वदनिं कवळ घेता : शब्दार्थ हवा आहे

आमच्या कुटुंबात रोजच्या वापरात असलेल्या या काव्यपंक्तींमधील काही शब्द आणि अन्वय मला कळत नाही. कोणी मदत केली तर हवी आहे. जेवण करण्यापूर्वी आम्ही म्हणत असू :
- - -
वदनिं कवळ घेतां नाम घ्या श्रीहरीचें
सहज हवन होतें नाम घेतां फुकाचें
जिवन करि जिवित्वा अन्न हें पूर्णब्रह्म
उदरभरण नोहें जाणिजें यज्ञकर्म ॥

अधोरेखित चरणाचा शब्दशः अर्थ मला माहीत नाही. त्यातले कुठले क्रियापद हेसुद्धा नीट कळत नाही.
- - -
वदनिं = वदनीं = तोंडात
कवळ = घास
घेतां = घेताना
नाम घ्या श्रीहरीचें = नाम घ्या श्रीहरीचे
अन्वय : वदनीं कवळ घेतां श्रीहरीचें नाम घ्या = तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या

(अन्वय काव्यपंक्तीसारखाच) सहज हवन होतें नाम घेतां फुकाचें = फुकटचे नाम घेता सहज हवन होते.

जिवन करि जिवित्वा (?जिवन करिं जिवित्वां?)
अन्न हें पूर्णब्रह्म = अन्न हे पूर्णब्रह्म (आहे)

उदरभरण = पोट भरणे
नोहें = नव्हे
जाणिजें = जाणले जाते, कळून येते (कर्मणिप्रयोग)
यज्ञकर्म = यज्ञकर्म
अन्व्यय : उदरभरण नोहें जाणिजें यज्ञकर्म = (हे) पोट भरणे नव्हे, यज्ञकर्म (म्हणून) जाणले जाते.

यातील गोळाबेरीज अर्थ मला कळलेला आहे. तो असा :
तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या. फुकटचे नाम घेता सहज (यज्ञातले) हवन होते. (जीवना संबंधी काहीतरी...) अन्न हे पूर्णब्रह्म आहे. हे पोट भरणे नव्हे, हे यज्ञकर्म म्हणून जाणा.

पण अधोरेखित अर्थ नुसता गोळाबेरीज नव्हे, तर शब्दार्था-अन्वयासकट कळला, तर हवे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

जीवन आणि जीवित्व

या दोन्ही शब्दांचा अर्थ "जगणे" हाच असला तरी "जीवन"हा शब्द वरच्या पातळीच्या जगण्यासाठी (मनुष्यपातळीच्या) वापरला जातो. जीवित्व शब्दाला थोडी नकारात्मक छटा आहे. जीवित्वाचा "खालच्या पातळीवरचे (पशुपातळीचे) जगणे " असा अर्थ घेतला तर मला लागलेला अर्थ असा:

"अन्नसेवन ही क्रिया पशुपक्षी आणि मनुष्य यांच्यात समान आहे, पण श्रीहरीचे नाव घेऊन केलेले (यज्ञकर्म समजून, अन्न हे पूर्णब्रह्म समजून केलेले) अन्नसेवन जीवित्वाचे जीवन करते. "

डिस्क्लेमर - मी पाहिलेल्या कुठल्याही शब्दकोशामध्ये जीवित्वाचा मी घेतलेला अर्थ दिलेला नाही. ज्ञानेश्वरांचा एक अभंग असा आहे "जियेचा अंबुला (नवरा) रुसोनिया जाये तियेचे जीवित्व जळो हे माये" यावरून जीवित्व शब्दाला नकारात्मक छटा असावी असे वाटले. त्यावरून जीवित्व = पशुपातळीचे जगणे असा अर्थ घेतला तर अर्थबोध होईल असे वाटले. न पटल्यास सोडून द्यावे.

मूळ

हा श्लोक कुठून् आला आहे, कूणी लिहला आहे ?

रामदास

बहुधा रामदास स्वामी.

अन्न हा वाक्याचा कर्ता

अधोरेखित चरणाचा शब्दशः अर्थ मला माहीत नाही. त्यातले कुठले क्रियापद हेसुद्धा नीट कळत नाही.

'जीवित्वास (निव्वळ जिवंत असण्यास) जीवन करणारे अन्न हे पूर्णब्रह्म आहे' असा अर्थ मला वाटतो.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

जिवन

जिवन या शब्दाचा "जीवन" यापेक्षा काही वेगळा अर्थ आहे का?

नितिन थत्ते

नितिन

जिवन या शब्दाचा "जीवन" यापेक्षा काही वेगळा अर्थ आहे का?

'नितिन' आणि 'नितीन' ह्या दोहोंत जसा फरक आहे तसाच फरक 'जिवन' आणि 'जीवन'मध्ये असावा. त्या श्लोकात केवळ वृत्तपालनासाठी 'जिवन' केले आहे. 'सदा सर्वदा योग तूझा घडावा' मधील 'तूझा' आणि 'तुझा' ह्यांतही काही फरक नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

करि

बरोबर असावे. पण "करि" हा शब्द "हातात" या अर्थाने घेऊन काही वेगळे सापडते का हे पाहण्याचा प्रयत्न होता.

नितिन थत्ते

करि म्हणजे कढी ?

करि म्हणजे कढी असावे का? 'जिवन कढि जिवित्वा' ह्या ओळींचा अर्थ चांगला लागतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ईग्रजी अंमल

करी म्हणजे कडी. ईग्रजी अंमलाखाली भारतातील अनेक "ड" ने संपणा-या शब्दांना "र" ने बदलले गेले.

खापर परकीयांवर

>>ईग्रजी अंमलाखाली भारतातील अनेक "ड" ने संपणा-या शब्दांना "र" ने बदलले गेले.

नसावे. अनेक बंगाल्यांना 'हम कडेगा' (हम करेगा) असे म्हणताना ऐकले आहे. (हा कडेगा हा उच्चार एक्झॅक्टली आपण करू तसा नसतो. पण तो कडेगा असा ऐकू येतो) र आणि ड च्या उच्चाराची अदलाबदल बर्‍याच उत्तर भारतीयांमध्ये आढळते. "देखो कितना सामान परा है" (पडा है) असे सिंधी व्यक्तीकडून ऐकले आहे.

नितिन थत्ते

बंगाली लिपी

बंगाली लिपीत आणि ह्यांच्या चिन्हांतदेखिल फारसा फरक नाही (म्हणजे खाली एक् नुक्ता!)

ड नाही बहुधा

नाही हो. व (उच्चार ब) आणि र सारखे आहेत.
(ड आपल्यासारखाच साधारण ড असतो).

नितिन थत्ते

+१

सहमत!

पुन्हा उजळणी करायला हवी!

असेच

हलवा-पूड़ी हा उच्चारही सामान्य आहे. आणि नेहमीच्या ड पेक्षा ह्या ड़ चा उच्चार वेगळा आहे.
'शेळके'चा उच्चार उत्तर भारतील 'शेड़के' असा का करतात ते मात्र कळले नाही. बहुधा त्यांना 'शेलके' ह्या शब्दाचा अर्थ माहीत असावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जल, अन्न आणि प्राण

जिवन करी जिवित्वा .... जिवन जिवित्वा करी. जिवन = जल, पाणी. जिवित्व = प्राण, आयुष्य. जल प्राणाला, आयुष्याला (निर्माण) करते. भगवद्गीतेत
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भव: ! (गीता३.१४) जल, अन्न व प्राण यांचा संबंध दाखवला आहे. समर्थ केवळ हरीस्मरणाने यज्ञ कसा सोपा होते ते सांगत आहेत.
शरद

जेवण करि जीवित्वा

जिवन करि जिवित्वा ऐवजी जेवण करि जिवित्वा कसे वाटते? बहुधा तो शब्द जेवण हाच असावा

वेगळे वदनी कवळ

आम्हाला शाळेत वदनी कवळ घेता थोडे वेगळे शिकवले होते असे वाटते -मला नेमके शब्द आठवत नव्हते तेव्हा नेटावर शोधून उचलले आहेत.

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे |
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे |
कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात |
श्रमिक श्रम करोनी वस्तु त्या निर्मितात |
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल |
उदर भरण आहे चित्त होण्या विशाल |

सर्वांस धन्यवाद

सर्वांस धन्यवाद.

श्री. विनायक गोरे म्हणतात तो अन्वय पटण्यासारखा आहे.
जीव असणारा तो जीवी, जीवी असण्याची स्थिती म्हणजे जीवित्व, त्यास = जीवित्वास
(येथे कर्तृत्वाचा उल्लेख नाही, फक्त एक स्थिती म्हणून जीव असणे)
जीवन म्हणजे बहुधा कृतिशील (कर्ता म्हणून) जगणे.
(पशू/मनुष्य असा फरक मानला नाही तरी स्थितिशील/कृतिशील असा फरक असावा. जीवन हे जीवित्वापेक्षा श्रेयस्कर आहे, हा काव्यार्थ पटतो.)

मुख्य म्हणजे "करि" हे "करणे"चे क्रियापद रूप आहे - कृदंत नव्हे - हे सांगितले, आणि "अन्न जीवित्वाला जीवन करी=करते" असा अन्वय सांगितला.

पुनश्च सर्वांचे आभार मानतो.

वेगळा अर्थ

जीवन करि जीवित्वा चा अर्थ मला 'जीवनाच्या जीवी असण्याची स्थितीला करते (कारणीभूत ठरते)' असा मला वाटत होता. जीवन अर्थपूर्ण करते हे पटत नाही. 'जिवातल्या जीवित्वासच जे कारणीभूत ठरतं त्याला पूर्णब्रह्मच म्हटलं पाहिजे.' हे अधिक जुळतं. मुळात ही ओळ 'जिवनजिवित्वकारी अन्न हे पूर्णब्रह्म' अशी असण्याची शक्यता आहे का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कुणी बरं?

हे कुणी लिहिले असेल बरं?
शेवटच्या ओळी अगदी मनाला भिडतात वगैरे......

आम्हाला शाळेत वदनी कवळ घेता थोडे वेगळे शिकवले होते असे वाटते -मला नेमके शब्द आठवत नव्हते तेव्हा नेटावर शोधून उचलले आहेत.

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे |
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे |
कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात |
श्रमिक श्रम करोनी वस्तु त्या निर्मितात |
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल |
उदर भरण आहे चित्त होण्या विशाल |

यावर ही प्रतिक्रिया आहे. चुकुन चुकी झाली

प्र. ल. गावडे

बहुतेक प्र्. ल. गावडे यांनी लिहिल्या आहेत. खूप पूर्वी त्या म. टा. मधील त्यांच्या लेखात वाचल्याचे आठवते, परंतु संदर्भ नाही. चूभूद्याघ्या.

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे |
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे |
कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात |
श्रमिक श्रम करोनी वस्तु त्या निर्मितात |
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल |
उदर भरण आहे चित्त होण्या विशाल |

चांगले सुडंबन आहे

प्र. ल गावड्यांचे हे "सु"डंबन आवडले.

(वृत्ताच्या दृष्टीने "दीन रात" असेच बरोबर आहे. आता मुळात रामदासांनीही ह्रस्व-दीर्घांची ओढाताण केलेली आहेच. पण जमल्यास ह्रस्व-दीर्घ आदलबदल झालेल्या शब्दाला स्वतःचा विसंवादी अर्थ नसला, तर बरे असते.)

का?

'जिवित्वा'या शब्दाचा अर्थ नेमका काय असावा हे माहीत नाही पण वर इतरांनी सांगितल्याप्रमाणे जगण्याला जीवन करते वगैरे अर्थ मला लागतो.

धनंजय यांच्या कुतूहलाविषयी आदर आहे पण हा प्रश्न विचारण्यामागे कुतूहल सोडून अन्य हेतू आहे काय याविषयी कुतूहल वाटले.

+१

+१

चर्चेत सांगितलेलेच कुतूहल

या सुपरिचित ओळींचा नीट अर्थान्वय लागत नव्हता, म्हणून कुतूहल होते. इतकेच.

माझ्या लहानपणी घरच्या कोण्या वडीलधार्‍या व्यक्तीने "जिवित्वा" हे क्रियापद-कृदंतरूप म्हणून सांगितले होते. (संस्कृतातल्या "जीवित्वा"="जगून" या अर्थी तत्सम, असे त्या व्यक्तीचे म्हणणे होते.) असे केल्याने वरीलप्रमाणेच गोळाबेरीज अर्थ लागतो. पण "करि" शब्दाचा अन्वय समाधानकारक लागत नाही. श्री. नितिन थत्ते यांनी म्हटल्याप्रमाणी "करीं=हातांत" असासुद्धा अर्धवट, पण असमाधानकारक अर्थ/अन्वय लागत होता.

नाम घेता 'फुकाचे'

नसून 'पुकाचे' असे आहे, म्हणजे देवाचे (पहा: संदर्भ)
- बाकी अधोरेखित ओळींबद्दल मलादेखिल कुतूहल आहे.

फुकाचे

आमच्या बालवाडीत आम्हाला नाम घेता 'तुक्याचे' असे शिकवल्याचे आठवते.

असे कसे असू शकते?

रामदास स्वामी श्लोक रचताना 'जेवताना तुकारामाचे नांव घ्या' असे कां सांगितील बरे?

असे कां सांगितील बरे?

जेवतांना देवाचे (श्रीहरी)/ साधू संतांचे नाव घ्यावे असे त्यांना सांगायचे असू शकेल.

असेच

मला देखील 'नाम घेता पुकाचे' असेच शिकवले होते... घरी आणि शाळेतही!
पुकाचे = देवाचे, असे आजीने सांगितले होते.

तो एक शाळेतला जाच!

अय्यो, राम्म, पाप्प! म्हणजे लहानपणापासून ज्यांनी 'नाम घेता फुकाचे' म्हटले त्यांनी घेतलेले देवाचे नांव फुकट गेले की काय?, त्यांच्या जेवणाचे हवनच झालेच नाही कि काय?

आम्हाला देखील बालवाडीत 'वदनी कवळ' म्हणावे लागे. तेंव्हा ते 'पुकाचे' असेच होते. मी फक्त तो श्लोक म्हणतोय असा अभिनय करायचो, कारण वर्गात सगळ्यांचे जेवणाचे डबे उघडले कि वर्गात एक वेगळाच खमंग वास पसरायचा, भुक जोराची लागायची, श्लोक म्हणणे मला तरी जाच वाटायचा.

शब्द आणि अक्शरे

अय्यो, राम्म, पाप्प! म्हणजे लहानपणापासून ज्यांनी 'नाम घेता फुकाचे' म्हटले त्यांनी घेतलेले देवाचे नांव फुकट गेले की काय?

नाही. मला वाटतं शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची आहे. नाहितरी आपण श आणि ष , द्न्य आणि ज्ञ, क्श आणि क्ष सारखेच मानता ना !

पुका म्हणजे देव?

पुका म्हणजे देव? असा शब्द कधी ऐकला नाही. वाचक यांचे संदर्भ त्यावर प्रकाश पाडत नाही. तो टंकनदोष असावा काय?

अवांतरः तुळूमध्ये पुका म्हणजे घाबरट.

पुन्हा टंकनदोष

वाचक याच्या संदर्भातील तिसर्या पर्यायात http://cloves-catering.page.tl/ श्लोक असा दिला आहे--

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहजवन होता नाम घेता पुकाचे
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

हवनाचे जर वन होऊ शकते, तर फुकाचे नक्किच पुका होउ शकते. किंवा "देवाचे नाव कसे फुकटचे घ्यायचे?" या भितीने पुढच्या पिढीने त्याचे नामांतर केले असेल असाही तर्क आहे. उत्क्रांतीत जशी सजीवाची शरीरवैशिष्ट्ये बदलतात तशीच अक्शरांची सुद्धा बदलत असतील.

'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म'चा अर्थ- फक्त उदरभरण करण्याला कोणतेही यज्ञकर्म मानले जात नाही, म्हणजेच देवाचे नाव न घेता केलेले उदरभरण कनिष्ठ मानले जाते, असाही होउ शकतो क?

पोपटपंची

वदनी कवळचे पाठभेद गंमतीशीर आहेत.

सहजवन
पुकाचे
तुक्याचे... आणखी शोधले तर आणखी मिळतीलच.

अर्थ न कळता, समजून घेता पोपटपंची करायला लावली तर लहानांचे आणि मोठ्यांचे आणखी काय होणार म्हणा? आम्हाला लहानपणापासून वेगळा पाठभेद शिकवल्याने आणि मूळ वदनी कवळही कानावर पडल्याने कधीतरी डोक्यात शब्दांचा अक्षम्य गोंधळ होतो.

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे|
सहज हवन होते आपुल्या बांधवांचे|

"पुक म्हणजे देव"

संदर्भ शोधले, जालावर मिळाले नाहीत, इथे माझ्याकडे शब्दकोश नाही, कोणाकडे असल्यास बघून कळवावे ही विनंती

शब्दकोशात बघितला पाहिजे

असा पाठभेद असल्यास....

वझेच्या आणि मोल्सवर्थच्या शब्दकोशांत असा कुठला शब्द दिसत नाही. अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशातही हा शब्द सापडत नाही.

संस्कृतात "पुक" शब्द "दान" या अर्थी वापरला जातो (फारसा प्रचलित नसावा), असे मोनिएर विल्यम्स शब्दकोशात सापडले.

रामदासांच्या रचनांचा प्रमाणित-संपादित संग्रह उपलब्ध आहे काय? असल्यास कोणी बघून शहानिशा करावी. सध्यातरी "पुका" हा पाठभेद प्रामादिक असावासा वाततो.

फुकाचे

साधे नाव जरी घेतले तरी जेवणाचे हवन होते, फुकाचे हे फुकटचे नुसते नाव जरी घेतले तरी हवनाचे पुण्य लाभते ह्यार्थी असावे असेच एकले आहे.

फुकाचे - पुकाचे - पुखाचे - 'पुख्ख्याचे'?

'फुकाचे' हा पाठभेद सोपा आणि सरळ आहे.त्यामुळे स्वीकारायला हरकत नाही.
'पुकाचे' या पाठभेदाचा अर्थ कळत नाही.
मी ऐकलेला 'पुखाचे' असाही पाठभेद आहे. पुख म्हणजे पुष्प, पुष्य असा अर्थ सापडतो. पुख म्हणजे (पूर्ण) पुरुष = राम असा अर्थ मला वाटत होता. पण तो तसा नाही हे शोधल्यावर लक्षात आले. (तसा अर्थ कोणी शोधला आहे काय?)
वाचताना 'पुख्खा झोडणे' असा एक वाक्प्रचार लक्षात आला. झोडणे म्हणजे आक्रमण करणे, तुटून पडणे इ. पण हा 'पुख्खा' शब्द कुठून आला?
या पुख्ख्याचा रामदासस्वामींच्या 'फुका'शी संबंध आहे की रामदासस्वामींना 'पुखा' म्हणजे 'पुख्खा' अभिप्रेत आहे?
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

जिवित्व

मला कोणीतरी सांगितलेला अर्थ - जिवित्व म्हणजे ज्यामध्ये जीवन हे तत्व आहे (जीवी...जिवित्व..जसे मनुष्यत्व, देवत्व), अशा गोष्टींना जीवन देणारे ते अन्न हे पूर्णब्रम्ह आहे.

बाकी इतर जाणकारांनी सांगितलेले अर्थ देखील चिंतनीय आहेत.

आणि हो, हे जिवित्वा नसून जिवित्व आहे असे देखील ऐकण्यात आले.

 
^ वर