उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
विचार वि. कल्पना
शरद् कोर्डे
June 2, 2007 - 1:14 pm
माणसांच्या कृतीवर कल्पनांचा व विचारांचा तुलनात्मक प्रभाव किती असतो याबद्दल काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनांत आलेले एक उदाहरण :
दोन फूट रुंदीची व १०० फूट लांबीची एक फळी घेऊन ती जमिनीवर टाकली तर तिच्या एका टोकाकडून दुसर्या टोकाकडे फळीवरून न उतरता चालत जायला कोणीही तयार होईल. न उतरता चालत जायला दोन फूट रुंदी पुरेशी आहे हे सर्वचजण मान्य करतील.
पण तीच फळी, मध्ये (समजा ८० फूट) अंतर असलेल्या दोन उंच इमारतींच्या गच्च्यांवर आडवी टाकली तर, दोन फूट रुंदी चालत जायला पुरेशी आहे हे मान्य करून सुद्धा, तिच्यावरून एका इमारतीच्या गच्चीवरून दुसर्या इमारतीच्या गच्चीवर चालत जायला कितीजण तयार होतील?
असं का?
माणसांचा विचारापेक्षा कल्पनेवर अधिक विश्वास बसतो.
दुवे:
Comments
??
विचार आणि कल्पना यांत अनेकदा तफावत असते हे मान्य आहे.
पण शरदकाका, आपण दिलेल्या उदाहरणात "विचार"पूर्वकच माणसे निर्णय घेत आहेत असे दिसते.
जमिनीवर ठेवलेल्या फळीवरून चालणे आणि ८० फूट उंचीवर हीच फळी असताना त्यावरून चालणे ह्या सारख्याच गोष्टी मानणे हाच मुळी कल्पनाविलास आहे. थोडा विचार केल्यास किंचितशी गफलत झालीच तर जमिनीवर आणि इमारतींवर होणारे परिणाम यात अक्षरशः जमीनास्मानाचा फरक आहे हे लक्षात येते.
म्हणजे कल्पना नाही तर साधा विचारच येथे माणसाला परावृत्त करतो.
असो एकूणच विचार, मन, कल्पना हे सारे गहन विषय आहेत. आपला विरंगुळा बरा!!
एकलव्य
What's Mind? Doesn't Matter! What's Matter?? Never Mind!!
कल्पनेची विचारावर मात.
आपण दिलेल्या उदाहरणात "विचार"पूर्वकच माणसे निर्णय घेत आहेत असे दिसते.
माणसे "विचार"पूर्वक निर्णय घेतात की कल्पनेच्या इतके आहारी जातात की वास्तवतेच्या काही अंगांकडे त्यांचे दुर्लक्ष होते? उदा. दोन फूट रुंदी फळीवरून न उतरता व तोल न जाऊ देता चालत जायला पुरेशी आहे हे वास्तव फळी जमिनीवर आहे की उंचावर आहे यावर अवलंबून नाही हे माणसांच्या लक्षांत येत नाही किंवा त्याबद्दल त्यांना पुरेशी खात्री वाटत नाही. याचा अर्थ कल्पना एकतर विचारशक्ति बंद पाडू शकते किंवा विचारापेक्षा अधिक प्रभावी ठरते.
च्यामारी फळी मध्येच मोडली तर! ;))
शरदशेठ,
अहो मी कदाचित त्या ८० फुट उंच फळीवरून चालत जायला तयार होईनसुद्धा, पण च्यामारी ती फळी मध्येच काडकन मोडली तर?!!!! (तेवढं वजन मी बाळगून आहे!) -;)
मग उपक्रमवर बाजारगप्पांचा पार्ट ३ कोण लिहिणार? ;)
हाही एक विचार!
काही का असेना, पण आमच्या सर्वसाक्षीने लिहिलेला अवघ्या दोन ओळींचा का होईना, पण 'श्रद्धांजली' हा लेख आपल्याला मनोगतावरसुद्धा(!) नक्की वाचावयास मिळेल! ;))
हाही एक विचार!
मरतांनासुद्धा तात्याला मनोगताचीच आठवण होईल!
हाही एक विचार!
आता बोला... ;)
तात्या.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
तसं जायला हरकत नाही
तसं जायला हरकत नाही,
जर योग्य तेव्हढा वेळ देउन मनाचे तयारी केली तर जायला पण हरकत नाही! का पण एक विचार...
गुंडोपंत
विचार आणि कल्पना
तुम्ही केलेला युक्तिवाद (जमिनिवरील आणि उंचावरील फळी) वास्तविक आहे. पण कल्पना आणि विचार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? माझ्यामते एका विशिष्ट प्रकारचा विचार म्हणजेच कल्पना असे म्हणता येईल.
अवांतर - विचार करणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. मनातून विचार पूर्णपणे काढून टाकणे बहुसंख्यांना शक्य होत नाही. विचारमुक्त होण्यासाठी साधनेची गरज असली तरी विचारशून्य अवस्था म्हणजे विचारमुक्त अवस्था असे म्हणता येणार नाही. मनातून विचार काढून टाकणे अवघड आहे त्याऐवजी त्यांना चांगल्या गोष्टींकडे वळवावे असे कोण्या सत्पुरुषाचे वचन ऐकले आहे, संदर्भ आठवत नाही.
विचार आणि कल्पना
मा. कोर्डेसाहेब व समस्त उपकमींनो,
या आधीच्या प्रतिसादामुळे झालेल्या विशयांतराबदद्ल क्षमस्व.
कोर्डेसाहेब्,
<माणसांचा विचारापेक्षा कल्पनेवर अधिक विश्वास बसतो. > माझे असे मत आहे की विचार म्हणजे डोक्यात् येणार्या असंख्य कल्पनांपैकी सर्वाधिक् स्विकारार्ह वाटलेली कल्पना.