हे काय आहे?

कधी कधी आपण एखाद्या वेगळ्या पदार्थासमोर, घटनेसमोर येतो आणि "अरेच्चा! हे काय आहे?" असा प्रश्न समोर उभा राहतो. विशेषतः एखादी नवी गोष्ट खाऊन पाहावी की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो. काही नवे चाखून बघण्यास थोडेसे धाडस लागते असे म्हणता येईल कारण सर्वच गोष्टी आपण खातो किंवा त्या चाखून बघण्याची हिम्मत असते असे नाही.

काही दिवसांपूर्वी एक पदार्थ नजरेस पडला. हिम्मत करून चाखून पाहिला आणि आवडला. काल त्याचा फोटो घेतला तो येथे लावते

abc

हा फोटो कसला आहे ते ओळखता येते आहे का?

तुम्ही कधी असे वेगळे पदार्थ चाखून पाहिले आहेत का? किंवा पाहून हे काय असावे, न खाल्लेले बरे असे विचार मनात आले आहेत का? कधीतरी दिसायला चांगला न वाटलेला पदार्थ फार आवडला किंवा खूप सुरेख दिसला पण बेचव निघाला असे काहीसे झाले आहे का?

अनुभव ऐकायला आवडतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

.

सदर् प्रकार् हा द्राक्षांचा भाउ वाटतो आहे.
चवीला काहिसा आंबट असणार. काय आहे ते ठाउक नाही.

तुम्ही कधी असे वेगळे पदार्थ चाखून पाहिले आहेत का?
चुकून कोंबडी तोंडात गेली होती. खाउन गच्च गिळल्यावरच समजले. मग (शाकाहारी असल्याने) त्रागा वगैरे करुन न घेता आपण् अन्न म्हणूनच ग्रहण केले आहे म्हणून निश्चिंत् होतो. बादवे, चविष्ट होती.

कधीतरी दिसायला चांगला न वाटलेला पदार्थ फार आवडला
हो. झाले ना. "पोंगल" हा दाक्षिणात्त्यांचा तांदळाच्या खिचडीसारखा पदार्थ प्रत्यक्षात खिचडीहून कैकपट् जास्त आवडला मला. पण दिसायला अगदिच अळणी, सपक वगैरे वाटला. पण् एक वेगळिच सात्त्विक टाइपची चव त्याला होती. अजिबात्,लाल तिखट, काळा मसाला ह्यांचा वापर नसताना फक्त काळे मिरे, हल्केसे काळे मीठ का काहितरी आणि लिंबू ह्यांची अप्रतिम चव त्या पदार्थाला होती.
तोम खा नावाचे एक थाई सूप् जाम आवडले, नारळाच्या दुधात काही वनस्पती टाकून केलेले सूप क्लासच. प्रथम् पाहतना तेवढे प्रभावी वाटले नव्हते.

किंवा खूप सुरेख दिसला पण बेचव निघाला असे काहीसे झाले आहे का?

क्वचितच. अन्नाला नावे ठेवने टाळतो. त्यामुळे प्रश्न पास.
--मनोबा

वेन पोंगल

वेन म्हणजे बहुधा सफेद.

वेन पोंगल हा पदार्थ सपक दिसतो कारण त्यात हळद, लाल तिखट किंवा इतर कोणतीही मसाला पूड नसते. पिवळी मूगडाळ, तांदूळ, तूप, काळी मिरी, आले, जीरे यांचा वापर करून हा पदार्थ बनतो. दिसायला सपक दिसतो पण चव अप्रतिम लागते याच्याशी १००% सहमत.

तोम खा नावाचे एक थाई सूप् जाम आवडले, नारळाच्या दुधात काही वनस्पती टाकून केलेले सूप क्लासच. प्रथम् पाहतना तेवढे प्रभावी वाटले नव्हते.

मलाही आवडते. किंबहुना, सर्व थाई जेवण आवडते. राइस पेपर हा तांदळाचा कागद असतो त्यात भाज्या आणि मांस बांधून (रॅप करून) एक पदार्थ (ऍपेटायझर) बनतो. तो मला त्यात कोणतेही मसाले नसल्याने बेचव वाटला होता पण राइस पेपर हा पदार्थ नावीन्यपूर्ण वाटल्याने चाखून पाहिला होता. असा काहीसा दिसतो -
Thanks to www.vietworldkitchen.com

चित्र नेटावरून.

सदर् प्रकार् हा द्राक्षांचा भाउ वाटतो आहे.
चवीला काहिसा आंबट असणार. काय आहे ते ठाउक नाही.

उत्तर अगदी बरोबर म्हणता येत नाही पण चवीला आंबटसर असणार हा अंदाज योग्य आहे.

जो हाथ न आये

हा फोटो कसला आहे ते ओळखता येते आहे का?
माशांच्या अंड्यांपासून द्राक्षांपासून काहीही असू शकते. पण मन ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही आहे ते आंबटच असावे. कारण की जो हाथ न आये खट्टा है.

तुम्ही कधी असे वेगळे पदार्थ चाखून पाहिले आहेत का?
मगदुरानुसार चाखून पाहिले आहेत. भेजा, कपूरा, सुंदरी (आतडी), जीभ वगैरे अवयव अगदी चवीने खाल्ले आहेत. आणि कबाब हे बीफवालेच हवेत हा माझा निष्कर्ष आहे. पण कोब्राहृदय मात्र अजून चाखलेले नाही. मात्र अँथनी बोरडेनचा 'नो रेझर्वेशन्ज़' हा कार्यक्रम एकेकाळी बऱ्यापैकी नियमितपणे बघत असे. असो. खाण्यात ऍडवेन्चरशिवाय खाण्यापिण्यात मजा नाही.

कधीतरी दिसायला चांगला न वाटलेला पदार्थ फार आवडला
असे आणि ह्याच्याउलट अनेकदा झालेले आहे.

तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

माशाची अंडी

मी प्रथमतः पाहिले तेव्हा माशाची अंडी वाटली होती पण माशाची अंडी असणे शक्य नाही असेही लक्षात आले होते. माशाची अंडी नाहीत आणि द्राक्षेही नाहीत. :-)

नो रेझर्वेशन्ज़

मात्र अँथनी बोरडेनचा 'नो रेझर्वेशन्ज़' हा कार्यक्रम एकेकाळी बऱ्यापैकी नियमितपणे बघत असे.

मी अजूनही बघतो. कार्यक्रमाचे सादरीकरण मला आवडते. त्याने लेओव्हर म्हणून नविन कार्यक्रम सुरू केला आहे त्याचेही २-३ भाग बघितले. बोर्डेनची शैली छान आहे. त्याचे किचन कॉन्फिडेन्शियल हे पुस्तकही बरे होते. ह्याशिवाय अँड्रु झिमर्न् चा बिझार फूड नावाचा कार्यक्रमही येतो. तो मात्र तितका आवडत नाही. अँड्रू कडे तितका चार्म नाही.

कोब्राहृदय

हा शब्द मगाशी नजरेतून सुटला. मुद्दाम वेगळा प्रतिसाद देते कारण भलताच रोचक वाटतो? ;-)

काय प्रकार बरे?

हे आहे

बोरडेनने विएतनाममध्ये जिवंत कोब्राहृदय खाल्ले होते. पहा:

अवांतर: कोब्राहृदय खाणे मर्दानगीचे लक्षण आहे. ह्याबाबतीतही स्त्रिया पुढे किंवा मागे असल्यास माहीत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

साबुदाणा

साबुदाण्याची खिचडी छान मोकळी झाली नाही की अशी गिचका दिसते. हा साबुदाण्याचा प्रकार आहे का?

हेहेहे

नाही पण माशांची अंडी, द्राक्षे, साबुदाण्याची खिचडी असे सर्व विचार माझ्याही डोक्यात आले होते.

आकारमान

ह्या गोलांचे आकारमान नेमके केवढे आहे? द्राक्षांएवढे मोठे की साबुदाण्याएवढे छोटे? हा पदार्थ शिजवलेला आहे की नाही? ह्या गूजबेरीज् आहेत का?
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

व्यास

बहुधा गोलाचा व्यास अर्धा सेंटिमीटर असावा. द्राक्षाएवढे मोठेही नाही आणि साबुदाण्याइतके छोटेही नाही.

पदार्थ शिजवलेला आहे असे म्हणता येत नाही.

नेमक्या गूजबेरी नाहीत. :-)

हे कोड्यासारखे झाले आहे, काही अधिक अंदाज आले की मग उत्तर सांगता येईल.

दासबोध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
रामदासस्वामींनी म्हटले आहे:

वाट पुसल्याविण जाऊं नये| फळ ओळखल्याविण खाऊं नये|
पडिली वस्तू घेऊं नये | येकायेकी ||

.. जे तत्त्व फळासाठी लागू आहे ते अन्य खाद्यसदृश पदार्थांसाठी लागू आहे.चित्रात दिसणारा घोस फळांचा असावा असे वाटते. कोकणात कवंडळ नावाचे फळ असते.(बहुधा काजर्‍याचे असावे).व्यास ३०मिमि.रंग गडद लाल.चकचकीत. खावेसे वाटेल.पण विषारी असते.कंगली नावाच्या वेलीला आकर्षक पिवळ्या रंगाच्या बेरींचे घोस लागतात.ती फळे विषारी असतात.
म्हणून दासबोध मानावा.अपरिचित वस्तू चटकन् तोंडात न घालणे बरे.

फळांचा घोस :-)

अगदीच फळांचा घोस असे म्हणता येणार नाही पण सपशेल चुकीचेही म्हणता येणार नाही.

अपरिचित वस्तू चटकन् तोंडात न घालणे बरे.

गोष्ट अपरिचित असली तरी इतरांना अनोळखी नसल्याने आणि खाण्याच्या टेबलावर/ काउंटरवर असल्याने धोकादायक निश्चित नाही. तसेही, मी वरील पदार्थ दोन वेळा खाऊन पाहिला आहे आणि ठणठणीत आहे तेव्हा खाऊन बघायला हरकत नाही.

एक नवीन प्रकारचं

केमिस्ट्री बेस्ड् क्युझीन् (नाव नक्की माहित् नाही. पण फार महागडं असतं) येऊ घातलं आहे त्यातला पदार्थ आहे का?

ते अगार् अगार जेली, ग्वार गम वगैरे पदार्थ वापरुन् डिशेस बनवतात.

अगदीच तसे नाही

ते अगार् अगार जेली, ग्वार गम वगैरे पदार्थ वापरुन् डिशेस बनवतात.

अगदीच तसे नाही. या पदार्थाला बनवण्यासाठी वापरलेल्या बाइंडिंगचे नाव एका प्रतिसादात आहे.

हा पदार्थ महागडा नाही पण असा सर्रास सर्व दुकांनांत मिळत नसावा.

ऑलिव्हचा भाउ/बहिण?

पदार्थ सॅलड बारवर ठेवल्या सारखा वाटतो आहे, गार आहे, गोड-अंबट आहे, ऑलिव्हचा भाउ/बहिण आहे काय? वर्स्ट गेस इज टॉमटोची संकरीत जात?

थोडं थोडं बरोबर

ऑलिव्हचा भाउ/बहिण आहे काय? वर्स्ट गेस इज टॉमटोची संकरीत जात?

नाही. :-(

पदार्थ सॅलड बारवर ठेवल्या सारखा वाटतो आहे, गार आहे, गोड-अंबट आहे

पदार्थ बारवर ठेवला आहे हे बरोबर. आंबट-गोड आहे हे ही बरोबर आणि त्यात गारही टाकू.

किन्वा?

पाहताक्षणी किन्वा किंवा माशांची अंडी असावीत, असं वाटलं होतं.

तुम्ही कधी असे वेगळे पदार्थ चाखून पाहिले आहेत का?

हो, एका 'ऑथेंटिक' चिनी रेस्तराँत मंडूक-पद-द्वय चाखण्याचा योग आला होता. कदाचित पूर्वग्रह असेल, पण चाखून पाहण्यापलीकडे फारशी मजल गेली नाही. तीच गत कोंबडीच्या पायांची :)

इथल्या एका स्थानिक हाटिलात वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर्स मिळतात. त्यातले व्हेनिसन, ऑस्ट्रिच, ऍलिगेटर आणि कांगारू ट्राय केले होते. कांगारू बर्गरची चव बरीचशी चिकनसारखी होती. (कांगारू सतत उड्या मारत असल्याने त्याचे मांस हे 'लीन मीट' सदरात मोडतं, असा पीजे वेट्रेसने मारल्याचं आठवतं).

तळलेले जवळजवळ सगळेच पदार्थ चांगले लागतात. कोरियन रेस्तराँत मिळणारे डीप फ्राईड सिल्कवर्म्सही याला अपवाद नाहीत. पण आतापर्यंत चाखलेल्या वेगळ्या पदार्थांत सर्वात चविष्ट जर काय सापडलं असेल तर न्यू ऑर्लिन्समधल्या कोशाँ नावाच्या रेस्तराँतले जेवण. सशाचे डंपलिंग्ज्, फ्राईड ऍलिगेटर विथ एओली (Aioli), पिकल्ड पोर्क टंग आणि स्टफ्ड् Mirlitons (दुधीसारखी एक फळभाजी)!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

पाय?

तीच गत कोंबडीच्या पायांची :)

पायांची की पावलांची? कारण कोंबडीची तंगडी तर समस्त मांसाहारी भारतीयांना अतिप्रिय!

पावले

बरोबर, पावलांची. हस्ताक्षरातले कोंबडीचे पाय डोक्यात होते :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

बोबा

चित्रातल्या पदार्थाला बस्टींग बोबा या नावाने ओळखले जाते. एकप्रकारची कृत्रिम फळे. चित्रातला पदार्थ पॅशनफ्रूट बोबा आहे. साबुदाण्याच्या पातळ पारदर्शक आवरणात (गोळीत) विविध फळांचा रस भरला जातो आणि बोबा तयार होतो. स्ट्रॉबेरी बोबा, ब्लॅकबेरी बोबा, ऑरेन्ज बोबा असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

बबल टी नावाच्या पेयात हे बोबा घातलेले असतात. मी हा टी कधी प्यालेला नाही. बहुधा आमच्या येथे मिळत नसावा.

सहसा फ्रोजन योगर्टच्या दुकानात योगर्ट घेतलं की वर घालण्यासाठी फळं, चॉकलेट आणि इतर मिठाया असतात त्यांत या कृत्रिम फळांचा समावेश असतो.

नैसर्गिक फळांप्रमाणे दाताखाली चावल्यावर रस आणि मांसल भागाची जाणीव होते ती या कृत्रिम फळांना चावल्यावर होत नाही. ही फळे दाताखाली आल्यावर पचकन फुटतात (पॉपिंग) आणि रस जिभेवर येतो.

लहानपणी (लहानपणीच का आताही करते) बबलरॅपमध्ये एखादी गोष्ट गुंडाळून आली तर ते आवरण घेऊन त्यावरील बबल्स टकाटक फोडताना जी गंमत येई/ येते तीच गंमत ही फळे खाताना येते.

मी पहिल्यांदा या फळांकडे पाहिले तेव्हा फ्रोजन योगर्टवर माशांची अंडी असे म्हणून डोळे विस्फारले पण नंतर यना आणि दासबोधातील सल्ला न मानता "ओळखल्याविणा फळ खावोनी पाहिले."

उन्हाळा जवळ येतो आहे. फ्रोजन योगर्टच्या दुकानाला भेट दिलीत तर हा प्रकार अवश्य चाखून बघा.

असो.

नंदनचा प्रतिसाद मस्तच. अशाप्रकारे क्रॉ-फिश खाताना ग्रील केलेलं झुरळ खातो आहोत अशी भावना दाटून आली होती.

बबल टी

बोबा घातलेला बबल टी एकदा प्यायला होता. वरचा प्रियालीचा प्रतिसाद वाचेपर्यंत बोबा हा खाण्याचा पदार्थ आहे हे माहित नव्हते. त्यामुळे बबल टी मधील टी पिऊन् मी बोबा फेकून दिले होते. ते बोबा कोणत्या स्वादाचे होते ते माहित नाही, मात्र त्यांचा रंग काळसर होता. पपईच्या बियांसारखे ते बोबा दिसत होते. तेव्हा त्यांना दुधाला स्वाद आणण्यासाठी केवळ् वापरले असावे असे वाटून मी ते खाल्ले नाहीत. असो. नवीन माहिती कळली. आता पुन्हा कधी बबल टीवाल्या दुकानाच्या बाजूला जाईन तेव्हा बोबा अवश्य खाऊन पाहीन.
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

वा!

मलाही माशाची अंडीच वाटली होती.
असो, आता उत्तर जाहिर झाले आहे.. बोबाची चव त्या त्या फळासारखी लागते का आवरणाला स्वतःची वेगळी चव असल्याने तिसरीच चव तयार होते?

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

चव

आवरणाला स्वतःची अशी काहीच चव नसते आणि ते दाताखाली आल्यावर चटकन विरघळते पण फळांचा रस असल्याने आपण काय खाल्ले हे कळते. अर्थातच, फळ खाल्ल्याचा आनंद मिळत नाही कारण फळातील मांसल भाग आपण चावून खातो ती अनुभूती नसते. आइस्क्रिम, योगर्टवर टॉपिंग म्हणून मात्र चांगले लागते.

पदार्थ कळला ते ठिक झाले.

पदार्थ कळला ते ठिक झाले..या निमित्तानी ..अता माझी ज्या २पदार्थांशी अशीच तोंडओळख झाली ते सांगतो .
१)भोकरं-हे कोकण प्रांतात येणारे एक करवंदासारखेच फळ आहे...ऑफ-व्हाइट कलरचे(खरं म्हणजे त्यातला व्हाइट कलर-ऑफ झालेला असतो,अश्या रंगाचे ;-) ) फळ आहे...मी प्रथम पाहिले तेंव्हा-''बघु तरी खाऊन ही बेजान चीज कशी लागते ती..'' असं म्हणत तोंडात टाकलं,तर अत्यंत चिकट,बुळबुळीत,आणी घरातली साखर संपत आल्यावर होणार्‍या चहा सारखं अ-गोड लागलं,त्यामुळे अर्थातच आवडलं नाही..
२)कोळ-पोहे-हाही कोकणी पदार्थ आहे...कोकणात कामाला गेलो असता,असेच एका घरी थकुन/भागुन आलो असता,त्यांनी-एका सुपात पोहे,आणी चिंचेचा मिसळीचं शांपलं भासावं असा फोडणी दिलेला कोळ समोर आणला..मी मनात म्हटलं,''हे क्काय बेचव प्रकरण रिचवावं लागणार आज..?''पण त्यांनी एका ताटलीत ते नुसते पोहे(लाल तांदळाचे) आणी त्यावर ते चिंचेचं शांपल(कोळ) घातला आणी,,,हें घ्यां हो...अमचे खांस कोकणी च्यायलेंज आंहे,तुमच्या घाटावरच्या लोकांना भारी अवडतें,परत परत मागुन खातात...!'' असे म्हणुन-समोरुन टोला हाणत..ती प्लेट हतात दिली..पण पहिला घास खाता क्षणीच...ती माऊली''परत मागुन खातात'' असे का म्हणाली याचे प्रत्यंतर आले...अतिशय साधा पण चवीला एकदम भन्नाट असा पदार्थ होता तो...पाहुन प्रेमात पडलो नाही,पण खाऊन पडलो.. ;-) http://atruptaaatmaa.blogspot.com

घाणेरीची फळे

घाणेरीची फळे - कांगुण्या
घाणेरीची फळे - कांगुण्या
घाणेरीची पाने आणि फुले
घाणेरीची पाने आणि फुले

वरील 'बोबा' पाहून दुर्लक्षित घाणेरीची आठवण झाली. कुंपण अथवा बांधावर आपोआप उगवणार्‍या ह्या काटेरी झुडुपाला अनेक रंगांची फुले येतात आणि त्यांच्या देठांशी 'बोबा'च्याच आकाराची फळे असतात. त्यांना 'कांगुण्या' अथवा 'चांगुण्या' म्हणतात. त्यांत अतिशय थोडा पण गोडसर गर आणि कणीच्या आकाराची बी असते. लहानपणी मी ही फळे अनेक वेळा खाल्ली आहेत.

शोभेचे झाड 'लँटाना' ह्याचाच भाऊ.

(श्रेयः पहिले चित्र - http://www.flickr.com/photos/dinesh_valke/385428262/, दुसरे चित्र - http://www.public.asu.edu/~camartin/plants/Plant%20html%20files/lantana....

कांगुण्या किंवा चांगुण्या

त्यांत अतिशय थोडा पण गोडसर गर आणि कणीच्या आकाराची बी असते. लहानपणी मी ही फळे अनेक वेळा खाल्ली आहेत.
मी पण. आज फारा दिवसांनी हे शब्द भेटले. धन्यवाद कोल्हटकर.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

 
^ वर