चित्रपट एक पाहाणे

प्रस्तुत प्रस्ताव लिहिण्याचे कारण वैयक्तिक दृष्टीने अतिशय तात्कालिक आहे. ते लिहिण्यामागे कसलाच अभ्यास किंवा नीट विचार केलेला नाही. परंतु वैयक्तिक पातळीवरच्या शंकाना इथे स्थान आहे असे धरतो.

आज रात्री व्हिटोरियिओ डि सिका चा १९४८ सालचा मान्यताप्राप्त सिनेमा "बायसिकल् थीफ्" पाहिला. चित्रपटाबद्दल थोडेसे वाचलेले होते आणि पाहायची उत्सुकता होती.

चित्रपट नक्कीच परिणामकारक आहे. डिव्हीडीची प्रिंट् रिव्हाईज असल्याकारणाने, १९४८ चा सिनेमा असूनही कुठेही अंधारी, धूसर दृष्ये नव्हती. चित्रपटाच्या कथानकाची अंधुक कल्पना होती. महायुद्धानंतरच्या भयानक आर्थिक परिस्थितीचे वास्तववादी चित्रण. व्यावसायिक नटांना न घेता त्या परिस्थितीतल्या लोकांकडून त्या त्या स्थळांवर करून घेतलेली कामे. एका दिवसाचे गोळीबंद कथानक, साध्या शब्दातले परिणामकारक संवाद, अतिशय सुबद्ध, नेमकी पटकथा, काही लक्षांत राहातील अशा फ्रेम्स्, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलाच्या पर्स्पेक्टिव्हने चितारलेले प्रसंग विलक्षण परिणामकारक.

येथवर चित्रपटाचा आस्वाद हा "अभ्यासक्रमीय" दृष्टिकोनातून माझ्या कुवतीप्रमाणे नि गोळा केलेल्या थोड्या माहितीप्रमाणे , प्रेडिक्टेबल झाला.

यानंतर मनात उमटलेल्या प्रश्नाना मला नीटसे समाधानकारक उत्तर देता न आल्याने हा धागा काढायचा असे ठरवले.

१९४८ नंतर अनेक दशके चित्रपट तंत्र निश्चितच बरेच पुढे गेलेले आहे. डोळे दीपवणारे सेट्स् , कलादिग्दर्शन, मेकप्स्, फोटॉग्रफी आणि नंतरचे स्पेशल इफेक्ट्स् चे साम्राज्य जरी बाजूला ठेवले (आणि ते अर्थातच बाजूला ठेवण्यासारखे नाहीच.) तरी, कथानकाची गुंतागुंत , कॅमेरा अँगल्स् चा वेगवेगळ्या संदर्भातला मार्मिक वापर , अर्थपूर्ण संवाद आणि एकंदर चितारायच्या कॅन्व्हासचे क्षेत्र या सार्‍यामधे प्रचंड समृद्धता गेल्या ६ दशकांत पाहायला मिळते. या सार्‍या संदर्भात "बायसिकल् थीफ" च्या उपरोल्लेखित गुणांचे महत्त्व कितपत राहाते ?

की असा विचारच मुळी खुजा आणि मुख्य म्हणजे काळाचे संदर्भ न लक्षांत घेता केलेला असल्याने चुकीचा ठरतो ? १९४८ पर्यंत प्रगत झालेल्या एकंदर चित्रपटविषयक ज्ञानाच्या, विचाराच्या संदर्भात हे असे चित्रपट माईल्स्टोन्स् असतात, आणि म्हणून ते महत्त्वाचेच राहातात ही गोष्ट पुरेशी आहे हेच खरे काय ?

थोडक्यात, महत्त्वाचा मानला गेलेला असा एखादा चित्रपट पाहून आणि त्याबद्दल थोडेसे वाचूनही, त्याचे (वर वर्णिलेल्याप्रमाणे झालेले ) आकलन अपुरेच ठरण्याची शक्यता आहे काय ?

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

आदिमानवांची भित्तिचित्रे, लहान मुलांनी काढलेली चित्रे इ. चे कौतुक सुद्धा सापेक्षच केले जाते असे वाटते. अशा गटांकडून आजच्या 'प्रगल्भ' प्रतिभेच्या तोडीची कला मिळूही शकते परंतु तसे नसले तरी कौतुक केले जातेच.
कॅसाब्लांका मध्ये बंदुकीची गोळी झाडल्यावर 'ठ्ठो!' अशा आवाजानंतर निपचित पडणारी पात्रे बघून "ह्ये काय भिकार?" असेच वाटले. हिंदी चित्रपटांमध्येही अशीच हाणामारी असते (हल्ली गुणवत्ता सुधारते आहे. वर्टिगोचा डॉली झूम, मेट्रिक्सचा बुलेट टाईम, इ. तंत्रे टुकारपटही वापरतात).

सहमत

सहमत, तरीही फक्त कौतुक म्हणून नव्हे तर त्यातून विशेष आनंद निर्मिती होतेच, त्यातच त्याच्या कौतुकाचा टिकाऊपणा आहे. त्यामध्ये केवळ कालसापेक्षता हा मुद्दा नसून निखळ आनंदनिर्मिती, विशेष तांत्रिक सादरीकरण, सामान्य विषयाचे असामान्य उदात्तीकरण, साधेपणातून विनोदनिर्मिती किंवा नुसतीच व्यथा मांडणी हि कारणे देखील असू शकतात.

मेट्रिक्सचा बुलेट टाईम

मेट्रीक्सच्या स्क्रिप्ट ला पोषक होता. अक्षयकुमारच्या आवारा-पागल दिवाना मधे ते तंत्र का वापरलं हे कळालं नाही..

काय उचलावं हे कळणं जसं महत्त्वाचं आहे तसं कुठे वापरावं हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे.
अशी तंत्र वापरली म्हणून् लगेच् गुणवत्ता सुधारली असं मला वाटत नाही.
धूम सिनेमा मधले स्पेशल इफेक्ट त्यामानाने स्क्रिप्टच्या जवळ जाणारे वाटतात.

वेडगळ शॉटस बॉलिवूडचीच् मक्तेदारी नाही..कालच गोल्डन-आय बघितला. त्यात आपला हिरो दरीत पडणार्‍या विमानात जाऊन् बसतो आणि ते विमान वर आणतो.

उत्तम

विषय. मला वाटतं, त्या त्या कलाकृतीच्या निर्मितीचा काळ लक्षात घेऊन आपल्या अपेक्षा काहीशा कॅलिब्रेट करायला हव्यात. यासाठी अर्थातच कुठलं सूत्र किंवा हमखास फॉर्म्युला नाही. 'बेन हर'सारखा विक्रमी संख्येने ऑस्कर जिंकणारा सिनेमा असो किंवा 'पण लक्षात कोण घेतो' सारखी जुनी पुस्तकं - आजच्या काळाच्या अपेक्षेने पाहिला\वाचली तर थोडी निराशाच पदरी पडू शकते.

दुसरा मुद्दा असा की, आजचं आयुष्य अधिक वेगवान आणि व्यामिश्र झालं आहे. तुमची इच्छा असो वा नसो, वेगवेगळे अनुभव तुमच्या मेंदूवर/मनावर येऊन आदळत असतात. सरासरी पाहिले जाणारे चित्रपट, धक्कादायक घटना वा बातम्या, वेगळ्या विषयावरची पुस्तकं यांचं आजच्या घडीला प्रमाण कितीतरी अधिक आहे. १८९० मध्ये एका सामान्य माणसाने गोडसे भटजींचं 'माझा प्रवास' वाचलं असतं तर त्याला वाटलेलं आश्चर्य, अचंबा, वेगळेपणा यांचा ते आजवर वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणून टिकून राहण्यात मोठा भाग असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

हेच

वा अतिशय योग्य शब्दात मांडले नंदन!
त्या त्या कलाकृतीच्या निर्मितीचा काळ लक्षात घेऊन आपल्या अपेक्षा काहीशा कॅलिब्रेट करायला हव्यात हे मान्यच पण आणि दिग्दर्शकाला नक्की काय म्हणायचे आहे याचा आशयही लक्षात घेणे महत्त्वाचे. निव्वळ तांत्रीक बाजू चांगल्या म्हणून चित्रपट चांगला होतो असे नाही.
पण मुक्तसुनीत म्हणतात तसे एखादा चित्रपट कळायला काही काळ द्यावा लागतो असे माझे मत आहे. उदा. इन्मार बर्गमनचा पर्सोना कळायला मला तरी बराच काळ लागला. तसेच सॅम्युएल बेकेटचे ऍन ऍक्ट विदाउट वर्डस् १ आणि २ समजायलाही वेळ लागला. पण समजल्यावर भलताच हर्ष झाला, छान वाटले. बेकेतच्या सादरीकरणात तंत्रापेक्षा आशयावर भर जास्त होता.

-निनाद

..

त्या त्या कलाकृतीच्या निर्मितीचा काळ लक्षात घेऊन आपल्या अपेक्षा काहीशा कॅलिब्रेट करायला हव्यात
सहमत.

तत्कालिक उपलब्ध संसाधनांचा अधिकाधिक चांगला/कल्पक वापर करून तयार केलेली कलाकृती श्रेष्ठ मानली पाहिजे. 'मुघल-ए-आजम' चे सेट्स किंवा 'संत तुकाराम' मधला वैकुंठगमनाचा सीन आज कदाचित आणखीनच सफाईदारपणे चित्रित करता येतील. मात्र त्याकाळी त्या त्या लोकांनी केलेल्या श्रमाचे मूल्य त्यामुळे कमी होऊ नये.

ठिक

षिर्शक आवडले. लेखण मात्र थोडक्यात आवरलंय् पण जेवढं लिहीलंय तेही थोडके नसे :)

अवांतर : परवाच १०,००० बी.सी. पाहिला . व्वा !! मजा आ गया :)

- टारझन

असंच


थोडक्यात आवरलंय् पण जेवढं लिहीलंय तेही थोडके नसे :)

असंच म्हणतो.

---
अवांतर:
बाकी मी देखील चित्रपट पाहून झाला की त्यावर थोडीशी समीक्षा लिहून टाकण्याचं काम चालू केलंय[येथे]. नुकताच बघितलेला दुसर्‍या महायुद्धातील तुर्कीमधील एका कथानकावर आधारित "दि गन्स ऑफ नॅव्हॅरॉन" हा देखील मला खूप आवडला. "फाइट क्लब" हा आजवर मला सर्वांत जास्त आवडलेला हॉलिवूडपट आहे, त्याबद्दल [येथे] मी थोडं लिहिलंय.

उत्तम

उत्तम चर्चाविषय आणि चर्चा.

सर्वात पहिला मुद्दा म्हणजे सापेक्षता. कलेमध्ये अब्सोल्यूट ट्रूथ असा प्रकार नसल्याने जी मते असतील ती वैयक्तिक आहेत. (इथे गोलमालमध्ये अमोल पालेकरचा संवाद आठवला, "संगीत अकांउटंसी नही है. संगीत में दो और दो चार हो सकते है, तीन हो सकते है, झीरो भी हो सकते है." (जसा आठवला तसा, चूभूद्याघ्या.)

काही अपवाद वगळता बरेचदा जुने चित्रपट बघताना तंत्रज्ञान किंवा इतर गोष्टींमध्ये मार खात आहेत असे जाणवते. हिंदी पिच्चरच्या बाबतीत हे विशेष जाणवते. न पिता झोकांड्या देत फायटिंग करणारा (आणि ब्याकग्राउंडला ढिशुम, ढिशुम असे आवाज) देव आनंद बघवत नाही. पण याचा अर्थ सगळेच जुने चित्रपट बघताना असे होत नाही. तंत्रज्ञान तोकडे असूनही पाथेर पांचालीची प्रत्येक फ्रेम जणू एक सुरेख चित्र असल्यासारखी लक्षात राहते. आवाज नसूनही चार्ली चॅप्लीन सहज बाजी मारून जातो. ह्याचा व्यत्यास म्हणजे अगदी अत्यानुधिक तंत्रज्ञान हाताशी असूनही काही चित्रपट पूर्ण निराशा करतात. एलियन आणि एबीससारख्या चित्रपटांनंतर कॅमेरॉन टायटॅनिक सारखा चित्रपट घेऊन येतो, वर तो गाजतो आणि त्याला ढीगभर ऑस्कर मिळतात. का विचारू नये.

चर्चेतील मूळ प्रश्नाचा विचार करायचा झाला तर तंत्रज्ञान, सफाई वगैरेंची सूट देऊनही चित्रपटात खिळवून ठेवण्यासारखे काही असेल तर त्या कलाकृतींचे आयुष्य बरेच आहे असे मानायला हरकत नाही. कधीकधी ही सूट देणे सहज जमते, कधीकधी जमत नाही, कधीकधी सूट द्यायची गरजच पडत नाही.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

बायसिकल थीफ

अर्थपूर्ण संवाद आणि एकंदर चितारायच्या कॅन्व्हासचे क्षेत्र या सार्‍यामधे प्रचंड समृद्धता गेल्या ६ दशकांत पाहायला मिळते. या सार्‍या संदर्भात "बायसिकल् थीफ" च्या उपरोल्लेखित गुणांचे महत्त्व कितपत राहाते ?

नक्कीच राहते. माझ्यामते बायसिकल थीफ, पाथेर पांचाली आणि टु हाफ टाइम्स इन् हेल. हे तीन चित्रपट आजही वरच्या पाहिलेल्या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट राहतात. आणि ते बरेच जुने आहेत. (कदाचित् तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिला हवा होता.)
आज तांत्रिक बाबी अनेक चांगलीच पुढे गेली आहे. पण लक्षात राहतात ती वापरण्याची कला.

की असा विचारच मुळी खुजा आणि मुख्य म्हणजे काळाचे संदर्भ न लक्षांत घेता केलेला असल्याने चुकीचा ठरतो ? १९४८ पर्यंत प्रगत झालेल्या एकंदर चित्रपटविषयक ज्ञानाच्या, विचाराच्या संदर्भात हे असे चित्रपट माईल्स्टोन्स् असतात, आणि म्हणून ते महत्त्वाचेच राहातात ही गोष्ट पुरेशी आहे हेच खरे काय ?

मला नाही वाटत. ही गोष्ट पुरेशी नाही. ती त्यापलिकडची आहे.

थोडक्यात, महत्त्वाचा मानला गेलेला असा एखादा चित्रपट पाहून आणि त्याबद्दल थोडेसे वाचूनही, त्याचे (वर वर्णिलेल्याप्रमाणे झालेले ) आकलन अपुरेच ठरण्याची शक्यता आहे काय ?

आजकालच्या आधुनिकोत्तरवादानंतर असे प्रश्न पडतातच कसे? :) तुमचे आकलन तुमच्याशी माझे माझ्याशी दिग्दर्शकाचे दिग्दर्शकाशी सुखी समृद्ध आणि वेगवेगळे राहोत.

कलाप्रवासाचा हा भाग चित्रकलेत जास्त मोठ्या काळाचा आहे. यातील कलात्मक गुण हे तांत्रिक असतातच पण शिवाय आकलनात्मक असतात. मुद्दाम कमी तंत्रे वापरून चित्रे काढली जातात. त्यातही चित्रकाराचे कौशल्य आणि कला गुणांना वाव मिळतो.

एका चांगल्या चित्रपटाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रमोद

नव-वास्तववादी शैली

हा नव-वास्तववादी (निओ-रिअलिस्ट) चित्रपट आहे. त्या काळात उल्लेखनीय ठरलेली आणि काळाच्या ओघातही टिकून राहण्यासारखी या शैलीची वैशिष्ट्यं अशी सांगता येतीलः

  • सर्वसामान्य माणसांच्या सुख-दु:खांचं चित्रण - याची अनेक उदाहरणं आपल्याकडेही सापडतात (दो बिघा जमीन, पाथेर पांचाली वगैरे). सध्या मराठी मध्यमवर्गात विशेष लोकप्रिय असणारे माजिद माजिदीसारखे समकालीन इराणी दिग्दर्शकही ही शैली वापरताना दिसतात.
  • सेटवर चित्रपट चित्रित करण्यापेक्षा शक्य तितक्या प्रत्यक्षचित्रणावर भर - यामुळे चित्रपट अधिक वास्तवसदृश होतो.
  • देखण्या नटांकडून नाटकी संवादफेक आणि एकंदर नाटकी अभिनय 'करून' घेण्याच्या जुन्या पध्दतीच्या शैलीपेक्षा अधिक सामान्य चेहरे असणारे नट (किंवा व्यावसायिक नट नसणारे लोक) वापरून वास्तवसदृश अभिनयावर भर

या वैशिष्ट्यांमुळे होणारा परिणामः सर्वसामान्य प्रेक्षक पडद्यावर चाललेल्या कथानकात आणि भावनिक गुंत्यात पटकन समरस होतो. हे समरस होणं कालातीत असावं असं वाटतं. त्यामुळे अशा चित्रपटांतून समकालीन वास्तव मांडणारे चित्रपट आजही मर्यादित प्रमाणात लोकप्रियता राखून आहेत. विशेषतः ज्यांना निव्वळ 'डोकं बाजूला ठेवून टाईमपास'छाप करमणुकीपेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित आहे अशा प्रेक्षकांत ते लोकप्रिय होताना दिसतात.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

त्रिकालाबाधित सत्य आणि अपेक्षांचे प्रमाणीकरण

कॅलीबरेशनला प्रमाणीकरण हा शब्द अंदाजपंचे म्हणून घे/घातला आहे. त्याहून समर्पक शब्द सुचवल्यास स्वागत.
प्रत्येक कलाकृती त्या त्या काळाच्या चौकटीत बसवून बघायची/ वाचायची असे ठरवल्यास निखळ रसास्वाद घेणे अवघड होऊन जाईल. प्यासा अमुक सालचा, मग त्या काळातल्या तंत्रज्ञानानुसार, त्या काळातील सामाजिक परिस्थितीनुसार , थोडक्यात त्या काळातील पेस्ट किंवा पेस्टल फॅक्टर्सनुसार तो कसा आहे अशी चिरफाड करताना उसनी घेतलेली उपमा वापरायची तर फणसाचे गरे बाजूला ठेऊन गदळ चिवडत बसल्यासारखे होईल. कलेच्या क्षेत्रात ऍबसोल्यूट असे काही असत नाही, हे पटायला जड जाते. 'जागते रहो' (मला) आजही कालसुसंगत आणि उत्कृष्ट वाटतो. हा चित्रपट पहिल्यांदा बघून आता पंचवीस वर्षे होऊन गेली. या काळात चौकटी बदलल्या तरी मूळ चित्राच्या गुणवत्तेला धक्का पोचलेला नाही. 'उड उड बैठी हलवईया दोकनिया, बर्फी के सब रस ले लिया रे पिंजडेवाली मुनिया' यातल्या गुणवत्तेला काळ चरे पाडू शकेल असे वाटत नाही.
कलेचा आस्वाद घेणार्‍यांच्या निखळ आस्वाद घेणारा रसिक आणि तलवार उपसून बसलेला समीक्षक अशा दोन जाती असाव्यात, असे वाटते. पहिली भूमिका कुणाला थिल्लरपणाची वाटली, तर वाटो बापडी, पण ती अधिक आनंददायक आहे, हे नक्की. प्रत्येक कलाकृतीचे अपडेटस डाऊनलोड करण्याच्या भानगडीत पडू नये, असे मला वाटते. नाहीतर नवा 'देवदास' पाहिल्यावर होते, तसे व्हायचे.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

मिती

नव्या तंत्रज्ञानाबरोबर चित्रपटासारख्या कलाक्षेत्राला नवीन मिती प्राप्त होतात. त्यामुळे जुने चित्रपट हे नवीन, विस्तारलेल्या अवकाशाच्या अधिकाधिक मर्यादित मिती वापरून बनवल्यासारखे वाटतात. माझा एक मित्र म्हणाला होता, अरे, आता ब्लॅक अॅंड व्हाइट पिक्चर्स बघवत नाहीत. त्याचं म्हणणं मला पूर्णपणे पटत नाही. कुठल्याही रंगीत चेहेऱ्यापेक्षा कालापानी मधली मधुबाला मला अधिक सुंदर वाटते. कमी मीतींमधला म्हणजे कमी प्रतीचा असं अर्थातच नाही. उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अॅब्सोल्यूट सौंदर्य निर्मिती करतात, व ती टिकून रहाते. शिंडलर्स लिस्ट साठी मुद्दामच फक्त काळेपांढरे रंग निवडले आहेत. काही स्वर वर्ज्य केल्यामुळे रागाला घाट यावा, मर्यादांमुळे अर्थ रेखीव व्हावा तसं आहे.

पण माध्यमाचं रिझोल्युशन वाढल्यामुळे काही वेळा आपल्या नजरा अधिक बारीक होतात. एकेकाळी आवडलेले पण आता भोंगळ, बटबटीत वाटणारे अनेक चित्रपट आहेत.

आविष्कारपद्धतींमधला बदल हा भाषा बदला सारखा असतो हे खरंच. ज्ञानेश्वरी हे उत्कृष्ट काव्य असलं तरी ती भाषा जाणून घेतल्याशिवाय गोडी कळत नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत

माध्यमाचं रिझोल्युशन वाढल्यामुळे काही वेळा आपल्या नजरा अधिक बारीक होतात. एकेकाळी आवडलेले पण आता भोंगळ, बटबटीत वाटणारे अनेक चित्रपट आहेत.

सहमत आहे. हेच गाणी, पुस्तके यांच्याबाबतीतही म्हणता येईल.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

अभिजाताची आवड

अशाच प्रकारे पुस्तकांच्या आवडीवर पूर्वी येथे चर्चा झाली होती.

मला वाटतं की काळानुसार गुणवत्ता सुधारतेच परंतु जुनी कला पाहायचे उद्देश वेगळे असू शकतात. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांबद्दल बोलायचे ठरवले तर स्पेशल इफेक्ट्स किंवा ऍक्शन असणारे चित्रपट कंटाळवाणे वाटू शकतात परंतु विनोदी चित्रपट कंटाळवाणे वाटतीलच असे नाही. उदा. चलती का नाम गाडी हा चित्रपट घरात सर्वांना आवडतो. मुलीनेही चांगला २-३ वेळा पाहिला आहे. किशोरकुमारच्या हाफ टिकटचेही असेच.

बेन-हर किंवा लिझ टेलरचा क्लिओपात्रा वगैरे चित्रपट माझ्या आवडीमुळे मी अद्यापही बघू शकते. ब्रॅम स्टोकरचा किआनु रिव्जचा नवा ड्रॅक्युला बघण्यापेक्षा ब्रॅम स्टोकरचे ड्रॅक्युला हे पुस्तक वाचणे अधिक रोचक वाटते. (त्यातला आताच्या काळात काही विसंगत वाटणारा भाग सोडून.)

अनपेक्षित गुंतागुंतीचा चित्रपट

आजवर या चित्रपटाचे नाव "द बायसिकल थीफ" असे एकवचनी आहे, असे मला वाटत होते. आताच समजले की "ladri di biciclette" या नावाचे सुयोग्य भाषांतर "बायसिकल थीव्ह्स्" असे बहुवचनी* आहे.
एवढ्याशा फरकाने "अरे या चित्रपटाचा एक मोठा भाग मला समजलाच नाही!" असे धस्स् झाले! हा चित्रपट पुन्हा बघणे आले. कारण बहुवचनाचा अर्थ लागणारे जे अंधुक संदर्भ लक्षात येते आहे, ते इतके पटत आहेत, की पूर्ण चित्रपट नव्याने बघून काही वेगळे समजेल अशी खात्री वाटते आहे.

तंत्र उत्तम असावे लागते, हे तर आहेच. पण कलाकृती उत्कृष्ट असते तेव्हा ती उत्कटतेच्या आणि बहुविधतेच्या बाबतीत जीवनाशी चढाओढ करू लागते. (मात्र जीवनासारखी रटाळ आणि निरर्थक होत नाही - सर्वच बाबतीत अनंत असण्याचे जीवनचे वैशिष्ट्य ते जीवनाचेच.)

पुन्हापुन्हा बघून किंवा स्मरूनही वेगवेगळे पैलू दिसू लागतात इतकी गुंतागुंत कलाकृतीमध्ये असते. हे जीवनातही असते. पण काहीतरी खर्‍यापेक्षा-खरे आवाक्यात येते आहे, इतपत अगदी पहिल्या दृष्टीतही एकसंध कलाकृतीबद्दल जाणवते. हे जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवांत पुष्कळदा नसते.

तांत्रिक सौष्ठव, उत्कट अनुभव देण्यातले यश आणि एकसंधता हे सगळे असलेली ती कलाकृती. आणि हे सर्व टिकाऊ असले तर ती कलाकृतीसुद्धा खूप टिकाऊ असते.

आदल्या काळात चांगली वाटलेली कलाकृती कालबाह्य होऊ शकतेच. पण (१) तंत्रातली समृद्धता ही गचाळपणापेक्षा वेगळी समजून न यावी इतके तंत्र संस्कृतीमधून विसरले जायले हवे (२) कलाकृतीने दिलेला अनुभव आधुनिक जीवनापेक्षा इतका वेगळा झालेला आहे, की त्याचे उत्कट पडसाद रसिकाच्या अंतर्गत उमटतच नाहीत (३) कलाकृती इतकी छिन्नविच्छिन्न झालेली आहे की तिची एकसंधता काळानेच भंगली आहे. हे सर्व काही होता कलाकृती कालबाह्य झाली, असे म्हणावे लागेल. "सायकलचोर" चित्रपट तीन्ही बाबतीत अजून जिवंत कलाकृती आहे.

कथानकाची गुंतागुंत , कॅमेरा अँगल्स् चा वेगवेगळ्या संदर्भातला मार्मिक वापर , अर्थपूर्ण संवाद आणि एकंदर चितारायच्या कॅन्व्हासचे क्षेत्र या सार्‍यामधे प्रचंड समृद्धता गेल्या ६ दशकांत पाहायला मिळते.

हा विचार सुसंदर्भ नाही. अनुभवाची उत्कटता आणि एकसंधता साधण्यासाठी दा सिका या दिग्दर्शकाने या सर्वांपैकी काही वापरायला हवे होते, असा विचार जर चित्रपट बघताना मनात आला असता, तरच हा विचार सुसंदर्भ झाला असता.

या बाबतीत अन्य कलाप्रकारांबाबत विचार करावा. आपणा सर्वांच्या आवडनिवडी, अनुभव वेगवेगळे असतात, म्हणून ही कसरत उपयोगी पडेल.
पुलं म्हणतात की एखादा उत्तम गायक फक्त तानपुर्‍याची एक साथ घेऊन स्वर्ग उभा करतो. अन्यत्र पुलंनी बाजाच्या पेटीवर उगाच गरळ ओकणार्‍या टीकाकारांविरुद्ध पेटीचे समर्थन केलेले आहे. ते स्वतः पेटी घेऊन कधीमधी गायकांची साथ करीत - तानपुरा असला तरी. म्हणजे पेटी बनवायचे तंत्र, पेटी वाजवायच्या तंत्राचा गेल्या शंभर-एक वर्षांत झालेला विकास हा पुलंना अमान्य नसावाच. पण ज्या गायकाला फक्त तानपुरा साथीला घेऊन उत्कट संगीतानुभव घडवता येतो त्याच्या कलेची महत्ता अन्य वाद्यांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे थोडीसुद्धा कमी होत नाही. प्रश्न हा असतो - तो संगीतानुभव घेत असताना उत्कटता आणि एकसंधता येण्यासाठी अन्य वाद्यांची कमतरता भासते आहे काय? सर्वच तंत्रे मर्यादित असतात - संगीतात रंगसंगतीचा "अभाव" नसतो, रंगसंगती ही संगीततंत्राच्या मर्यादेबाहेरची होय. (नृत्यात मात्र संगीत आणि रंगसंगती, हे दोन्ही असू शकतात.) तानपुर्‍यासह गाण्याच्या तंत्राच्या मर्यादेत गायक सौष्ठव दाखवतो आहे काय? उत्कटता, एकसंधता, सौष्ठव असल्यास पुरते.

किंवा हे व्हॅनगॉघने चितारलेले चित्र बघा :

http://blog.businessofsoftware.org/2007/11/a-carpenter-som.html

१८८० नंतर जगात पेन्सिल, चितारण्याचा कोळसा यांच्या तंत्रात सुधारणा होतच आहे. जगाचे सोडा. खुद्द व्हॅनगॉघच नवनवीन तंत्रे आणि युक्त्या शिकतच गेला - वरचे चित्र त्याच्या चित्रकारी आयुष्यातले अगदी सुरुवाती-सुरुवातीचे चित्र आहे. ही सगळी माहिती या चित्राच्या आस्वादाशी संबंधित असली तर अगदी दुय्यम रीतीने.

अगदी या चित्रातील पर्स्पेक्टिव्हमधले "घोटाळे" आणि शरिराच्या मानाने पंजाचे "प्रमाणदुष्ट" आकारमान वगैरे घ्या. हे मुळात तांत्रिक दोष आहेत की नाही, की चित्रकाराने मुद्दामून घेतलेला निर्णय आहे? याबद्दल ठाम टीका करता येऊ नये इतकी उत्कटता आणि एकसंधता या चित्रात आहे. ("सायकलचोर" चित्रपटात असे छिद्रान्वेषी दोषसुद्धा नाहीत - गैरसमज नसावा.) टीका केलीच तर ती चित्राच्या अंतर्गतच करावी लागते - "या दोषांमुळे या चित्रात रसभंग होतो" अशी. आणि मग कित्येक रसिक असहमती सांगतील : "या चित्रात रसभंग होत नाही." मात्र, "व्हॅनगॉघने किंवा अर्वाचीन चित्रकारांनी नंतरच्या अनेक चित्रांत हाताचे आकारमान प्रमाणात साधले आहे, म्हणून येथले चुकलेले आहे" अशी टीका नि:संदर्भ आहे.

- - -
*"बहुवचन" - हा गळ टाकलेला आहे.

 
^ वर