अचानक - जीवन विसंगतींनी भरलेले आहे !
हा सिनेमा बऱ्याच वर्षांपूर्वी बघितला असल्याने आता त्याचे सगळे तपशील आठवत नाहीत. तो एखाद्या परदेशी सिनेमावर आधारीत आहे की नाही तेही माहित नाही, पण सिनेमा बघून आपल्या समाजव्यवस्थेतील एक विसंगती नजरेसमोर येते आणि विचारात पाडते.
या सिनेमाचे कथानक एका सैनिकाभोवती फिरते. ही भूमिका विनोद खन्नाने केली आहे आणि माझ्यामते त्याने ती चांगल्या पद्ध्तीने केली आहे. सिनेमामधे काही ठिकाणी फ्लॅशबॅक वापरला आहे. सिनेमाचे कथानक काहीसे असे आहे:
विनोद खन्ना हा सैनिक सुट्टीसाठी आपल्या घरी येतो. अचानक आल्यामुळे त्याला आपल्या बायकोचे आपल्याच मित्राबरोबर संबंध आहेत हे कळते. रागाने बेभान हो ऊन तो आपल्या पत्नीचा आणि मित्राचा खून करतो. आपल्या हातून खून झाल्याची जाणीव होताच तो प्रथम हबकतो, आपली प्रिय बायको आणि मित्र आपल्या हातून मेले हे जाणवून खचून जातो. पण नंतर स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी तो घरातून पळून जातो.
पोलीस त्याचा पाठलाग करतच असतात. तो पूर्ण सिक्वेन्स मूळातून बघण्यासारखा आहे. सैनिक असल्याने आपल्या शत्रूला चकवा कसा द्यावा याची त्याला माहिती असते. तो त्याचा पुरेपूर वापर करतो, जसे इंग्लिश ८ च्या आकड्यात पळाल्यामुळे कुत्रे गोंधळतात आणि वासाचा माग घेत परत परत तिथेच घुटमळतात. पण हे सगळे करूनही शेवटी तो पोलिसांच्या तावडीत सापडतो. गोळी वर्मी बसल्यामुळे बेशुद्ध होतो. पोलीस त्याला अटक करून इस्पितळात नेतात. तिथे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर (ओम शिवपुरी) त्याचे प्राण वाचवतात.
दोन खून केल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता असते पण नियमानुसार अपराधी पूर्ण बरा झाल्याशिवाय त्याच्यावर खटला भरणे किंवा त्याला शिक्षा देणे शक्य नसते. त्यामुळे त्याला पूर्ण बरे होईपर्यंत इस्पितळात रहाणे भाग असते.
अशातच त्याची ओळख त्याच्यावर उपचार करणाऱ्या नर्सशी(फरिदा जलाल) होते. ही नर्स त्याला भाऊ मानून त्याची मनापासून सेवा करते. तिच्या प्रेमाचे गुपित सैनिकाला कळाल्यावर त्याला आपल्या प्रियकराबद्द्ल सगळे काही सांगते. त्याचे मन प्रसन्न रहावे म्हणून निशिगंधाची फुले आणते. सैनिकावर उपचार करणारे डॉक्टरही त्याच्या चांगल्या स्वभावाने त्याच्यावर खूष असतात. दरम्यान सगळे विसरून जातात की तो एक खूनी आहे आणि तो बरा झाल्यावर त्याला पोलीस घेऊन जातील.
डॉक्टर आणि पोलीस इन्स्पेक्टर यांच्यात काही संवाद होत असतात सैनिकाच्या प्रकृतीबद्द्ल. डॉक्टरांना कल्पना असते की आपण जे उपचार करत आहोत ते केवळ त्याला बरे करून पुन्हा मृत्युच्या तोंडी ढकलण्यासाठी. आणि त्यामुळेच ते मनातून खूपच निराश असतात. परंतु कायद्यापुढे काहीच करू न शकल्याने बिचारे आपले कर्तव्य करीत रहातात.
आणि शेवटी तो दिवस येतो. पोलीस (ईफ़्तेकार) सैनिकाला घेऊन जातात. पण जाता-जाता आपल्या समाजव्यवस्थेबद्द्ल प्रश्न निर्माण करूनच. एखादी व्यक्ति दोषी आहे आणि तिला शिक्षा होणे अटळ आहे, अशा परिस्थितीमधे ती बरी होईपर्यंत तिच्यावर उपचार करणे आणि काही दिवस का होईना सामान्य जीवन जगू देणे आणि पुन्हा खटला चालवायला आणि शिक्षा द्यायला त्या व्यक्तिला घेऊन जाणे हे सर्वच खूप विचित्र वाटते.
खूप वर्षांपूर्वी बघितलेला आणि अजूनही आठवणीत राहिलेला असा हा सिनेमा.
Comments
अहो कल्याणीताई
हा चित्रपट इंग्रजी चित्रपटावर आधारीत असण्यापेक्षा प्रसिद्ध नाणावटी आहुजा खटल्यावर आधारीत आहे. चित्रपट मलाही आवडतो.
रेहमान, लीला नायडू आणि कदाचित सुनिल दत्त यांचाही असाच एक चित्रपट आहे 'ये रास्ते है प्यार के' त्याची वेगळी आवृत्ती असावी. दोन्ही चित्रपटात साम्य म्हणाल तर बथ्थड चेहर्याचे नायक. सुनिल दत्त आणि विनोद खन्ना.
---
सेल्युलॉइड समुदायाचे सदस्यत्व घ्या की. ते ही कुलकर्ण्यांचेच आहे असे ऐकले.
- राजीव.
गुलजार
'अचानक' च्या गुणवत्तेचे बहुतेक श्रेय गुलजारला जावे. विनोद खन्नाकडूनच काय पण गुलजारनी जीतेंद्र आणि चक्क शत्रुघ्न सिन्हाकडूनही चांगला म्हणता येईल असा अभिनय करुन घेतला आहे. ('मेरे अपने', 'परिचय','खुशबू' वगैरे) फ्लॅशबॅक हे तर गुलजारचे आवडतेच तंत्र, त्यांनी ते बर्याच ठिकाणी वापरले आहे.
ओम शिवपुरीची भूमिकाही सुंदर. 'मजबूर' मध्ये सज्जननेही असाच रोल, तोही चांगला केला होता.
सेल्युलॉइड समुदायाचे सदस्यत्व घ्या की.
सन्जोप राव
खरोखर
खरोखर एक वेगळा विषय गुलजारजींनी हाताळला होता आणि तो पण् समर्थ पणे. "मेरे अपने" तर खासच होता.
सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"