अंतस्थ हेतू - निव्वळ अर्थार्जन ?!?!

कोणतेही कार्य उभे करण्यामागे अंतस्थ हेतू हा "अर्थार्जन" हाच असतो. काहीजण तो स्पष्टपणे मांडतात तर काही जण तो दडपून ठेवताता तर काही जणांना स्वतःलाच उमगत नाही.

हे आणि असे तत्त्वज्ञान अनेकदा ऐकण्यात आणि वाचनात येते.

माझ्या मते हे खरे नाही.
अनेकदा -- होय अनेकदा! केवळ अपवाद म्हणून नव्हे!! -- आपण आणि अन्य जन अर्थार्जनाचा विचारही न करता स्वतःचा वेळ, पैसा हे उघड्या डोळ्यांनी आणि आनंदाने कारणी लावत असतो.
आज उघडेनागडे जग पाहिल्यानंतरही माझे मत हे निव्वळ भाबडा आशावाद आहे असे मला वाटत नाही.

आपली काय भूमिका आहे हे समजून घ्यायला आणि त्यातून शिकायला (read between the lines) आवडेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

अनेकदा -- होय अनेकदा! केवळ अपवाद म्हणून नव्हे!! -- आपण आणि अन्य जन अर्थार्जनाचा विचारही न करता स्वतःचा वेळ, पैसा हे उघड्या डोळ्यांनी आणि आनंदाने कारणी लावत असतो. आज उघडेनागडे जग पाहिल्यानंतरही माझे मत हे निव्वळ भाबडा आशावाद आहे असे मला वाटत नाही.

संपूर्ण सहमत. आणि वेगळी चर्चा चालू केल्याबद्दल आपले आभार!

विषयांतराचा रोष पत्करून या चर्चेच्या मूळ संदर्भाचीही आठवण करावीशी वाटते. लेख आणि चर्चांवर आधारित असणार्‍या मराठी संकेतस्थळांच्या निर्मितीने काही विशेष अर्थार्जन होवू शकेल अशी परिस्थिती आजमितीला नाही असे मला वाटते. अर्थार्जन झालेच, तरीही ते स्थळनिर्मात्यांच्या "अपॉर्चुनिटी कॉस्ट" च्या तुलनेत अगदी नगण्य असावे. हे सर्व जाणूनही , हौसेपोटी किंवा कळकळीपोटी, आपला पैसा, श्रम, आणि वेळ आनंदाने खर्च करणारे निर्माते अस्तित्वात असणे हे मला अजिबात अशक्य वाटत नाही.

- कोंबडी

ज्याचे त्याचे नंदनवन

कोणतेही कार्य उभे करण्यामागे अंतस्थ हेतू हा "अर्थार्जन" हाच असतो. काहीजण तो स्पष्टपणे मांडतात तर काही जण तो दडपून ठेवताता तर काही जणांना स्वतःलाच उमगत नाही.

हे जर 'कार्याचे' सर्वसामान्यीकरण असेल तर मला पटत नाही. विशेषतः बाबा आमटे, अनिल अवचट, मेधा पाटकर, बंग इ. आपल्या कार्यातून कोणत्याप्रकारचे अर्थार्जन (स्वतःसाठी अर्थातच) करतात हे जाणून घ्यायला आवडेल.

अनेकदा -- होय अनेकदा! केवळ अपवाद म्हणून नव्हे!! -- आपण आणि अन्य जन अर्थार्जनाचा विचारही न करता स्वतःचा वेळ, पैसा हे उघड्या डोळ्यांनी आणि आनंदाने कारणी लावत असतो

अगदी!

आपली काय भूमिका आहे हे समजून घ्यायला आणि त्यातून शिकायला (read between the lines) आवडेल.

प्रत्येकाचे एक नंदनवन* असते, ज्यात बागडायला ज्याला/ त्याला आवडते. बरेचदा, आपल्याला जे पटते त्याचे सर्वसामान्यीकरण करायलाही आवडते. हे करताना आपण जगाला आपल्यासोबत फरफटवत असतो याचे भान सुटते. तरीही, यात फारसे काही गैर नसावे कारण एकाने दुसर्‍याच्या नंदनवनात पाऊल टाकायची फारशी गरज नसते आणि त्याने फार मोठा फरकही पडत नाही. जोपर्यंत आपल्या नंदनवनावर हल्ला होत नाही तोपर्यंत ज्याला त्याला आपापल्या नंदनवनात नांदू दिले की झाले.

* नंदनवन as in fool's paradise.

अपवाद नाही

अनेकदा -- होय अनेकदा! केवळ अपवाद म्हणून नव्हे!! -- आपण आणि अन्य जन अर्थार्जनाचा विचारही न करता स्वतःचा वेळ, पैसा हे उघड्या डोळ्यांनी आणि आनंदाने कारणी लावत असतो.
आज उघडेनागडे जग पाहिल्यानंतरही माझे मत हे निव्वळ भाबडा आशावाद आहे असे मला वाटत नाही.

अक्षरशः खरे आहे. निव्वळ भाबडा आशावाद नक्किच नाही. आणि त्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर कितीतरी असे लोक दिसतील. अर्थार्जनाचा विचार तर बाजूलाच राहू दे, उलट पदरमोड सुध्दा करून अनेक जण कार्य करतच रहातात.

आवडाबाई

अक्षरशः खरे आहे. निव्वळ भाबडा आशावाद नक्किच नाही. आणि त्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर कितीतरी असे लोक दिसतील. अर्थार्जनाचा विचार तर बाजूलाच राहू दे, उलट पदरमोड सुध्दा करून अनेक जण कार्य करतच रहातात.

आवडाबाई, आपले म्हणणे खरे आहे. आम्ही त्याच कॅटॅगरीमधले आहोत.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही.

मत

कोणतेही कार्य उभे करण्यामागे अंतस्थ हेतू हा "अर्थार्जन" हाच असतो. काहीजण तो स्पष्टपणे मांडतात तर काही जण तो दडपून ठेवताता तर काही जणांना स्वतःलाच उमगत नाही.

नाही!.. मला देखिल वरिल तत्वज्ञान पटले नाही त्यात थोडा बदल केलेले खालील विधान पटते का बघा?

"कोणतेही कार्य उभे करण्यामागे कसलातरी "स्वार्थ" हा असतोच.. प्रत्येकवेळी हा स्वार्थ पैशात मोजला जाईलच असे नाही.. "

-वरूण
---------------------------------------------------------------------------------
मराठी संकेथळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

माहीती

काही जैन मंदीरामध्ये धार्मिक पुस्तके विकत देण्याची दुकाने आहेत ती विनामोबदला तत्वावर चालतात, पण पुस्तकांना कमी किमतीत विकून ही त्याना कधी कधी (हा कधी कधी प्रयेक वेळी येतो ही गोष्ट वेगळी) फायदा* ही होतो.... तेव्हा त्या फायदाचा उपयोग ते दुकान एखाद्या नवीन गावी ज्या मंदीरामध्ये दुकान नाही आहे त्या जागी नवीन दुकान चालू करण्यात करतात तेव्हा मला एक गोष्टीचे अपप्रुप (कसा लिहतात हा शब्द) वाटे की अशी किती दुकाने ही मंडळी चालवत असतील व सर्व दुकानांचा फायदा जातो कुठे !

ही माहीती विचारल्यावर काही महत्वपुर्ण माहीती हाती लागली....
काही जैन मंदीरांच्या स्वतःच्या शाळा व वस्तीगृह आहेत हे सर्वानाच माहीत असावे .... तेथील मुलांकडुन थोडीफार आर्थिक मदत घेतली जाते व जो पैसा कमी पडतो तो दान / पुस्तक विक्री / महामस्तिकाभिषेक व ईतर जागेतून मिळवला जातो.
एक मुला साठी कमीत कमी प्रत्येक महीन्यामध्ये १०००.०० रुपये खर्च येतो व शुल्क हा कधी कधी १००.०० रुपये देखील घेताना मी पाहीला आहे कारण मी स्वतः एका वस्तीगृहामध्येच शिक्षण घेतले आहे व तेथील व्यवस्थापन स्वतः काही काळ पाहीले आहे त्यावरुन.

*फायदा : काही भक्तजण पुस्तके दान करतात ती देखील विकली जातात.

वरील प्रकार कुठल्या व्यवस्थेत बसतो ?

कोणतेही कार्य उभे करण्यामागे अंतस्थ हेतू हा "अर्थार्जन" हाच असतो. काहीजण तो स्पष्टपणे मांडतात तर काही जण तो दडपून ठेवताता तर काही जणांना स्वतःलाच उमगत नाही.

अथवा ह्या मध्ये


अनेकदा -- होय अनेकदा! केवळ अपवाद म्हणून नव्हे!! -- आपण आणि अन्य जन अर्थार्जनाचा विचारही न करता स्वतःचा वेळ, पैसा हे उघड्या डोळ्यांनी आणि आनंदाने कारणी लावत असतो

राज जैन

अर्थाजना पलिकडे

अर्थार्जन हे साधन आहे साध्य नव्हे. निव्वळ पैसा मिळवावा म्हणून कुणी पैसा मिळवत नसावा. (पैसे मिळवताना फारसे सुख मिळत असेल असेही वाटत नाही.)
आपण म्हणता त्या स्वार्थाला कंडशमन म्हणता येईल असे वाटते. काहीजणांसाठी हे दुसर्‍यापुढे शेखी मिरवणे, आपली विद्वत्ता सिद्धकरणे असू शकेल तर काहींसाठी निव्वळ स्वतःची हौस भागवणे. पैकी दुसरे निर्माते म्हणून श्रेष्ठ तर पहिले अवलंबित.

(वरील विचार फाउंटनहेड सोबत वाचल्यास, पचायला एकदम सोपे जातील. लिहीण्याची इच्छा व क्षमता असणार्‍यांनी यावर अधिक प्रकाश टाकला तर वाचायला चर्चेत भाग घ्यायला आवडेल (इथे सार्त्र!))

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

स्वार्थ आणी कैफ

"कोणतेही कार्य उभे करण्यामागे कसलातरी "स्वार्थ" हा असतोच.. प्रत्येकवेळी हा स्वार्थ पैशात मोजला जाईलच असे नाही.. "
सहमत आहे. पैशाचा कैफ परवडला अशी इतर गोष्टींची नशा असू शकते. विरक्तीची नशा आसक्तीच्या नशेपेक्षा तीव्र असू शकते. 'संन्याशाची मस्ती' हा वाक्प्रचार अगदी समर्पक आहे.
निव्वळ पैसा मिळवावा म्हणून कुणी पैसा मिळवत नसावा. (पैसे मिळवताना फारसे सुख मिळत असेल असेही वाटत नाही.)

असहमत. असे असते तर एका मर्यादेनंतर पैसा मिळवण्यातला फोलपणा सर्वांच्याच लक्षात आला असता. अधिक पैसा, त्याहून अधिक पैसा हा त्या नशाचक्राचाच एक भाग आहे. इथे पैसा मिळवणे या उद्दिष्टापेक्षा पैसा मिळवण्याच्या प्रक्रियेचा कैफ दांडगा आहे. "चारचार ठिकाणी काम करतो तेंव्हा आजचा बॅंक बॅलन्स दिसतोय, महाराज.." या वाक्यात 'मी चार ठिकाणी काम करतो' हे सांगणे हीच नशा आहे. त्यामुळे आपण म्हणता त्या स्वार्थाला कंडशमन म्हणता येईल असे वाटते हे पटते.

सन्जोप राव

नशा, शेपूट घालणे वगैरे...

मला एक विचारायचे आहे. विरक्तीमुळे आलेली नशा अधिक चांगली, की नशेमुळे विरक्ती आलेली चांगली ?
तूर्त तरी आम्हाला फक्त नशेमुळे येणारी क्षणिक विरक्ती एवढाच अनुभव आहे. विरक्तीची नशा वगैरे केवळ वाचीव आणि ऐकीव माहिती. पण तो अनुभव जेंव्हा येईल तेंव्हा प्रथम तुम्हालाच सांगू!

सन्जोप राव

आमचे मत..

कोणतेही कार्य उभे करण्यामागे अंतस्थ हेतू हा "अर्थार्जन" हाच असतो.

हे विधान संपूर्ण खरे नाही. आम्ही मागेही येथील आमच्या एका प्रतिसादात असे म्हटले होते की स्वतःचा वेळ आणि पैसा खर्चून अर्थाजनाचा विचार न करता जेव्हा एखादी गोष्ट केली जाते तेव्हा त्याला चक्क "हौस" असं म्हणतात. आता व्यक्ति तितक्या प्रकृती असं तात्याबांनी म्हटलेलंच आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तिची हौसही वेगळी! (आमच्या हौशींबद्दल आम्ही सवडीने केव्हातरी बोलूच!;)

अश्या व्यक्ती फारच कमी असतात, की जिथे आपल्याला "हौस" च्या ऐवजी "तळमळ" हा शब्द वापरता येईल! उदा, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन, शिवाय स्वतःच्याच पदरचे चार पैसे खर्च करून काही थोरामोठ्यांनी उभ्या केलेल्या आणि नावारुपाला आणलेल्या शिक्षणसंस्था!

आपण आणि अन्य जन अर्थार्जनाचा विचारही न करता स्वतःचा वेळ, पैसा हे उघड्या डोळ्यांनी आणि आनंदाने कारणी लावत असतो.

अगदी खरं! आता हेच बघा ना, आत्ता आम्ही संगणकासमोर उघड्या डोळ्यांनी बसलो आहोत, आणि केवळ टीवटीव करायची हौस आहे म्हणून या चर्चाप्रस्तावावरता आमचेही बहुमूल्य मत ठोकतो आहोत! यात आमचा वेळही वाया चालला आहे आणि पर्यायाने पैसाही खर्च होतो आहे. पण त्याचबरोबर आनंदही निश्चितपणे होतो आहे. चार ओळखीची माणसं भेटतात, त्यांचे प्रतिसाद, उपप्रतिसाद वाचायला मिळतात, आमच्या स्वभावानुसार टिवल्याबावल्या करायला मिळतात आणि ज्या आम्हाला करायला अत्यंत आवडतात!

उपक्रमसारख्या ठिकाणी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्चून आम्ही केवळ हौस म्हणून, टाईमपास म्हणून येतो असं तात्याबांनी इथे वेळोवेळी म्हटलेलंच आहे! ;)

आज उघडेनागडे जग पाहिल्यानंतरही माझे मत हे निव्वळ भाबडा आशावाद आहे असे मला वाटत नाही.

खरं आहे रे बाबा एकलव्या! अरे पण काही मंडळींना उघडेनागडे राहायचे आणि नाचायचे पैशेही मिळतात हो! (उदा, आमच्या बिपाशा आणि मल्लिका शेरावत काकू!! ;)

जळ्ळं, आम्ही उघडेनागडे राहिलो आणि नाचलो तर पैशे तर सोडाच, पण ही नुसती बातमी ऐकून आमचे उपक्रमराव आमचा उपक्रमावरचा लॉगईनदेखील रद्द करतील हो! आता बोला!! ;)

आपली काय भूमिका आहे हे समजून घ्यायला आणि त्यातून शिकायला (read between the lines) आवडेल.

बरं का एकलव्य महाराज, आमची भूमिका आम्ही वर मांडलेलीच आहे. यातून आपण काही शिकलो आहोत असं जर आपणास वाटत असेल तर आमची गुरूदक्षिणा (ड्युटीफ्री मधली 'टीचर्स'!) तेवढी येतांना घेऊन या हो! ;)

आपला,
(हौशी!) तात्या.

(आपली स्वाक्षरी अक्षरमर्यादे बाहेर आहे. कृपया आपली स्वाक्षरी अक्षरमर्यादेनुरूप बनवा - उपसंपादक)

स्वार्थ असतोच.

कोणतेही कार्य उभे करण्यामागे अंतस्थ हेतू हा "अर्थार्जन" हाच असतो.
प्रत्येक वेळा स्वार्थ असतोच,अधिक पैसा झाला की प्रसिध्दी आणि यापूढची पायरी म्हणजे समाजसेवा,काही अपवादात ही क्रमवारी बदलू शकते.जोडी बदलू शकते. जसे समाजसेवा=प्रसिद्धी,पैसे=समाजसेवा,आता या इतक्या पैश्याचं काय करावं= समाजसेवा.आयूष्यात आता सगळं मिळालं= समाजसेवा(प्रसिद्धीसहीत)यात सर्वात "अर्थार्जन" हाच विषय असतो(पडद्यामागून)
मग पूढे ज्या गैरव्यव्हाराच्या बातम्या येतात.त्याची पायाभरणी अशीच झालेली असते.काही नावे आज आदर्श असतील ती अपवाद म्हणू फार तर.पण ती नावे कायमच आदर्श असतील असे म्हणण्याचा हा काळ नाही असे वाटते.

हेतू

बर्‍याचशा गोष्टींमागे अर्थार्जन हा हेतू असू शकतो, पण सर्वच नाही. पण त्यामागचे हेतू एकवेळ अर्थार्जन बरे असे असू शकतात. बर्‍याचदा हे हेतू आपल्यालाही ठाउक नसतात याच्याशी सहमत आहे. उदा. आपल्याला एखाद्याची/एखादीची दया येते तेव्हा त्यामागे नेमकी भावना काय असते? बर्‍याचदा आपण त्याच्या/तिच्या जागी नाही या जाणिवेतून आलेली सुटकेची भावना. याचप्रमाणे दानधर्मासारख्या गोष्टींमागेही वेगळे अंतःस्थ हेतू असू शकतात.
हे विचार सिनिकल वाटू शकतात याची जाणीव आहे.

आभार...

आपली मते येथे मांडल्याबद्दल आभार.

कोंबडीताई -
हौसेपोटी किंवा कळकळीपोटी, आपला पैसा, श्रम, आणि वेळ आनंदाने खर्च करणारे निर्माते अस्तित्वात असणे हे मला अजिबात अशक्य वाटत नाही.
खरे आहे!
आपला मुद्दा हा विषयांतर नाही. आपण एका जोरदार आणि जणू युगानुयुगे चाललेल्या चर्चेचा दाखला दिलेला आहे... तो येथील विषयासही पूरक आहे.

प्रियालीताई -
नंदनवनात वावरणारी माणसे आम्हाला आवडतात... हे मी माझ्या नंदनवनातून लिहितो आहे.

आवडाबाई -
पदरमोडीचा आपण दिलेला संदर्भ अक्षरशः खरा आहे. माझे एक गुरू यासंदर्भात बोलताना म्हणायचे की परवडत किंवा झेपत नसतानाही एखाद्याच्या मदतीला धावून जाणारी माणसे काही वेगळीच असतात. त्यांची आठवण झाली.

वरुण -
"कोणतेही कार्य उभे करण्यामागे कसलातरी "स्वार्थ" हा असतोच.. प्रत्येकवेळी हा स्वार्थ पैशात मोजला जाईलच असे नाही.. "
हे मनोमन मान्य आहे. स्वार्थाच्याही अनेक छटा, तर्‍हा आणि पातळ्या आहेत. आपण कोठे आहोत याचा धांडोळा घेणे गरजेचे.
बहुदा चर्चिलच्या आयुष्यातील हा एक प्रसंग बोलका आहे - प्रत्येक गोष्टीमागे स्वार्थ असतो असे चर्चिलचे ठाम मत. हे मत मित्राशी भांडून भांडून मांडत असताना ही दुक्कल बग्गीतून चालली होती. मध्येच एक कुत्र्याचे पिल्लू बर्फात कुडकुडताना दिसले. चर्चिल महोदयांनी बग्गी फिरवली, पिल्लू उचलले आणि एका सुरक्षित ठिकाणी सोडले. पुन्हा मार्गस्थ झाल्यावर मित्राने विचारले की हे जे काही केलेस त्यात तुझा काय स्वार्थ होता ते सांग. चर्चिल उवाच - हे मी केले नसते तर मला रात्रभर झोप लागली नसती.

राज जैन -
रंगेहात माहितीबद्दल आभार.

मिलिन्द -
प्रत्येक चलनाचे महत्व हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर (जो स्थलकालसापेक्ष आहे) अवलंबून असते.
ही आपली मांडणी रुचली.
"संकेतस्थळ चालकांचे अंतस्थ हेतू आणि बहिस्थ हेतू वेगवेगळे नसावेत, मग तो हेतू कुठलाही असू दे."
आपला विचार आणि आग्रह पटण्यासारखा आहे.

इतरांचेही आभार... व्यक्तिगत दखल थोड्या वेळाने किंवा उद्या... क्षमस्व!

कोनचा काय आणि कोनचा काय

आपल्या मराठी माणसांक देवान शाप दिलो हा. एखादो विषय उपस्थित करुन त्येचेवर चर्चा घडवून आणूची. म्हंजे थोडक्यात, भांडान करण्याची हौस भागवून घेवचो पध्दतशीर मार्ग. कोणाचो कायव हेतू असान देत.

(मजकूर संपादित. प्रतिसादाच्या माध्यमातून होणारे लिखाण हे सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणारे नसेल याची कृपया काळजी घ्यावी.)

- मालवणी माणूस

आभार (२)...

तो - कंडशमनाचा त्याचा मुद्दा (आणि शब्दही) पटला...
बाकी "अर्थार्जन हे साध्य आहे पण साधन नाही" असे असावे असे त्याला म्हणायचे आहे असे समजतो. ते तसे असतेच असे नाही.
(वरील विचार फाउंटनहेड सोबत वाचल्यास, पचायला एकदम सोपे जातील. लिहीण्याची इच्छा व क्षमता असणार्‍यांनी यावर अधिक प्रकाश टाकला तर वाचायला चर्चेत भाग घ्यायला आवडेल (इथे सार्त्र!))हे अजूनही समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे... फाउंटनहेड सोबत नसल्याने पचायला जड जाते आहे असे म्हणतो.

सन्जोप रावांनी "सन्याश्याची मस्ती" ह्या वाक्प्रचाराची करून दिलेली आठवण आवडली. "विरक्त भाव"ही पोहचला!

तात्या - आपला उघडानागडा प्रतिसाद पोहचला... आणि आपला लॉग-इनही सुरक्षित राहिलेला पाहून आनंद आहे. (अवांतर - आता गुंडोंची काळजी वाटते.) आपण आमचे आद्य गुरू आहात... दक्षिणा पाठवून देतो.

प्रा. डॉ. दिलीप बुरुटे - ... यात सर्वात "अर्थार्जन" हाच विषय असतो(पडद्यामागून)
आपले समीकरण वाचले. त्यात तथ्य नाही असे म्हणणे म्हणजे दांभिकपणा ठरेल. पण त्या समीकरणाने सगळी गणिते सुटतात किंवा सगळीच माणसे कळतात असे आम्हाला वाटत नाही.

राजेंद्र - ... पण त्यामागचे हेतू एकवेळ अर्थार्जन बरे असे असू शकतात. ... हे विचार सिनिकल वाटू शकतात याची जाणीव आहे.
जाणीवपूर्वक आपले मत मांडले आहे ते पटले. आपली कळकळ वाचकांपर्यंत पोहचली आहे असे माझ्या बाबतीत तरी खरे आहे.

मालवणी माणसा - आपल्या मराठी माणसांक देवान शाप दिलो हा. एखादो विषय उपस्थित करुन त्येचेवर चर्चा घडवून आणूची.
शाप नसो ह्या तो वरदान आसू बरंका!

प्रतिसादांची दखल घेणे मागे पडले होते... क्षमस्व!
पण चर्चा मुरू घातली होती मरू नाही अशी समजूत करून घेऊन आज आभाराचा दुसरा टप्पा पूर्ण करतो आहे. पुन्हा एकदा आपले आभार

(कालबाह्य) एकलव्य

 
^ वर