गरम रक्त आणि थंड डोके

पुण्यात संतोष माने याने दहा व्यक्तींची हत्या केली त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना पुण्याच्या पोलिस कमिशनर मीरा बोरवणकर म्हणाल्या की त्याला माथेफिरू म्हणून त्याचा बचाव करू नका. मानसिक विकार हा प्रचलित कायद्यांमध्ये बचाव समजला जातो त्याविषयी माझे विचार मांडून इतरांची माहिती, मते, इ. जाणून घेणे हा या चर्चाप्रस्तावाचा उद्देश आहे.

नियोजनपूर्वक आणि सारासार विचार करून गुन्हा केला असल्यास गुन्हेगाराला अधिक शिक्षा देण्यात येते. उलट, रागाच्या भरात गुन्हा घडल्यास दयेची वागणूक मिळते.

शिक्षेमागे पुढील उद्देश शक्य असतात.

इतरांना धडा बसविणे (समाजावर परिणाम)
(यासाठी कोणालाही गुन्हेगार ठरवून शिक्षा दिली तरी चालते.)
रागाच्या भरात गुन्हा करणार्‍या व्यक्तीने शिक्षेचा पुरेसा विचार केलेला नसतो. चटकन स्मरतील इतक्या ठसठशीत शिक्षांचाच त्यांच्यावर परिणाम होऊ शकेल. त्यामुळे, अविचाराने केलेल्या कृत्यांना अतिप्रचंड शिक्षा द्यावी लागेल, तर नफा तोट्याचे गणित करून गुन्ह्याचा निर्णय घेणार्‍या व्यक्तीला गणित तोट्याचे दाखवेल इतकीच शिक्षा पुरेल असे मला वाटते.
सूडाचे समाधान (पीडितावर परिणाम)
अजाणता इजा पोहोचविणार्‍यापेक्षा दुष्टपणे इजा करणार्‍याविषयी सूडाची भावना अधिक राहील परंतु एवीतेवी शिक्षेचा हा उद्देश वाईटच समजला जातो.
नुकसानभरपाई (पीडितावर परिणाम)
या निकषाने दिलेली शिक्षा पीडेवर आणि तिचे पूर्ण परिमार्जन करण्यास आवश्यक वसुलीवर अवलंबून राहील. 'गुन्हेगाराला दिलेली आर्थिक पीडा' प्रकारची शिक्षा या सदरात नसते.
गुन्हेगाराने जाणूनबुजून लूट केली की अजाणता घडली त्यावर नुकसानभरपाईची रक्कम अवलंबून राहू नये. उलट, विचारपूर्वक नेम धरून केलेल्या गुन्ह्यांपेक्षा अंदाधुंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये अनेकांना अधिक पीडा होईल आणि अधिक नुकसानभरपाई जमवावी लागेल असे मला वाटते.
सुधारणा (गुन्हेगारावर परिणाम)
रागाच्या भरात गुन्हा करणारी व्यक्ती शिक्षेची पुरेशी पर्वा करीत नाही, शिक्षा मोठी असल्यासच तिची पुनरावृत्ती करणे ती व्यक्ती टाळेल, अन्यथा वारंवार गुन्हे करीतच राहील. उलट, समंजस व्यक्तीमध्ये कमी शिक्षेनेही अपराधी भावना निर्माण होईल असे मला वाटते. उदा., 'शहाण्याला शब्दाचा मार'.

अशा प्रकारे, क्षणिक रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्यांना सौम्य शिक्षा देण्याचे कोणतेच कारण मला सापडलेले नाही. मुद्दा असा आहे की विचार न करता घडलेली कृती हे तर जनावराचे लक्षण आहे आणि तशा व्यक्तीला मानवतेची वागणूक देण्याचीही आवश्यकता नाही. गरम रक्ताने, आदिम ईगोने सारेच सस्तन प्राणी वागतात तर स्थितप्रज्ञ डोके हे मानवी सुपरईगोचे लक्षण असते. एखादा बुद्धिमान अपराधी सुटला तर किमान बुद्धिमत्तेच्या जनुकांच्या उत्क्रांतीत तर मदत होईल?

रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्यांना प्रचलित समाजात कमी शिक्षा का आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

शिक्षा कमी असावी

आजच्या लोकसत्तेत बातमी आहे - एका साडेचार वर्षांच्या मुलाने वडिलांनी प्लेस्टेशन आणून दिले नाही म्हणून रागाने गोळ्या घालून वडिलांचा खून केला. सदर मुलाला नेमकी काय शिक्षा दिली तर त्याला आणि त्याच्या वयाच्या इतर मुलांना धडा मिळेल? या मुलाला शिक्षा झाल्यास त्याच्या आईला किंवा त्याच्या आजी-आजोबांना सूडाचे समाधान लाभेल काय? किंवा त्यांची नुकसान भरपाई होईल काय? किंवा या मुलाला सुधारगृहात भरती केल्याने तो उद्या चांगली व्यक्ती बनेल ही जाण त्याला आहे काय?

असो.

रागाच्या भरात जे कृत्य होते त्याला बर्‍याचदा आप्त बळी पडतात असा एक अंदाज मांडते. याच्या पुष्ट्यर्थ नानावटी-आहुजा, प्रमोद-प्रवीण महाजनांपासून जॉन-लॉरेना बॉबिट पर्यंत अनेक उदाहरणे देता येतील. यांतील कोणीच सराईत गुन्हेगार नाही. पैकी काहीजणांकडे रक्त खवळून उठेल अशी कारणे आहेत. कदाचित, राग शांत झाल्यावर त्यांना केलेल्या कृत्याचा पश्चात्तापही होत असेल आणि त्यांना शिक्षा मिळाल्याने कोणाला समाधान लाभेल किंवा नुकसान भरपाई मिळेल असेही काही नसेल. याचबरोबर अशा गुन्हेगारांना बर्‍याचदा जनाधार मिळतो. नानावटी खटल्यात हे झाल्याचे आठवते.

परंतु याचसोबत रिंकू पाटील खटला किंवा प्रेयसीच्या तोंडावर ऍसिड टाकणे वगैरे विकृत प्रकारांनाही रागाच्या भरात केले जाते. येथे मात्र नुकसानभरपाईपेक्षा सूडाचे समाधान किंवा कडक शिक्षेमुळे समाजातील अशा प्रकारांना आळा बसावा असा उद्देश असू शकेल. तरीही,शिक्षा देताना गुन्हेगाराचे वय आणि पार्श्वभूमी यांचा विचार होणे आवश्यक आहे आणि अर्थातच नानावटी खटल्याप्रमाणे कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण होऊ नये हे ही मान्य आहे.

मनोविकृतांची उदाहरणे मात्र वरील कृत्यांपेक्षा वेगळी वाटतात आणि त्यांना सौम्य शिक्षा न देता, समाजापासून दूर ठेवणे योग्य ठरावे. अन्यथा, एखाद्या मनोरुग्णाला कडक शिक्षा केली म्हणून इतरांना नेमके कोणते समाधान लाभेल कळत नाही.

विचार न करता घडलेली कृती हे तर जनावराचे लक्षण आहे आणि तशा व्यक्तीला मानवतेची वागणूक देण्याचीही आवश्यकता नाही.

विचार न करता कृती आपण सर्वचजण कधी ना कधी करत असतो. ती कधी स्वतःच्या अंगावर बेतते किंवा दुसर्‍याच्या परंतु ही कृती करताना त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील ही अनेकदा कल्पनाही नसते. अशा नकळत झालेल्या कृत्यासाठी एखाद्याला मानवतेची वागणूक नाकारावी असे ठोस विधान करणे योग्य वाटत नाही.

रागाच्या भरात कृत्य करणार्‍याला सौम्य शिक्षा देताना बहुधा खालील विचार केला जात असावा -

१. कृत्यामागील पार्श्वभूमी - हे कृत्य करायला काय कारण/ निमित्त असावे हा विचार. उदा. एखाद्या बाईला (किंवा नवर्‍याला) आपल्या जोडीदाराकडून सतत त्रास होत असेल आणि त्या दबलेल्या रागाची परिणिती गुन्ह्यात झाली तर सदर व्यक्ती शिक्षेसोबत दयेस पात्र का नसावी?

२. गुन्हेगाराची पार्श्वभूमी - जर तो सराईत गुन्हेगार नसेल तर त्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला हे जाणून घेणे आणि त्यानुसार निर्णय घेणे आवश्यक वाटत असावे.

वृत्ती

नियोजनपूर्वक आणि सारासार विचार करून गुन्हा केला असल्यास गुन्हेगाराला अधिक शिक्षा देण्यात येते. उलट, रागाच्या भरात गुन्हा घडल्यास दयेची वागणूक मिळते.

महत्वाचे विधान, पण समाजाकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याचे मिळणारे फळ ह्यांची सांगड घालणे गरजेचे आहे. वरिल विधानावरून समाजामधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धिमत्ता ही वृत्तीपेक्षा अधिक महत्वाची असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो, नियोजनपूर्वक आणि सारासार विचार करून गुन्हा केला असल्यास गुन्हेगाराला मिळणारी शिक्षा ही जाणिवपूर्वक केलेल्या विध्वंसाबद्दल असते, अशा व्यक्तीला गुन्हेगारी भूतकाळ असण्याची शक्यता अधिक असते, उलट अजाणतेपणी (रागात) कृत्य केलेल्या व्यक्तिस शिक्षेत सवलत मिळाल्यास तीत गुन्हेगारी वृत्ती वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते.

सुधारणा (गुन्हेगारावर परिणाम)
रागाच्या भरात गुन्हा करणारी व्यक्ती शिक्षेची पुरेशी पर्वा करीत नाही, शिक्षा मोठी असल्यासच तिची पुनरावृत्ती करणे ती व्यक्ती टाळेल, अन्यथा वारंवार गुन्हे करीतच राहील. उलट, समंजस व्यक्तीमध्ये कमी शिक्षेनेही अपराधी भावना निर्माण होईल असे मला वाटते. उदा., 'शहाण्याला शब्दाचा मार'.

हे विधान थोडे विसंगत वाटले, फक्त शिक्षेमुळेच सुधारणा होते हा विचार अपूर्ण आहे, रागाच्या भरात गुन्हा करणार्‍या व्यक्तीला गुन्ह्याबद्दल आधिच टोचणी लागली असू शकते, त्यावर कमी शिक्षा मिळाल्यास समाजात किमान प्रतिष्ठेने वावरणे सुकर होऊ शकेल, जास्त शिक्षा झाल्यास गुन्हेगारी भूतकाळ असलेल्या लोकांशी अधिक संबध येऊन सुधारणा होण्याएवजी अधिक नुकसान होऊ शकेल. तसेच समंजसपणा ही वृत्ती आहे, त्याचा आणि शांतपणे गुन्हे करण्यात अपेक्षित बुद्धिमत्तेचा संबध कसा जोडता येईल?

शिक्षा वृत्तीला होणे अपेक्षित असते, अधिक बुद्धिमत्ता + नकारात्मक वृत्ती जास्त नुकसानकारक असू शकते.

संतोष मानेच्या केसमधे झालेल्या कृत्यास जर परिवहन महामंडळ, सरकार जबाबदार(प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष) असल्यास फक्त मानेला जबर शिक्षा करून सुधारणा होईल ही अपेक्षा गैर वाटते.

चांगली चर्चा

शिक्षेपासून समाजाला काय अपेक्षित आहे, याबाबत चिंतन आवडले. अजुण गुन्हा न-केलेल्या लोकांना जरब, सूड आणि नुकसानभरपाई, हे तीन वेगवेगळे हेतू बहुधा एकाच वेळी साध्य होत नाहीत.

कदाचित फौजदारी गुन्ह्यांच्या कठिण नैतिक प्रश्नात जाण्यापूर्वी दिवाणी किंवा जवळजवळ-दिवाणी गुन्ह्यांकडे बघता येईल.
यू.एस मधील अनेक राज्यांत गुन्हा सिद्ध झाल्यास "रिपॅरेटिव्ह डॅमेज" आणि "प्यूनिटिव्ह डॅमेज" असे दंड वेगवेगळे सुनावले जातात. म्हणजे "नुकसानभरपाई" आणि "सूड+अन्य लोकांना जरब" हे भाग वेगवेगळे केले जातात.

काही हिंसक फौजदारी गुन्ह्यात नुकसानभरपाई करता येत नाही, असे आपण आजकाल ठामपणे मानतो. उदाहरणार्थ काही प्राचीन समाजात खुन्याचे कुटुंब खुन्याला किंवा कुटुंबातील मुला-मुलीला मृताच्या कुटुंबाकडे गुलाम म्हणून पाठवीत. अशा प्रकारे मेलेल्या व्यक्तीच्या नासलेल्या भावी मजुरीची भरपाई होते. परंतु आपण आज असे मानत नाही. खुन्याला मयताच्या कुटुंबाकडे बंदिस्त करण्याऐवजी आपण आजकाल सरकारी बंदीशाळेत ठेवतो काय? मृत व्यक्तीची मजुरी गेली हे सरकारचे नुकसान मानतो काय? ऐतिहासिक दृष्ट्या असे असले तरी खुन्याच्या मजुरीकडून सरकारची नुकसानभरपाई होत नसावी.

वगैरे, वगैरे.

सध्या या विस्कळित विचारांपेक्षा वेगळे काही सुचत नाही.

यावरून आठवले

मागे मी वाचत असलेल्या एका कथेत द. अमेरिकेतील एका जमातीविषयी (बहुधा यानोमामी) अंदाजे अशीच माहिती होती.

उदाहरणार्थ काही प्राचीन समाजात खुन्याचे कुटुंब खुन्याला किंवा कुटुंबातील मुला-मुलीला मृताच्या कुटुंबाकडे गुलाम म्हणून पाठवीत. अशा प्रकारे मेलेल्या व्यक्तीच्या नासलेल्या भावी मजुरीची भरपाई होते

.

त्यात खुन्याला अगदी गुलाम म्हणून नाही पण मृताच्या नातेवाईकांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलावी लागते आणि बहुधा त्यांच्यातच राहावे लागते. यामुळे दोन गोष्टी होतात. नुकसानभरपाई आणि परस्परांवर अवलंबून राहिल्याने आपापसातील द्वेष कमी होतो.

अर्थातच, या गोष्टीची सत्यासत्यता माहित नाही.

दुष्मन

राजेश खन्ना आणि मुमताज यांचा दुष्मन हा चित्रपट ह्याच कल्पनेवर आधारीत आहे.

शिक्षा

दुष्मन अतिशय बाजारू पद्धतीने चित्रीत केला गेला आहे. त्यापेक्षा राजश्री चा शिक्षा जास्त संयत व परिणामकारक आहे.

 
^ वर