भारतीय रुपया कुठे चालला आहे?

गेले दोन महिने भारतीय रुपयाची डॉलरसंदर्भात प्रचंड घसरण सुरू आहे. रिझर्व् बँकेने हस्तक्षेप करून ती थांबवण्याचा प्रयत्न करून बघितला पण तो फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. बा़जारात दाट अफवा आहे की रुपयाचे अधिकृतरीत्या अवमूल्यन करण्यात येईल. हे अवमूल्यन १० ते १६ % असेल असेही काहीजण छातीठोकपणे सांगताहेत.
आतापर्यंत आपली अर्थव्यवस्था बाहेरच्या जगातील पडझडीपासून दूर राहिली होती आणि हा आपल्या अर्थव्यवस्थेवर सरकारी अंकुश असल्याचा परिणाम आहे असे सांगत रि़झर्व बँकेने आपली पाठ थोपटून घेतली होती.पण आजच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादन ५ % नी घसरले आहे.शेअरबाजार तर तीळभर पुढे आणि गहूभर मागे असा खाली येतो आहे.
ही मंदीची चाहूल तर नव्हे? आपल्याकडे साधारण दसरादिवाळीच्या सुमारास किंमती वस्तूंना मोठी मागणी असते. या वर्षी चित्र उलट राहिले आहे.
हे असे का व्हावे? कृषिउत्पादन भरपूर आहे.धान्याची कोठारे भरलेली आहेत.शेतकर्‍यांना हमीभाव वाढवून मिळताहेत. यंदा पाऊसपाणी ठीक होते,सुगीही बरी झाली. म्हणजे शेतकर्‍याच्या हातात थोडेफार पैसे खुळखुळायला हवेत. ग्रामीण भागातील मागणी आणि खपाची आकडेवारी हाताशी नाही. पण तिथे मागणी उणावली नसावी कारण या विभागात मागणीने अजून संपृक्तता गाठलेली नाही. की विजेच्या अनुपलब्धतेमुळे फ्रिज्, टी.व्ही वगैरेंची मागणी घटली? पण विजेचे दुर्भिक्ष्य हे आजकालचे नाही.मग आताच असे काय वेगळे घडले?की वाढवलेल्या व्याजदरांमुळे उत्पादनाची नफाक्षमता घटून उत्पादन कमी झाले/करावे लागले?
मग शहरी ग्राहकांनी मोठ्या वस्तूंकडे पाठ फिरवली का? भारतातला तो सुप्रसिद्ध 'उभरता' 'बुभुक्षित' 'भुकाळ ' इ. इ. मध्यमवर्ग कुठे गेला?त्याची भूक एकदम शमली का?
जागतिक परिस्थितीमुळे इंधनाच्या किंमती वाढवाव्या लागल्या, त्याचा सर्वंकष परिणाम झालाच असणार.पण शहरी उच्चमध्यमवर्गावर, जो टक्केवारीने कमी पण संख्येने बहुराष्ट्रीय कंपन्यांचे डोळे विस्फारतील एवढा अधिक आहे, त्याच्या क्रयशक्तीवर परिणाम होण्याइतका तो खचितच नाही.
मंदी खरोखरच येऊ घातली आहे काय? की आम्ही 'मंदी,मंदी' करून उगाच भुई धोपटतो आहोत?
रुपया डॉलरच्या तुलनत घसरला तर निर्यातदारांना ते फायद्याचे ठरेल पण इंधनादि वस्तूंमुळे प्रचंड वाढलेल्या आपल्या आयातीचे काय?
ठोस आकडेवारी उपलब्ध नसली तरी ढोबळ चर्चा होऊ शकेल असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

मंदी...

recession व depression दोन्ही साठी मराठित मंदी हाच शब्द आहे काय?
सध्याची स्थिती depression च्या अधिक जवळ जाणारी आहे अशी कुजबूज आहे.

चलनाबद्द्लः-
अजिबात समजत नाही. पण तरीही शंका ही की मागील सात-आठ वर्षापासून बर्यापैकी परकिय गंगाजळी व् डॉलर असणार्‍या देशांत भारताचा नंबर बराच वर आहे. इतके असूनही आपल्या चलनाचे अवमूल्यन् कसे काय् होउ शकते हे समजले नाही.

--मनोबा

खिन्नावस्था

सध्याची स्थिती depression च्या अधिक जवळ जाणारी आहे अशी कुजबूज आहे.

सहमत आहे.

डिप्रेशनसाठी खिन्नावस्था हा शब्द योग्य वाटतो. (मनोगतावर मंदी आणि खिन्नता असे दोन शब्द दिसले.)

शहरी ग्राहकांनी मोठ्या वस्तूंकडे पाठ फिरवली का? भारतातला तो सुप्रसिद्ध 'उभरता' 'बुभुक्षित' 'भुकाळ ' इ. इ. मध्यमवर्ग कुठे गेला?त्याची भूक एकदम शमली का?

परवाच शहरातील झटपट बंद होणारी मॉलमधील दुकाने परंतु लहान शहरांत पेव फुटलेले मॉल यावर एक लेख वाचला. दुवा मिळाला तर टाकेन.

मंदी

जेव्हा पुढे जाण्याची गती काही अडथळ्यांमुळे वाढेनाशी होते तेव्हा त्या स्थितीला अवरुद्धता म्हणता येईल. ही अवरुद्धता काही काळ तशीच राहिली तर कुंठितावस्था (स्टॅग्नन्सी) येते. त्यानंतर जर गती पहिल्यापेक्षा उणे झाली तर रिसेशन येते.गती मंद होणे या अर्थी रिसेशनसाठी मंदी हा शब्द वापरता येऊ शकेल. आर्थिक आघाडीवर पीछेहाट असाही शब्दप्रयोग करता येईल. डीप्रेशनचा अर्थ अधिक व्यापक असावा. बहुधा त्यातून सर्वंकष आर्थिक अरिष्ट सूचित होत असावे.

घसरणारा रुपया

राही यांनी एका महत्वाच्या विषयावर चर्चा चालू केली आहे. या विषयावरचे माझे विचार मी एका लेखात मांडलेले आहेत. हा लेख बराच मोठा असल्याने प्रतिसाद म्हणून देण्यापेक्षा स्वतंत्र लेख म्हणून द्यावा असे वाटल्याने निराळा देत आहे. यात राही यांचा चर्चा विषय हायजॅक करण्याची अजिबात इच्छा नाही हे नमूद करतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर