"टू द लास्ट बुलेट" या पुस्तकाचा परिचय

टू द लास्ट बुलेट-विनिताताई कामटे यांनी विनीताताई देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय

(हा लेख 'मिसळपाव' या संस्थळावर पूर्वी प्रसिद्ध केला गेलेला आहे.)

२६/११/२००९ला "मुंबई हत्याकांड (Mumbai Massacre)" म्हणून ओळखल्या जाणार्‍या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष झालं. त्याच दिवशी श्रीमती विनीता कामटे यांनी वीरगती प्राप्त झालेले आपले पती हुतात्मा अशोकजी कामटे यांच्याबद्दल विनीता देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेले "To the last bullet" हे पुस्तक प्रकाशित झाले. २८-२९ नव्हेंबरला मला ते पुण्यातल्या पुस्तकविक्रेत्यांकडे मिळाले व मी ते घेतले. अर्धेअधीक पुण्यातच वाचून झाले व उरलेले मी अमेरिकेच्या विमानप्रवासात वाचले.

विनीताताईंनी खरंच फारच ताकतीने आपलं दु:ख गिळून अतीशय सुंदर व अर्थवाही पुस्तक लिहिलेले आहे. घडी उलगडताना प्रत्येक घडीबरोबर जसं एकाद्या साडीचं सौंदर्य झळकू लागतं तसंच प्रत्येक वाक्यागणिक/पानागणिक अशोकजींचं लोभसवाणं - करारी, शिस्तप्रिय व त्याच वेळी अतीशय सहृदय, कनवाळू - असं व्यक्तिमत्व उजळत जातं. हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्याबद्दल माझ्या मनात एकच विशेषण आलं ते म्हणजे "पुरुषोत्तम"!

हे पुस्तक वाचायच्या आधी मला त्यांना वीरगती कोणत्या परिस्थितीत मिळाली याची फारशी माहिती नव्हती. विनीताताईंनी लिहिल्याप्रमाणे स्वत:चा नाकर्तेपणा किंवा हलगर्जीपणा (किंवा दोन्ही!) लपविण्यासाठी अशोकजींच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व राजकीय नेत्यांनी एक गैरसमज पसरवला होता कीं हेमंत करकरे, सालसकर व अशोकजी या तीघांना त्यावेळची परिस्थिती किंवा तिचे गांभिर्य कळलेच नाहीं व एकाद्या नवशिक्या व अपरिपक्व अधिकार्‍यांसारखे अविचारी धाडस दाखवत ते एकाच गाडीत बसून पुढे गेले व अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण २१ नव्हेंबरला मी भारतात परत आल्यावर दूरचित्रवाणीवर या हल्ल्याबद्दल सखोल संशोधनावर आधारलले बरेच कार्यक्रम पहायला मिळाले व त्यातून हे गैरसमज दूर होऊ लागले होतेच. पण विनीताताईंचे हे पुस्तक वाचल्यावर मात्र उरली-सुरली कोळिष्टके क्षणात दूर झाली व अनेक नवे (व छुपे) खलनायक समोर येऊ लागले. विनीताताईंनी जरी खूपच सडेतोडपणे हे पुस्तक लिहिले असले तरी कांहीं ठिकाणी त्यांनी जरासा ’आवरता हात’ घेतलाय् असेही वाटले. सुदैवाने विनीताताईंनी त्यांचा तसेच विनीताताई देशमुख यांचाही इ-मेलचा पत्ता दिला होता त्यांना मी बरेच प्रश्न विचारले. अद्याप विनीताताई कामटे यांचे उत्तर आलेले नाहीं पण विनीताताई देशमुख यांनी कामटे मॅडमच उत्तर देतील असे लिहिले आहे. कदाचित् पोलीसखात्याच्या मर्यादांमुळे त्यांनी हात आवरता घेतला असेल. याबाबतीतील मला वाटलेल्या कुशंका माझ्या लेखनात पुढे सविस्तरपणे येतीलच.

हा सत्य परिस्थिती लपविण्याचा प्रारंभ होतो हुतात्मा करकरेंच्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या हरवण्यापासूनच. म्हणजे ते जॅकेट योग्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते कीं हलक्या प्रतीचे होते याचा शोध तिथेच संपला! अगदी प्रेसिडेंट केनेडींचा मेंदू वॉल्टर रीड इस्पितळातून "नाहींसा" झाल्याच्या घटनेची आठवण करून देणारी ही घटना आहे. तो नाहींसा झाल्यामुळे केनेडींना लागलेली गोळी मागून झाडलेली होती कीं पुढून झाडलेली हे कळलेच नाहीं, तसाच हा प्रकार. "त्या दिवशी हेमंत करकरेंनी जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जॅकेट वापरले असते तर ते आज हयात असते कां हा प्रश्न मला जन्मभर भेडसावीत राहील" असे श्रीमती कविता करकरे यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटलेलेच आहे. पुढे त्या म्हणतात कीं हुतात्मे कांहीं एका दिवसात तयार होत नाहींत तर त्याला आयुष्यभराची निष्ठा व धैर्य लागते व ते त्यांनी अशोकजींच्या कारकीर्दीत जवळून पाहिले होते.

आपल्या "थेट हृदयापासून" या परिचयपर ’दोन शब्दां’त विनीताताईही म्हणतात कीं हा हल्ला असामान्य असाच होता. या हल्ल्याला कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षणही मुंबई पोलिसांना नव्हते, त्यांची शस्त्रेही अद्ययावत् व पुरेशी नव्हती, तरीही कांही पोलीस अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी ही एक जास्तीची जबाबदारी समजून असामान्य नेतृत्व व असाधारण धैर्य दाखवून परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्या पुढे म्हणतात कीं याउलट मुंबई पोलीस संघटनेचे बरेच अधिकारी त्या दिवशी या संकटाला सामोरे जायला कचरल्याचे जाणवते. भित्र्या पोलीस अधिकार्‍यांना किती सुरेख "शालजोडीतला आहेर" दिलाय् विनीताताईंनी!

अपुरी शस्त्रास्त्रे व अपुरे प्रशिक्षण यांमुळे प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या पोलिस हवालदारांना पुढे न पाठवता या तीन अधिकार्‍यांनी स्वत:च पुढाकार घेऊन या हल्ल्याला तोंड दिले. या अधिकार्‍यांनी दबा धरून बसलेल्या (ambush) अतिरेक्यांवर गोळीबार करून त्यांपैकी कसाबचे दोन्ही हात निकामी केले ज्यामुळे आणखी नरसंहार टळला. पुढे चौपाटीवर हुतात्मा ओंबळे व इतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या जखमी कसाबला पकडले. अशा तर्‍हेने छत्रपती शिवाजी टर्मिनल ते चौपाटी दरम्यान या सर्व अधिकार्‍यांनी दाखविलेल्या शौर्यामुळेच एक अतिरेकी आज आपल्या हाती लागला. वरिष्ठांनी त्यांच्या या शौर्याला 'अविचारी धाडस' किंवा 'अज्ञाना'चा मुलामा चढवायला नको होता.

या सर्वांचे व त्यातल्या त्यात अशोकजींचे असाधारण काम व त्यांचा दुर्दैवी मृत्यू रंगभवन गल्लीत कोणत्या परिस्थीतीत झाला यामधील दडवून ठेवलेले रहस्य उलगडून ते जनतेसमोर एका पुस्तकाच्या रूपाने ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला होता व त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला.

त्यांना पोलीस संघटनेकडून सहकार्य तर नाहींच मिळाले पण याउलट पदोपदी त्यांच्या मार्गात अडथळेच आणले गेले याचे त्यांना आश्चर्य व दु:ख झाले. साधा पोस्टमॉर्टेमचा रिपोर्टही त्यांना दिला गेला नाहीं.

जर त्या दिवशी करकरे यांच्या आज्ञा पाळल्या गेल्या असत्या व त्यांनी केलेली व्यूहरचना पाळली गेली असती तर हे शूर अधिकारी असे धारातीर्थी पडलेच नसते. गोळी लागल्यावरही रक्तबंबाळ स्वरूपात त्यांना रस्त्यावर पडलेले रंगभवन गल्लीत रहाणार्‍या रहिवाशांनी पाहिले होते व त्यांनी १०० नंबरवर फोन करून ही माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिलीही होती. तरीही कसे कुणी मदतीला आले नाहीं, एक पोलीसची लाल दिवा असलेली गाडी तिथून गेली त्यातील अधिकार्‍यांनीही त्यांना कशी मदत केली नाहीं याचेही वर्णन त्यांनी केले आहे. करकरे याच्या व्युहरचनेबरहुकूम करवाई झाली असती तर बरेच अतिरेकी हाती लागले असते व या शूर अधिकार्‍यांचा मृत्यूही टळला असता असे त्यांनी नमूद केले आहे.

हे रहस्य त्यांनी कसे परिश्रमपूर्वक उलगडले, त्यांना पोलीस संघटनेकडून कुणीही कशी सुखासुखी माहिती दिली नाहीं व शेवटी RTI द्वाराच त्यांनी ही माहिती कशी मिळविली हा व इतर हृदयद्रावक भाग पुढील कांहीं भागात.

शेवटी एक विनंती. प्रत्येक स्वदेशाभिमानी भारतीयाने हे पुस्तक वाचनालयातून वाचायला न आणता विकत घेऊन वाचावे जेणे करून तिच्या आवृत्यावर आवृत्या झटपट विकल्या जातील व विनीताताईंच्या लिखाणाचे चीज होईल.कामटेसाहेबांचा जन्म पोलिस 'कुटुंबा'त झाला होता. त्यांचे वडील व आजोबाही सैन्यात/पोलिसात होते. आजोबा तर महाराष्ट्र राज्याचे पहिले आय.जी. होते. विनीता कामटे यांचेही घराणे उच्चशिक्षणविभूषित होते व त्या कुटुंबातले बहुसंख्य लोक वकील व न्यायाधीश अशा जागांवर होते. कामटेसाहेबांच्या आईचा जन्म शीख पिता व ब्रिटिश आई यांच्या पोटी झालेला होता. त्यामुळेच कदाचित्त् कामटेसाहेब 'गोर्‍या' साहेबासारखे दिसत. खाण्याची मनसोक्त आवड पण तितकेच शारीरिक धडधाकटपणाकडे (physical fitness) कटाक्षाने लक्ष अशा दुहेरी उत्तम सवयींमुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांवर छाप पाडणारे होते.
त्यांना शर्मिला नावाची सख्खी बहीण आहे जी दुबईला असते. दुर्दैवाने त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होत व त्यामुळे त्यांची आई दिल्लीला वेगळी रहात असे. पण कामटेसाहेब मात्र आपल्या आईवर अतोनात प्रेम करीत असत व नेहमी तिला भेटत असत. शर्मिलाताई तर त्यांना वडील भावापेक्षा पितृस्थानीच मानत असत.
आय्.पी.एस्.ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची पहिली नेमणूक नक्षलवाद्यांचा सुळसुळाट असलेल्या भंडारा येथे झाली. नवख्या अधिकार्‍याच्या दृष्टीने ही एक कसोटीचीच नियुक्ती. त्यावेळी त्यांचे 'बॉस' होते श्री अरान्हा. (पोर्तुगीज भाषेत हा उच्चार 'अरानिया' असा करतात). अरान्हासाहेबांनी कामटेसाहेबांना त्यांच्या कामगिरीवर खुष होऊन महाराष्ट्र सरकारतर्फे खास गौरवाचे बक्षिसही त्यांना देवविले होते. अरान्हासाहेबांवर कामटेसाहेबांचा खूप जीव होता. हुतात्मा करकरे हेही त्यावेळी शेजारच्याच जिल्ह्यात कार्यरत होते व त्यांचे व करकरे यांचेही नजीकचे व सौहार्द्राचे संबंध होते असे विनीताताई लिहितात.
२६ नव्हेंबरलासुद्धा त्यांचा दिनक्रम नेहमीसारखाच सुरू झाला, फक्त फरक इतकाच कीं अरान्हासाहेब त्या दिवशी कामटेसाहेबांच्या घरी पाहुणे म्हणून रहाणार होते व दोघे रात्रीचे जेवण एकत्र घेणार होते. नेहमीप्रमाणे घरी आल्यावर आपला 'तालमी'चा (gym) नित्यक्रम संपवून ते दोघे जेवायला चेंबूरच्या गोल्फ़ क्लबवरील रेस्टॉरंटमध्ये (रेस्तोराँ) जेवायला गेले व परत येतांना त्यांना ताजच्या आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या त्यांच्या नातेवाइकांचे गोळीबाराचा आवाज ऐकून आश्चर्यचकित झाल्यामुळे "हे काय चाललेय्" अशा अर्थाचे फोन आले. त्यांनी नियंत्रण कक्षाकडे चौकशी करून "गँगवॉर आहे. आहे तिथेच बसून रहा व रस्त्यावर येऊ नका" असा सल्ला दिला. गॅंगवॉरचा संशय आल्यामुळे त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रातील परिस्थिती बिघडू नये म्हणून आपल्या अंमलदारांना योग्य त्या आज्ञा देऊन अरान्हासाहेबांसह ते घरी पोचले.
येवढ्यात श्री गफूरसाहेबांचा त्यांना फोन आला कीं त्यांनी ताबडतोब दक्षिण मुंबईकडे प्रयाण करावे व गफूरसाहेबांना ताजमधील ट्रायडेंट हॉटेलशेजारच्या "ऑपरेशन सेंटर"मध्ये भेटावे.
अरान्हासाहेबांना आश्चर्य वाटले कीं कामटेसाहेबांच्या अधिकारक्षेत्रात सर्व आलबेल असतांना त्यांना दुसर्‍याच्या अधिकारक्षेत्रात जाण्याची आज्ञा का दिली जातेय्! पण वरिष्टांची आज्ञा प्रमाण मानून कामटेसाहेब मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवळच्या मार्गाने ट्रायडेंट हॉटेलशेजारील ऑपरेशन सेंटरकडे निघाले. (नकाशा पहा)
_____________________________________________________________________________________

कामा इस्पितळाभोवतीचा परिसर
_____________________________________________________________________________________
जसे ते ताजच्या जवळ आले तेंव्हां परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याचे त्यांना कळून आले असावे. कारण त्यांनी "मी कुठे रिपोर्ट करू, ट्रायडेंट कीं इतर कुठे" असा प्रश्न नियंत्रण कक्षाला (मारियांना) विचारला. ध्वनीफितींनुसार नियंत्रण कक्ष गफ़ूरसाहेबाशी संपर्क साधू शकला नाहीं म्हणून मारियांनी थेट संदेश दिला कीं कामा इस्पितळात गोळीबर चालू आहे, तरी कामटेसाहेबांनी कामा इस्पितळाकडे जावे. २३:२४वा आलेल्या या आदेशानुसार ते चार मिनिटात तिथे पोचले. या दरम्यान करकरेसाहेबही शिवाजी टर्मिनसला पोचले होते. तिथे त्यांना कळले की अतिरेकी 'टाइम्स गल्ली'च्या पुलावरून पळाले होते. त्यांनी आपले बुलेटप्रूफ जॅकेट व हेल्मेट परिधान केले व आपल्या कनिष्ठ लोखांना उत्साह देत तेही तिकडे गेले व त्यांनी 'नियंत्रण कक्षा'ला तसे कळविले.
यावेळी करकरेसाहेबांनी जी माहिती कंट्रोल नियंत्रण कक्षाला जो परिस्थितीचा अहवाल दिला तो परिपूर्णतेचा व सुबोधतेचा (comprehensiveness and lucidity) सुंदर नमुना आहे. ते म्हणाले कीं 'ATS QRT'चे व 'क्राईम ब्रॅंच'च्या तुकड्या (teams) आता कामा इस्पितळाच्या मागील फाटकाशी जय्यत तयार आहेत. हॉस्पिटलमधून ए.के.-४७मधून गोळीबार व ’हातबाँब्स’चा (grenades) मारा सुरू आहे. व ए.सी.पी. (मध्य मुंबई) श्री दाते जखमी झाले आहेत, कॉन्स्टेबल टिळेकरांना आम्ही मागचे फाटक तोडून बाहेर यायला मदत करून त्यांना इस्पितळातही पाठविले आहे. आम्ही मागील फाटकाशी आहोत तरी पुढील फाटकाशी कुमक पाठवून ते बंद करून अतिरेक्यांना वेढून टाकावे. एवढेच नव्हे तर या गोळीबारात उत्तम समन्वय साधून पोलिसांचाच एकमेकांवर गोळीबार होणार नाहीं (crossfire)याची खात्री केली पाहिजे. तसेच प्रसादसाहेबांना सांगून लष्कराकडून कमांडो मागवायला सांगावे. (यावरून त्यांना एव्हाना परिस्थितीचे गांभिर्य पूर्णपणे कळून आले होते.)
खरंच किती विचारपूर्वक आदेश दिले होते करकरेसाहेबांनी! आणि तरीही त्या तीघांच्या हौतात्म्यानंतर ते स्वत:चे समर्थन करू शकत नाहींत म्हणून या तीघांवर "त्यांना परिस्थितीचे गांभिर्यच समजले नाहीं" असे मूर्खासारखे आरोप त्यांच्या वरिष्ठांनी व राजकीय नेत्यांनी केलेच नसते!
२३:२४ला (म्हणजे कामटेसाहेब तिथे पोचण्याच्या आधीच) करकरेसाहेबांनी दिलेल्या या आदेशाला उत्तर म्हणून नियंत्रण कक्षाकडून निरोप आला "सर, म्हणजे तुम्हाला 'कामा'च्या पुढच्या फाटकाकडे मदत पाहिजे, होय ना?". म्हणजे निरोप या पोलीस कर्मचार्‍याला नीट समजला होता हे सिद्ध होते! याला उत्तर म्हणून करकरेसाहेबांनी पुन्हा हाच आदेश २३:२८ वाजता पुन्हा दिला. त्याला २३:३० वा. नियंत्रण कक्षाकडून "Noted, Sir" अशी पोचही आली.
२३:४५ वा. धुरगुडे नावाचे इन्स्पेक्टर जिथे पहापालिका मार्ग व रंगभवन गल्ली मिळतात तिथे सेंट झेवियर कॉलेजच्या (पोर्तुगीज भाषेत हा उच्चार 'शाविये' असा करतात) कोपर्‍यावर आले. कामा इस्पितळाच्या समोरच्या दरवाजातून झट्कन बाहेर पडलेल्या व फूटपाथवर चालणार्‍या दोघा तरुण अतिरेक्यांना त्यानी हटकले. उत्तरादाखल त्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या व त्यांना ठार केले. जर करकरेसाहेबांच्या आदेशाचे पालन झाले असते तर धुरगुड्यांचे व या तीघांचे प्राणही असते वाचले असते व या दोघाना तिथेच पकडता आले असते. मारुती फाड नावाचा ड्रायव्हर, जो त्यावेळी त्याच्या साहेबांसाठी गाडी घेऊन चालला होता, त्याने धुरगुड्यांना गोळी लागलेली पाहिली. पण पुढच्याच क्षणी त्याच्यावर गोळीबार झाला व त्यात त्याचे एक बोट उडवले गेले. प्रसंगावधान दाखवून त्याने गाडी ’सेंट्रल लॉक’ केली व स्वत: सीटच्या खाली पडून राहिला. त्याला मेलेला समजून अतिरेकी पुढे गेले व रंगभवन गल्लीत शिरले.
करकरेसाहेबांच्याकडे फारसे विकल्प नव्हतेच. कारण वेळ कुणासाठीच थांबत नाहीं. बेधुंद गोळीबार चाललाच होता, श्री दाते जखमी अवस्थेत होतेच व नियंत्रण कक्षाकडून २३:२४ वा. दिलेल्या त्यांच्या आदेशानुसार कारवाई झालेली आहे कीं नाहीं याबद्दल काहीच उत्तर नव्हते. पण वेळ घालविणेही चुकीचे होते.
करकरेसाहेब व कामटेसाहेब वेगवेगळे आले असले तरी कामाच्या मागे एकमेकांना भेटले होते व त्यांनी विचारविनिमय करून घेतलेला निर्णय (अधीक वेळ न घालवता रंगभवन गल्लीतून पुढच्या फाटकाकडे जाण्याचा) बरोबरच होता.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर