कोणी व्यक्तिगत घेऊ नये कारण तो उद्देश नाही. जमलेच तर जरा विचार करायला लावणे हा उद्देश असू शकेल...
तर मला वरील मुद्यावर विचार करताना येशू ख्रिस्ताची गोष्ट आठवली, पाप केले म्हणून पकडलेल्या बाईस दगड कोणी मारावेत तर ज्याने पाप कधी केले नाहीत त्याने/तीने.. आता आपण स्वतः प्रौढ म्हणून आणि लहान असताना पण किती नियमभंग केलेत किती वेळेस शिस्तभंग केलेत ह्याचा विचार केला तर काय होईल?
मी माझ्या पासून जितके प्रामाणिक राहाण्यासाठी त्रास् होणार नाही तितके सांगून सुरवात करतो :)
- शाळेत असताना बोलू नको म्हणले तरी बोलणे, दंगा करणे
- कॉलेजात सबमिशन/ होमवर्क्स (नेहेमी नाही, पण) कधी कधी वेळेवर न देणे
- अमेरिकेत गाडी चालवताना स्पिड लिमिटच्या वर गाडी चालवणे (सिग्नल मात्र मोडत नाही, कधी चुकून मोडला गेला असला तर आणि ते पण आठवत नाही..)
- कधी कधी गाडी हॅझार्ड लाईट्स लावून नो पार्कींगमधे ५ मिनिटे का होईना पण पार्क करणे (अर्थात पर्याय नसतो म्हणून पण तरी ह्यात नियमभंग आहेच
अजून काही पटकन आठवत नाही ..
आता भारतातले काही:
- रहदारीचे नियम - गाडी चालवत असताना पादचार्यांसाठी न थांबणे, नो हॉर्न च्या झोने मधे पण हॉर्न वाजवणे, कसाही रस्ता क्रॉस करणे ...
- लाच देणे आणि घेणे हे दोन्ही पाप/बेकायदेशीर आहे . तरी आपण (भारतात) पोलीसाला ट्रॅफिक व्हायोलेशनसाठी, पासपोर्टसाठी खेटा पडू नये म्हणून कधी मेजाखालून पैसे दिलेत का? घरे विकत घेताना सर्व पैसा हा कधी चेक ने दिला आहे का, का काही हिस्सा बॅगेतून? अजून अशी बरीच ठिकाणे आहेत...
- साधे उपक्रमवर पहा आपण त्यांनी म्हणून केलेले नियम मान्य करायला कुरकुर करतो - अमुक प्रकारचे लेखन का नको म्हणून वाद घालतो पण फुकट मिळणार्या सुविधेबरोबरच्या नियमांचे पालन करायला मात्र जबर् कुरकुर. तेच मिसळपाववर दिसून आले...
असो. तर असे अनेक नियमभंग आपण दरोज बघतो, काही करतो पण शिक्षा मात्र चतूरपणे टाळतो. अर्थात अशा नियमभंगाच्या मागे कारणे असतात. कधी सिस्टीमचे दोष तर कधी परिस्थिती असे म्हणू शकतो पण नियमभंग तो नियमभंग.. मग त्या ४-५ वर्षांच्या छोट्या मुलींनी जन्माच्या कर्माला कधी तरी मेहेंदी लावली तर असला नियम का हा प्रश्न अथवा त्याला एव्हढी शिक्षा का असा प्रश्न का पडत नाही? आपल्या (मुलीच्या) बाबतीत असे प्रसंग घडले तर आपण ऐकून घेऊ का?
आपण खरेच प्रामाणीकपणे वागतो का? की नियम हे आपल्याला एक आणि इतरांना एक हा प्रकार करत असतो? "ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल" असे तर आपले वर्तन होत नाही ना?
Comments
हेच
विकासराव,
लहानपणीच नियम तोडले तेव्हा वडिलजनांनी फटकावून सरळ केले असते किंवा चांगले आदर्श ठेवले असते तर आपल्यातले काही नियमभंग न करते. पण आपल्या सर्वांचे आईवडिलही त्या मुलींना शाळेत घेतले नाही म्हणून शाळेतील व्यवस्थापनाशी रदबदली किंवा आपले म्हणणे पटवून द्यायचा प्रयत्न करायचे सोडून शाळेने कसा उद्दामपणा केला म्हणून कंठशोष करणार्या पालकांप्रमाणेच होते का काय?
- राजीव.
प्रश्न वेगळा आहे
विषय आहे की आपण सर्वांनीच आयुष्यात कधी नियम मोडले आहेत का नाहीत हा. आणि त्या संदर्भात या मुलींना जरब बसायला हवी, नियम पाडणार्यांना समजायलाच हवे वगैरे भाषेबद्दल आहे...
त्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे तो कायदे पाळण्याचा. मी सांगण्याचा उद्देश होता की हातावरच्या मेहेंदीच्या इतकेच आपण ३० च्या झोन मधे ३५ ने जातो. त्यात काही स्पिडींग करायचा उद्देश असतो अशातला काही भाग नाही. तरीपण तो नियमभंगच आहे, आणि तरी तो कधीना कधी होतोच. आता आपले असे म्हणणे असेल की आपण कधीच नियम मोडले नाहीत अथवा मोडत नाहीत तर तो भाग वेगळा आहे पण असा या जगात एखादा दलाई लामाच असेल (आणि त्यांनी पण चीनचे नियम मोडलेच म्हणून राजाश्रय घेऊन भारतात रहावे लागले!) बाकी सर्व कधी ना कधी नियम मोडतातच... आणि सामान्य माणसे जे नियम मोडतात ते नियम मोडायला म्हणून नाही तर कधी कधी ते नियम कालबाह्य अथवा असंबद्ध असतात म्हणून...
शाळा बर्याचदा उद्दामपणे वागू शकतात. आम्ही अशी एक शाळा पाहीली आहे. फक्त सुदैवाने आमची शाळा अशी नव्हती. किंबहूना मुलांनी गडबड करायची नाही तर कोणी असा प्रश्न विचारून शिक्षकांच्या आचरट शिस्तभोक्तेपणाला आळा घालत दुसरी कडे प्रेमाने आणि हक्काने विद्यार्थ्यांवर जरब बसवून बाल्य भयभीत राहून हरवायला न लावणार्या मुख्याध्यापिका आम्हाला पहायला मिळाल्या...
अवांतरः ७-८ वर्षांपूर्वीची गोष्ट. ही अमेरीकेत पण गाजली पण झालेली जपानमधे... शाळेत वेळेवर येण्याबद्दल कडक शिस्त (अमेरीकेत पण वेळेवर येयचे नियम असतात नाही तर टार्डीपणाचा शिक्का मिळतो आणि आमच्या शाळेत पण आम्ही लहान असताना "विद्यार्थी उशीरा आला" असा शिक्का नोंदवहीत मिळून पालकांकडुन दुसर्यादिवशी सही घ्यावी लागायची). तर या जपानी शाळेत दार वेळ झाली की आपोआप बंद होयचे आणि नंतर विद्यार्थ्यांना शा़ळेत (त्यादिवसा करता) घेतले जायचे नाही आणि शिक्षा होयची. एकदा उशीर होईल म्हणून भयभित झालेली एक लहानमुलगी बंद होणार्या दरवाजातून आत जात असताना अंदाज चुकला अडकली आणि मरण पावली... थोडक्यात कुठली शिस्त आणि किती याला मर्यादा हव्यात इतकेच म्हणायचे आहे.
आत्मचिंतन
माझे नियमभंगः
मी पुढील लिखित नियम मोडले आहेत
१. स्टेशनवर प्लॅटफॉर्म टिकिट न घेता एकदा शेजारच्या हरवलेल्या मुलाला शोधायला स्टेशनवर गेलो होतो
२. एकदा मी सिग्नल न देता रस्त्यात अचानक गाडि थांबवली होती नि त्यामुळे मागून् येणार्या ट्रॅफिकला प्रचंड त्रास झाला होता. (कारण फक्त दोन बदक हळू हळू रस्ता क्रॉस करत् होती)
३. एकदा लोकांनी केवळ आरडाओरडा केला म्हणून लोकलची चेन ओढली (पुढे कळलं की काही झालच् नव्हत :-) )
४. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून रोज भाजी खरेदी करतो (जरि ते बेकायदा बसत असले, आकडा टाकून वीज मिळवत असले तरी भाजी घ्यायला मी कोणताही परवानाधारक शोधत नाही)
तसे बरेच आहेत् पण चर्चेच्या सुरवातीलाच् एवढं आत्मचिंतन नको नाही का? ;)
ऋषिकेश
आता पुढे
लेखा जोगा मांडायचा तर बेशिस्त समाजाची थोडीफार री मी देखील ओढली पण कॉलेजमधेच - कॉलेज सोडल्यावर बराच ताळ्यावर आलो. जरा जास्तच प्रामाणिक, गोपाळ/ श्रीमान आदर्शवादी म्हणून हेटाळणी पण अनुभवली. पण आपण एकटाच संधर्षाशिवाय हे जग बदलू शकत् नाही तसेच भारतीय लोक जास्तच भावूक आहेत. चूक समजावली तर वैयक्तिक घेतात व कदाचित वेळेपुरत लोक नमते घेतील पण आलाय मोठा शिकवायला म्हणून संबध खराब करून घेणार्, त्याहून वाईट म्हणजे असे करू नका म्हणताय म्हणल्यावर करणारच जरी आपलं चूकतय हे त्यांना मनातून पटत असेल तरीही. [रस्ता पब्लीकचा आहे हो तुम्ही इचारणार कोन (अभीजितला आठवेल :-))]
सर्वजण आपण स्वःताहून सुरवात करायची सोडून इतर जणांनाच दोष देत असतो. कचरापेटी कचरा आत टाकायचा सोडून कायम आजूबाजूलाच फेकायचा. कागद-कपटे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, थोटक, पान / गुटका खाऊन पिचकार्या. यात तर आपलीच चूक आहे, मग हळूहळू तो एक भाग बकाल झाला, हे प्रशासन स्वच्छता ठेवत नाही म्हणून ओरडा. मी एका माणसाला (जुन्या कचेरीतील वरिष्ठ सहकारी, एक बोल बच्चन, आम्ही काही जण जेवण झाल्यावर जरा मोकळ्या हवेत बाहेर उभे होतो. मी लवकरच ती कचेरी सोडणार होतो.) विचारले काय हो तुमचे ह्या देशावर प्रेम आहे का? तर त्याने अशीच कविता, लेख, वर्णन फेकले, देश माझा.. सुंदर धरती.. काळी आई ..भारत माता... हिच्या रक्षणा...ब्लाह ब्लाह.. मी म्हणालो ह्या भूमीच्या रक्षणासाठी प्राण द्यायचे म्हणता पण मगच पासून ५ वेळा कडेला तंबाखू थूंकलात. आपल्या आईवर असे कोणी थुंकते का? गप्प बसला पण संतापून, क्रोधाने. त्याला समज किती आली कल्पना नाही.
सार्वजनीक स्वच्छतागृहाची अवस्था तर आपण जाणताच. हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती असलेला देश म्हणायचे, पण सार्वजनीक स्वच्छतागृह पाहीले की कसला सुसंकृत समाज , माणूस नावाच्या बेशीस्त जनावरांना हैदोस घालायला निर्माण केलेली जागा असे नाही वाटत?
भ्रष्टाचाराबद्दल काही भाष्य करायला नकोच. बरेचदा वाटते की देशात काहीतरी करावे पण जे ते सरकारी "खाते" खायला मागते. मी नाही म्हणतो व जमेल तेवढे चांगले काम / मदत करून मोकळा होतो. देशप्रेम, इ. बोजड शब्द मला कळत नाही , पटत नाही कारण प्रेम म्हणजे तिथे सगळे "क्षम्य" असा सोयिस्कर अर्थ काढून अनर्थ माजवला जातो. भारत नावाच्या देशात एक समाज आहे, ज्याच्याबद्दल मला (माझी काही माणस) तिथे आहेत म्हणून प्रचंड ओढ आहे. तिथल्या काही लोकांपुढे मी कायम नतमस्तक होतो. पण एक समाज म्हणून भारताबद्दल आदर, प्रेम नाही आहे. सर्वच काही वाईट असे मी म्हणत नाही. पण आज जगात हजारो वर्षांच्या संस्कृती, लोकशाही, मुल्य इ. इ. २४/७ ट्यॅव ट्यॅव करणार्या "देशाला" खरोखर भुषणावह अशी परिस्थीती नाही आहे. त्यातून जर खरच एखाद्याला भारत उत्तमच आहे म्हणायचे असल्यास माझी वाद घालायची इच्छा नाही. (जेमेतेम ४५-५०% मार्काने पास असे मी म्हणेन, तुमच्या पैकी किती जणांना आपल्या पाल्याने सामान्य परिक्षेत ५०% मार्क मिळवले तर आनंद होईल हे विचारुन पहावे.)
ऋषिकेश म्हणतात तसे मी पण कधी रस्त्याच्या कडेने भाजी घेताना कधी लायसेन्स नाही विचारले पण त्या स्वभावाने गरीब, "मराठी" :-) भाजीवाल्याबाईला. पण वर्षानुवर्षे [न माजता :-)] चांगली भाजी देते म्हणून घेतो. रस्ते, पदपथ मोकळे व्हावेत ह्यासाठी लहान विक्रेत्यांकरता वेगळे संकूल व्हावे ह्याचे समर्थन करतो. ट्रॅफीक नियम पाळतो. सर्व बील, टॅक्सेस वेळेवर भरतो. मला वाटते की त्यातल्या त्यात सर्व शक्य तेवढे पाळतो.
असो तर ज्याला चांगल वागायची इच्छा आहे त्याची (माझी) बर्याच वेळा घुसमट होते. त्यातून (माझ्यात) जरा माणुसघाणेपणा निर्माण होतो.
प्रथम थोडे मागे...
प्रातिनिधिक समस्या
या उदाहरणने आपण सगळेच भुईला भार होउ. केळीच्या वाफ्यात नैसर्गिक विधी केला तर त्याचे सोनखत होतं, धनगर लोक शेळ्यामेंढ्या याच कारणासाठी बसवतात. भुमी कुठली यावर ते अवलंबून आहे.
.
कारण मोठ्या माशांना गळ टाकला तर ते टाकणार्यांना खेचून घेउन गिळून टाकतील. छोट्या माशांना गळात पकडण्यात काय मर्दुमकि. मोठे गुन्हेगार मोकाट सुटणार आणि छोटा मात्र लटकणार? किंबहुना त्याला बौद्धिक डोस पाजणार ही बाब त्याला खटकते म्हणून तो तरीही...... येतो. १०० रु. लाच घेणारा १००० रु कडे बोट दाखवतो. १००० रु वाला १ लाख वाल्या कडे आणि ..........
प्रकाश घाटपांडे
समाज म्हणजे काय तर् तुम्ही... आम्ही .. मी!!!
सर्वजण आपण स्वःताहून सुरवात करायची सोडून इतर जणांनाच दोष देत असतो.
तुम्ही 'सहज' फार् मोलाचं बोलतलात. अर्थात प्रत्येकाची कॄति करण्याची पद्धत् वेगळी. एक किस्स सांगतो (तसा तो मी बर्याचदा सांगतो :-)आणि अनेकांना पटतो)
मी दादरहून ठाण्याला चाललो होतो. दुपारची वेळ होती, रविवार होता. गाडि अश्यावेळी जशी रिकामी असते तशी रिकामी होती. एक कुटुंब माझ्या समोरच बसलं होतं. त्यातले वडिल, ही गाडी आपल्याच कृपेने चालत असल्या सारखे समोरच्या बाकड्यावर पाय पसरून झोपले होते. मातोश्री आनि त्यांची दोन मुले (खरतर कारटी म्हणणार होतो ) उगाचच बडबड आरडाओरड करत होती. पुढे सायनला एक संत्री-मोसंबीवाला चढला, मातोश्रींनी मुलांसाठी संत्री घेतली. आणि ती मुलांसाठी संत्री सोलू लागली. प्रथेप्रमाणे सालं ही गाडिच्या डब्यातच टाकायची वस्तू आहे असा या बाईंचा ठाम समज असावा. त्याप्रमाणे त्यांनी एका संत्र्यांची सालं गाडितच खाली टाकली. आता बाईसाहेबांनी दुसरं संत्र सोलायला सुरवात केलीइ. त्याबाईची वटवट आणि एकूणच स्वभाव पहाता (आणि तिच्या नवऱ्याच्या साईझकडे बघुन :-) )तिला काही बोलण्यात अर्थ आहे असं वाटत नव्हतं.
म्हणून मग न रहावून मी उठलो आणि स्वतःच त्यांनी फेकलेली सालं गोळा करू लागलो. माझ्याकडे नेहेमी एक् रिकामि प्लॅस्टिक पिशवी शिशात् असते (कचर्यासाठी) त्यात् सालं भरली नी शांतपणे पुढच्या संत्र्याची वाट पाहू लागलो. सगळा डबा माझ्याकडे बघत होता. मग एकदाची त्या बाईला लाज वाटली आणि एका पोराला धपाटा घालून "बघतोयस काय? जा सालं उचलं.. " असं म्हणून त्या मुलाला कामाला लावलं आअणि माझ्याकडे "आलाय मोठा शहाणा" अशा अर्थाचा कटाक्ष टाकला.
पुढे काहि नाही.. त्या बाईने तिसरं संत्र सोललच नाही. ते नवरा झोपला होता म्हणून की लाज वाटली म्हणून कोण जाणे..
सांगायचा मुद्दा असा आपण केवळ स्वतःपुरतं बघावं आपण बदललो तर् कदचित कोणीतरी बदलेल्. आपण् म्हणता तसं बदला म्हणून कोणी बदलेल् असं वाटत् नाही (तुमच्य वाट्याला केवळ वाइइटपणा येइल).आणि खरतर कोणी सांगतय म्हणून बगदलण्यापेक्षा लोकं आपणहून बदलले तर जास्त नियम बनवायची गरजच नाही. कारण माझ्या मते नियम बनवणं म्हणजे आपलं मत दुसर्यावर लादणं. चांगलं वागणं आपोआप आलं पाहीजे आणि त्यासाठी समाज तेवढा सशक्त हवा. पण् हा समाज म्हणजे काय तर् तुम्ही... आम्ही .. मी!!! जर् हा प्रत्येक मी सुधारला तर् समाज सुधारलाच!!
छान..
हम्म्! चर्चाप्रस्ताव छान आहे! :)
शाळेत असताना आमचे वर्षातले बरेचसे दिवस बाकावर उभं राहण्यात आणि वर्गाबाहेर आंगठे धरून उभं राहण्यातच गेले आहेत..:)
धन्य ते शिक्षक आणि शिक्षिका, ज्यांना तात्या अभ्यंकरांना शिक्षा करण्याचे भाग्य लाभले...:)
बाकी, वाहतुकीचे वगैरे नियम लहानपणापासून पाळत आलेलो आहे...
आपला,
(वर्गाबाहेर टाईमपास करत उभा असलेला!) तात्या.
नियामकांची गरज
नियम आपण पाळत नाहीत म्हणून किती आत्मक्लेष करून घ्यायचा?
ज्या देशात रिक्शा नाहित त्या देशातील वाहतूकीचे नियम आपण आपल्याइथे कसे अमलात येतील?
ज्या देशात रिक्शा आहेत त्या देशासाठी स्वतःचे वाहतूकीचे नियम तयार करणारे विद्वान आवश्यक आहेत. (नियामक)
नियम पाळत नाहीत बरोबरच नियम बनवणे पण मजेशीर होऊ शकेल.
चांगला
विकासराव,
लेखाचा मुददा चांगला आहे. मीही काही वेळेला नियमभंग केले आहेत.
-कॉलेजमध्ये लेक्चरना दांड्या मारणे, कोर्सवर्क वेळेवर सबमिट न करणे
- काही वेळेस बसमध्ये प्रचंड गर्दी आणि कंडक्टर दुसर्या टोकाला असेल तर तिकीट घेणे अशक्य व्हायचे, अशा वेळेस विनातिकीट प्रवास
- विक्रेत्यांना लायसन्स विचारलेले नाही
- हिंदी, मराठी, इंग्रजी गाण्यांच्या एमपी३ आंतरजालावरून उतरवतो, हा बहुधा प्रताधिकार कायद्याचा भंग असावा (यूट्यूबमधे कसे आहे माहित नाही.)
सध्या इतकेच आठवते आहे. मुद्दा हा की कायद्यानुसार गंभीर अपराध मानल्या जाणार्या गोष्टी सोडून देउ पण दिलेल्या नियमांच्या थोडे आतबाहेर होतच असते. शेवटी नियम हे मानवनिर्मित आहेत आणि त्यामुळे सूसूत्रता येणे अपेक्षित आहे. एखादा नियमामागे काही तर्क नसेल, तर तो पाळण्यात काही अर्थ नाही.
आपल्याकडे धार्मिकतेच्या नावाखाली 'असे करू नये' टाइप बरेच नियम असतात. आमच्या एक मावशी होत्या, त्यांचे म्हणणे होते की संध्याकाळी आंघोळ करू नये, अशुभ असते. लहानपणापासून कालेजात जाईपर्यंत मी हा नियम पाळला. मग एक दोनदा संध्याकाळी दमून घरी आल्यावर आंघोळ केली आणि इतके फ्रेश वाटले की तेव्हापासून मी नेहेमी सकाळऐवजी संध्याकाळी आंघोळ करायला लागलो.
प्रत्येक नियमामागे तर्क लावणे महत्वाचे आहे. अर्थात कायदेशीर नियमांना तर्क नसेल तर बदलणे बरेच अवघड/अशक्य असते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
माझी उत्तरे
थोडं घाई-घाईत.
भरपूर दंगा केला आहे आणि शिक्षा मात्र वर्गमित्रांना व्हायची. त्याचे अजून वाईट वाटते. एकदा-दोनदा प्रामाणिकपणे गुन्हा स्वतः केल्याचे कबूल केले होते तरीही शिक्षक शिक्षा वर्गातल्या मुलांनाच करायचे.
हे मात्र कधीही केले नाही. शाळेत नाही आणि कॉलेजातही नाही. सर्व काही वेळेवर सबमिट व्हायचे. वेळेशी बांधीलकी ठेवायला बर्याच भारतीयांना जमत नाही त्याचे नेहमी वाईट वाटते. (कार्यक्रम ४ वाजता सुरु होत असेल तर ५ पर्यंत उगवणे हे बहुधा भारतीय शिस्तीत बसते. ;-))
३५ च्या स्पीड लिमीटला ४० आणि ७० च्या स्पीड लिमीटला ८० ने गाडी चालवते परंतु ते खरंच नियमबाह्य आहे का की टॉलरन्स या प्रकारात मोडते ते आठवत नाही. सिग्नल, स्टॉप्स मोडलेले नाहीत. अद्याप सुदैवाने कधी तिकिटही मिळालेले नाही. लहान मुलीला घेऊन प्रवास करण्यामुळे बहुधा ती जबाबदारीची जाणीव असावी.
नाही मी कधीही गाडी तशी पार्क केलेली नाही आणि करायची वेळ येऊ नये. अतिशय थंडीत, बर्फात फक्त बारीकसं काम आहे म्हणूनही नो पार्किंगमध्ये आम्ही दोघांनीही गाडी उभी केलेली नाही.
आता भारतातले काही:
तेव्हा स्वतःची गाडी नव्हती पण पादचारी म्हणून कसाही रस्ता क्रॉस केलेला आहे. आता भारतात गेलं तर तेही जमत नाही. :(
नाही, सुदैवाने आणि आश्चर्याने भारतात मला शासकीय यंत्रणांचे अनुभव चांगले आहेत. फक्त एकदा रेशनिंग ऑफिसर रेशन कार्ड बदलायला काहीही कारण नसताना हट्टून बसला होता. (मला अबूधाबीला परतायचे होते त्याच दिवशी त्याला तपासणी करता यायचे होते. वेळा मॅच होत नव्हत्या. त्यावेळेसही तो आला पण त्याला प्रकार माहित असल्याने केवळ २०० रु. साठी हट्टून बसला होता. मला हसावे की रडावे की त्याची किव करावी हेच कळेना. शेवटी, २०० रु काहीही कारण नसताना हातावर टेकवावे लागले. याला लाच न म्हणता भीक म्हणणे बरे ठरेल.)
नवं घर घेताना ज्या काही गोष्टी भारतात "लीगली" ;-) कराव्या लागतात त्याच केल्या.
हे मात्र कधीही केले नाही. सिविल शब्दांत निषेध केला पण हट्ट नाही. ही संकेतस्थळे ही त्या त्या चालकांची हौस आहे आणि मला जर त्यातले काही पटत नसेल तर मी स्पष्ट शब्दांत तसे लिहून दाखवले किंवा तिथला वावर कमी केला. वितंडवाद नाही.
आणि एक महत्त्वाचा मुद्दा. कोणतेही कर कधीही चुकवलेले नाहीत. वैतागून का होईना पण ते कायदेशीर रीत्या भरलेले आहेत. :)
असो. नियम बरेचदा तोडले जातात. ते काटेकोरपणे पाळणे नेहमीच शक्य असते असे नाही. बरेचदा गलथान यंत्रणेचा फायदाही उठवला जातो परंतु हे नियम माहित असून ते मोडले तर कोणत्या शिक्षेला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही असतेच आणि ती आपण टाळूही शकत नाही.
तसेच, मागे एकदा मनोगतावर लिहिले होते, "खोटे कधी बोलू नये" असे आपण मुलांना शिकवतो तेव्हा आपण खोटे बोलत नसतो असे नसते. तरीही आपण मुलांना खोटे कधी बोलू नये असेच शिकवावे असे वाटते.
भारतात...
>>>नाही, सुदैवाने आणि आश्चर्याने भारतात मला शासकीय यंत्रणांचे अनुभव चांगले आहेत.
मलापण अनुभव चांगले आले आहेत. बर्याच गोष्टी (पासपोर्ट सहीत) ह्या कुठल्याही प्रकारची लाच/भिक न देता झाल्या आहेत. विमानतळावर फक्त एकदाच एका माणसाने हातातला कॅमकॉडर पाहून पैसे मागीतले. माझाच आहे, हवे असल्यास पासपोर्टवर शिक्का मार म्हणल्यावर म्हणाला की निदान स्कॉच तरी आहे का? काही मिळणार नाही आणि हवी असल्यास बॅग उघडा म्हणल्यावर सोडून दिले...एकदा "इमर्जन्सी" साठी भारतात तातडीने जात असताना फक्त जरूरीचे सामान असलेली हँडबॅग (कॅरीऑन) जवळ ठेवली होती कारण काय तर बॅगेची वाट पहाण्यातपण वेळ जाऊ नये म्हणून. त्यात एखाद्या पौंडानेच वजन जास्त होते, तर इकडे लुफ्तांसाची बाई नाटके करायला लागली. मग वैतागून कारण सांगीतले तरी नाटके सोडली नाहीत पण शेवटी मी त्यातील पन सामान कमी करून मित्राकडे देणार होतो पण तेंव्हा तीने मान्य करून तसेच घेतले. पण भारतात गेल्यावर इंमिग्रेशनमधून बाहेर पडत असताना एका अधिकार्याने बॅगा कुठे येतात ते दाखवायला सुरवात केली. म्हणले नाही फक्त हँडबॅग आहे. आश्चर्य वाटून म्हणाला की असे कसे, कारण सांगताच, व्यक्तिगत मदत करून एका मिनीटात बाहेर काढले...
एकदा एक मजेशीर अनुभव आला: (दहा एक वर्षांपूर्वी, जेंव्हा रुपयाची किंमत थोडी वेगळी होती) मुंबईत लोकलचे सेकंडक्लासचे तिकीट होते. पण ४-५ गाड्या दुपारच्या वेळेस पण सोडाव्या लागल्या. शेवटी वैतागून एका येणार्या फास्ट लोकल मधे फर्स्टक्लासमधे चढलो. स्टेशनावर उतराताक्षणी टिसीने मलाच पकडले. पण तयारी होती आणि कारण काही असले तरी चूक अर्थातच माझी होती. म्हणून पैसे तयार ठेवले होते. त्याने विचार केला आणि अर्धाच दंड + तिकीटाचे पैसे लावले. मी म्हणले सगळे घ्या. तो म्हणाला की नाही हे फार महाग होईल तुम्हाला. मग त्याने रिसीट पण फाडली आणि मी दिलेल्या नोटेमधील सुट्टे पैसे पण परत केले. कुठलीही लाच न घेता, मी विनवणी न करता, त्याने त्याच्या अखत्यारीत असलेली गोष्ट केली. का ते अर्थात माहीत नाही.
पण त्याआधी भारतात काम करत असताना कधी दूरच्या पल्ल्यांच्या गाड्यांमधे ऐनवेळेस जर कधी जायचा प्रश्न आला, तर फर्स्टक्लासचे बर्थचे तिकीट असूनपण केवळ रिझर्वेशन नाही म्हणून अनरिझर्वड सीट/बर्थ साठी पण टिसीने पैसे घेतले होते आणि ते झक मारत दिले होते.
>>>नवं घर घेताना ज्या काही गोष्टी भारतात "लीगली" ;-) कराव्या लागतात त्याच केल्या.
म्हणून म्हणतो की भारत हे खरेखुरे "लोकशाही" राष्ट्र आहे. कारण सरकारी नियमांप्रमाणेच "लोकांनी केलेले नियम" पण आपल्याला नियमात राहील्याचा आनंद देऊ शकतात!
>>>असो. नियम बरेचदा तोडले जातात. ते काटेकोरपणे पाळणे नेहमीच शक्य असते असे नाही. याच पद्धतीत राजेंद्र यांनी देखील म्हणले आहे.
माझा हाच मुद्दा आहे. कधी भिक म्हणू, कधी अडला नारायण म्हणू आणि नियमाला अपवाद असतात म्हणू पण काही वेळप्रसंगी नियम हवे तसे पाळत नाही एव्हढे नक्की. त्याच अर्थाने, लहान मुलांच्या बाबतीत शिस्त लावताना जरब हा भाग असण्यापेक्षा महत्व आणि प्रेमाचा हक्क दिसला पाहीजे असे वाटते.
त्यावेळी
त्यावेळी मनसोक्त तोडलेत नियम!
यादी करायची तर उपक्रमाचे पान पुरणार नाही.
तरी वानगीसाठी काही देतो.
१. राँग साईडने(च) कॉलेज पर्यंत गाडी चालवणे. तीन जण बसवून!
२. मित्रांशी पैजा लावून दिवसात किमान २५ सिग्नल तोडणे.
३. ठरवून एका महिन्यात कोणतेही तिकिटच न काढणे. (अगदी थेटरचेही!)
४. मला(व कंपुला) बंक मरायचा असेल तर लेक्चररला रस्त्यातच थांबवून "महत्वाच्या शंका विचारणे" नंतर मित्रांनाही 'शंका विचारायला पाठवणे' व लेक्चर्स ना उशीर घडवणे! वर्गाला कुलुपच लावून ठेवणे. शिवाय कॉलेजच्या आवारात गाडी नेता यावी म्हणून रात्रीच गेटची कुलुपे कापून ठेवणे. (असे सहा-सात वेळा झाल्यवर त्याला वेल्डींगच मारण्यात आले, मग बिजागिर्यांच काढायची युक्ते करायला लागलो;) नंतर तर माझा एक मित्र खांबालाच धडकला मग पुढे 'गेटचे कोसळणे' अनिवार्य झाले.)
५. 'त्रास देणार्या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे
६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे
७. कचरा टाकला म्हणून कायदा हातात घेवून लोकांना बडवणे.
८. पावभाजीच्या गाडीवर काम करणार्या छोट्या मुलांना जास्त पैसे द्यावेत म्हणून मारामार्या करणे. गिर्हाईकांना जास्तीचे त्या मुलांना पैसे टीप म्हणून द्यायला'च' लावणे.
९. कटकट्या शेजार्यांची झोप खराब करणे (रात्री २ ते ३ या पहाटेच्या वेळातच मोठ्या आवाजात त्या शेजार्यांना आवडणारेच भजन् लावणे वगैरे पुण्याची कामे!)
१०. गप्पा मारायला म्हणून सिग्नलवरच गाडी लावून तासभर उभे राहणे!
११. पोलिसांशी अति वितंडवाद घालणे (यातून अनेकदा पोलिस मित्रच होवून गेले... मग मात्र नियम तोडणे फार अवघड वाटायचे!:))
१२. नो पार्कींग च्या पाट्यांवर पोस्टर्स चिटकवणे (किंवा चिटकवून घेणे!) (तेंव्हा जाहिरात क्षेत्रात होतो!)
१३. शाळेत पिटिच्या तासाला हटकून 'चमत्कारीक आवाज' काढणे. दुसर्या (इंग्रजी माध्यमाच्या) शाळेत जावून मारामार्या करणे
१४. शाळेचा गृहपाठ वेळेवर न देणे व नंतर चमत्कृतीपूर्ण सबबींचा फायदा घेणे. (शेजारच्या काकूंना बाळ झाले त्यांना कुणी नव्हते म्हणून आईने चहा व डबा द्यायला पाठवले होते वगैरे डँबीस व धादांत खोटी कारणे देणे!;) )
१५. वर्गात सारखा त्रास देतो, अतिशंका विचारतो, म्हणून बाहेर कढल्यावर थेट मुख्यध्यापंकाकडे तक्रारी करणे व वाद घालण्याचा (नेहमीच अयशस्वी) प्रयत्न करणे.
१६. शिक्षकांनी मारण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा हात धरून ठेवणे. (हे नियम तोडणे नाहीये असे माझे सुप्रसिद्ध मत आहेच;) !) मोट्या वर्गात छड्या घेतांना चटकन हात काढून घेणे, मग एक मास्तर टेबल हात ठेवायला लावायचे, मी तिथुनही काढून घेतल्यावर टेबलावर आपटून त्यांचा रूळच तुटला व उडालेला तुकडा एका मुलाला लागला - रक्त आले, मग पालक आले... मग पुढे मोठेच प्रकरण झाले. पण छड्या बंद झाल्या!
१७. शिक्षा झालीच तर शिक्षकांच्या गाड्यांचे पेट्रोल गायब करणे. सकाळीच त्यांच्या गाडीत हवा नसेल असे पाहणे.
१८. रिक्षावाल्यांना सांगून ठेवून आकडू मुलींना कॉलेजच्या अर्ध्या रस्त्यातच 'रिक्षा बंद पडली' असे म्हणून उतरवून देणे व पाई यायला लावणे. (लगेच त्याच रिक्षात आपण मात्र आरामात बसून येणे!)
वगैरे वगैरे वगैरे छोट्यामोठ्या गोष्टी. फार काही केले नाही हो! :))
शिवाय आपली कामे करून द्यायला लाच देणे किंवा
कबूल करूनही ऐन वेळेला लाचच न देणे वगैरे गोष्टीही आहेतच. (आता हे नियम तोडणे आहे का हे माहीतनाही बॉ!)
(वर कुणी काही फारशी कबुली दिली नाहीये... मीच दिसतोय जर भोळा!:) )
असो, पण आता नाही हा करत असे काही! :)
आता गुंडोपंत मागचे दिवस आठवून नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतात.
जे "मला समजतील ते नियम" पाळण्याचाही प्रयत्न करतो.
मुळात "नियम म्हणजे काय" हा प्रश्न "सत्य म्हणजे काय" या प्रश्नाच्या अतिशय जवळ जाणारा आहे.
नियम हे जोवर सर्व लोकांच्या उपयोगाचे आहेत, तोवर ते पाळायला हवेत असे मी मानतो. (वरच्या उदाहरणात गुंडो अवखळ तरूण होते, आता नाहीत! ;) )
आताशा बहुतेक सर्व नियम पाळतो किंवा प्रामाणिक प्रयत्न तरी करतो. पण ते नियम तोडल्याशिवाय 'का पाळायचे' हे ही कळत नाही ना राव! (सिग्नल वर गाडी लावून गप्पा मारतांना एक मारूती अगदी उडवणारच होती आम्हाला... गाड्या पडल्या, आम्ही वाचलो! नि तो पळाला म्हणून वाचला!)
शिवाय निगोशिएटींग स्कील्स वाढतात! ओळखी होतात.
काय काय 'वाकू शकते' हे कळते 'काय मोडते पण वाकत नाही' हे ही कळते!
असो, आता डोळे दुखायला लागले आहे तेंव्हा आवरते घेतो.
आपला
गुंडोपंत
गुंडोपंत हे तर आपले लोकशिक्षण
येथील प्रत्येकाने कमी अधिक प्रमांणात या गोष्टी केल्या असणार! हा रहेमानी किडा शरिराच्या विशिष्ट भागातच का असतो हे मात्र अद्याप कोडे आहे. आपल्यात फक्त तो जाहीरपणे कबूल करण्याचे धारिष्ट्य आहे .ही बाब कितीतरी महत्वाची आहे. आपल्याला अजूनही काही गोष्टी लिहायच्या आहेत. पण संकेतस्थळाच्या प्रकृतीमुळे तसेच इतरांचा अधिक रोष ओढवून घ्यायला नको या आताशा वाटणार्या मानसिक फरकामुळे आपण लिहित नाहीत एवढेच. त्याचा संबंध मिसळपाववरील माझ्या या स्वगताशी अप्रत्यक्ष त्याचा संबंध आहेच. असो लिहायला लागा मनातल आणी जनातल>
प्रकाश घाटपांडे
उपलब्धता ते उपयुक्तता
उपलब्धता ते उपयुक्तता यातील "व्यवहार्य " अंतर हे स्थल काल समाज सापेक्ष आहे त्यामुळे हे विवादास्पद मुद्दे निघतातत. अन्यथा यांना ब्रेड मिळत नाही तर हे लोक केक का खात नाही? असा प्रश्न विचारणार्या मानसिकतेचा मुद्दा उपस्थित् करता येतो. आजही भारतात ४० ते ४५ टक्के ( इंडियातले नाही) लोक प्रातर्विधि उघड्यावर करतात. इथे मुद्दा केवळ मानसिकतेचा नाहिये.
प्रकाश घाटपांडे