व्वा... क्या ब्बात!

आत्ताच "हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने" हे http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY इथे पूर्ण ऐकलं.

मूळचा मी राहणारा औरंगाबादचा. जुनं औरंगाबाद म्हणजे धाकटं हैद्राबादच म्हणता येइल. निजामाची मराठवाडा प्रांताची राजधानी. नवीन औरंगाबाद मध्ये राहिलो तरी तिथली ती खास जुनी मोगलाइ ष्टाइल, नवाबी कारभार ह्याचं थोडं थोडं दर्शनही झालच.
पण ती तिथली खास अशी वाटणारी मुसलमानी भाषा, त्या त्यांच्या टपर्‍यांवर लागलेल्या वेगवेगळ्या कव्वाल्या, त्यातले ते त्यांचे खास् उच्चार....
ह्या माहिती तंत्रज्ञाननगरीत पोटापाण्यासाठी आल्यापासून हे सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. तिथं रमजानचा भोंगा कधी कधी भल्या पहाटे त्रस्त करतोय असं वाटायचं. पण कधी मधेच त्यातल्या लोकांना रमजानच्या "सेहरा"साठी का कशासाठीतरी उठवायला लागलेली काही गाणी, कव्वाल्या, घोषणा ह्याही आवडायच्या.
विशेषतः एखाद्या कव्वालीत सामान्य माणसाच्या मनातले भाव , त्याचे प्रकट केलेले राग्-लोभ मनाला भावतात.
कधी कधी अस्सल उर्दु गझल किंवा कव्वाली उर्दुशी फारसा परिचय नसल्यानं पूर्ण समजली नाही तरी काहितरी आवडतच. "लाहोल मिलाकुवत" किंवा "क्या ब्बाsssत" असलं काही तोंडातून निघून जातच जातं.

आता वरती दिलेला दुवाच बघा की. सगळ्या लावण्यवतींबद्दल असलेली तक्रार अगदि सुरेल मांडलीए.
गोड दिसणार्‍या पण दुष्ट, क्रूर आणि नजरेने कत्ल करणार्‍या रूपगर्वितांबद्दलची तक्रार ह्याहून अचूक ती काय मांडणार?
अगदि साधी पेटी-तबला-डफ अशी वाद्ये वापरलेली दिसताहेत. पण शब्दरचनेसाठी अगदि अचूक ठेका, अचूक चाल!
उच्चार सुद्धा बघा :- "हम भी कह देंगे हम लूट गए शराफत में" ह्या ओळी खास इस्माइल आझाद ह्यांच्या आवाजतल्या उच्चारात "हम भी ख्येह द्येंगे शराफ॰त म्यें" अशा बनून येतात. भाषिक नमुना म्हणून मला ही शैली नक्कीच आवडते.
एकेक शब्द अगदि चपखल बसतोय. मुद्दाम काही एक चालीत बसवायचे म्हणून काहिच नाही. शब्द आणि संगीत अगदि एकरूप झाल्यासारखे वाटतात.आपण तर बुवा गाण्यावर फिदा झालोय. बस्स इतकच सांगायचं होतं. आवर्जून ऐका असं सुचवायचं होतं, म्हणून इथे धागा टाकतोय. संगीतातल्या जाणकारांनी भर घातल्यास उत्तम.
दुवा पुन्हा देतोयः-http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY

Comments

कव्वाली, त्यातली जुगलबंदी ऐकायला खूप आवडते.

माझ्या आवडत्या कव्वाली -
(१) माटी के पुतले तुझे कितना गुमान है
(२) देख तमाशा लकडी का
(३) चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा
(४) कैसे बेशर्म आशिक है ये आज के

या कव्वालींची कॅसेटच लहानपणी घरात होती. आणि गायक-गायिकांचा आवाज खूप वेगळा असा "खडा आवाज" म्हणतात् तसा आहे त्यात. म्हणजे त्या त्या प्रदेशाची "खूशबू" (वैशिष्ट्य) त्या आवाजात जाणवते. मला वाटतं चवथं गाणं पुतलीबाई नावाच्या गायिकेने गायलेले आहे. हे कोणत्या प्रांतातील लोक ते माहीत नाही पण फार छान वाटतं ऐकायला.

कव्वाली, त्यातली जुगलबंदी ऐकायला खूप आवडते.

साब्री ब्रदर्स्

श्री.मन यांच्या या उत्स्फुर्त लेखन वाचनाचा आनंद घेत असतानाच एक विचित्र योगायोग आठवला, तो असा की त्यांच्या या लेखाच्या अगोदरच सहा दिवसापूर्वी 'कव्वाली' क्षेत्रातील एक बुजुर्ग नाव 'मकबूल अहमद साब्री' यांचे दक्षिण आफ्रिकेतील एका दवाखान्यात वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. 'साब्री ब्रदर्स' या नावाने ओळखली जाणारी ही दुक्कल आता फक्त स्मृतीतच राहिल्. गुलाम फरीद हे १९९४ मध्येच अल्लाघरी गेले होते. कव्वालीला खर्‍या अर्थाने घराघरात पोहोचविण्याची कामगिरी करणार्‍या कलाकारांच्या यादीत साब्री ब्रदर्स यांचा सिंहाचा वाटा आहे हे मानले पाहिजे.

वरची 'अल् हिलाल' मधली कव्वाली तर लाजवाब अशीच आहे. इस्माईल् आझाद, नुसरत फतेह अली खाँ, जॉनीबाबू कव्वाल, अजिझ नाझा आदीनी हा वारसा पुढे चालविला आणि आता राहत फतेह अली.

'हमे तो लूट् लिया' पडद्यावर साकारणारा कलाकार 'शेख' जो अशाच छोट्याछोट्या भूमिकेत 'सी' ग्रेड म्हटल्या गेलेल्या चित्रपटात अधुनमधून येत होता. त्यातल्या त्यात मेहमूदच्या 'बॉम्बे टु गोवा' मध्ये बसमध्ये मुलाबरोबर भजी खात बसलेला "शेख" बाप आठवणीत राहिल.

लाहौल विला कूव्वत

"लाहोल मिलाकुवत" किंवा "क्या ब्बाsssत"

माझ्या माहितीनुसार उर्दूत/हिंदुस्तानीत "लाहौल विला कूव्वत" हा तुकडा सहसा कुणी भलतेसलते, विपरीत बोलले तर उद्गारला जातो. थोडक्यात, 'सत्यानास हो', 'बेड़ा गर्क हो नासपीटे' ह्या क्याटेगरीतला आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

"लाहौल विला कूव्वत"

मला आठवते की माझ्या काही मुस्लिम मित्रांसमवेत [त्यातील एक 'काझी' आहे] "लाहौल..." वर चर्चा केल्याचे.

ढोबळमानाने "लाहौल विला कूव्वत" हा एखाद्या विपरित उद्गाराला 'तोबा तोबा' अशा अर्थाने उद्देश्यून काढला जातो. आपल्याकडे जसे 'शुभ बोल रे नार्‍या' म्हटले जाते तशा अर्थानेच काहीसे. तसे पाहिले तर "लाहौल विला कूव्वत" हे अर्धेच वचन आहे, पूर्ण वाक्य "लाहौल वा ला कुव्वत इला बिल्लाह" असे असून् त्याचा अर्थ 'देवाच्या करणीपुढे आपण सारे तुच्छ आहोत' ['...सबब तू ज्यादाचा भाव खाऊ नकोस' असाही सल्ला त्यातून ध्वनीत होतो.]

अस्सय् होय...

इतरही बहुतांश गोष्टींप्रमाणेच उर्दुतही आम्ही अडाणीच. नुसत्या आजुबाजुच्या गप्पा त्याही अर्धवट ऐकुनच आमचं काय ते शिक्षण.
सापडेल ते, सुचेल तसं लिहिल्याशिवाय राहवत नाही. आणि अशा चुका जाणवल्या की कधी कधी आपलाच पुन्हा लेख वाचवत नाही.
लेखाला स्व संपादनाची सोय इथे असती तर किती बरं झालं असतं.

--मनोबा

उर्दू

अरे बाप रे ! असं म्हणू नका मनोबा. मी "लाहौल.." चे पूर्ण रूप सांगितले म्हणजे अगदी कै. डॉ.झाकीर हुसेन यांचा शिष्य होतो असा बिलकुल अर्थ होत नाही. कव्वालीमुळे झालेला त्या अनुषंगाची एक चर्चा आठविली इतकेच.

तसे पाहिले तर माझीही उर्दूबद्दलची आवड त्या भाषेत असलेल्या विलक्षण नजाकतीमुळेच आहे. फार खोलवरचे ज्ञान आहे असेही नाही.

औरंगाबाद

मनोबा म्हणतो तशी औरंगाबाद शहरावरची ही इस्लामिक छाप अगदी जाणवण्यासारखी आहे. उर्दू भाषेतला पहिला कवी- वली दकनी - औरंगाबादचाच. गेल्याच वर्षी औरंगाबादचे सुप्रसिद्ध शायर श्री. बशर नवाज यांना भेटण्याचा योग आला होता, त्याची आठवण झाली.

'हमे तो लूट लिया' माझेही फेव्हरेट ! :)

बरसात की रात

आवडती कव्वाली बर्‍याच दिवसांनी ऐकायला मिळाली!

बरसात की रातच्या कव्वाल्या सगळ्यांनाच माहित आहेत. "ना तो कारवां बरोबर "निगाहें नाज़ के मारोंका हाल" मला खूप आवडते. त्यातले पुरुष गायक अभिनय मस्त करतात. सगळे खरोखर कव्वाल वाटतात (असतीलही)."बहार-ए-हुस्न सलामत फि़जा से पूछ जरा..." ला कव्वालीची लय आणि दिशा एकदम मस्त बदलते, आणि अधिक वेगवान होत जाते. शेवटचे "मुकाबला है" कडवं ऐकलं की मलाच तिथे जाऊन टाळ्या माराव्याशा वाटतात.

त्याच स्पर्धेचा दुसरा टप्पा जास्त फिल्मी वाटतो.

कव्वाल्या

'निगाहे-नाज़' मलाही खूप आवडते. बरसात की रातच्या फिल्लमी कव्वाल्या मस्तच आहेत. पण माझ्यामते पारंपरिक कव्वाली गायनाच्या श्रवणाचा आनंद अवर्णनीय. 'छाप तिलक सब छिनी रे' ही अमीर ख़ुसरोने लिहिलेली कव्वाली वेगवेगळे गायक गात असतात. प्रत्येकाचा अंदाज वेगळा. मुरक्या-तानांची मजा वेगळी.

http://www.youtube.com/watch?v=FVIUAKHoM8c&feature=related
साबरी बंधूंनी गायलेली. अल्लाsssआ.....

http://www.youtube.com/watch?v=GWKR5CsRZ8Y
नुसरत फ़तेह अली ख़ान ह्यांनी गायलेली.

एकेकाळी शंकर शंभू नावाचे कव्वाल प्रसिद्ध होते. चांगले गायक होते. हिंदू गायक कव्वाली गातात ह्याचे मला तेव्हा अप्रूप होते. त्यांची एक कव्वाली http://www.youtube.com/watch?v=UP04jKX15Gk&feature=related.

कव्वालीत एक मनक़बत नावाचा प्रकार असतो तो ही मस्त असतो. त्यात मुहम्मद पैगंबराचा जावई अलीची स्तुती असते. ऐका पारंपरिक मनक़़बत 'मन कुंतो मौला': http://www.youtube.com/watch?v=mXOnbygCLl0

तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पारंपारिक कव्वाली

पारंपारिक कव्वालीबद्दल १००% सहमत.

http://www.youtube.com/watch?v=GWKR5CsRZ8Y
नुसरत फ़तेह अली ख़ान ह्यांनी गायलेली.

ही (आणि मन कुंतो मौला) ऐकली होती, पण विडियो पहिल्यांदाच पाहिला. सुरुवातीला मिनिटभर पेटी-तबला-टाळ्या मूड तयार करतात, गाणं आत्ता सुरू होते का सारखे वाटत राहते - नुसरत यांच्या डोळ्यातला भाव तेव्हा अगदी बघण्यासारखा आहे.

शंकर-शंभू च्या दुव्याबद्दल धन्यवाद!! मी पहिल्यांदा नावे ऐकलीत. दोघे कसे सराफाचे दुकान बंद करून थेट गायला बसल्यासारखे दिसतात - सद्याच्या कव्वाली-पेहरावशैलीहून किती वेगळे आहेत, नाही? कव्वाली मस्त आहे. पेटीवरच्या कव्वालचा हलकेच नाकातला आवाज फारच गोड आहे. आता दिवसभर चाल डोक्यात राहणार.

मला नुसरत यांचे "अल्लाह हू" खूप आवडते (यह ज़मीं जब न थी, यह जहाँ जब न था....), आणि "शाहबाज़" आल्बम मधले "शाहबाज़ क़लंदर". यात त्यांच्या बरोबर दोघे साथीदार गायक आहेत. त्यात एकाचा आवाज खरोखर वेड लावण्यासारखा आहे. नुसरत यांच्या काही रागदारी कव्वाल्याही ऐकल्या आहेत, पण सगळ्या नाही आवडल्या - त्यातली तानकारी मला नेहमी पचतेच असे नाही.

सुरेख....

"ना तो कारवां बरोबर " आत्ताच ऐकले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित वाटते आहे. मधुनच "सूर संगम" चित्रपटातल्या "मैका पिया बुलाये" ह्यामधल्या काही स्वरांची आठवण होते आहे. ह्या कव्वालीत काही कलावतीचे स्वर् आहेत काय?

पल दो पल का साथ हमारा
असेच बर्निंग ट्रेन् चित्रपटातले पल दो पल का साथ हमारा हेही (बहुदा केदार रागातले) आमचे आवडते.

तसेच कलावती मधले अजून एक है अगर दुश्मन जमाना हेही क्लासच. पण दोन्ही आम्हा अलिकडच्या टीव्हीवाल्या पोरांसाठी चितपरिचित आहे. वरती दिलेले मात्र इतके टीव्हीवर वगैरे ऐकण्यात आले नव्हते.

हे दोन्ही कव्वालीच्या पारंपरिक व्याख्येत बसतात काय ह्यावर कुणी प्रकाश टाकला तर बरे होइल?

--मनोबा

मुकाबला है

"शेवटचे "मुकाबला है" कडवं ऐकलं की मलाच तिथे जाऊन टाळ्या माराव्याशा वाटतात."

रोचना, हा अनुभव मी आत्ताच घेतला. खरंच्, किती उत्स्फुर्तपणे आपले हात टाळ्यासाठी शिवशिवतात ~ [न राहवून वाजवल्याही]

"हमारे हुस्न की बिजली चमक्ने वाली है
न जाने आज हज़रों का हाल क्या होगा"

अशी श्यामा आणि रत्ना यानी 'धमकी' दिल्यावर त्याला सडेतोड असा जवाब तो तरुण कव्वाल देतो :

"रंग पर नाज न कर क्यों की रंग बदल जाता है
ये वो महमाँ है जो आज आता है कल जाता है
इश्क़ पर नाज़ करे कोइ तो कुछ बात भी है
हुस्न का नाज ही क्या, हुस्न तो ढल जाता है..."

त्यावेळी त्या दोघींचा हताश पराभूत चेहरा....व्वा, सुरेखच

मग शेवटी त्याचा उत्साह ~ "मुकाबला है तो ~~"

भन्नाटच. [पुढे दुसर्‍या सामन्यात त्या दोघी जिंकतात असे काहीसे कथानक आहे.]

पाणीपुरी

कव्वाली या काव्य/संगीतप्रकाराकडे पाहून बर्‍याचदा नाके मुरडली जातात. काय ते ट्रकवाल्यांचं गाणं / पानटपरिवरची आवड अशी संभावना केलेली मी ऐकली आहे. तुलनेने गझल म्हणे खानदानी प्रकार असतो.

असो बापडा. पण माझ्या मते कव्वाली ही रस्त्यावर उभे राहून पाणीपुरी खाण्यासारखे आहे. एकामागे एक अगदी चविष्ट पुरी पहिली खाऊन होत नाही तोच दुसरी जवळजवळ तोंडात कोंबावी लागतेय असे एकामागे एक त्या कव्वालीचे अर्थपूर्ण, स्वरश्रीमंत अन् 'कडक' शे'र् येत् रहातात.

आपल्याला बुवा पाणीपुरी भयंकर आवडते!

 
^ वर