शिक्षण काय फक्त पोट भरण्यासाठीच?

आता थोड्याच दिवसांत (२६ जूनला) दहावीचे बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतील. निकालाच्या निमित्ताने आजकालचे शिक्षण रोजगार मिळण्याच्या दृष्टीने कसे निरुपयोगी आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी प्रसारमाध्यमांतील रकाने च्या रकाने खर्च होतील. जणू काही शिक्षणाचा एकमेव हेतु माणसाला पोट भरता यावे हाच आहे.

खरे तर शालेय शिक्षणाचा हेतु माणसाला जगाची माहिती करून देणे तसेच त्याला नवीन माहिती मिळवण्यासाठी व नवनिर्मितीसाठी सक्षम बनवणे हाच असायला हवा. त्याची रोजगाराशी सांगड घालणे चूक आहे. शिक्षणाने सक्षम झालेला माणूस स्वतःच्या रोजगाराचा प्रश्न स्वतःच सोडवू शकेल. शिक्षणसंस्था या उत्पादनक्षेत्राच्या गरजेप्रमाणे यंत्रमानव पुरवणारे कारखाने होऊ नयेत. तसे झाले तर नवनिर्मिति थांबेल. माणसाच्या गरजा पोट व त्याच्या आसमंतांतला प्रदेश यांच्यापुरत्याच मर्यादित नसतात. जगण्यासाठी त्याला स्वप्नांचीही गरज असते.

विचार करा. फक्त रोजगाराचा विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण देणे कितपत योग्य आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत !

कोरडे साहेब,
तुमचे अन आमचे विचार मिळते जूळते असतात.फक्त मी असे म्हणेन की,रोजगाराचाच विचार डोळ्यासमोर ठेवून तसे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.! शिक्षण आणि पोट याचा जवळचा संबध आहे.एकदा त्याची व्यवस्था झाली की,मग शिक्षण काय पोट भरण्यासाठी असते काय ? असे म्हणायचे असते.आणि मग पोट रिकामे असले की ---

भरल्या पोटाने अगा जर आम्हीही चंद्र पहातो,
तर,आम्हीही कूणाची याद केली असती !

असे म्हणता येते !

अवांतर ;) प्रतिसाद कोरडा वाटत असेल तर तो माझा दोष समजावा.कारण महाविद्यालयीन प्रवेश समितीत असल्यामुळे.कला,वाणिज्य,शाखाच अधिक रोजगार देऊ शकतात. हे पटवून सांगण्याची जवाबदारी आमची असते ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रश्नांतून प्रश्न

डॉ. दिलीप बिरुटे यांस,
प्रतिसदाबद्दल धन्यवाद.

रोजगार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण द्यायचे म्हंटले तर नवीन पिढीने कोणते शिक्षण घ्यावे ते वडील माणसांना ठरवावे लागेल कारण मुलांना रोजगारांची परिस्थिति माहीत असण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे एकीकडे आपण मुलांचा कल पाहून शिक्षण द्यावे असे म्हणतो तर दुसरीकडे शिक्षणाची दिशा ठरवण्याची जबाबदारी वडील माणसांवरच टाकतो. त्यांनी ठरवलेली शाखा मुलांना आवडली नाही तर ती शिक्षण अर्धवट सोडण्याची व त्यांची काही वर्षे फुकट जाण्याची शक्यता असते. शिवाय शिक्षण पुरे होईपर्यंत रोजगारांची परिस्थिति बदललेली असण्याचीही शक्यता असते.

यावर एक उपाय म्हणजे मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेऊ द्यावे व ते पुरे झाल्यावर रोजगार उपलब्धतेनुसार त्यांनी पुढील प्रशिक्षण घ्यावे.

 
^ वर