स्थावर मालमत्ता - गरज, उपभोग आणि गुंतवणूक
रियल इस्टेट - आजकालच्या नवोदित श्रीमंत मंडळींमध्ये गाजणारा एक चर्चेचा मार्मिक विषय. नुस्ता भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र चाललेला प्रकार आहे. शांघाई काय, फ्लोरिडा काय, पुणं काय किंवा कंकून मेक्सिको काय - सर्वत्र अफाट प्रमाणात बांधकाम आणि खरेदी-विक्रीची करारबाजी चालू आहे. मध्यंतरी ह्याची चाहूल माझ्यापर्यंत पोहोचली आणि मी विचारात पडलो - प्रश्न नुसत्या एका बंगल्याचा नाहितर फ्लॅटचा नव्हता, तर जागतिक पातळीवर सर्व "मार्केट्स" मधल्या एका फंडात गुंतवणूक करायचा होता. अकडे तर भारतासारख्या देशासाठी भितीदायक होते. एरवी मी संपूर्णपणे "भांडवलशाहीवादी" असतो, पण ह्या बाबतीत मी जरा आखडता हात घेतला (म्हणजे मला त्या फंडात पडायचं नव्हतं म्हणा ना).
मला वाटलं की मी गरज नसताना केवळ नफ्यासाठी स्थावर मालमत्तेत पैसे गुंतवणे योग्य नाही कारण त्या जागेची ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी मी उगाचच अडचण तयार करतोय.
स्थावर मालमत्तेच्या खरेदीची बरीच कारणं असू शकतात. सर्वात प्राथमिक कारण म्हणजे गरज. डोक्यावरील छप्पर - त्यात स्वतंत्र की एकत्रित हा तेवढा फरक. ह्यापुढे विचार येतो उपभोगाचा. कुणाची इच्छा असते आपलं वैभव सिद्ध करण्याची तर कुणाला प्रशस्त आवारात आपल्या हौशींचा पाठपुरावा करायचा असतो. अजून एक विचार असतो मासिक मिळकतिचा - कोणी भाडेकरु मिळेल अशी जागा घेऊन ती भाड्यानी देऊन त्यातुन मासिक उत्पन्न वाढवण्यासाठी खरेदी करतं आणि अखेर असतो नुस्ता नफ्याचा विचार - आज घेतलेली जागा काही वर्षांनी विकली तर त्यातून नफा मिळेल ह्या हेतूने केलेली खरेदी.
ह्यात अजून एक पैलू म्हणजे खरेदी करण्याचे कालमान. वाढत्या किंमतींपासून स्वरक्षणासाठी काही वर्ष आधिच करून ठेवलेली खरेदी हे ही अनेकदा बघण्यात येतं.
मला स्वरक्षणासाठी केलेली खरेदी पटते. उपभोगासाठी घेऊन ठेवलेली मालमत्तासुद्धा पटते, पण निव्वळ नफ्यासाठी केलेली खरेदी पटत नाही, कारण त्यानी गरजूंची तफावत विलक्षण वाढते आणि शिवाय पर्यावरणाची अफाट हानी होते. ह्यावर इतर सदस्यांचं काय म्हणणं आहे?
Comments
पर्यावरण
स्थावर मालमत्ता ज्याने घेतली तो या ना त्या स्वरूपाने नफ्याचा विचार करणारच. पण अंतिम वापर स्वतः मालकच (तात्काळ/ भविष्यात) करणार किंवा इतर कोणाला तो काही वर्षांनी जागा विकणार यावर केवळ पर्यावरणाची हानी अवलंबून नसते. पर्यावरणाची हानी ही मुख्यत्वे चुकीच्या शहरीकरणामुळे/ जागेच्या हव्यासामुळे / आराखडयांमुळे होते. जसे भारतातील नद्यानाले बुजवून केलेली बांधकामे. किंवा अमेरिकेत बघतो तसा आज जागेचा हव्यास जगभर वाढला आहे. अमेरिकन स्वप्न मुख्यतः घराभोवती - तेही उपनगरातल्या - फिरते. तेव्हा तरूण जोडप्यांनी उत्साहाच्या भरात ऐन तारुण्यात घेतलेली मोठाली घरे, त्यामुळे आडव्यातिडव्या पसरलेल्या उपनगरांची अधिकच वाढ - पर्यायाने अपरिहार्य झालेल्या खाजगी वाहतूक साधनांच्या/ उर्जेच्या वारेमाप वापराने उभा ठाकलेला पर्यावरणाचा प्रश्न हे सर्व आहेच. त्यामुळे केवळ आज घेतलेली जागा काही वर्षांनी विकली तर त्यातून नफा मिळेल ह्या हेतूने केलेली खरेदी यामुळे पर्यावरणाची हानी होते असे वाटत नाही - लोक आर्थिक गुंतवणूक करताना आपला फायदा बघणारच. त्यांना त्यांच्या एकंदरीत निर्णय प्रक्रियेबद्दल जागरूक करणे एवढाच पर्याय आहे.
नफेखोरीनी हानी जास्त
निव्वळ नफ्यासाठी घेतलेल्या मालमत्तेनी हानी जास्त होते कारण एक व्यक्ती एखादं घर घेण्या ऐवजी दहा दहा घरं घेऊ लागतो. आणि तो घेतो म्हणून इतरही घेतात. पुणे परिसराच्या जवळ होणार्या घडामोडींकडे बघितलं तर लक्षात येईल. इतकी फार्म हाऊस इत्यादींची बांधकामं आहेत आणि प्रत्यक्षात बघितलं तर वर्षानुवर्षं कोणीही तिकडे फिरकत नाही. एरवी तिथे असणार्या टुमदार गावांऐवजी मोठमोठाल्ले रिकामे बंगले मात्र दिसतात. पुण्यातल्या माझ्या एका मित्राच्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी माझ्याशी बोलताना ह्याबद्दल् हळहळ व्यक्त केली - त्यांच्या अनेक पिढ्या पुण्यात, गेल्या त्यांचा पेशा सावकारी, दुकानदारीचा असल्यामुळे परंपरागत ऐश्वर्य, पण "हे असं हवरटपना करुन आमच्या कुटल्या शेटजीनी ते शेतकरी लोकाची सुपीक जमीन घेऊन अशी पडीक नाही टाकली". आता मात्र इतर लोकं घेतात म्हणून त्यांनीही एक-दोन फार्म हाउस घेतलेत.
पटले पण
तुमचे म्हणणे पटले पण आजही दोन घरेही घेऊ शकतील अशी श्रीमंत माणसे लोकसंख्येच्या मानाने कमीच आहेत. फार्म हाउसेस वाढली आहेत हे मान्य आहे, पण जर अशी घरे शहराच्या भविष्यकालीन वाढीचे नीट आराखडे करून बांधली तर निसर्गावर त्याचा परिणाम कमी होईल. पण आपल्याकडे आजच नाही पण गेली कित्येक वर्षे परंपरागत शेतकी जमीन बिगर शेतकी "करून" घेण्याची "पद्धत" आहे - या कशातही आराखडा नसतो. समुद्रालगतची जमीन देखील यातून सुटत नाही. आजही हेच होते आहे फक्त त्याचे परिणाम जास्त प्रमाणावर जाणवतात कारण तरूण आणि नवश्रीमंतांचे वाढलेले प्रमाण. सर्वांना घरे हवी असतात पण ती घरे कोणत्या जमिनीवर बांधली आहेत याच्याशी किंबहुना मातीशीच काही देणे घेणे नसते. अगदी पहिले आणि एकुलते एक घर घेतानाही असा विचार होताना दिसत नाही. फक्त शहराच्या किती जवळ आहे आणि काय सुखसोयी उपलब्ध आहेत यावर घराची किंमत/उपयुक्तता ठरते.
मूलतः घरांमुळे निर्माण होणारा पर्यावरणाचा प्रश्न हा त्याकडे मालक/ग्राहक यांनी पूर्ण दुर्लक्ष केल्याने उत्पन्न होतो एवढेच मला म्हणायचे होते - बाकी तुम्ही म्हणता तशी केवळ लाभार्थी घरे घेऊन ठेवल्यानेही दुष्परिणाम होतातच आहेत. प्रत्येकाने घर घेताना या गोष्टीचा विचार केल्यास हाच परिणाम कमी होण्यास मदत होईल. बाकी जास्तीचा कर वगैरे लावल्यानेदेखील सर्किट म्हणतात त्याप्रमाणे या गोष्टीला आळा बसू शकतो.
महत्त्वाचा प्रश्न
तुम्ही केलेले विश्लेषण पटण्यासारखे आहे. गुंतवणूक म्हणून स्थावर मालमत्ता हा पर्याय आजकल लोकप्रिय झालेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे मागणीत आणि पर्यायाने किंमतीत झालेली प्रचंड वाढ. बर्याच बांधकाम व्यावसायिकांनीही वाढलेल्या मागणीचे निमित्त करून भाव फुगवले आहेत. आता रिझर्व बँकेने कर्जाचे दर वाढवल्याने संभाव्य ग्राहकांतील आर्थिकदृष्ट्या सर्वात खालच्या थरातील ग्राहक आपला निर्णय लांबणीवर टाकतील. (जे प्रामुख्याने एकच घर, स्वतःसाठी घेऊ इच्छितात)
या क्षेत्रातील नफेखोरीला रोखणे आवश्यक पण अवघड आहे, शिवाय ही नफेखोरी थांबवण्यासाठी राजकीय/प्रशासकीय इच्छाशक्ती कितपत असेल याविषयी शंकाच आहे.
अवांतर - 'फंडात' न पडणे आवडले :)
धन्यवाद्
;-) धन्यवाद!
अखेर गुंतवणूक केलीच
अखेर मी स्थावर मालमत्तेच्या एका फंडात गुतंवणूक केलीच. पण ह्या फंडाचे स्वरूप थोडे वेगळे आहे : जर स्थावर मालमत्तेच्या एका "इंडेक्स्" ची किंमत घटली तर मला त्याच्या काही पटीनी जास्त पैसे मिळतील. म्हणजे किंमती जर ५ टक्क्यांनी घसरल्या तर मला २० टक्के फायदा होईल असा हा फंड. असे खूप लोकांनी केले तर माझ्यामते बांधकाम व्यवसाय कमी आकर्शक वाटू लागेल आणि गरजूंना सहज घरं मिळू शकतील. दुर्दैव एवढच की हा फंड फक्त अमेरिकेपुरता मर्यादित आहे.
कमर्शियल पेपर?
नाही, हा हेज फंड नाही - मी हे जे विकत घेतलं आहे त्याला "कमर्शियल् पेपर" असं म्हणतात (असं मला वाटतं). त्याला एक ठरलेला कालावधी असतो (१ वर्ष इ.) हेज फंड हे जास्त उलाढाल करत असतात व त्यात असा ठराविक कालावधी नसतो. हेज फंड कधीकधी असे कमर्शियल पेपर् घेतात असं मी ऐकून आहे. ह्या तांत्रिक बाबींत मी नेहमी गोंधळतो, तेंव्हा स्वतः गुंतवणूक करण्या आधी स्वतंत्र अभ्यास करावा.
कॉन्ट्रॅरियन
किंमतींच्या विरुद्ध दिशेला जाणार्या फंडाला कॉन्ट्रॅरियन म्हणत असावेत. हेज फंड्स हे प्रामुख्याने अनुभवी व तोटा सोसण्याची जास्त क्षमता असणार्या गुंतवणुकदारांसाठी असतात असे ऐकिवात आहे.
गैर काय? / गाजराची पुंगी
खिरेसाहेब,
एक उदाहरण म्हणून -
(१) आज मी माझ्या भविष्य निर्वाह निधीतच (आणि पी. पी. एफ. / राष्ट्रीय बचत योजना इ. मधे) गुंतवणूक केली, तर मला ८ टक्क्यांच्या आसपास व्याज मिळतं.
(२) दुसरा पर्याय म्हणजे मी शेअर्स / म्युच्युअल फंडांत गुंतवणं... तोही चांगला पर्याय आहेच.
(३) स्थावर मालमत्ता घेताना, जरी काही वर्षांसाठी भाव उतरले, तरी कालांतराने (२० वर्षांपेक्षा जास्त) त्यावरचा परतावा हा १) पेक्षा नक्कीच खूपच जास्त आणि (२) एवढा असू शकतो.
शिवाय (३) मधे, मी कर्ज घेऊन (योग्य तो, सूट वगळता -जी कायदेशीर आहे - आयकर देतो त्याव्यतिरिक्तही) देशाच्या अर्थकारणाला मदतच करत असतो. मग त्यात गैर काय? शिवाय शेअर बाजारातल्यासारखे चढ-उतार जरी स्थावर मालमत्तेत झाले, तरी स्वतः तिथे जाऊन राहणे हा पर्याय आहेच ना! मग अगदी गाजराची पुंगी म्हणूनही स्थावर मालमत्ता पहिल्या २ पर्यायांपेक्षा नक्कीच चांगली, असं मला वाटतं.
मला स्वरक्षणासाठी केलेली खरेदी पटते. उपभोगासाठी घेऊन ठेवलेली मालमत्तासुद्धा पटते, पण निव्वळ नफ्यासाठी केलेली खरेदी पटत नाही, कारण त्यानी गरजूंची तफावत विलक्षण वाढते आणि शिवाय पर्यावरणाची अफाट हानी होते.
हे तुमचे मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत; पण -
(१) माझ्या भविष्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतात (भविष्य निर्वाह निधी वगळता) दुसरं कुणीच घेत नाही. ह्या एका निधीतून १ मोठी शस्त्रक्रिया करणंही शक्य होईल की नाही, ही मला शंका वाटते. त्यामुळे 'निव्वळ नफा' हा अशा वेळी उपयोगी पडला, तर का नको?
शिवाय 'कायदेशीर नफा कमावणं' यात गैर काय?
(२) मला वाटतं मीही एक गरजूच आहे; पण आपल्या परीनं / क्षमतेप्रमाणे प्रत्येकानं हे तिन्ही पर्याय वापरावेत.
(३) पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी प्रत्येक घराच्या बरोबरीनं झाडं लावली जावीत असा नियम / कायदा व्हावा; पण घरंच बांधू नयेत हे पटत नाही.
- कुमार
गैर काहीच नाही - हा केवळ व्यक्तिगत प्रश्न
गुंतवणूकीचे तितकेच चांगले पर्याय जर उपलब्ध असतील तर तुम्ही स्थावर मालमत्तेत गुंतवणूक कराल का, हा प्रश्न आहे. माझ्या बचतींमध्ये मी इतर अनेक प्रकारची गुंतवणूक करतो, व त्यात मला स्थावर मालमत्तेइतकाच नफा होतो, मग गुंतवणूकीचे ते मार्ग मी जास्त अनुकूल मानतो.
अर्थातच माणसांनी घरात राहूच नये असं मी म्हणत नाहिये, पण त्याच बरोबर माणसांनी आपल्या गरज व हौसेपेक्षा केवळ आर्थिक फायद्यासाठी घरं घेतली तर कृत्रिम मागणी तयार होते व त्यातून पर्यावरणाची हानी अफाट होते असा माझा मुद्दा आहे
खिरे