हे वृत्त काय आहे?
प्राथमिक शाळेत चौथ्या इयत्तेत आम्हाला एक धबधब्याविषयीची कविता होती. तिच्या पहिल्या दोन ओळी माझ्या स्मरणात आहेत त्या अशा:
किती उंचावरूनी तू
उडी ही टाकिशी खाली
जणो व्योमातुनी येशी
प्रपाता जासि पाताळी.
गेले बरेच दिवस मी ह्या कवितेचे वृत्त काय असावे असा विचार करीत आहे. तसे वृत्त सरळधोपट दिसते. त्याच्यामध्ये प्र॑त्येकी ८ वर्णांचे (syllables) ४ पाद आहेत आणि प्रत्येक पाद
य र गु गु असा आहे. हे वर्णसमवृत्त आहे असे दिसते. ह्याचे नाव काही केल्या मला मिळालेले नाही.
पिंगलाचे छन्दःसूत्र, केदारभट्टकृत वृत्तरत्नाकर, आपटे संस्कृत-इंग्लिश शब्दकोश, तसेच उपलब्ध अशी दोन वृत्तविषयक मराठी पुस्तके मी शोधली पण असे वृत्त कोठेच दिसले नाही. केवळ http://sanskrit.sai.uni-heidelberg.de/Chanda/HTML/list_all.html ह्या संस्थळी हे वृत्त 'कुलाधारी' नावाचे आहे असा धागा दिसला. प्रत्यक्ष वृत्ताचे वर्णन तेथेहि नाही. 'कुलाधारी' असे वृत्त अन्य कोठेच दिसत नाही.
ह्या कवितेचे वृत्त कोणते हा माझा पहिला प्रश्न. तसेच ह्या कवितेचा कवि कोण आणि पूर्ण कविता कोणास माहीत आहे काय असा दुसरा प्रश्न
Comments
धबधबा
भवानीशंकर पंडित यांची 'धबधबा' नावाची ही कविता जिचा उल्लेख 'गज्जल' असा केला गेला आहे.
"आठवणीतल्या कविता" या क्रमांक ४ च्या संचात ही कविता आणि तीवरील भाष्यही उपलब्ध आहे. तुमच्याकडे हा संग्रह नसेल असे गृहित धरून ती कविता इथे देत आहे :
धबधबा
[गज्जल]
किती उंचावरूने तूं | उडी ही टाकिसी खालीं
जणों व्योमांतुनी येसी | प्रपाता ! जासि पातालीं. १
कड्यांना लंघुनी मागें | चिपांना लोटिसी रागे;
शिरीं कोलांटुनी वेगे | शिळेचा फोडिसी मौली ! २
नगाचा ऊर फोडोनी | पुढे येसी उफाळोनी;
उडे पाणी फवारोनी | दरीच्या सर्द भोंताली. ३
तुषारांचे हिरेमोत्यें | जणों तू फेंकिसी हाते;
खुशीचे दान कोणाते | मिळे ऐसे कधी काळी ? ४
कुणी तांदूळ् वा कांडे | रुप्याचे भंगती हांडे
मण्यांचा की भुगा सांडे | कुणाच्या लूट ही भाली ? ५
घळीमाझारिं घोटाले | वरी येऊनिं फेंसाळे,
कुठे खाचांत् रेंगाळे | करी पाणी अशी केली. ६
उभी ताठ्यांत् जी झाडे | तयांची मोडिसी हाडें;
कुशीं गेसी लव्हाळ्यांना | तयांचा तूं जणो वाली ! ७
विजेचा जन्मदाता तूं | प्रकाशाचा निशीं हेतू;
तुला हा मानवी जंतू | म्हणोनी फार सांभाळी ! ८
~ संपादक मंडळाने या कवितेवर केलेल्या टिपणीत वृत्तांसंदर्भात मात्र कसलाही उल्लेख नाही. फक्त उदय-वाचन-२ मध्ये ही कविता 'हिरेमोती' शीर्षकाने आली होती असे म्हटले आहे.
धबधबा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे या कवितेचे शीर्षक असून कवि भवानीशंकर पंदित हे आहेत.पूर्ण कविता अशी:
...............धबधबा.........
[गज्जल]
जणों व्योमांतुनी येशी प्रपाता जाशी पाताळी|
.
कड्यांना लंघुनी मागे चिपांना लोटिसी रागे|
शिरी कोलांटुनी वेगें शिळेचा फोडिसी मौली|
.
नगाचा ऊर फोडोनी पुढे येसी उफाळोनी|
उडे पाणी फवारोनी दरीच्या गर्द भोंताली|
.
तुषारांचे हिरेमोत्यें जणों तू फेंकिसी हातें|
खुशीचे दान कोणातें मिळे ऐसें कधी काळी?
.
कुणी तांदूळ वा कांडे रुप्याचे भंगती हांडे|
मण्यांचा की भुगा सांडे कुणाच्या लूट ही भालीं?
.
घळीमाझारी घोटाळे वरी येऊनि फेंसाळे|
कुठे खाचांत रेंगाळे करी पाणी अशी केली|..(केली=क्रीडा)
.
उभीं ताठ्यांत जी झाडें तयांची मोडसी हाडें|
कुशीं घेसी लव्हाळ्यांना तयांचा तूं जणों वाली|
.
विजेचा जन्मदाता तूं प्रकाशाचा निशीं हेतू|
तुला हा मानवी जंतू म्हणोनी फार संभाळी|
..........भवानीशंकर पंडित.........
समांतर
मलाही याचे वृत्त कळले नाही.
परंतु "तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशील का" या गाण्याच्या वृत्ताशी ते जुळते.
नितिन थत्ते
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे
ही कविता माझ्या आईच्या तोंडून विशिष्ट चालीवर म्हटलेली ऐकलेली आहे. या चालीवर इतरही कविता ऐकलेल्या आहेत. मला संगीताचं तितकं ज्ञान नाही, खाली साधारण स्वरांचे चढउतार दिलेले आहेत. चुभुद्याघ्या.
किती उंचा SS वरूने तूं SS | उडी ही टाSSकिसी खालीं
५ ५ ५ ९ ९ ६ ८ ६ ७ ७ | ६ ८ ६ ७ ७ ७ ६ ६ ५
जणों व्योमां SS तुनी येसी SS | प्रपाता ! जाSसि पातालीं.
३ ३ ३ ५ ५ ३ ३ ३ ४ ४ | २ २ २ ३ ३ १ १ १ ०
याच वृत्तात
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे
हेही आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
जगी या खास वेड्यांचा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"किती उंचावरूनी तू...."ची चाल गुणगुणता दोन पद्ये आठवली.त्यांतील एक -खरा तो एकची धर्म..." श्री.राजेश यांनी उद्धृत केले आहेच.
दुसरे रणदुंदुभी(ले.वीर वामनराव जोशी) नाटकातील पद. त्यांत पुढील पंक्ती आहेत--
.
कुणाला वेड कनकाचे कुणाला कामिनी जाचे|
भ्रमाने राजसत्तेच्या कुणाचे चित्त ते नाचे|
कुणाला देव बहकावी कुणाला देश चळ लावी|
.
मराठी नाट्यसंगीत(बाळ पंडित) या पुस्तकात या गीताची चाल गझल असे लिहिले आहे.
.
या छंदात प्रत्येक ओळीत आठ आणि आठच अक्षरे असतात.
श्रींइतीन थत्ते म्हणतात "तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशील का" या गाण्याच्या वृत्ताशी ते जुळते."
चालीत बरेचसे साम्य आहे हे खरे.पण दुसर्या ओळीत नऊ अक्षरे आहेत त्यामुळे ...मला तू दूर नेशील का?" हे चालीत म्हणताना खटकते.
अगदी अगदी
हेच लिहावयाचे होते.
थोडी ढील
गुरूऐवजी दोन लघु योजण्याबाबत थोडी ढील असावी. त्यामुळे कधीमधी ९ अक्षरे येत असावी :
अधोरेखित ठिकाणी एका गुरू अक्षराऐवजी कवीने दोन लघु अक्षरे घेतलेली आहेत.
श्री. नितिन थत्ते यांनी दिलेल्या गाण्यात ध्रुवपद वेगळ्या वृत्तात, आणि कडवी वेगळ्या वृत्तात असावीशी वाटतात.
वेगळी चाल
>>श्री. नितिन थत्ते यांनी दिलेल्या गाण्यात ध्रुवपद वेगळ्या वृत्तात, आणि कडवी वेगळ्या वृत्तात असावीशी वाटतात
हो.
दिलेल्या दुव्यावर ऑडिओ ऐकण्याचीदेखील सोय आहे.
नितिन थत्ते
लघु गुरु चिन्हे
या विषयावरून एक अवांतर.
सध्या मराठी पुस्तकेसाठी आम्ही माधव ज्युलियन यांचे काव्य शास्त्रावरचे पुस्तक करीत आहोत. त्यात कित्येक वृत्ते दिली आहेत.
मात्र एक अडचण येत आहे. लघु-गुरु साठी मराठी युनिकोड मध्ये कुठली चिन्हे वापरावीत?
प्रमोद
माधव जूलियन - छंदोरचना
सध्या मराठी पुस्तकेसाठी आम्ही माधव ज्युलियन यांचे काव्य शास्त्रावरचे पुस्तक करीत आहोत. त्यात कित्येक वृत्ते दिली आहेत.
हे पुस्तक म्हणजे 'छंदोरचना' हा त्यांचा प्रबंध आहे असे वाटते. माझ्या समजुतीनुसार हे पुस्तक काव्यशास्त्र म्हणजे Aesthetics वर नसून छंदःशास्त्र म्हणजे Prosody वर आहे. बर्याच राजकारणानंतर त्यांना ह्या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने D. Litt. ही पदवी दिली. त्यांच्या अकाली मृत्यूच्या काही दिवसच आधी त्यांना हा मान मिळाला.
नुकतेच दुसर्या एका चर्चागटात मी ह्या पुस्तकाचा उल्लेख केला होता आणि ह्याची digital version कोठे उपलब्ध आहे काय असे विचारले होते. तुम्ही हेच काम अंगावर घेतले आहे हे वाचून आनंद वाटला. पूर्ण झाल्यावर आम्हांस अवश्य कळवावे.
(अवांतर - माधव जूलियनांचे गं.दे.खानोलकरलिखित चरित्र तसेच त्यांच्या पत्नीने लिहिलेले 'आमची अकरा वर्षे' हे पुस्तक अशी मी कित्येक वर्षांपूर्वी वाचली होती. वि. द. घाटेंच्या लिखाणातहि त्यांच्याबद्दलच्या अनेक हृद्य आठवणी आहेत कारण दोघेहि बालवयात बडोद्यात एकत्र होते असे स्मरते. १९२०च्या पुढेमागे पुण्यात कसे 'बुद्रुक' वातावरण होते ह्याची कल्पना माधव जूलियनना 'वरदा' प्रकरणात फर्गसन कॉलेजमध्ये जो त्रास दिला गेला त्यावरून चांगली येते.)
धाग्याचा विषय असलेले वृत्त 'जगी हा खास वेडयांचा' ह्या गाण्यातहि आहे हे मलाहि आत्ताच सुचले होते तेव्हढयात यनावालांची हाच उल्लेख असलेला प्रतिसाद पाहिला.
'मराठी आमुचा बाणा, शिवाजी आमुचा राणा' ह्यामध्येहि हेच वृत्त दिसते. गाण्याचे पुढचे शब्द कोणास ठाऊक आहेत काय?
स्क्रिब्डी वर पुस्तक
मागे श्री. चित्तरंजन यांनी स्क्रिब्डी वर पुस्तक ठेवल्याचा दुवा दिला होता. (डाऊनलोड करता-करता दोनदा अडकले, मग पुन्हा उतरवून घ्यायचा प्रयत्न मी केला नाही.)
युनिकोड आणि लघुगुरूची चिन्हे
लघुगुरूसाठी माधवराव पटवर्धनांनी वापरलेली चिन्हे ही सध्या युनिकोडाच्या देवनागरी चिन्हांच्या संचात समाविष्ट नाहीत. ही चिन्हे मुळात पारंपरिक देवनागरी चिन्हेही नाहीत. छंदःशास्त्राच्या संस्कृत परंपरेत लघू अक्षरासाठी '।' हे चिन्ह तर गुरू अक्षरासाठी 'ऽ' हे चिन्ह वापरण्यात येत असे. वृत्तदर्पणकार परशुरामपंत गोडबोले ह्यांनी लॅटिन परंपरेतून आलेली ब्रीव ( ˘ ) आणि मॅक्रोन ( ¯ ) ही चिन्हे अनुक्रमे लघुगुरूकरता वापरून रूढ केली. ह्याचा उल्लेख माधवरावांनी 'मराठी छंदोरचने'त (मराठी छंदोरचना, १९३७ पृ.६८) केला आहे.
तेव्हा सध्या मराठीत वापरण्यात येणारी ही चिन्हे चिन्हसारणीत (कॅरेक्टरमॅपात) सर्वसाधारण लॅटिन चिन्हांच्या गटात सापडतात. ती चिन्हसारणीतून शोधून वापरता येतील.
व्योमगंगा
बहुधा हे व्योमगंगा वृत्त आहे.
खात्री नाही, पण वाचतांना तसे वाटले. तपास करतोच.
वियद्गंगा
ह्या वृत्ताचे नाव वियद्गंगा आहे. यमाचा राधिका गागा ! यमाचा राधिका गागा | असे.
वियद्गंगा हे तसे लोकप्रिय वृत्त आहे.
व्योमगंगा हे राधिका गा | राधिका गा ! राधिका गा | राधिका गा असे आहे.
बरोबर
वियदगंगाच ! दुरूस्तीबद्दल आभारी आहे.
याच वृत्तात भटांची एक गझल (माझी आवडती)-
"जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा
विजा घेऊन येणार्या पिढ्यांशी बोलतो आम्ही !"
हे कोठे सापडले?
ज्ञानेश आणि चित्तरंजन,
वियद्गंगा अथवा व्योमगंगा ह्या वृत्तांची लक्षणे इत्यादि कोठे पाहावयास मिळतील?
हे पहावे
http://www.manogat.com/node/13552
मनोगतावर वृत्त-छंद इ. मध्ये रस असणारे अनेक सदस्य आहेत. तिथे अशा प्रकारचे बरेच लेख सापडतील असे वाटते
- दिगम्भा