गणपती बाप्पा आले

आले आले गणपती बाप्पा आले (खरंतर मी 'बाप्पा आले' एवढेच लिहिणार होतो पण बप्पी लहिरीच्या मुलाचे नाव बाप्पा लहिरी (!) आहे असे समजले म्हटले, कन्फ्युजन नको) तर आपल्या सर्वांचे आवडते गणपती बाप्पा उद्या येत आहेत. गणपती हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय दैवत आहे असे म्हणायला हरकत नाही. गणपतीच्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला वेगळीच धुंदी चढते जेवढी दिवाळीलाही चढत नाही.

पोराटोरांची तर अगदी चंगळ असते. फटाके, गोडधोड, सुट्टी हे सगळं घेऊन उंदरावरून येणारे गणपती बाप्पा त्यांना भारीच भावतात. गणपतीच्या चालीरीती तरी सारख्या कुठे आहेत? मैलागणिक चालीरीती बदलतात, अहो शेजार-शेजारच्या घरातही वेगळ्या असतात. कुठे ५ दिवसाचा गणपती, कुठे दीड दिवसाचा, कुठे चतुर्दशीपर्यंत तर कुठे वर्षभर! पुन्हा दर दिवशीचे पदार्थ आणि सोपस्कार वेगवेगळे.

अरे हो हो! एवढी क्यासेट लावली पण मुद्द्याचे काही बोलाल की नाही असं तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो की आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नातेवाइकांच्या, माहितीतल्या चालीरीती, त्यांचे वेगळेपण, वेगवेगळे सोपस्कार, खाद्यपदार्थ या विषयी आपलं मन मोकळं करता यावं म्हणून ही चर्चा.

तर सांगा बरं तुमच्याकडे कसा असतो गणपती?

लेखनविषय: दुवे:

Comments

लालबागच्या राजाचा विजय असो..

नवीनराव,

अरे हो हो! एवढी क्यासेट लावली पण मुद्द्याचे काही बोलाल की नाही असं तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो की आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नातेवाइकांच्या, माहितीतल्या चालीरीती, त्यांचे वेगळेपण, वेगवेगळे सोपस्कार, खाद्यपदार्थ या विषयी आपलं मन मोकळं करता यावं म्हणून ही चर्चा.

आपला चर्चाप्रस्ताव इंट्रेस्टींग आहे. त्यानुसार आम्ही आपलं मन मोकळं करत आहोत..

गणपतीबाप्पा हे आमचंही लाडकं दैवत आहे. त्याची आम्हाला सगळ्यात भावणारी गोष्ट जर कोणती असेल तर त्याचं ते गोजिरं, गोंडस रूप! :)

गणपतीची खरी मजा मात्र आमच्या कोकणात बरं का! एक गणपती आणि दुसरी होळी (हावलूबाय!) हे दोन सण कोकणवासीयांचे विशेष लाडके. पोटापाण्याच्या उद्योगाकरता मुंबईत आलेले बरेच चाकरमानी रजा काढून गणपतीकरता कोकणात जातात. चार दिवस मजेत, सुखासमाधानाने घालवतात! :)

आता आपण आपापल्या घरातल्या गणपतीबद्दल सांगा असे सांगितलेत त्यामुळे आम्हाला आमच्या जातीचा उलेख इथे करावा लागेल! आम्हा बहुतेक चित्तपावनांच्या घरी दीड दिवसाच्या गणपती असतो. अहों थोंडक्यांत गोडी! कसें? :)
गणपती पाठोपाठ येणार्‍या गौरी यादेखील खड्याच्या आणल्या जातात. ५ खड्यांना गौरी मानून त्याची पूजा केली जाते. उभ्या मुखवट्याच्या गौरी आणि त्यादिवशीचं ते १६ भाज्या असलेलं साग्रसंगीत जेवण याची खरी मजा मात्र देशस्थांकडे हो! :) असो..

कोळ्यांची आणि भंडार्‍यांची गौरी मात्र मांसाहारी असते बरं का! त्यांच्याकडे गौरीपूजनाच्या दिवशी झकाससा मटणवड्यांचा नैवेद्य असतो. आमच्या ओळखीच्या काही कोळणी आहेत, त्यांच्याघरी आम्ही हे प्रसादाचं जेवण जेवलो आहे! :) कोळ्यांच्या घरची अजून एक पद्धत म्हणजे त्यांच्या घरातल्या गणपतीसमोर पाच जिवंत चिंबोर्‍या (खेकडे) टांगून ठेवलेले असतात. चामारी गणपती गेला की हे कोळी लोक त्याच चिंबोर्‍यांचं तिखटसं कालवण करून चापत असतील! :)

काही कट्टर मासेखाऊ सिंधूदूर्गवासीय आणि गोवेकर यांच्या कोकणातल्या घरच्या गणपतीची अजून एक प्रथा बर्‍याच घरात पाहायला मिळते. ती म्हणजे पुढल्या दाराने गणपती विसर्जनाकरता बाहेर पडला की मागच्या दाराने मासळी घरात येते. श्रावण महिन्यामुळे ही मंडळी माश्यांच्या जेवणाकरता अत्यंत तरसलेली असतात! :) असो..

एकूण गणपती आपल्याला लई आवडतो बॉस! आपण तर साला त्याच्या प्रेमातच आहोत!

सर्व उपक्रमींना गणेशोत्सवाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!..

देवा गणपतीराया सर्वांना चांगली बुद्धी दे रे बाबा...

गणपतीबाप्पा मोरया...

लालबागच्या राजाचा विजय असो..

आपला,
(गणेशभक्त) तात्या.

घरचा गणपती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आमच्या घरचा गणपती सुद्धा दीड दिवसाचाच. काही लोकांकडे पाच दिवस गणपती ठेवतात तसा आपल्याकडे नाही याचे तेव्हा (लहानपणी ) फार वाईट वाटत असे. पण ते किती शहाणपणाचे होते ते आता लक्षात येते. (गणपती अकरा दिवस सुद्धा ठेवतात हे पुण्यात आल्यावर समजले.)
श्री. तात्या लिहितात "काही कट्टर मासेखाऊ सिंधूदूर्गवासीय आणि गोवेकर यांच्या कोकणातल्या घरच्या गणपतीची अजून एक प्रथा बर्‍याच घरात पाहायला मिळते. ती म्हणजे पुढल्या दाराने गणपती विसर्जनाकरता बाहेर पडला की मागच्या दाराने मासळी घरात येते. श्रावण महिन्यामुळे ही मंडळी माश्यांच्या जेवणाकरता अत्यंत तरसलेली असतात! " हे मात्र शत प्रतिशत सत्य.शब्दशः खरें. अमच्या घरी हे असेच होत असे. तात्यांचा अनुभव फर मोठा आहे.

गणेश विसर्जन

गौरी गणपती हा द्वंद्वसमास स्वरुपातच माझ्या प्रतिमेत आहे. घरात अत्यंत धार्मिक वातावरण असल्याने गणेश उत्सव हा धार्मिक स्वरुपातच साजरा केला जायचा. ओसरीवर कोनाड्यात शिसवीच्या देव्हा-यात गणपतीची मुर्ती चे प्रतिष्ठापन आणि माजघरात गौरीचे ठरलेले. इतरांच्या घरात गणपतीची सजावट पाहिल्यावर आपल्या घरात तशी आकर्षक सजावट नाही याचे दुःख होई. घरात सजावटीच वावड नव्हतं पण आग्रह ही नव्हता. विसर्जन करताना मात्र वाईट वाटे. सोंड्यात ल्या (शेताचे नांव) विहिरीत विसर्जन करताना मुर्ती पाण्यात टाकल्यावर येणारा 'डुबूक्कन' आवाज आणि इतिहास शिकताना सतीच्या प्रथेत त्या बाईला चितेवर ढकलून देताना तिच्या 'आर्त किंकाळ्या' यात मला काहीतरी साम्य वाटे. त्यानंतर लागणारी विलक्षण हुरहुर व एक प्रकारचे रितेपण दर वर्षी जाणवे.

प्रकाश घाटपांडे

थोडक्यात पण मनचे

घाटपांडे साहेब,

आपला प्रतिसाद थोडक्यात पण आमच्याही मनातले बोलणारा आहे. हा असा एक सण आहे की त्यात देवापेक्षाही कुणीतरी घरातलेच असल्यासारखे वाटते. मला वाटते त्या अर्थाने हा एकमेव सण असावा. सुरवातीस अमेरिकेत शिकायला आल्यावर ज्या काही गोष्टींची हूरहूर लागली त्यात हा एक सण होता. आता येथे पण गौरी-गणपती बसवतो...

पुन्हा एकदा...

सालाबादाप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणेच या वर्षीही गणपती (बाप्पा वगैरे) यावरील चर्चा, लेख वगैरे सुरु झालेच्. सणासुदीचे दिवस आले की अशी सामुदायिक सांस्कृतिक उबळ येणे यात काही नवीन नाही. विशेषतः 'पल्याड' असले की हमखास 'माझी दहीहंडी, माझा दसरा, माझे नवरात्र' अशा उचक्या लागतात. (हे वैयक्तिक घेऊ नये, मी 'पल्याड' असताना मलाही लागत असत!) 'सार्वजनिक गणेशोत्सव' यावरचाच वार्षिक चर्चाविषय कसा आला नाही कोण जाणे. उद्यापासून दहा दिवस तर काय कुणाला काय हवे ते करण्याचे 'परमिट' दस्तुरखुद्द बाप्पांच्या हस्तेच देण्यात आलेलं असल्यानं प्रश्नच नाही. 'रुपाली' च्या भाषेत 'पुण्याची सांस्कृतिक खरुज' अजरामर होवो, पुण्यातले दोन लाख नवीन खड्डे पावन होवोत, पुढील वर्षापासून गणेशोत्सवाचे दहाही दिवस ध्वनिवर्धक बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची सद्बुद्धी विघ्नहर्ता आर आर आबांना देवो, विसर्जनाच्या मिरवणुकीतील नृत्यातला महिलांचा सहभाग वाढत वाढत जाऊन त्याचे पार अंटार्टिकापर्यंत झेंडे लागोत, गुरुजी मंडळाला गुलाल फुकट मिळो, प्रतापराव गोडसेंच्या मुखातून बोलणारा दगडूशेठ (हे त्यांच्या भक्तांचेच बोल हो!) त्यांच्या भक्तांकडून एकसष्ठ लाखाचे सिंहासन बनवून घेवो (तेवढी ती इनकम टॅक्सची रेड पडू देऊ नको रे बाप्पा!), मिरवणुकीच्या ढोलताशांचे डेसिबल्स आणि मिरवणुकीचा कालावधी यांचे नवनवीन रेकॉर्डस स्थापन होवोत....
गणपती बाप्पा मोरया!
सन्जोप राव

एक विनोद

पुढील वर्षापासून गणेशोत्सवाचे दहाही दिवस ध्वनिवर्धक बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची सद्बुद्धी विघ्नहर्ता आर आर आबांना देवो,

या वरून एक विनोद / व्यंगचित्र आठवला/ले. विसर्जनाच्या (दहाव्या) दिवशी ताशा/कर्णे यांचा उपयोग करून लोकं जोरात ओरडत असतात, "गणपती बाप्पा मोरया", पुढच्या चित्रात गणपती कानात बोटे घालून त्रासीक नसजरेने बसलेला आणि मनातल्या मनात म्हणताना घेतला आहे" "पुढच्या वर्षी लवकर न्या!"

गणपती-बंदोबस्त

गणपती म्हणल की पोलिस खात्यात त्याला बंदोबस्त हा शब्द आपोआप चिकटतो. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीची जेव्हढी विटंबना होत असेल तेव्हढी अन्य धार्मिक विटंबना कोठे होत असेल असे वाटत नाही. अनेक गुंड गणेशभक्तीचा मुखवटा चढवून सार्वजनिक जीवनात मानाने जगतात. कायदा व सुव्यवस्था साठी गणपतीला वेठीस धरतात, गणपती मिरवणूकित पुढे हलणार नाही अशी धमकी देतात. इतर दिवशी हिस्ट्री शिटर (गुन्हेगारी परंपरा असलेले) असलेले समाजकंटक यांच्याकडे मिरवणूक लवकर संपवण्यासाठी, गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार न करण्यासाठी पोलिसांना साकडे घालावे लागते.दादा बाबा करावे लागते हे मी जवळून पाहिले आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलिस खात्याला एका तणावातून जावे लागते. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडली की पोलिस आयुक्तांना हुश्य होते.
आज लोकमान्य टिळक असते तरी या लोकांनी त्यांना जुमानले नसते. विरोध होतो तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरुपाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला नव्हे.
(गणपती नुस्ता नावाला, चैन पाहिजे आम्हाला)
प्रकाश घाटपांडे

पुरे की

दरवर्षी काय तेच तेच उपहासात्मक लेखन वाचायचं संजोपराव तुमच्याकडून.

काही वेगळं लिहा की!

चर्चाकार विचारतो: आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नातेवाइकांच्या, माहितीतल्या चालीरीती, त्यांचे वेगळेपण, वेगवेगळे सोपस्कार, खाद्यपदार्थ या विषयी आपलं मन मोकळं करता यावं म्हणून ही चर्चा.

-राजीव.

सहमत..

आहे. चर्चाकाराने गणपतीबद्दलच्या घरगुती चालिरिती, सोपस्कार वगैरे या बद्दल चर्चाविषय टाकला आहे. परंतु राव साहेबांनी घाईगडबडीमध्ये गणेशोत्स्वाच्या सामाजिक स्वरुपाबद्दल लिहिले आहे..:)

असो.. (अर्थात, गणेशोत्सवाच्या सामाजिक स्वरुपाबद्दल रावसाहेबांनी जे लिहिले आहे त्याच्याशी मी सहमत आहे..)

तात्या.

पटण्यासारखे

चपखल प्रतिसाद.

मागच्याच आठवड्यात वर्गणीसाठी धक्काबुक्की केल्याने हृदयविकाराचा झटका येऊन पुण्यातील एक दुकानदार मरण पावल्याची बातमी वाचली. गणेशाच्या आगमनापूर्वीच बाप्पाचे थेट दर्शन करवून देणारे असे भक्त आता विरळा राहिलेले नाहीत. गल्लीबोळातल्या प्रत्येक मंडळाला 'स्वेच्छेने' वर्गणी द्यावी लागते. आणि या वर्गणीचा उपयोग काय तर रात्री बारापर्यंत "कोंबडी पळाली" किंवा "मी बाबूराव बोलतोय" अशी गाणी लावून आपल्या कमरेची हालचाल करत पुण्यनगरीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणे. एखादी 'डाव' गुणदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने नृत्यकलेचे प्रदर्शन करत असताना भारताच्या आधारस्तंभांना दोन बोटे तोंडात घालून शिट्ट्या मारण्याची संधी देणे. उत्सव "एन्जॉय' करण्यासाठी सोमरसाचे प्राशन करणे, दहा दिवसांनंतर रस्त्यावर मंडप कुठे उभारला होता ही जाणीव गुडघ्यांनी व मणक्यांनी करून देणे.

शिवाय गणेशोत्सवानंतर विसर्जित मुर्त्या व "निर्माल्य" नदीनाले तुंबवून टाकतात. थोडीशी उसंत घ्यावी तोच दांडिया करण्यासाठी युवक युवती पुन्हा हातात दांडके घेऊन तयार... मग लगेच फटाके आणि मग थर्टी फर्स्ट...

शेखचिल्ली

शेखचिल्ली प्रकारचा प्रतिसाद!...

डेसिबलचे प्रमाण वाढल्याने वातावरणातील तापमानात वाढ होते व त्यामुळे जागतिक तापवृद्धीला हे अधिकच प्रोत्साहन देणारे ठरेल. अँटार्क्टिकातील हिमखंड वितळल्यानंतर बुडणार्‍या झेंडेवाल्यांकडे तरंगायला निदान झेंड्याच्या काठ्या तरी असतील पण पवनेचे पाणी वाढल्याने आम्ही बुडून जाऊ याचाही विचार करा.

(ह. घ्या.)

आमच्याकडे

आमच्याकडे खड्याच्या गौरी असतात आणि गौरी गणपती बरोबर जातात.
गणपती विसर्जनाच्या बाबतीत घटपांडे साहेबांच्या पहिल्य प्रतिसादाशी सहमत आहे.
--लिखाळ.

गणपतीबाप्पा मोरया !

आमच्याकडे पण!

आमच्याकडे खड्याच्या गौरी असतात आणि गौरी गणपती बरोबर जातात.

आमच्याकडेपण फक्त खड्याच्या गौरींबरोबर मुखवटे पण असायचे त्याला साड्या नेसवायचे. अर्थातच दोन नवीन साड्या घेण्याचे एक चांगले निमित्तपण होयचे!

पहिला आणि दुसरा दिवस

मंडळी, तुमचे प्रतिसाद वाचून मजा आली. तर त्याचे झाले काय की गेले दोन दिवस गणपतीच्या गडबडीत असल्याने मला इथे येता आले नाही आणि तुमचे प्रतिसाद वाचता आले नाहीत. आणि प्रतिसादच वाचले नाहीत तर त्यांना उत्तर काय देणार? कप्पाळ? तो केहने की बात ये है की ... तुम्हारा नाम क्या है बसंती? असे म्हणू नका हो इतक्यात :))

तर असो, गणपतीच्या पहिल्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना करायला येणारे गुरूजी प्रचंड बीजी. बर्‍याच वेळा फोन केला तर आलोच आलोच म्हणून त्यांनी बराच वेळ काढला. शेवटी फक्त मोबाईल ऑन केला आणि काही बोललेच नाहीत. पण मोबाईलवर आरतीचा आवाज येत असल्याने आधीच्या यजमानाघरचे आवरत आले आहे असा शेरलॉकी कयास आम्ही केला. धन्य आमच्या गुरुजींची चतुराई :) गुरूजी आले आणि त्यांनी यथासांग पूजा वगैरे सांगून "पार्थिवसिद्धिविनायका"त प्राण फुंकले आणि सर्वांना भूक लागल्याची जाणीव तीव्र झाली. जेवायला उकडीचे मोदक आणि आरतीला खव्याचे मोदक.

दुसरा दिवस हा गणपतीसाठी 'व्हेइकल डे' होता म्हणे. म्हणजे उंदराचा दिवस हो! नैवेद्याला तळलेले मोदक, करंज्या आणि हरभर्‍याची उसळ असा उंदिरमामांना आवडता मेन्यू :)

पण काय सांगा दिवस आलेत, पोटापाण्यासाठी परत यावे लागले नाहीतर तिसर्‍या दिवशी काय झाले हेही तुम्हाला कळवले असते.

बाप्पा शिमिंग!

आमच्याकडे भारतात घरी दिड दिवसाचा गणपती असतो. त्यानिमित्ताने सर्व एकत्र जमतात, चांगलेचुंगले भोजन होते, आरत्या म्हणताना मजा येते. उदबत्ती, धूप, फुले, मखर यांच्यामुळे स्वत:चेच घर वेगळे भासते. दिवाळीपेक्षाही अधिक आनंद या दिड दिवसांत वाटतो.

अवांतर: गणपतीचे काल विसर्जन झाले तेव्हा माझ्या दोन वर्षांच्या भाच्याला काय होते आहे हे कळेना. बाप्पा त्याच्या घरी गेला असे सांगितल्यावर त्याला फारसे पटले नाही.

"बाबाने बाप्पाला पान्यात शोडलं आनि बाप्पा शिमिंग करायला गेला." असे घरी येऊन सांगत होता असे कळले.

 
^ वर