कार्बन क्रेडीट

एक चांगला लेख नुकताच वाचनात आला - कार्बन क्रेडीट..अर्थात नफ्याची संधी- प्रवीण गवळी, प्रहार - १९ जानेवारी, २०१० (येथे) त्यातीलच काही भाग खाली उद्धृत करत आहे.

"‘कार्बन क्रेडिट’ हा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर हरितगृह वायू कमी करण्याच्या दिशेने उचललेले एक ठोस पाऊल आहे. एक कार्बन क्रेडिट हे एक टन कार्बन डायऑक्साईड किंवा यासम वायूंच्या समान मानलं जातं व बाजारात हे विकलं/ खरेदी केलं जाऊ शकतं. आजच्या घडीला ही एक नवी बाजारपेठ आकार घेऊ लागली आहे व स्टॉक एक्स्चेंजसारख्या माध्यमातून याची खरेदी / विक्रीसुद्धा होऊ लागली आहे. एक कार्बन क्रेडिटचं मूल्य २२ युरो आहे. बाजारपेठेची एक खासियत असते. तिथे फक्त ‘मागणी व पुरवठा’ हेच सूत्र चालतं व मागणी असणाऱ्या कोणत्याही घटकाची तिथे चलती असते. मागणी असेल तर भाव नक्कीच रास्त व जास्त मिळतो. जो कोणी कमी ‘कार्बन’ वातावरणात सोडेल त्याचे पॉइंट्स वाढतात व तो हे पॉइंट्स ‘जास्त’ कार्बन वातावरणात सोडणाऱ्याला विकू शकतो. म्हणजेच कार्बन क्रेडिट कमावण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील घटक प्रगत तंत्रज्ञान वापरून कमी हरितगृह वायूंची निर्मिती करण्यासाठी आपोआप उद्युक्त होतील, ही या बाजारपेठेमागची धारणा आहे. भारत व चीन या देशांनी शेकडो कोटींचे ‘कार्बन क्रेडिट’ जमा केलेले आहेत व ते युरोपीय देशांना विकूही शकतात. या बाजारपेठेत सामील होऊन कोणीही सामान्य मनुष्य यातून भरपूर माया जमा करू शकतो. वेगळ्या शब्दांत सागायचं तर कोणतीही कंपनी, कारखाना किंवा एखाद्या शेतकऱ्यानेही संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘फ्रेमवर्क कनेक्शन ऑन क्लायमेट चेंज’(यूएनएफसीसीसी)शी संपर्क साधून हरितगृह वायू वातावरणात सोडण्याची ‘प्रमाणभूत’ पातळी किती आहे, याची माहिती घेऊन त्यापेक्षा कमी ‘कार्बन’ किंवा हरितगृह वायू वातावरणात सोडले तर त्याला ‘क्रेडिट’ मिळतात. हेच क्रेडिट किंवा पॉइंट युरोपीय देश विकत घेऊ शकतात. कारण त्यांनी क्योटो करारावर सही केलेली आहे. अमेरिकेने अजून या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही.
क्योटो करारानुसार युरोपियन राष्ट्रे २००८ ते २०१२ पर्यंत एका ठराविक प्रमाणात हरितगृह वायू कमी करण्यासाठी करारबद्ध आहेत. त्यामुळे या कालावधीत फार मोठय़ा प्रमाणात कार्बन क्रेडिटची अदलाबदल होणार आहे. या हरितगृह आपत्तीतून नफा कमावण्याची संधी चालून आलेली आहे. आपण याचा काही फायदा उठवणार आहोत की नाही?"

माझ्या माहितीनुसार, ह्यातील अनेक मुद्दे आता खूप सीरीयस वळण घेऊ पहात आहेत व त्यामाध्यमातून खरोखरच खूप फायदा मिळवण्याची संधी आहे, उदा- कार्बन क्रेडीटचे ट्रेडींग, देवाण-घेवाण, ई.
महानगर पालिका व तत्सम महामंडळे ह्यांनी त्यांच्या कार्यभागात येणाऱ्या पाणी, हवा प्रदुषणाशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणून तसे सिद्ध केले तर त्यांना ह्या कार्बन क्रेडीटचा लाभ होऊ शकतो. एखादा आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्याला खास पद निर्माण करुन ह्याबद्दलच्या सर्व कामाला गति देता येऊ शकते. खाजगी कारखाने, वीज महामंडळे, वीज उत्पादन व्यावसायिक हे सगळे ह्यातुन नफा कमावु शकतात. ह्याबद्दल अधिक माहीती गुगलून मिळू शकते.

[आधीच चर्चा झाली असेल तर कृपया दुवे कळवावेत]

लेखनविषय: दुवे:

Comments

या कार्बन क्रेडिटच्या भूलभूलया बद्दल सकाळ आगस्ट ०३/२०१०

या कार्बन क्रेडिटच्या भूलभूलया बद्दल सकाळ आगस्ट ०३/२०१० मध्ये चांगला लेख आला. बडी धेंड लहान राष्ट्रांना कसे मूर्ख बनवत आहे हे त्यात स्पष्ट केले आहे. http://72.78.249.124/esakal/20091226/5715089045882136531.htm

'कोपनहेगन'ची शोकांतिका
On 27/12/2009 23:42 vishal ozarde said:
मठ्ठपणा ही चीज कोपनहेगन परिषदेच्या आयोजकांकडून शिकावी. आत "ग्लोबल वॉर्मिंग" वर परिषद चालू आहे आणि बाहेर युरोपात तुफान हिमवर्षावामुळे ८०+ लोक मरत आहेत. एव्हढीच जर खुमखुमी होती तर जरा गरम देशात तरी भरवायची होती परिषद. ते शक्य नव्हतं तर निदान उन्हाळ्यात तरी आयोजित करायची! स्वत:चे हसे करून घेतले आहे परिषदेने.

3) कार्बन ट्रेडिंग : अत्यंत सोपा दिसणारा असा हा पर्याय आहे; पण त्याचे फायदे मिळवण्यासाठी प्रचंड ससेहोलपट होते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. उत्सर्जन कमी केले हे त्रयस्थ विशेषज्ञाकडून खातरजमा करून हे प्रयत्न सातत्याने राखल्याचे प्रमाणपत्र दिल्यावरच त्याचे फायदे मिळतात. कागदी घोडे नाचवून विकसनशील देशांची दमछाक करण्याचा हा डाव आहे. पैशाने सर्व काही साध्य होते, हेच गाजर पुन्हा विकसित देश दाखवत आहेत. 4) उत्सर्जनाच्या पापाचे क्षालन करून मुक्तीचा प्रयत्न : माझा कारखाना शहरात कार्बन वायूचे उत्सर्जन करतो, म्हणून मी कुठेतरी तीन-चारशे मैलांवरच्या टेकड्यांवर जंगलउभारणीसाठी मदत करेन, यामध्ये भ्रष्टाचाराला थेट आमंत्रण आहे, हे ओघानेच आले.

फाजीलपणा

अ-कल्याणकारी शासनव्यवस्थेची पुढची पायरी म्हणून कार्बन क्रेडिट संकल्पनेकडे बघता येईल.
पाणीपुरवठा (रीझनेबल शुल्क घेऊनही) जमणार नाही, पावसाचे साठवा (भूजल खेचण्याविरुद्धसुद्धा कायदे करण्याची मागणी ऐकली होती). रस्तेदुरुस्ती परवडत नाही, टोल भरा. कचरा नेण्यास आम्हाला खर्च येतो, वस्तू विकत घेतानाच त्याची भरपाई करा. अशा प्रकारे, (पोलिससेवा वगळली तर) काहीच मोफत मिळणार नाही अशा व्यवस्थेकडे जग चालले आहे. कार्बन क्रेडिट हा श्वास घेण्यावरसुद्धा निर्बंध घालण्याचा डाव आहे.

धंदा

मुंबईत टी डी आर् हा प्रकार आहे ना, तसाच हा प्रकार.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

स्टोरी ऑफ स्टफ

वरील प्रतिसादातील मुड पाहून आणखी काही दुवे चाळले तर ही फीत मिळाली-स्टोरी ऑफ स्टफ. तरीही जे समजले आहे ते इतके काळेकुट्ट नाही.

बागुलबुवा

त्यांची बाटलीबंद पाण्याची कथा बघितली होती.
सँडल घालणारे लोक ;)

उतारा म्हणून क्रायटनची स्टेट ऑफ फिअर सुचवितो.

चांगली चर्चा

कार्बन क्रेडिट ही कल्पना वाचून आश्चर्य वाटले. या चर्चेतून अधिक माहिती मिळावी असे वाटते. आणखी कशाकशाचे कमोडिटायझेशन होणार आहे याची कल्पना करवत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कमाल आहे...

ही कल्पना मला तरी ५-६ वर्षे माहिती आहे. महाराष्ट्रातील कितीतरी कारखाने कार्बन क्रेडीट विकून महसूल कमवित आहेत.(इन्क्लुडिंग साखर कारखाने)

||वाछितो विजयी होईबा||

कार्बन क्रेडीटचे ट्रेडींग

फिलिपाईन्स मधेही कार्बन क्रेडीटचे ट्रेडींग सुरु झाले आहे. नुसती चर्चा करुन माहितीचे प्रदर्शन करायचे आहे की, त्यात सहभागी होऊन पैका कमवायचा आहे हे ठरवण्याचा अधिकार अर्थातच ज्याचा-त्याचा.

कॅप अँड ट्रेड

मला या घडीस युरोपातील माहीत नाही, पण नव्वदच्या थोडे मागे-पुढे अमेरिकेत, "क्लिन एअर ऍक्ट" च्या संदर्भात (वास्तवीक) प्रदुषण व्यापार कायद्याने चालू झाले - त्याला पोल्यूशन असे न म्हणता "एमिशन ट्रेडींग" म्हणले गेले आहे अथवा "कॅप अँड ट्रेड" असे म्हणले जाते. वरील मूळ लेखात दिल्याप्रमाणे, स्वतःचे एमिशन कमी करा नाहीतर दुसर्‍याने कमी केले आहे त्याला पैसे द्या असा प्रकार. त्यातून आपले पैसे वाचवायला म्हणून का होईना पण उद्योग सुधारतील अशी त्यातून अपेक्षा. दुसरा भाग असा की सरकारी दंड भरायला लावण्यापेक्षा बाजारपेठात एकमेकांकडून सुधारता येते हा त्यातील उद्देश.

याचीच पुढची पायरी हे कार्बन कॅप अँड ट्रेड प्रकरण होते. राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी या जागतिक करारात सामील होण्याची तयारी दर्शवली होती म्हणून सुरवातीस अमेरिकेने हट्ट केल्याने चालू झाले. पण नंतर रिपब्लीकन बहुमत असलेल्या अमेरिकन काँग्रेसमधे ते कधीच होऊ शकले नाही. सगळ्यात मोठा पोल्यूटर देशच करारात नसल्याने पुढे काय होणार असे वाटले. पण करार पुढे गेलाच. ओबामाला पण कॅप अँड ट्रेड आणायचे होते पण तुर्तास तरी ते होऊ शकलेले नाही.

तरी देखील आज अमेरिकेत विविध प्रकारे स्वेच्छेने अथवा विविध राज्यांच्या अंतर्गत कराराने कार्बन ट्रेडींग चालू आहे. त्यात पुर्वेकडील अमेरिकेकडील आणि कॅनडातील राज्ये आहेत तसेच पश्चिमी किनार्‍यावरील अमेरिकेची आणि कॅनडातील राज्ये आहेत. कार्बन डिसक्लोजर प्रॉजेक्ट म्हणून एक मोठा प्रकल्प चालू आहे. वगैरे...

काही विमान कंपन्या आता तिकीटे काढताना तुमच्या प्रवासात किती कार्बन उत्सर्जित होणार हे सांगून त्यासाठी अधिक पैसे मागून ते कुठेतरी दक्षिण अमेरिकेत झाडे लावू वगैरे सांगतात. थोडक्यात कॅप अँड ट्रेड करायचा प्रयत्न करतात अथवा त्यानिमित्ताने स्वतःची जाहीरात करत अधिक पैसे करतात.

आता भारताला होणार्‍या फायद्या संदर्भातः

एखादा आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्याला खास पद निर्माण करुन ह्याबद्दलच्या सर्व कामाला गति देता येऊ शकते.
सरकारी अधिकारी त्यात आणणे म्हणजे एका अर्थी मुळ उद्देशाला मुठमाती देण्यातलाच प्रकार होऊ शकतो. त्यात कायद्याचे स्थान असावे पण कार्यक्रम नीट चालतो का नाही हे पहायला संबंधीत क्षेत्रातील विविध तज्ञांची समिती करावी लागेल - त्यात त्या विषयातील जसे इंजिनियर्स लागतील, तसेच शास्त्रज्ञ, व्यवस्थापन तज्ञ आणि अगदी एखाद - दुसरा पर्यावरण चळवळीतील (ऍक्टीव्हिस्ट) प्रतिनिधी पण वॉचडॉग म्हणून लागेल.

महानगर पालिका व तत्सम महामंडळे ह्यांनी त्यांच्या कार्यभागात येणाऱ्या पाणी, हवा प्रदुषणाशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणून तसे सिद्ध केले तर त्यांना ह्या कार्बन क्रेडीटचा लाभ होऊ शकतो.

तसे बरेच चालू आहे. मात्र त्यात खरे किती आणि खोटे किती हा मोठा मुद्दा आहे. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना "सिद्ध" करण्यासंदर्भातील "सिद्धसाधकाच्या खेळाचा" कंटाळा आला आहे असे पण अशाच व्यक्तींकडून ऐकलेले आहे. वास्तवीक या क्षेत्रात, पैशाचा आणि राहणीमानाचा फायदा होण्यासारखे बरेच काही करण्यासारखे आहे. पण माझा थोडाफार अनुभव सांगतो की "पी हळद हो गोरी" ही मनस्थिती आहे. पैसे मिळवण्यासाठी गुंतवण्याची गरज आहे आणि सुधारणा आणायची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात पायवाट पण न करता रस्ते बांधल्याचे कागदोपत्री सिद्ध करण्याची लागलेली सवय आता जित्याची खोड झाली आहे.

कागदपत्रांची पुर्तता

>>सरकारी अधिकारी त्यात आणणे म्हणजे एका अर्थी मुळ उद्देशाला मुठमाती देण्यातलाच प्रकार होऊ शकतो.>>

तो अधिकारी बाकीच्यांची मदत हवी असेल तर घेऊ शकतो.
नाशिक महानगर पालिकेने नुकताच एक क्रांतीकारी प्रयोग ह्या संदर्भात पुर्ण केल्याचे ऐकले. त्याबद्दल् अधिक माहिती मिळवीत आहे.

>>वास्तवीक या क्षेत्रात, पैशाचा आणि राहणीमानाचा फायदा होण्यासारखे बरेच काही करण्यासारखे आहे.

सहमत आहे.

>>पण माझा थोडाफार अनुभव सांगतो की "पी हळद हो गोरी" ही मनस्थिती आहे. पैसे मिळवण्यासाठी गुंतवण्याची गरज आहे आणि सुधारणा आणायची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात पायवाट पण न करता रस्ते बांधल्याचे कागदोपत्री सिद्ध करण्याची लागलेली सवय आता जित्याची खोड झाली आहे.

-लोकं कागदपत्रांची पुर्तता करण्यास का कंटाळले असावेत ह्याचा अंदाज बरोबर येतो.

कार्बन क्रेडिट

चांगली चर्चा आणि प्रतिसाद. वाचते आहे.

मॉडेस्ट प्रपोजल

मी आता एक नवीन ट्रेडिंगची कल्पना मांडणार आहे.
अण्णा हजारे* हे चारित्र्यवान गृहस्थ म्हणून ज्ञात आहेत. आणि एखादा डॉन हा गुन्हेगार म्हणून ज्ञात असतो.

आता आपण चारित्र्याचे ट्रेडिंग सुरू करूया.
म्हणजे डॉनने गुन्हा केला की तो 'चारित्र्य डेबिट' असेल. पण अण्णांच्याकडे तर 'चारित्र्य क्रेडिट' भरपूरच आहे. मग असे करता येईल.
चारित्र्याच्या क्रेडिटची कुपने (चाक्रेकु) काढायची. अण्णांकडे अशी कुपने जमा होत राहतील. मग डॉन अण्णांकडून चाक्रेकु विकत घेईल. अण्णांनी एकदा उपोषण केले की अण्णांकडे चाक्रेकु पुन्हा जमा होतील. ती त्यांना पुन्हा विकता येतील.

डॉनने समजा एक खून केला तर त्याच्या खात्यात समजा १००० कुपने डेबिट होतील. त्याने अण्णांकडून ५०० कुपने विकत घेतली तर त्याची नेट डेबिट कुपनसंख्या ५०० होईल. त्याने अजून ५०० क्रेडिट कुपन अजून कोणाकडून घेतली तर त्याची डेबिट कुपनसंख्या शून्य होईल.

या नव्या रेजीम मध्ये गुन्ह्याची शिक्षा डेबिट कुपनांच्या बॅलन्सवर अवलंबून असेल. त्यामुळे वरील परिस्थितीत डॉनला कोणतीही शिक्षा होणार नाही. डॉन १००० कुपने मिळवू शकला नाही तर जेवढी कुपने कमी पडतील त्या प्रमाणात शिक्षा होईल (म्हणजे प्रत्यक्षात शिक्षा खून केल्याबद्दल असणारच नाही, तर कुपने मिळवू न शकल्याबद्दल असेल).

आता एखाद्या केसमध्ये डॉन निर्दोष सुटला तर त्याच्याकडे १००० कुपने बॅलन्स राहतील जी तो पुढच्या एका खुनाच्या किंवा ५ मारामार्‍यांच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करू शकेल.

ही कुपने बाजारात फ्रीली ट्रेडेबल असल्याने ही कोणालाही विकता/विकत घेता येतील. त्यामुळे डॉनकडे कुपने शिल्लक नसतीलच तरी तो ती विकू शकेल आणि दिवसा अखेरीस स्क्वेअरऑफ करू शकेल. तसेच क्रेडिट प्रत्यक्ष निर्माण करणार्‍या (प्रामाणिक/सज्जन) माणसांची नेहमीच कमतरता असल्याने कुपने नेहमी चढ्या भावात राहतील आणि सज्जन माणसांना यातून बराच पैसा मिळवता येईल.

* अण्णांचे नाव एक उदाहरण म्हणूनच घेतले आहे. त्यातून अधिक उणे अर्थ काढून धागा भरकटवू नये.

या प्रपोजलवरून हे लक्षात येईल की कार्बन क्रेडिटची स्कीम ही पैसा फेकून प्रदूषण करण्याची मुभा मिळवण्याची मा***द स्कीम आहे. मी जेव्हा कार्बन क्रेडिटची कल्पना प्रथम ऐकली तेव्हा माझ्या मनात असेच विचार आले.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

गिल्ट ट्रेडिंग

मी या ट्रेडिंगविषयी ऐकलं होतं. भारतात एका मावशींनी सांगितलं की त्यांचा जावई कार्बन ट्रेडिंगचं काम बघतो. लोकांना जेव्हा ते कळत नाही तेव्हा त्या सांगतात 'तो धूर विकतो'. मी त्यांना गमतीने म्हटलं, 'नाही नाही, तो धूर नाही, गिल्ट (अपराधी भावना) खरेदी करतो'. थत्तेंचा प्रतिसाद वाचून त्याची आठवण आली.

प्रथम थत्तेंच्या रिडक्शिओ डि अॅब्सर्डम च्या मर्यादा. त्यांनी खुनाचं उदाहरण दिलं आहे त्यामुळे ट्रेडिंगची कल्पना अर्थातच हास्यास्पद वाटते. पण अगदी लहान पातळ्यांच्या गुन्ह्यांच्या बाबतीत असं करायला काहीच हरकत नाही. किंबहुना प्रायश्चित्ताची (शिक्षा नव्हे) कल्पना त्याच धर्तीवर आहे. अनेक अपराध्यांना अमेरिकेत कम्युनिटी सर्व्हिस करायला लावतात. जर समाजातलं पुण्य वाढवायचं असेल तर ही कल्पना राबवायला काहीच हरकत नाही. जेव्हा एखादी राशी नियंत्रित करायची असेल तर ती स्वत:हून नियंत्रित करणाऱ्यांना प्रोत्साहन व अनियंत्रित वाढ करणाऱ्यांना दंड अशी व्यवस्था सर्वच बाबतीत दिसते. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी पहिल्या मुलाला टॅक्स ब्रेक व दुसऱ्याला अतिरिक्त टॅक्स अशा प्रकारच्या उपाययोजना दिसतातच. प्रत्येकाने दहा रुपये वाचवण्याऐवजी, शंभर लोकांनी हजार वाचवले पाहिजेत असा आग्रह ट्रेडिंगच्या कल्पनेमागे आहे. तेव्हा कल्पना उत्तम आहे. कमोडटायझेशन झाल्याबद्दलची तक्रार कळली नाही. जर या कमोडिटायझेशनमुळे तुमच्या सद्वर्तनाबद्दल पैसे मिळणार असतील तर त्यात तत्त्वतः काय वाईट आहे? (ती राबवण्यात काय अडचणी आहेत, हे माहीत नाही)

रस्तेदुरुस्ती परवडत नाही, टोल भरा. कचरा नेण्यास आम्हाला खर्च येतो, वस्तू विकत घेतानाच त्याची भरपाई करा.

हे खर्चच नाहीत असं म्हणायचं आहे का? कोणालातरी ते करावे लागतातच. त्यांना कमोडिटी म्हटल्या अगर न म्हटल्याने फरक पडत नाही. कुठच्या खिशातनं ते वळते करायचे एवढाच मुद्दा आहे.

आता राहिला मुद्दा कार्बन् ट्रेडिंगचा. ते करण्याची गरज आहे का? म्हणजे, कार्बन् मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करण्याची गरज आहे का? यावर मला उत्तर एवढ्यात तरी नाही असं वाटतं. पुढची पन्नास एक वर्षं तरी सर्व जगात आर्थिक, सामाजिक समानता येण्यासाठी भारत, चीन, आफ्रिका यांना ऊर्जा जाळून प्रगती करून घेण्याची गरज आहे. ६०% लोकसंख्येच्या भल्यासाठी ५% लोकांची काहीशी अतिरेकी काळजी बाजूला ठेवावी या मताचा मी आहे. त्यांची गिल्ट आपण घेण्याची गरज नाही. आपल्याला जर त्यातून पैसे मिळणार असतील तर जरूर घ्यावेत. नंतर ते दामदुपटीने भरावे लागत नसतील तरच अर्थात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

सहमत.

कुठच्या खिशातनं ते वळते करायचे एवढाच मुद्दा आहे.

होय, तेवढाच मुद्दा मांडायचा होता.

+१

रिडुक्टियो गमतीदार आहे, पण ग्राह्य नाही.

मर्यादित अशा कुठल्याही मालाच्या खर्चाचा हिशोब केलेला बरा.

फक्त अगण्य असावा इतक्या मुबलक मालाचा हिशोब केला नाही, तर चालतो. (पूर्वी वातावरणातली हवा, समुद्रातले पाणी, कसण्यापूर्वीची पडीक माळरान आणि जंगल-जमीन, धरण्यापूर्वीची सागरी मासळी, उकिरड्यासाठी पडीक जमीन... हे सर्व या प्रकारच्या "मुबलक" मालात मोडायचे. अजूनही सूर्यप्रकाश, वारा, लाटांची ऊर्जा... हे या प्रकारच्या मालाची उदाहरणे आहेत.)

आक्षेप नक्की कशाला?

>>किंबहुना प्रायश्चित्ताची (शिक्षा नव्हे) कल्पना त्याच धर्तीवर आहे. अनेक अपराध्यांना अमेरिकेत कम्युनिटी सर्व्हिस करायला लावतात.

दंड न करता कम्युनिटी सर्विस करायला लावणे यात गुन्हा करणार्‍याला स्वतःला प्रत्यक्ष शारिरिक झळ पोचणे हे अपेक्षित आहे. दुसर्‍याची कम्युनिटी सर्विस विकत घेण्याची मुभा म्हणजे दंडावर सुटका असे पुन्हा होईल.

>>लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी पहिल्या मुलाला टॅक्स ब्रेक व दुसऱ्याला अतिरिक्त टॅक्स अशा प्रकारच्या उपाययोजना दिसतातच.

हे पुन्हा आसपासच्या प्रदेशात होत असेल तर बरे. पण कार्बन ट्रेडिंगची कल्पना एका ठिकाणचे क्रेडिट दुसरीकडे वापरणे ही आहे. म्हणजे जिथे अपत्यसंख्या मुळातच कमी आहे अशा स्वीडन आदि देशातील जोडप्यांकडून अरबांनी क्रेडिट विकत घेणे आणि त्या जोरावर अरबस्तानात पोरवडा वाढवणे असे अपेक्षित आहे.

अमेरिकेसारखे श्रीमंत देश कार्बन क्रेडिट विकत घेऊन भरपूर प्रदूषण करू शकतात आणि पुन्हा कार्बन पॉझिटिव असल्याची टिमकीही वाजवू शकतात. उलट विकसनशील देशांना प्रत्यक्ष ऊर्जावापर कमी करावा लागेल. तरीही ते क्रेडिट विकत घेण्यास पैसा नाही म्हणून नेट कार्बन निगेटिव्ह राहतील. नेट कार्बन निगेटिव्ह आहेत म्हणून जागतिक स्तरावर काही सँक्शनस् आदिंना तोंड द्यावे लागेल. जी शिक्षा होईल ती प्रदूषण केल्याबद्दल नाही तर क्रेडिट मिळवता आली नाहीत म्हणून.

शिवाय प्रदूषण केल्याबद्दल असणारा गिल्ट आणि स्टिग्मा नष्ट होईल ते वेगळेच.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

भरपाई

माझा मुद्दा केलेल्या गुन्ह्याची भरपाई कुणाकडून तरी पुण्य विकत घेऊन करण्याबाबत आहे. म्हणजे एखादा कारखाना कार्बन जाळतो असे असेल तर त्याने स्वतः झाडे लावून क्रेडिट मिळवण्याला उत्तेजन मिळावे. दुसर्‍या कोणीतरी दुसरीकडे लावलेल्या झाडांचे क्रेडिट विकत घेऊन भरपाई करण्याला नव्हे. अन्यथा मोखाड्याच्या जंगलात (आधीच जिथे भरपूर झाडे आहेत आणि जमिनीला किंमत नाही) झाडे लावून त्याचे क्रेडिट विकत घेऊन मुंबईत प्रदूषण वाढवण्याची सोय होते.

असे ट्रेडिंग तात्त्विक दृष्ट्या योग्य आहे असे म्हणायचे असेल तर अण्णा हजार्‍यांचे पुण्य अरूण गवळीच्या गुन्ह्यांशी बॅलन्स करायला हरकत नसावी.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

प्रकार

काही गुन्हे कंपाउंडेबल असतात तर काहींची शिक्षा भोगावीच लागतो.
खुल्या वातावरणात केलेले उत्सर्जन जगभर पसरते, त्यामुळे मोखाडा आणि मुंबई यांच्यात फरक चालेल. अन्यथा, प्रत्येकाला डोक्यावर एक झाड घेऊन फिरावे लागले असते.

प्रत्येक बाबतीत तेच-तेच नियम

+१ सहमत. प्रत्येक बाबतीत तेच-तेच नियम लागू असायला पाहिजेच्त अहे थत्ते ह्यांचे म्हणणे आहे का?

प्र क टा आ

प्र क टा आ

प्र क टा आ

प्र क टा आ
(माफ करा, काहीतरी घोळ होतो आहे इथे माझ्या संगणकात.)

मग जगात सर्वत्र सारखे प्रदूषण का नाही ?

माझ्या अल्प बुद्धिमत्तेला पडलेले एक अल्प प्रश्न.
>> खुल्या वातावरणात केलेले उत्सर्जन जगभर पसरते,
तर मग आफिके मध्ये, अमिरेकात, टुंड्रा प्रेदेशात, चीन मध्ये, आणि इथे मुंबई मध्ये किव्वा पुण्यात प्रदूषण सारखेच असयला हवे नाही का ?
(चला हे मानु, कि प्रदूषण पसरायला काही वेळ लागतो , पण किती?
१ महिना पुरेसा असेल नाही का, )
मग एक महिन्या नंतर का होईना जगात सर्वत्र सारखे प्रदूषण का नाही ?

होय

१ महिना नक्कीच पुरेल असे वाटते. वायूंच्या विसरणाच्या (डिफ्युजन) वेगाचे आकडे मिळाले तर नेमकी आकडेमोड करता येईल. (वार्‍यांच्या परिणामामुळे वेग वाढेल तो वेगळाच.)

प्रदूषण

हा अधिक व्यापक शब्द आहे. सध्या चर्चा चालू आहे ती उत्सर्जित कार्बन डाय ऑक्साइडची. गृहितक असं आहे की जगभर अनेक ठिकाणी झाडं लावली तर ते पुरेसं आहे, प्रत्येक कारखान्याच्या अंगणात जंगल असलंच पाहिजे असं नाही. कारखाने हा सोर्स असेल तर झाडं हे सिंक आहे.

थत्तेंचा आक्षेप अपराधाचं कमोडिटायझेशन होण्याला आहे असं वाटतं. मला वाटतं जर पर्यावरणाचा प्रश्न भावनिक न ठेवता तांत्रिक करायचा असेल तर त्यामागची अपराधी भावना कमी करण्याची काहीतरी व्यवस्था हवी. कार्बन ट्रेडिंगचं फ्रेमवर्क ती पुरवते.

थत्तेंचा मुद्दा गरीब (अप्रगत) राष्ट्रं व श्रीमंत (प्रगत) राष्ट्रं अशी तफावत लक्षात घेतली तर मात्र थोडा जाचक ठरायला लागतो. ज्यांनी आत्तापर्यंत कार्बन हवेत सोडून स्वतःची प्रगती करून घेतली त्यांच्यावरची जबाबदारी टाळण्याचा हा मार्ग आहे का? त्यासाठी भारत, चीन यांसारख्या राष्ट्रांना पुढची काही दशकं सूट मिळणार आहे का? तसं जर नसेल तर मग हा अन्यायाचा मार्ग ठरू शकेल. पण तो अन्याय टाळणं न टाळणं हे कार्बन ट्रेडिंगची व्यवस्था वापरतो की दुसरी कसली वापरतो यावर अवलंबून राहाणार नाही असं वाटतं. (अन्यायच करायचा ठरवला तर मग व्यवस्था कुठची वापरतो हे काहीसं दुय्यम होतं.)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पसरते

>>खुल्या वातावरणात केलेले उत्सर्जन जगभर पसरते, त्यामुळे मोखाडा आणि मुंबई यांच्यात फरक चालेल.

मग आपण शहरात झाडे तोडण्यावर असलेले निर्बंध हटवावे का? त्या ऐवजी कार्बन क्रेडिट दाखवून किंवा मोखाड्याला झाड लावल्याचा पुरावा दाखवून मुंबईत झाडे तोडायला परवानग्या देवू. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ५०-१०० चौ किमी जमीन मोकळी करून घेता येईल. ऑल यू नीड इज इक्विव्हॅलंट कार्बन क्रेडिटस् अर्न्ड बाय प्लॅण्टिंग ट्रीज इन आफ्रिका.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

डिफ्युजन

केवळ कर्बद्विप्राणिल वायूसाठी तसे चालेल (असे वाटते) पण झाडे केवळ प्राणवायूसाठी नसतात.

कन्व्हर्जन

अन्यथा मोखाड्याच्या जंगलात (आधीच जिथे भरपूर झाडे आहेत आणि जमिनीला किंमत नाही) झाडे लावून त्याचे क्रेडिट विकत घेऊन मुंबईत प्रदूषण वाढवण्याची सोय होते.

हे नेहेमीच चूक असेल असं नाही. जर देशात अमुक इतकी झाडं पुरेशी आहेत - त्यांचं भौगोलिक वितरण फारसं महत्त्वाचं नसेल तर मुंबईत कार्बन् जास्त होतो तो मोखाड्याच्या जंगलात शोषला जायला हरकत नाही. हे काहीसं इन्शुरन्स सारखं आहे. मी गाडीने दुसऱ्या गाडीला धक्का मारण्याचं पाप सर्व जण वाटून घेतो.

असे ट्रेडिंग तात्त्विक दृष्ट्या योग्य आहे असे म्हणायचे असेल तर अण्णा हजार्‍यांचे पुण्य अरूण गवळीच्या गुन्ह्यांशी बॅलन्स करायला हरकत नसावी.

मुळात या युक्तिवादात शंभर आंधळ्यांना रस्ता क्रॉस करून दिला तर एक खून माफ अशा प्रकारचं कन्व्हर्जन शक्य आहे हे गृहितक आहे. तुम्हीच असं गुणोत्तर मांडून बघा, म्हणजे यातला प्रश्न लक्षात येईल. वीस जीव वाचवले तर एक जीव घेण्याची परवानगी हे आपण लशींच्या बाबतीत वापरतोच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१ ग्रेट मुद्दा.

---वीस जीव वाचवले तर एक जीव घेण्याची परवानगी हे आपण लशींच्या बाबतीत वापरतोच.
- +१ ग्रेट मुद्दा.
सरकारी हॉस्पिटलात नवशिक्या डॉक्टरांना शिकायला पाठवण्याच्या प्रथेमुळे किती प्राण नंतर वाचतात हे ही आपण जाणतोच.

माझ्या माहीतीप्रमाणे

दुसर्‍या कोणीतरी दुसरीकडे लावलेल्या झाडांचे क्रेडिट विकत घेऊन भरपाई करण्याला नव्हे. अन्यथा मोखाड्याच्या जंगलात (आधीच जिथे भरपूर झाडे आहेत आणि जमिनीला किंमत नाही) झाडे लावून त्याचे क्रेडिट विकत घेऊन मुंबईत प्रदूषण वाढवण्याची सोय होते.

माझ्या माहीतीप्रमाणे क्रेडीट हे जे आहे त्याला मिळत नाही तर जिथे कार्बन उत्सर्जन टाळले जाणार आहे तिथे दिले जाते. ते टाळताना नक्की काय केले याला देखील महत्व असते. केवळ उदाहरणादाखल: उद्या कोणी ठाण्यात भरपूर झाडे लावून ऑफसेटींगच्या नावाखाली पैसे मिळवायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी ठरण्याची शक्यता नाही. पण ठाणे शहर हे सौरउर्जेवर आणि पवनउर्जेवर स्वतःची उर्जा भागवू लागले, अर्थात नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आणि नैसर्गिक साधनावरचा भर कमी करून कार्बन उत्सर्जन थांबवले तर त्यांना क्रेडीट्स मिळतात. अर्थात सूर्य पश्चिमेला उगवतो, उगवू शकतो म्हणत सिद्ध करणारे तसेच मान्य करणारे असतात आणि त्यामुळे त्यातील मूळ उद्देशाचा गैरफायदा घेतला जातो.

क्रेडिट विक्री अन्य ठिकाणी

ठाणे शहराने असे सौर ऊर्जा आदि मार्गाने कमावलेले क्रेडिट विकत घेऊन कुठेतरी कोणीतरी फकाफका धूर काढू शकतो हाच यातला वादाचा मुद्दा आहे.
(क्रेडिट झाडे लावून मिळाले की सौरऊर्जा वापरून हे माझ्या मुद्द्याच्या दृष्टीने गौण आहे).

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

यात ठाणे शहराला पैसे मिळतात ना?

यात ठाणे शहराला पैसे मिळतात ना? हे पैसे मिळाले नसते, तर हल्लीच्या सौर-तंत्रज्ञानाची किंमत मोजून ठाणे शहराला सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे शक्य झाले नसते.

म्हणजे पैशाच्या हिशोबात बघावे, तर धूर काढणार्‍यानेच सौर-ऊर्जा प्रकल्प बांधलेला आहे.

अर्थात हिशोब चोख पाहिजे.

असेच म्हणतो

धनंजयच्या वरील प्रतिसादाशी सहमत. नियंत्रित (रेग्यूलेक्शन) आणि बाजारपेठआधारीत (मार्केटबेस्ड) अर्थव्यवस्था यातील हा फरक आहे. उद्देश असा आहे की यातूनच दुसर्‍याला पैसे देण्याऐवजी उद्योग ते पैसे गुंतवून नवीन तंत्रज्ञान विकसीत करतील आणि परीणामी ते तंत्रज्ञान स्वतःच्या उद्योगात गुंतवून प्रदुषण (येथे कार्बन उत्सर्जन) कमी करतील.

या संदर्भात, माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितलेल्या अमेरिकेतील क्लिन एअर ऍक्टचा झालेला फायदा खालील आलेखात बघता येईलः

(दुवा)
आजही येथे अनेक आंतर्राष्ट्रीय कंपन्या आहेत, ज्यांना अमेरिकेतील नाही तरी युरोप आणि इतरत्र असलेल्या कायद्यांना अथवा स्थानिक कायदे तसे असल्याने बांधील रहावे लागते, त्या अनेक नवीन तंत्रज्ञान विकसीत करत आहेत. शिवाय अनेक लहान उद्योग या क्षेत्रात खूप नवीन तंत्रज्ञान विकसीत करून नवीन धंदा तयार करत आहेत - जे इतर उद्योगांना कार्बन उत्सर्जन कमी करायला लावून त्यांचे पैसे वाचवत आहेत, उर्जा वाचवत आहेत आणि स्वतःचा नफा वाढवत आहेत.

पैसा कोणाचा=काम कोणाचे

माझ्या मॉडेस्ट प्रपोजलमध्येही डिफेक्टिव्हली डॉनच अण्णा हजार्‍यांना समाजकार्यासाठी पैसे देणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात डॉनच समाजकार्य करणार आहे. मग त्याला त्याच्या खुनाच्या गुन्ह्यातून सूट द्यायला काहीच हरकत नाही.

("ट्रेडेबल" क्रेडिटसवर सट्टा खेळणेही शक्य होईल हे सध्या मी सोडून देत आहे)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

बरोबर

बरोबर. तसा तुमचा रेडुक्टियो वाद आहे खरा. पण वाद तसा रिड्यूस होत नाही असे माझे मत वरतीच सांगितले आहे.

तुमच्या रेडुक्टियो मध्ये "काहीतरी अनैतिक आहे" असे अध्याहृत आहे.

मग हे उदाहरण बघा :
"आज प्लंबरने-गवंड्याने संडास बनवावे आणि निघून जावे. त्यावर उद्यापासून बेसुमार दुर्गंधीयुक्त विधी करावे मी. श्रम करणारा तो या वेळी, श्रमाबद्दल पैसे टाकून वेगळ्याच काळी आपल्या दुर्गंधीची विल्हेवाट लावणारा मी."
("झाडे लावायची एकाने एकीकडे, त्याबद्दल पैसे टाकून धूर ओकायचा दुसर्‍याने दुसरीकडे" अशा तालावर.)
हे प्रति-रेडुक्टियो म्हणून घ्या. संडास हा तर माझ्या आणि अनेक ओळखीच्या लोकांच्या अगदी रोजवापरातला आहे. उदाहरण कपोलकल्पित नाही. मात्र पुन्हा-पुन्हा विचार करून वाटत नाही की यात मी व माझ्या ओळखीचे लोक काही अनैतिक करतो आहे.

तुमच्या रेडुक्टियो वादात हा दोष आहे, की मूल्य/किमतीचा हिशोब पूर्णपणे जुळवलेला नाही. "खून" प्रकारच्या मनुष्यघाताची किंमत कोणाच्या पुण्याने देता येत नाही. या आपल्या सर्वांच्या दृढ भावनेच्या मुळाशी "किंमत पुरेशी नाही" असे आहे. मात्र तुम्ही "किंमत पुरेशी नाही" असा निष्कर्ष न काढता "व्यापार अनैतिक आहे" असा निष्कर्ष काढता.

त्या रेडुक्टियोमध्ये आणखी एक तपशील हरवलेला आहे - तो म्हणजे पापकर्मातून अन्य सुखावह उत्पादन होते का? हा तपशील. तुमच्या उदाहरणातील खुनातून आनुषंगिक सुखावह उत्पादन होत नाही. मात्र भकाभका धूर ओकणार्‍या कारखान्यातून वीज, पोलाद, वगैरे सुखावह उत्पादने होतात.
(मुळात स्विफ्टच्या मॉडेस्ट प्रोपोझलमध्ये अन्नपुरवठा, बाळांच्या आयांना पौष्टिक आहार, वगैरे, आनुषंगिक उत्पादन होत होते. स्विफ्टचा विचारप्रयोग अधिक सयुक्तिक मांडलेला आहे.)

- - -
(हजारे/खुनी) तुमच्या उदाहरणात मनुष्यघाताच्या ऐवजी प्राणिहत्या घेऊया.
कुरणात बकरे-बकर्‍यांचे काळजीपूर्वक संवर्धन करणार धनगर.
शहरातल्या खाटिकबाजारात बकर्‍यांचे रक्त सांडणार खाटीक. धनगराला पैसे दिले म्हणून या प्राणिहत्येला सूट द्यायला पाहिजे. (मात्र येथे आपण "ठीकच तर आहे" म्हणतो. "भलतेच!" असे म्हणून व्यापार बंद करत नाही.) खाटिक करतो त्या रक्तपातापासून मनुष्यांकरिता अन्न प्राप्त होते. त्याची आपल्याला गरज असते. मग खाटकाच्या प्राणिहत्येचा समतोल वेगळ्याच कुठल्या धनगराकडून केलेल्या पशुसंवर्धनाने लावतो.

पुन्हा गरज-किंमत वगैरे हिशोब चोख करावा लागतो. मांसाहारी अन्न मिळते, आणि धनगरालाही पैसे दिले, म्हणून काही जनावरांना चाबकाने फोडून मारता येत नही - त्या क्रूरपणाची किंमत मिळणार्‍या अन्नापेक्षा अधिक असते, पशुसंवर्धनासाठी शुल्क देऊन चुकवता येत नाही.

रूपक

माझ्या उदाहरणात खून हे रूपक वापरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला बहुधा. जीविताची किंमत ठरवता येत नाही हे खरे. पण इतर खुना खेरीजच्या गुन्हयांना हे तत्त्व लागू करावे का? हातभट्टीलावणे, जुगाराचे अड्डे चालवणे.

तुमच्या मुतारीचे उदाहरण माझ्या रूपकाशी सुसंगत नाही. तुम्ही पैसे देऊन मुतारी स्वच्छ करून घेता. दुसरीकडची मुतारी स्वच्छ करण्याबद्दल पैसे देऊन तुमची मुतारी अस्वच्छ ठेवण्याची मुभा घेत नाही. मी पुण्याची एक मुतारी स्वच्छ ठेवण्याचे पैसे दिलेत म्हणून ठाण्याची मुतारी घाण केली तरी मी दोषमुक्त होऊ शकतो असे आपल्याला मान्य नसते/नसावे.

खाटिक गुराखी उदाहरण बरे आहे. पण मग डॉन-अण्णा स्कीमपण (खून सोडून) चांगली आहे. केपीएस गिल यांनी पंजाबचा प्रश्न सोडवण्यात महत्त्वपूर्न भूमिका निभावली - मोठा नरसंहार टाळला-म्हणून त्यांनी एका स्त्रीच्या पार्श्वभागावर चापटी मारल्याच्या गुन्ह्यातून त्यांना मोकळे करून टाकावे. (चापटी मारण्याचा आनंद मिळाल्यानेच त्यांना पंजाबी अतिरेक्यांची लढण्याचा हुरूप आला असावा).

स्विफ्टच्या सारखी प्रतिभा नसल्याने गोंधळ झाले असतील.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

कॅप अँड ट्रेड मधे रुपक चुकते.

उदाहरण म्हणून दोन कंपन्या/उद्योग/प्रोसेसेसच गृहीतकात धरू. त्यांच्या एकूण कामामुळे होणारे कार्बन उत्सर्जन हे अ चे १०० आणि ब चे १०० असे एकूण २०० युनिट्स आहे. प्रांत/देश/--- धोरणाप्रमाणे कार्बन उत्सर्जन हे प्रत्येकी ७० युनिट्सपर्यंत खाली जायला हवे असे अपेक्षित आहे. म्हणजे एकूण १४० झाले पाहीजे. तसे आम्ही करू हे स्वयंस्फुर्तीने मान्य करून करारावर सह्या केल्या आहेत. आत्ताच्या प्रोसेसेस एकदम बदलणार नाहीत आणि त्यात प्रत्यक्ष काहीच गैर नाही मात्र दूरगामी परीणाम भोगावे लागू शकतात इतकेकरारातील सगळ्यांनी मान्य केलेले आहे.

आता "अ" बदल करत नाही/करू शकत नाही, परीणामी १००च युनिट्सच राहीले. त्याउलट "ब" ने मात्र नवीन तंत्र आणले/आणू शकला/प्रोसेस बदलू शकला आणि १०० वरून ते एकदम ४० वर नाही पण अगदी ६० पर्यंत खाली आले. अर्थात एकत्रित १६० झाले आणि ब चे स्वतःपुरत्या गरजेपेक्षा १० ने अधिक कमीच झाले आहे. म्हणून "ब"जास्तीचे कमी झालेले १० युनिट्स "अ" ला विकतो.

गुन्ह्यांच्या बाबतीत हे तत्वतः शून्यच असायला हवे. तिथे असा करार नसतो की डॉन अथवा अगदी पोलीसांनी पण एन्काउंटरच्या नावाखाली, या वर्षात एकूण १०० मारले तर चालतील कारण त्यामुळे गेल्या वर्षीच्या २००पेक्षा हा आकडा १०० ने कमी येणार आहे, एकालाही चुकून देखील मारू नये असेच अपेक्षित असते. तसे झाले नाही आणि पकडले गेले तर कायद्याने शिक्षाच होणार, झाली पाहीजे.

शंका

२ पॉईंटस्

१. ट्रेड ऑफ लोकली करायचा आहे की ग्लोबली? (कार्बन उत्सर्जन एकूणात कमी झाले तरी चालते असे आहे का यावर काही प्रकाश टाकता येईल का?)
२. क्रेडिट विकत घेतले की "मी पण प्रदूषण कमी करण्याला हातभार लावला" असे तो म्हणू शकतो.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

उत्क्रांत

ट्रेड ऑफ लोकली करायचा आहे की ग्लोबली? (कार्बन उत्सर्जन एकूणात कमी झाले तरी चालते असे आहे का यावर काही प्रकाश टाकता येईल का?)

एकूणच ह्यावरील धोरण हे इतर कुठल्याही प्रदुषणासंदर्भातील धोरण/कायद्यापेक्षा जागतिक लागणार आहे. इतर कायदे (आधी सांगितलेला क्लिन एअर ऍक्ट वगैरे) स्थानिक देश/प्रांतापुरते मर्यादीत असू शकतात. अर्थातच त्यामुळे इतर कुठल्याही धोरणाप्रमाणेच हे धोरण देखील पूर्ण झालेले नसून उत्क्रांत होत आहे. जागतिक पातळीवर कॅप अँड ट्रेड हे ज्यांनी करारावर सह्या केल्या त्या राष्ट्रांपुरते मर्यादीत आहे. म्हणून एखाद्या अमेरिकन कंपनीला तत्वतः त्याचा फायदा घेता येत नाही. तसेच आमच्या भागातील ६-७ राज्ये आणि बाजूला लागून असलेली कॅनडातील राज्ये यांच्या मधे देखील असाच करार केवळ औष्णिक प्रकल्पापुरता मर्यादीत आहे. तेथे देखील असेच त्यांच्यापुरते मर्यादीत चालते. मग त्या संदर्भात बॉस्टनमधील एखादा औष्णीक वीज प्रकल्प हा भारतात झाडे लावून पापक्षालन करू शकणार नाही. फारतर कॅनडात दुसर्‍या कंपनीकडून घ्यावी लागतील जिच्याशी धंद्यात स्पर्धा असू शकेल.

या व्यतिरीक्त असेच एक स्वयंस्फुर्तीने चालणारे "शिकागो क्लायमेट एक्सचेंज" आहे ज्यात सहभागी असलेल्या कंपन्यांना असे ट्रेडींग शेअरबाजाराप्रमाणे करता येते. अजून खूप काही असेच...

क्रेडिट विकत घेतले की "मी पण प्रदूषण कमी करण्याला हातभार लावला" असे तो म्हणू शकतो.

कॅप अँड ट्रेड संदर्भात सगळे सिद्ध केले (ऑडीट केले) की एकूण कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावला हे त्या करारापुरते असतेच. अर्थात हा मार्केटींगचा देखील भाग झाला जो अनेक कंपन्या विविध प्रकारे करत असतातच, कॅप अँड ट्रेड असो अथवा नसोत. कॉर्पोरेट सोशल रीसपॉन्सिबिलीटी मधे जसे आम्ही "गूड् कॉर्पोरेट सिटीझन्स" आहोत हे दाखवले जाते तसेच "सस्टेनेबिलीटी रीपोर्टींग" आणि तत्सम प्रकारातून पर्यावरण मित्र म्हणून दाखवले जाते. त्या साठी पण आता सिस्टीम्स तयार झाल्या आहेत आणि ऑडींटींग पण असते. अर्थात तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो.

बिझनेस आणि नोक-या

वरील काही प्रतिसाद वाचता असारासार विचारबुद्धी उफाळून वर आल्याचे स्पष्ट दिसते. काही विधाने बेसलेस आहेत. ठण्ठणपाळ ह्यांनी सकाळवरील एक बातमी जशीच्यातशी टाकली.
मराठी माणसे नोकरीत तरबेज. पण त्यांनी हे समजून् घ्यायला हवे की, ते ज्या ठिकाणी नोकरी करतात ती कंपनी, कार्यालय वर्षानुवर्षे सतत फायद्यात राहण्यासाठी "बिझनेस" करावा लागतो. नाहीतर पगारात वाढ कशी होणार?
प्रगत देशातील मनुष्यबळ व इतर खर्च इतका जास्त आहे की, त्यांना जेथे तेच काम कमी खर्चात करणे शक्य असेल तर करावेच लागते. - कारण कोणत्याही धंद्याचा मुख्य हेतू फायदा कमावणे हा असतो. (हे काही नवे तंत्र नाही, टाटाच्या एका कंपनीला पार्ट्स् सप्लाय करणा-या हजारो कंपन्या पुण्यात आहेत. जो आंतर्देशीय आऊटसोर्सिंगचाच प्रकार)

काहींनी आज कार्बनचे ट्रेडींग, उद्या आणखी कशाचे? आणि हे सगळे योग्य नाही असा एक गमतीशीर सुर लावला आहे. खरे म्हणजे कशाचेही ट्रेडींग व्हायला काय हरकत आहे? त्यामुळे "व्हाट इज इन इट फॉर मी?" ला महत्व देणारे लोक ह्यात काहीतरी आहे म्हणून सहभागी तरी होतील. दुसरे असे की, बिझनेस वाढला की, नोकर्या उपलब्ध होतात, त्या कोणीतरी निर्माण कराव्याच लागतात. भारताची इतकी लोकसंख्या व त्यांना असलेले उपजीवीकेची साधने ह्यांचा ताळमेळ कसा लागणार. नाहीतर एकीकडे आयटी आऊटसोर्सिंगला हमालीकाम म्हणून हिणवायचे आणि दुसरीजकडे स्वतःच्या घरातील काहींना त्या नोकर्या लागल्या की आनंद होणे साहजिक मानायचे हे चालत राहते. म्हणून जर आग जरी रामेश्वरी लागली असेल तर बंब त्यांनी सोमेश्वरी पाठवला तर चालेल- इकडे पाणी हवे आहे.

नियमावली कायमच्या अशाच राहतील असे मानण्याचे कारण नाही.

सध्याच्या नियमावली कायमच्या अशाच राहतील असे मानण्याचे कारण नाही. कुठेतरी सु्रुवात होणे गरजेचे असते. ते ह्यानिमित्ताने झाले आहे. शेवटी चुकामधून शिकणे हा स्थायीभाव आहे आणि होणाऱ्या चुका आजपावेतो प्रदुषणाने जितक्या झाल्या आहेत त्यापेक्षा निश्चितच कमी भेसूर असाव्यात असा अंदाज आहे- कारण त्या फारतर आर्थिक स्वरुपाच्या असतील. तसे पाहिले तर आता जे चालले आहे ते तसेच चालू देणे हे धोकादायक आहेच. विरोध झाला की, हितसंबंध आड येतात. मग मुंबईत प्रदुषण होते आहे आणि झाडे मात्र दुसरीकडेच लावली जाताहेत ह्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत महत्वाचा बदल असा आहे की, झाडे लावले जाताहेत, आणि माझ्या दृष्टीने हे फार महत्वाचे आहे.

झाडे?

जी मंडळी अशा प्रकल्पांना फंडींग करत आहेत, त्यांच्या दृष्टीने झाडे लावणे हा सगळ्यात वेळखाऊ प्रकार आहे. त्यापेक्षा प्रदुषणच न होऊ देणे हे सगळ्यात महत्वाचे मानून त्यानुसार उपाययोजना सुचविल्या जात आहेत.

अजून एक उदाहरण

देवाला श्रावण क्रेडिट चालेल काय? (या प्रतिसादाचाही जीवित/मृत व्यक्ति/विभूतींशी दूरान्वय नाही, संबंध सापडल्यास तो योगायोग समजावा.)

 
^ वर