गलती मैने की, तुमने दुख भोगे|

महापौर, ज्यास सन्मानाने शहराचा प्रथम नागरिक असे देखील संबोधले जाते तोच घरात आणि घराबाहेर देखील ताळतंत्र सोडून वागू लागतो. स्वतःच्या स्वीय सहाय्यकाच्या नादी लागून उलट सुलट व्यवहार करतो. सहाय्यकाच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवून स्वतःच्या पत्नीला दुय्यम वागणूक देतो. त्याच्या हेकेखोर स्वभावामुळे त्याची मुलेही त्याच्यासोबत संवाद साधण्यास घाबरतात. बाहेरही त्याची दुष्कृत्ये चव्हाट्यावर आणणार्‍या महिला पत्रकारास तो मारहाण करतो. त्याचा मार खात असतानाच ती महिला पत्रकार त्याला अशी काही माहिती सांगते जी त्यालाही ठाऊक नसते आणि ती समजल्यावर त्याचे डोळे उघडतात. ज्यांच्या सोबतीने आपण ही दुष्कृत्ये करीत आहोत ते आपले साथीदार देखील आपल्याशी दगलबाजी करत आहेत ह्याची जाणीव त्याच्याकरिता मोठी धक्कादायक असते. जिला आपण सर्वस्व अर्पण करावयास निघालो आहोत ती वीणा ही स्वीय सहाय्यक त्रिपाठीची बहीण नसून पत्नी आहे व हे दांपत्य आपल्याला फसवून आपल्या नावावर आर्थिक घोटाळे करून स्वतंत्ररीत्या माया जमवित आहेत हे कळल्यावर मेयर जी के रायडू एकदम अमूलाग्र बदलतो.

या लोकांच्या नादाने आपण समाजाची आणि आपल्या कुटूंबाचीही किती अवहेलना केली हे त्यास उमजते. आपली पत्नी आपल्या चूकीने अपंग झाली असूनही आपण तिचा दु:स्वास केला तरी त्या बिचारीने कधी तक्रार केली नाही ही अपराधी भावना त्यास छळू लागते. आपल्या सर्व पापांची कबूली ह्या गीतातून तो आपल्या शांती ह्या धाकट्या मुलीपाशी देतो.
ही कबूली दिल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू होतो. तसंही आपल्याकडे एका धर्मात मृत्यूपूर्वी देवासमोर कन्फेशन देण्याचा प्रघात आहे तर दुसर्‍या एका धर्मात लहान मुलांना देवाचे रूप समजण्याचा रीवाज. चित्रपटात या दोन्ही चालींचा सुंदर मिलाप करूनच जणू ह्या गीताची निर्मिती झाली आहे असं वाटतं.

गाणे अर्थातच भाषांतरीत असल्याने प्रत्येक शब्दाचे रसग्रहण करण्यात फारसा काही अर्थ नाहीये. आशय समजून घेणे महत्त्वाचे. त्यातही पत्नीच्या कुबड्यांकडे लक्ष जाताच डोळ्यांत तरळणारे पाणी आणि ओठांवर येणार्‍या "गलती मैने की, तुमने दुख भोगे" ह्या ओळी संवेदनशील प्रेक्षकांस नक्कीच हेलावून टाकतात.

खरं तर रिचर्ड ड्रेफ्यूसच्या मून ओवर पॅरेडोर वरून प्रेरित असलेला कमल हसन यांचा मेयरसाब हा संपूर्ण चित्रपटच अप्रतिम आहे. परंतू हिंदी आवृत्ती काही पुन्हा बसघायला मिळाली नाही. जालावर उपलब्ध असणार्‍या तमिळ (इंदिरन चंदीरन http://www.youtube.com/watch?v=MhU-O2Nlp3k) आणि तेलुगू (इंद्रुडू चंद्रुडू http://www.youtube.com/watch?v=Kpuk3uLfLWQ ) आवृत्त्या नीटशा समजत नाहीत. वीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या हिंदी आवृत्तीच्या आठवणींवर समीक्षण लिहीणं हे वाचकांवर अन्याय करणारं ठरेल असं वाटल्याने तूर्तास केवळ इलई राजाच्या खास दक्षिण भारतीय संगीताच्या ठेक्याने नटलेल्या या सुश्राव्य गीताविषयीच लिहीत आहे.

मेयर जी के रायडूत होणारे इतके महत्त्वाचे आणि सकारात्मक परिवर्तन दाखवून देणार्‍या या गीताविषयी जाणून घ्यायला संक्रांतीपेक्षा अधिक उत्तम वेळ ती कोणती असणार?

सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

अगदी मनापासून धन्यवाद !

गाणे लगेच फेवराईट मध्ये सामील करून टाकले, आणि आता 'Shemaroo' च्या मागे लागतो हिंदी प्रत मिळवण्यासाठी :-)

 
^ वर