...[तर औषधाच्या किंमती निम्म्याने कमी होतील!

 

...तर औषधांच्या किमती निम्म्या होतील!

                                                     डॉ. अनंत फडके

     आज औषधांच्या किमती न परवडणाऱ्या आहेत कारण त्याबाबतचे सरकारचे धोरण चुकीचे आहे. काही योग्य पावले उचलली तर औषधांच्या किमती झटक्यात निम्म्याहून घसरतील. एक उदाहरण घेऊया - औषधे त्यांच्या व्यापारी नावाखाली न विकता त्यांच्या मूळ नावाने विकायची असा कायदा केला तर एवढया एका गोष्टीने औषधांच्या किमती झटक्यात उतरतील. उदाहरणार्थ -

     डोकेदुखी, अंगदुखी व ताप तात्पुरता कमी करणाऱ्या एका नेहमी वापरल्या जाणाऱ्या औषधाचे मूळ नाव (जनरिक नेम) 'पॅरासिटॅमॉल' असे आहे. 'पॅरासिटॅमॉल' च्या गोळीची उत्पादन किंमत सुमारे 15 पैसे आहे. नफेखोरीपासून दूर राहणाऱ्या लो-कॉस्ट या संस्थेची ही गोळी मूळ नावाने वेष्टनात बंद केलेल्या रूपात तीन रुपयांना दहा गोळया या दराने रुग्णांना मिळते. पण क्रोसिन, मेटॅसिन इत्यादी व्यापारी नावाने हीच गोळी तिप्पट-चौपट किमतीला पडते. क्रोसिन, मेटॅसिन, कॅलपॉल इ. नावाखाली मिळणाऱ्या गोळया या पॅरासिटॅमॉलच्याच गोळया असतात. हे सामान्य माणसाला माहीत नसते. त्याचा गैरफायदा उठवून नफेखोरी केली जाते! ही व्यापारी नावे  'पॉप्युलर' करण्यासाठी जाहिरातबाजीवर जो खर्च केला जातो त्यामुळेही या ब्रँड्सच्या किमती जास्त असतात. जी कंपनी भल्या-बुऱ्या मार्गाने आपला ब्रँड पॉप्युलर करते ती त्यासाठीच्या जाहिरातबाजीचा खर्च तर वसूल करते, पण बाजारात एखादे नाव प्रस्थापित झाले की त्या किंमत वाढवली तरी त्याचा खप कमी होत नाही याचा फायदा घेऊन पॉप्युलर ब्रँडच्या किमती खूप जास्त ठेवून जादा नफेखोरी केली जाते. शिवाय हा ब्रँड विकणाऱ्या दुकानदारालाही कंपनी घसघशीत मार्जिन देते. थोडक्यात एकच मूळ औषध वेगवेगळया कंपन्या वेगवेगळया व्यापारी नावाखाली विकतात व या स्पर्धेत जी कंपनी जास्त प्रस्थापित होते ती आपली किंमत जास्त ठेवते.

     एखाद्या औषधाच्या उपलब्ध ब्रँड्सपैकी सर्वात यशस्वी, महाग ब्रँड व त्यातल्या त्यात स्वस्त ब्रँड यांच्या किमतींमधील फरक लक्षात घेतला, तर केवळ औषधाचे व्यापारी नाव बदलल्याने रुग्णाला किती अकारण भुर्दंड पडतो याची कल्पना येते. तक्ता क्र. 1 मध्ये उदाहरणादाखल काही औषधांच्या बाबतीत ही तुलना केली आहे.

तक्ता क्र. 1
व्यापारी नावामुळे ग्राहकावर पडणारा भार

क्र.

औषधाचे नाव

 

कशासाठी
 वापरतात

 

व्यापारी नावाने मिळणाऱ्या सर्वात स्वस्त व सर्वात महाग औषधांच्या किमतीतील फरक

 

नावाजलेल्या कंपनीने दुकानदारांना दिलेले मार्जिन

 

1.

 

सिप्रोफ्लॉक्सॅसिन 500 मि.ग्रॅ.

 

टायफॉईड व इतर

 

309%

 

484%

 

2.

 

ओफ्लॉक्सॅसिन

 

जंतुलागणीवर

 

969%

 

400%

 

3.

 

ऍम्लोडिपिन

 

उच्च रक्तदाबावर

 

348%

 

700%

 

4.

 

ऍटेनॉलॉल

 

उच्च रक्तदाबावर

 

573%

 

300%

 

या तक्त्यातील सर्व उदाहरणे नावाजलेल्या कंपन्यांची आहेत. औषध तेच, कंपन्या नावाजलेल्या, पण त्यांच्या किमतीत एवढा प्रचंड फरक आहे याचे कारण व्यापारी नावांमुळे एकच औषध वेगवेगळया कंपन्या खूप वेगळया किमतीला विकू शकतात आणि तरी ग्राहकांना त्यातील मखलाशी कळत नाही!

     व्यापारी नावाच्या आधारे केलेली ही फसवणूक, लूट थांबवायची असेल, तर औषधांची सर्व व्यापारी नावे रद्द करायला हवीत. औषधाचे मूळ, सुटसुटीत नाव वापरायचे व कंसात कंपनीचे नाव द्यायचे असे केले तर ही लूट थांबेल. उदाहरणार्थ 'पॅरासिटॅमॉल (ग्लॅक्सो)', 'पॅरासिटॅमॉल (सिप्ला)' इ. नावांनी ही गोळी मिळायला लागली की रुग्णांना कळेल, की औषध तेच आहे, फक्त कंपनी वेगळी आहे. तेवढयासाठी कोणी दुप्पट-चौपट पैसे द्यायला तयार होणार नाही. म्हणजे व्यापारी नावे रद्द केली तर केवळ तेवढयाने औषधांच्या किमती एक तृतीयांश ते एक दशांश कमी होतील!

     औषधांच्या व्यापारी नावाच्या आधारे होणारी नफेखोरी बाजूला ठेवली तरी एकंदरीत या क्षेत्रात खूप नफेखोरी चालते. कारण आजारी पडल्यावर रुग्णाला डॉक्टरने लिहून दिलेले औषध घ्यावेच लागते. मग ते अवास्तव महाग का असेना. रुग्णाच्या या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन नफेखोरी केली जाते. याचे प्रमाण प्रचंड आहे. किरकोळ बाजारात रुग्णाला पडणारी किंमत व लो-कॉस्ट या बिगर-व्यापारी तत्त्वावर, काम करणाऱ्या संस्थेने बनवलेल्या औषधांची किंमत यांची तुलना तक्ता क्र. 2 मध्ये केली आहे.  लो-कॉस्ट ही संस्था आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याइतपतच नफा घेऊन धर्मादाय व इतर सामाजिक आरोग्य-प्रकल्पांना उत्तम दर्जाची औषधे विकत आहे. लो-कॉस्टची स्वतःची क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी आहे (अशी लॅबोरेटरी छोटया कारखान्यांमध्ये सहसा नसते). इतर छोटया कारखान्यांपेक्षा कामगारांना अधिक पगार आणि सवलती दिल्या जातात. तरीसुध्दा मूळ नावाने औषधे विकल्यामुळे, जाहिरातबाजीवर खर्च करावा न लागल्यामुळे व नफेखोरी हे उद्दिष्ट नसल्याने 'लो-कॉस्ट'ची औषधे व्यापारी कंपन्यांच्या औषधांपेक्षा कितीतरी स्वस्त पडतात.

तक्ता क्र. 2
लो-कॉस्ट व व्यापारी कंपन्यांच्या किमतींमधील फरक

क्र.

गोळीचे नाव

 

गोळीचे वजन
(मि.ग्रॅ.)

 

कशासाठी वापरतात

 

दर 10 गोळयांमागे किंमत
रुपयांमध्ये
लो-कॉस्ट      व्यापारी कंपनी

 

1.

 

अलबेंडॅझॉल

 

400

 

जंतावर

 

11

 

90

 

2.

 

ऍमलोडिपिन

 

5

 

उच्च रक्तदाब

 

2.05

 

21.77

 

3.

 

ऍमॉक्सिसिलिन

 

500

 

जंतुलागणीवर

 

19.75

 

68.90

 

4.

 

एनॅलॅप्रिल

 

5

 

उच्च रक्तदाब

 

3

 

22.58

 

5.

 

फ्लुकोनॅझोल

 

150

 

बुरशीलागण

 

35

 

295

 

6.

 

मेटफॉर्मिन

 

500

 

मधुमेह

 

1.5

 

3.73

 

7.

 

ग्लायबोनक्लॅमाइड

 

5

 

मधुमेह

 

1.5

 

3.73

 

8.

 

रिफँपिसिन

 

450

 

क्षयरोग

 

32

 

59.12

 

 

     तक्ता क्र. 3 मध्ये मधुमेहावरील गोळया मूळ नावाने व घाऊक बाजारात घेतल्या तर किती स्वस्त पडतात ते दिले आहे.

तक्ता क्र. 3
मधुमेहावरील गोळयांच्या किमतींतील तफावत

क्र.

गोळीचे मूळ नाव

 

घाऊक बाजारातील किंमत,

दर 10 गोळयांमागे (रु.)
(उत्पादकाचे नाव)

किरकोळ बाजारातील किंमत,

दर 10 गोळयांमागे (रु.)
(ब्रँड नेम)

1.

 

ग्लायबेनक्लॅमाइड (5 मि.ग्रॅ.)

 

3 रु. (लोकॉस्ट)

 

9 रु. (डिओनिल)

 

2.

 

मेटफॉर्मिन (500 मि.ग्रॅ.)

 

4 रु. (लोकॉस्ट)

 

10 रु. (ग्लायसीफेज)
11.50 रु. (ग्लायकोमेट)

 

3.

 

ग्लिमेपेराइड (1 मि. ग्रॅ.)

 

10 रु. (ब्ल्यू क्रॉस)

 

62 रु. (ऍमॅरिल)

 

4.

 

ग्लिकॅझाइड (80 मि. ग्रॅ.)

 

12 रु. (मोरपेन)

 

45 रु. (रिक्लाइड)

 

5.

 

पायोग्लिटॅझोन (15 मि.ग्रॅ.)

 

12 रु. (ब्ल्यू-क्रॉस)

 

24 रु. (पायोपॅड)
64.50 रु. (पायोझोन)

 

(टीप : या तक्त्यात दिलेल्या किमती शक्यतो अचूक दिल्या आहेत. पण तुमच्या दुकानदाराकडून खात्री करून घ्यावी).

     वरील चर्चेवरून निष्कर्ष निघतो की औषधे फक्त मूळ नावानेच विकायला परवानगी दिली तर केवळ या एका उपायाने औषधांच्या किमती एका झटक्यात निम्म्याहून जास्त उतरतील! राज्यकर्ते हे का करत नाहीत असा प्रश्न नागरिकांनी त्यांना विचारायला हवा.

 

[अन्यत्र पुर्वप्रकाशित]

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्कृष्ट लेख

उत्कृष्ट लेख. खूपच आवडला
चन्द्रशेखर

आपला उपक्रम स्तुत्य,

आपला उपक्रम स्तुत्य,
जमल्या अजून अधिक औषधाची यादी करावी.
राज्यकर्ते करायच्या अगोदर आपणच अशी एखादी यादी करून लोकांमध्ये वाटू शकतो. (PDF file बनवून सर्व मित्रांना पाठवू शकतो)
राज्यकर्त्यांची वाट बघितली तर ३००० साल उजाडेल.
मी हा तक्ता (ह्या धाग्याचा दुवा) आत्ताच मित्रांना पाठवित आहे.

>> राज्यकर्ते हे का करत नाहीत
ह्याचे उत्तर खूप-खूप साधे, सोपे, सरळ आहे. त्यामुळे ते उत्तर देण्याचे टाळतो.

>> असा प्रश्न नागरिकांनी त्यांना विचारायला हवा.
मी सुरुवात करीन.

आयमॉल

नक्कीच अभ्यासपूर्ण लेख आहे आणि डोळे उघडविणारा आहे. वरील अनेक टॅब्लेट्समध्ये "आयमॉल" चाही समावेश आवश्यक वाटतो. या गोळीतही लेखात उल्लेख केलेले खालील घटक आहेत :

Ipubprofen IP 400 gm
Paracetamol IP 325 gm
Caffeine IP 25 gm

डोकेदुखी, अंगदुखी, किरकोळ ताप यासाठी मी (आणि माझ्यासारखे अनेक) ही गोळी वापरत असतो. याच्या पॅकेटवर धोक्याचा शेरा आहेच :

“Overdose of Paracetamol may be injurious to Liver”

आता हा ओव्हरडोस म्हणजे किती हे कुणी नक्की करायचे? कारण आयमॉल हे शेड्यूल ड्रगमध्ये जरी येत असले तर रस्त्यावरील कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये पेपरमिंटसारखे चटकन मिळते.

भारतात

भारतात प्रयत्नांती कुठलेही औषध ओव्हर द काउंटर मिळू शकते असे वाटते.
काही देशांमध्ये प्रिस्क्रिप्शनवर एकदाच औषध विकत घेता येते, नंतर ते प्रिस्क्रिप्शन बाद होते.

आयमॉल वापरलेले नाही पण व्हिक्स ऍक्शन ५०० मध्ये हेच घटक आहेत (वजा आयबोप्रोफेन) . तिच्यावर बंदी येणार /आली असे ऐकले होते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

:-)

खरे आहे. चांगली माहीती.

>लो-कॉस्टची स्वतःची क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी आहे (अशी लॅबोरेटरी छोटया कारखान्यांमध्ये सहसा नसते).

या कंपनीबद्दल जरा माहीती दुवे द्यावेत. त्यांनी औषधे कूठे मिळतात अथवा कशी मागवावी याची माहीती मिळाल्यास सर्व मित्रमंडळींना कळवता येईल.

डॉ. फडके यांना अनेक धन्यवाद व अशीच माहीती कृपया देत रहा.

प्रकाशकाका धन्यु

मनापासून अभिनंदन. या विचार करण्याच्या शक्ती मुळे माझा देश महान

उपक्रमावर आल्या पासून पहिल्यांदा COMMON MAN चा विचार करून लिहिलेला अभ्यास पूर्ण लेख वाचला. मनापासून अभिनंदन. या विचार करण्याच्या शक्ती मुळे माझा देश महान आहे. आज वैद्यकिय व्यवसाय हा आजारी माणसा साठी चालवला जात नाही तर. ओषध निर्मात्या कंपन्या ओषध विक्रते आणि मेडिकल विमा कंपन्याच्या फायद्या साठी चालवला जातो. हे य देशातील जनतेचे दुर्देव्य आहे.य सर्व कडी त आजच्या शिक्षण व्यवस्थे मुळे डॉक्टर नकळत ओढला जातो. आणि मग सुरु होते कट प्रक्टिस चे दुष्ट चक्र. य करता पेशंट सुद्धा जबाबदार आहे. जो डॉक्टर सरळ प्रक्टिस करतो याच्या कडे पेशंट फिरकत नाही. जो पर्यंत डॉक २-५ इन्जेक्शेन देत नाही ४-५ वेगवेगळ्या चाचण्या करण्यास सांगत नाही, तो पर्यंत पेशंट चे समाधान होत नाही. आज ७५% रोगांना चाचण्याची आवशकता नसते. हे सत्य लपवून ठेवल्या जाते.

चांगला लेख

चांगला लेख.

डॉ फडके यांची(?) लोकविज्ञान संघटना या विषयावर पूर्वीपासून कार्यरत आहे. जेनेरिक औषधे देण्यासाठी काही केंद्रेही ते चालवतात असे ऐकून आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

चांगला माहितीपूर्ण लेख

चांगला माहितीपूर्ण लेख. डॉ. फडके आणि प्रकाश घाटपांडे यांचे आभार. ज्यांना ज्यांना अजून माहिती असेल त्यांनी या यादीत भर घालावी.

लो कॉस्ट कंपनीची अजून माहिती मिळू शकेल का? जेनेरिक औषधे नेहमीच्या केमिस्टकडे मिळतात का?

चिनार

उपाय

औषधांच्या दुकानात IDR पुस्तक बहुतेकदा असतेच. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधाचे जनरिक रसायन कोणते ते त्यात शोधता येईल. त्यातच इतर कंपन्यांच्या वेष्टनामधील औषधाच्या किमतीही दिलेल्या असतात. अशा प्रकारे सर्वात स्वस्त औषध निवडता येईल.
जनरिक हा शब्द दोन अर्थांनी वापरतात. वैद्यकीय वर्तुळात "क्रोसिन या ब्रँडमध्ये पॅरॅसिटेमॉल हे जनरिक रसायन असते" अशा अर्थाने तो शब्द वापरतात. कायद्याच्या भाषेत, इतर कंपन्यांनी (परवाना मिळवून किंवा पेटंटची मुदत संपल्यावर किंवा बेकायदेशीर) पेटंटद्वारे सुरक्षित असलेल्या औषधाची निर्मिती केली तर त्या कंपन्यांच्या ब्रँडलाच जनरिक म्हणतात.
माझ्या माहितीप्रमाणे, शुद्ध जनरिक औषधे (ज्यांच्यावर ब्रँडनावच नसते, केवळ उत्पादक कंपनीचे नाव असते, म्हणजे ती दोन्ही अर्थाने जनरिक असतात) किरकोळ विक्रीसाठी नसतात, दवाखान्यात रुग्णांना एक-एक करून देण्यासाठी डॉक्टरांना परवडतात. रुग्णांच्या आवश्यकतेच्या कितीतरीपट गोळ्या एकेका पुड्यात असतात. शिवाय, वेष्टनही तकलादू असते.

चांगली माहिती

लेखातून चांगली माहिती मिळाली. कंपन्यांचे नाव कंसात घातले तरीही औषधांच्या कंपन्या इतर मार्गांनी (वितरक व औषध दुकानदार वगैरेंचा) मार्क अप चार्ज करू शकतील.

वरील चर्चेवरून निष्कर्ष निघतो की औषधे फक्त मूळ नावानेच विकायला परवानगी दिली तर केवळ या एका उपायाने औषधांच्या किमती एका झटक्यात निम्म्याहून जास्त उतरतील!

वरील निष्कर्ष काढण्याइतपत माहिती प्रस्तुत लेखात नाही.

हाच मुद्दा

हाच मुद्दा मलाही मांडायचा आहेच.
प्रकाश घाटपांडे

...[तर औषधाच्या किंमती निम्म्याने कमी होतील!

सप्रेम नमस्कार.

काही दशकांपूर्वी ह्या विषयावर सखोल अभ्यास करून भारत सरकारने नेमलेल्या हाथी आयोगाने उत्तम अहवाल दिला होता. काही विशिष्ट (सुमारे ऐंशी?) मुख्य औषधांची विक्री कुलनामाखालीच (generic name) केली पाहिजे असा कायदा करण्याची शिफारस त्यांनी केली होती. भारत सरकारने तो प्रथम स्वीकारलाही होता. पण या अहवालाविरुद्ध सर्वच औषधनिर्मिती कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात झुंडगिरी करून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला (सर्व प्रकारे !!). मग कॉंग्रेस सरकारने तो निर्णय पुढे ढकलला. आणि अशा प्रकारे त्या कायद्याची अंमलबजावणी २-३ वेळा पुढे ढकलल्यावर कधीतरी सर्वांच्या नकळत तो केराच्या टोपलीत फेकून दिला.

पुढे असेही ऐकण्यात आले होते की त्यानंतर बांगलादेशाने आपल्या देशात हाथी आयोगाच्या आधारावर बराचसा तसाच कायदा केला. नक्की माहिती नाही. पण सत्ताधारी पक्षाने मात्र औषध कंपन्यांची जनतेच्या टाळूवरील लोणी खाण्याची सोय चालूच ठेवली, बहुधा आपणही स्वतः त्या लोण्यात भागीदारी घेऊन !!

सलील कुळकर्णी

जेनेरिक वापरावे, + अन्न-औषध प्राधिकरण सुरक्षेबाबत जागरूक असावे

जेनेरिक वापरावे, + अन्न-औषध प्राधिकरण सुरक्षेबाबत जागरूक असावे

चांगला लेख.

(नावाजलेल्या कंपन्या आपल्या मालात भेसळ नसल्याची ग्वाही देतात. कमी नावाजलेल्या कंपन्यांचा माल निकृष्ट असल्याची भावना बाजारात असली, तर शाश्वतीची किंमत म्हणून वधारलेला भाव मागता येतो. अन्न-औषध प्राधिकरण सर्व मालाबद्दल शाश्वती देईल इतके कार्यक्षम हवे.)

(श्री. प्रकाश घाटपांडे यांनी मागेच सांगितलेले आहे, की डॉ. फडके यांच्या अनुमतीने लेख येथे दिलेले आहेत. तरी प्रत्येक लेखाखाली हे वाक्य लिहावे, अशी विनंती. जुन्या जाणत्यांना गरज नाही, पण नव्या सदस्यांमध्ये त्यायोगे ही जाणीव रुजेल "अनुमती घेणे सोपे आहे, आवश्यक आहे, अपेक्षित आहे".)

+१

अन्न-औषध प्राधिकरण सर्व मालाबद्दल शाश्वती देईल इतके कार्यक्षम हवे.वे

असेच म्हणते.

एक अनुभव - मागे कधीतरी भारतात असताना मुलीला पोटाचा त्रास सुरू झाला. आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जाता आले नाही (वेगळे शहर) तेव्हा कोणा नातेवाईकाने सांगितलेल्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर चांगले असावेत, पण त्यांनी नेहमीच्या गोळ्या न देता एका पुडीत बांधून गोळ्या दिल्या (बहुतेक डॉ. रेड्डी यांच्या असाव्यात असे मला वाटते). त्या नेहमीच्या गोळ्यांपेक्षा कितीतरी कमी किंमतीच्या होत्या, पण मला या नवीन गोळ्यांचा वापर करायला कम्फर्टेबल वाटले नाही, एवढे खरे.

चांगला लेख

फडक्यांचे लेख येथे दिल्याबद्दल धन्यवाद. माहितीपूर्ण आहेच. त्यांनीही येथील आमंत्रण घेतले आहेच पण ते अधिक सक्रिय होऊन लिहू लागले तर चर्चा अधिक चांगली होईल.

उपयुक्त लेख

छान लेख. उपयुक्त माहीती. उपक्रमावर वाचनखुणा नसल्याची उणीव पुन्हा एकवार जाणवली

मात्र ह्या गोळ्या खरंच त्याच आहेत का? हा प्रश्न लोकांच्या मनात डोकावेल. उद्या एखाद्याला कोणी क्रोसिन ऐवजी पॅरासिटॅमॉल घे म्हटले तर तो कदाचित घेईल कारण याबद्दल बरेच लोक ऐकून आहेत आणि क्रोसिन फारशा सिरियस आजारावर घेतली जात नाही. मात्र उद्या एखाद्या मधुमेह्याला तुला दिलेल्या गोळ्यांऐवजी मेटफॉर्मिन घे म्हटले तर तो म्हणेल मी आधी डॉक्टरला विचारतो आणि मग घेतो.

तेव्हा याबाबतीत अश्या लेखांद्वारे जनजागृती हवीच पण त्याचबरोबर डॉक्टरांनीही लो-कॉस्ट गोळ्या आपणहून प्रिस्क्राईब केल्या पाहिजेत किंवा निदान गोळ्या लिहून देताना ह्या पर्यायाची माहीतीही रुग्णाला देऊन ठेवली पाहिजे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आम्ही जनरिक नावाने गोल्या द्यायची सोय केली आहे

माफ करा, मला येथे मराथी ताय्पिन्ग् जमत नाहीय. गुगल वर थोदे जमते.
लो-कॉस्ट च्या सन्केत स्थलावर (www.locostindia.com)लो-कॉस्ट बद्दल अधिक माहिती मिलेल.
" औषधे फक्त मूळ नावानेच विकायला परवानगी दिली तर केवळ या एका उपायाने औषधांच्या किमती एका झटक्यात निम्म्याहून जास्त उतरतील! वरील निष्कर्ष काढण्याइतपत माहिती प्रस्तुत लेखात नाही. " असा मुद्दा एकाने मान्दला आहे.
माझ्या लेखातील दुस्र्या व तिसर्या तक्त्या मध्ये कमी किम्तीचा कोलम जनरिक नावाने मिल्नार्या औशधान्चा आहे. त्याची शेजारच्या तक्त्याशी तुलना केली तर "वरील निष्कर्ष काढण्याइतपत माहिती" मी दिली आहे हे लक्शात येइल.
लुपिन ही कम्पनी त्यान्ची कअल्शियम ची गोली १५ गोल्याना ६ रु. या दराने डॉक्टरला विकते. तेच पाकीत पेशन्त्ला तीच कम्पनी, तेच ४४ रु ला देते! म्हनजे दर्जा चा किमतीशी सम्बन्ध नाही.डॉक्टर साथी व रुग्नानसाथी वेगली धोरने असतात. पुने शहरात आम्ही जनरिक नावाने या गोल्या ८ रु. ला पाकीत् या दराने द्यायची सोय केली आहे. इतर ८० औशधे जनरिक नावाने मिल्तील. फोन - डॉक्टर मोने- ९७६४८०००९२
डॉ. अनंत फडके

आपण जी माहिती दिलीती, ती उपयुक्त आहे. हे जास्त महत्वाचे.

टायपिंग येणे व न येणे हा मुद्दा (माझ्यामते) खरंतर गौण आहे.
आपण जी माहिती दिलीती, ती उपयुक्त आहे. हे जास्त महत्वाचे.
अजून अशीच माहिती असेल तर नित्य देत राहावी. हि विनंती.

+१

सहमत.
आपण जी माहिती दिलीती, ती उपयुक्त आहे. हे जास्त महत्वाचे.
अजून अशीच माहिती असेल तर नित्य देत राहावी. हि विनंती.

मोडक्या तोडक्या मराठीत का होइना उपयुक्त माहीती कधीही मौल्यवानच.

डॉ. फडके धन्यवाद.

परदेशात मला हा अनुभव आला आहे. जेव्हा मी जनरीक ब्रँडच्या उपलब्ध पॅरासिटॅमॉल गोळ्या मागीतल्या तेव्हा एका प्रसिद्ध कंपनीच्या ओव्हर द काउंटर मिळणार्‍या किमतीच्या १/३ किमतीत, तिप्पट जास्त गोळ्या मिळाल्या. घटक सगळे तेच. हे स्वस्तातले उत्पादन भारतीय फार्माकंपनीचेच (आउटसोर्स)होते हे. वे. सा. न. ल.

थोडेसे अवांतर पण समांतर - अमेरीकेतील एक सौंदर्य प्रसाधने बनवणारी कंपनी जी ग्राहकांना सांगते की ग्राहकांनी त्यांना आवडणारे प्रथितयश ब्रँडचे उत्पादन सांगा (छापील माहीती) व ते त्यातील प्रमुख घटक पाहून तेच घटक असलेले उत्पादन प्रतिथयश ब्रँडपेक्षा कमी किमतीत ते बनवुन देतील. ग्राहकांना शिक्षीत करुन, स्वस्तातला पर्याय तसेच जगभर वितरण व्यवस्था देण्यामुळे जगभरचे ग्राहक अनायसे या कंपनीला मिळाले आहेत हे.वे.सां. न. ल.

शंका

माझा एक मित्र भूतकाळात फार्मसी व्यवसायाशी संबंधित होता. सध्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. त्याने दिलेला सल्ला असा की डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या ब्र्यांडचेच औषध शक्यतो घ्यावे. गोळ्या तयार करताना विशिष्ट तापमान व इतर रासायनिक प्रक्रियांचे स्वरुप यात किंचितही बदल झाला तरी गोळीच्या गुणवत्तेत फरक पडतो. ज्या गोळ्या स्वस्त असतात त्या कंपन्यांकडे स्टॅंडर्ड तपासणीच्या यंत्रणा पुरेशा प्रगल्भ नसतात. खरे खोटे प्रत्यक्षदर्शींनी/अनुभवींनी सांगावे.

त्याने मांडलेला दुसरा एक मुद्दा असा की एक्पायरी डेट जवळ आलेल्या गोळ्या थेट कंपन्यांकडून उचलून ग्रामीण-अशिक्षित समूहांमधील दुकानांमध्ये विकण्याची मोठमोठी रॅकेटे मध्य भारतात कार्यरत आहेत. अशा गोळ्या कमी किमतीला उपलब्ध असतात. (कंपन्यांना एनीवे त्या फेकाव्याच लागतात.) अशा गोळ्यांची 'पावर' कमी झालेली असली तरी त्यापासून शक्यतो साईडइफेक्ट्स होत नाहीत. याबाबत काही माहिती आहे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

समांतर

मला वाटते की मुदत उलटली तरी अनेक औषधे कार्यक्षम उरत असावीत आणि घातक होत नसावीत. मी तरी, कोणत्याच गोळीवर दोन वर्षांपेक्षा अधिक मुदत बघितल्याचे स्मरत नाही. सरकारांच्या अनेक आचरट नियमांपैकी हा एक वाटतो.

शीतपेयांवर तीन महिने मुदत लिहिलेली असते. परंतु, एक महिना उलटल्यावर १५-२०% सूट मिळते, तसाच हा प्रकार असू शकेल.

धंदा

सरकारच्या आचरट प्रकारांपेक्षा औषध कंपन्यांची धंद्याची लाईन वाटते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

समजले नाही

औषधाची मुदत संपल्याचा भूर्दंड ग्राहकांना पडण्याची शक्यता मला कमी वाटते. स्वतःवरून माझा अंदाज आहे की बहुतेक ग्राहक, विशेषतः ओवर द काउंटर औषधे मुदतीनंतरही वापरत असावेत. उत्पादन वाया जाणे आणि धाड पडण्याची भीती हे दोन त्रास मुदत छोटी असल्यामुळे कंपन्यांना होतील/होतात. धंद्यात फायदा का होईल/होतो?

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते या कार्यक्रमात हा विषय आमीर खानने उचलून धरला. त्यानिमित्त पुन्हा एकदा या विषयावरील चर्चा झडू लागली. डॉ अनंत फडके यांचा मटा मधील नुकताच आलेला या विषयावरील लेख http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13750320.cms
प्रकाश घाटपांडे

औषधांच्या किमती:

आजच्या लोकमत मधील बातमी.

खाली साभार डकवत आहे:

प्रमुख औषध कंपन्यांकडून ग्राहकांची लूट
(18-06-2012 : 00:42:07)
- दसपट किमतीने औषधांची विक्री, कंपनी मंत्रालयाच्या अहवालातील माहिती

नवी दिल्ली। दि. १७ (लोकमत न्यूज नेटवर्क)
ग्लॅक्सोस्मिथक्लाईन, फायझर आणि रॅनबक्शी यांच्यासह अनेक प्रमुख औषध उत्पादक कंपन्या सर्वसामान्यपणे सर्रास वापरली जाणारी औषधे त्यांच्या उत्पादन खर्चाहून दसपट किंमतीने विकत असल्याचे केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
मंत्रालयाच्या ‘कॉस्ट ऑडिट’ शाखेने केलेल्या या सर्वेक्षणात असे समोर आले की, ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचे ‘कॅलपोल’, फायझरचे ‘कोरेक्स कफ सिरप’, रॅनबक्शी ग्लोबलचे ‘रिव्हायल’, डॉ. रेड्डीज लॅबचे ‘ऑमेझ’आणि अँलेम्बिकचे ‘अँझीथ्राल’ यासह इतरही अनेक औषधे त्यांच्या उत्पादन खर्चाहून १,१२३ टक्क्यांपर्यंत चढय़ा भावाने विकली जातात. सर्वेक्षणातून निघालेले हे चिंताजनक निष्कर्ष लक्षात घेऊन कंपनी व्यवहारमंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी रसायन व खते खात्याचे मंत्री एम.के. अलागिरी व सार्वजनिक आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना पत्र लिहिले असून औषध कंपन्यांच्या या अयोग्य व्यवहारास आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे.
रॅनबक्शी, डॉ. रेड्डीज लॅब, वाएथ, एफडीसी, अँलेम्बिक, ग्लॅक्सोस्मिथक्लाईन, फायझर, यूएसव्ही, एल्डर फार्मा, झायडस कॅडिला, व्होकार्ड आणि सिपला इत्यादी आघाडीच्या कंपन्यांतर्फे उत्पादित किंवा विक्री केल्या जाणार्‍या औषधांच्या बाबतीत हे सर्वेक्षण केले गेले होते. मंत्रालयाने हे सर्वेक्षण स्वत:हून केले होते.‘शेड्युल्ड ड्रग्ज’च्या संदर्भात कंपन्या उत्तादन खर्चाच्या तुलनेत जास्तीत जास्त दुप्पट किरकोळ विक्रीची किंमत ठेवू शकतात, असे ‘नॅशनल फर्मास्युटिकल प्रायसिंग अँथॉरिटी’चे धोरण आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक औषधे उत्पादन खर्चाच्या २0३ टक्के ते १,१२३ टक्के एवढय़ा अव्वाच्या सव्वा भावाने विकली जातात, असे या सर्वेक्षणात आढळून आले.
सर्वेक्षणात असेही आढळले की, ‘अँमलोडोपाईन’, ’मेटफॉर्मिन’, ‘सिप्रोप्लॉक्झासिन’ व ‘अझिथ्रोमायिसन’ यासारख्या भरपूर खप असलेल्या ‘ब्रॅण्डेड औषधांच्या बाबतीत नफ्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. तसेच एकाच प्रकारच्या औषधाच्या उत्पादन खर्चात विविध कंपन्यांमध्ये बरीच तफावत आहे व एकाच मूळ औषधी द्रव्यापासून तयार केलेली औषधे विविध कंपन्यांकडून वेगवेगळया किंमतीला विकली जातात. औषधांची कमाल विक्री किंमत उत्पादन खर्चाच्या एक हजार टक्क्यांपर्यंंत जास्त ठेवण्याच्या कंपन्यांच्या या व्यापार प्रथेमुळे वितरक, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते अशा विक्री साखळीतील सर्वांंनाच अनभिज्ञ ग्राहकांची फसवणूक करण्यास वाव मिळतो. उत्पादन खर्चाच्या दसपट भावाने औषधे खरेदी करायला लागणे हे ग्राहकांच्या हितास फारच मारक आहे, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. विशेषत: जीवरक्षक औषधांच्या किंमती नियंत्रणाखाली राहाव्यात यासाठी सरकार राष्ट्रीय औषध दरनिश्‍चिती धोरण आखण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवहार मंत्रालयाने औषधांच्या किंमतींच्या संदर्भात स्वत:हून केलेले हे सर्वेक्षण उल्लेखनीय आहे. औषधांची विक्री किंमत कशी ठरवावी यासंदर्भात रसायन आणि औषध मंत्रालयाने केलेला प्रस्ताव कृषीमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रीगटाने मान्य केला तर ६0 टक्के औषधांच्या किंमती नियंत्रणात ठेवणे शक्य होऊ शकेल.
---------------------------
कंपन्यांकडून प्रतिक्रिया नाही !
रॅनबक्शी, फायझर, झायडस, कॅडिला आणि सिपला या कंपन्यांचे यावरील म्हणणे जाणून घेण्यासाठी ‘पीटीआय’ वृत्त संस्थेने त्यांना पाठविलेल्या ई-मेलना कंपन्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तर मंत्रालयाच्या सर्वेक्षणातील या निष्कर्षांंवर आम्हाला कोणतेही भाष्य करायचे नाही, असे डॉ. रेड्डीज लॅब कंपनीकडून सांगितले गेले.

 
^ वर