सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण कसे राबवावे?

माझ्या मित्रासबरोबर काल गप्पा चालल्या होत्या. त्याने सांगितलेला हा प्रसंग.. "त्याचा इस्त्रीवाल्याच्या मुलाला शिकायचे नाही असे तो इस्त्रीवाला माझ्या मित्राला दोन वर्षांपूर्वी सांगत होता. तेव्हा मित्राने कारण विचारले असता त्याला शाळेत जे शिकवतात ते आवडत नाही (आणि त्यामुळे नीट येतही नाही). त्याची सगळी आवड गाड्यांचा "मेकॅनिक" किंव तत्सम मशिन्सना उघडण्यात आहे आणि शाळेत ते काही शिकवत नाहीत. इस्त्रीवाला नुकताच गावाहून आला होता. मुलगा गावी असताना नियमित शाळेत जात असे त्यामुळे त्याच्या पायाभुत गोष्टीच कच्च्या होत्या. त्याला इंजिनियर हो म्हणणे धाडसाचे ठरले असते. अश्यावेळी मित्राने त्याच्या मुलाशी बोलून त्यास आय.टी.आय.च्या कोर्सबद्द्ल सांगितले. मात्र त्यात ऍडमिशन मिळण्यासाठी दहावी / बारावी ही किमान परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असेही सांगितले. मात्र ही नवी माहीती मिळाल्यानंतर आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळेल असा हुरूप येऊन दोन वर्षे चांगला अभ्यास करून तो दहावी झाला व त्याला आता आयटीआयला ऍडमिशन मिळाली आहे"
मित्राला ही कथा ऐकून म्हटले "अरे वा! चांगलं काम केलस की"
तो म्हणाला "अरे त्यासाठी नाही सांगितली हि गोष्ट. सांगायची गोष्ट अशी की आता आपल्याकडे शालेय शिक्षण सक्तीचे होऊ लागले आहे. मी त्या इस्त्रीवाल्याच्या मुलाला मार्गदर्शन करू शकलो पण हे सार्‍यांच्या बाबतीत होईल असे नाही. बहुतांशी मुले कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एकाच प्रकारचे साचेबद्ध शिक्षण घेणार व कमीतकमी १५ वर्षात पदवीधर म्हणून बाहेर पडणार. पुढे केवळ शाळेत जायचं म्हणून एकाच प्रकारचे शिक्षण घेणारी अख्खी पिढी उभी राहील. एकाच प्रकारे घेतलेले शिक्षण, साधारण एकाच छापाचे विचार व एकाच पद्धतीने ब्रेन कंट्रोल केलेली पिढी तयार होणार आहे हे कितपत बरोबर आहे?"
"अरे पण आपल्यावेळीही असेच तर होते. सगळे जण तोच अभ्यासक्रम शिकायचे. तरीही सगळे एकाच साच्यात विचार थोडेच करतो? आणि तुला काय म्हणायचे आहे? सगळ्यांना शिक्षण देऊ नये? का शिक्षणाची सक्ती करू नये? चांगल्या गोष्टी कोणी आपणहून करत नसतील तर काहिशी सक्ती करावी लागु शकते"
"नाही शिक्षण नको असे नाही पण सरसकट शिक्षणाने काहि तोटे होणार आहेत त्याचाही विचार झाला पाहीजे"
"कोणते तोटे?"
"आता बघ आपण ट्रेकला गेलो होतो तिथे आपल्याला वाट दाखवायला आलेले आजोबा काय सांगत होते? 'चार बुकं शिकल्यापासून पोर गडावर फिरकेनाशी झाली आहेत. खाली उभं राहून शिग्रेटी ओढतील पण कोणाला वाट दाखवायलाही गडावर येणार न्हाईत' किंवा आपला मेकॅनिक पण ओरडत होता हल्ली गॅरेजमधे कामं करायला तरूण पोरं पटकन तयार होत नाहीत. हॉटेलवाल्यांना विचार त्यांना वेटर नेहमी "मागास" म्हणजेच अशिक्षित राज्यांतून का आणावे लागतात? थोडक्यात सगळ्यात मोठा तोटा म्हणजे शारीरिक श्रमांचे मुल्य कमी होऊन ते श्रम करायला लागणार्‍या मनुष्य बळाची कमतरता येत्या वर्षांत वाढणार आहे. शिवाय एका छापाचे शिक्षण घेऊन होणारी सृजनशीलतेची कमतरता हाही लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. याच बरोबर एकाच प्रकारच्या मनुष्यबळाची होणारी वाढ झाल्यावर त्यांचे नोकरीचे प्रश्न सुटले नाहीत तर त्यामुळे वाढता असंतोष व तरुणांचे चुकीच्या मार्गाला लागणं ही बायप्रोडक्ट्स आहेतच"
मी मित्राचं बोलणं ऐकून विचारात पडलो हे खरं..

सार्वत्रिक शिक्षण हवेच हे खरे. पण ते एकाच प्रकारचे हवे का? जर

  • शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे काय शिकावे याचीही सक्ती करणे कितपत योग्य आहे? (शालेय शिक्षणात)
  • सक्तीच्या शालेय शिक्षणाचे फायदे आपण सारेच जाणतो आणि ते आहेतच. पण या सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाचे काही तोटे आहेत का? असल्यास त्यावर उपाय काय?
  • शिक्षण घेऊनही शारिरीक श्रमाला मोल व श्रमजीवनाला प्रतिष्ठा देणे हे शक्य आहे का? असल्यास कसे?
  • इतक्या सुशिक्षितांना जर फारसे शारिरीक श्रम न करता पैसा हवा असेल तर तशा नोकर्‍या उपलब्ध आहेत का? नसल्यास ह्या सार्वत्रिक शिक्षणामुळे असंतोषाची संभावना कितपत वाढते?
  • थोडक्यात, सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण देताना काही खबरदारी, विषेश योजना, पुरवणी नियम असणे गरजेचे आहे असे वाटते का?

टीपः सदर चर्चा ही भारतीय विद्यार्थ्यासंबंधी आहे. मात्र असे प्रयोग जगात होत असल्यास त्यांनी सक्तीचे सार्वजनिक शिक्षण राबवताना ह्या गोष्टीची काळजी घेतली आहे का? असल्यास / नसल्यास काय परिणाम झाले हे देखील वाचायला आवडेल

लेखनविषय: दुवे:

Comments

इंग्रजांची मानसिक गुलामी झुगारावी लागेल.

खाली उभं राहून शिग्रेटी ओढतील पण कोणाला वाट दाखवायलाही गडावर येणार न्हाईत' किंवा आपला मेकॅनिक पण ओरडत होता हल्ली गॅरेजमधे कामं करायला तरूण पोरं पटकन तयार होत नाहीत. हॉटेलवाल्यांना विचार त्यांना वेटर नेहमी "मागास" म्हणजेच अशिक्षित राज्यांतून का आणावे लागतात? थोडक्यात सगळ्यात मोठा तोटा म्हणजे शारीरिक श्रमांचे मुल्य कमी होऊन ते श्रम करायला लागणार्‍या मनुष्य बळाची कमतरता येत्या वर्षांत वाढणार आहे. हे १००% नव्हे १००१% बरोबर आहे. इंग्रजांनी त्यांच्या कारकुनी करता राबवलेली शिक्षण पद्धती आपण ६५ वर्षा नंतर ही बदलू शकलो नाही ही आपल्या शिक्षण धोरणाची शोकांतीका आहे. तसे पाहीले तर स्वातंत्र झाल्या नंतर भारत सरकारचे प्रत्येक धोरण ठाम असे नाही. आपण परदेशातील विद्यार्थी पेट्रोल पंप, मेक्डोनाल्ड्स मध्ये काम करून शिकतात म्हणून नुसते कोतूक करतो पण आपली मुळे कोण्या नेत्याच्या तालावर का नाचतात याचा विचार आपण करत नाही. नेते हा विचार करणार नाहीत त्यांना श्रम करणारेराबणारे हात नको आहेत. यांना हातात दगड घेवून उगारणारे हात पाहिजे आहेत जर परिस्थिती खरच बदलावयाची असेल तर बालवाडी पासून शिक्षण पद्धती बदलावी लागेल.पाहीली पासून शेती आणि श्रमावर आधारित, मूल्य शिक्षणावर आधारित अभ्यास क्रम तय्यार करावा लागेल. इंग्रजांची मानसिक गुलामी झुगारावी लागेल.

thanthanpal.blogspot.com

छान

वाट दाखवायला गडावर जाणे, गॅरेजमध्ये गाड्या धुणे/ऑईल बदलणे, वेटरची नोकरी करणे, पेट्रोल भरणे, असल्या 'मॅकजॉब'साठी "पाहीली पासून शेती आणि श्रमावर आधारित, मूल्य शिक्षणावर आधारित अभ्यास क्रम तय्यार" केला की "गोरगरिबांच्या मुलांना धुणीभांडी आणि झाडू मारण्याव्यतिरिक्त कामे मिळूच नयेत म्हणून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटा ती बालवाडीत गेल्यापासूनच बंद करण्याचा सदाशिवपेठी डाव" असे बोंबलायला ठठपा मोकळे!

सदाशिव पेठी मुलांना अश्या शिक्षणाची जास्त आवश्यकता आहे

त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटा ती बालवाडीत गेल्यापासूनच बंद करण्याचा सदाशिवपेठी डाव" असे बोंबलायला ठठपा मोकळे! माझ्या प्रतिसादावर आपली भोचक प्रतिक्रया वाचून तुमच्या अज्ञानाची कीव करावी तेव्हढी कमी. मुलभूत दुखणे काय आहे हे समजून न घेता प्रतिक्रिया करून इतर समाजा बद्दल तुच्छतेने बोलणे हे गिरीजा कीर सह आपणा सर्वांची हीन मानसिकता आहे. गरीब मुलानाचा नाही तर सदाशिव पेठी मुलांना ही अश्या शिक्षणाची सक्ती करावी त्यांना त्याची जास्त आवश्यकता आहे. गरीब काय कोणतेही काम करण्यास तय्यार असतो, फक्त त्यास योग्य प्रशिक्षण दिले की तो वरचढ होईल हे तुमचे दुखणे आहे. आजचे शिक्षण हे फक्त कारकुनी शिवाय काहीच निर्माण करत नाही.श्रम प्रतीष्टेवर आधारित शिक्षण पद्धत न राबवल्या मुळेच सदाशिव पेठेतील तरुण श्रमाची कामे करावयास लाजतो आणि मग कोणाच्या तरी झेंड्याखाली टपोरीपणा/टग्गेगिरी करत फिरतो. जरा समाजाचे निरक्षण करा. २५-३०% टक्के नोकरीला लागले म्हणजे सर्व सदाशिवपेठेत आलबेल आहे असे नाही. thanthanpal.blogspot.com

वेगळा मुद्दा

श्रमाची कामे म्हणजे काय? वातानुकुलित खोलीत, पंधरा हजार रुपयांच्या खुर्चीत बसून विचार करायला श्रम पडत नाहीत का? सदाशिवपेठी असो किंवा खेड्यातील, लोक श्रमाची कामे करीत नाहीत कारण मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. ज्यांना जमिनी विकून पैसे मिळतात ते सिग्रेटी फुंकत फिरतात. जेथे खरीच विवंचना असते तेथे लोक कष्ट करतातच. शहरातही पैसा फेकला की हवे तितके काम करवून मिळते, गुंडोपंतांना विचारा.

"सदाशिव पेठी मुलांना ही अश्या शिक्षणाची सक्ती करावी त्यांना त्याची जास्त आवश्यकता आहे."
ते स्वतःचे हित बघतीलच की! त्यांचे शैक्षणिक वाट्टोळे झाले तर 'इतर समाजाला' अधिकच संधी मिळतील ना?

"गरीब काय कोणतेही काम करण्यास तय्यार असतो, फक्त त्यास योग्य प्रशिक्षण दिले की तो वरचढ होईल हे तुमचे दुखणे आहे."
वाट दाखवायला गडावर जाणे, गॅरेजमध्ये गाड्या धुणे/ऑईल बदलणे, वेटरची नोकरी करणे, पेट्रोल भरणे, असल्या 'मॅकजॉब'साठी प्रशिक्षण लागत नाही.

काळा बरोबर बदला नाही तर क्षमा करणार नाही.

सदाशिवपेठी हा माझा शब्द नाही तो तुमच्या प्रतिसादात प्रथम तुम्हीच वापरला. या मुळे मला उठाठेव करावी लागली. प्रत्येक काम अधिक चांगले करण्या करता प्रशिक्षणाची गरज आहे.
इंग्रजांनी त्यांच्या कारकुनी करता राबवलेली शिक्षण पद्धती आपण ६५ वर्षा नंतर ही बदलू शकलो नाही ही आपल्या शिक्षण धोरणाची शोकांतीका आहे. हा मुद्दा तुम्हाला समजला नाही किंवा यातच तुमचा फायदा असल्या मुळे मुख्य विषया कडे जाणूनबुजून तुम्ही दुर्लक्ष करत आहात . समाज व्यवस्था बदलण्यास प्रस्थापितांचा ज्ञानेश्वरा पासूनच विरोध आहे. पण आज ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या पालख्या साहित्य संमेलनात मिरवण्यात येतात पण विरोधक नामशेष झाले त्याच काय काळा बरोबर बदला नाही तर क्षमा करणार नाही.

thanthanpal.blogspot.com

तसे नाही!

"सदाशिवपेठी हा माझा शब्द नाही तो तुमच्या प्रतिसादात प्रथम तुम्हीच वापरला. या मुळे मला उठाठेव करावी लागली."
ते ठीक आहे पण तुम्ही नाहीरेंची बाजू घेता ना? सदाशिवपेठींची शैक्षणिक प्रगती कशी करावी त्याची चिंता तुम्हाला कशाला? सदाशिवपेठींची शैक्षणिक अधोगती झाली तर 'इतर समाजा'ला बरेच ना? काळाबरोबर बदलले नाहीत तर सदाशिवपेठींना कारकुनी करत 'खितपत' पडू द्या ना! ते तुमच्याकडे मदत मागायला आले का?

"इंग्रजांनी त्यांच्या कारकुनी करता राबवलेली शिक्षण पद्धती आपण ६५ वर्षा नंतर ही बदलू शकलो नाही ही आपल्या शिक्षण धोरणाची शोकांतीका आहे. हा मुद्दा तुम्हाला समजला नाही किंवा यातच तुमचा फायदा असल्या मुळे मुख्य विषया कडे जाणूनबुजून तुम्ही दुर्लक्ष करत आहात ."
'नयी तालीम' प्रकारची शिक्षणपद्धती मला नको आहे हे मी मान्यच करतो. त्यात माझा तोटा होईल/झाला असता हेही मान्य! वाट दाखवायला गडावर जाणे, गॅरेजमध्ये गाड्या धुणे/ऑईल बदलणे, वेटरची नोकरी करणे, पेट्रोल भरणे, असल्या 'मॅकजॉब'साठी वेगळी शिक्षणपद्धती सुरू केली तर त्यात सदाशिवपेठींना फायदाच होईल कारण गॅरेजमध्ये गाड्या धुणे/ऑईल बदलणे, वेटरची नोकरी करणे, पेट्रोल भरणे, असल्या 'मॅकजॉब'साठीच्या वेगळ्या शा़ळांमध्ये केवळ नाहीरे वर्गच जाईल आणि त्या मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागेल. म्हणून सांगतो की अशी वेगळी शिक्षणपद्धती नाहीरे वर्गासाठी वाईट ठरेल.

"काय काळा बरोबर बदला नाही तर क्षमा करणार नाही."
ते माझे आणि काळामधील म्याटर आहे, तुम्ही चिंता करू नका.

सदाशिवपेठीना शिक्षणाची दीक्षा देणारे महात्मा फुले

सदाशिवपेठीना शिक्षणाची दीक्षा देणारे महात्मा फुले, हे नाहीरे वर्गाचे बहुजन समाजाचेच होते हे तुम्ही विसरलात का? सर्व वर्गाना , स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी जीवाची बाजी लावली हे कृतघ्न व्यक्तीच नाकबूल करेल.कुटुंब नियोजन अथवा संतती नियमनाचा भारतातील आद्य प्रवर्तक पंचाहत्तर वर्षापूर्वी लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी धरला होता तेंव्हा सुद्धा सनातनी - कर्मठ हिंदू समाजलोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. भारताच्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी सध्या संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली. तेंव्हा सदाशिव पेठींची उठाठेव करू नका म्हणणारे पुरातन वादी सुद्धा काळाच्या ओघात नष्ट झाले.

thanthanpal.blogspot.com

वेगळा मुद्दा

अहो पण त्यांचे भले केलेत तर सध्या आहे ती विषमता वाढेल ना? की तुम्हीसुद्धा या 'शोषक' समाजाचे पाईक झालात?

पण त्यांचा मुद्दा चांगला आहे

रिटेसाहेब, जाऊ द्या, त्यांना तुमचा मुद्दा समजला आहे पण ते गाडी वेगळ्या वाटेवरुन नेत आहेत.

पण त्यांचा मुद्दा चांगला आहे. आय टी आय चे शिक्षण अधिक व्यापक करुन त्यात नव्या-नव्या ट्रेडस् घालत राहणे हे ब-याच मुलांसाठी योग्य ठरेल. ज्या लोकांना हे बदल घडवुन आणता येऊ शकतात ते अशा चर्चा वाचतील तेव्हाच काही हालचाल सुरु होइल.

१८० डिग्रीने उलटे

--पाहीली पासून शेती आणि श्रमावर आधारित, मूल्य शिक्षणावर आधारित --

मागे एकदा मी मेडीकल कोर्स गावातील गरजांनुसार करावा असा विचार व्यक्त केल्यानंतर तुम्ही केलेला थयथयाट आठवतो. तेव्हा तुमचे विचार १८० डिग्रीने उलटे होते.

रजेवर?

ठणठणपाळ रजेवर गेले आहेत का?

शिक्षकांनाही शिक्षण

शिक्षकांनाही शिक्षण सक्तीचे केले तर बरेच प्रश्न सुटतील.

नाही कळले

नाही कळले. शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे? असे तुम्हाला वाटते? कारण शालेय शिक्षणासाठी डीएड्/ बीएड् वगैरे विषेश अभ्यासक्रम आहेत.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

"हाडाचा" शिक्षक

प्रत्येक क्षेत्रातील व्यावसायिक त्यांच्या क्षेत्रातील काम आधुनिक, सहज, कार्यक्षम, काळानुरुप, भविष्यवेधी असे करण्यासाठी विचार विनिमय करतात व त्यात अनेक गोष्टी साध्यही करतात. आयटी क्षेत्रात हे प्रकर्षाने जाणवते. मला वाटते की, भारतातील शिक्षणक्षेत्र हे असे एक क्षेत्र आहे ज्यात अशाप्रकारची वैचारीक देवाणघेवाण होत नाही, असा माझा समज आहे.
शिक्षणक्षेत्राकडे जो वर्ग शिक्षक म्हणून जातो, तो इतर सगळे मार्ग बंद झाल्यानंतर हा मार्ग निवडणारे असतात. पैसाही कमी मिळतो व काहीच्याकाही कामे मागे लावली जातात त्यामुळे शिक्षक ख-या अर्थाने "हाडाचा" होतो, जो आधी धष्टपुष्ट असतो. चैतन्यशील, स्वतःला नवनवे शिकण्याची आवड असलेले लोक ह्याकडे किती वळतात हा प्रश्नच आहे. हे कुठेतरी बदलायला हवे आहे.
जे अनुभवी शिक्षक माझ्या पाहण्यात आहेत, ते तर "सर्व-ज्ञानी" असल्याच्या थाटात वावरतात. एखादा विषय वर्षानुवर्षे शिकवल्यावर त्यातील बारकावे समजणारच, त्यात विषेश ते काय? पण ह्यांचा वावर जणू ह्यांनीच तो विषय शोधुन काढल्यासारखा असतो. त्यामुळे नवे असे काही करु देत नाहीत. शाळेतल्या प्रत्येक कामाला टच्चून विरोध करतात.
त्यामुळेच असे वाटते की, ज्या लोकांना महत्वपुर्ण बदल घडावे असे वाटत असायला हवे, त्यांना तुम्ही मांडलेले प्रश्न अगदी मुळापासुन माहीती आहेत व कसे सोडवायचे हे ही माहीती आहेत.

"ट्रेनर"

कार्पोरेट जगातील जे "ट्रेनर" आहेत, ते मात्र बरेच सजग आहेत व त्यांच्यात वरील अपेक्षीत विचार विनिमय होत असतो. खरे तर ही मंडळी आपल्या शिक्षकांची चुलत भावंडे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना कार्पोरेट जगातील इतर व्यावसायिक कंपन्याही आहेत ज्या त्यांना ट्रेनिंगसाठी सर्व सुविधा देऊ शकतात.
म्हणजेच सजगता हा प्रगत देश आणि विकसन्शील देश ह्यातील लोकांच्या मानसिकतेतील तफावत नसुन, इतरच काहीतरी आहे व त्यातील मला पटलेली कारणे वर दिली आहेत.

सहमत आहे

शिक्षणक्षेत्राकडे जो वर्ग शिक्षक म्हणून जातो, तो इतर सगळे मार्ग बंद झाल्यानंतर हा मार्ग निवडणारे असतात. पैसाही कमी मिळतो व काहीच्याकाही कामे मागे लावली जातात त्यामुळे शिक्षक ख-या अर्थाने "हाडाचा" होतो, जो आधी धष्टपुष्ट असतो. चैतन्यशील, स्वतःला नवनवे शिकण्याची आवड असलेले लोक ह्याकडे किती वळतात हा प्रश्नच आहे. हे कुठेतरी बदलायला हवे आहे.

सहमत आहे.
हे बदलायला हवेच आहे. पण फक्त इतके केले की शारीरिक श्रम लागणार्‍या कामांना प्रतिष्ठा कशी मिळेल हे समजले नाही. हे करायला हवेच पण याच्या बरोबरीने श्रमाधिष्टीत कामांना उच्च रोजगार, रेकग्निशन (मराठी?) वगैरे मिळणे तितकेच आवश्यक वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अजेंडा

कारण शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांचा असा अजेंडा असणे चुकीची अपेक्षा होणार नाही. देशात काय नवे कोर्सेस सुरु करावेत ह्या विषयावर दर काही महीन्यांनंतर कॉन्फरंन्सेस घेणे, वगैरे सुद्धा करणे त्या अजेंडात असावे. एकच विषय दरवर्षी त्याच पद्धतीने शिकवावा लागतो, असा मनुष्यबळाचा दुरुपयोग कसा थांबवता येईल, इतिहासासारखे विषय शिकवत बसण्यापेक्षा त्या धड्यांवर आधारीत चित्रफिती तयार करुन शाळांमधे (शक्य आहे तेथे), दाखवल्या तरी इतिहास समजेल, अशा छोट्या गोष्टी करुन शिक्षणातील बदल अधिक कार्यक्षमता निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरतील.

ह्म्म्म्

इतिहासासारखे विषय शिकवत बसण्यापेक्षा त्या धड्यांवर आधारीत चित्रफिती तयार करुन शाळांमधे (शक्य आहे तेथे), दाखवल्या तरी इतिहास समजेल, अशा छोट्या गोष्टी करुन शिक्षणातील बदल अधिक कार्यक्षमता निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरतील.

सहमत आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हम्म!

महाराष्ट्रात बिहारी आणि भय्ये यांना रोजगार कमावण्याच्या इतक्या संधी का आहेत असे तुम्हाला वाटते? वेगळ्या शब्दांत अमेरिकेत मेक्सिकन लोकांना इतक्या संधी का उपलब्ध आहेत असे तुम्हाला वाटते? या प्रश्नांतच चर्चेचे उत्तर दडलेले आहे.

शिक्षणामुळे काही कामे काहीजणांना कमी प्रतीची वाटू शकतात किंवा शिक्षणामुळे आपल्याला साजेशी कामे मिळावीत असे त्यांना वाटू शकते.

शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे काय शिकावे याचीही सक्ती करणे कितपत योग्य आहे?

शालेय शिक्षणाचा पॅटर्न किंवा सिलॅबस १००% योग्य म्हणता येणार नाही परंतु तसे ते भारत, इंग्लंड, अमेरिका कोठेच नसावे परंतु काय शिकावे याची सक्ती योग्य आहे असे मला वाटते. प्रत्येक मुलाला भाषा/ विज्ञान/ गणित आणि इतिहास-भूगोलाची किमान माहिती हवीच. (किमानची व्याख्या करण्यास शिक्षण मंडळ समर्थ आहे.)

सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाचे काही तोटे आहेत का? असल्यास त्यावर उपाय काय?

तसे तोटे नाहीत. एखादे काम करण्यास कमीपणा वाटण्याचे खापर शिक्षणावर फोडणे चुकीचे आहे. हा व्यक्तिगत दोष आहे.

शिक्षण घेऊनही शारिरीक श्रमाला मोल व श्रमजीवनाला प्रतिष्ठा देणे हे शक्य आहे का? असल्यास कसे?

शिक्षणाने शारीरिक श्रमकामगार कमी होतील. यंत्रांवर भार देणारी पिढी तयार होईल. शिक्षित पिढी रोजगार शोधण्यासाठी कमी लोकवस्तीच्या ठिकाणी जाईल आणि शारीरिक कामे करण्यासाठी इतर मागास भागातून लोक येतील.

इतक्या सुशिक्षितांना जर फारसे शारिरीक श्रम न करता पैसा हवा असेल तर तशा नोकर्‍या उपलब्ध आहेत का? नसल्यास ह्या सार्वत्रिक शिक्षणामुळे असंतोषाची संभावना कितपत वाढते

?

उत्तर वरीलप्रमाणे. सुशिक्षित नोकरी मिळवण्यासाठी आपली जागा सोडून बाहेर पडतील. फार वर्षांपूर्वी कोकणातून लोक मुंबईत आले. आता मुंबईतून अमेरिकेस जातात. चक्र पूर्वीपासूनच सुरु होते. यात नावीन्य नाही.

थोडक्यात, सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण देताना काही खबरदारी, विषेश योजना, पुरवणी नियम असणे गरजेचे आहे असे वाटते का?

अर्थातच. मागणी तसा पुरवठा हा नियम शिक्षणव्यवस्थेलाही लागू आहेच. शिक्षणाचे पॅटर्न आणि सिलॅबस विशिष्ट कालावधीनंतर बदलायलाच हवा.

एका फटक्यात

शिक्षणामुळे काही कामे काहीजणांना कमी प्रतीची वाटू शकतात किंवा शिक्षणामुळे आपल्याला साजेशी कामे मिळावीत असे त्यांना वाटू शकते

बरोबर.. इतर देशांत हे त्यामानाने हळु झाले. भारतात आता आलेल्या कायद्याने हे (सक्तीचे शिक्षण) तुलनेने जलद होईल [हे गृहितक म्हणा हवंतर]. त्यामुळेच ही भीती वाटते की भारतासारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशांत अशी किती कामे तयार होतील? जर शिकलेल्यांना त्यांना साजेसे वाटेल से काम मिळु शकत नसेल तर फार जास्त असंतोष निर्माण होईल असे वाटते. हे म्हणजे चांगल्या प्रकारे जगण्याचे गाजर दाखवून परंपरागत व्यवसायापासून तोडायचे किंवा किमान त्या व्यवसायापासून अंतर वाढवायचे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाला साजेसे कामही उपलब्ध नाही अश्या विचित्र परिस्थितीत एक पिढीच्या पिढी सापडु शकते असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सक्तीचे शिक्षण

सक्तीचे शिक्षण म्हणजे फक्त १० वी पर्यंतचे ना? सुमारे १५-१६व्या वर्षी मूल १० वी होते. तोपर्यंत त्याला व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची खरेच गरज आहे का हे तपासून पाहायला हवे. माझ्यामते आहे पण खूप खोलवर व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज नसून पायाबांधणीसाठी उपयुक्त शिक्षण मिळायला हवे.

जर शिकलेल्यांना त्यांना साजेसे वाटेल से काम मिळु शकत नसेल तर फार जास्त असंतोष निर्माण होईल असे वाटते. हे म्हणजे चांगल्या प्रकारे जगण्याचे गाजर दाखवून परंपरागत व्यवसायापासून तोडायचे किंवा किमान त्या व्यवसायापासून अंतर वाढवायचे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाला साजेसे कामही उपलब्ध नाही अश्या विचित्र परिस्थितीत एक पिढीच्या पिढी सापडु शकते असे वाटते.

जर अनेक लोक एकाच प्रकारचे शिक्षण घेऊ लागले तर परंपरागत व्यवसायापासून तोडले जाऊ शकतात हे खरेच. परंतु, हा प्रश्न काही आजचा नाही. परंपरागत व्यवसायाचे स्वरूप नेहमीच बदलते आहे. माझ्या लहानपणी वसई रोड स्टेशनपासून वसई गावात जाण्यासाठी एस. टी किंवा घोडा गाडी/ टांग्याचा वापर करावा लागे. कालांतराने रिक्षा आल्यावर घोडा गाडीचा व्यवसाय पूर्ण बसला. सुरुवातीला टांगेवाल्यांच्या भविष्याबद्दल लोक चिंता व्यक्त करत. स्टेशनापासून गावापर्यंतचा रस्ता सुमारे ५-७ मैलांचा आहे. त्यावर चालणारे टांगे ही वसईची शान मानली जाई परंतु कालांतराने टांगेवाल्यांना वेगळा धंदा बघणे आले. म्हणजेच, रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेणार्‍या पिढीने टांगा चालवण्याचा परंपरागत धंदा करणार्‍यांवर गदा आणली.

परंपरागत पद्धतीने माझे पणजोबा मामलेदार होते. माझ्या आजोबांनी आर्किटेक्चर आणि त्यांच्या भावाने डॉक्टरकी शिकून मामलेदारीच्या व्यवसायावर गदा आणली. :-) डॉक्टर होणार्‍यांने वैद्याच्या धंद्यावरही गदा आणली असावी किंवा परंपरागत बांधकाम व्यवसायावर आर्किटेक्चरने गदा आणली असावी.

सरकारी बोर्ड, पाट्या, पॅम्प्लेट वगैरे एखाद्या पर्यटन स्थळांवर लावले की हळूहळू गडावर नेणारे वाटाडे, गाईड्स यांची गरज कमी भासू लागते. त्याऐवजी ऑफिसातील खुर्चीत बसून लोकांना नकाशावरील मार्ग दाखवणारे किंवा हातात पॅम्प्लेट देऊन त्याचा दर सांगणार्‍यांची संख्या वाढेल.

प्रतिसाद थोडासा विस्कळीत झाला असल्यास क्षमस्व! सांगायचा मुद्दा असा की शिक्षणाने असंतोष वाढेल असे नाही. शिक्षित लोक व्यवसायासाठी इतर जागा शोधतील, स्थलांतर करतील, नवे उद्योग सुरु करतील. परंपरागत उद्योग मागे पडतील किंवा ते करण्यासाठी बाहेरून लोक येतील.

तर्कशुद्ध आहे पण प्रत्यक्षात काहि वेगळेच

सांगायचा मुद्दा असा की शिक्षणाने असंतोष वाढेल असे नाही. शिक्षित लोक व्यवसायासाठी इतर जागा शोधतील, स्थलांतर करतील, नवे उद्योग सुरु करतील. परंपरागत उद्योग मागे पडतील किंवा ते करण्यासाठी बाहेरून लोक येतील.

हे तर्कशुद्ध आहे पण प्रत्यक्षात हे दिसत नाही. (का हाच ट्रांझिशन पिरीएड आहे?)
आजच सकाळी एका रिक्षावाल्याशी बोलणे झाले. त्याचे बी.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरी नाही त्यामुळे नाईलाजाने रिक्षा चालवावी लागते आहे.. सरकार बद्दल तुफान असंतोष दिसला. सांगत होता, वडील किर्तनकार होते. आता शिकल्यावर किर्तन करून पोट भरायला लाज वाटते. नोकरी करायची आहे पण मिळत नाही.

त्याला किर्तन करायला लाज वाटते हा त्याचा व्यक्तीगत दोष म्हणून सोडून देतालाअले असते (आधी हाच विचार करायचो) पण आजकाल अशी उदाहरणे वरचेवर भेटत/दिसत/ऐकु येत आहेत म्हणून तर हा चर्चाप्रस्ताव टाकला

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

नक्की?

पण कीर्तनाने नक्की लाज का वाटते? ते तर काही श्रमाचे काम नाही! (रिक्षावाल्याला त्यात जुनाट मनोवृत्ती दिसत असेल तर ते स्वागतार्ह आहे पण मग धार्मिक व्यवसाय या अपवादांची चर्चा करण्यात अर्थ नाही) त्याला अर्थप्राप्ति कमी असल्यामुळे त्याने व्यवसाय बदलला असणे शक्य आहे.

(बहुदा, वि. म. दांडेकर यांनी उदाहरण दिले आहे की) नदीवर पूल बांधला की नावाड्यांचा व्यवसाय उध्वस्त होतो पण म्हणून काय विकासच करू नये काय? मिल आणि विणकर यांचे उदाहरण तर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतही होते असे स्मरते. नवे रोजगार तर नक्कीच बनत असतात.

'नोकर्‍याच नाहीत' ही कहाणी लोक कित्येक दशके चवीने सांगतात असे वाटते, या 'हल्ली'ची नक्की व्याख्या कोणीतरी केली पाहिजे ;)
मला वाटते की खूपच वंचित असलेले लोक दडपून गप्प बसतात, थोडीशी उन्नती झाली की 'कंठ फुटतात'. याला तुम्ही म्हणता तसा संक्रमणकाळ ठरविता येईल असे वाटते.

संक्रमण काळ

हे तर्कशुद्ध आहे पण प्रत्यक्षात हे दिसत नाही. (का हाच ट्रांझिशन पिरीएड आहे?)
आजच सकाळी एका रिक्षावाल्याशी बोलणे झाले. त्याचे बी.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरी नाही त्यामुळे नाईलाजाने रिक्षा चालवावी लागते आहे.. सरकार बद्दल तुफान असंतोष दिसला.

सरकारबद्दल असंतोष हाच संक्रमणकाळ आहे. बहुधा, आपल्याला शिकून नेमके काय करायचे आहे किंवा आपण शिकलो ते ज्ञान कसे अप्लाय करायचे आहे याबाबत सदर व्यक्तिच्या मनात शंका असावी. सामान्य माणूस या असंतोषातून आपल्याला साजेसे* काहीतरी शोधून असंतोष शांत करण्याचा प्रयत्न करतो.

फक्त बी. ए. च्या शिक्षणाला आजच्या जगात फार किंमत नाही हे सत्य आहे. :-( बी. ए. सोबत बी. एड किंवा तत्सम व्यवसायाभिमुख कोर्सेस करूनही सदर व्यक्तिस पुढे सरकता येईल. त्यासाठी बी. ए. चे शिक्षण हा पाया ठरू शकते.

दुर्दैवाने, आपल्याला कोणत्या संधी उपलब्ध आहेत याचा अनेकांना पत्ता नसतो आणि कदाचित यासाठी शिक्षणासोबत काउन्सिलिंगची गरज असते, जे आपल्याकडे सहजी उपलब्ध नाही.

* साजेसे म्हणजे आवडीचे असे नाही. साजेसे म्हणजे जे करण्यात कमी लाज वाटेल असे. आमच्या जवळ राहणार्‍या एका अंडरग्रॅज्युएट मुलाने आधी रिक्षा घेऊन रिक्षाचालकाचा धंदा केला. कालांतराने त्याने केटरिंग व्यवसायात उडी मारली आणि बस्तान बसवले.

सक्तिचे शिक्षण

एका चांगल्या विषयाला वाचा फोडली याबद्दल धन्यवाद.
शिक्षण काय असावे आणि ते सक्तिचे असावे की नाही हे दोन भिन्न प्रश्न आहेत.

माझ्या मते सध्या असलेल्या शिक्षणाची देखील सक्ती गरजेची आहे. आणि ते १०वीपर्यंत तरी सक्तिचे असावे.
सक्ति कशी राबवावी? तर दोन्ही बाजूंनी म्हणजे शिकणार्‍यांना काहीतरी (जसे दुपारचे जेवण) देऊन आणि दुसर्‍या बाजुला पालकांना शिक्षेचा (मुलांना वसतीगृहात घालणे) धाक दाखवून सक्ति राबवली गेली पाहिजे.

शिक्षणामुळे श्रमाची प्रतिष्ठा कमी होते का? मला असे वाटत नाही. म्हणजे शिक्षणात असे काही नसते ज्यात श्रम करणे हे कमी दर्जाचे आहे हे सांगितले जाते. मात्र समाजात अशिक्षित वर्ग मोठा असल्याने आणि तो गरीब व श्रमजीवी असल्याने असे होत असेल. कदाचित जातीव्यवस्था (ब्राह्मण शिक्षित असतात श्रमजीवी नसतात आणि सर्वात वरच्या थरात असतात) या समजूतीला कारणीभूत असेल. याबरोबर आज श्रमजीवींना मिळणारी रोजी आणि इतरांना मिळणारी रोजी यात खूप तफावत असते हे कारण असेल. शिक्षणामुळे कदाचित याप्रकारची जाणीव तयार होत असेल. पण अभ्यासक्रमात बदल करून श्रमप्रतिष्ठा प्रस्थापित होईल असे वाटत नाही.

•इतक्या सुशिक्षितांना जर फारसे शारिरीक श्रम न करता पैसा हवा असेल तर तशा नोकर्‍या उपलब्ध आहेत का? नसल्यास ह्या सार्वत्रिक शिक्षणामुळे असंतोषाची संभावना कितपत वाढते?

माझ्या मते अडाणी श्रम उपजिविका (शेती क्षेत्र सोडल्यास) कमी होत जात आहे. बांधकाम व्यवसाय (जो अडाणी श्रमजीवींना थारा देत असे) स्वरूप बदलतो आहे. तिथेही आता शिक्षित श्रमव्यावसायिक मोठ्या प्रमाणात लागतात. अशा परिस्थितीत शिक्षित श्रमव्यवसाय हा कदाचित सुशिक्षित सफेद कॉलरपेक्षा (बिगर सरकारी कारकून) पेक्षा जास्त पैसा मिळवून देणारा होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षित श्रमव्यवसायाला प्रतिष्ठा मिळू शकते.

•थोडक्यात, सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण देताना काही खबरदारी, विषेश योजना, पुरवणी नियम असणे गरजेचे आहे असे वाटते का?

नाही.

शिक्षणामुळे श्रमास दुय्यम स्थान मिळते का?

नाही.

प्रमोद

अभ्यासक्रम मूख्य अडथळे !

>>>शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे काय शिकावे याचीही सक्ती करणे कितपत योग्य आहे ?
प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण काय असावे त्याबाबत एक धोरण ठरलेले असते.शाळेत येणारा विद्यार्थी म्हणजे कच्चा माल. त्यावर 'प्रक्रिया' करुन त्यांना पदवीधर बनविणे म्हणजे पक्का माल तयार करणे. असे हे शिक्षण पदवीधरांना नोकरीची हमी देत नाही. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे करणे यासाठी गरजेचे की, अजून कितीतरी मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. ते शिक्षण घेण्यासाठीही पुढे येत नाही. त्यांची शाळेतील उपस्थिती वाढली पाहिजे म्हणून शासन वेगवेगळे प्रयोग राबवत असते त्यासाठी शिक्षणाची सक्ती आवश्यकच आहे असे वाटते.
>>>सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाचे काही तोटे आहेत का? असल्यास त्यावर उपाय काय ?
सक्तीच्या शिक्षणाचा तोटा म्हणून आपण असे म्हणतो की, कौशल्य असलेले अभ्यासक्रमाकडे होणार दुर्लक्ष. जसे की,तुम्ही उदा. म्हणून दिले आहे की, दहावीनंतर आयटीआयला पोरं जात होती. वेल्डींग,डिझेल मॅकेनिक,फिटर अशा कोर्सेसना नंबर लावण्यासाठी वशिला लावल्या जात होता. असे कौशल्य असलेले शिक्षण आणि अभ्यासक्र प्राथमिक शाळेत मिळाले पाहिजे याच्याशी सहमत आहे. पुढे त्याचे कौशल्य आणि अभ्यासातील प्रगती याचा समन्वय करुन त्याचे मूल्यमापन झाले पाहिजे असे वाटते. आणि नेमके हे होत नाही हा मूख्य तोटा या प्राथमिक शिक्षणाचा वाटतो.
>>>>सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण देताना काही खबरदारी, विषेश योजना, पुरवणी नियम असणे गरजेचे आहे असे वाटते का ?

सार्वत्रिक शिक्षण देतांना पारंपरिक अभ्यासक्रम बदलले पाहिजेत. प्राथमिक शिक्षणाची तोंडओळख झाल्यानंतर बौद्धिक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण् दिले पाहिजेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

कोणतेही काम कमी प्रतीचे नसते

कोणतेही काम कमी प्रतीचे मानू नये. मिळालेले काम मन लावून करावे.

"भारतातील लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात" असे कुत्सितपणे कोणी म्हणाले तर त्यांना फाट्यावर मारावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रियालींचं मत पटलं, थोडा विस्तार

तोपर्यंत त्याला व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची खरेच गरज आहे का हे तपासून पाहायला हवे. माझ्यामते आहे पण खूप खोलवर व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज नसून पायाबांधणीसाठी उपयुक्त शिक्षण मिळायला हवे.

हे शंभर टक्के पटलं. त्यांनीच पुढे म्हटलेलं 'व्यवसायाचं स्वरूप सतत बदलत असतं' हा विचार जोडला की पायाबांधणीसाठी उपयुक्त शिक्षण म्हणजे काय याचा विचार करता येतो. लहान मुलाला चालता येणं, बोलता येणं ही जशी मूलभूत गरज आहे, तशीच समाजात सक्षमपणे वावरण्यासाठी काही मूलभूत गरजा आहेत.

- लिहितावाचता येणं
- अंकगणित येणं
- विज्ञानाची जुजबी माहिती
- आपला इतिहास काय आहे हे माहीत असणं
- आपला परिसर, राज्य, देश व जग यांविषयी भौगोलिक ज्ञान असणं.
- वेगवेगळ्या भाषांची व साहित्याची ओळख
- कला, व खेळ यांमध्ये मुलांचा विकास

या गोष्टींऐवजी मुलांची कृत्रिम विभागणी करून 'तू सुतारकाम शीक, तू गवंडीकाम शीक' असं करणं म्हणजे प्रगतीच्या दिशा खुंटवून टाकणं होईल. लेखातल्या उदाहरणातला मुलगा कदाचित उत्तम मेकॅनिक होईलही. पण कदाचित त्याची ही आवड हे त्याच्या 'यंत्रं कशी चालतात' या आवडीचं एक विशिष्ट स्वरूप असेल. पुढे जाऊन तो गाड्या डिझाईन करणारा, उत्तम इंजिन बनवणारा होऊ शकेल. मग त्याच्या आवडीचा विकास एवढ्यातच एका सध्या माहीत असलेल्या खोक्यात का टाकून द्यायचा?

सध्याचं शिक्षण हे ध्येय उत्तम रीतीने गाठतं की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल, पण ध्येयच कोतं का ठेवावं?

त्यामुळे सक्तीचं शिक्षण असावं, त्याचा अभ्यासक्रम ही सर्वसाधारण कौशल्यं (जनरल स्किल्स) विकसित करणारी असावी, व सुमारे १६ ते १८ या वयात त्यांचं विशिष्टीकरण सुरू व्हावं या मताचा मी आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रतिष्ठेतील उच्चनीचता

आज भारतातील अशी परिस्थिती आहे का कि महाविद्यालयातील प्राचार्या माझा नवरा उत्तम ट्रक ड्रायव्हर आहे असे अभिमानाने सांगेल. श्रमाची प्रतिष्ठा हा विषय थोडा बाजुला ठेउ पण बुद्धीजीवी वर्गात देखील प्रतिष्ठेची उच्चनीचता आहेच. डॉक्टर या व्यवसायात देखील पोस्टमोर्टेम करणारा डॉक्टर कवटीफोड्या म्हणुन प्रतिष्ठेच्या खालच्या स्तरात येतो. प्रत्येक बौद्धीक प्रतिष्ठेच्या व्यवसायात अशी उच्चनीचता आहेच.
हजारो वर्ष या संकल्पनांमधे अडकलेल्या समाजाला एक संक्रमणाचा अवधी लागणार आहे. या काळात श्रमप्रतिष्ठा व सेवाव्यवसाय हे एकेमेकाशी सांगड घालत वाटचाल करणार आहेत. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे झाल्यावर पुढील शिक्षण हे व्यवसायाभिमुख झाले तर ते अधिक उपयुक्त ठरेल.
समाजात मिळणारी प्रतिष्ठा ही उंचावलेला आर्थिक स्तर व त्याचे समाजातील सुसंस्कृत वर्तन यावर जेव्हा अवलंबुन होउ लागेल त्यावेळी श्रमप्रतिष्ठा ही आपोआप मिळू लागेल.
माझे अंनिसतील एक सुसंस्कृत सहकारी स्वतःची रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत. नंतर त्यांनी मारुती व्हॅन घेतली व आता इंडिका कि तवेरा. त्यांना ग्राहकाकडुन मिळणार्‍या वागणुकीत लक्षणीय फरक जाणवला.

प्रकाश घाटपांडे

हाच तो संक्रमणकाळ

हजारो वर्ष या संकल्पनांमधे अडकलेल्या समाजाला एक संक्रमणाचा अवधी लागणार आहे. या काळात श्रमप्रतिष्ठा व सेवाव्यवसाय हे एकेमेकाशी सांगड घालत वाटचाल करणार आहेत.

प्रतिसाद आवडला.
वर प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे हाच तो संक्रमणकाळ असावा.. अथवा संक्रमणाची सुरूवात असावी.. पुढे येत्या काळात समाज ढवळला जाईल असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर