उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
प्लास्टिकची विल्हेवाट
छाया थोरात
November 13, 2011 - 7:40 am
प्लास्टिकची विल्हेवाट
मी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नेरळ ( माथेरान ) या ठिकाणी राहते.
शेतजमीनीवर घर बांधुन गेले सहा महिने निसर्गाच्या सहवासात रहात आहे. डोंबिवली सारख्या शहरात गेले ३० वर्षे (जन्मापासुन ) वास्तव्य केलेले असल्यामुळे शेतात घर बांधुन राहणे खरंचच खूपच वेगळे आहे.
इथे मला एक खूपच प्रकर्षाने जाणवणारा प्रश्न म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्ट प्लास्टिक आवरणात मिळते. या वस्तू वापरल्यानंतर या प्लास्टिकची विल्हेवाट कशी करावी ? कोणी काही सुचवेल का? स्वता:च्या शेतात हा प्लास्टीकचा कचरा मी टाकू शकत नाही.
दुवे:
Comments
भंगार
प्लॅस्टिकच्या पिशव्या स्वच्छ करुन एकत्र बांधून भंगारवाल्याला द्या. कवडीमोल मिळेल, कदाचित तेवढेही मिळणार नाही, पण प्रदूषण न केल्याचे समाधान मिळेल.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा
कळले नाही
सर्व गोष्टी प्लास्टिकच्या आवरणात मिळतात हे मान्य, प्लास्टिकची सहज विल्हेवाट लावता येत नाही हेही मान्य पण स्वतःच्या शेतात कचरा का टाकावा? कचरापेटी नाही का?
विल्हेवाट
तुमच्याकरिता फक्त प्लास्टिक कचर्याचाच प्रश्न असेल तर त्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये विक्रेत्यांकडे ज्या पद्धतीच्या लाकडी पेट्या उपलब्ध असतात त्याप्रकारची एक आपल्या घरी आणून परसदारात ती ठेवून देणे आणि तिथे प्लास्टिक कचर्याचा साठा करणे. नेरळ (माथेरान) हे प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ असल्याने तिथे नगरपालिकेतर्फे अशा कचर्याची [विशेषतः प्लास्टिक] एकत्रित "इनसिनरेटर" द्वारा विल्हेवाट लावली जाते [हे मी पाहिले आहे]. त्याशिवाय घन कचर्यासाठीही तिथे "हॅमरिंग प्लॅन्ट्स्" आहेत. महिन्यातून एकदा तुम्ही आणि तुमच्या आजुबाजूच्या रहिवाश्यांनी असा प्लास्टिकचा ढीग जमला की वॉर्ड् ऑफिसरला फोन केल्यास त्यांच्यातर्फे कचरागाडी अगदी दारात येऊ शकते, नव्हे ती त्यांची ड्युटीच आहे.
पण याचा अर्थ असा नव्हे की नगरपालिकेनेच येऊन तो प्लास्टिकचा निचरा करणे गरजेचे आहे. तुम्ही आणि तुमच्यासारखे दोनतीन लोकदेखील छोट्या पातळीवर देशी इनसिनरेटर शेताच्या एका कोपर्यात बांधून घेऊ शकता व तिथे हा जमा होणारा ढीग जाळून टाकू शकता. हाही स्वयंप्रेरणेचा एक भाग होऊ शकतो.
अशोक पाटील
शक्य नसते.
एकाद्या खोलीत नुसत्या प्लॅस्टिकला आग लावून 'देशी इन्सिरनरेटर' बनत नाही. या भट्ट्यांतून अतीउच्च तापमान तयार करून त्यात प्लॅस्टिकचे विघटन केले जाते. योग्य प्रकारे इन्सिनरेटर बनविण्याचा खर्च,(लाखांत जातो) व जाळण्याचा डीझेल/विजेचा खर्च पहाता मुळातच बायोडिग्रेडेबल प्लास्टीक वापरणे हा इलाज आहे.
बाजारात जाताना हातात कापडी पिशवी नेल्याने भरपूर कचरा कमी होतो हा माझा अनुभव आहे. आधीपासूनची रॅपर्स एकत्रकरून रद्दीवाल्याला फुकट देणे हा दुसरा पर्यायही चांगला आहे.
पर्याय
होय डॉक्टर, ते मला माहीत होते. माझ्या नजरेसमोर तो इथेच प्रतिसादात दिलेला सूरत कार्पोरेशनचा जर्मन मेकचा (ज्याची किंमत २००३ साली ८५ लाख दाखविली गेली होती) हाय पॉवर्ड इनसिनेरेटरच होता. तुम्ही म्हणता तसे खाजगी पातळीवर इतका खर्च करणे संभवत नाहीच, पण भुश्श्याच्या शेगड्या करून (ज्याला 'बुरुंडी' असे नाव आहे) छोट्या पातळीवर, प्रयोगात्मक तत्वावर, एकत्रितरित्या असे प्लॅस्टिक जाळले जात असल्याची उदाहरणे मी पाहिली आहे. नेरळमध्ये थोरात आणि आजुबाजूच्या परिसरातील लोक असे आव्हानात्मक प्रयोग करून त्याची उपयुक्तता जाणू शकतील, या हेतूने तो विचार मांडला होता.
(माझा उद्देश इतकाच की प्रत्येक दुखण्यावर नागरिकाने नगरपालिकेला वेठीस न धरता, स्वतःही इनोव्हेशन दाखविणे आजकाल गरजेचे झाले आहे.)
अशोक पाटील
एम्पिसीबी
गुरुजी,
मायबाप सरकारने फिरंग्यांच्या 'वेस्ट डिस्पोजलाच्या' पद्धती पाहून एक नवीन "खाते" सुरू केलेले आहे. एम्. पी. सी. बी. असे त्याचे नांव. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. त्यांना असल्या इनोव्हेशन्स वा इन्सिनरेटर्स चालत नाहीत. एक लाख रुपये दंड अन १ वर्ष तुरुंगवास् असली शिक्षा आहे त्यांच्या नियमात. बायोमेडिकल वेस्टच्या निमित्ताने हे आमच्या बोकांडी बसले आहे.
कचरा गोळा करणे या एका व्यवसायात किती पैसे आहेत हे कळलं तर मग समजेल की कचरा माफिया का तयार झाल्या आहेत. कधीतरी या कचर्याचे अर्थशास्त्र असे लिहीन त्यात सांगेन.
इनसिनरेटर
प्लॅस्टिक जाळून टाकणे हा माझ्या मते काही योग्य उपाय नाही. (कचरा उघड्यावर जाळला तर भारतातील काही शहरांत दंड आकारला जातो.) विघटनशील(बायोडिग्रेडेबल) कचर्याची कंपोस्टिंग, व्हर्मीकंपोस्टिंग अशा पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि प्लॅस्टिकबाबत 'थ्री आर' - रिड्यूस, रीयूज, रीसायकल- हे धोरण स्वीकारणे योग्य आहे. प्लॅस्टिक जाळले की होणारे प्रदूषण बघीतले की त्यापेक्षा प्लॅस्टिक नैसर्गिकरीत्या कुजून नष्ट होण्याची (दोनशे वर्षे!) वाट बघणे बरे, असे वाटते.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा
प्रयोगशीलता
वेल्. बंदिस्त ठिकाणी इनसिनरेटरचा उपयोग करून प्लॅस्टिकची विल्हेवाट लावली जात असल्याचे मी सूरत महानगरपालिकेच्या एका डेपोत पाहिले होते. जर्मन मेकची ती यंत्रणा अवाढव्य दिसत होती. घंटा गाडीतून (नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी) गोळा केलेल्या एकत्रित कचर्यातून हरेक प्रकाराचे, विभिन्न जाडीचे, जातीचे, प्लॅस्टिक वेगळे करण्याची यंत्रणा मात्र 'मानवीहाता'चीच होती. असा वेगळा केलेला तो कचरा नंतर कॉम्पॅक्टर साधनाने एक गठ्ठा करून त्यावर रासायनिक फवारे (म्हणजे कुठले ते या क्षणी मला आठवत नाही, पण किमान आठ-दहा मिनिटे स्प्रे मारला जात होता, वासही उग्र होताच) मारून ते मुरेपर्यंत बाजूला ठेवले जात होते. पुढील प्रक्रिया मात्र सर्वकाही यंत्राने झालेल्या पाहिल्या. एकावेळी तसे कॉम्पॅक्ट केलेले वीस-पंचवीस गठ्ठे यारीने त्या इनसिनरेटरमध्ये स्वाहा होत होते. लांबून पाहाणार्या आमच्यासारख्यांना वातावरणातील हिट जाणवत होती, पण धुराचा कुठेही मागमूस दिसला नाही.
अर्थात आपली ही चर्चा विस्तृत प्रमाणावर गोळा होणार्या प्लॅस्टिक कचर्याविषयी चालली आहे. नेरळ सारख्या ठिकाणी राहाणार्यांनी प्लॅस्टिक एकत्र करून एकतर स्थानिक नगरपालिकेचे सहकार्य मिळवावे, नाहीतर निदान या निमित्ताने तरी सहासात कुटुंबांनी एक सायंकाळ 'निचरा' या विषयासाठी जमून ठोस उपायाबाबत रिसर्च करणे क्रमप्राप्त आहे.
(रिसर्चची व्याख्या डॉ.अभय बंग यानी अशी केलेली आहे की, : "रिसर्च - नॉट ऑन दि पीपल, बट वुईथ दि पीपल"....आणि हेच खरे आहे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत उठसूट शासन आणि नगरपालिकेला वेठीस धरण्यापेक्षा चार गरजूंनी एकत्र येणे जरूरीचे मानले पाहिजे.)
अशोक पाटील
डांबरी रस्ता
प्लॅक्टीकच्या पिशव्या डांबरी रस्ता बनविताना डांबरात मिसळल्यास उत्तम प्रतिचे डांबर बनते असा पेपर आय आयटी वाल्यांनी सादर केल्याचे वाचनात आले होते. त्याचे पुढे काय झाले कोणास ठाऊक
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
आमच्या गावाला या ..
पुण्याला या तुम्ही. मस्त शहर आहे. प्लास्टीक ची सवय होउन जायील. :)
---------------------
-धनंजय कुलकर्णी
डोंबिवली सारख्या
"डोंबिवली सारख्या शहरात गेले ३० वर्षे (जन्मापासुन ) वास्तव्य केलेले असल्यामुळ........"
सगळा कचरा गोळा करुन डोंबिवलीत आणुन टाकुन द्या, योग्य विल्हेवाट लागेल.
हा हा हा...
मस्त.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
प्लॅस्टिकपासून इंधन
प्लॅस्टिकपासून इंधन तयार करण्याच्या रासायनिक कृतीचा शोध नागपूर येथील डॉ.झाडगावकर यांनी लावला आहे असे पाच सहा वर्षांपूर्वी ऐकले होते. त्याचे व्यावसायिक रूप अजून पर्यंत का पुढे आले नाही ते समजत नाही.