संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी..
राम राम मंडळी,
दोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..
आमच्या ठाण्याच्याच राहणार्या एक संस्कृत भाषेच्या विदुषी सौ अदिती जमखंडिकर यांनी एका कार्यक्रमाकरता संस्कृत भाषेचं वर्णन करणार्या,
संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी
सकलसंस्कृती मुकुटविलासिनी
ज्ञानविज्ञानविद्याकलाशालिनी
महाकाव्यकथानाटकभूषिणी
नमनं नत शिरसा..
चूभूद्याघ्या - मला संस्कृत नीटसं लिहितादेखील येत नाही! ;)
या ओळी लिहिल्या आणि याला चाल लावण्याची आणि त्या कशा पद्धतीने गायकांकडून गाणे अपेक्षित आहे, ही सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली.
थोडक्यात मुजिक डायरेक्शणच म्हणा ना! ;)
मी या ओळींना भैरवी रागाचा साज चढवला आणि सौ वरदा गोडबोले व डॉ राम देशपांडे या आजच्या तरूण पिढीतल्या अभिजात संगीत गाणार्या आघाडीच्या गायकांनी उत्तम तर्हेने गाऊन या ओळींचं आणि माझ्या चालीचं सोनं केलं.
डॉ राम देशपांडे यांनी पं यशवंतबुवा जोशी, पं बबनराव हळदणकर, पं उल्हास कशाळकर, पं यशवंत महाले यांच्याकडून गाण्याची तालीम घेतली आहे. रामवर एखादा लेख मी लवकरच लिहिणार आहे. सौ वरदा गोडबोले यांच्यावर माझा विस्तृत लेख आपल्याला इथे वाचता येईल. माझ्या अजूनही काही बंदिशी वरदाने गायल्या आहेत त्या मी यथावकाश जालावर चढवीन आणि त्याची माहिती इथे सवडीने देईनच!
मंडळी, राग भैरवीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. माझ्या मते राग भैरवी म्हणजे खुद्द आपली भारतीय संस्कृती! आपले रितीरिवाज, आपले सणउत्सव, १४ विद्या ६४ कला या सगळ्यांना जी एकाच धाग्यात बांधते ती भैरवी! माझ्या तरी भैरवीबद्दल याच भावना आहेत. भैरवीबद्दल विस्तृतपणे एकदा केव्हातरी लिहिणारच आहे.
बराय तर मंडळी, अदितीताईंच्या वरील ओळी आपल्याला या दुव्यावरून उतरवून घेता येतील आणि ते गाणे ऐकता येईल.
ऐकून कसं वाटलं ते अवश्य सांगा हो! ;)
आपला,
(गाण्याखाण्यतला) तात्या.
Comments
वा!
सुंदर चाल आणि तितकेच सुंदर गायन!
तात्या आपलीही कमाल आहे.
सुंदर
आत्ताच ऐकली ही भैरवी. सुंदर.
साथसंगत..
मंडळी क्षमा करा, सदर गाण्याला साथसंगत कुणी केली आहे हे लिहायचंच विसरून गेलो.
या गाण्याला संवादिनीची साथ पं विश्वनाथ कान्हेरे यांनी केली आहे.
कान्हेरेबुवा हे पं गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य. कान्हेरेबुवांची संवादिनीची साथसंगत अगदी ऐकण्यासारखी असते. फारच सुरेख! भारतातल्या अनेक मोठमोठ्या कलाकारांना बुवांनी साथ केली आहे. पं उल्हास कशाळकरांच्या साथीला नेहमी बुवाच असतात.
माझा बुवांशी अगदी चांगला परिचय आहे, हे मी माझं भाग्य समजतो. कधी बुवांच्या घरी गेलो की बुवा स्वतः प्रेमाने पिठलंभात करून वाढतील, आणि अगदी मनसोक्त पेटी ऐकवतील. 'बराय बुवा, निघतो आता' असं मी म्हटलं की एखादी कोकणी शिवी देऊन 'बस रे, काय घाई आहे? एवढा जरा बसंतीकेदार ऐकून जा' असं प्रेमाने म्हणतील! ;)
बुवाही आमच्या कोकणातलेच बरं का! ;)
तबल्याच्या साथीला धनंजय पुराणिक आहेत. आज नाट्यसंगीताच्या किंवा भजनाअभंगांच्या साथीला धनंजय पुराणिकच पाहिजेत असा आग्रह अनेक मोठे कलाकार नेहमी धरतात.
मंडळी, हा धन्या पुराणिक आपला दोस्त बरं का. राहणारा डोंबिवलीचा. धन्याचं घराणं हे मूळचं कीर्तनकारांच्या परंपरेतलंच घराणं. धन्या स्वतः गातोही उत्तम! असो..
तात्या.
माहिती हवी
तात्या, तुम्हाला मागे खुशवंतसिंग म्हटलं होतं. आता पुलं म्हणावं काय असं वाटतंय.
संगीत दिग्दर्शन छान जमलय. वा वा!
आता काही 'माहिती' द्या. :
या गीतातील स्वरतानांचे नोटेशन तुम्ही केलेत काय?
नोटेशन कसे लिहितात?
नोटेशनची चिन्हे आणि त्यांचा अर्थ काय?
(चार रेषांवरून धडपडणार्या मुंग्या अशी आणि इतकीच त्यांची आम्हाला ओळख आहे.)
उत्तर माहितीपूर्ण ठरेल याची खात्री आहे.
नानासाहेब,
तात्या, तुम्हाला मागे खुशवंतसिंग म्हटलं होतं. आता पुलं म्हणावं काय असं वाटतंय.
तुमचं म्हणणं आमच्या गुरुवर्यांना चार रुपायांचं पोष्टाचं तिकिट चिकटवून पत्राने स्वर्गात कळवलं आहे. ते सध्या स्वर्गात इंद्रासमोर 'बटाट्याच्या चाळीचा' प्रयोग करण्यात बिझी आहेत. त्यांच उत्तर आलं की कळवतो आपल्याला! ;)
पत्राचा मजकूर -
आदरणीय गुरुवर्य भाईकाका,
सा न वि वि
कसे आहात? वरती स्वर्गात तुमच्या डोक्यावर रंभा तेल थापत्ये आणि उर्वशी पंख्याने वारा घालत्ये असं ऐकून आहे! ;)
असो, आमचे हे विसूनाना काय म्हणताहेत तेवढं बघा आणि त्याना मोठ्या मनाने क्षमा करा. भावनेच्या भरात ते काय लिहून गेले आहेत हे त्यांचं त्यांनाही कळलेलं नाही! असो..
परवाच तुमचा गजा खोत भेटला होता. अजून 'उगीच का कांता' हे पद त्याला पेटीवर वाजवायला जमलेलं नाही! ;)
असो, गजाखोतासकट आम्हा सर्वांनाच तुमची खूप आठवण येते एवढं मात्र खरं!
बाकी सर्व मजेत,
तुमचाच,
तात्या.
:)
संगीत दिग्दर्शन छान जमलय. वा वा!
धन्यवाद नानासाहेब.
या गीतातील स्वरतानांचे नोटेशन तुम्ही केलेत काय?
नाही, मी नोटेशन केले नाही. मला नोटेशन करता येत नाही. माझ्या हातात अदितीताईंनी गाणं ठेवलं आणि ते वाचता वाचता अद्ध्या त्रितालाच्या मीटर मधली भैरवीतली चाल मला सुचली. मी ती लगेच वॉकमनवर टेप करून ठेवली आणि मागाहून रामला आणि वरदाला ऐकवली.
नोटेशन कसे लिहितात?
नोटेशनची चिन्हे आणि त्यांचा अर्थ काय?
मला माहीत नाही. नोटेशन लिहिण्याच्या 'पलुसकर पद्धती' आणि 'भातखंडे पद्धती' अश्या दोन पद्धती आहेत असे मी ऐकून आहे. संगीतच्या शास्त्राविषयक, व्याकरणाविषयक कोणतीही पुस्तकं मी वाचलेली नाहीत.
असो, प्रतिसादाकरता धन्यवाद नानासाहेब!
तात्या.
पुरेसे आहेत..;)
संगीतच्या शास्त्राविषयक, व्याकरणाविषयक कोणतीही पुस्तकं मी वाचलेली नाहीत.
सुदैवाने,
'शंकर निवास' शिवाजी पार्क, मुंबई.
आणि
'कलाश्री' बंगला, नवी पेठ, पुणे -३०
येथील दोन दिग्गज ग्रंथराजच आम्हाला आयुष्यभराकरता पुरेसे आहेत! ;)
असो..
संघ, सावरकर, आणि कोल्हापूर!
पण शिवाजी पार्कात कोण ? बाबूजी तिथे रहात होते ? श्रीधर तर पार्ल्याला राहतात ना आता ?
हो, बाबुजी त्यांच्या कुटुंबियांसमवेत आधीपासून शिवाजी पार्कातच रहात होते. श्रीधरजींनी मागाहून पार्ल्याला फ्लॅट घेतला.
वयपरत्वे आमच्या ललितामावशी मात्र आता बाबुजींच्या पश्चात बर्याचदा पार्ल्याला मुलाकडेच असतात. मी अनेकदा शिवाजी पार्कातल्या बाबुजींच्या घरी गेलो आहे. पण मी नेहमी ललितामावशींनाच जास्त वेळा भेटलो आहे. बाबुजी घरात असले तरी त्यांच्या वार्याला मी फारसा उभा रहात नसे. नेहमी त्यांना टरकूनच असे! ;)
कधी मूड असेल तर मात्र ते स्वतःहून माझ्याशी बोलायचे! ;)
'अरे मुबई-पुणं ही माझी कर्मभूमी. या शहरांबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहेच. पण माझा खरा जीव आमच्या कोल्हापुरावरच आहे! जगभर हिंडलो, पण आमच्या कोल्हापूरसारखं उत्तम हवापाणी कुठेच नाही!'
असं ते एकदोनदा मला म्हणाले होते.
अखेरपर्यंत बाबुजींचे 'संघ', 'सावरकर', आणि 'कोल्हापूर' हेच अत्यंत श्रद्धेचे विषय होते. 'संघ' हे तर बाबुजींचं पहिलं प्रेमच म्हणायला हवं.
असो..
सर्वार्थाने मोठा माणूस! अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत!
तात्या.
गदिमा ,बाबुजी आणि कोल्हापुर
'वाटेवरल्या सावल्या' या गदिमांच्या आत्मचरित्रात्मक लेखनात सुधीर फडके आणि गदिमा यांच्या उमेदीच्या काळातील कोल्हापुरचे दिवस आहेत. त्यात सुधीर फडक्यांचा 'राम फडके' या नावाने उल्लेख आहे. तेच त्यांचे खरे नाव असावे.
तात्या, कोल्हापुर म्हणजे कलापुरच, म्हाराजा! सारे दिग्गज तिथेच घडले. त्यामुळे त्यांचे पहिले प्रेम कोल्हापुरावर असणार हे निश्चित!
राम फडके../ललितामावशी!
त्यात सुधीर फडक्यांचा 'राम फडके' या नावाने उल्लेख आहे. तेच त्यांचे खरे नाव असावे.
राम फडके हेच त्यांचे मूळ नांव आहे. राम विनायक फडके.
विनायकराव फडके हे त्या काळातले कोल्हपुरातले उत्तम वकील. त्यांची वकिलीही खूप जोरात सुरू होती. मुलगा चांगला गातो, म्हणून त्याकाळी कोल्हापुरात असलेल्या ग्वाल्हेर घराण्याच्या पं वामनराव पाध्येबुवांकडे त्यांनी रामला गाणं शिकण्याकरता ठेवला होता. सारं काही उत्तम सुरू होतं. पण विसूनाना, नशीबाचे फासे नेहमी आपल्याला हवे तसे पडतातच असे नाही.
आमचा कोकणी अंतु बर्वा भाईकाकांना म्हणतो ना,
'अहो, चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली, अन् दारचा हापूस तेव्हापासनं या घटकेपर्यंत मोहरला नाही! शेकड्यानं आंबा घेतलाय एकेकाळी त्या झाडाचा! पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं ते बघा!'
तश्यातलीच थोडीशी गत झाली कोल्हपुरातल्या ह्या फडके कुटुंबियांची! ऐन उमेदीत विनायकरावंची बायको वारली आणि त्यांचं आयुष्यावरचं लक्षच उडालं. उत्तम सुरू असलेली वकिली बसली ती बसलीच!
बाबुजी मात्र पत्नीच्या बाबतीत भाग्यवान ठरले. आमच्या ललितामावशींनी बाबुजींना अगदी त्यांच्या अखेरपर्यंत मोलाची साथ दिली!
बाबुजींचं लव्ह म्यॅरेज होतं बरं का विसूनाना. ललितामावशी या माहेरच्या सारस्वत!
ललिता देऊळकर! उत्तम गाणार्या. ललितामावशींनी त्या काळात गाणी गाऊन वडिलांचं ऐशी हजारांचं कर्ज फेडलं. अत्यंत कर्तृत्ववान बाई! अशोककुमार देविकाराणीच्या अछुतकन्याच्या काळातली!
पण नंतर मात्र बाबुजींशी विवाह झाल्यानंतर ललितामवशींनी गाण्याला राम राम ठोकला आणि पूर्ण वेळ घरातच रमल्या.
असो!
बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खूप काही आहे, विसूनाना! पण बोलत बसलो तर वेळ जाईल.
आमच्या 'ललितामावशी' हा एक स्वतंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे. स्वभावाने अतिशय गोड. मृदुभाषी. हाताने अतिशय उदार! त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते. कुठलंही दडपण येत नाही. मला तर एखाद्या मैत्रिणीशी आपण बोलत आहोत असंच नेहमी वाटत आलेलं आहे.
विसूनाना, सध्या सवड नाही, पण एकदा केव्हातरी ललितामावशींचं व्यक्तिचित्र नक्की रंगवेन. अर्थात, त्या आधी माझ्या या वृद्ध मैत्रिणीची परवानगी मात्र घेतली पाहिजे हो! ;)
पण ती निश्चित मिळेल याचीही खात्री आहे! ;)
आपला,
तात्याबर्वा!
तात्या, प्रसाद वाटत जा...
तात्या, तुमच्याकडे थोरामोठ्या लोकांनी दिलेला प्रसाद आहे.
तो आमच्यासारख्या देवळाबाहेरून दर्शन घेणार्या लोकांना थोडा-थोडा का होईना वाटत चला.
तुम्ही दीर्घलेखन फारच कमी करता असा माझा (लटका) आरोप आहे.
श्रवणीय
भैरवी ऐकली. फारच श्रवणीय आहे.
अभिनंदन! आपले आणि इतर सर्वांचे.
लै झ्याक..
तात्या गानं लै आवडलं बरका!!... तुमी मुजीक कसं दिलत त्ये बी कळाल.. (म्हंजी कळाल काहीच न्हाई पन वाचाया गंमत वाटली!!).. आनि त्या माहितीवाल्या लोकांणी पन उडवल न्हाई बगून बरं वाटलं..
~गुंड्याभावा, उपक्रमाचं वय वाडतय रं बाबा!~
सुंदर.
आत्ताच ऐकली भैरवी. फारच सुंदर
प्रसादाची बर्फी! ;)
सर्कीटराव,
फक्त भैरवीचा मूड ह्या चार ओळींना फिट होत नाही, असे राहून राहून वाटत राहिले.
शक्य आहे. कुठलंही गाणं किंवा कुठलाही राग हा प्रत्येकाला कसा भावेल हे सांगता येत नाही. एखादवेळेला आपल्याला बंदिशीचे शब्द फार आवडतात, पण तो राग तेवढा पटत नाही आणि एखाद वेळेला एखाद्या बंदिशीची सुरावट, नजाकत अतिशय आवडून जाते पण शब्द तेवढे प्रभावी वाटत नाहीत असंही होऊ शकतं. शिवाय या सगळ्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात हा भाग वेगळा!
म्हणूनच गाणं आणि खाणं आणि इतर कुठलीही फाईन आर्ट ही अनुभवायची गोष्ट आहे, आणि प्रत्येकाचं अनुभवविश्व वेगळं!
जगातल्या ९०% भैरव्या ह्या करुण (हुरहुर लावणार्या) वाटतात, अगदी भक्तीरसाने ओथंबलेल्या असल्या तरी.
खरं आहे. करूण म्हणण्यापेक्षा हूरहूर लावणार्या अधिक असतात असं मला वाटतं. आत्तापर्यंत मोठमोठ्या कलाकारांच्या अनेक मैफली ऐकल्या त्यात शेवटी गायल्या गेलेल्या काही भैरव्या तर अक्षरशः बेचैन करून गेल्या! क्या बात है..
तेव्हा मला एक माहिती हवी आहे. भैरवी ह्या रागात पूर्ण बडा खयाल कुणी गायलेला आपण ऐकला आहे का ?
नाही बुवा, मी तरी कधी ऐकला नाही. माझ्यामते प्रत्येक रागाचा एक जीव असतो, एक प्रकृती असते. भैरवीचा पिंड हा बडा ख्यालाचा नाही/नसावा असं मला वाटतं. त्याचप्रमाणे काफी, खमाज, पिलू ही मंडळीदेखील लहानश्या नाजूक जिवाची!
तसे पुरिया, मुलतानी, तोडी, मालकंस, मल्हार, दरबारी नाहीत. ते बलाढ्य राग आहेत. ऐसपैस आहेत!
आमच्या अण्णांसारखा एखादा दिग्गज गवई या रागांनीच संगीताची पूजा बांधतो. अगदी यथासांग! पूजेदरम्यान या रागांचे मोठमोठे मंत्रघोष चालतात.
भैरवी ही अश्या मोठ्या रुद्रांकरता/यागांकरता नव्हेच!
पण शेवटचा फलादेश, आरती आणि प्रसाद मात्र भैरवीचाच हवा! ;)
प्राणप्रतिष्ठा, पत्रीफुलांचे नाना उपचार, पंचामृती पूजा, अजून कुठकुठले मोठाले मंत्र, यातून पूजा बांधली जाते. पण तिची सांगता मात्र हातावर ठेवलेल्या छानश्या प्रसादरूपी बर्फीमुळेच होते.
तो हातावर ठेवलेला प्रसाद म्हणजेच भैरवी! ;)
--तात्या अभ्यंकर.
अप्रतिम!!
तात्या, मानला बुवा तुला. क्या बात है यार ? अदिती ताईंचे शब्द,वरदाचा आणि डॉ. राम देशपांड्यांचा आवाज एवढे असल्यावर चाल कुणाची का असेना? [ चिडलास ?] यार ,चाल खरोखरच सुंदर बांधल्येस. मजा आला. तुला सांगू ? भैरवीत चाल बांधणेच कठीण. ईतक्या पध्दतीने वापरली गेली आहे ;तरीपण त्यातून नवीन काहीतरी काढायचे .कठीणच. पण तू छान जमवलेस.
एक अप्रतीम भैरवी ऐकाला मिळाली . सर्वांचे अभिनंदन !!
सुरेख
सुरेख चाल. गायलेही छानच आहे.
छान
तात्या,
भैरवी ऐकली. फार छान वाटले. आपले आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन. आणि येथे दुवा दुवा देवून आम्हाला सहभागी करुन घेतल्या बद्दल आभार.
बाबूजींबद्दल सुद्धा बरेच वाचायला मिळाले. आपल्या व्यक्तीचित्रांच्या प्रतिक्षेत.
--लिखाळ.
साहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) -(सखाराम गटणे-पुल.)
मस्त! ;)
साहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) -(सखाराम गटणे-पुल.)
लिखाळराव,
आपली सही अतिशय आवडली!
आपला,
तात्या गटणे.
धन्यवाद तात्या
धन्यवाद तात्या.
--लिखाळ.
साहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) - (सखाराम गटणे- पुल)
सुंदर
भैरवी खूप आवडली. तुमचे विशेष करून आणि इतरांचेही अभिनंदन.
चित्रा
आभार..
गाणं आवडलं असं कळवणार्या सर्व रसिक सभासदांचे मनापासून आभार..
त्यातलं जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांचं, आणि जे काही चुकीचं/वाईट असेल ते माझं, असंच मी मानतो. माझे मानस गुरू बाबूजी आणि भीमण्णा यांचा आशीर्वाद राहिला तर अजूनही काही चांगलं काम करायची इच्छा आहे.
असो..
वरदाने माझ्या अजूनही काही बंदिशी गायल्या आहेत त्याही इथे यथावकाश देईन..
आपला,
(आभारी) तात्या.
गाणे ऐकले
... गोड वाटले.
गानसूरांमध्ये रमणार्या आणि त्यातले कळणार्या आपणा सर्व मंडळीचा हेवा वाटतो.
प्रतिसाद
तात्या,
मी तुमच्या ब्लॉगवर प्रतिसाद आत्ताच दिला. त्यानंतर इथले प्रतिसाद वाचले. तेव्हा इथेच उत्तर दिलेत तरी चालेल.
कलोअ,
सुभाष
वा
तात्याबा
तुम्हाला जे काही देवानं दिलेय ते आमच्या पर्यंत असेच पोहोचवत रहा!
वा ऐकुन छान वाटले.
आपला
गुंडोपंत
सहमत.
तात्याबा
तुम्हाला जे काही देवानं दिलेय ते आमच्या पर्यंत असेच पोहोचवत रहा!
सहमत !
एकलव्य, गुंड्याभाऊ, सुभाषराव,
एकलव्य आणि गुंड्याभाऊचे मन:पूर्वक आभार..
सुभाषराव,
मी तुमच्या ब्लॉगवर प्रतिसाद आत्ताच दिला. त्यानंतर इथले प्रतिसाद वाचले. तेव्हा इथेच उत्तर दिलेत तरी चालेल.
माझ्या ब्लॉगवर आपला प्रतिसाद मला कुठे दिसला नाही. आपल्याला कशाचे उत्तर अपेक्षित आहे?
तात्या.