सध्याच्या शेअरबाजारातून चांगले पैसे कसे मिळवावेत?

सध्याच्या शेअरबाजारातून चांगले पैसे कसे मिळवावेत?
तुमच्या मनात शंका येत असेल कि सध्या शेअरबाजारापासून दुरच राहीलेले बरे कारण गेले जवळपास एक वर्ष सेन्सेक्स १५५०० ते १८००० या दरम्याने वरखाली होत आहे.
पण खरं म्हणजे हाच काळ शेअरबाजारातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे हे मी स्वानुभवाने सांगतो. जोपर्यंत युरोपमधील आर्थिक संकट दुर होत नाही तो पर्यंत बाजारात तेजी येणे कठीण आहे, यावर मार्ग निघणार हे निश्र्चित, युरोपीअन देशाना तो काढावाच लागेल अन्यथा युरो चलन बंद करावे लागेल व परत प्रत्येक देशाचे चलन जागतीक बाजारात व्यवहारासाठी वापरावे लागेल, हे कोणालाच परवडणारे नाही, मात्र यासाठी किती काळ लागेल हे सांगता येत नाही. आपल्या देशात व सर्वच इमर्जींग देशात (BRIC Countries ब्राझील, रशीया, इंडिया व चीन) FII (Foreign Institutional Investors) गुंतवणूक करत आहेत, फार मोठी रक्कम त्यानी गुंतवलेली आहे. हे फक्त पैसा मिळवण्यासाठी येथे आलेले आहेत आणि आज बारावर त्यांचेच वर्चस्व आहे, तेच बाजाराची दिशा ठरवत आहेत म्हणूनच बाजार पुढील काही काळ १५% ते २०% या दरम्याने वर खाली होत रहाणार यातच त्याना पैसे मिळतात. स्वस्तात खरेदी करा व महागात विका हेच तत्वाने हे चालले आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे वर जाते ते खाली येणारच व जे खाली येते ते वर जाणारच हा अर्थशास्त्राचा नियम आहे, मात्र शेअर बाजारात स्टॉकची निवड महत्वाची असते.
सर्वसामान्य माणसाने या बाजारातून कसा जास्तीत जास्त फायदा मिळवावा?

हे करा:
1) संयम पाळणे फार महत्वाचे.
2) अगदी थोडे म्हणजे २ किंवा ३ च लार्ज कँप शेअरची (अशा शेअर्समध्येच सर्वात जास्त उलाढाल होते व धोकाही कमी असतो) निवड करा ज्यात सर्वात जास्त उलाढाल होते व सर्वात जास्त चढ उतार होतात. (कृपया हे कोणते ते विचारू नका कारण हे ज्याचे त्याने स्वत:च्या अभ्यासाने ठरवावे, थोडे निरिक्षण केलेत कि आपोआप लक्षात येईलच).
3) आता या स्टॉकची किंमत खाली येऊ लागली कि थोडे थोडे गुंतवावयास लागा, मात्र एकदम सर्व पैसे गुंतवू नका, किंमत कमी आली कि परत थोडे गुंतवा मात्र जर फायदा पहिल्याच व्यवहारात झाला असेल तर तो घेऊन परत वाट पहात किंमत कमी होईपर्यंत थांबा.
4) नुकसानीत विकू नका, सरासरी करत रहा.
5) तुम्हाला किमान ५% फायदा झाला कि विकून टाका. फायद्याचे गणित करताना, ब्रोकरचे कमिशन व आयकराची गणना करा. लक्षात ठेवा नफा हा निव्वळ झाला पाहिजे.
6) हे वारंवार करा, ह्या संधी बाजारात नियमीत येत असतातच.
7) बाजाराचे (एफआयआय) च्या कलाप्रमाणेच निर्णय घ्या. प्रवाहाप्रमाणे पोहणेच फायद्याचे असते.
8) तुमच्याकडे असणा-या अतिरीक्त रकमेचीच गुंतवणूक करा, जी किमान एक वर्ष तरी लागणार नाही.
9) तुम्ही अगदी रु.दहा हजारानेही सुरुवात करु शकता.
10) लक्षात ठेवा बाजाराचे अचूक भाकीत कोणीच करु शकत नाही व जो असे सांगतो तो खोटे बोलतो.
11) शेअर बाजाराकडे तुमचे स्वत:चे किराणा दुकान आहे असे समजून व्यवहार करा.
12) हे व्यवहार नफा मिळवण्यासाठीच करावयाचे आहेत हे विसरु नका.
13) बाजाराच्या कलाप्रमाणे बदलत रहा.

हे करु नका:
१) डे-ट्रेडिंग अजीबात करु नका.
२) मार्जीनच्या मोहात तर अजीबात पडू नका, यात फारच जास्त धोका आहे.
३) एकसारखे खरेदी विक्री करु नका, हे फक्त ब्रोकरच्या फायद्याचे असते.
४) जास्त मोह करु नका, फायद्यात असताना विकून टाका, जास्त फायद्याचा सोस धरु नका कारण संधी नेहमीच येत रहाणार आहे. जो जास्त व्याजाला भुलला तो मुद्दलाला मुकला.
५) बाजाराच्या कलाच्या विरुध्द वागू नका, प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याने फक्त लवकर दमछाक होते.
६) कर्ज काढून पैसे यात गुंतवू नका.
७) सर्व रक्कम एकदम गुंतवू नका.
८) कंपनीची माहिती असल्याशिवाय आयपीओच्या वाटेला जाऊ नका यात नुकसानच जास्त होते, गेल्या पाच वर्षात आलेल्या आयपीओपैकी ८०% शेअर्समध्ये मोठ्याप्रमाणावर नुकसानच झालेले आहे व यातील काहींचे बाबत तर ९०% पर्यंत नुकसान झालेले याला काही सन्माननीय अपवाद आहेत, जसे कि काही पीएसयु स्टॉक.
९) कोणत्याही शेअरच्या प्रेमात पडू नका.
१०) टिव्हीवर ब-याच आर्थीक वाहिन्या आहेत त्यावर नियमीत चर्चेचे गु-हाळ चालू असते, ते जरुर पहा पण त्यांच्या टिपवर विसंबून व्यवहार करु नका, यातील 50% टिप चुकीच्या असतात (कदाचीत मुद्दामच दिल्या जातात काय माहित नाही).
११) दुस-यानी (ब्रोकर वगैरे) दिलेल्या हॉट टिपच्या मोहात पडू नका, सारे काही स्वार्थासाठी चालते व ज्याला बाजाराची माहितीच नाही त्याचे का ऐकावे?

किती फायदा होऊ शकतो?
१) वर्षात किमान ४ ते ६ वेळा तुम्ही निवडलेल्या स्टॉक मध्ये चढ उतार होत असतातच.
२) संयमाने वागल्यास वर्षात चांगला फायदा मिळवू शकता.

हे शक्य नसल्यास:
१) म्युच्युअल फंडात नियमीत दरमहा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहा.
२) २ किंवा ३ स्टॉक नियमीत खरेदी करत रहा Buy & Hold या तत्वाने वागा.
३) गुंतवणूकीचे उदिष्ट ठरवा व त्यानुसारच वागा.
४) चक्रवाढीमुळे दिर्घ मुदतीत फायदाच होतो यावर विश्वास ठेवा.
५) नियमीतपणा फार महत्वाचा आहे.
६) शेअरबाजारात सलग दोन-तिन वर्षेसुध्दा नुकसान होऊ शकते मात्र त्यानंतर एखादे वर्ष १५०% फायदासुध्दा करुन देते व झालेले नुकसान भरुन येऊन भरघोस फायदाही होऊ शकतो.

या लेखात व्यक्त केलेले विचार हे माझ्या स्वत:च्या अनुभवावर आधारलेले आहेत ते तुम्हाला उपयक्त वाटले तर आचरणात आणा अथवा सोडून द्या, याच्याशी उपक्रम या संकेतस्थळाचा कोणताही संबंध नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्व अभ्यास करून मगच शेयर बाजारात पाऊल ठेवणे योग्य

ठाकूर साहेब ,
आपल्या पोस्ट मधील "हे करु नका:" मधील मुद्दा क्रमांक १),२) आणि ४) च्या बाबतीत थोडी मतभिन्नता आहे.मुद्दा १) आणि २ ) साठी आधी त्याचा सखोल अभ्यास करावा त्यातील फायद्या पेक्षा तोट्याचा अभ्यास करावा आणि मगच त्या साठी पाऊल उचलावे अन्यथा ते करू नये हे जास्त संयुक्तिक ठरेल,आणि मुद्दा क्रमाक एक दोन साठी जे सांगणे आहे तेच पुन्हा मुद्दा क्रमांक ४) साठी लागू होते कि जर तुमचा "स्व अभ्यास" असेल तरच आत्मविश्वासाने प्रॉफिट रन करता येणे शक्य आहे.अन्यथा जास्त मोह करु नका, फायद्यात असताना विकून टाका.
मुळात शेयर बाजार ह्या विषयी सर्वसाधारण मराठी माणसा मध्ये प्रचंड भीती आहे.शेयर बाजारातील गुंतवणूक किंवा त्यातील ट्रेडिंग हा एक स्वतंत्र असा सखोल अभ्यासाचा विषय आहे.बाजाराचे तंत्र नि त्यातील टेक्निकल अनालिसिस हा विषय समजून घेण्यात काही वर्षे खर्च होतात नि त्या नंतर खरे तर गुंतवणूक किंवा ट्रेडिंग हे विषय येतात.हे विषय समजून न घेता किंवा त्याचा काही एक अभ्यास न करता केवळ अल्पावधीत,काहीही श्रम कष्ट न करता फुकट पैसे मिळवायचा जुगारी अड्डा असा सर्वसाधारण प्रवाद आहे.मात्र बाजारातून साधी ५ रुपयाची कोथिंबीरिची जुडी घेताना सुद्धा,तिची किंमत योग्य आहे का ?ती शिळी आहे का ताजी ?तिला माती जास्त तर लागली नाहीयेना ?तिला फुलं यायला सुरुवात तर झाली नाही ना ? हे तपासून बघणारे आपण शेयर बाजारात तसे धृतराष्ट्र बनून पाऊल ठेवतो.विषय समजून घेऊन ,स्व अभ्यास करून मगच शेयर बाजारात पाऊल ठेवणे योग्य अन्यथा म्युचुअल फंड हि सर्वसाधारण गुंतवणूकदाराच्या दृष्टीने त्या मध्ये गुंतवणूक करण्याचा योग्य पर्याय आहे ह्या बाबत दुमत नाही.

उत्तम

छान मुद्देसूद माहिती आहे.

छान माहिती

दुस-यानी (ब्रोकर वगैरे) दिलेल्या हॉट टिपच्या मोहात पडू नका, सारे काही स्वार्थासाठी चालते व ज्याला बाजाराची माहितीच नाही त्याचे का ऐकावे?

छान माहिती. उद्या बाजारात काय होणार आहे हे जगात कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. कसलेही बादरायण संबंध जोडत टिप्स देणार्‍या तथाकथित तज्ञांपासून दूर राहावे हे उत्तम.

बाहेर कसे पडावे?

२००८ सालापूर्वी काही रक्कम गुंतवली होती. सर्व मिळून आत्ता ३० टक्के नुकसान आहे. बाहेर कसे पडू? मार्गदर्शन करावे.

पैसे घालवायची जागा

आमच्या मते शेअरबाजार ही बहुसंख्यांसाठी पैसे मिळवायची नसुन पैसे घालवायची जागा आहे. यात खुपच थोडे लोक पैसे मिळवत असतात
प्रकाश घाटपांडे

 
^ वर