मराठी असे आमुची मायबोली...

आजच्या जागतिक मराठी भाषा दिनी केवळ योगायोगाने ’मराठी असे आमुची मायबोली’ हे माधव जूलियनरचित पद्य ’श्रीमहाराष्ट्र-शारदा’ नावाच्या कवितासंग्रहात दृष्टीस आले. पद्य सहज चाळताचाळता असे जाणवले की ह्या पाठामध्ये आणि ह्याच पद्याच्या कानावर पडणार्‍या पाठामध्ये बराच फरक आहे. त्या संदर्भात हे पुढील लिखाण केले आहे.

१) ह्या पद्याचा एक पाठ http://tinyurl.com/6nr62w2 येथे मिळाला. तो असा आहे:

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
{असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी} ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

{हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥}

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥

२) हेच गीत यूटयूबवर http://tinyurl.com/85r7nyr येथे ऐकता येते. गायले आहे ज्योत्स्ना भोळे, पंडितराव नगरकर ह्यांनी. ह्या गायनामध्ये क्र. १ ह्या पाठामधील {} अशा कंसांच्या आत टाकलेले शब्द संपूर्ण वगळण्यात आलेले आहेत. विशेषेकरून दुसर्‍या कडव्याचा दुसरा अर्ध आणि चौथे कडवे संपूर्ण वगळण्यात आले आहेत. प्रत्येक कडव्याच्या अखेरीस ’मराठी असे आमुची मायबोली मराठी असे आमुची मायबोली’ असे पालुपद गाण्यात आले आहे

३) दिनकर गंगाधर केळकर (म्हणजेच कवि अज्ञातवासी आणि राजा केळकर संग्रहालयाचे संस्थापक) ह्यांनी संपादित केलेल्या आणि १९२३ साली प्रकाशित झालेल्या ’श्रीमहाराष्ट्र-शारदा’ नावाच्या कवितासंग्रहात तत्कालीन कवींच्या अनेक प्रसिद्ध कविता एकत्र करण्यात आल्या आहेत. त्या संग्रहामध्ये ही कविता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. क्र.१ च्या पाठात आणि ह्या पाठात बरीच भिन्नता आहे. अशी भिन्नता येथे निळया रंगात दाखविली आहे.

आमुची मायबोली.

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे;
नसे बाह्य ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें थोर आशा असे;
न मातब्बरी पञ्चखण्डान्तरी ती जरी मान्यता पावली इंग्रजी!
भिकारीण आई जहाली म्हणूनी
कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी? ॥१॥

जरी मान्यता आज हिन्दीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिन्दवी,
दिलाचा मराठा मराठीस वंदी हिची जाणुनी योग्यता थोरवी;
असो दूर पेशावरीं उत्तरी तो, असो दख्खनी दूर तंजावरीं,
मराठीच माझी म्हणे मायबोली प्रतिष्ठापुनी मूर्ति अभ्यन्तरी. ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
सहिष्णुत्व अंगी पुरे बाणलेले, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं;
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें, हिला बैसवूं वैभवाचे शिरीं! ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां;
हिचे कुद्रती रूप लावण्य देखा, जयाचा रसज्ञामधी अस्करा; -
न घालूं जरी वाङ्मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने,
मराठी असे आमुची मायबोली, कशाला बढाई कशाला जिणे?॥४॥

करंटी दरिद्री नसे जन्मता ही हिची थोर सम्पत्ति कालोदरी
पचेना, उपेक्षेमुळे राहिलेली, झणी तीस बाहेर काढू तरी!
कशाला हवी लूट? देतील भाषा जगाच्या हिला वाढती खण्डणी-
मराठी असे आपुली मायबोली! मराठे, झिजूं या हिच्या कारणी!
॥५॥

हे पाठभेद पाहता असा प्रश्न मनात येतो की हे पाठभेद कसे उत्पन्न झाले असावेत?

ज्योत्स्ना भोळे-पंडितराव नगरकर ह्यांच्या गाण्यामध्ये एकूण दीड कडवे वगळले आहे त्याचे कारण जुन्या तबकडयांच्या साडेतीन-चार मिनिटांच्या मर्यादेत गाणे बसविणे हे असू शकेल. चौथ्या कडव्यातील ’लक्तरे’ ह्या गद्य शब्दामुळे त्या कडव्याचा वगळुकीत समावेश झाला असावा!

क्र. १ आणि ३ मधील पाठभेदामागे एक मनोरंजक कारण असावे असे वाटते. दोनहि पाठ माधव जूलियनांनीच लिहिलेले असावेत परंतु क्र. ३ हा त्यांचा मुळातला पाठ असावा आणि क्र. १ हे त्याचे संस्कारित रूप असावे. मुळातील पाठामध्ये जे फारसी शब्द आहेत (मातब्बरी, दिल, दख्खनी, कुद्रती, अस्करा,) ते नंतरच्या पाठात बदलून त्यांच्या जागी नवीन संस्कृत वा संस्कृतोद्भव शब्दांची योजना झालेली दिसते. मूळचे फारसीचे प्राध्यापक असलेले माधवराव नंतरनंतरच्या काळात भाषाशुद्धीच्या छंदाने पूर्ण भारून गेले होते त्याचेच हे दर्शक असावे. ह्याशिवाय अन्य जे बदल दिसतात (उदा. ५वे कडवे संपूर्ण नवे करण्यात आले आहे) ते का हे मात्र कोडेच आहे.

अजूनहि एक मजेदार चीज दिसते. माधवरावांचा सर्व उच्चारित अनुस्वार परसवर्णांनी दाखविण्याबाबत आग्रही असत. त्यामुळे त्यांच्या लिखाणात ’डोङ्गर, कण्टाळा’ असे - अंगावर शहारे आणणारे - उपयोग सर्वत्र दिसतात. केळकरांनी ह्याचा मान राखायचा म्हणून की काय काही ठिकाणी अनुस्वार त्याच मार्गाने दाखविले आहेत. पञ्चखण्डान्तरी, हिन्दीस, हिन्दवी आणि खण्डणी हे शब्द माधवरावांना हवे तसे आहेत पण ’तंजावरीं’चे केळकरांनी ’तञ्जावरी’, अथवा ’पांग’चे ’पाङ्ग’ केलेले दिसत नाही.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर