ब्रियन सिलास..केवळ अप्रतिम!

राम राम मंङळी,

आज जालावर मुशाफिरी करता करता 'ब्रियन सिलास' या एका अतिशय चांगल्या दर्जाच्या कलाकाराचे वादन कानावर पडले. हे अतिशय सुरेल अन् सुरेख वादन आपल्याही ऐकण्यात असावे म्हणून हा लहानसा लेख.

मी गेली अनेक वर्षे या कलाकाराच्या प्रेमात आहे. जुन्या (आणि काही मोजक्या) नव्या हिंदी चित्रपटातील गाणी हा मनुष्य पियानोवर फारच सुरेख वाजवतो. याचे आत्तापर्यंत पियानोवादनाचे अनेक ठिकाणी जाहीर कार्यक्रम झाले आहेत आणि याच्या वादनाची ध्वनिमुद्रणेही बाजारात उपलब्ध आहेत. (ती सर्वच्या सर्व ध्वनिमुद्रणे सुदैवाने माझ्या संग्रही आहेत.)

एकतर पियानो हे अत्यंत गोड, आणि अतिशय तरल अशा स्वरांचे वाद्य आहे. या वाद्यात काय जादू आहे कुणास ठाऊक, पण याचे सूर कानी पडले की आत्मा तृप्त होतो! आणि आपल्या जुन्या हिंदी चित्रपटातील काही अजरामर गाणी यावर वाजू लागली की ते श्रवणसुख माणसाला अक्षरशः वेड लावतं! सिलास साहेबांचे पियानोवादन ऐकताना हा स्वर्गीय श्रवणसुखाचा अनुभव मिळतो!

हा लेख लिहीत असतांना एकीकडे मी सिलास साहेबांनी वाजवलेले एहेसान तेरा होगा.. हे गाणे ऐकत आहे. आपणही अवश्य ऐका. फारच सुरेख वाजवलं आहे!

एहेसान तेरा होगा मुझपर,
दिल चाहता है वो केहेने दो,
मुझे तुमसे मोहोब्बत हो गई है,
मुझे पलको की छावमे रेहेने दो!

क्या बात है, यमन रागातलं काय सुरेख गाणं आहे हे! वरील ओळींतील 'पलको की छावमे रेहेने दो' मधला यमन पियानोवर ऐकतांना काय वाटतो! आहाहा.. क्या बात है, साला दिल खुश होऊन जातो! :)

सिलास साहेबांनी वाजवलेली इतर गाणी आपल्याला या दुव्यावर जाऊन तेथील गाण्यांपुढील 'प्ले साँग' या दुव्यावर टिचकी मारून ऐकता येतील.

हा दुवा आपल्याला सिलास साहेबांच्या संकेतस्थळावर नेऊन सोडेल..

एखाद्या निवांत विकेंडच्या संध्याकाळी आपल्या आवडत्या स्त्रीसोबत विदेशी मद्याचे दोन घुटके घेत आणि सिलास साहेबांच्या पियानोवादनाचा आस्वाद घेत, तिच्याशी सुखदु:खाच्या दोन गोष्टी शेअर करण्याचा आनंद काही वेगळाच! साला आणखी काय पाहिजे लाईफमंदी?! :)

असो,

आपला,
(मनस्वी!) तात्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा, छान

ब्रायन सिलास माझ्या वडलांना सुद्धा फार आवडतात. त्यांनी मला सिलास यांच्या जुन्या हिंदी गाण्यांच्या पियनो-वादनाच्या काही तबकड्या भेट दिल्या होत्या. पण सिलास यांच्याशी पहिली ओळख म्हणून मी त्या ऐकायला नको होत्या. कारण पियनो या वाद्याचे मर्मच सिलास समजले नसल्यासारखे, "हॉटेलातल्या जेवणार्‍यांसाठी, नीट ऐकले नाही तर गोड वाटेल असे," वाजवत होते असे माझे मत झाले.

त्यांनी रागदारी संगीत हाताळायचे ठरवले आहे, हे उत्तमच!

(अवांतर : पण कोणीही हिंदुस्तानी (किंवा कर्नाटक सुद्धा) शास्त्रीय संगीत वाजवायला पियानो निवडेल याबद्दल मला फार आश्चर्य वाटते. पियानोची हातोटी आहे स्वरमेळ (पॉलिफोनी - अनेक धुनी एकत्र वाजवून तरी त्या सुंदर वाटणे, हार्मनी - अनेक सुर एकत्र वाजवून एक मिश्र सुर तयार करणे). आणि कुठल्याही स्वरमेळाच्या चौकटीचा चक्काचूर करणारे, अर्धकोमल-अर्धतीव्र स्वरांनी सौंदर्यस्थळे दाखवणरे, असे आपले रागदारी संगीत आहे. अवजारही उत्तम, कलाही उत्तम, पण तरी दोघांमध्ये तफावत असेल असे वाटते. अतिरेकाचे उदाहरण द्यावे, तर कोणी एखाद्या उत्तम हातमागावर उत्तम सोन्याचे दागिने बनवते, असे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटेल ना, तसे.)

तात्यांची शिफारस ऐकून या गाण्यातला यमन पुन्हा ऐकीन. कावीळ आली की सगळेच पिवळट दिसते असे म्हणतात. सिलास यांच्या वादनाबद्दल दूषित पूर्वग्रह झाल्यामुळे त्यांची सर्व गाणी मी गुणग्राही श्रोत्याच्या भावनेने ऐकली नसतील, हेदेखील खरेच.

गानेमे तंत और तंतमे गला! :)

कारण पियनो या वाद्याचे मर्मच सिलास समजले नसल्यासारखे, "हॉटेलातल्या जेवणार्‍यांसाठी, नीट ऐकले नाही तर गोड वाटेल असे," वाजवत होते असे माझे मत झाले.

प्रत्येकाची आवडनिवड अन् प्रत्येकाची मतं! मला तरी सिलास जेव्हा हिंदी गाणी वाजवतात तेव्हा त्या गाण्यांचं एक छानसं प्रतिबिंब मी आरश्यात बघतोय असंच वाटतं. एखादं हिंदी गाणं आपण जसं गायकाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकतो तीच आणि तशीच अपेक्षा त्या गाण्याचं वादन ऐकताना ठेवू नये असं माझं मत आहे. प्रत्येक वाद्याच्या काही क्वालिटीज असतात, तर काही लिमिटेशनस् असतात. माणसाचा 'गळा' हे अर्थातच सर्वात लवचिक आणि लोकप्रिय वाद्य! :) त्यामुळेच संगीताची व्याख्या करताना गायन, वादन आणि नृत्य असा क्रम आहे! :)

माझ्या मते सिलास जेव्हा एखादं हिंदी गाणं वाजवायला घेतात, तेव्हा त्यांचा कॅनव्हास स्वतंत्र असतो, कोराच असतो. त्यात एखादं गाणं जसं त्याना भावलं तसेच ते रंग भरणार! आणि तेच योग्यही आहे.

त्यांनी रागदारी संगीत हाताळायचे ठरवले आहे, हे उत्तमच!

धनंजया, तुझा काहितरी गैरसमज झालेला दिसतो आहे. सिलासने रागदारी संगीत हाताळायचे ठरवले आहे असं मी तरी कुठेही म्हटलेलं नाही. 'एहेसान तेरा होगा' या गाण्यात यमन आहे, तेव्हा ते गाणं वाजवताना त्यातला यमन कसा वाटतो याबद्दलच मी लिहिले आहे. या गाण्यापुरतंच यातल्या यमनकडे बघितलं पाहिजे. तो काही ख्यालसंगीतातला यमन नव्हे! ख्यालसंगीतातला यमन ऐकयचा असेल तर तुला उस्ताद शाहिद परवेज यांची सतार ऐकली पाहिजे. शाहिदभाईंचं वादन म्हणजे क्या केहेने!

'गलेमे तंत होना चाहिये और तंतमे गला होना चाहिये' असं बुजुर्ग लोक नेहमी म्हणायचे. या वाक्याचा शब्दशः अर्थ न घेता तारतम्याने घ्यावा! केहेने का मतलब इतनाही की, कुणी गाऊ लागलं की ऐकणार्‍याला गोड सारंगीच (गानेमे तंत) ऐकतोय की काय असं वाटलं पाहिजे, आणि कुणी वादन करू लागलं की ऐकणार्‍याला कुणी गातंय की काय (तंतमे गला!) असं वाटलं पाहिजे!

गानेमे तंत और तंतमे गला! बात समझमे आयी धन्यासेठ? :) हिराबाई जेव्हा गातात तेव्हा सुंदर सारंगी वाजल्यासारखा भास होतो, आणि उस्ताद विलायतखा जेव्हा वाजवतात तेव्हा ते गातच आहेत की काय असं वाटावं इतकं सुंदर वाजवतात!

सिलास साहेब जेव्हा ही गाणी वाजवतात तेव्हा कुणीतरी आपल्याच मुडात छानपैकी ते गाणं गुणगुणतंय की काय असं वाटतं हेच सांगायचा माझ्या मूळ लेखाचा हेतू आहे. आता ते तुला किंवा इतर कुणाला कितपत पटावं, रुचावं, हे व्यक्तिसापेक्ष आहे! Right? :)

आता हिंदुस्थानी रागदारी संगीताचा विषय काढलास म्हणून पियानो संदर्भात अजून एक मुद्दा मांडतो आणि माझं भाषण संपवतो! :)

आपलं हिंदुस्थानी रागदारी संगीत, विशेष करून आमचं किराणा संगीत हे मूलतः श्रुतींचं आणि मिंडकामाचं आहे. बिनकारांचं आहे. आणि कितीही म्हटलं तरी पियानो, काय किंवा हार्मोनियम काय, ही शेवटी कटनोटस् ची वाद्य. यात सुरात सलगता राहात नाही. बटणावरून हात उचलला की स्वर बंद! त्याची आस राहात नाही. पण तो झाला त्या वाद्याचा गुणधर्म! त्यामुळे हिंदुस्थानी रागदारी संगीत ज्या सुरेखपणे जसं तंतुवाद्यांवर वाजेल (सरोद, सतार, सारंगी) तसं या कटनोटस् च्या वाद्यांवर वाजणार नाही हे साहजिकच आहे! पण त्यातूनही या वाद्यांतील कटनोटस् चे शॉर्टकमिंग झाकून ठेवून सिलाससारखा काय किंवा आमच्या गोविंदराव पटवर्धनांसारखा एखादा कलाकार त्या वाद्यात काही कला सादर करतो, ती कला आणि ते कलाकार तुलनेने केव्हाही थोरच ठरतात!

अर्थात ही सगळी माझी मतं! शेवटी प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीला आपला सलाम! :)

धनंजया, शेवटी संगीत हा एक महासागर आहे. त्यात अनेक दीपस्तंभ आहेत, त्याला अनेक किनारे आहेत आणि अनेक क्षितिजं आहेत! कुणी कुठे जायचं, कुठल्या बेटावर किती रमायचं, हे ज्याने त्याने ठरवायचं! या महासागराचा अंतिम ठाव कुणालाच लागलेला नाही, ना कधी लागेल! :)

असो, तात्या अभ्यंकरांचे मौलिक विचार इथेच थांबवतो! :)

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

सर्व मुद्दे पटले

सर्व मुद्दे पटले. मुख्य म्हणजे गळ्याची तोड कुठल्याच वाद्याला नाही ते तर खरेच.

प्रत्येक वाद्याच्या काही क्वालिटीज असतात, तर काही लिमिटेशनस् असतात.

उत्तम-ते-मध्यम दर्जाच्या पाश्चिमात्त्य वादकांकडून साधारणपणे यापेक्षा अधिक पियानोच्या क्वालिटीज बाहेर येताना दिसतात, आणि लिमिटेशन्स् कमी दिसतात. मी ऐकलेल्या तबकड्यांत तरी सिलास यांची वाद्य वाजवण्यातली तयारी कमकुवत वाटली. तबकडीकडे "अरे, कोणी चांगला गुरू-बिरू कर!" असे ओरडायची इच्छा अनावर होते.

रागदारीसाठी नाही, पण चांगल्या तयारीच्या पियानोवादकाने सुगम संगीत वाजवले तर बहार येईल (आणि येते), यात शंका नाही.

त्यामुळे हिंदुस्थानी रागदारी संगीत ज्या सुरेखपणे जसं तंतुवाद्यांवर वाजेल (सरोद, सतार, सारंगी) तसं या कटनोटस् च्या वाद्यांवर वाजणार नाही हे साहजिकच आहे!

यात मोठी महत्त्वाची गोष्ट सांगितली, तात्या. व्हायोलीन हे वाद्य भारतातील (खासतर कर्नाटक संगीतवाले) वादक तयारीच्या दृष्टीने पाश्चिमात्त्यांच्या तोडीस तोड वाजवतात. येथे संगीताचे ज्ञान म्हणायचे नाही. पण गजावर (बो-वर) कमीजास्त दबाव देऊन स्वतःला तालाची साथ देता येते, वगैरे, तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचे आहे. वाद्याला काय शक्य आहे असे चांगल्या गुरूकडून शिकले, की मग पुढे त्या सगळ्याचा सौंदर्यदृष्टीने मस्त वापर करता येतो. मला वाटते, की व्हायोलीन हे तंतुवाद्य असल्या कारणाने, त्याच्या तांत्रिक खुबी शोधून, आत्मसात करून, शिष्यांना शिकवण्यात आपल्याकडील अव्वल गुरूंना उत्साह वाटला असणार. या दृष्टीने पियानो हे कट-सुरांचे वाद्य उपेक्षित राहिले, त्याच्या खुबी शोधून शिकवण्यात कोणत्याच वरच्या दर्जाच्या गुरूला रस वाटला नसणार. पाश्चिमात्त्यांत मात्र संगीताच्या माहीर गुरूंना पियानोच्या खुबी शोधण्यात रस वाटला. त्यामुळे सिलास यांच्या (त्या तबकडी) इतपत तयारीने पाश्चिमात्त्य शाळकरी पोरे सुद्धा पियानो वाजवतात. (सर्व पोरे नव्हे! पियानो आवडीने शिकणारी पोरे.) पाश्चिमात्त्यांत सुगम संगीतासाठीही पियानो रेकॉर्डिंग करणार्‍याकडून अधिक प्रशिक्षण अपेक्षित असते.

सेंसिबल प्रतिसादाकरता धन्यवाद, :)

उत्तम-ते-मध्यम दर्जाच्या पाश्चिमात्त्य वादकांकडून साधारणपणे यापेक्षा अधिक पियानोच्या क्वालिटीज बाहेर येताना दिसतात, आणि लिमिटेशन्स् कमी दिसतात.

पण ते पाश्चिमात्य संगीत वाजवताना. आपल्याकडील यमन, बागेश्रीसारख्या रागांवर आधारित गाणी, जिथे स्वरांची एक ठराविक श्रुतीस्थानं असतात, अशी गाणी या उत्तम ते मध्यम दर्जाच्या पाश्चिमात्य वादकांकडून कशी आणि कितपत वाजतील याबद्दल मी उत्सुक आहे. सिलासचे पियानोवादन ऐकताना हिंदुस्थानी रागसंगीतातील त्यांना अतिशय उत्तम जाण आहे हे त्यांच्या स्वरांच्या लगावावरून, खास करून शुद्धमध्यम, गंधार या स्वरांचे यमनकल्याणातील स्वरस्थान लक्षात घेता, चांगले जाणवते. मला त्यांच्या वदानातील हाच मुद्दा महत्वाचा वाटला. अर्थात आपण म्हणता त्याप्रमाणे पाश्चिमात्य देशातील शाळकरी मुलेदेखील त्यांच्यापेक्षा अधिक सरस वादन करत असतील तर ते कलेच्या दृष्टीने चांगलेच आहे! :)

रागदारीसाठी नाही, पण चांगल्या तयारीच्या पियानोवादकाने सुगम संगीत वाजवले तर बहार येईल (आणि येते), यात शंका नाही.

परंतु त्याकरताही हिंदुस्थानी रागसंगीताची थोडीफार जाण असायला हवी असे मला वाटते आणि ती जाण मला सिलासच्या वादनात दिसते.

यात मोठी महत्त्वाची गोष्ट सांगितली, तात्या. व्हायोलीन हे वाद्य भारतातील (खासतर कर्नाटक संगीतवाले) वादक तयारीच्या दृष्टीने पाश्चिमात्त्यांच्या तोडीस तोड वाजवतात.

इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानी संगीतातील काही व्हायोलीन वादक तर कुणाशी तुलनाच होऊ शकणार नाही इतपत तयारीने वाजवतात. उदाहरणार्थ आमचे दातारबुवा, पं गजाननबुवा जोशी, श्रीधर पार्सेकर. दुर्दैवाने श्रीधर पार्सेकर हा अवलिया कलाकार बर्‍याच मंडळींना माहित नाही.

असो, धन्याशेठ तुझ्या (काही एक सेन्स असलेल्या!!) प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.. :)

तू उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर मी निश्चितपणे विचार करीन..

तात्या.

--
मिसळपाव डॉटकॉमच्या कामाकरता उद्या पुण्याचा एक संगणकतज्ञ मला ठाण्यात येऊन भेटणार आहे! :)

एक हाताने पियानो वाजवणे

दिशांत डॉट कॉम वरच्या तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन एहसान तेरा ची धुन ऐकली.

गोड वगैरे आहेच. पण पूर्ण गाणे फक्त उजव्या हाताने वाजवलेले आहे. डाव्या हाताचा पत्ताच नाही! हा प्रकार म्हणजे व्हायोलीन वाजवायला घ्यायचे आणि बो (गज) वापरायचा नाही याच्यापैकी झाले.

इथे वाजवणार्‍याच्या यमन रागाच्या ज्ञानाबद्दल टिप्पणी नाही आहे. वाद्याचे तांत्रिक मर्म समजण्याबद्दल आहे. पियानोचा नीट फायदा करून घेणार नसेल, तर दुसरे कुठले वाद्य अधिक सयुक्तिक नसते का ठरले? (छोटा झायलोफोन निवडायचा). व्हायोलिनवर गज नाही वापरणार असे ठरवले तर व्हायोलीन ऐवजी मँडोलीन नाही का निवडायचे? (यू. श्रीनिवास नावाचा एक कर्नाटक संगीताचा वादक फार सुंदर मँडोलीन वाजवतो. झंकार करणारी जादू बोटांत होती, तर व्हायोलीन निवडण्याचा अट्टाहास त्याने केला नाही.)

गजावर प्रभुत्व मिळवायचे असेल त्यानेच व्हायोलीन निवडावे. उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांच्या तंत्रावर प्रभुत्व मिळवायचे, त्यानेच पियानो निवडावा.

पियानोची एक-एक पट्टी दाबून धुन वाजवण्याला पाश्चिमात्त्यांत "फेकिंग ए ट्यून ऑन द पियानो" (खोटाखोटा पियानो वाजवायचा) असा पुष्कळदा उल्लेख करतात. बहुतेक उत्तम गायकांना "फेकिंग ए ट्यून" जमते - कारण आपल्या गळ्यातले ज्ञान त्याला पुरते. (पण गळ्यात तरी ज्ञान लागतेच हो! माझ्यासारख्या बेसुर्‍याला नाही जमत...) दोन्ही हात वापरण्याचे तंत्र मात्र शिकून, सराव करून, तयार करावे लागते.

अर्थातच पश्चिमेतल्या शाळकरी मुलांना यमन कसा कळणार? त्यांचे अभिजात संगीताबद्दल प्रशिक्षण वेगळे. त्यातले काहीबाही कळेल. पण कोणतंही शाळकरी पोर दोन हातांनी पियानो वाजवेल!

आणि सगळी सौंदर्यस्थाने उलगडून दाखवायला आपल्याकडील कलाकाराला जसे एक तप लागते, तसे पाश्चिमात्त्य कलाकारांनाही. स्टेजवर येऊन पाश्चिमात्त्य अभिजात संगीत वाजवणारे तरुण वय २-३ वर्षांचे असल्यापासून शिकत असतात, आणि शालेय शिक्षणानंतर (प्रतिभा असेल तर आधीही) चारेक वर्षे तरी कुणा गुरूचे पाय धरतात. हे आपल्याकडील अव्वल दर्जाच्या कलाकारांपेक्षा वेगळे नाही.

धन्याशेठ, आपलं समिक्षणवजा विवेचन छान आहे! :)

गोड वगैरे आहेच.

वगैरे म्हणजे काय काय हे कळेल का? कारण आपण actual वादनाबद्दल 'गोड' हा एकच शब्द वापरून इतर वर्णन 'वगैरे' या सदरात टाकले आहे. अर्थात, आपल्या बाकी माहितीपूर्ण प्रतिसादाची सन्माननीय दखल मी खाली घेतोच आहे.

हा प्रकार म्हणजे व्हायोलीन वाजवायला घ्यायचे आणि बो (गज) वापरायचा नाही याच्यापैकी झाले.

ते कसं काय? गज वापरलाच नाही तर व्हायोलीन वाजेल का? म्हणजे त्याच्या तारा नुसत्या झंकारता येतील, पण त्यातून गाणे वाजेल का?

पियानोचा नीट फायदा करून घेणार नसेल, तर दुसरे कुठले वाद्य अधिक सयुक्तिक नसते का ठरले?

हा प्रश्न सिलासलाच विचारायला हवा खरा! :)

उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांच्या तंत्रावर प्रभुत्व मिळवायचे, त्यानेच पियानो निवडावा.

अहो पण हा ज्या त्या माणसाचा प्रश्न आहे असं नाही का वाटत आपल्याला? आपणच वर मोठ्या रसिकतेने (की उपहासाने?:) म्हटले आहे की सिलासचे वादन गोड वगैरे वाटले! तरीही पियानो या वाद्याची निवड केली आहे ती चुकीची आहे असं आपल्याला म्हणायचं आहे?

भले एका हाताने वाजवून का असेना! संगीत हे आवडल्याशी मतलब, कानाला गोड लागण्याशी मतलब! बरोबर आहे का मी म्हणतोय ते?

आता पियानो हे वाद्य दोन्ही हाताने वाजवायचं वाद्य आहे असे आपण म्हटले आहे. कबूल, अगदी १००% कबूल! अहो पण एखाद्याने ते वाद्य एका हातानेच वाजवले आणि जर ते वादन आपल्याला आवडले तरी आपण त्याला आपल्या परिने दाद देणार आहोत की दोन हाताने वाजवायचं वाद्य हा माणूस एका हातानेच का वाजवतो अशी तांत्रिक समिक्षा करणार आहोत, हे अर्थातच ज्याने त्याने ठरवायचे आहे!

बरं, असं कुठे झालंय का, की एका हाताने वाजवल्यामुळे सिलास कुठे लय खेचतो आहे, की तालासुरात कुठे चुकतो आहे? तसं असेल तर कृपया तत्परतेने त्या गाण्याचा उल्लेख करा. मला ते गाणे पुन्हा एकदा ऐकायला आवडेल!

पियानोची एक-एक पट्टी दाबून धुन वाजवण्याला पाश्चिमात्त्यांत "फेकिंग ए ट्यून ऑन द पियानो" (खोटाखोटा पियानो वाजवायचा) असा पुष्कळदा उल्लेख करतात.

अच्छा, म्हणजे पाश्चिमात्यांच्या म्हणण्याप्रमाणे 'सिलासने खोटा खोटा पियानो वाजवला आहे' असं आपल्याला म्हणायचं आहे का? आणि तसं असेल तर खोट्या खोट्या पियानोवादनातून आपल्याला त्याने वाजवलेले 'एहेसान तेरा होगा' हे गाणे गोड वगैरे कसे वाटले?/वाटू शकले?

दोन्ही हात वापरण्याचे तंत्र मात्र शिकून, सराव करून, तयार करावे लागते.

सहमत आहे..

पण कोणतंही शाळकरी पोर पियानो दोन हातांनी पियानो वाजवेल!

अगदी बरोबर! कारण त्याच्या गुरूने त्याला त्याच पद्धतीने शिकवलं असेल. आता सिलास एका हातानेच पियानो वाजवतो याचा अर्थ एकतर त्याने कोणत्याही गुरुकडे विधिवत शिक्षणच घेतले नसावे, किंवा त्याच्या गुरुने त्याला एका हातानेच वाजवायला शिकवले असावे किंवा पियानो हे वाद्य कशाशी खातात याचीच मुळात सिलासला कल्पना नसावी! :)

माझ्या मते मुद्दा इतकाच आहे की त्याचे वादन आपल्याला आवडले किंवा नाही? ही आवडनिवड मात्र निश्चितपणे प्रत्येक व्यक्तिची वेगवेगळी असू शकते, व्यक्तिसापेक्ष असू शकते, हे मात्र कबूल!

असो, धन्याशेठ तुमच्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास आपण बांधील नाही या डिस्क्लेमरची मला पूर्ण कल्पना आहे, किंबहुना हे प्रत्येकाने 'बाय डिफॉल्ट' गृहीतच धरले पाहिजे असेही मी मानतो! :)

आपला,
(आभारी) तात्या.

ता क - माझ्या कीपॅडच्या बटणांचा क्रम हा टाईपरायटरच्याच बटणांप्रमाणे आहे. परंतु मला दोन्ही हातांनी टायपिंग येत नसल्यामुळे मी एका हातानेच सदर प्रतिसाद व माझे इतर लेख टाईप करतो. तरी कृपया सदर लेखन हे खोटे खोटे न समजता खरे खरेच समजावे ही नम्र विनंती! वाचकांनी कृपया दोन हातांनी टाईप केले आहे की एका हाताने, या कळजीत न पडता काय टाईप केले आहे त्या मजकुराशीच मतलब ठेवावा असेही वाटते! :)

आता जाता जाता एक किस्सा आठवला तो इथे लिहावासा वाटतो-

एकदा कोल्हापुरात भीमण्णांची मैफल होती. समोर कुणीतरी एक तज्ञ संगीत समिक्षक (?!) बसला होता. मैफल संपल्यावर तो अण्णांपाशी गेला आणि चेहेरा पाडत अण्णांना म्हणाला,

" हम्म! आपलं गाणं तसं आवडलं, परंतु अमूक अमूक गोष्टी आपल्या गाण्यात दिसल्या नाहीत. अमूक अमूक गोष्टींची आपल्या गाण्यात कमतरता आहे! आपल्याला वेळ असेल तर माझे म्हणणे विस्तृतपणे मांडतो!"

त्यावर अण्णा त्याला हसून म्हणाले,

"अहो माझ्यापाशी अगदी भरपूर वेळ आहे. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे माझ्या गाण्यात काही कमतरता असूही शकेल. पण त्या गोष्टी आपण मला सांगून तेवढ्या पटकन समजणार नाहीत! आणि अहो पंचाईत अशी झाल्ये की माझे गुरुजी सवाईगंधर्व आता हयात नाहीत त्यामुळे आता माझ्यातील कमतरता, तृटी माझा कान पकडून सुधारणारं कुणी राहिलं नाही हो! त्यामुळे आता विचारणार तरी कुणाला? असो, यापुढे हे असंच चालायचं! तरीही माझं गाणं आपल्याला 'तसं आवडलं' यातच मला भरून पावलं! :)

(ही हकिगत कोल्हापुरातल्या देवल क्लबातली, १९७५ च्या सुमारातली. मला पं भाई गायतोंडे यांनी सांगितली!)

तात्या.

--
ज्या मंडळींना धड दोन ओळीही गुणगुणता येत नाहीत ती मंडळी शेवटी संगीत समिक्षक होतात! :)

खरे आहे

ज्या मंडळींना धड दोन ओळीही गुणगुणता येत नाहीत ती मंडळी शेवटी संगीत समिक्षक होतात! :)

अगदी माझे गुणगुणणे ऐकून कोणीतरी हे लिहिले असावे. :-)
बाथरूमच्या बाहेर गायचे धार्ष्ट्य माझ्यापाशी नाही.

गज वापरलाच नाही तर व्हायोलीन वाजेल का? म्हणजे त्याच्या तारा नुसत्या झंकारता येतील, पण त्यातून गाणे वाजेल का?

गजाशिवाय व्हायोलीन वाजवायला (झंकारायला) लहान मुलांना बरेच गुरू शिकवतात. स्वर शुद्ध, कोमल, तीव्र लावायला शिकताना गजाची कसरत करावी लागू नये, म्हणून. चमत्कृती म्हणून गाण्यात थोडा भाग झंकारून कधीकधी पट्टीचे व्हायोलीन वादक टाळी मिळवतात. एकाच वेळी उजव्या हाताने गज वापरून डाव्या हाताने झंकार करूनही एखादा तयारीचा व्हायोलीनवादक स्वतःला तालाची किंवा सुराची साथ देऊ शकतो. हा प्रकार मला जमत नाही. ज्याला जमतो, त्याचे पाय बाकीचे व्हायोलीनवादक धरतात. असो, पण बहुतेक वेळा गज वापरतातच.

"डग्गा पिशवीत ठेवून फक्त तबलाच वाजवत बसला", असे उदाहरण कदाचीत जास्त समांतर ठरले असते. पण आधी दिलेले उदाहरण मला वैयक्तिकरीत्या अनुभवाचे आहे.

खोट्या खोट्या पियानोवादनातून आपल्याला त्याने वाजवलेले 'एहेसान तेरा होगा' हे गाणे गोड वगैरे कसे वाटले?/वाटू शकले?

तात्या, तुमच्यासारख्या जाणकारापुढे मुद्द्यास मुद्दा ठेवून बोलण्यास माझा काय अधिकार आहे. पण मित्रांमध्ये कोणी "फेकिंग द ट्यून" असे गोड वाजवले, तर सर्व त्याची पाठच थोपटतात. म्हणून काही तो मनुष्य रेकॉर्डिंग करायला जात नाही. मला घरची लोकं वाद्य बरं वाजवतो, आणखी एक गाणे वाजव रे, म्हणातात, म्हणून मी काही उद्या तबकड्या बनवायला देणार नाही. यात असे नाही की घरचे लोक खोटी स्तुती करतात. "बर्‍यापैकी गोड वाजवतोस" आणि "तिकीट घेऊन तुझ्या कार्यक्रमाला येऊ" याच्यामध्ये कुवतीचा जमीनआस्मानाचा फरक आहे.

तरी गोड वाटले हे खरेच. तुमच्याशी संवाद केल्यामुळे, त्या गाण्याच्या चालीचा आणि शब्दांचा पुन्हा अनुभव आला. त्याने अंगावरून मोरपीस फिरले हे तर खरेच. पुढच्या वेळी हातात चषक आणि आणि गप्पांची चहक चालू असताना लावीन या तबकड्या पार्श्वसंगीतासाठी. माझ्या वडलांनी दिलेल्या भेटवस्तूचे चीज होईल, असा पुत्रधर्मही साधेल.

काही गाणी मला 'थोडीशी' आवडतात, काही 'तशी' आवडतात, काही 'खूप' आवडतात, आणि काही 'अप्रतिम' आवडतात. मला स्वतःला गुणगुणता येत नाही असे असले तरी, एक रसिक म्हणून आवडीची अशी उतरंड भिमण्णांनी लावू दिली असती असे वाटते. अहो, जलशात अंग चोरून बसणारा माणूस मी, मी थोडाच त्यांना विचारायला जाणार आहे. पण खुद्द सवाई गंधर्वांचे न गाणारे रसिक त्यांचे गाणे ऐकताना असा तरतमभाव कधीच मांडत नसतील का? "आजची मैफिल कालच्या इतकी रंगली नाही", अशी चर्चा करत नसतील का? यात मी एकटाच नाही असे मला लोकांशी बोलून वाटते.

थोरामोठ्यांची उदाहरणे द्यायची, तर शंकरासारखे कुणालाच गाता येत नाही, पण विष्णूसारखा रसिक समोर असल्याशिवाय एकदा शंकर गायला तयार नव्हता अशी पुराणातली कथा आपण ऐकतो. (स्वतः न गाता विष्णूला नारद/गंधर्वांचे बर्‍यापैकी गाणे, आणि शंकराचे उच्चकोटीचे गाणे यात फरक कळत असावा. कारण) कधी नव्हे तो विष्णू पाघळून पाणी झाला - हीच गंगा. कलाकृतीचा सांगोपांग जाणून आस्वाद घेण्यासाठी खुद्द त्या तोडीचा कलाकार असण्याची गरज नाही, असे त्या पुराण लिहिणार्‍याचे मत असेल, नाही का?

ज्योती कलश छलके..

धन्याशेठ, माझा हा शेवटचा प्रतिसाद. मी हा लेख लिहिल्यामुळे येथे प्रतिसाद देतो आहे. माझा दुसरा आयडी येथील प्रशासनाने 'प्रशासकीय अनुमती' खाली ठेवला आहे. जोपर्यंत ही मंडळी माझी प्रशासकीय अनुमती काढत नाहीत तोपर्यंत मी येथे काहीही लिहायचे नाही असे ठरवले असून वाचनमात्र रहायचे ठरवले आहे!

अगदी माझे गुणगुणणे ऐकून कोणीतरी हे लिहिले असावे. :-)

कदाचित माझेही! :)

"डग्गा पिशवीत ठेवून फक्त तबलाच वाजवत बसला", असे उदाहरण कदाचीत जास्त समांतर ठरले असते. पण आधी दिलेले उदाहरण मला वैयक्तिकरीत्या अनुभवाचे आहे.

एकंदरीत व्हायोलीनच्या उदाहरणांवरून धन्याशेठ व्हायोलीन वाजवतो/शिकतो/वाजवायचा/शिकायचा, असे वाटते. एकदा ऐकलं पाहिजे..:)

तात्या, तुमच्यासारख्या जाणकारापुढे मुद्द्यास मुद्दा ठेवून बोलण्यास माझा काय अधिकार आहे.

ऐसी बात नही.. तू बरेच पाश्चिमात्य कलाकारही (खास करून पियानोवादक) ऐकलेले दिसतोस! त्यामुळे तुझे मुद्देदेखील बिनबुडाचे किंवा केवळ विरोधाला विरोध करणारे न वाटता, साधार वाटले. आणि संगीतचं म्हणशील जेवढं तुम्ही अधिक ऐकाल तेवढे अधिक बहुश्रुत होता. हा न संपणारा प्रवास आहे..

तरी गोड वाटले हे खरेच. तुमच्याशी संवाद केल्यामुळे, त्या गाण्याच्या चालीचा आणि शब्दांचा पुन्हा अनुभव आला. त्याने अंगावरून मोरपीस फिरले हे तर खरेच

अरे तेच तर महत्वाचं! घटकाभर का होईना, त्याच्या वादनामुळे तू सुखावलास! बाकी प्रत्येक कलाकार हा आयुष्यभर काहितरी शिकतच असतो, आपापल्या परिने समृद्ध व परिपूर्ण होत असतो. काय सांगावं, तू जे मुद्दे मांडले आहेस ते सिलासला माहीत नसतील असं थोडंच आहे? पाश्चिमात्य शाळकरी पोरांपेक्षाही आपण वादनात कमी आहोत याची जाणीव त्याला नसेल?

पुढच्या वेळी हातात चषक आणि आणि गप्पांची चहक चालू असताना लावीन या तबकड्या पार्श्वसंगीतासाठी.

ये हुई ना बात! अजून काय पाहिजे? चषकामध्ये ग्लेन फिडिच असल्यास मीही येईन! :) त्यातून अगदीच जरा तुला सिलासचा कंटाळा आला तर दिदीची जुनी गाणी ऐकू किंवा गुलामअलीने संगीतबद्ध केलेल्या आशाताईच्या गझला ऐकू! अजून काय पहिजे? :)

माझ्या वडलांनी दिलेल्या भेटवस्तूचे चीज होईल, असा पुत्रधर्मही साधेल.

हे वाचून 'पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ' ही अण्णा माडगुळकरांची ओळ उगाचंच आठवून गेली! :)

कलाकृतीचा सांगोपांग जाणून आस्वाद घेण्यासाठी खुद्द त्या तोडीचा कलाकार असण्याची गरज नाही, असे त्या पुराण लिहिणार्‍याचे मत असेल, नाही का?

करेक्ट! माझ्यामते कलाकृतीचा आस्वाद मिळाल्याशी कारण! मग समोरचा कलाकार छोटा/मोठा, कुशल/शिकाऊ कसाही असो.. तू म्हणतोस त्याप्रमाणे पाश्चात्य वादकांच्या तुलनेत सिलासच्या वादनात वैगुण्ये असतीलही, परंतु मी मात्र त्याला जेव्हा ऐकला तेव्हा सुखावून गेलो एवढं मात्र नक्की! :)

अहो हरिप्रसाद चौरसिया, पन्नालाल घोष, ही वास्तविक बासरीवादनातली फार मोठी नांवं! पण मला तर एकदा पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका भिकार्‍याच्या बासरीतून बाबुजींचं ज्योती कलश छलके' हे गाणं ऐकायला मिळालं. (कदाचित अजूनही तो भिकारी तिथे बसत असेल,)

हे गाणं तो इतकं सुरेल आणि सुंदर वाजवत होता की क्या केहेने! मी भान विसरून तिथे ऐकतच उभा राहिलो. त्याचं वादन ऐकताना, ना मला चौरसिया आठवले, ना तो कुणाची नक्कल/चेष्टामस्करी करतोय असं जाणवलं! उद्या कदाचित नेहरू सेंटरसारख्या मोठ्या ऑडिटोरियम मध्ये चौरसिया माझ्यापुढे अगदी यथास्थित दीड दोन तास स्वरांचा महाल उभा करतील, तरीही त्या भिकार्‍याने दोन तीन मिनटांकरता ऐकवलेलं ज्योती कलश छलके मात्र आयुष्यभर लक्षात राहील! त्याचं वादन ऐकत असताना मनात विचार आला, 'साला पैसे फेकून आपण या कलाकाराला काय भीक घालणार? काय लायकी आहे आपली?'

गाणं संपल्यावर मी तिथून चालता झालो. त्याला भीक न देताच! पण भीक तरी कसं म्हणू?

त्याचं ते 'मानधन' माझ्यावर आजतागायत उधार आहे!

--तात्या अभ्यंकर.

मानधन!

त्याचं ते 'मानधन' माझ्यावर आजतागायत उधार आहे!

वा तात्या क्या बात कही!
आपले आपल्या आयुष्यात काय असतं हो खरंच? आपण सामान्य माणसं असे कुणाच्या तरी एखाद्या सुरावटीवर जगत असतो तेही त्यांचं खरं मानधन न देताच!

खरं सांगायचं तर तुमचं हे प्रामाणीकपणे भावनाशील असणंच भावून जातं बॉ!

तुम्ही काय केले, प्रशासनाने काय केले यात या वेळी मी पडत नाहीये. (मागच्यावेळी होतो!) पण तुमचे लिखाण चिमटे काढणारे, दिलखुलास दाद देणारे प्रतिसाद वाचायला मिळणार नाहीत याची मात्र खंत वाटते आहे.

आपला मित्र
गुंडोपंत

म्हणजे

ज्या मंडळींना धड दोन ओळीही गुणगुणता येत नाहीत ती मंडळी शेवटी संगीत समिक्षक होतात! :)

उदाहरण द्यावे. म्हणजे लोकांना कळेल कि असे असलेले समिक्षक कोण आहेत? आणि त्यांनी कोणत्या कलाकरांवर अशी समिक्षा केली आहे. त्याला त्या कलाकारांनी काय उत्तरे दिली आहेत. नाहितर उगाच जाहिर वक्तव्य करू नये वा किस्से सांगून लोकांची फसवणूक करू नये. तसेच हे लिहिताना गुणगुणण्याचा आणि समिक्षक होण्याचा काय संबंध आहे हे सुद्धा सांगा.





मराठीत लिहा. वापरा.

आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या!

उदाहरण द्यावे. म्हणजे लोकांना कळेल कि असे असलेले समिक्षक कोण आहेत? तसेच हे लिहिताना गुणगुणण्याचा आणि समिक्षक होण्याचा काय संबंध आहे हे सुद्धा सांगा.

त्या आधी आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे आपण द्यावी हे अधिक संयुक्तिक वाटते! त्यानंतर आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी अवश्य देऊ! अगदी नावा-पत्त्यानिशी उदाहरणे देऊ आणि त्यांनी ज्या कलाकारांवर अशी वक्तव्ये केली आहेत, त्या किशोरीताईंचेही वक्तव्य सांगू. "तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधिल नाही" असा पवित्रा नक्कीच घेणार नाही!

नाहितर उगाच जाहिर वक्तव्य करू नये वा किस्से सांगून लोकांची फसवणूक करू नये.

तद्वत, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता उगाच आपल्याला समजत नसलेल्या विषयात थोबाड खूपसून आपले अज्ञान जगजाहीर करू नये!

(आपल्या सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे देण्यास सिद्ध असलेला) तात्या.

--
तुणतुणे किंवा एकतारी वाजवण्याकरताही तालासूराची, लयीची काहीएक समज लागते. त्या बाबतीत मठ्ठ आणि बेअक्कल माणसाचे ते काम नव्हे, असे वाटते! :)

तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधिल नाही

तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधिल नाही. हे आम्ही आधिच सांगितले आहे. उगाच लहान मुलांसारखा हट्ट करून आपण आपले मानसिक वय कशाला जाहिर करता? इथे तुम्ही प्रश्न उपस्थित केला तो समिक्षक काय करतात या बद्दल. नसेल जमत तर सोडून द्या. उगाच स्टंट करू नका. आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यास तुम्ही देखील बांधिल नाही हे मागेच सांगितले आहे.

उगाच आपल्याला समजत नसलेल्या विषयात थोबाड खूपसून आपले अज्ञान जगजाहीर करू नये!
आम्हाला काय समजते आणि काय नाही यावर जाहिर वक्तव्य करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? तुम्हाला नक्कि कशातले किती कळते? असा प्रश्न आम्ही जाहिर विचारण्याची चेष्टा करत नाही. (तुम्ही पातळी सोडुन वक्तव्य करता हे जग जाहिर आहेच.)

संगीत ऐकण्या करता कान लागतात (कर्ण बधीरांना सोडून) हे आजवरचे आमचे तसेच जगाचे मत आहे. त्यासाठी संगीताचा (संगीता नावाच्या कोळीणीचा नव्हे.) अभ्यास असावा लागतो हे नवीनच कळले. असे असते तर जग, सगळे सोडून फक्त संगीत ऐकण्यासाठी शिकण्याच्या मागे आधी लागले असते. असो. समिक्षक आणि संगीताचा एवढाच अभ्यास असेल तर एक जाहिर आव्हान देतो. संगीताच्या अभ्यासाने समिक्षक झालेल्या एखाद्या समिक्षकाला पोहंकराच्या अल्बम मधले लट उलझी आणि आपण स्वतः त्याची जाहिर केलेली नक्कल/विटंबना (मागे दुवा तुम्ही स्वतःच दिला होतात.) ऐकायला द्या. (पहायला नव्हे.) त्यांची समिक्षा आम्ही मान्य करू. वाटल्यास तुम्ही म्हणता तशा एखाद्या समिक्षकाची सुद्धा मान्य करू.





मराठीत लिहा. वापरा.

अरे हे काय चालले आहे?

अरे हे काय चालले आहे?

दोघेही शांत व्हा पाहू!
उगाच छोट्या छोट्या गोष्टींमधुन इतके मोठे इगोचे डोंगर का उभे करता?

झालं तेव्हढे चिकार झाले.

काही प्रश्न सोडून दिल्यानेच सुटतात...
तसे हा विषय दोघे ही सोडून द्या बरं आता...

गुंडोपंत

हेच म्हणतो

तुम्ही दोघे श्रेष्ठ आहात पण वरचढ हा प्रकार टाळा.

लगे हाथ..

(तुम्ही पातळी सोडुन वक्तव्य करता हे जग जाहिर आहेच.)

काय सांगता? :)

त्यांची समिक्षा आम्ही मान्य करू.

अवश्य! आम्हालाही हा मुद्दा मान्य आहे.

वाटल्यास तुम्ही म्हणता तशा एखाद्या समिक्षकाची सुद्धा मान्य करू.

नको, त्यापेक्षा आपणच एखादा संगीताचा अभ्यास केलेला समिक्षक सुचवा. कारण संगीताचा अभ्यास केलेला एखादा समिक्षक माझ्या माहितीत नाही! पण आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की त्या आधी भास्करबुवांच्या 'हारवा मोरा..' या बंदिशीची सही सही नक्कल करत नारायणरावांनी गायलेल्या 'नाथ हा माझा' बद्दल त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर सदर 'नाथ हा माझा' हे गाणे म्हणजे नक्कल/चेष्टामस्करी/किंवा बुवांचा अपमान आहे किंवा कसे हे त्या समिक्षकाने ठरवू दे, आणि त्यानंतर अगदी अवश्य आमाची आणि पोहनकरसाहेबांची क्लीप त्याला ऐकवू! त्यावर त्याचा निर्णय आम्हालाही शिरोधार्य असेल!

लगे हाथ, मेघदूताच्या चाली कश्या वाटतात हेही त्याला विचारून घेऊ!

तात्या.

कुठे गेले सगळे संपादक?

कुठे गेले सगळे संपादक?
वरची चर्चा काढुन टाकणे शक्य नाहीये का?

आपला
गुंडोपंत

बघा

वर्गात मास्तर नाही बघून कसा फायदा घेतात काही विद्यार्थी!!

सही!

वर्गात मास्तर नाही बघून कसा फायदा घेतात काही विद्यार्थी!!

आता कळलं शिक्षा कशी होते ती! :)))
ह. घ्या!!
ह. घ्या!!
ह. घ्या!!
ह. घ्या!!
ह. घ्या!!
ह. घ्या!!

आपला
गुंडोपंत

खरडवही/व्यक्तिगत निरोप

या सुविधांचा वापर शंकानिरसनासाठी व व्यक्तिगत चर्चेसाठी करता येईल.

हॉटेलातले जेवण

हे मात्र पटले बर.. आम्ही ब्रायन सिलासला फक्त हॉटेलात ऐकले आहे. ते संगीत फक्त जेवतानाच चांगले वाटते. ते ही हॉटेलात. आता अनेकदा केन्नी जी किंवा यांन्नी असतो. ते घरी सुद्धा चांगले वाटते ऐकायला. केन्नी जी किंवा यांन्नी यांच्या धुन स्वतःच्या असल्याने सुद्धा चांगल्या वाटत असाव्यात कदाचित.
ब्रायन सिलासचे हे वादन म्हणजे रिमिक्सचा भक्कम पाया आहे असे म्हणता येइल.





मराठीत लिहा. वापरा.

असहमत..

ब्रायन सिलासचे हे वादन म्हणजे रिमिक्सचा भक्कम पाया आहे असे म्हणता येइल.

या विधानाशी असहमत आहे. पियानोसारख्या उत्कट वाद्यातून जुन्या गाण्यांचा अविष्कार करून त्या स्मृतींना उजाळा देण्याचे कामच सिलासने केले आहे असे मला वाटते.

सिलासच्या वादनात आणि रिमिक्स गाण्यात खूपच फरक आहे असे वाटते. एकतर जे ओरिजनल आहे ते गाणं आहे, आणि सिलासने जे केलं आहे ते वादन आहे! शिवाय रिमिक्स गाण्यात पुष्कळ वेळा मूळ गाण्याचा ठेका बदलला जातो, ऍरेंजमेन्ट बदलली जाते. इथे सिलासने मूळ गाण्याची एरेंजमेन्ट, किंवा ठेका यापैकी काहीही बदललं नसतांना, मूळ गाण्याचा साचा कुठेही न बिघडवता वादन केले असताना ते वादन हा रिमिक्सचा भक्कम पाया कसा काय असू शकतो असा भाबडा प्रश्न मला पडला आहे! असो, संगीत या विषयातील माझं ज्ञान फारच तोकडं असल्यामुळे मी या विषयावर अधिक काही बोलू शकत नाही!

आमच्या गोविंदरावांनी हार्मिनोयमवर नारायणराव बालगंधर्वांची, रामभाऊ मराठ्यांची अनेक पदं अतिशय सुरेख वाजवली आहेत,

ब्रायन सिलासचे हे वादन म्हणजे रिमिक्सचा भक्कम पाया आहे असे म्हणता येइल.

याच चालीवर उद्या गोविंदरावांचे वादन म्हणजे रिमिक्सचा भक्कम पाया आहे असेही कुणी म्हटल्यास ते फारसे वावगे ठरणार नाही! :)

धन्यवाद,

तात्या.

संगीत

येथे आम्हाला हे अधोरेखित करायचे आहे कि मुळ संगीतकाराने बनवलेली धुन तंतोतंत न वाजवता. थोडे बदल करत वाजवली जाते. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर मुळ गाणे/धुन सोडुन , मुळ गीतकाराने बनवलेल्या गाण्याचे काहिहि करणे, मग वादन असु देत वा काहीही, ती नक्कलच आहे. आता वा काय छान नक्कल आहे? असे म्हणणे हा आम्हाला तरी मुळ कलाकाराचा अपमान/चेष्टा वाटते.





मराठीत लिहा. वापरा.

याच चालीवर,

दुसर्‍या शब्दात सांगायचे तर मुळ गाणे/धुन सोडुन ,

सिलासने कुठल्या गाण्यात मूळ गाणे/धुन सोडली आहे ते कळेल का?

मुळ गीतकाराने बनवलेल्या गाण्याचे काहिहि करणे, मग वादन असु देत वा काहीही, ती नक्कलच आहे. आता वा काय छान नक्कल आहे? असे म्हणणे हा आम्हाला तरी मुळ कलाकाराचा अपमान/चेष्टा वाटते.

सिलासने केलेले वादन ही कुणाची चेष्टामस्करी (?) आहे असे आम्हाला तरी वाटत नाही..

आता,

आता,

वा काय छान नक्कल आहे? असे म्हणणे हा आम्हाला तरी मुळ कलाकाराचा अपमान/चेष्टा वाटते.

याच चालीवर काही प्रश्न -

१) भास्करबुवांनी 'मम आत्मा गमला' किंवा 'स्वकुल तारक सुता' ही पदं बांधताना त्यात अनुक्रमे कोमल निषाद आणि शुद्ध गंधार हे स्वर ठेवले नव्हते. नारायणराव बालगंधर्वांनी ही पदं गाताना हे स्वर अतिशय लिलया गायले. आपण म्हणता त्यानुसार भास्करबुवांच्या मूळ धुनेव्यतिरिक्त त्यात बदल करून ते गायल्याने बालगंधर्वांनी बुवांची चेष्टामस्करीच केली आहे! बरोबर?

२) मगाशी आम्ही गोविंदरावांच्या नाट्यपदं वादनाचे उदाहरण दिले. त्यातही पुष्कळदा गोविंदरावांनी स्वत:च्या जागा घेतल्या आहेत. आपल्या म्हणण्याप्रमाणे गोविंदरावांनी भास्करबुवांचा, नारायणरावंचा, वझेबुवांचा, रामभाऊंचा जबरदस्त अपमान/चेष्टामस्करी केली आहे असेच म्हणायला हवे! करेक्ट?

३) 'रंजिश ही सही' ही गझल अनेक मंडळी अतिशय निरनिराळ्या जागा घेत अगदी छान गातात. ही गझल एका चित्रपटातील आहे. प्रत्येक व्यक्ति त्या बरहुकुमच ती गझल गाते असे नाही. याचा अर्थ गुलामअली, जगजितसिंग, पं अजय चक्रवर्ती ही सग़ळी मंडळी ही गझल गाताना मूळ संगीतकाराचा अन् गीतकाराचा अपमान/चेष्टामस्करी करतात असे आपल्याला म्हणावयाचे आहे काय?

४) कुमारांनी एकदा भूपात अत्यंत हुकमी असा शुद्ध मध्यम ठेवला होता. हा स्वर भूपात वर्ज्य आहे. याचा अर्थ कुमारांनी भूपाच्या शास्त्रकाराचा भयंकर अपमान, चेष्टामस्करी वगैरे केली आहे असे आपल्याला म्हणावयाचे आहे काय?

५) किराण्या घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे या मारुबिहाग गातांना शुद्ध मध्यम हा स्वर लावत नाहीत. इतर सर्व मंडळी ह्या स्वराचा प्रयोग करूनच मारुबिहाग गातात. याचा अर्थ मारुबिहागच्या शास्त्रकाराचा प्रभाताईंनी विना शुद्धमध्यमाचा मारुबिहाग गाऊन जबरदस्त अपमान/चेष्टामस्करीच केली आहे असे आपल्याला म्हणायचे आहे काय?

तात्या.

मत

आम्ही आमचे मत मांडले आहे. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. उगाच आपलं चार गायकांची आणि घराण्यांची नावे लिहिली म्हणजे नक्कल हि मुळ प्रत होत नाही.

अवांतरः ब्रायन सिलास विषयाचे तुणतुणे वाजवण्यात आम्हाला रस नाही. भले तो काहीही आणि कसे ही वाजवो.... तुमचे मत आम्ही मान्य करायला वा आमचे तुम्ही, कोणीही कोणास बांधील नाही. कृपया वाद घालू नये. तुम्ही लेख लिहायचे काम केले आहे आणि आम्ही मत प्रदर्शनाचे. हा एक मंच आहे आणि येथे प्रत्येकाला मत प्रदर्शनाच हक्क आहे. निदान अजून तरी. त्यामुळे उगाच वादासाठी वाद घालू नये.





मराठीत लिहा. वापरा.

वाद?

उगाच आपलं चार गायकांची आणि घराण्यांची नावे लिहिली म्हणजे नक्कल हि मुळ प्रत होत नाही.

तसं आम्हीही म्हटलेलं नाही! नक्कल ही चेष्टामस्करी/अपमान वगैरे आहे असे आपण लिहिले होते त्या संदर्भात आम्ही काही प्रश्न विचारले होते इतकंच!

तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही.

यातच आम्हाला आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली! अनेक धन्यवाद.. :)

ब्रायन सिलास विषयाचे तुणतुणे वाजवण्यात आम्हाला रस नाही.

त्याचं कुणी तुणतुणं वाजवावं असा आग्रह आम्हीही कुणाला केलेला नाही!

भले तो काहीही आणि कसे ही वाजवो....

हो ते झालंच! त्याने कसं व काय वाजवलं आहे हे जो तो ठरवेलच!

तुमचे मत आम्ही मान्य करायला वा आमचे तुम्ही, कोणीही कोणास बांधील नाही.

एकमेकांचे विचार मांडण्यास व त्यातून काही चर्चा घडवून आणण्यास कुणी कुणाचे बांधिल असण्याची काहीच गरज नाही! सबब इथे बांधिलकीचा प्रश्न आलाच कुठे हे कळत नाही! असो..

कृपया वाद घालू नये.

आम्ही फक्त आमची मते आपल्या प्रतिसादावर विस्तृतपणे मांडली आहेत. आम्ही लेख लिहिला आहे, त्यावर तुम्ही तुमचे मतप्रदर्शन केले आहे. त्यावर पुन्हा आमचे काही मत असू शकतेच की! तेवढेच आम्ही केले आहे, याला आम्ही 'चर्चा' असे म्हणतो. या चर्चेत अद्यापपर्यंत तरी काही वाद घातला गेला आहे असे आम्हाला वाटत नाही. किंबहुना, प्रथमपासून आपला सूरच किंचित वाद घालण्याकडे वाटतो आहे! (अर्थात हे आमचे मत. तसे नसल्यास उत्तमच आहे!)

त्यामुळे उगाच वादासाठी वाद घालू नये.

हेच आमचे आपल्यालाही सांगणे आहे!

तुम्ही लेख लिहायचे काम केले आहे आणि आम्ही मत प्रदर्शनाचे.

त्याबद्दल आभारी आहे!

तात्या.

ऐकतो!

अजुक ऐकलो नाय भौ!
ऐकून सांगतो बरं!

आपला
गुंडोपंत

मस्त !

ब्रियन सिलास..केवळ अप्रतिम!

खरं सांगतो आम्ही कधी हे नाव ऐकले नाही पण आपण दिलेल्या दुव्यावर गेलो आणि आम्ही तिकडेचच झालो !
ए मालिक तेरे बंदे हम इथून सुरुवात केली आणि आता बाकी ऐकत ऐकत हा प्रतिसाद लिहितो आहे, एकदम झक्कास !

एखाद्या निवांत विकेंडच्या संध्याकाळी आपल्या आवडत्या स्त्रीसोबत विदेशी मद्याचे दोन घुटके घेत आणि सिलास साहेबांच्या पियानोवादनाचा आस्वाद घेत, तिच्याशी सुखदु:खाच्या दोन गोष्टी शेअर करण्याचा आनंद काही वेगळाच! साला आणखी काय पाहिजे लाईफमंदी?! :)
हे तर सहीच !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रिमिक्स

वरील चर्चा वाचून रिमिक्स हे काहीतरी घाणेरडा किंवा वाईट प्रकार आहे असा समज होऊ नये म्हणून सांगतो.
ए. आर. रहमान, झाकीर हुसेन यांचा शक्ती ग्रुप,शंकर महादेवन यांनी अतिशय सुंदर रिमिक्स गीते सादर केली आहेत. दुवे शोधून देण्याचा प्रयत्न करतो.

अवांतरः ऑम्लेट चवीला चांगले झाले आहे की नाही हे कळण्यासाठी अंडी घालण्याची गरज असते का?

हा हा हा!

ऑम्लेट चवीला चांगले झाले आहे की नाही हे कळण्यासाठी अंडी घालण्याची गरज असते का?

हा हा हा!
कै च्या कैचे बर्का तू कर्णा!!
लै भारी उदाहरण दिलेस्... अजूनपण हसतोय!

अंडोपंत

हा हा हा..

अवांतरः ऑम्लेट चवीला चांगले झाले आहे की नाही हे कळण्यासाठी अंडी घालण्याची गरज असते का?

हा हा हा, ते अंडी घालणार्‍यांना विचारा! :)

रिमिक्स

रिमिक्स हे काहीतरी घाणेरडा किंवा वाईट प्रकार आहे
असा समज पसरवला जातो हे मात्र खरे आहे. मुद्दा व्यवस्थित वाचल्यास लक्षात येइल कि रिमिक्स हे काहीतरी घाणेरडा किंवा वाईट प्रकार आहे असे कुठे ही म्हणलेले नाही. लता मंगेशकर नेहमी रिमिक्सला नावे ठेवत आल्या आहेत तर आशाजींनी स्वतःच स्वतःची रिमिक्स गायली आहेत. अर्थात रिमिक्स हा एक चांगला चर्चेचा विषय आहे. "रिमिक्स - काय चांगले काय वाईट?"

अवांतरः ऑम्लेट चवीला चांगले झाले आहे की नाही हे कळण्यासाठी अंडी घालण्याची गरज असत असे मत होण्यास या लेखावरचे प्रतिसाद कारणीभुत आहेत असे वाटून जाते.





मराठीत लिहा. वापरा.

आशावादी

लता मंगेशकर यांचे गायन अतिश्रेष्ठ असले तरी मी आशावादीच आहे. लता मंगेशकरांनी इतक्या फालतू गोष्टींवर प्रतिक्रिया व्यक्त करणे खरे तर नको होते. तीच गोष्ट नौशाद साहेबांची. अगदी बाळासाहेब ठाकर्‍यांची मदत रिमिक्स बंद करण्यासाठी घेण्यापर्यंत त्यांची तयारी होती.

असो. ताल चित्रपटातले "ताल से ताल मिला" हे मूळ गाणे व रहमानने "वेस्टर्न थीम" मध्ये बसवलेले त्याचे रिमिक्स हे दोन्हीही मला आवडतात. रिमिक्स ला वाईट स्वरुप येण्याचे कारण बहुधा कवायतपूर्ण घाणेरडे व्हिडिओ असावेत.

शक्ती

रिमेंबर शक्तीचे व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध आहेत. हा पहा एक.

">

अवांतर : याला फ्यूजन म्युझिक म्हणतात असे आठवते. चूभूद्याघ्या.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वा वा!

फार छान वाटलं ऐकायला.. :)

राजेंद्रा, ही क्लीप इथे दिल्याबद्दल तुझे आभार..

तात्या.

अंडी व ऑम्लेट

संदर्भातले एक सुरेख प्रकटन सन्जोप रावांनी येथे केले आहे. ते पुरेसे बोलके व गाण्याचे शास्त्र न समजताही गाण्याचा आनंद लुटता येतो हे स्पष्ट करणारे आहे. (असे वाटते.)

आडं काहून चालू राह्येले

चानक्य काका,तात्यासाब
तुमी असे भांडल्यावर आम्ही कोणाकडं पाह्यचं बॉ.
तात्याबाच्या लेकनात चानक्यानं डोकं घालू नै अन् चानक्यकडं तात्याबानी पाहू नै

बाबूराव
अध्यक्ष
(उपक्रमगाव)
गाव तंटा समिती

सही!

चानक्य काका,तात्यासाब
तुमी असे भांडल्यावर आम्ही कोणाकडं पाह्यचं बॉ.
तात्याबाच्या लेकनात चानक्यानं डोकं घालू नै अन् चानक्यकडं तात्याबानी पाहू नै

बाबूराव
अध्यक्ष
(उपक्रमगाव)
गाव तंटा समिती

सगळंच सही आहे बाबूराव!
:))

आपला
गुंडोपंत
शेक्रेट्री
(उपक्रमगाव)
गाव तंटा समिती

 
^ वर