कुठले मराठी संकेतस्थळ तुम्हाला सध्या आघाडीचे/यशस्वी वाटते?

कुठले मराठी संकेतस्थळ तुम्हाला सध्या आघाडीचे/यशस्वी वाटते? आणि तुमच्या मते ते आघाडीचे किंवा यशस्वी का होऊ शकले? त्यांना कसला धोका आहे?

खरं तर त्या संकेतस्थळाचं नाव/ संकेतस्थळांची नावं काय हे फारसं महत्वाचं नाही. पण आघाडीवर् असणे, यशस्वी होणे याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असणार् आणि समजा काही उपक्रमींची ती एकसारखी निघाली तरी त्यामागचे निकष वेगळे असणार. ते जाणून् घ्यायची इच्छा आहे. काही वर्षांपूर्वी मनोगत् हे सगळ्यात आघाडीचे संकेतस्थळ असेही कुठेसे वाचल्याचे आठवते.("मनोगत हे सगळ्या संकेतस्थळांचे बाप आहे") अजुनही ते तितकेच् आघाडीचे आहे का? असलेच तर् कशामुळे त्यांनी आघाडी टिकवली आहे. नसली तर् कशामुळे गमावली अशीही चर्चा वाचायला आवडेल

लेखनविषय: दुवे:

Comments

थोडे स्पष्टीकरण

यात् कुठेही अमुकच संकेतस्थळाला चांगले ठरवावे किंवा जुनी भांडणे उकरून् काढावी असा उद्देश् नाही. म्हणूनच "तुम्हाला" काय वाटते हे महत्वाचे आहे. लौकीक अर्थाने काही असो. त्यामुळे अमुक तमु़क् संस्थाळींची तुलना करण्यापेक्षा माझे हे निकष आहेत् म्हणून् मला हे असे वाटते असे लिहलेत् तर् सगळ्यांनाच् त्यातून् शिकता येईल्.

मराठी संकेतस्थळे

मराठी संकेतस्थळे आठवतील तशी देत आहे:-
सामना
महाराष्ट्र टाइम्स
ईईईई ई ई सकाळ
मराठी गूगल
आटा-दालचे भाव सांगणारे कुठलेही स्थळ (मराठी गंडलं सालं नेमकंख्याच वाक्यात)
तुकाराम.ऑर्ग
मराठी युट्यूब(मराठी/देवनागरी फाँट वापरुन शोधता येते ते यु ट्युब)
मनसे ची वेबसाइट
मराठी विकिपिडिया
मराठी/पुणेरी पाट्यांची संकेतस्थळे

--मनोबा

नेमकं काय करायचं आहे?

कुठले मराठी संकेतस्थळ तुम्हाला सध्या आघाडीचे/यशस्वी वाटते? आणि तुमच्या मते ते आघाडीचे किंवा यशस्वी का होऊ शकले? त्यांना कसला धोका आहे?

या प्रश्नांची उत्तरे जाणून नेमकं काय करायचं/ साधायचं आहे?

आघाडी आणि यशस्वी वगैरे असणे हे कायम नसते. वर-खाली, कमी-जास्त हे होतच असते. समीकरणे सतत बदलत असतात. तेव्हा आपल्याला जे रुचते, जे पटते ते आवडते. टिश्यूपेपर संस्कृतीत (ऋषीकेशकडून साभार) ही आवड सतत बदलत असते.

मनोगत हे सगळ्या संकेतस्थळांचे बाप आहे

मनोगत बाप आहे, मायबोली आई आहे, उपक्रम सख्खं मूल आहे आणि मिपा बहुधा सावत्र मूल आहे. ह. घ्या. पण हे नातेसंबंध जाणून काय साधायचे आहे?

असो.

जी काही मराठी संकेतस्थळे आहेत ती माझ्यामते रिकामटेकड्या लोकांचे उद्योग आहेत. हे कोणाचे पोटापाण्याचे व्यवसाय नाहीत. मालक-चालक-संपादक वगैरे हाताशी वेळ आणि काड्या करण्याची इच्छा असल्याने साइट्स चालवत आहेत. त्यांचे साइट्स मोठ्या वगैरे करायचे उद्देश असतीलच असे नाही.

मोठ्या साईटस

जी काही मराठी संकेतस्थळे आहेत ती माझ्यामते रिकामटेकड्या लोकांचे उद्योग आहेत. हे कोणाचे पोटापाण्याचे व्यवसाय नाहीत. मालक-चालक-संपादक वगैरे हाताशी वेळ आणि काड्या करण्याची इच्छा असल्याने साइट्स चालवत आहेत. त्यांचे साइट्स मोठ्या वगैरे करायचे उद्देश असतीलच असे नाही.


साईट मोठी आणि लहान कशी होते किंवा तिचे लहानपण आणि मोठेपण कशावरुन ठरते हे ठाऊक नाही. वरील विधाने प्रचंड 'ओव्हरसिम्प्लिफाईड' आहेत असे वाटते. 'रिकामटेकड्या लोकांचे उद्योग', 'काड्या करणे' वगैरे शेरेबाजी अनावश्यक वाटते. एखाद्या वैयक्तिक कटू अनुभवाने असे सरसकट सगळ्या संकेतस्थळांना मोडीत काढणे अनाकलनीय वाटते. 'माणसाचे डोके आणि पुस्तक यांची टक्कर होऊन 'ठक्क' असा आवाज झाला तर प्रत्येक वेळी दोष पुस्तकाचाच असतो असे नाही या अर्थाचे एक (आईनस्टाईनचे?) वाक्य आठवले.) अर्थात 'रिकामटेकड्या' वगैरे शब्दांच्या वापरामागे श्लेष असेल तर गोष्ट वेगळी!

सन्जोप राव
अज्ञः सुखमाराध्य: सुखतरमाराध्यते विशेषज्ञः|
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्माऽपि नरं न रञ्जयति||
( अ़ज्ञान मनुष्याला पटविणे सुकर असते, विशेषज्ञाला पटविणे अधिकच सुकर असते. (पण) थोडक्या ज्ञानाने पंडित बनलेल्याला ब्रह्मदेवसुद्धा काही पटवू शकणार नाही.)

ओवरसिम्प्लिफाइड

विधाने प्रचंड 'ओव्हरसिम्प्लिफाईड' आहेत असे वाटते. 'रिकामटेकड्या लोकांचे उद्योग', 'काड्या करणे' वगैरे शेरेबाजी अनावश्यक वाटते. एखाद्या वैयक्तिक कटू अनुभवाने असे सरसकट सगळ्या संकेतस्थळांना मोडीत काढणे अनाकलनीय वाटते.

ज्याप्रकारे चर्चा मांडली आहे त्याप्रकारे उत्तरे देणे मला योग्य वाटते तेव्हा ओवरसिम्प्लिफाइड शब्दाशी प्रचंड सहमत आहे. बाकी अनावश्यक वाक्ये वगैरे हे आपले वैयक्तिक मत असू शकेल. असा अनावश्यकपणाही माणूस जाहीर आणि खरडवह्यांतून अनेकदा करत असतो फक्त कधीतरी बाजू बदलून इतरांना अनावश्यक म्हणतो. गंमतीदार आहे. :-) पण असो. अनावश्यकपणाही कायम नसतो. त्याचीही समीकरणे बदलतात. स्वतः करतो तेव्हा आवश्यक असते, इतर करतात तेव्हा अनावश्यक - हे गृहितक मात्र बदलत नाही.

बाकी, वाक्य ओवरसिम्प्लिफाइड असले तरी माझ्यामते प्रामाणिकही आहे. कोणी ते खोटे पाडून दाखवले तर आनंद होईल. संकेतस्थळांच्या जमा-खर्चाचे हिशेब कोणी दाखवून आमच्या पोटापाण्याची व्यवस्था ही अशी चालते असे सांगितले तर या चर्चेला माझ्यामते वेगळी दिशा प्राप्त होईल.

'रिकामटेकड्या' वगैरे शब्दांच्या वापरामागे श्लेष असेल तर गोष्ट वेगळी!

श्लेष वगैरे काही नाही. हे वाक्य जितके इतरांबद्दल आहे तेवढेच स्वतःबद्दलही असल्याने कटू अनुभव, अनावश्यक वगैरे आपण केलेली शेरेबाजी मोडीत निघते. :-) असो. रिकामटेकडेपणाही कायम नसतो म्हणा. तोही बदलत राहतो.

तेव्हा गैरसमज नसावा.

नेमकं काय्?

>नेमकं काय करायचं आहे?

कुठले निकष असतात्, त्यातले कुणाला का महत्वाचे वाटतात् हे जाणून् घ्यायची इच्छा आहे. का? मी ज्या कारणाने मधून् मधून् काही नवीन् वाचायला उपक्रमावर् येतो त्याच कारणाने. भले मला सुद्धा रिकामटेकडा म्हटले तर् चालेल.

>आघाडी आणि यशस्वी वगैरे असणे हे कायम नसते. वर-खाली, कमी-जास्त हे होतच असते. समीकरणे सतत बदलत असतात.
म्हणून् सध्या काय समीकरणे आहेत् हे जाणून् घ्यायचे आहे. काही महिन्यांनी हे बदलेल हे मान्य आहे. काही आठवड्यांनी हे बदलावे अश्या वेगाने बदल् मराठी आंतरजालावर् होत असतील् यावर माझा विश्वास नाही.
>पण हे नातेसंबंध जाणून काय साधायचे आहे?
मी कुणाचे तरी वाक्य आठवले तसे संदर्भासाठी दिले होते. विसरुन् जा. ते मह्त्वाचे नाही.

>ती माझ्यामते रिकामटेकड्या लोकांचे उद्योग आहेत.
हरकत् नाही. मग कुणाला रिकामटेकडेपणा जास्त् छान् वापरता येतोय्? एखादा माणूस् जर् कमी वेळात जास्त् आळशीपणा करत असेल् तर् ते पण् मला शिकण्यासारखे वाटते बुवा.

> साईट मोठी आणि लहान कशी होते किंवा तिचे लहानपण आणि मोठेपण कशावरुन ठरते हे ठाऊक नाही.

अगदी मान्य. म्हणून् व्यक्तिसापेक्ष यशाचे निकष जाणून् घ्यायची इच्छा आहे.

लै भारी!

रिकामटेकड्या लोकांच्या उद्योगाबद्दल चर्चा करणे म्हणजे तर रिकामटेकडेपणाची हद्दच झाली ब्वॉ! मानला तुम्हाला.

-Nile

माझी व्याख्या

मी आजतागायत ८ वर्षे मराठी आंतरजालावर आहे (वेगवेगळ्या सदस्यत्वाने). माझा अनुभव सांगतो.
पूर्वीच्या काळी (म्हणजे साधारण ६ ते ८ वर्षापूर्वी) मनोगत हेच सर्वात आघाडीचे संकेतस्थळ होते. तिथे कविता, लेख, विडंबन यांचा सुकाळ असायचा. अनेक उत्तमोत्तम कवी, लेखक यांची रेलचेल होती. (उदा द्यायचे झाले तर 'माफीचा साक्षीदार', विसोबा, लिखाळ, नंदन इ. इ. ) बाप रे नको त्या जुन्या आठवणी ! त्यानंतर मग उपक्रम नंतर मायबोली, मिसळपाव इ अनेक संकेतस्थळे अस्तित्वात आली. त्यामुळे जुन्या लेखकांचे 'मनोगत' हे पहिले प्रेम आहे हे निश्चित.
माझ्या मते निकष असे आहेत-
१) संकेतस्थळावर काय प्रकारचे लिखाण चालते आणि तिथला साहित्यिक दर्जा काय आहे
२) तिथे किती कंपूबाजी चालते
३) सर्व प्रकारच्या साहित्याला मुक्त द्वार आहे कि नाही
४) चर्चाविषय चावून चावून चोथा झालेले आहेत का
५) एखाद्या चर्चेत किंवा लेखात किती सदस्यांचा सहभाग आहे
६) अवांतर किंवा वैयक्तिक शेरेबाजीला स्थान आहे कि नाही
७) सगळे विषय हाताळले जात आहेत का
८) काही थोड्या लोकांनीच संकेतस्थळाचा ताबा घेतला आहे का (तेच तेच लोक सारखे लेखन करतात)
९) एखाद्या नवीन सदस्याला कशी वागणूक दिली जाते
१०) सदस्य नुसते मनोरंजन म्हणून येतात कि यातून काही निष्पन्न होते (उदा. कट्टा, महत्वाची माहिती देवाण-घेवाण, समाजसेवा, प्रबोधन) इत्यादी.

माझ्या मते प्रत्येक मराठी संकेतस्थळाचा एक बहार काळ असतो आणि मग तो ओसरत जातो, परत काही वेळाने तो परत येतो. पण या सगळयांमध्ये उपक्रम हे आपले संकेतस्थळ आपला वेगळा ठसा जपून आहे हे निश्चित.

एक बदल

उपक्रमाचा मी नियमीत वाचक आहे आणि इथली माहिती खूपच उपयुक्त असते. त्यात काही चुकीचे असू नये म्हणून हा प्रतिसाद.

>>त्यानंतर मग उपक्रम नंतर मायबोली, मिसळपाव इ अनेक संकेतस्थळे अस्तित्वात आली.
मायबोली.कॉमची सुरूवात सप्टेंबर १९९६ला झालेली असल्याने या सर्व संकेतस्थळांमध्ये ती सर्वात आधी अस्तित्वात आली आहे.

+१

मायबोली.कॉमची सुरूवात सप्टेंबर १९९६ला झालेली असल्याने या सर्व संकेतस्थळांमध्ये ती सर्वात आधी अस्तित्वात आली आहे.

हे खरे आहे. मायबोली (माबो) हे बहुधा सर्व मराठी संकेतस्थळांची आई म्हणता येईल.

माबोवरीलच वेलणकरांनी नंतर मनोगत हे स्वतःचे संस्थळ सुरू केले.

मनोगतावरीलच तात्याने नंतर मिसळपाव (मिपा) हे स्वतःचे संस्थळ सुरू केले.

मिपावरीलच राजे आणि मुक्तसुनीत यांनी अनुक्रमे मिमराठी (मिम) आणि ऐसी अक्षरे (ऐअ) ही संस्थळे सुरू केली.

उपक्रम बहुधा स्वयंभू असावे (कल्पना नाही).

वरील पैकी माबोचा कॅनवास बराच मोठा आहे. तिथे एकाच वेळी अनेक विषयांवरील अनेक धाग्यांवर (तेथिल शब्द - बाफ) लिखाण सुरू असते. इतके की, एका बाफवरील सदस्याला दुसर्‍या बाफवरील सदस्याची अनेकदा माहितीदेखिल नसते! त्यांचे वेळोवेळी, अनेक ठिकाणी मेळावे (उदा. वर्षाविहार) होत असतात.

मनोगतावर प्रि-स्क्रीनींग होत असल्यामुळे आपले लिखाण/प्रतिक्रिया लगेच प्रकाशित होत नाही. म्हणून तिथे लिहायला अनेकजण नाखूष असतात.

उपक्रमाचा हेतूच वेगळा असल्यामुळे ते वेगळ्याच कॅटेगरीत येते.

बाकी मिपा, मिम आणि ऐअ यांची एकमेकांशी तुलना करता येईल.

असो, तूर्तास इतकेच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ड्रूपलवरील पहिले

मनोगत हे ड्रूपलवर आधारित पहिले मराठी संकेतस्थळ. मनोगतापासून प्रेरणा घेत मराठी संकेतस्थळे ड्रूपलकडे वळती झाली. उपक्रम त्यातलेच. उपक्रम हे मीम, मिपाच्या आधी सुरू झाले. आता ड्रूपलवर असले तरी मायबोली पूर्वी डब्ब्यात डब्बा छाप होते. तिथे वावरणे पूर्वी सोपे नव्हते. कारण माझ्या आठवणीनुसार मायबोली तेव्हा पीएचपीबीबीवर आधारित असावे. (सर्वटे चूक सुधारतीलच). मायबोलीचे कुटुंब मोठे आहे. तर अजूनही 'होनं गं मंजे', 'होरे सुऱ्या', 'गटगला तू वडे आण', 'मी ;चकल्या', 'ती अळूवड्या' आणि 'तो फदफदं आणेल' वगैरे वाचून मजा येते. असो. पैसे कमाविण्याच्या बाबतीत मायबोलीकडून इतर संकेतस्थळांना बरेच काही शिकता येईल. आणि त्यांनी ते शिकावे.

मनोगत हे मराठी शुद्धलेखनाला वाहून घेतलेले संकेतस्थळ झालेले आहे की काय असे वाटते. अर्थात त्यांचा हेतू उदात्त आहे. बाकी संकेतस्थळांबद्दल कधी तरी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हम्म...

उपक्रमाच्या पाठोपाठ काही महिन्यातच मिपा सुरु झाले. त्यानंतर मिमराठी; असे समजून होतो.

'होनं गं मंजे', 'होरे सुऱ्या', 'गटगला तू वडे आण', 'मी ;चकल्या', 'ती अळूवड्या' आणि 'तो फदफदं आणेल'
केवढी ती सात्विक सात्विक चर्चा. इथल्या उपक्रमाचा पुन्हा जंगी कट्टा करायचा झाला तर "काय हो ञंकोजीराव, कालचे पुष्टकार्यार्थ हर्मीवस्त्र हे अझुरिअस नेप्टानिससच्या प्राचीन काळातील शिंका किंवा माशा कशा माराव्यात हे पुस्तक घेउन याल का" अशी "माहितीपूर्ण" विचारणा होइल की काय् अशी साधार भीती वाटते.
अर्थात, माबोवर कधी गेलो नाही अन् उपक्रमाचा कंटाळा आला तरी ते सोडवतही नाही, हे ही खरेच.

शेवटच्या परिच्छेदातील पहिल्या वाक्याशी सहमत.

--मनोबा

पैसे

पैसे कमाविण्याच्या बाबतीत मायबोलीकडून इतर संकेतस्थळांना बरेच काही शिकता येईल. आणि त्यांनी ते शिकावे.

मिम त्याच वाटेने जात आहे असे दिसते (एक गल्लेवाले तर दुसरे जैन!). इतरांनी शिकावे, हे मान्य.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बदल

योग्य आहे. धन्यवाद.

ऐलपैल

कुठले मराठी संकेतस्थळ तुम्हाला सध्या आघाडीचे/यशस्वी वाटते?

ऐलपैल.कॉम

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

का?

का?

--मनोबा

:)

कारण ते मला सर्वात यशस्वी व आघाडीचे वाटते.
ते संस्थळ आघाडीचे आणि यशस्वी (कोणा)कोणाला वाटत नाहि ??

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

ऐलपैल

मी हे संकेतस्थळ अजून वाचलेले नाही व अनुभव वरून त्याची जी विनाकारण व अवास्तवी जाहिरात केली जाते त्यामुळे ते मला वाचावेसे वाटलेले नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

विनाकारण व अवास्तवी जाहिरात

ऐलपैल हे थंडगार संकेतस्थळ आहे हे मान्य पण तुम्हाला विनाकारण व अवास्तवी जाहिरात कुठे दिसली?

अनुभव वरून त्याची जी विनाकारण व अवास्तवी जाहिरात

जरा डाव्या बाजूच्या कॉलमकडे नजर टाकलीत की मी काय म्हणतो ते लक्षात येईल. या संकेतस्थळातील मजकुराची यादी अनुभव वर देण्याचे काय प्रयोजन आहे?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अनुभव मासिकात का?

अनुभव वरून त्याची जी विनाकारण व अवास्तवी जाहिरात

अनुभव ह्या मासिकात का? इथे अनुभव नावाचा कॉलम कुठे दिसत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अनुभव काय आहे?

या संकेतस्थळातील मजकुराची यादी अनुभव वर देण्याचे काय प्रयोजन आहे?

चंद्रशेखर, हे अनुभव काय आहे? मी कालसुद्धा वाचलं होतं पण मला ती शुद्धलेखनाची चूक वाटल्याने सोडून दिलं. आज तसं वाटत नाही तेव्हा खुलासा व्हावा. अनुभव म्हणजे काय हे कळले तर पुढे बोलता येईल परंतु अनुभव म्हणजे उपक्रम असेल तर यापुढे बोलण्यात स्वारस्य नाही. जी व्यक्ती एखाद्या संकेतस्थळावर एक-दोन वर्षे वावरते ती सातत्याने दोन दिवस त्या संकेतस्थळाला चुकीच्या नावाने संबोधत असेल तर ती व्यक्ती किती गोंधळलेली (कन्फ्यूज्ड) आहे याचा अनुभव आला. पण तरीही एक सांगण्याचा मोह आवरत नाही.

जरा डाव्या बाजूच्या कॉलमकडे नजर टाकलीत की मी काय म्हणतो ते लक्षात येईल.

तुम्ही जर उपक्रमाच्या डावीकडे नजर टाकावी म्हणत असाल तर एक लक्षात घ्यावे की जे डावीकडे उमटते त्यात सामान्य सदस्याचा लॉग-इन किंवा लॉग-ऑफ शिवाय संबंध नसतो. जे इतर उमटते ते संकेतस्थळाच्या चालक आणि मालक यांच्या मर्जीने आणि त्यांनी केलेल्या डिझाइननुसार उमटते. जसे, उपक्रम दिवाळीची केलेली जाहीरात(?) तीही कदाचित आपल्यामते विनाकारण आणि अवास्तवी असेल पण इतरांच्या मते ती एका खाजगी संकेतस्थळ चालकाने आपल्या साइटवर दिलेली सुविधा आहे.

असो. तरीही इतक्या टोकाला जाऊन विनाकारण आणि अवास्तवी का म्हणावे ते कळले नाही.

अनुभव

गेले काही दिवस मी अनुभव नावाच्या एका लेखमालिकेत गुंग आहे. ऐलपैल या संकेतस्थळाला या संकेतस्थळावरून मिळत असलेली प्रसिद्धी मला रुचत नसल्याने त्याबद्दल मी लिहिणारच होतो. परवा आणि काल या बद्दल संधी मिळाल्याने लिहिताना, डोक्यात सतत अनुभव या लेखमालिकेचा विचार चालू असल्याने, अनवधानाने मी उपक्रम ऐवजी अनुभव लिहून गेलो आहे. त्याबद्दल मी सर्व उपक्रम वाचकांची क्षमा मागू इच्छितो.
मात्र ऐलपैल या संकेतस्थळाला येथे दिली जाणारी प्रसिद्धी मला रुचलेली नाही हे मी परत सांगू इच्छितो.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

न रुचण्याचे कारण सांगावे

मात्र ऐलपैल या संकेतस्थळाला येथे दिली जाणारी प्रसिद्धी मला रुचलेली नाही हे मी परत सांगू इच्छितो.

न रुचण्याचे कारण सांगावे. एखादी गोष्ट इतकी निकराने न रुचण्याबद्दल आपल्याकडे ठोस कारणे असतील असे समजते.

  • उपक्रमाच्या मालकांनी डाव्या रकान्यात ऐलपैलबद्दल जागा देताना आपली परवानगी काढणे आवश्यक होते.
  • ऐलपैलच्या चालकांनी हे संकेतस्थळ सुरू करण्याआधी आपल्याकडून रितसर परवानगी घ्यायला हवी होती.
  • ऐलपैलच्या चालकांनी 'आमच्या संकेतस्थळावर आपण लेख प्रसिद्ध करावा' असा लकडा आपल्यामागे खरडवही किंवा व्यनितून लावला होता.
  • आपण इतर संकेतस्थळावर आपले लेख जसे कॉपी पेस्ट करता तसे करण्यास ऐलपैलने आपल्यावर निर्बंध लावले होते.
  • ऐलपैल किंवा उपक्रमच्या चालकांनी आपल्याकडून बळजबरीने जाहीरातीसाठी पैशांची मागणी केली होती.

एखाद्या खाजगी संकेतस्थळ चालकांनी कशाला प्रसिद्धी द्यावी हा त्यांचा प्रश्न असतो. तसेच, त्यांनी प्रताधिकाराचे उल्लंघन करून आपल्या मुखपृष्ठावर चित्रे छापली असतील किंवा नेटावरून उचलली असतील तर सदस्यांचा रोष मान्य आहे. जर तसे काही नसेल आणि ऐलपैल आणि उपक्रम संगनमताने एकमेकांच्या संकेतस्थळाला प्रोत्साहन देत असतील तर आपल्याला ही गोष्ट न रुचणे मला बालीश वाटते.

सहमत आहे

एका संकेतस्थळाने दुसर्‍या स्थळाची शिफारस करणे ह्यात खटकण्यासारखे काय आहे समजले नाही. वरती मांडलेले सर्व मुद्द पटले.

सहमत पण

मुद्दे पटले, पण अशी जाहिरात वैयक्तिक पातळीवर न पटण्याचे स्वातंत्र्य असावेच, कदाचित ललित लेखनाची प्रसिद्धी उपक्रमवरुन व्हावी हे त्यांना पटले नसावे. पण ते त्यांनी सागितल्यास त्यास आक्षेप नसावा.

न पटण्याचे स्वातंत्र्य

पण अशी जाहिरात वैयक्तिक पातळीवर न पटण्याचे स्वातंत्र्य असावेच, कदाचित ललित लेखनाची प्रसिद्धी उपक्रमवरुन व्हावी हे त्यांना पटले नसावे.

अशी जाहीरात वैयक्तिक पातळीवर न पटण्याचे स्वातंत्र्य मान्य आहे. मलाही ही मूळ चर्चा पटलेली नाही, तशी नाराजी मी माझ्या औपरोधिक* प्रतिसादातून दाखवली. परंतु, "विनाकारण आणि अवास्तवी" हे शब्द वापरण्यास जेवढे ठोस कारण हवे ते हे उद्धृत केलेले कारण नाही.

दुसरे म्हणजे, उपक्रमावर ललित लेखन प्रसिद्ध होत नाही परंतु ललित लेखनाविषयी चर्चा, पुस्तके, कविता, चित्रपट यांचे परीक्षण, रसग्रहण इ. यथायोग्य चालते त्यामुळे उपक्रम ललितलेखनाचे शत्रू नाही. ऐलपैलला डाव्या रकान्यात जागा देऊन उपक्रमाने ललित लेखनाला प्रमोट करण्याचा पायंडा घातला आहे असे कोणाला वाटत असल्यास चुकीचे आहे. उपक्रमावर ललित लेखनाला प्रमोट करणे आधीपासूनच होत होते.

किंबहुना, येथे ललित लेखन का चालत नाही, ललित लेखन कोठे करावे अशा प्रकारचे अनेक प्रश्न लेखकांकडून येत असल्याने बहुधा उपक्रम त्यांना ऐलपैलच्या संगनमताने मार्ग दाखवत असावे.

* आजकाल हे ही सांगावे लागते.

 
^ वर