लहानांचे येणे

नमस्कार,
काल मी माझ्या घरातल्या एका लहानाला उपक्रमावर आणले. मी कसे टंकायचे वगैरे मदत केली. पण बाकी सर्व लेखन, चर्चाप्रस्ताव व प्रश्न तिचेच होते. उपक्रमावर लहानांनी यावे, यावेसे वाटावे हे उत्तम लक्षण वाटते आहे.

कालचे लेखन पाहता, ही मुलेच भाषा जिवंतं ठेवू शकतील असे वाटते. पण यासाठी पालकांनी, काका, मावश्यांनीही मदत करण्याची गरज आहे. मात्र त्यांना इथली भाषा कळणे जड वाटते आहे. नेट ला आंतरजाल का म्हणतात वगैरे प्रश्न पडत आहेत. 'मी आता काय वाचू?' हा पहिला प्रश्न होता. याला मलाही उत्तर देता आले नाही. मग मी सुचवले की तूच लिही.

आपण कुणी आपल्या घरातल्या लहान मुलांना येथे यावे म्हणून प्रोत्साहित केले आहे का? काय घडले? आपले अनुभव वाचायला आवडतील. कदाचित उपयोगीही पडतील असे वाटते.
(कालचे प्रोत्साहन आवडले आहे.)

-निनाद

लेखनविषय: दुवे:

Comments

पीजी - १३

उपक्रम, मनोगत, आणि अशी कुठलीही स्थळे की ज्यांवर स्ट्रिक्ट कंट्रोल नाही, ती स्थळे अगदी आर-रेटेड जरी नसली, तरी पीजी-१३ नक्कीच आहेत, असे वाटते. मुलांनी काय वाचावे आणि काय वाचू नये, ह्यावर पालकांचा कंट्रोल असावा, तसेच लेखकांनी, संकेतस्थळ चालकांनीही त्यांना मदत करून काँटेंट रेटिंग वगैरे दिले, तर ठरवायला सोपे जाईल.

उपक्रम एक वेळ ठीक आहे, पण उद्या मिसळपावावर आपल्या घरातला लहानांना पाठवण्याबद्दल आपले काय विचार आहेत ?

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

काँटेंट रेटिंग

तथागत,
आपली काँटेंट रेटिंग ची कल्पना उत्तम आहे.
पण असे करता येणे शक्य आहे का?

नीलकांत, आहे का असे शक्य लेखकाला नि संपादकांना अधिकार देणे?

आपला
गुंडोपंत

मिसळपाव

मिसळपावचे स्वरूप
योग्य असेल तर माझी काहीच हरकत नाहीये पाठवायला.

आपला
गुंडोपंत

हे दरच वेळी शक्य असतेच, होतेच असे नाही.

मुलांनी काय वाचावे आणि काय वाचू नये, ह्यावर पालकांचा कंट्रोल असावा,

हे दरच वेळी शक्य असतेच, होतेच असे नाही. इतर काही पाहण्यापेक्षा मुले उपक्रमावर् आलेली कधीही उत्तम.

आपली रेटिम्गची संकल्पना चांगली आहे.
जितकी लहान मुले येतील तितके चांगले.
मिसळपाव या साईटचे स्वरूप जरासे बोल्ड असे प्रतीत होत असले तरी चांगलेच असाअवे असे वाटते. त्यामुळे मुलांनीही जायला हरकत
नाही.
-निनाद्

उपक्रम

मुलांनी येण्यास उपक्रम योग्य वाटते. अर्थातच, काय वाचावे आणि काय नाही हे पालकांनी ठरवावे. संस्थळावर किती वेळ घालवावा हे ही पालकांनी ठरवावे. मुलांसाठी येथे कथा/ कविता नाहीत पण इतिहास, गडदर्शन, विज्ञान, गणित, मुलांसाठी कोडी यांत त्यांना नक्की भाग घेता येईल.

प्रोत्साहन देण्यास आपण आहोतच.

मुद्दामून मुलांसाठी कोणी लिहू शकेल का?

या सगळ्या विषयांवरचे लेख तर मुलामुलींना आवडतील. पण एक "छोट्यांसाठी" म्हणून समुदाय काढावा का? येथे काहींची लेखणी प्रासादिक आहे. त्यांनी वेळात वेळ काढून काही छोटे लेख लिहावे. इंग्रजी जालावर आहे तितके छोट्यांचे साहित्य जमणार नाही. तरी सुरुवात तर होईल!
जुने "किशोर"चे अंक प्रत-अधिकारातून मुक्त झाले असतील तर ते डकवू शकू का? त्यांतले लेखन सोपे असले तरी लहानांच्या बुद्धिमत्तेचा मुळीच अवमान नव्हता. किंवा अशी तुम्ही वाचलेली कुठली दुसरी मासिके असतील. कोणाला मूळ लेखक ओळखीचे असतील आणि लेखक अनुमती देणार असतील, तर बघा.
शिवाय अमेरिकेच्या केंद्रसरकारची सर्व प्रकाशने प्रत-अधिकार-विरहित असतात असा कायदा आहे. तर त्यांच्यापैकी थोड्यांचे भाषांतर का न करावे? उदाहरणार्थ हा दुवा.
माझ्याकडून २५ शब्दांपेक्षा लहान वाक्य कधी टंकलेच जात नाही त्यामुळे हे कार्य मी सुचवो, न सुचवो, मी खुद्द न केलेलेच बरे - हे घ्या २५ शब्द!

उपक्रम

याला उपक्रमकर्त्यांची परवानगी लागेल असे वाटते. इच्छुकांना व्य. नि. ने विचारता येईलच.

कल्पना चांगली आहे. मला आवडली. लहानांसाठी चित्रे, मोठे फाँट्स, दृक्-श्राव्यफिती यांचा वापर करता येईल.

छान कल्पना आहे

येथे काहींची लेखणी प्रासादिक आहे. त्यांनी वेळात वेळ काढून काही छोटे लेख लिहावे. इंग्रजी जालावर आहे तितके छोट्यांचे साहित्य जमणार नाही. तरी सुरुवात तर होईल!

हे आवडले.
छान कल्पना आहे.
मला काम करायला आवडेल.
मगे लहानमुलांचा स्थळाची एक कल्पना येथे काही सदस्यांनी मांडली होती .
पण पुढे काय झाले कळलेच नाही.

(किशोर चे सगळे जुने अंक मिळतील असे ठिकाण मला तरी माहीत नाही. शिवाय आताच्या मुलांना त्याचे संदर्भा लागतील का हा हीए प्रशन आहेच. पण कल्पना उत्तम.)

-निनाद

मला वाटते

लहान मुलांसाठी वेगळा विभाग असावा कारण येथे जरा नाही म्हणले तरी काही प्रसंगी प्रौढांसाठी अशी भाषा येते.
तसेच इथल्या विद्वानांची भाषा जर का घरातील लहान मुले वापरू लागली तर उगाच त्यांना अकाली वृध्दत्व आल्यासारखे तुम्हाला नंतर वाटेल ;-) ह.घ्या.

देसीपंडितचे उदाहरण

देसीपंडित वर बघितले असता... त्यांच्या मुख्य अनुक्रमणिकेत इंग्रजी वगळता प्रादेशिक भाषांचे कंटेन्ट दिसत नाही. मात्र विशिष्ट भाषिक विभागावर टिचकी मारली असता केवळ त्याच विभागातील कंटेन्ट्स दिसतात.

समुदायाबाबत असे काहीसे करता येईल का? ज्या लोकांना व्याकरण किंवा क्लिष्ट शास्त्रीय माहितीत रस नाही त्यांना ते दिसू नये अशी व्यवस्था वगैरे?

किंवा लहान मुलांसाठी वेगळी टिचकी बनवून त्यांना न आवडणारे मोठ्यांचे कंटेन्ट त्यात दिसणार नाही वगैरे.

नीलकांत किंवा शशांकला माहिती असावी.

हे जाणवलेच

आपले म्हणणे खरे आहे.
ही मला चांगलेच जाणवले. इथली भाषा या मुलांची नाही. ही, जरा जुनी ६०/७० सालातली मराठी असल्याचा भास मला होत असतो.
त्यामुळे भाषा कशी ठेवायची यावर विचार व्हायलाच हवा. बाकी भाषेच्या शुद्धतेच्या बाबतीत नियम कसे आणी किती सांगायचे हाच प्रश्न पडला.
यावर कोठे उदाहरंणासहीत असलेले सचित्र व इंटरॅक्टीव्ह असे स्थळ नाही का? नसल्यास त्यात वाव आहे!
मी वर म्हंटल्या प्रमाणेच, आंतरजालाला नेट का नाही म्हणायच? असा प्रश्न आलाच. (तो 'फक्त जाल म्हणायच 'असं म्हणून मिटवला!)
-निनाद

कंटेंट रेंटींग आणि बाल साहित्य

सध्या एखादे लेखन वाईट आहे असं वाटल्यास वाचक लेखाला तसे गुण देऊ शकतात आणि व्यवस्थापक लोकाग्रहास्तव ते लेखन अप्रकाशित करू शकतात, अशी सोय करता येऊ शकेल.

बच्चेमंडळींसाठी मागे एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची चर्चा ऐकली होती. तसं झालं तर उत्तम. त्यात त्या वयोगटासाठी हवं तसं सादरीकरण करता येईल. साधा फरक सांगतो. मोठयांना रिच कंटेंट हवा असतो त्यासोबत चित्रांची जोड हवीच असं काही नाही. मात्र भरपूर लिखाण असलेलं संकेतस्थळ लहानमुलांना खिळवून ठेवू शकेल का नाही शंकाच आहे.

कुणी लहानपणी कॉमिक्स वाचलेत का हो? लोकमत कॉमिक्स ते राज आणि डायमंड कॉमिक्स वाचण्याचा कुणाचा अनुभव असेल तर त्यांनी २५+ झाल्यावर पुन्हा एकदा कॉमिक्स वाचावेत म्हणजे वयानुसार आवडी कश्या बदलतात ते लक्षात येईल.

चांदोबा, चंपक, ठकठक , बालहंस आदी मुलांसाठी असलेल्या पुस्तकांत मी खुप काळ घालवलाय. लहान मुलांच विश्व वेगळंच असतं.
एकदा बालहंस नावाच्या हिंदी पाक्षीकाने पालकांशी संवाद साधला होता. त्यात संपादक खुप काही बोलले. त्यातील एक वाक्य कायम लक्षात राहीलंय. मुलांच विश्व कसं असतं हे दाखवण्यासाठी , " एक सुंदर राजकुमारी होती" हे वाक्य मोठ्यांना वेगळं संदर्भ देतं आणि लहानांचा संदर्भ वेगळा असतो.

लहानांच्या विश्वात सरळ सरळ विभागणी असते, चांगलं आणि वाईट. त्यांच्या विश्वात नेहमी चांगल्या गोष्टींचाच जय होतो. मोठं झाल्यावर कळतं की असं सरळसरळ विभाजन नसतंच कधी. पण तरीसुध्दा लहान मुलांनी वाचलंच पाहिजे. त्यांच्या याच विश्वाचा आधार घेऊन इसापाने सगळ्या प्राणीमात्रांना बोलतं केलंय. त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावछटा दाखवलेल्या आहेत. धुर्त, लबाड, शूर, प्रामाणिक आदी सगळं. ह्यामुळे मुलांचं विचार विश्व समृध्द होतं. विष्णू शर्माचं पंचतंत्र तर बनलेलंच आहे मुलांना व्यवहारचतुर बनवण्यासाठी...

जसं जसं वय वाढत जातं तस तश्या आवडी बदलत जातात. कुमार वयातील मुलांना भन्नाट भरारकथा आवडतात, फाफे (फास्टरफेणे) आदी आवडतात. सुरस असावी आणि उत्कंठा वाढवानारी असावी.

पुढे जी.ए. , व.पू. आणि सु.शींचा काळ येतो :) याच दरम्यान वाचनाची आवड , विषय, लेखक आदी तयार होतात.
यापूढे काय होतं या बद्दल अनभिज्ञ....

...नीलकांत

 
^ वर