दिवाळी २०११ मधील "ढीगभर लक्षणे" बाबत चर्चा

दिवाळी अंकातील "ढीगभर लक्षणे की एकसंध व्याधी" (दिवाळी अंकातील दुवा.) या लेखाबाबत चर्चा या धाग्याखाली करूया.

प्रत्येक प्रश्न/टिप्पणी या धाग्याखाली उपप्रश्न असू शकतील.

एका प्रश्नाचे उत्तर येथे सुरुवातीलाच देतो : "नेमके कोणाचे प्रबोधन अथवा नेमका काय हेतू समोर ठेवून लेख लिहला (टारगेट ऑडीयन्स) याचा खुलासा आल्यावर लेख नीट समजायला मदत होईल."
उत्तर : वैद्यकाबाबत, आणि एकुणातच विज्ञानाबाबत जिज्ञासा असणारे, आणि प्रामाणिक वादविवादांतील विवादकांचे आधार स्वतःहून ढोबळमानाने पडताळू इच्छिणारे असे वाचक या लेखाचे लक्ष्य होत.

आपणापैकी अनेकांना
(१) "ही घ्या प्रश्नांची अंतिम उत्तरे" असे बाबावाक्य नको असते,
(२) "हा विषय सगळ्यांसाठी अनाकलनीय आहे" अशी नि:सार बोळवणही नको असते,
परंतु
(१) संदिग्धतेमध्येही कृतिशील निर्देश हवे असतात,
(२) सारासारविवेकाच्या सदैव चालत असलेल्या प्रक्रियेचे आकलन हवे असते.

अशा वाचकांना या लेखातील विचारधारा उपयोगी पडू शकेल.

अशा वाचकांची जिज्ञासा वैद्यकाबाबत असेल, भूगर्भशास्त्राबाबत असेल, अर्थशास्त्राबाबत असेल... मानवी जीवनाला स्पर्श करणार्‍या कुठल्याही विज्ञानाबाबत असेल. "ढीगभर लक्षणे" लेख त्यापैकी वैद्यकातील कुतूहलास अनुसरून आहे. आपणा सर्वांच्या जिज्ञासेला आव्हान देणारी वैद्यकातील संदिग्धता कुठली? त्यापैकी एक ही जरूर आहे : वर्तमानपत्रात "उपटसुंभ" नवीन रोग अधूनमधून घबराट पसरवतात : एड्स काय, सार्स काय, अमुक काय आणि तमुक काय. यात खरे-खोटे म्हणा, उपयोगी-निरुपयोगी म्हणा, किती घाबरावे-किती स्वस्थ राहावे म्हणा... हे कसे ठरवता येते? त्यावरून आपण सहजच या मूळ प्रश्नापाशी येऊन ठेपतो :
"शरिराच्या लक्षणांच्या वाटेल त्या संचालाच आपण व्याधी म्हणत नाही. पण मग कुठल्या एकत्रित संचाला एकच व्याधी असल्याचे ठरवतो?" याच वाक्यांनी दिवाळी अंकातील लेख सुरू होतो, व पुढे जातो.

लेखात "मेटाबॉलिक सिन्ड्रोम" बाबत अद्ययावत आणि समजावयास सोपी माहिती आहे. पण ती देणे हा लेखाचा उद्देश खचितच नाही. या विषयाबाबत संदिग्धता आहे, आणि संदिग्धता कशी सोडवता येते, त्याबाबत विश्लेषण आहे. असे कृतिशील उदाहरण दिल्याशिवाय आदला तात्त्विक ऊहापोह फक्त "तात्त्विक"च राहिला असता. हे तात्त्विक विश्लेषण प्रत्यक्ष उदाहरणात लागू करून दाखवल्यामुळे वाचक स्वतःला महत्त्व वाटणार्‍या संदिग्ध विषयाबाबत स्वतःहून लागू करण्यास उद्युक्त होतील, अशी आशा आहे. येथे तपशिलांबाबत प्रबोधनाचे उद्दिष्ट्य दुय्यम आहे, आणि विषयाबाबत सबलीकरणाचे उद्दिष्ट्य प्राथमिक आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

खुलाश्याबद्दल धन्यवाद.

नक्कीच उपयुक्त विचारधारा आहे. "मेटाबॉलिक सिन्ड्रोम" उदाहरणामुळे तर लक्षवेधी, विचारप्रवर्तक. :-)

संलक्षण

धनंजय च्या लेखातील सिंड्रोम ला संलक्षण हा शब्द खुप आवडला.
अवांतर- इर्रिटेबल बाउल् सिंड्रोम ला मराठीत काय म्हणता येईल? ( सध्या त्याने त्रस्त असल्याने ही उत्सुकता )
प्रकाश घाटपांडे

नावाचे जाऊ द्या

नेहमीचे दूध बंद करून लॅक्टोज फ्री दूध सुरू करा, अगदी चहातही तेच वापरा. भारतात मिळते की नाही माहिती नाही. तसेच कॉफी आणि कृत्रिम गोड पदार्थ घातलेले अन्नपदार्थ (मिठाई किंवा कोल्ड ड्रिंक्स्) बंद केल्यास हा रोग बरा होऊ शकतो.

ते ही झालं

लॅक्टोज इन्टॉलरन्स नाही आहे हा. सगळे उपाय झाले/ चाल्लेत ( पोटाचे विकार तज्ञ ते मानसोपचार तज्ञ ) किचकट प्रकरण आहे. इथे आतड्याचा दाह असा प्रतिशब्द वापरला आहे. पण तो पटत नाही.
अश्रद्धेचे परिणाम काहींचे मत

प्रकाश घाटपांडे

बाउल् नाही, बॉवेल्..

त्रासदायक अजार आहे.
आपण गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्टना दाखविले आहे की नाही ते समजले नाही. पण आहारात अन् मुख्य म्हणजे पाण्याचे पथ्य (फक्त घरचे. घरच्याच एक्वागार्डचे पाणी) इ. बदल करून बराच फायदा होतो.

दुरुस्ती

दुरुस्ती बद्दल आभार. मराठीत सरळ आय बी एस च म्हणतात. गॅस्ट्रोएंटेरॉलोजिस्टना दाखवले आहेच. त्यांचे मते हा सायकोसोमॅटिक आहेच. आंतरजालावर शोधले असता यावर रामबाण इलाज अद्याप नाही. पथ्य हाच मार्ग. या संलक्षणाचे ठोस कारण सापडले नाही. गट लिंक , ई कोलाय वगैरे कारणे आहेत. त्यावर मतभेद ही आहेत. असो. सामाजिक संकोच व मर्यादा येतात हे मात्र खरे
प्रकाश घाटपांडे

 
^ वर