"आत्मा ते जनुक"

मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच.

मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो.

आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.

आज ज्याला आधुनिक वैद्यक मानले जाते त्याचा ज्ञात इतिहास सुमारे अडीच हजार वर्षांचा आहे. विविध संस्कृतींमधे वेगवेगळ्या टप्प्यांमधे कायकाय नि कसकशी प्रगती झाली, त्यात महत्त्वाचे टप्पे काय होते, ज्ञानाची प्रगती कसकशी झाली , त्यात काय अडथळे आले, हा सगळा अर्थातच एका नव्हे तर अनेक खंडांच्या आवाक्यात आरामात बसेल इतका गहन आणि विस्तृत असा विषय आहे. विविध भाषांमधे अनेक ज्ञानकोष या विषयाला वाहिलेत.

डॉ. चंद्रकांत वागळे यांनी लिहिलेल्या "आत्मा ते जनुक" या पुस्तकाचा विषय ढोबळ मानाने हाच आहे. अनेक शतकांच्या इतिहासातले महत्त्वाचे टप्पे थोडक्यात दाखवल्यामुळे , या छोट्याशा पुस्तकाला एका नकाशाचे स्वरूप आलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे , ज्ञानाच्या या ब्रह्मांडाचे दर्शन या पुस्तकरूपी पिंडात करताना, त्यांनी एक महत्त्वाचे सूत्र राखलेले आहे. आणि सगळा प्रवास या सूत्राने होतो. कोणते बरे हे सूत्र ?

मानवजातीच्या प्रगतीचा वेध घेताना सामान्यतः असे मानले जाते की, माणसाला निसर्गातल्या गोष्टींचे कुतुहल होते. ज्ञानविज्ञानाच्या प्रगतीमागे या कुतुहलाचा मोठा भाग होता आणि आहे. निसर्गातल्या घटनांमागची मीमांसा जोवर करणे शक्य नव्हते, त्यामागची कारणे जोवर अज्ञात होती तोवर त्याना परमेश्वराचे स्वरूप देण्यात आले. सजीवत्व हा देखील या कुतुहलाचाच विषय होता. या सजीवत्वाच्या, चेतनेच्याबद्दलच्या चिंतनातूनच "आत्मा" ही संकल्पना अस्तित्वात आली. विसाव्या शतकात जनुकांचा शोध लागेपर्यंत, सजीवत्त्वाचा शोध चालूच होता, मात्र त्याला स्वरूप होते तत्वज्ञानविषयक संकल्पनांचे. जनुकांच्या शोधाने सचेतनत्वाचे कोडे उलगडले आणि काही विशिष्ट परिस्थितीत काही प्रोटीन्स आणि न्युक्लिक अ‍ॅसिड्स या दोन अचेतन रासायनिक द्रव्यांमधून सचेतन जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकते हे सिद्ध झाले. म्हणजे जडतत्वापासूनच सजीवत्व निर्माण होते हे पुराव्याच्या आधारे सिद्ध झाले. शतकानुशतके विचारांची घुसळण चालू असलेल्या एका अतिशय अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पनेचे रूपांतर काँक्रीट स्वरूपी सिद्धतेपर्यंत कसा झाला याचा हे पुस्तक वेध घेते.

विषयाची व्याप्ती घेता , पुस्तक २०० पानी म्हणजे अगदीच टीचभर मानायला हवे. मात्र लेखकाने केलेला सम्यक अभ्यास, हे पुस्तक सादर करत असताना नेमके काय मांडायचे आहे याचे त्याने ठेवलेले भान , आणि महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल , निर्णायक शोधांबद्दल दिलेली नेमकी माहिती या मुळे या प्रदीर्घ प्रवासाच्या नकाशाने आपले काम अचूक बजावलेले आहे.

हिप्पोक्रीटसच्या शपथेपासून जो प्रवास सुरू होतो तो वेसालिअसच्या पहिल्यावहिल्या शरीरशास्त्रीय अभ्यासाला , दुसर्‍या शतकात गॅलेनने मांडलेल्या रक्ताभिसरणाच्या संकल्पनेला गवसणी घालतो. आणि इथे सगळ्यात आश्चर्यकारक भाग येतो. तिसर्‍या शतकात गॅलनने जी थिअरी मांडली त्यात "शरीरात रक्त वहाते" इतकाच भाग बरोबर होता. बाकी सगळे अंदाजपंचे असल्याने चुकीचेच होते. गॅलनच्या या थिअरीला उलथून लावण्याकरता १६वे शतक उजाडावे लागले ! १६ ते १९वे शतक केवळ अ‍ॅनाटॉमीचा अभ्यास चालू होता. या सगळ्यादरम्यान शवविच्छेदनावरील बंदीमुळे अनेक शतके अंधारातच गेली. त्यानंतर मात्र पाश्चात्य जगतात प्रयोग-नीरीक्षणे-संशोधन- सिद्धांत मांडणी या प्रक्रियेला वेग येत गेला. विल्यम हार्वे, मॉरग्ननी यांनी रक्ताभिसरणाचे रहस्य उलगडले. फर्को नावाच्या जर्मन संशोधकाने पेशीचा सिद्धांत मांडला. सूक्ष्मदर्शक यंत्रे जन्माला आली. लुई पाश्चर ने सूक्ष्मजीवांचे अस्तित्व सप्र्योग सिद्ध केले , रेबीज वरची लस शोधून काढली. क्षयजंतूंवर संशोधन झाले. लिस्टरने निर्जंतुकीकरण शोधल्याने शस्त्रक्रिया विकसित व्हायला महत्त्वाचे वळण मिळाले स्टेथोस्कोप अस्तित्त्वात आले. हे सर्व होता होता वेदनाहरण करणार्‍या क्लोरोफॉर्मचा, पहिल्या इसीजीचा शोध लागला. भौतिकशास्त्रज्ञानी क्ष किरणाअंसारख्या गोष्टींचा शोध लावला. आणि पेनिसिलीन आणि अन्य अँटीबायोटीक्सचे युग अवतरायला , विसावे शतकही उजाडले. फ्रॉईड बाबाने मनोविकारशास्त्रात क्रांती घडवून आणली. मेंडेलसारख्या संशोधकांमुळे आनुवांशिकतेचे रहस्य उलगडण्याला सुरवात झाली आणि जनुकांचे युग अवतरले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात , डीएने सारख्या संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले आणि ह्युमन जीनोम पर्यंत जेनेटीक एंजिनियरींग येऊन पोचले.

हे सगळे संक्षिप्त आहे, अगदी थोडक्यात आहे, परंतु अत्यंत रोचक रीतीने मांडलेले आहे. अक्षंड परिश्रम, प्रयोग, संशोधनाला आयुष्याचे मिशन बनवून केलेले काम या सार्‍यामुळे आपल्या सर्वांचे जीवनमान वाढायला , आपले आयुष्य वेदनारहित करायला , सुखकर बनवायला कसकशी क्रमाक्रमाने प्रगती झाली हे सारे उत्तम रीतीने मांडलेले आहेच. पण त्याचबरोबर केवळ मनन-चिंतनाच्या पातळीवर असलेल्या सचेतनत्वाच्या संकल्पनेचा प्रवास तत्वज्ञानाचय ग्रंथांमधून , धर्मग्रंथांच्या नि धर्मपीठांच्या कचाट्यातून , प्रयोगशाळॅपर्यंत आणि संशोधनसिद्ध काँक्रिट पुराव्यांपर्यंत कसा झाला हे अतिशय उद्बोधक आहे.

हे पुस्तक सर्वव्यापी नाही, सगळे आवाक्यात घेणारे नाही. त्याचा तसा दावाही नाही. मात्र हा एक उत्तम आरंभबिंदू आहे.

शीर्षक : आत्मा ते जनुक
लेखक : डॉ. चंद्रकांत वागळे.
प्रकाशन : पॉप्युलर
पृष्ठे : २२०.
किंमत : रु २१०

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचायला हवे

पुस्तक वाचायला हवे. या विषयाशी ओळख करून घ्यायला उपयुक्त दिसते आहे.

धन्यवाद.

वाचेन...!

पुस्तकाची ओळख आवडली. पुस्तक मिळाले तर वाचेन.

-दिलीप बिरुटे

खऱोखरीच उत्तम `आरंभबिंदू`

मात्र हा एक उत्तम आरंभबिंदू आहे.

>>> सहमत आहे. गेल्याच महिन्यात मी हे पुस्तक वाचले आणि संबंधित सर्व विषयांवर अधिकाधिक वाचत जायला हवे, असे वाटले. खऱोखरीच उत्तम `आरंभबिंदू` !!!

उत्तम परिचय

पुस्तक वाचावेसे वाटत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुस्तकपरिचय लेखनाचा वस्तुपाठ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"आत्मा ते जनुक" या पुस्तकाचा श्री.मुक्तसुनीत यांनी मोजक्या शब्दांत यथायोग्य परिचय करून दिला आहे. प्रथम प्रस्तावना केली, पुस्तकाचे नाव लिहिले,लेखकाचे नाव सांगितले,विषय थोडक्यात निवेदन केला मग परिचय करून दिला. अशा प्रकारच्या लेखनाचा हा वस्तुपाठच म्हणायचा. श्री.प्रकाश घाटपांडे यांचाही अशा लेखनात हातखंडा आहे.अशा लेखांमुळे हे संकेतस्थळ समृद्ध झाले आहे.

 
^ वर