हे तर करावेच लागेल

भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात. नवीन व्यवसाय कसा सुरू करावा ही चर्चा येथे व्हावी ही अपेक्षा. खालील माहिती मध्यम व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडेल असे वाटते.

१. पॅन नंबर - कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पर्मनंट अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. हा नंबर युनिट ऑनलाईन अप्लाय करता येतो. मात्र कागदपत्रे छाननीसाठी प्रत्यक्ष जावेच लागते. यासाठी बहुदा युनिट ट्रस्टच्या शाखेत जाता येते. कंपनी रजिस्टर करणार असाल तर ४९ए हा फॉर्म आवश्यक आहे. शिवाय कंपनी नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी, कंपनीचे ऍड्रेस प्रूफ आणि तुमचा आयडी लागेल. याची फी रुपये ९४ आहे. (फॉर्म आंतरजालावरून उतरवून घेतला असल्यास फुकट, नाहीतर रुपये ५ अधिक)

२. प्रा. लि. कंपनी च्या सुरुवातीसाठी टॅक्स अकाऊंट नंबर (टॅन) आवश्यक राहील. यासाठी ४९ बी हा फॉर्म भरून जेथे टीडीएस भरता येतो अशा ठिकाणी देणे आवश्यक आहे. योग्य ती छाननी झाल्या नंतर हा क्रमांक दिला जातो. यासाठी बहुदा रुपये ६० फी लागते.

३. कोणत्याही व्यवसायासाठी शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन आवश्यक असते. याची फी मात्र तुमच्या कंपनीत किती लोक कामावर आहेत यावर ठरते. १ माणसासाठी रुपये १००, १ ते ५ माणसे नोकरीवर असल्यास रु. ३०० लागतात.

४. प्रा. लि. कंपनी साठी व्हॅट रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. ही नोंदणी सेल्स टॅक्स साठी असते. यासाठी
- कंपनीच्या घटनेची प्रत
- नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी
- कंपनीचे ऍड्रेस प्रूफ
- तुमचे पासपोर्ट आणि लायसन असे किमान दोन आयडी
- विहित नमुन्यातील फोटो
- पॅन कार्डाची प्रत
ही कागदपत्रे लागतील.
या नोंदणीसाठी रु. ५०० फी आहे.

५. प्रा. लि. कंपनी साठी प्रोफेशन टॅक्सचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
यासाठी - कंपनीच्या घटनेची प्रत
- नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी
- कंपनीचे ऍड्रेस प्रूफ
- पॅन कार्डाची प्रत
यासाठी कोणतीही फी नाही.

६. तुमच्या प्रा. लि. कंपनी मध्ये २० पेक्षा जास्त लोक काम करत असतील त्यांच्यासाठी भविष्य निर्वाह निधीची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी कोणतीही फी नाही.

७. तुमच्या प्रा. लि. कंपनी मध्ये २० पेक्षा जास्त लोक काम करत असतील त्यांच्यासाठी तर मेडिकल इंशुरंन्स रजिस्टरमध्ये नोंदणी आवश्यक आहे. यासाठी कोणतीही फी नाही.

ही माहिती चांगल्या हेतुने देत आहे. भारताबाहेरील व्यक्तींना भारतात व्यवसाय सुरू करतांना काय काय आवश्यक असू शकेल याचा अंदाज देण्यासाठी २०१०-११ या सालात संकलित केलेली आहे. वर देलेल्या रकमांचे आकडे, फिया भारतातील निरनिरा़ळ्या कायदेशीर तरतूदींनुसार बदलत असतात. योग्य त्या कायदेशीर माहितीसाठी योग्य त्या वकिलाची मदत घ्यावी.

या शिवाय तुमच्याकडे काही माहिती असल्यास त्याची चर्चेचे स्वागत आहे.

Comments

आनखी

इतरत्र दिलेला प्रतिसाद इथे चिकटवत आहे.

उत्तम माहितीपूर्ण धागा.

१. >>प्रा. लि. कंपनी साठी प्रोफेशन टॅक्सचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.

या खेरीज स्वतःचे प्रोफेशन टॅक्सचे रजिस्ट्रेशन घ्यावे लागते. आपण आधी नोकरी करत असतो तेव्हा पगारातून प्रोफेशन टॅक्स भरतो. नोकरी सोडल्यावर वेगळे रजिस्ट्रेशन घ्यावे लागते.

२. जर सेवा पुरवण्याचा व्यवसाय करणार असू तर (काही अपवाद वगळता) सर्व सेवादात्यांना सेवाकराचे (service tax) रजिस्ट्रेशन घ्यावे लागते. विशिष्ट टर्नओव्हरपर्यंत सेवाकर माफ असतो. तरी रजिस्ट्रेशन मात्र करावे लागते.

३. तुम्ही काही धोकादायक व्यवसाय (उत्पादन, साठा, विक्री) वगैरे करत असाल तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची + प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी लागत असावी. काही बाबतीत एक्स्प्लोझिव्ह लायसन्सही लागते.

४. जर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायचा असेल तर एफ पी ओ चे लायसन्स लागते. हॉटेल/उपहारगृहाचा व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या आरोग्य विभागाची परवानगी लागते.

नितिन थत्ते

डीन + डिजिटल सिग्नेचर

चांगला हेतू व धागा.

  1. डिजिटल सिग्नेचर लागते
  2. कमीतकमी २ भारतीय डायरेक्टर लागतात, त्यासाठी त्यांचा डीन नंबर लागतो.

चांगला प्रयत्न

सरकारी नोंदण्यांची यादी देण्याचा प्रयत्न आवडला. यात व्यवसायाप्रमाणे भर टाकणे जरुरी आहे. (जसे फॅक्टरी ऍक्ट, एक्स्पोर्ट बद्दल विदेशी चलनाचा, सर्विस टॅक्स वगैरे.)

तुम्ही दिलेल्या नोंदण्या बरोबर आहेत. पण यातील कित्येक लहान व्यवसायासाठी जरुरी नाहीत.

सहसा पॅन सगळ्यांकडे असतो (व्यवसाय सुरु करण्यापूर्वी). तो नसला तरीही व्यावसायिकतेतून होणारी उलाढाल मोठी नसेल तर त्याची गरज नसते. (अशी माझी समजूत आहे.)

शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन हे जेव्हा कुठल्या व्यापारी जागेतून व्यवसाय करत असाल तर लागतो. फॅक्टरीतून व्यवसाय केल्यास वेगळे रजिस्ट्रेशन लागते. त्याप्रमाणे कंत्राटदारीचा व्यवसाय वा तत्सम जागा नेघेता केलेले व्यवसाय हे शॉप ऍक्ट खाली येणार नाहीत. तसेच कदाचित शहराबाहेरून केलेला व्यवसाय हा देखिल त्यात येणार नाही.

आता प्रा. लि. कंपनींच्या नोंदणीबद्दल. ज्यांना हा मार्ग पकडून जायचे आहे. त्यांच्या साठी धोक्याची सूचना म्हणजे प्रा.लि. कंपनीला पटकन बंद करता येत नाही. त्यामुळे बहुतेकजण आधी प्रोप्रायटरी वा पार्टनरशिप मधे व्यवसाय करतात. जम बसू लागल्यावर त्याची प्रा.लि. कंपनीत रुपांतर करतात.

प्रा.लि. कंपनी स्थापन करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनी कायद्याची पूर्तता झाली पाहिजे. अगदी पाटी कशी असावी, भागधारकांची मिटींग कशी बोलवावी. बोर्ड ऑफ डायरेक्टर कसे असावे या अनेक बाबींचा त्यात समावेश असतो. (यासाठी कंपनी कायद्याचे वाचन करणे जास्त श्रेयस्कर). यासाठी वेगवेगळी रजिस्टर्स कंपनीच्या रजिस्टर्ड ऑफिसमधे ठेवावी लागतात. सल्लागारावर 'कंपनी सेक्रेटरी' असलेली व्यक्ति असणे बंधनकारक. चार्टर्ड अकाउंटटने दरवर्षी छाननी करायची असते. कुठल्याही व्यवसायासाठी यांचा सल्ला आवश्यक.

प्रोफेशनल टॅक्स, सर्विस टॅक्स (सर्विस कंपन्यांसाठी), एक्साईज रजिस्ट्रेशन (उत्पादन करणार्‍यांसाठी), तर सेल्स टॅक्स व्यापार करणार्‍यांसाठी आवश्यक आहे. यातील काहींतून लहान व्यावसायिकांना सूट दिली जाते. (उलाढालीची रक्कम अमुकच्या आत असेल तर.) याशिवाय आयात निर्यात करायचे असेल तर वेगळ्या नोंदण्या कधी कधी लायसन्स लागते.

व्यवसायानुसार वेगवेगळ्या नोंदण्या तीन स्तरावर (महापालिका/राज्य/केंद्र) केल्या जातात. यांची यादी व्यवसायानूरुप बदलत जातात. काही व्यावसायिकांना विशिष्ट शैक्षणिक पात्रता लागते. (उदा. आर्किटेक्ट, डॉक्टर) या पात्रतेची परिक्षा उत्तीर्ण होणे व संबंधित व्यवसायसंस्थेचे रजिस्ट्रेशन लागते.

पाण्यात पडल्यावर पोहायला येते म्हटल्याप्रमाणे व्यवसायात पडल्यावर या सर्व गोष्टी जमू लागतात. चांगले सल्लागार विशेषतः चार्टर्ड अकाउंटंट मिळाला तर बहुतेक नोंदण्याचे योग्य ते मार्गदर्शन मिळते.

प्रमोद

चांगला धागा

बरीच चांगली माहिती मिळते आहे. निनाद, धाग्याबद्दल आभार

उपक्रमरावः वाचनखुणांची गरज पुन्हा अधोरेखीत होते आहे.. कृपया लक्ष घालावे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर