घर स्वतःचे की भाड्याचे?

खालील मजकूर एका ढकलपत्रातून आला. तो वाचल्यावर क्षणभर पटतो. पण त्यातले अनेक मुद्दे एकांगी वाटले. घर हा प्रत्येकाचा गरजेचा भाग आणि त्यासाठीचे अर्थकारण हा सर्वात महत्वाचा आणि न टाळता येण्यासारखा भाग. मजकूर असा आहे :

असं समजा की एक 2BHK फ्लॅट विकायचा आहे. त्या फ्लॅट ची कींमत ५० लाख आहे. आणि बँक तुम्हाला त्याच्या एकूण किमतीच्या ८५% कर्ज देऊ करत आहे. आपण धरून चालु कि हे कर्ज आपण २० वर्षांसाठी घेतो आहे. आणि आता खाली दिलेले "calculation " पहा.

घर घेण्यासाठी तुम्ही स्वतः दिलेले contrbution १५% : रुपये ७.५ लाख ( यामध्येच सगळी बचत/जमापुंजी संपुन जाते !)
गृह कर्ज : रुपये ४२.५ लाख

दरमहा येणारा EMI (व्याजदर ११%) : रु .४७०००
maintenance charges दरमहा : रु .२०००
मालमत्ता कर दरमहा (Property tax) : रु .१०००-१५००

गृह कर्ज व्याजावर मिळणारी कर सवलत : दरमहा रु .४००० ( ते ही फक्त पहिल्या काही वर्षांपर्यंतच )
म्हणजे घरासाठी येणारा एकूण खर्च (अंदाजे) दरमहा : रु. ५००००
(मेंटेनन्स चार्जेस आणि कर हे भविष्यात महागाई दराप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.)

आणि दरमहा एवढे सगळे पैसे दिल्यानंतर -
१. प्रत्येक वेळी तुमच्या कुटुंबाला खरेदीसाठी नकारघंटा ऐकावी लागणार (जरी तुमचा पगार ७० ते ८० हजार असेल तरी)
२. पहिल्या काही वर्षांसाठी तरी खर्चावर संपुर्ण नियंत्रण , Family holiday आणि नविन गाडीचा प्लान पुढे ढकलला जाणार :-)
३. आणि जर या काळात नोकरी गेली, कामावरुन बडतर्फ केले (जे मंदीच्या काळात हमखास होते !) तर तुमची आर्थिक गणिते अशी काही बिघडतील की काही खैर नाही.

२० वर्षांनंतर तुम्ही दिलेली एकुण रक्कम असेल : ( ५००००० X २० X १२ ) + ७५०००० = १२७५०००० = रुपये १.३ करोड
आणि एवढे सगळे करुन करून तुम्हाला काय मिळालं तर एका २० वर्ष जुन्या असलेल्या society मधला एक २० वर्ष जुना झालेला फ्लॅट. २० वर्षांनंतर तुमच्या 2 BHK घराची (market price ) किंमत १.५ करोड असेल. आणि 20 वर्षात एका घराशिवाय काहिही मिळाले नसेल.

हेच घर जर तुम्ही घर भाडयाने घेतले तर तुम्हाला जास्तित जास्त घरभाडे १०००० येईल. इतर सगळा खर्च मिळून , आणि असं समजून चालूया की भाडे दरवर्षी ८% दराने वाढेल ( खरे तर कमीच वाढेल). प्रतीवर्षी तुम्ही दिलेलं घरभाडे असेल १.२ लाख, १.३ लाख, १.४ लाख.........
याच दराने २० वर्षांनंतर तुम्ही भरलेलं एकुण भाडे असेल ................फक्त ६० लाख.

फायदे -

१. तुम्ही कधीही घर बद्लु शकता. अगदी एखाद्या छोट्याशा कारणासाठी देखिल !
२. अचानक परगावी किंवा परदेशी स्थायीक होण्याची संधी मिळाली तर तुम्ही सहजगत्या ती संधी स्वीकारु शकता.
३. आपल्या सोयीनुसार ऑफीसच्या जवळ, मुलांच्या शाळेच्या जवळ घर घेऊ शकता.
४. तुमच्या वाढत्या कुटुंबासाठी 3BHK फ्लॅट कधीही घेउ शकता.
५. राहत्या घराचे भाडे जसजसे वाढेल त्यानुसार HRA मध्ये कर सवलतही मिळेल.
आता जर तुम्ही "हुशार" असाल तर काही पैसे शेअर बाजारात किंवा Mutual fund मध्ये गुंतवाल कारण तुम्ही फक्त रुपये १०००० घरभाडे देत आहात, ५०००० EMI नाही.

जर तुम्ही २० वर्षांपर्यंत १५% दराने दरमहा रुपये २५००० गुंतवले ( उदाहरणार्थ तुम्ही जागा खरेदी करा किंवा Mutual Fund, PPF मध्ये गुंतवा.) जसे तुमचे घरभाडे वाढेल तसे तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी करु शकाल, आणि तरी सुद्धा तुम्ही २.५ करोड या २० वर्षात कमवु शकता ( हे तुमच्या SMART गुंतवणुकीवर अवलंबून आहे.)

आणि नंतर तुम्ही असाच एखादा FLAT तुमच्या मूलांकरिता खरेदी करु शकता आणि काही पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षण आणि विकासावर सुद्धा खर्च करु शकता.

हे वाचल्यावर अनेक प्रश्न डोक्यात आले ते येथे देत आहे.

  1. विकत घर घेण्या ऐवजी भाड्याने घर घेणे खरच फायद्याचे आहे का?
  2. तेजी मंदी येत राहातातच. मंदीच्या काळात गृहकर्ज बोजा वाटते हे खरे पण भाड्याचे मोक्याच्या ठिकाणचे घर परवडते का?
  3. वरच्या मजकूरात भाड्याच्या घराच्या बाबतीत अनेक गृहितके लपलेली आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली तर मंदीच्या काळात ती तोट्यात जाणार नाही का?
  4. भारतात घर घेण्याबद्दल एक वेळ मान्य केले तर परदेशात या बद्दल काय अवस्था आहे? नुकतेच काही मित्रांनी स्वीडनमध्ये भाडे परवडत नाही त्या पेक्षा स्वतःचे घर बरे म्हणून विकत घेतले. निदान परत येताना पैसे वाढून कमाई होते आणि करार संपण्याची तलवार नाहीशी होते हि कारणे सांगितली. इतर देशांमध्ये काय अवस्था आहे?
  5. आपले अनुभव आणि मते काय आहेत?

लेखनविषय: दुवे:

Comments

एकांगी

ढकलपत्रातून आलेला मजकूर आणि 'calculation' बरोबर असले तरी तो लेख फारच एकांगी वाटला.
तुम्ही वर म्हणताय तसंच मंदिच्या काळात म्युच्युअल फंडस्, शेअर बाजार, इ. ठिकाणी सुद्धा तोटाच होतो हे आपण आतापर्यंत अनेक वेळा पाहिले आहे.

त्या मजकूराच्या शेवटी वाक्य आहे, नंतर तुम्ही असाच एखादा FLAT तुमच्या मूलांकरिता खरेदी करु शकता आणि काही पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षण आणि विकासावर सुद्धा खर्च करु शकता.

परंतु, त्यातच वर लिहिले आहे की ज्या घराची किंमत आता ५० लाख आहे ती २० वर्षांनी १.५ करोड च्या आसपास असणार. म्हणजेच महागाई दराला अनुसरून त्या काळी घराची किंमत अवलंबून असणार. जर तुमची आर्थिक मिळकत सुद्धा विशेष प्रगती न करता केवळ महागाईच्या दराचे वाढली असली तर जी तडजोड आज घर घेताना करावी लागणार तीच २० वर्षांनी करावी लागणार!

तसेच त्या मजकूरात लिहिल्याप्रमाणे तुम्ही २० वर्षात २.५ करोड कमवु शकता, मात्र हे तुमच्या SMART गुंतवणुकीवर अवलंबून आहे. हा SMART गुंतवणुक प्रकार म्हणजे नेमका काय आहे? ती सगळ्यांनाच जमते का? की केवळ शेअर बाजाराच्या तत्कालीन परिस्थितीत ज्याचा फायदा झाला त्याची गुंतवणुक SMART होते??

परदेशात ज्यांना दीर्घ काळासाठी रहायचे आहे ते बहुतेक लोक स्वतःचे घर घेण्याचा प्रयत्न करतात असे दिसते. भाड्याचे घर घेताना भाडे जरा जास्त असले तरी शहरात मोक्याच्या जागी, शाळा-कचेर्‍यांच्या जवळच पाहिले जाते. पण तश्या जागी घर विकत घेणे परवडत नाही. म्हणून परदेशात घर विकत घेणारे, सगळेच नाहित पण पाहण्यात असलेले बरेचसे लोक, उपनगरात घर घेतात हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.

हे कसे ?

हे कसे काढलेत ? >>
दरमहा येणारा EMI (व्याजदर ११%) : रु .४७०००

---------------------
-धनंजय कुलकर्णी

ढकलपत्र

मी नाही काढले. ते ढकलपत्रातच आहे. म्हणूनच गंमत वाटली.






रु. ४३८६९

रु. ४३८६९ फक्त. येथे सोपा हिशोब आहे.

डिपेंड्स.

संपूर्ण गणित चेक केले नाही, पण कधी कधी घर घेणे योग्य निर्णय असतो तर कधी कधी भाड्याने राहणे. खालील लिंकामधील् बेसिक्स भारतातही लागू होईल असा अंदाज आहे.
http://www.time.com/time/magazine/article/0,9171,2074227,00.html

http://www.time.com/time/business/article/0,8599,2001469,00.html

http://www.nytimes.com/2010/04/21/business/economy/21leonhardt.html

http://www.nytimes.com/interactive/2010/04/20/business/20100420-rent-rat...

-Nile

पटले नाही

२० वर्षांनंतर तुमच्या 2 BHK घराची (market price ) किंमत १.५ करोड असेल
हे वाक्य दिशाभूल करणारे आहे.

मुंबई, ठाणे अथवा पुणे येथील घरांच्या किमती २० वर्षांत केवळ तिपटीने वाढतील, हेच मूळात पटत नाही.

स्वानुभव - ठाण्यात १९९४ साली घेतलेल्या घराची किंमत आज २०११ साली ७ पटीने तर २००४ साली घेतलेल्या घराची किंमत चौपटीने वाढल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहमत

कोल्हपुरात २००८ साली घेतलेल्या घराची किंमत सुद्धा आज दुपटी पेक्षा जास्त आहे.






किंमत

स्वतःचे हक्काचे घर असणे या मानसिक समाधानाची किंमत पैशात करता येणार नाही. भाड्याचे घर बदलावे लागु शकते. स्वतःचे घर शक्य असताना भाड्याच्या घरात रहाण्याचा कल नसतो.एखाद्या ठिकाणी कायमस्वरुपी राहायचे नसल्यास भाड्याचे घर सोयीस्कर असते. मूर्ख लोक घरे बांधतात व शहाणे लोक त्यात भाड्याने रहातात ही उक्ती मर्यादित अर्थाने खरी आहे.
प्रकाश घाटपांडे

वास्तव्य

स्वतःचे घर असणे आणि भाड्याने घर घेणे या गोष्टी इतर अनेक बाबींवर अवलंबून आहेत. घर घेताना माणूस शक्यतो पुढील गोष्टींचा विचार करतो -

१. कायम किंवा पर्यायी वास्तव्य
२. कुटुंब/सदस्य संख्या आणि कुटुंबाची गरज
३. ऐपत
४. गुंतवणूक

भाड्याच्या घराविषयी ज्या कटकटी असतात त्या ढकलपत्रात आलेल्या नसाव्या. हल्ली भाड्याने घर देताना केवळ ११ महिन्यांच्या बोलीवर देऊन ११ महिन्यांनी भाडेकरूला काढून टाकण्याकडे कल दिसतो. आमचे घर भाड्याने देताना एजंटने आम्हाला तसे करण्याबाबत कटाक्षाने सुचवले होते. असे जर होत असेल तर दर ११ महिन्यांनी घर बदलणे किती कष्टदायक असते त्याचा प्रत्यय येतो.

विकत घर घेण्या ऐवजी भाड्याने घर घेणे खरच फायद्याचे आहे का?

आपल्या मालकीचे एक घर हवे, ज्यातून कुणी आपल्याला बाहेर काढू शकत नाही ही भावना माणसाच्या मनात घर करून असते असे वाटते त्यामुळे घर असणे हे मानसिक दृष्ट्या नक्कीच फायद्याचे आहे.

तेजी मंदी येत राहातातच. मंदीच्या काळात गृहकर्ज बोजा वाटते हे खरे पण भाड्याचे मोक्याच्या ठिकाणचे घर परवडते का?

मोक्याच्या ठिकाणच्या जागांची भाडी ऐकली तर डोळे पांढरे होण्याची वेळ येते.

वरच्या मजकूरात भाड्याच्या घराच्या बाबतीत अनेक गृहितके लपलेली आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली तर मंदीच्या काळात ती तोट्यात जाणार नाही का?

नक्कीच.

भारतात घर घेण्याबद्दल एक वेळ मान्य केले तर परदेशात या बद्दल काय अवस्था आहे? नुकतेच काही मित्रांनी स्वीडनमध्ये भाडे परवडत नाही त्या पेक्षा स्वतःचे घर बरे म्हणून विकत घेतले. निदान परत येताना पैसे वाढून कमाई होते आणि करार संपण्याची तलवार नाहीशी होते हि कारणे सांगितली. इतर देशांमध्ये काय अवस्था आहे?

वर म्हटल्याप्रमाणे भाड्याचे घर आणि मालकीचे घर घेण्याची गरज शोधायला हवी. भाड्याच्या घरापेक्षा हक्काचे घर बरे असा विचार करून आम्हीही स्वतःचे घर विकत घेतले परंतु अमेरिकेतील मंदीमुळे घेतलेल्या किंमतीपेक्षा आता घराची किंमत कमी झाली आहे. याशिवाय, घर घेण्यासोबत इतर अनेक गोष्टी, कामे सोबत येतात आणि खर्चही.

अजून १५ वर्षांनी वगैरे मला घर विकून पुन्हा भाड्याच्या घरात जाऊन राहणे आवडेल असे वाटते कारण स्वतःच्या घरात उचलाव्या लागणार्‍या अनेक जबाबदार्‍या भाड्याच्या घरात उचलण्याची गरज नसते.

'लग्न पहावं करून, व घरं पहावं बांधुन!'

हो! ह्या ढकलपत्रातील विचार एकांगीच आहेत. आपले आयुश्य हे वेळेचा, पैशाचा, कश्टाचा हिशोब करून जगता येते कां? मला तरी या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक मिळाले आहे. 'लग्न पहावं करून व घरं पहावं बांधुन!' ह्या म्हणीचा अर्थ सध्या मला चांगलाच उमगतो आहे.

लग्नाआधी वडिलांच्या घरात मस्त जगत होतो. पण लग्न झाल्यावर ते घर सोडावे लागले. आत्ता मी भाड्याच्या घरात राहतो.
पण जेंव्हा-जेंव्हा घरमालक व त्याची बायको अचानक घरी येतात, तेंव्हा काहिसं विचित्र वाटतं. त्यांच्या पुढे चोरासारखं उभे राहून त्यांच्याशी आपण बोलतोय, असे उगीचच वाटत राहतं. मी स्वत: १ बीएचकेचे घर बांधकाम अवस्थेत असताना बुक केले आहे, पण ते तयार होईपर्यंत भाड्याच्या घरात राहणे क्रमप्राप्त आहे. नेमक्या त्या बील्डरलाच, डि.बी.रीअ‍ॅलिटीच्या मालकालाच सीबीआयने २जी स्कॅमच्या लफड्यामुळे पकडले आहे, त्यामुळे काम कधी पुर्ण होईल, देवाला ठाऊक!

चुकीची गृहीतके

लहानपणापासून माझे अंकगणित चांगले होते, त्यामुळे असाच प्रचंड आकडेमोडीचा हिशोब करून मी वयाच्या ४० वर्षांपर्यंत स्वतःचे घर विकत घेण्याचा विचार झुरळासारखा झटकून टाकत होतो. श्यामच्या आईचा मनावर एवढा पगडा होता की जन्मात कधीही कर्ज घ्यायचे नाही अशी जवळ जवळ प्रतिज्ञाच मी लहान असतांना केली होती. सुदैवाने मी अत्यल्प भाडे भरून सरकारी वसाहतीत रहात असल्यामुळे मला कर्ज काढून घर बांधण्याची गरजही नव्हती. पण तोवर माझ्या बहुतेक सहका-यांनी सेवानिवृत्तीनंतर राहण्यासाठी काही ना काही तजवीज केली होती. त्यामुळे मीही नाइलाजाने कुरकुरतच अखेर त्यांच्या लाइनीत आलो. आता वीस वर्षानंतर मागे वळून पाहता माझ्या सदनिकेची किंमत वीस पटीने वाढली आहे. माझा जन्मभराचा अख्खा पगार जरी मी शिल्लक टाकला असता (जे शक्य नव्हतेच) तरी आज मी हे घरकुल विकत घेऊ शकलो नसतो. मी घराच्या कर्जाचे जे हप्ते भरले ते पैसे शिल्लक टाकले असते तरी त्यावर मिळालेल्या व्याजासकट ते या किंमतीच्या अर्धेसुद्धा झाले नसते. खरे तर मी ते खर्च करून टाकण्याचीच शक्यता होती. त्यामुळे ते शिल्लक उरले नसतेच.
अर्थात माझ्या मालकीचे घर नसल्याने काही बिघडत नाही असे जरी समजले तरी आज माझ्या घराचे जेवढे बाजारभावाप्रमाणे भाडे आहे ते माझ्या आजच्या मिळकतीत मला परवडण्यासारखे नाही. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर मी हे घर भाड्याने घेऊ शकलो नसतो आणि मला कुठे तरी गैरसोयीच्या आणि लहानशा घरात रहावे लागले असते. माझ्या पिढीमधील बहुतेकांचा असा अनुभव आहे. म्हणजे ज्यांनी पूर्वीच चांगले घर (फ्लॅट) घेऊन ठेवले ते आता त्यात राहतात आणि त्या काळात जे घेऊ शकले नाहीत त्यांना आता दूर जावे लागले. याचे मुख्य कारण म्हणजे घरांच्या किंमती, घरांची भाडी आणि स्वतःचे उत्पन्न किती टक्क्यांनी वाढेल याची पंचवीस वर्षांपूर्वी केलेली गृहीतके चुकीची ठरली.
पुढील वीस वर्षात नक्की काय होईल हे कोणीच सांगू शकणार नाही. पण गेल्या पाच वर्षांचा काही मुलांचा अनुभव पाहता असे दिसते की जो ईएमआय पाच वर्षांपूर्वी त्यांना जेवढा भयानक वाटत असे तेवढा आज वाटत नाही. त्यामुळे त्यांना ऋण काढून घर विकत घेतल्याचा पश्चात्ताप होत नाही. घरांच्या किंमतीत जर सतत वाढच होत असेल तर केंव्हाही गरज पडल्यास ते विकून टाकून, त्यातून घेतलेले कर्ज फेडून वर थोडे पैसे शिल्लक उरतात. त्यामुळे चिंता नसते.
अमेरिकेत ज्या मुलांनी कर्ज काढून घरे विकत घेतली होती त्यांच्या घरांच्या किंमती बँकिंगच्या क्षेत्रात झालेल्या स्कॅममुळे अचानक कमी कमी होत गेल्या. त्यामुळे मध्यंतरी काही काळ त्यांना बराच त्रास भोगावा लागला होता असे ऐकले. कारण घर विकूनसुद्धा त्यासाठी घेतलेले कर्ज फिटत नव्हते. ते फेडण्यासाठी आणखी कमाई करून ती त्यात घालावी लागत होती.

थोडक्यात सांगायचे तर कर्ज घेणारच नाही असा हट्टही धरू नये आणि आपल्या कुवतीपेक्षा जास्त कर्ज घेऊही नये. .... आणि वीस वर्षांचा हिशोब करू नये.

असा काहीसा ताळा करावा खरा

वरील आकडेमोड मी तपासलेली नाही. पण त्यातील आकडे मान्य केलेत, असे समजूया. बघता २० वर्षांच्या शेवटी घरमालकाला (१.५ - १.३ करोड =) २० लाखाचा निव्वळ फायदा झालेला आहे. भाडेकरूला ६० लाखाचा निव्वळ तोटा. तरी त्या कथेत मालकीच चांगली झाली!

असा काहीसा ताळा करावा खरा. पण वीस वर्षांची आकडेमोड म्हणजे जरा जास्तच वाटते आहे. वीस वर्षांत बहुतेक गृहीत धरलेले व्याजदर चुकलेले असतील. १-५ वर्षांपुरता करावा. त्या काळापुरते बघावे :

(कर्ज-हप्त्यांतला व्याज-अंश + कर + चालू डागडुजीचा खर्च - घराच्या वाढीव किमतीचा घरमालकाचा हिस्सा) >?< (भाडे)

(घराच्या वाढणार्‍या किमतीमुळे वरील हिशोबात निव्वळ फायदा होत असला तरी...) गृहकर्जाचा हप्ता + कर + डागडुजीचा खर्च ही बेरीज कुटुंबाच्या उत्पन्नात "सहज" बसली पाहिजे. ("सहज" हा वैयक्तिक भावनेचा प्रश्न आहे. कुणाला फॅमिली हॉलिडे ढकलणे सहज वाटेल, तर कुणाला तो जुलूम वाटेल.)

ज्याची त्याची ...

1. विकत घर घेण्या ऐवजी भाड्याने घर घेणे खरच फायद्याचे आहे का?

फक्त पैशाचा व वर उल्लेख केलेल्या चढत्या आलेखाचाच विचार केला तर एका व्यक्तीच्या (रहाणारा एक इसम, कुटुंब नाही) दृष्टीने फायद्याचे वाटते. पण जगात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीत खरेदी केलेली घरे असेही दाखवतात की भाडे महाग् आहे व गृहकर्जाचा हप्ता कमी. किंवा आता घराची किंमत घेतलेल्या कर्जापेक्षा कमी आहे. त्यामुळे नक्की असे काहीच गृहीत धरता येणार नाही.

माझ्यामते घराची किंमत महाग असली तरी स्वताला परवडेल असे एक घर, भले ते वेगळ्या शहरात असो की तुम्ही रहात नाही अश्या भागात असो. घ्यावे. मग ते भाड्याने देउन त्यातील् आपला कर्जाचा वाटा भाड्यामुळे कमी करता येतो.

शिवाय कुटुंबात लहान व्यक्ती, वृद्ध, आजारी, अपंग इ लोक असताना सगळ्यांना घेउन घर बदलत रहाणे सोपे नाही. मुळात भाड्याने आपल्या गरजेप्रमाणे उत्तम घर पाहीजे तेव्हा मिळणे हे गृहीतक चुकीचे वाटते. स्वताचे घर असल्याच्या मानसीक समाधानाची किंमत् कशी करणार? शिवाय आपल्या समाजात स्वताचे घर नसलेल्या मुलाचे लग्न जमणे अवघड वाटते. बाकी स्टेटस सिंम्बल वगैरे वगैरे..

त्यामुळे घर घ्यावे असे माझे मत. भले तुम्ही स्वता सोयीसाठी भाड्याच्या घरात रहा पण एक घर असावे.

2. तेजी मंदी येत राहातातच. मंदीच्या काळात गृहकर्ज बोजा वाटते हे खरे पण भाड्याचे मोक्याच्या ठिकाणचे घर परवडते का?

सापेक्ष आहे. सगळ्यांनाच परवडत नसणार. पण एक खोली किंवा नशीबात असेल तर ओळखीने कोणाच्या तरी मोक्याच्या ठिकाणच्या घरात विश्वासू , ओळखीचे म्हणून ऑलमोस्ट रेंट फ्री रहायला मिळणारे काही नशीबवान असतात की. थोडक्यात सगळेच पैशात मोजता येत नाही.

3. वरच्या मजकूरात भाड्याच्या घराच्या बाबतीत अनेक गृहितके लपलेली आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली तर मंदीच्या काळात ती तोट्यात जाणार नाही का?

गृहीतकेच ती काही खरी काही खोटी ठरतात हा इतिहास आहे.

4. भारतात घर घेण्याबद्दल एक वेळ मान्य केले तर परदेशात या बद्दल काय अवस्था आहे? नुकतेच काही मित्रांनी स्वीडनमध्ये भाडे परवडत नाही त्या पेक्षा स्वतःचे घर बरे म्हणून विकत घेतले. निदान परत येताना पैसे वाढून कमाई होते आणि करार संपण्याची तलवार नाहीशी होते हि कारणे सांगितली. इतर देशांमध्ये काय अवस्था आहे?

पुन्हा एकदा हे सगळे ज्या त्या देशावर, तेथील तुमच्या एन्ट्री व एक्झीट टायमिंगवर अवलंबून. दोन्ही पर्यायांचा विचार करुन नुकसान परवडेल इतपतच सौदा करावा.

5. आपले अनुभव आणि मते काय आहेत?

अनुभव घर घ्यावे. पण कधी घ्यावे, केवढे घ्यावे हे ज्याने त्याने आपल्या परिस्थीतीचा विचार करुन ठरवावे. चुकीच्या व्यवहारात २५ मिलीयन डॉलरचे घर सोडावे लागल्याने आता तीन मिलीयनच्या अपार्टमेंट् मधे म्हणजे 'झोपडीत' रहायला लागल्याने डिप्रेशन आलेली लोक आहेत व खिशात दमडी नसताना दुसर्‍यांच्या २५ मिलीयनच्या पेंटहाउस मधे फुकट रहायची संधी मिळालेली लोक देखील. जस्ट नो युअर गेम.

हिशोब

आनंद घारे यांनी मांडलेले मुद्दे बरोबर आहेत. विशेषतः निवृत्तीनंतरच्या मिळकतीत भाडे (आणि घरे बदलण्याचा उपद्व्याप) परवडत नाही. त्यांचा दुसरा मुद्दाही बरोबर आहे. कर्ज घेताना जो हप्ता भयंकर मोठा वाटतो तो थोड्याच काळात सुसह्य होतो. माझे उदाहरण द्यायचे तर १९९० च्या सुमारास मी कर्ज घेण्यासाठी चौकशी केली होती आणि तेव्हा एक लाखाच्या कर्जासाठी काहीतरी १४०० रु ईएम आय होता आणि माझा पगार सुमारे ३००० रु होता. तेव्हा मला तो १४०० रु चा हप्ता खूप जास्त (पगाराच्या निम्मा) वाटला होता. पण ३-४ वर्षांनी तो हप्ता खूपच सुसह्य वाटला. अर्थात ही गोष्ट तरूण वयात शक्य आहे जेव्हा पगारवाढ चांगली मिळत जाते.

अजून एक मुद्दा मला नव्या पिढीत वेगळा वाटतो तो म्हणजे माझ्या पिढीत (चांगल्या नोकर्‍या असलेल्या) बहुतेकांनी पहिले घर घेताना १ रूम किचनने (किंवा १ बी एच के ने) सुरुवात केली आणि दुसर्‍या टप्प्यावर (वयाच्या चाळीशीत) मोठे घर घेतले. सध्या पहिले घरही २ बी एच के हवे असा कल दिसतो आहे. (१ रूम किचन मिळतच नाही हा भाग अलाहिदा).

पगाराच्या ८०-८५ टक्के ई एम आय असलेले कर्ज घेणार्‍यांबाबत काही म्हणायचे नाही. आम्ही भित्रे आहोत हे मान्य आहे.

नितिन थत्ते

थत्तेकाका कशाला भित्रे म्हणवून घेता

थत्तेकाका कशाला भित्रे म्हणवून घेता. तुम्ही दिलेला सल्ला हा नेहमीच फायदेशीर ठरला आहे.

इथेसुद्धा तुमचा सल्ला लागू पडतो आणि तो मी आजमावतोय..

- पिंगू

स्वतःचे घर घ्यावे

स्वतःचे घर घ्यावे (त्यात कधी रहावे हा निर्णय परिस्थिती, सोय वगैरे बघुन नंतर घेता येतो) या वरील अनेकांच्या मताशी सहत आहे.
ते किती मोठे/महाग घ्यावे? तर परवडेल इतके घ्यावे.. परवडेल म्हणजे?
माझ्या मते तुमच्या घराच्या किंमतीच्या 'तुमचे वय इतके टक्के' तुम्ही स्वतः भरू शकाल असे घर घ्यावे.
म्हणजे तुमचे वय २५ आहे तर घराच्या २५% किंमत कर्जाशिवाय भरता आली पाहिजे. जसजसे वय वाढते तसतसे कर्ज घेणे कमी करणे आवश्यक आहे .

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

गंभीर आणि मिस्किल

पगाराच्या वीस ते तीस टक्के ईएमआय येत असेल तर जरूर घर घ्यावे. चांगली गुंतवणूक आहे.
शक्यतो फिक्स रेटने कर्ज घ्यावे. पाच-दहा वर्षात वाढणारा पगार आणि चलनफुगवटा पाहता दरमहा हप्ता आवाक्यात वाटू लागेल.वीस वर्षात तर चिल्लर वाटू लागेल.
पती-पत्नी दोघेही कमावते असतील आणि दोघांनी या कर्जाचा भार उचलायचा ठरवला तर सहज शक्य आहे.
हे वीस वर्षांपूर्वीही लागू होते, आजही आहे आणि पुढेही असेल. फक्त आकडे बदलत जातात.

ह.घ्या. - आजकाल लग्नापूर्वी स्वतःचा(पालकांचा नव्हे) (शक्यतो पुण्यात) स्वतंत्र फ्लॅट असणे ही अट असते असे ऐकतो.(कुणाचा फ्लॅट आणि कुणाची अट ते चा.वा.ल.आ.अ.);)

खरे आहे

एकदा एका बँक मॅनेजरने दिलेली माहिती अशी आहे की सध्या बरेच लोक कर्ज घेताना २० वर्षाचे घेतात. पण परतफेड करताना सर्वसाधारणपणे ८ वर्षात करतात. म्हणजे जर गणिते बदलली तर परतफेड लवकरात लवकर केल्यास घराची पटींमध्ये वाढत जाणारी किंमत आणि ८ वर्षात केलेली गुंतवणुक याचा फरक हा बराच मोठा फायदा होईल जो फक्त आपल्या खिशात जाईल. पण घरभाडे मालकाच्या खिशात. तसेच नवरा बायको दोघे मिळून बोजा उचलत असतील तर ते जास्त फायदेशीर आणि सुसह्य आहे.

किस्सा: एका महिला सहकारीने दुसरीला सांगितले अगं स्थळ चांगले आहे तसे पण त्याच्या नावावर वाहनकर्ज आहे. दुसरी म्हणते अगं मग कशाला करतेस लग्न? घर आणि गाडी दोन्ही त्याचे हवे. कर्ज अजिबात नको. वाहन कर्ज असलेला मुलगा चांगलं स्थळ कसे म्हणतेस्? :)






चूक तर नाही ना?

>> म्हणजे घरासाठी येणारा एकूण खर्च (अंदाजे) दरमहा : रु. ५००००
...

>> २० वर्षांनंतर तुम्ही दिलेली एकुण रक्कम असेल : ( ५००००० X २० X १२ ) + ७५०००० = १२७५०००० = रुपये १.३ करोड

दरमहा खर्च रू. ५०,००० आहे, पण ५,००,००० लिहिले आहे.
योग्य आकडा १,२०,७५००० असा हवा.
-स्वधर्म

काही त्रुटी...

घारे, थत्ते व सहज यांच्याशी सहमत. आत्ताच नोकरी बदलल्यामुळे सध्याचं घर विकतोय (परवा क्लोजिंग आहे!), त्यामुळे ही सगळी गणितं ताजी आहेत. मी सुदैवाने अमेरिकेतल्या घरांच्या किमतींचा बुडबडा फुगायच्या आधी घर घेतलं. त्यामुळे घराची किंमत त्या रोलरकोस्टरवर चढून खाली आपटली तरी एकंदरीत पाण्याच्या थोडा वरतीच आहे. पण माझ्यानंतर दोन वर्षांनी घरं घेणारे अजूनही २५% पाण्याखाली आहेत. कदाचित चारपाच वर्षात ही तूट भरून निघून किमती पुन्हा मूळ पदावर येतील.

हा अविस्मरणीय अनुभव असला तरी घर विकत घेण्याशिवाय पर्याय मला तरी वाटत नाही. वरच्या उदाहरणात सुमारे ७०% पगार घराच्या हप्त्यासाठी - म्हणजे जरा जास्तच वाटतं. टॅक्स, रिटायरमेंट फंड वगैरे जाऊन उरलेल्या पैशाच्या ४० ते ५०% हप्ता भरणं ठीक वाटतं.

भाडी 'स्वस्त' आहेत व घरं 'महाग' आहेत या युक्तिवादात मार्केटला अजून न कळलेलं मला कळलेलं आहे असा पवित्रा दिसतो. हा धोक्याचा आहे. हे जर गणित बरोबर असतं तर लोकांनी घरं भाड्याने देण्याऐवजी सरळ विकायलाच काढली नसती का? स्टॉक मार्केटमध्ये इतका फायदा होत असेल तर पन्नास लाखाच्या भांडवलावर महिना दहा हजार मिळवत बसणं मूर्खपणाचंच.. असा मूर्खपणा हजारो लोक करत आहेत असं म्हणणं धार्ष्ट्याचं वाटतं.

पन्नास लाखाच्या घराची वीस वर्षांनी किंमत फक्त दीड कोटी हे गणित चुकीचं वाटतं. गेल्या वीस वर्षात रुपयांमधलं उत्पन्न तिपटीपेक्षा खूपच जास्त झालेलं आहे. आत्ता जे पन्नास लाखाचं घर म्हणून विचारात घेतलं आहे तशा घराची वीस वर्षांपूर्वी किंमत काय होती आठवून पहा... माझा अंदाज आठ ते दहा लाखाचा आहे. हा अंदाज जर बरोबर असेल तर या घराची किंमत तीन कोटीच्या आसपास किंमत येईल, मग सगळेच निष्कर्ष चुकतील. शेवटी घर ही गुंतवणुक आहे, त्यामुळे गुंतवणुकांबाबतचे सर्व धोके, व फायदे लागू पडतात हेच खरं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

स्वतःचे की भाड्याचे?

प्रत्येकाने घर विकत घेतलेच पाहिजे. भाड्याच्या घरात राहणे म्हणजे पैसे वाया घालवणे आहे. असा काहीसा कल अमेरिकेन लोकांच्यात बरीच वर्षे होता/आहे. सरकारी योजनांनीही लोकांना स्वतःचे घर घेण्यास बरेच उद्युक्त केले. स्वतःचे घर घेण्याची ऐपत असूनही भाड्याच्या घरात राहणे म्हणजे मूर्खपणा आहे असे जे वातावरण होते ते आता बदलताना दिसत आहे. वरील निरोप हेच सांगतो आहे. हाउसींग बबल चे फुटणे हे त्यामागचे महत्वाचे कारण असावे. भारतात अजून तसा फटका बसलेला नाही. घरांचा किंमती एक्स्पोनेंशियली वाढतच आहेत त्यामूळे अजून तरी भारतात ऐपत असल्यास स्वत:चे घर घेण्याकडे कल असावा असे वाटते. पण जे अमेरीकेत घडले ते भारतातही घडू शकते, घरांच्या किंमती कोसळू शकतात, ही रिस्कही आहे.

थोडक्यात भाड्याचे घर की स्वतःचे? ह्याचे योग्य उत्तर एकंच असे नाही (जे पूर्वी ठामपणे 'स्वतःचे' असे सांगीतले जायचे). प्रत्येकाच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार बदलणारे आहे.

 
^ वर