हिंदी चित्रपट 'रेनकोट'
पूर्वी कधी नाव न ऐकलेला आणि ऋतुपर्ण घोषदिग्दर्शित 'रेनकोट' नावाचा हिन्दी सिनेमा यूटयूब वर येथे दिसला:
http://www.youtube.com/watch?v=JuwpxG5DYVM
http://www.youtube.com/watch?v=gakiOW09ZsI&feature=related
माझ्यातरी माहितीत हे नाव अजिबात नव्हते. पण दिग्दर्शकाच्या नावमुळे पाहण्यास सुरुवात केली आणि पार्श्वभूमीवरील पहिल्याच लोकगीताने आणि नंतरच्या शुभा मुद्गलच्या आवाजातील 'मथुरानगरपति' ह्या गाण्यामुळे बघतच राहिलो आणि एक उत्तम चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळाला. (आनंद द्विगुणित झाला कारण तो यूटयूब वर फुकट मिळाला हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच!)
ही सफल होऊ न शकलेल्या प्रेमाची कहाणी आहे. ऐश्वर्या राय, अजय देवगण ह्यांचा संयमित अभिनय आणि अनपेक्षित शेवट ह्यामुळे चित्रपट आठवणीत राहील असा झाला आहे. अनु कपूरचा उत्तम cameo role हि मजा आणतो.
चित्रपटाला बहुधा फार पैसे मिळाले नसावेत आणि त्यामुळे तो फारसा गाजला नसावा असे वाटते. पण पाहिला नसल्यास अवश्य पहा अशी शिफारस करण्यासाठी हे लिहीत आहे.
Comments
ओ हेन्री
ऐश्वर्या राय ने चांगले अभिनय केलेला अनोखा चित्रपट! मला फार आवडला होता. ओ हेन्री या लघुकथाकाराच्या प्रसिद्ध "गिफ्ट् ऑफ् द मॅजाय्" कथेवर आधारित आहे. त्या कथेला सध्याच्या भारतीय संदर्भात मात्र घोषने छान उतरवले आहे. आता बघून बरीच वर्षे झाली, पण दोन्ही पात्रांच्या संवादातून, एकमेकांना सांगितलेल्या खोट्या गोष्टींतून १९९१ च्या आर्थिक बदलानंतर भारतीय मध्यमवर्गाच्या बदलत्या आशा-निराशांची यादीच जणू प्रस्तुत केली असे वाटल्याचे आठवते.
चित्रपट थियेटरमध्ये किती गाजला माहित नाही, पण बहुदा त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
बाकी - घोषचे अन्य कुठले चित्रपट बघितले आहेत का? त्यांचा पहिला - उनिशे एप्रिल - मस्त आहे, आणि बाड़ीवाली (त्यात किरण खेर ने मुख्य भूमिका केली आहे) फारच चांगला आहे. त्या नंतरचे त्याचे चित्रपट फारच विचित्र होत गेले, पण हे दोन सबटायटल्सयुक्त मिळाले तर अवश्य पहा (दोन्ही मूळ बंगालीत आहेत). ऍगथा ख्रिस्टीच्या "दे डू इट विथ मिरर्स" गोष्टीवर आधारित "शुभ महूरत" ही चांगला आहे - त्यात शर्मिला टगोर आणि राखीचे अभिनय मस्त आहे - राखी मिस् मार्पलच्या भूमिकेत.
मनू आणि निरू
मी पाहिला आहे हा चित्रपट तसेच ओ'हेन्रीची ती खूप गाजलेली 'मॅगी' कथाही वाचली आहे. अत्यंत 'पोएटिक ट्रीटमेन्ट्' दिली आहे ऋतुपर्ण घोष यानी मूळ कथेला. त्याचे बेमालूम भारतीयकरण तर असे सजले आहे की कथेची कल्पना परकीय आहे अशी पुसटशीही शंका मनी येत नाही. ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत् असेल कधीमधी 'करीअरमधील रेनकोट हाच खरा माईल स्टोन.'
अन्नू कपूरच्या त्या जागामालकाच्या रोलबद्दल तर लिहावे तितके कमीच होईल.
सहज गंमत म्हणून कधीकधी पावसाळी रात्री मी मनू आणि निरू या जोडीसाठी इंग्लिश चित्रपटात रॉक हडसन आणि ऑड्री हेपबर्न याना नजरेसमोर आणतो तर हिंदीसाठी शशी कपूर व साधना याना. मजा येते.
सहमत
सुरेख आणि संयत चित्रपट आहे एकूणच.
ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत् असेल कधीमधी 'करीअरमधील रेनकोट हाच खरा माईल स्टोन.'
हा आणि 'प्रोव्होक्ड'सुद्धा ! :)
खरे आहे
हृद्य चित्रपट आहे. तसाही अजय देवगण मला आवडतो :-)
ऐश्वर्याने काम चांगले समजून केले आहे.
तेव्हा बघायचा राहिलाच होता.
धागाकर्त्याने लिंक दिल्यामुळे आणि रोचना यांनी मोजक्या वाक्यात उत्कंठा वाढवल्यामुळे चित्रपट बघण्याच्या यादीत टाकला आहे.
आवडलेला चित्रपट
आवडलेला चित्रपट आहे.
मिसळपाव संकेतस्थळावर "मथुरानगरपति" गाण्याचे रसग्रहण वाचल्यानंतर आवर्जून बघितला होता.
मलासुद्धा "गिफ्ट ऑफ मॅजाय्" कथेची आठवण झाली. पण त्याच्या ढाच्यात इतका फरक केलेला आहे, की काय म्हणावे. (थोडक्यात इंग्रजी लघुकथेत प्रेम सफल आहे. चित्रपटात नाही.)
वरच्यांसारखेच
चित्रपट संयत आहे. कलाकारांचे अभिनय आणि दिग्दर्शकाचे दिग्दर्शन उठावदार आहे.
चांगला चित्रपट
२-३ वर्षांपुर्वी बघीतल्याने विस्मृतीत गेला होता. तुमच्या धाग्यामुळे पुन्हा आठवला.
चित्रपट
ओ'हेन्रीच्या कथा एकेकाळी आवडत असत. आताशा आवडत नाहीत. चित्रपट पाहीला होता. काही फ्रेम्समध्ये आवडला होता. पण एकूणात फारसा आवडला नव्हता, असे वाटते.
लक्षणीय
चित्रपट वेगळा आहे. लक्षणीय आहे. एकदा बघण्यासारखा वाटला होता असे आठवते.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
थेटरात पाहिला होता.....
थेटरात पाहिला होता आठेक् वर्षांपूर्वी.
चांगला आहे ह्यात् शंकाच् नाही. पण मला स्वतःला इतके संथ चित्रपट पहायची सवय् नाही. त्यामुळे मी चित्रपटाचा एडिटर/संकलक असतो तर काटछाट करुन ४०-५० मिनिटात कथा अधिक प्रभावीपणे मांडली असती असे वाटते.
मूळ परदेशी कथेत हा विषय पती-पत्नीच्या प्रेमाच्या अंगाने येतो, एकमेकांना जीवापाड जपणार्या जोडप्याची कथा म्हणुन येतो, तर चित्रपटात अयशस्वी प्रेमकहाणीतल्या भूतपूर्व प्रेमिकांच्या हल्कासा मत्सर,दंभ आणि त्यातही कुठेतरी ओलावा अस्सा होउन् येतो.
मूळ कथा चार लायनीत अशी काहिशी आहे:-
गरिब घरातल्या नवरा-बायकोचं आपसातलं ट्युनिंग् उत्तम आहे. त्यांच जमतही चांगलं. नवर्याला एकच गोष्ट खटकते ती म्हणजे आपल्या पत्नीच्या सुंदर् केशसंभारावर त्या तोडीचा दागिना नाही. तर् बायकोला खटकणारी गोष्ट म्हणजे नवर्याच्या जुन्या, एकेकाळच्या भारीच्या कोटवर् व्यवस्थित बटने नाहित. आणि एका लग्नाच्या वाढदिवशी पत्नी आपले केस कापून/विकून कोटला लावयला म्हणुन सोन्याची बटने आणते, तर् त्याच् दिवशी पती आपला कोट विकून भारीचे दागिने आणतो, असे काहिसे कथानक आहे. (ब्रिटिश मित्राकडून् ऐकले आहे.) नवरा-बायको संबंधातले. ऋतुपर्णॉनी आपल्याकडच्या वातावरणात चांगलेच मुरवले आहे.
--मनोबा
कथा आणि चित्रपट
श्री.मन (मनोबा) यांच्या "त्यामुळे मी चित्रपटाचा एडिटर/संकलक असतो तर काटछाट करुन ४०-५० मिनिटात कथा अधिक प्रभावीपणे मांडली असती असे वाटते." या विधानातील रोखठोकपणाबद्दल आदर मनी ठेवून इतकेच म्हणू शकतो की एखाद्या कथेला 'चित्रपटा'च्या चौकटीत आणायचे झाल्यास त्यामध्ये दिग्दर्शकाच्या कल्पकतेची केमिस्ट्री येणे अपेक्षितच नव्हे तर ती व्यवसायाच्या दृष्टीनेही गरजच असते. ४०-५० मिनिटातच का, तसे पाहिले तर मग ती कथा [वा तत्सम छोटा जीव असलेली अन्य कोणतीही] अगदी दहापंधरा मिनिटाच्या स्पॅनमध्येही बसविता येतेच.
किंबहुना फिल्म ऍण्ड् टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटसारख्या मान्यताप्राप्त संस्थातून स्नातकाना 'अमुक एक कथेवर-कल्पनेवर १५ मिनिटाची शॉर्ट फिल्म कशी बसवाल?" अशा धर्तीची प्रॅक्टीकल्सही असतात. अर्थात इथे चार-सहांचे ग्रुप्स पाडले जातात व त्या सदस्यांनी प्रथम दिलेल्या आयडियाचे स्क्रिप्ट बनवून ते चित्रीत करण्यासाठी लागू शकणारा वेळ याचा निबंध वरिष्ठांना सादर करायचा असतो. त्यामध्ये त्यांच्या - शिक्षकांच्या - मतानुसार 'मिनिटा'त दोन कमी वा दोन जास्त होऊ शकतात. अशा काही चर्चासत्रांना मी 'प्रेक्षक' या नात्याने हजर होतो. त्यावेळी तर अनुभवलंय की काही ठिकाणी ग्रुप लीडर ती 'वाढीव दोन' मिनिटेही स्वीकारू इच्छित नाही, इतका त्याचा आपल्या पेपरवर्कवर विश्वास असतो. उदा. एका बॅचला "मुलाखतीसाठी मुलगा मुंबईत आला होता, पण तो अजून घरी/गावी परत आलेला नाही याबद्दल बरोबरीच्या मित्राने पोलिसात रितसर फिर्याद दिली होती आणि आता दोन आठवडे झाल्याने प्रकरण कुठपर्यंत आले आहे?" याची चौकशी करण्यासाठी एका छोट्या शहरातून मुंबईत आलेली पण आता स्टेशनवर भांबावून गेलेली व्यक्ती आणि तिच्या हालचाली दाखविणे, असा विषय आला होता. त्यातही आव्हान म्हणजे पटावर एकाही ओळीचा [होय एकाही ओळीचा] संवाद नाही. हे १२ मिनिटात दाखविणे आवश्यक होते. प्रोजेक्टला स्वीकृती देताना वीस-बावीस वयोगटातील ती तीन मुले व दोन मुले यांच्या चेहर्यावरील उत्साह आणि आनंद टिपून घ्यावा असे मला तीव्रतेने वाटले होते.
[पुढे अशाच काहीशा कथानकावर चारू हसन यानी आपल्या प्रभावी अभिनयाने सादर केलेला 'तबरना कथे' हा गिरीश कासारवल्ली यांचा कन्नड चित्रपटही पाहण्यात आला. फरक इतकाच इथे कथेतील मध्यवर्ती व्यक्ती बंगलोरमध्ये 'माझ्या पेन्शन केसचे काय झाले?" याची विचारणा करण्यासाठी त्या कार्यालयात आल्याचे दाखविले गेले आहे. चारू हसन यानी सादर केलेल्या पेन्शनराच्या भूमिकेबद्दल् त्याना 'सर्वोत्तम अभिनेता' चा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. भारतीय चित्रपट व्यवसायातील 'दहा सर्वोत्कृष्ट चित्रपट' निवडायचे झाल्यास 'तबरना कथे' चा त्यात समावेश होईल. 'अभिनय' म्हणजे काय हे समजण्यासाठी मराठीतील झाडून सार्या नटमंडळीना एकत्रितपणे हा चित्रपट दाखवावा असे वाटते.]
~ पण इथवर ठीक असते. प्रत्यक्षात 'कमर्शिअल' लेव्हलवर चित्रपट काढताना तसे करून चालत नाही. तिथे विशिष्ट वेळेचे - जसे किमान ९०-१०० मिनिटे - भान ठेवणे फार गरजेचे असते, अन्यथा निर्माताही कशाला फंदात पडेल. गिरीश कासारवल्ली याना तर 'पेन्शनरची कागदपत्रे' एवढ्याच अल्पशा कथानकाला पडद्यावर आणण्यासाठी तब्बल १८० मिनिटे खर्चावी लागली होती.
हजारो पानांच्या अमर्याद पट्ट्यात मांडलेल्या ऐतिहासिक कादंबर्यांचे कथानकही आठदहा पानातही मांडता येतेच. 'महाभारत' तर शेवटी काय, तर दोन चुलत भावंडांचे जमिनीच्या वाटण्याबद्दल झालेले भांडण असेही आपण म्हणू शकतो.
तसे नव्हे....
त्या कथेला "लहान करण्यासाठी" म्हणून नव्हे तर त्याच्या "मूळ " किंवा "स्वाभाविक" रुपापर्यंत परत आणण्यासाठी ती काटछाट आवश्यक आहे असे म्हणायचे होते. म्हणजे, मूळ कथावस्तूचा जीवच तेव्हढ्या वेळाचा वाटला. अधिक स्पष्टीकरण;-
मला आवाडणार्या काही दूरदर्शनच्या काळातल्या जुन्या अप्रतिम मालिका म्हणजे "मिट्टी के रंग" आणि "मालगुडी डेज्" .
ह्या दोन्हीही मालिकांत मनाला स्पर्शून जाणार्या भावणार्या अशा लघुकथा होत्या. त्या पाहताना कुठेही घड्याळाकडे(अजून् किती वेळ् आहे ते पहायला) लक्ष जातच नसे. आता, त्या कथाही अशाच चित्रपटात मांडायच्या म्हटल्यावर लांबलेल्या वाटल्या असत्या, तितक्या प्रभावी म्हणून ऑफर् असतानाही निर्देशकाने/दिग्दर्शकाने ते केले नव्हते.(एक् जुना इंटारव्ह्यु आठवतोय.)
एकेका कथावस्तुचा एकेक जीव असतो, एक् लांबी असते आणि एक् फॉर्मॅट असतो, आणि ह्या कथेला लघुकथेचा किंवा दोनेक एपिसोडचा फॉर्मॅत मला जास्त आवडला असता असे म्हणायचे आहे.
मागील वर्षी राज्य नाट्य का सकाळ करंडक स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती एकांकिका पाहिली होती:- "दळण".
ही द मा मिरासदारांच्या कथेवर् आधारीत होती. त्यांची परवानगी घेउन त्यात योग्य ती काटछाट करून खूपच रोचक पद्धतीने ती मांडली गेली होती. अर्थातच बक्षीस् मिळाले. त्याच्याच काही दिवस आधी अजून एका ग्रुपने जेव्हा त्यांना माझ्या सुचवण्यावरून संपर्क केला तेव्हा त्यांनी दुसर्या एका कथेला द्वी-अंकी नाटकात रुपांतरीत करण्यास मनाई केली. कारण? "कथावस्तुचा जीव तितका नाही. ती लांबल्यास योग्य ठरणार नाही, प्रभावी होणार नाही." हे स्वतः द् मा मि ह्यांनी सांगितले. म्हणजे मूळ कथेचा असा स्वतःचा एक् जीव असतो असे मी म्हणतो आहे.
अर्थातच आपण ज्येष्टांनी केलेली टिप्पणी काही एका निरिक्षणावरुन किंवा अनुभवावरुन केलेली असणार आणि आपला स्वतःचा एक समृद्ध दृष्टिकोन असणार हे मान्य आहे.
--मनोबा
और आहिस्ता
और आहिस्ता किजीये बातें या गाण्यात हेच कथानक वापरलेलं आहे तर. आता चित्रपट बघण्याची उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे.
तसा चांगला आहे..
पण बॉक्स ओफीस (खोका-कार्यालय) वर आदळला हा चित्रपट.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
व्वा
पण बॉक्स ओफीस (खोका-कार्यालय) वर आदळला हा चित्रपट.
खोका-कार्यालय............. व्वा