राज्य रस्ता मंडळ आणि मराठी.
राज्य रस्ता मंडळात ( आरटीओ) शिकावू लायसन्स ( परवाना) घेण्यासाठी जाण्याचा योग आला तेंव्हा खालील गोष्टी पाहण्यात आल्या.
१. मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८०% पेक्षा जास्त असावी आणि अर्थातच मराठी मुलांचा भरणा जास्त असावा असे वाटले.
२. अर्जावर मात्र जवळपास सर्वांनीच इंग्रजी मध्ये सह्या केल्याचे दिसले.
३.अर्ज सुध्दा सगळ्यानी इंग्रजी मध्ये भरलेला दिसला.
४. दुर्देवाने अर्ज सुद्धा इंग्रजी भाषेतच होता.
५.काही वेळेस काही शंका पाहण्यासाठी शासकिय परिपत्रक पाहावे लागले तेंव्हा त्यातील भाषा खरोखरीच दुर्बोध वाटली.
खरेदीखत, डॉ. चे औषधाचे प्रिस्किप्शन ( ???), दुकानाचे देयक इत्यादी इंग्रजीमध्ये दिसण्याचे प्रमाण वाढलेले दिसतेच.
मराठी शाळेतून शिक्षण जवळपास हद्दपार झालेली दिसतेच पण व्यावहारिक ठिकाणी सुध्दा मराठीचे पध्दतशिर उच्चाटण होत असल्याचे दिसते.
काय करता येईल बरे ???
द्वारकानाथ
Comments
आधी शासकीय मराठी हटवा!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
ह्या शासकीय मराठीने वाट लावलेय सगळी.इंग्लिश नको म्हणून ही भाषा जर लादली असेल तर रोगापेक्षा औषध घातक असे ठरायचे. ती भाषा मराठी नव्हेच. त्या ऐवजी लोकांना इंग्लिश जवळची वाटते ते उगीच नाही. बोली भाषेच्या जवळ जाईल अशी मराठी वापरून सगळे अर्ज वगैरे छापा आणि मग बघा गंमत. लोक सहजपणाने मराठीचा वापर करतील की नाही ते.
अर्थात तोच प्रकार शासकीय हिंदीचा देखिल आहे.
हे म्हणजे कसे "आधीच मर्कट ,त्यात मद्य प्याला" अशी स्थिती आहे.
सहमत
बर्याच अंशी सहमत आहे. शासकीय मराठी दुर्लभतेच्या जवळ जाणारी असते. त्यामानाने इंग्रजी जवळची वातल्यास नवल नाही. त्यातही कोर्टकचेरीतील मराठीतर अगम्य असते. काही प्रमाणात हीच परिस्थिती शासकिय हिंदीची आहे असा अनुभव राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करताना आला होता.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
हेच!!
बोली भाषेच्या जवळ जाईल अशी मराठी वापरून सगळे अर्ज वगैरे छापा आणि मग बघा गंमत. लोक सहजपणाने मराठीचा वापर करतील की नाही ते.
हे सगळीकडेच व्हावे हेच तर म्हणतो आहोत आम्ही!!
आपला
गुंडोपंत
हेच म्हणतो !
बोली भाषेच्या जवळ जाईल अशी मराठी वापरून सगळे अर्ज वगैरे छापा आणि मग बघा गंमत. लोक सहजपणाने मराठीचा वापर करतील की नाही ते.
आम्ही किती दिवसापासून म्हणतोय राव, ज्याच्या त्याच्या बोलीतून लिहा म्हणून !
इथे आपली मदत हवी आहे - एक पैज
शासकीय मराठीने वाट लावली, की क्लिष्ट विषयांना भाषाही काटेकोर आणि क्लिष्ट लागते?
पुढील शासकीय पत्रकाचा तुम्हाला यापेक्षा सोप्या "बोलीभाषेत" काटेकोर अनुवाद करता येईल का? म्हणजे अर्थ नेमका असला पाहिजे...
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणांखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शसन पद्धत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटित करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
हा वाक्यखंड "सोप्या" किंवा "बोली" मराठीत लिहायची मी उपक्रमावरती पैज लावतो आहे. मुख्य म्हणजे नेमका अर्थ हरवता कामा नये. "उत्तरदायित्व" ऐवजी "जबाबदारी" वापरू शकू. पण "प्राधिकरण", "अधिनियम" ऐवजी काय वापरणार, त्यात नेमका अर्थ आला पाहिजे. कारण "अधिनियम" म्हणजे वाटेल ती घोषणा नसते. तुमच्या "बोली" अनुवादात "तत्संबंधित" आणि "तदनुषंगिक" मधला कायदेशीर फरक दिसून आला पाहिजे. इ.इ.
यासाठी मी ३००-४०० रुपये बक्षीस ठेवायला तयार आहे (ते पैसे विजेत्यापाशी कसे पोचते करायचे कोणीतरी मला सांगावे लागेल!). प्राडॉ, गुंडोपंत, राजेंद्र, यांनी वाटल्यास परीक्षक व्हावे.
माझे मत म्हणावे तर कुठल्याही भाषेत शासकीय कागदपत्रांसाठी अर्थ मोघम असून चालत नाही, म्हणून ठराविक, नेमके, (रोजवापरात नसलेले) शब्द लागतात. इंग्रजीत थोडेच वेगळी बाब आहे? ही इंग्रजी सूचनापत्रिका बघा. शासकीय मराठी शासकीय इंग्रजीपेक्षा कठिण आहे, हे पटत नाही बुवा!
पैजेसाठी माझे उदाहरण नको म्हणता? मग प्रमोदकाका, तुम्ही कुठलातरी, तुम्हाला नावडलेला, शासकीय भाषेतला अर्ज उपक्रमावर ठेवा, आणि त्याच्या "बोलीभाषेतल्या" पण अर्थाच्या दृष्टीने काटेकोर अनुवादाला मी बक्षीस देईन!
सहमत पण..
बोली भाषेत अनुवाद करणे अत्यंत अवघड आहे या मुद्याशी सहमत आहे, पण मला तरी इंग्रजी पत्रिका वाचणे अधिक सोपे गेले बुवा. म्हणजे जर वापरायची वेळ आली तर इंग्रजी पत्रिका वापरेन असे वाटते. दुसर्या शब्दात सांगायचे तर शासकीय इंग्रजी 'बेटर ऑफ द टू एव्हिल्स' असावी असे वाटते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सोसायटी?
प्राधिकरण म्हणजे ऍथॉरिटी, सोसायटी नव्हे. इथे सार्वजनिक संस्था म्हटले तरी चालावे. --वाचक्नवी
माझा प्रयत्न.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणांखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शसन पद्धत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटित करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामामध्ये जास्तीतजास्त खुलेपणा आणि जबाबदारी तयार करण्यासाठी, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणांखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहारातील शासन पद्धत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटित करण्याकरिता आणि त्यासंबंधी किंवा त्याअनुषंगाने होणार्या बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
[मी (पुलंच्या मते) 'पुणेरी शुद्ध मराठी बोली' या नावाची पुण्यात बोलली जाणारी बोली बोलतो. मूळ नियम आणि आता मी केलेला 'प्रयत्न' दोनही मला एकदा वाचूनच समजले. इतरांनी सुद्धा कोंकणी, अहिराणी, वैदर्भिय, इत्यादी बोलींमध्ये प्रयत्न करुन ४०० रु. चे बक्षीस मिळवायचा प्रयत्न करावा. मी रांगेत उभा आहे.]
मी थोडे सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो नियम असल्याने तो (शक्य तेव्हढा) लहान आणि भरिव असावा असा एक संकेत असतो बहुधा. तो नियम अजून सोपा करण्यासाठी लहान वर्णनात्मक वाक्ये करुन समजावून द्यावा लागेल. त्यामुळे नियमाला एक सर्वजनांना समजेल अशी 'समजावणी' असावी. यापेक्षा अजून काय करावे !
--लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)
माझाही प्रयत्न.
सार्वजनिक संस्थांना जबाबदारीची जाणीव असावी आणि त्यांच्या कामकाजांत जास्तीतजास्त खुलेपणा यावा यासाठी हा अधिनियम आहे. संस्थांच्या कागदपत्रांतील नोंदींची माहिती मिळवण्याचा शासनमान्य व्यावहारिक मार्ग आता जनतेला मोकळा आहे. या अधिनियमाद्वारे केन्द्र आणि राज्य सरकारे माहिती आयोगांची स्थापना करून माहितीच्या कायद्याची रीतसर अंमलबजावणी करू शकतील(. )
खरेतर, श्री. धनंजय लिहितात तेवढे मूळ मराठी क्लिष्ट नव्हते. इंग्रजी वाचता आले नाही, कारण त्यासाठी सुमारे दोन दशलक्ष 'चाव्यां'चा घाव संगणकाला झेलावा लागला असता, त्याला माझी तयारी नव्हती.--वाचक्नवी
४०० साठी
४०० रुपयांसाठी,
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणांखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शसन पद्धत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटित करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम.
'सार्वजनिक प्राधिकरणां'च्या कुठल्याही कामात अधिक पारदर्शकता यावी, जबाबदारी निर्माण व्हावी, त्यांच्या कामासंबंधित माहिती सर्वसामान्यांना मिळवता यावी, ही (माहिती) कशी मिळावी याची निश्चित पद्धत ठरवावी, 'केंद्रीय माहिती आयोग' आणि 'राज्य माहिती आयोग' (दोन्ही विशेषनामे) बनवण्यासाठी, या संबंधीच्या आणि यातून उद्भवलेल्या इतर बाबींची तरतूद म्हणून हा 'अधिनियम' बनवला आहे.
(आपण इंग्रजी 'अधिनियमा'तले वाक्य सुचवले असते तर भाषांतर आणखी सोपे झाले असते ;) )
परीक्षक मंडळ
अहो परीक्षक मंडळ! कोणी आहे का तिकडे!
म्हणजे मंडळापैकी कोणीही अजून जबाबदारी स्वीकारली नाही आहे. ते मंडळ घटित करण्यापूर्वी, ही पैज व्यवहार्य आहे की नाही याची माहिती मिळवण्याची तरतूद मी करणे आवश्यक होते. मी स्वतः परीक्षण केलेले चालणार नाही हे आलेच. नाहीतर हा सर्व प्रकार इतका गढूळ होईल की पारदर्शकता नाहीच असे स्पर्धक मानतील.
पण पैकी दोन स्पर्धकांना तत्संबंधित मूळ "वकिली" इंग्रजी सोपे गेले असते असे ते म्हणतात, यातच मी मिळवली. त्या अनुषंगाने हे म्हणण्यास वाव आहे, की जितपत कठिण इंग्रजी आपण वापरून शिकलो आहोत, तितपतच मराठी आपण वापरून शिकलो, तर सवयीने क्लिष्ट इंग्रजी जशी समजू येते, तसे सवयीने क्लिष्ट मराठीही समजू येईल.
असो. पैसे कसे पोचते करायचे हेपण सांगावे लागेल, पण ते विजेता ठरल्यावर बघता येईल.
मी इथे आहे.
मी इथे आहे :)
आणि ही जबाबदारी स्वीकारायची माझी तयारी आहे अर्थात कुणाचा आक्षेप नसल्यास. ख्रिस्ती विवाहसोहळ्यांमध्ये ज्याप्रमाणे लग्न होण्याआधी कुणालाही आक्षेप घेण्याची संधी असते, तशीच इथेही आहे असे समजावे. :)
बाकीच्या परिक्षकांनीही त्यांच्या सहभागाची मान्यता दिल्यास पुढे जाता येईल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
द्वारकानाथ जी
मराठी बरोबरच हिंदी भाषिकाचाही भरणा असावा. महाराष्ट्र सर्वांचा आहे. मराठी मराठी करून उपयोग नाही.
आपला
कॉ.विकि
छे छे अजिबात नको!
नको नको!!
मराठी बरोबरच हिंदी भाषिकाचाही भरणा कोणत्याही परिस्थितीत अजिबात नको!
आक्रमण करून मराठीची वाट लावतायेत तेव्हढी पुरे आहे!
महराष्ट्र स्वतंत्र झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही!
आपला
गुंडोपंत
नागपूर्
नागपुरातही हिंदीचा प्रभाव अधिक आहे असे ऐकून आहोत. खरे का?
रेसिप्रोकेटिव्ह
मराठी बरोबरच हिंदी भाषिकाचाही भरणा असावा. महाराष्ट्र सर्वांचा आहे. मराठी मराठी करून उपयोग नाही.
हिंदी भाषिक प्रांतात जिथे मराठी भाषीक आहेत तिथे ते मराठीचा वापर करतील का? तुम्ही त्यांना तसे सांगायला जाल का आणि गेलात तर काय उत्तर मिळेल याची उत्सुकता आहे.
किती
किती मराठी भाषिक आहेत?
महाराष्ट्रात सुमारे ८% हून अधिक इतरभाषिय असावेत.
विकास साहेब
मुंबई सध्या हिंदी भाषीकच झालीय. मुंबई केंद्रशासीत करायलाच हवी आणि हो महाराष्ट्रातील बहूतेक शहरे हळू हळू हिंदी भाषीकच होत आहे. परप्रांतीय वाढत चालले आहेत.आता तुम्हीच सांगा?असे का होते.
आपला
कॉ.विकि
केंद्र शापीत
मुंबई सध्या हिंदी भाषीकच झालीय. मुंबई केंद्रशासीत करायलाच हवी
बंगलोर मधे कन्नड हे मुंबईतील मराठी संख्येपेक्षा कमी आहेत. सध्याची आकडेवारी माहीत नाही, पण १५-२० वर्षांपुर्वी जेंव्हा मुंबईत ३२% मराठी होते तेंव्हा बंगलोर मधे २३% कन्नड होते. आता तर काय आय टी मुळे कन्नडांचे प्रमाण वाढले असण्याची शक्यता नाही. आता तुम्ही मला सांगा कोणी बंगलोर केंद्रशासीत करायचा प्रयत्न करील का?
आणि केंद्र शासीत करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार आहे. कोणी तरी दिल्ली वाल्याने मुंबईलाच काय कुणालाच शहरे कशी चालवायची ते सांगू नये. केंद्राचे काम हे देशाचा कारभार चालवायचे आहे शहराचा नाही. आपल्याकडे केंद्राने सगळीकडे नाक खुपसल्याने बर्याच गोष्टी "केंद्र शापीत" झाल्या आहेत (हा आचार्य अत्र्यांचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळिच्या वेळचा ज्यात तुमच्या कम्युनिस्टांनी पण सहभाग घेतला होता तेंव्हा, वापरेलेला शब्द आहे) .
आता तुम्हीच सांगा?असे का होते.
कारणे अनेक आहेत, पण मूळ मुद्दा सांगतो, की जर सामान्य माणसाला आपल्या गावात / भागात सुखासुखी राहता आले तर उगाच स्थालांतर करायला नको असते.
मला वाटते
भारतातल्या कूठल्याही सरकारी कचेरीत ३ भाषेतील फॉर्म असावेत.
१ "त्या राज्याशी भाषा" - वरील उदा. मराठी, गुजराथेत - गुजराथी, कर्नाटकात - कन्नड
२. राष्ट्रभाषा - हिंदी
३. भारतात सर्वात जास्त वापरली जाणारी परदेशी भाषा - इंग्रजी
ज्याला वरील पैकी ज्या भाषेतला फॉर्म भरायचाय... भरू देत.
समाप्त (The End)
-------------------------------------------------------------------
एकदम अवांतर, सर्व महत्वाची कामे करून घ्या मगच वाचा व सोडून द्या. :-) ह. घ्या.
>>मराठी शाळेतून शिक्षण जवळपास हद्दपार झालेली दिसतेच पण व्यावहारिक ठिकाणी सुध्दा मराठीचे पध्दतशिर उच्चाटण होत असल्याचे दिसते.
मराठी शाळेतून शिक्षण जवळपास हद्दपार झालेली दिसतेच -- म्हणजे काय? मराठी माध्यम असून शिक्षक विषय इंग्रजीत शिकवतात? महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात मराठी माध्यमातून शिक्षण उपलब्ध आहे कि नाही? व विद्यार्थी मराठी माध्यमातून लिहायच्या (देवनागरी) ऐवजी इंग्रजी (रोमन लिपीत) मधे लिहतात? आम्ही मराठीत शिकलो. मला वाटते हिंदीचा पेपर हिंदीत, मराठीचा मराठीत, संस्कृत - संस्कृत, इंग्रजी -इंग्रजीत. आता काय वेगळे आहे का, सगळेच जण सर्रास सर्व विषय मराठीशिवाय दुसर्या भाषेत का?
व्यावहारिक ठिकाणी सुध्दा मराठीचे पध्दतशिर उच्चाटण होत असल्याचे दिसते.
व्यावहारीक ठीकाणी - बाजार (मार्केट) ठरवणार काय भाषा पाहीजे. काय हो प्रा. डॉ. सर औरंगाबादला भाज्या "टेक ग्रीन फेनूग्रीक - व्हेरी फ्रेश फेनूग्रीक " म्हणून मेथी विकली जाते का? पुण्याच्या भाजीमंडईत गेले पाहीजे. कोणाला काही खबर असल्यास सांगावे.
विधानसभेच्या निवडणूकांची भाषणे मराठीमधे होत नाहीत? ठाकरे, पवार, देशमूख सगळे मराठीत भाषण देत नाहीत? जागतीककरणानंतरच एकापेक्षा जास्त मराठी दुरचित्रवाहीन्या नाही सूरू झाल्या? साखर कारखाने, शेती महामंडळाच्या सभेत अवर शुगर प्रॉड्क्शन इज व्हेरी गूड धीस इयर. वुई शूड गेट गूड चीप लेबर फ्रॉम आंध्रा, लॉट ऑफ एक्स फार्मर्स यू नो, सुईसाईड् रेट व्हेरी हाय देअर आय हर्ड. संपतराव आय वील इ-मेल यू द लीस्ट ऑफ माय एजंट. महीपती व्हेर व्हेअर यू माय मॅन? यू मिस्ड व्हेरी गूड प्रेसेन्टेशन फ्रॉम दॅट पूअर लेबरर फ्रॉम मध्य प्रदेश ही सेड समथींग इन मराठी बट कूड नॉट फॉलो हीम, विश यू वेयर देअर टू एक्सप्लेन.
महाराष्ट्रात जे डॉ़क्टर होतात ते सगळे मराठी माध्यमातून होतात? त्यांना शस्त्रक्रीयेसाठी जी आयुधे, नव्या रोगांवरची संशोधने, पुस्तके, औषधे हे सर्व मराठी मधेच उपलब्ध असते? विचार करा तुम्ही कलकत्यात आहात, बंगाली डॉक्टर ने बंगालीत औषधाचे नाव लिहून दिले. आता औषध हे ९९.९९% इंग्रजीत नाव (लेबल) असलेले, साधारण तशीच नावे असलेली अजून दोन औषधे, औषधविक्रेता म्हणतो कुठले देऊ. तुम्ही म्हणता इथे काय लिहले आहे ते दे. दुकानदार म्हणतो मी आहे मध्यप्रदेशचा मला बंगाली वाचता येत नाही. अहो इंग्रजीत असेल तर आपणच आपले बरोबर ताडून घेऊ शकतो ना?
माझ्या मते मराठी भाषेचा महाराष्ट्रात चांगला वापर आहे. महाराष्ट्रात परकीय लोकांचा, कंपन्यांचा, माध्यमांचा, शिक्षणाचा लोंढा पुर्वीपेक्षा वाढला आहे त्यामूळे इतर भाषांचा वापर देखील. अजूनही घराघरात बर्यापैकी मराठी मधेच बोलले जाते.
अरे बाबांनो इंग्रजीने व्यावहारीक जगात मराठीपेक्षा आघाडी घेतली आहे. जरा भाषाप्रेम बाजूला ठेवून सखोल विचार करून पहा, बरीच कारणे आहेत. जगातल्या बर्याच भाषांची पण इंग्रजीपूढे हीच गत आहे. आता आहे असे आहे.
असो हताश होऊ नका. उपक्रमाकडे ब्रम्हास्त्र आहे. सध्या बाल्टिमोरच्या एका प्रयोगशाळेत आहे. अधून मधून मेंटेनन्स ठेवतो. आमच्या शस्त्राचे नाव आहे "धनंजय"
श्री धनंजय भगवानुवाच
यदायदाही मराठीस्य ग्लार्नी भवती महाराष्ट्र्
....सम्भवामि युगे युगे
अजून बिगरीतच
हल्लीहल्लीच मराठीतून लिहायला प्रयत्न करू लागलो आहे - उपक्रम चालवून घेतो, म्हणून उत्साह वाढतो.
पण तुमचे हे म्हणणे खरे, की इंग्रजीतून वेगवेगळे विषय शिकून, जगाभरातल्या लोकांशी त्याबाबत चर्चा केलेल्या मराठी लोकांनी, पुन्हा मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मायभाषेचे कर्ज आहे म्हणून नाही, तर तिचे प्रेम आहे म्हणून. असा प्रयत्न जयंत नारळीकर करतात (घाईत हे एक उदाहरण सुचले, आणखीही आहेत, वाटते.) पण त्याहूनही खूप अधिक हवेत. ज्ञानेश्वरांनी संस्कृत येत असून मराठीत रचना केली, त्याचे अनुकरण आजच्या सुजाण लोकांनी केली तर किती छान होईल. तशी अद्वितीय रचना आपल्याला जमणार नाही. आपणा सर्वांना राजहंसासारखेच डौलदार न चालण्याचे परमिट खुद्द ज्ञानेश्वरांनीच देऊन ठेवले आहे. आणि अद्वितीय कोणाला हवी आहे - आपल्याला इथे द्वितीय, तृतीय... शेकडो रचना मराठीत व्हायला हव्या आहेत!
वैचारीक आणि चौफेर रचना असल्यामुळे भाषा वापरण्यालायक होते. नुसतेच "अनुग्रहोत्तीर्ण", "महानिदेशकालय" शब्द संदर्भाशिवाय शिकावे लागले तर जुलूम वाटतो.
पण आपल्याला खूप लेखन-वाचनामुळे संदर्भ आहे, तर adjudication, counterinsurgency, असले लांबलांब इंग्रजी शब्द इतके सहज पचायला लागतात, की ते लांब वाटतसुद्धा नाहीत.
राष्ट्रभाषा.
मराठी देखील राष्ट्रभाषा आहेच. :) इंग्रजी व हिंदी या (राष्ट्रभाषेबरोबरच) अधिकृत भाषा देखील आहेत.
अधिक माहिती मनोगतावर ;) (दुवा नाही सापडला :( )
त्याला हवा असलेला दुवा
मनोगतापरपे यह दुवा मिला.
शासकीय मराठीको अभी दुवा की नही दवा की जरुरत है ऐसा लोगोंको वाटता है क्या?
बाय द वे. "उप्परी उप पस्करण" या शब्दांचा अर्थ सांगाल का? चिंचवड रेल्वे ष्टेशन वर एका सरकारी इमारतीवर लिव्हले आहे.
आम्हाला येथे भेट द्या.
सुरेश चिपळूणकरांना विचारा
याचा अर्थ सुरेश चिपळूणकरांना विचारा. ते हिंदी-मराठी - हिंदी भाषांतर करतात ना?
प्रकाश घाटपांडे
उपरी उपस्कर
उपरी म्हणजे वरचे(डोक्यावरचे). हिंदी-संस्कृतातले उपस्कर म्हणजे मराठीत उपकरण-एक्विप्मेन्ट. उपरी उपस्कर म्हणजे ओव्हरहेड एक्विपमेन्ट. इतका सोपा अर्थ, मला वाटते, कळायला हरकत नसावी. संस्कृतमध्ये केरसुणी, सूप, मुसळ इत्यादी गृहोपयोगी सामग्रीला उपस्कर म्हणतात.
'उप्परी उप पस्करण' वाचले असल्यास हे अशुद्धलेखन किंवा अशुद्धवाचन आहे. --वाचक्नवी
शक्य आहे
खूप दिवसांपूर्वी वाचलेले आठवल्याने लिहिण्यात चूक झाली असेल. "उपरी उपस्कर" हा शब्द असावा.
उपर हा शब्द माहीत होता. उपरी आणि उपस्कर हे दोन्ही शब्द माझ्यासाठी नवे आहेत.
धन्यवाद.
आम्हाला येथे भेट द्या.
मी मराठी !
शासकीय कामकाजातील मराठी ने सोपी मराठी अवघड करुन टाकली या मताशी आम्ही सहमत आहोत. शासनाचे परिपत्रके काढणारे हे वेगवेगळे सचिव मराठी शब्दकोष पाहून जनतेला समजणार नाही, असे शब्द निवडत असावेत, ज्यामुळे एका परिपत्रकाचा अर्थ ज्याच्या त्याच्या सोयीने काढता येतो आणि शेवटपर्यंत कोणालाही त्याचा अर्थ कळलेला नसतो, त्यामुळेच न्यायालयीन कामकाजातून मराठी हद्दपार झाली असावी ? असे वाटते.
वेगवेगळ्या कार्यालयातील जनतेशी संबधीत अर्जाचे नमुने मात्र बोली भाषेत आणि सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत असले पाहिजेत,
असे वाटते.
मराठी शाळेतून शिक्षण जवळपास हद्दपार झालेली दिसतेच पण व्यावहारिक ठिकाणी सुध्दा मराठीचे पध्दतशिर उच्चाटण होत असल्याचे दिसते.
या मताशी आम्ही सहमत नाही. मराठी शाळेतूनच मराठी माणसाच्या जीवनव्यवहाराची भाषा जी मराठी आहे, त्यातून अजूनही मराठीचे उत्तम शिक्षण दिले जाते, व्यावहारिक ठिकाणी सुद्धा मराठी बोलल्या जाते त्या व्यव्हारातले शब्द कदाचित वेगळे असतील पण तिचे उच्चाटण होत आहे, असे आम्हाला तरी वाटत नाही.
बाकी,
सहजरावांच्या मतांशी आम्ही सहमत आहोत.अजूनही आम्ही, मेथी, पालक, आंबटचूका, शेपू, तांदुळच्या, चंदनबटवा, अशा भाज्यांना भाजी मंडईत नावानिशी बोलल्याशिवाय आम्हाला तरी आम्ही मराठी आहोत असे वाटत नाही. महाराष्ट्रभर मराठी बोलल्या जात असतांना, अर्ज इंग्रजीतून का तर, मराठीचे काही खरे नाही, ती भाषा कोणाला समजत नाही, असे म्हणनारे कोणत्या भाषेचे समर्थन करीत असतात ते अजूनही आम्हाला कळले नाही.
जीआर आणि शासकीय व्यवस्थापन
अर्थातच शासन निर्णय. http://www.maharashtra.gov.in/english/gr/index.php?currIndex=3&initIndex...
या ठीकाणी उपल्ब्ध आहेत. अर्थातच हे मंत्रालयात काढले जातात. सकृतदर्शनी पारदर्शकतेकडे झुकणारी यंत्रणा ही खालील गोष्टींचा आधार घेते
१) जीआर चे अर्थ/अनर्थ/अन्वयार्थ काढण्याचे कसब व अधिकार हे नोकरशाही स्वत:कडे ठेवते
२) क्लीष्टता वाढवणे व श्लेष काढण्यास पुरेसा अवकाश ठेवणे, शब्दांचे बुडबुडे डरकाळ्या म्हणुन मारणे.
३) अनेक अंतर्विसंगती अंतर्भूत असणे ( कधी कधी १८० अंश आउट ऑफ फेज)
४) अंमलबजावणीसाठी असलेली व्यवहार्यता विचारात न घेणे
५) अधिसूचना व शासननिर्णय यात संदिग्धता ठेवणे
६) व्यवस्थापन शास्त्राचे कोणतेही आधुनिक निकष ने लावणे
७) माहितीची सहज उपल्ब्धता न ठेवणे
८) कार्यालयीन प्रोसिजर या अशा काही ठेवणे कि साप-शिडीच्या खेळात शेवटपर्यंत गेलेला खेळाडू एखाद्या सापाने (तथाकथित प्रोसिजर) गिळल्यावर पुन्हा पुर्वपदावर आणणे.[ नवीन खेळाडू सारखे पुनश्च हरि ओम्]
ही यादी खूपच लांबवता येईल. पुढील यादी उपक्रमींवर सोडतो.
प्रकाश घाटपांडे
बिनतांत्रिक कामासाठी मातृभाषा.
मातृभाषेचा उपयोग फक्त घरगुती संवाद, बाजारातील दैनंदिन व्यवहार, व्यासपीठावरील भाषणे आणि ललित साहित्यासाठीच केला तर सर्व प्रश्न चुटकीसारखे सुटतील. कोकणीचे आजपर्यंत असेच आहे, त्यांचे कुठे अडते?
इंग्रजी भाषा समजणारे भारतात जेवढे लोक आहेत तेवढे जगातल्या कुठल्याही देशात नाहीत. मराठी परिपत्रकापेक्षा इंग्रजी परिपत्रक जास्त लोकांना समजेल. सर्वांना समजावे असे वाटत असेल तर इंग्रजीचे शिक्षण सुलभसाध्य करा.
भारताची इंग्रजीतील राज्यघटनाच अधिकृत आहे, देशी भाषेतील नाही. कायदेकानून प्रथम इंग्रजीत बनतात, कारण त्यांतील शब्द आणि वाक्यरचनेतून एकच अर्थ ध्वनित होतो. मराठीत इतके सोपे शब्द वापरून अर्थस्पष्ट वाक्यरचना करणे अजून सोईस्कर नाही. एकवेळ मराठी पत्करेल इतके हिंदी अवघड असते. संस्कृत ग्रंथांवरच्या काशीच्या विद्वानांनी लिहिलेल्या हिंदी टीकेपेक्षा संस्कृत भाषेतील टीका वाचलेली परवडते. हिंदी टीका म्हणजे शंभर टक्के संस्कृत शब्द वापरून केलेली हिंदी वाक्यरचना असते. मराठी परिपत्रक म्हणजे तरी आणखी काय असते?
वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी पाय्आर् स्क्वेअर्ड लिहायला-उच्चारायला-लक्षात ठेवायला जितके सोपे वाटते तितके पाय गुणिले त्रिज्या वर्ग नाही. त्रिकोणाकरिता तर हाफ़बीएच हे पाया गुणिले अर्ध्या उंचीपेक्षा कितीतरी सोपे. इंग्रजी भाषेत आणि रोमन लिपीत जे जे चांगले आहे त्याचात्याचा आपण यथेच्छ उपयोग केला पाहिजे.--वाचक्नवी.
आपले मत.
मराठी भाषेला ९०० वर्षाचा इतिहास आहे.
जे काही चांगले आहे असे समजुन आणि स्विकारले तर आपली भाषा संपली तर चालेल काय?
मराठीला काही मर्यादा असतील तर संस्कृतला परत जीवन द्यायला पाहिजे का? कदाचित ती संपूर्ण भारताची भाषा होऊ शकेल.
इस्त्रायलने त्यांची हिब्रु भाषा परत जिवंत केली तसे आपल्या सर्वांना जमेल काय?
पटले नाही
आपली भाषा संपली तर चालणार नाही परंतु ती केवळ एका गटाची/ समूहाची भाषा आहे. देशाची नाही. संपूर्ण देशात कामकाजासाठी इंग्रजीच ठीक आहे. वाचक्नवी म्हणतात त्याप्रमाणे कामकाजाव्यतिरिक्त इतर ठीकाणी मराठी बोलावी/ वापरावी.
संस्कृतही कामकाजाचीच भाषा होती आणि एका विशिष्ट गटाची मक्तेदारी. ती कधीही जनसामान्यांची भाषा नव्हती. इंग्रजी त्यामानाने सर्व वर्गांत बोलली जाते आणि जगभरात चालते. सुदैवाने संस्कृतला राष्ट्रभाषेचा किंवा कामकाजाच्या भाषेचा दर्जा देण्याचा वेडेपणा देशात कोणी करू धजत नाही हे आपले भाग्य आहे.
आणि बाकीचा वाचक्नवींचा प्रतिसाद पटला.
बहुतेक राज्यशासन-लोक कारभारासाठी राज्यभाषा मराठी हवी
आजतरी मराठी माध्यमात महाराष्ट्रातील खूपशी लोकसंख्या शिक्षित आहे (आकडेवारी बिरुटेसरांना यांना विचारा). तोवर महाराष्ट्र राज्यशासनाचा लोकांशी नेहमीचा संपर्क मराठीत झाला पाहिजे (शिवाय इंग्रजीतही करण्यास पर्याय असावा).
म्हणजे सामान्य अर्ज (वाहनचालक परवान्यासाठीचा, पूर/दुष्काळग्रस्तांसाठी अनुदानाचा अर्ज, वगैरे) मराठीत लिहिण्याची मुभा पाहिजे. पण मग अर्जातले सगळे शब्द फारच सोपे हवे असा आग्रह नको - वाक्ये जमेल तितकी सोपी हवीत. काटेकोर, नेमका अर्थ हा सोपेपणापेक्षा महत्त्वाचा. तो साधल्यानंतर सोपेपणा हवाच!
दुहेरी/तिहेरी भाषाशिक्षण इतके चांगले झाले, की बहुसंख्य लोक मराठी/हिंदी/इंग्रजी दोन/तीनही भाषा चांगल्या समजून वापरू लागले असे समजा. तर मग त्या त्या भाषांच्या वापराची मर्यादित क्षेत्रे ठरली तरी कुठल्याच भाषेच्या भवितव्याला धोका पोचणार नाही.
सहमत
संपूर्ण सहमत.
आम्हाला येथे भेट द्या.
सुलभीकरण
To make things simple is most difficult thing.
प्रकाश घाटपांडे
<span style="color: #CCCCCC;">प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
हरयाणातले शेतकरी
ही बातमी पहा: हरियाणात निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्राबाबू नायडू तेथील शेतकर्यांसमोर हिन्दीत भाषण करत होते. ते तेलुगू ढंगाचे हिंदी ऐकून शेतकर्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. भाषण काही रंगेना. चंद्राबाबूंच्या ते लक्षात आले. त्यांनी हातातला हिंदी भाषणाचा कागद दूर ठेवला आणि सरळ इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. शेतकरी खूष. मग इंग्रजीत प्रश्नोत्तरे झाली. शेतकर्यांनी आपल्या मोडक्यातोडक्या इंग्रजीत त्यात उत्साहाने भाग घेतला. नायडूंचे तेलुगू-इंग्रजीतले भाषण शेतकर्यांना अतिशय आवडले हे सांगायला नकोच. अंती टाळ्यांचा कडकडाट झाला.
निष्कर्ष:-- आपली मातृभाषा किंवा राष्ट्रभाषा हिंदीपेक्षा सामान्य व अडाणी समजल्या जाणार्या भारतीय जनतेला इंग्रजी जास्त सोपे वाटते.
असाच अनुभव केन्द्र शासनाच्या एका मुंबईतील कार्यालयात दिल्लीहून आलेल्या कामगार संघटनेच्या नेत्यांना आला होता. दिल्लीतील तमाम शिपाई मंडळींना जोशपूर्ण वाटणारे त्यांचे हिंदी भाषण मुंबईतील चपराश्यांना नीरस वाटायला लागले. नेत्यांना स्थानिक पुढार्यांनी खूण केली आणि नेते इंग्रजीत बोलायला लागले. क्षणार्धात वातावरणात उत्साह संचारला आणि सभा यशस्वी झाली हे सांगायला नकोच!
मस्त!
+१
आमच्या प्रिय इंग्रजीला प्राधान्याची आणि एकमेव राष्ट्रभाषा म्हणून स्थान मिळण्याचे दिवस आता दूर नाहीत.
ऍक्च्युअली धिस शुड हॅव हॅपन्ड लॉन्ग बॅक यू नो!
- (इंग्रज) आजानुकर्ण
आम्हाला येथे भेट द्या.
एकमेव नाही.
दोन राष्ट्रभाषा हव्यात, एक बोलायची आणि एक लिहायची. सर्व अडचणी चुटकीसारख्या सुटतील.. चीनमध्ये माओच्या काळात शेतकर्यांच्या कानाशी ट्रान्झिस्टर असत. त्यावर चाललेले इंग्रजीचे पाठ ऐकावे लागत. आता काय परिस्थिती आहे माहीत नाही. लोहिया वगैरे उत्तरी भारतीयांनी इंग्रजीला विरोध करून हिंदीचा पुरस्कार केला, दाक्षिणात्यांनी हिंदीला विरोध. आता जगातली सर्वात जास्त इंग्रजी समजणारी प्रजा भारतात आहे. ------वाचक्नवी
सहमत
http://www.rediff.com/news/oct/22akd.htm हे मस्त आहे.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
आम्हाला येथे भेट द्या.
उत्तम दुवा
एक उत्तम दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. अगदी माझ्याच मनातले विचार आकडेवारी देऊन फारच चांगल्या तर्हेने मांडले आहेत. ह्या लेखावर ऑक्टोबर २२ तारीख होती. म्हणजे या वर्षी असेल तर अगदी ताजा लेख. त्यातले एकच समजले नाही. शहरी आणि ग्रामीण भागात इंग्रजी वाचणार्यांच्या टक्केवारीपेक्षा समजणार्यांची टक्केवारी कमी कशी? म्हणजे वाचतात जास्त आणि वाचलेले किंवा ऐकलेले समजते कमी लोकांना, हे पटण्याजोगे नाही. कदाचित 'रीड' चा अर्थ अभ्यासणे असा घेतला आहे की काय न कळे.
नवीन महत्त्वाची माहिती मिळाली ती अशी की, खेड्यापाड्यातले कमीतकमी २५ टक्के लोक इंग्रजी समजतात. ही मोठी दिलासी देणारी गोष्ट आहे.--वाचक्नवी
लेखाबाबत
सदर लेख बराच जुना दिसतो. पानावर खाली पाहिले असता १९९७, रेडिफ असे दिसते. शिवाय मुलायमसिंग यांचा "आजी संरक्षणमंत्री" असा उल्लेख आहे. त्यामुळे लेख जुना आहे यात शंका नाही.
लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो, की इंग्रजीचे भारतातील महत्त्व या व त्याच्याशी निगडीत विषयांवर अगदी १९९२ पासून प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ रामचंद्र गुहा व या लेखाचे लेखक अंबरीष दिवाण यांनी खूप चांगले लेख लिहिले आहेत. गुहा यांचे लेख तर वाचायला पर्वणीच असते. अतिशय शास्त्रशुद्ध विचार सोप्या शब्दात कसे मांडावे ते त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
उदा. विषयांतर करुन हा दुवा देतो. हा लेख वाचल्यापासून मी गुहा यांचा फ्यान झालो. मिलिंद बोकील यांच्या कातकरी: विकास की विस्थापन या पुस्तकात त्यांनी गुहा यांच्याबद्दल अतिशय चांगले उद्गार काढले आहेत. गुहा यांची पर्यावरणविषयक पुस्तकेही अप्रतिम आहेत असे ऐकले/वाचले आहे. मात्र प्रत्यक्ष पुस्तके वाचण्याचा योग आलेला नाही.
आम्हाला येथे भेट द्या.
धोकादायक मत.
काही लोकांच्या समुदायाच्या कृतीवरुन असे मत अथवा नित्कर्ष काढणे धोकादायक आहे.
प्लीज, थँक यू आणि टेन्शन.
आमचा मारवाडी दुकानाच्या फळीशेजारी नसला की त्याच्या अशिक्षित म्हातारीच्या ताब्यात दुकान असते. कुणी वस्तू विकत घेतल्यावर थॅंक यू म्हणाले की म्हातारी टेचात नो मेन्शन म्हणते. तिच्या तोंडून मी एकदा प्लीज पण ऐकले होते.
डोक्यावरून सिमेंट-वाळूचा माल वाहणारी एक स्त्री-मजूर गवंड्याला म्हणत होती, "तो(दुसरा पाटीवाला) नसला म्हून काय झालं, मी हाए ना? अजाबात टेन्शन घेऊ नका."
प्लीज, थॅंक यू, टेन्शन ला सोपे मराठी शब्द वापरात आहेत?--वाचक्नवी
मराठी, इंग्रजी आणि इतर देशी भाषा
२२ ऑक्टोबरच्या सकाळमध्ये तलगिरींचा एक छान लेख आला होता. त्याला अनेक प्रतिसाद आले होते. ते पुढील दुव्यावर आहेत.
http://esakal.com/esakal/esakal.nsf/MiddleFrame?OpenForm&MainCategory=Sa...
लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.लिंक उघडून जरूर वाचा.--वाचक्नवी