लसींचा वारेमाप वापर - कोणाच्या हितासाठी

प्रस्तावना- डॉ अनंत फडके हे लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते असुन जनाआरोग्य अभियानाचे समन्वयक आहेत. रुग्णहक्क चळवळ व वैद्यकीय क्षेत्रात जनजागृतीचे काम गेली अनेक वर्षे करतात. ते स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांचे काही लेख इथे चर्चेच्या प्रस्तावासाठी घेत आहे. सदर लेखांच्या उपक्रमावरील प्रसिद्धीसाठी त्यांची पुर्वपरवानगी घेण्यात आली आहे. anant.phadke@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.खर तर त्यांना उपक्रमाचे सदस्य होण्याची विनंती देखील केली आहे.

लसींचा वारेमाप वापर - कोणाच्या हितासाठी?

                                      डॉ. अनंत फडके

     आधुनिक औषधांपैकी लसी हे सर्वात गुणकारी 'औषध' आहे कारण त्याने आजारच टळतो. आपला आहार, घरातील व बाहेरील स्वच्छता यामुळे जरी मुख्यतः जंतुजन्य आजार टळत असले, तरी त्याला पूरक म्हणून लसींचा वापर अतिशय फलदायी असतो. मात्र लसींचा भरमसाठ वापर केला तर तोटा होऊ शकतो. असा वारेमाप वापर करायची प्रथा औषध कंपन्यांच्या प्रभावाखाली वाढली आहे. 'पल्स पोलिओ' कार्यक्रमाअंतर्गत पोलिओ लसीचा तसेच काही  खाजगी डॉक्टर्स करत असलेला नव्या लसींचा वारेमाप वापर जनतेच्या हिताचा नाही. लसीकरणाचा हा वारेमाप, आपमतलबी वापर रोखण्यासाठी डॉ. मित्तल, डॉ. पुलियल हे बालरोग तज्ज्ञ, काही सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, आरोग्य मंत्रालयाचे माजी सचिव, डॉ. के. बी. सक्सेना व आरोग्य चळवळीतील काही डॉक्टर-कार्यकर्ते यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.  त्याची पार्श्वभूमी पाहूया.

'लसजन्य पोलिओ' मध्ये वाढ!

     'साबिन'  या शास्त्रज्ञाने शोधलेली तोंडावाटे द्यावयाचे थेंब या स्वरूपातील पोलिओ लस भारतात 1988 पासून राष्ट्रीय लसीकरणाच्या कार्यक्रमात दिली जाते.  भारतात 1988 मध्ये पाच वर्षाखालील 24,257 बाळांना पोलिओमुळे पंगुत्व आले. लसीकरणामुळे हे  प्रमाण  1994 पर्यंत 80% नी म्हणजे 4,793  पर्यंत उतरले. पण फक्त 60% बाळांपर्यंतच साबिन-लस तेव्हा पोचत होती. ती सर्व बाळांना पोचवण्याचे उद्दिष्ट गाठून पोलिओजन्य पंगुत्व बहुतांश संपुष्टात आणता आले असते.  पण देवीप्रमाणे पोलिओचे निर्मूलनच करायचे;  कुपोषण, सार्वजनिक अस्वच्छता यांवर मात न करताही पोलिओचे विषाणू चारसहा वर्षांतच इतिहासजमा करायचे असा अट्टहास काही तज्ज्ञांनी धरला. तो मुख्यतः पाश्चिमात्य कंपन्यांच्या हितासाठी,  जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रभावाखाली!      साबिन लसीमुळे दर 40 लाख डोसमागे एक या दराने 'लसजन्य पोलिओ' होतो हे लक्षात न घेता पोलिओ-निर्मूलनाच्या मृगजळामागे धावत साबिन लसीचे डोस 'पल्स-पोलिओ' मोहिमेमार्फत प्रचंड वाढवले. त्यामुळे 'नैसर्गिक पोलिओ' मुळे  पंगुत्व येणाऱ्या बाळांची संख्या वर्षाला 50 च्या खाली जरी आली, तरी दुसऱ्या बाजूला  'लसजन्य पोलिओ'मुळे   पंगू होणाऱ्या बाळांचे प्रमाण वाढले. तज्ज्ञांच्या मते सध्या ते वर्षाला सुमारे 200 ते 300 झाले आहे. 'राष्ट्रहितासाठी' पंगुत्व पदरात पडलेल्या या अभागी बाळांचे पुनर्वसन करा व त्यांच्या पालकांना नुकसानभरपाई द्या व पल्स-पोलिओ कार्यक्रमाचा पुनर्विचार करा अशी 'जनस्वास्थ्य अभियान' ने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

      साबिन लसीमुळे होणाऱ्या पोलिओकडे सरकारने दुर्लक्ष केले तरी या ''साबिन लसीमुळे होणारा  पोलिओ टाळण्यासाठी आम्ही बाळांना इंजेक्शनवाटे वेगळी लस देतो'' असे म्हणून आता खाजगी डॉक्टर्स 'साल्क' पोलिओ-लस देतात. पण एका इंजेक्शनला 400-500 रु. देऊ शकणाऱ्या  मध्यम/श्रीमंत थरातील पालकांच्या बाळांना  लसजन्य पोलिओ झाल्याचे ऐकिवात नाही! कुपोषण, अस्वच्छता या पार्श्वभूमी असलेल्या गरीब थरातील बाळांना लसजन्य पोलिओ होतो.

            2000 सालापर्यंत पोलिओ-निर्मूलन होणार होते. ते अजून झालेले नाही. उलट साबिन लसीच्या या अतिरेकामुळे अनपेक्षितपणे दुसराच मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. 'तात्पुरता लुळेपणा' येणाऱ्या बाळांचे प्रमाण 1998 ते 2009 या काळात 9461 वरून 50,371 पर्यंत (पाच पट) वाढले! (पहा  www.npspindia. org हे अधिकृत संकेत स्थळ.) ही वाढ म्हणजे केवळ संख्याशास्त्रीय गोष्ट आहे; प्रत्यक्षात एवढी बाळे कायमची पंगू होत नाहीत अशी अधिकृत भूमिका आहे. पण  2006, 2007 सालासाठी उत्तर प्रदेशातील  अशा बाळांचा पाठपुरावा डॉ. जेकब पुलियल या बालरोग तज्ज्ञाने 'माहितीचा अधिकार' मार्फत केल्यावर कळले की  यांपैकी  40% बाळांना कायमचे पंगुत्व आले होते!

     काही  बालरोग तज्ज्ञ अयोग्य प्रभावाला बळी पडल्यामुळे  लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम बदलण्याचे दुसरे उदाहरण म्हणजे 'हेपॅटायटिस बी' लसीचा राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश. देशातील 3% पेक्षा जास्त जणांना हेपॅटायटिस बी च्या विषाणूंची दीर्घकालीन लागण झाली तर सर्व नवजात बाळांना ही लस टोचावी अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस होती. चुकीची आकडेवारी देऊन काही  'तज्ज्ञ' मांडत राहिले की भारतात हे प्रमाण 3%पेक्षा जास्त आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रसिध्द ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ एस. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने सर्व सर्वेक्षणांचा आढावा घेऊन हे प्रमाण  1.60%  इतके आहे असा  निष्कर्ष काढला  तरी  त्याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करण्यात आले!

नव्या लसींचा मतलबी वापर

     आता इतर नव्या लसी भारतातही बाजारात आल्या आहेत. त्यांतील काहींबद्दल प्रश्नचिन्हे आहेत. उदा. न्युमोनियाविरोधी लसीच्या ज्या  संशोधन निबंधाचा दाखला देऊन तिची शिफारस केली जाते त्यात आढळले की  या लसीने फक्त 25% मुलांना न्युमोनियापासून संरक्षण मिळाले व मृत्यूचे प्रमाण 5% नी कमी  झाले.  मात्र ही लस दिलेल्या मुलांमध्ये दम्याचे प्रमाण जवळ जवळ दुप्पट झाले. भारतात मुळात न्युमोनियाने मृत्यूचे प्रमाण 1%च आहे. शिवाय  न्युमोनियाच्या जिवाणूंच्या उपप्रकारांपैकी भारतात फक्त53% उपप्रकारांपासूनच ही लस संरक्षण देते.हे  सर्व लक्षात घेता पुरेसे  संशोधन झाल्याशिवाय या लसीचा वापर करणे  शहाणपणाचे  नाही. समजा, बाळाला न्युमोनिया झाला तर  औषधाचा खर्च  सहसा 30 ते 50 रु. येतो. (साध्या औषधांना दाद न देणाऱ्या थोडया केसेसचा अपवाद वगळता) मात्र लसीकरणाचा खर्च 16 ते 30 हजार रु. येतो!

     'हिब (Hib) जिवाणूमुळे मेंदू-आवरणाला सूज' (Hib meningitis) या गंभीर आजारापासून चांगले संरक्षण देणारी लस उपलब्ध आहे. पण  जी कोणती प्रभावी, निर्धोक लस निघेल ती प्रत्येक बाळाला टोचायची असे नाही. त्या आजाराचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम, लसीचा खर्च यांचाही त्या लसीचा, विशेषतः राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश करताना विचार करायला हवा. लाखो बाळांना ही लस टोचल्यावर जेवढे मृत्यू, आजारपणे टळतील त्यावरून बाळाचे एक वर्ष आयुष्य वाचवण्यासाठी किती खर्च येतो ते काढायला हवे व इतर लसींची त्यासोबत तुलना करायला हवी. पण 'राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट'  या तज्ज्ञांच्या गटाने असा हिशोब न मांडताच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करायची शिफारस केली!  भारतातील मान्यवर संशोधनात आढळले आहे की भारतात या आजाराचे प्रमाण खूप कमी, म्हणजे दर लाख बाळांमागे केवळ 7 आहे (पाश्चिमात्य देशात ते 109 आहे) याकडेही या 'तज्ज्ञांनी' साफ दुर्लक्ष केले!  त्यामुळे  संबंधित कंपन्यांच्या 'प्रभावाखाली' ते आहेत का हे तपासायला हवे. कारण जगभरचा, जागतिक आरोग्य संघटनेबाबतचाही  अनुभव सांगतो की अशा कमिटयांवर कधीकधी मतलबी तज्ज्ञ पेरलेले असतात.

     धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प यांच्यापासून संरक्षण देणारी 'ट्रिपल' लस सरकारी कार्यक्रमात मोफत तर बाजारात 15-20 रु. ला मिळते. त्यातील 'डांग्या खोकला' वरील लसीमुळे इंजेक्शनची जागा सुजून 1-2 दिवस ताप येतो. त्यावर साधे क्रोसिनचे औषध दिले की काम भागते. पण असा त्रास होणार नाही अशी 'बिनदुखरी' लस निघाली आहे. पण ती फार  महाग म्हणजे 1300 रु. ला आहे!  अनेक डॉक्टर्स पालकांना स्पष्ट सांगत नाहीत की या 'बिनदुखऱ्या' लसीचा दुसरा कोणताही फायदा नाही.

     वर निर्देशित नव्या, महागडया लसींच्या वापराला शास्त्रीय पाया नसूनही त्यांचा वापर वेगाने वाढतो आहे कारण या लसी देण्यात डॉक्टरांना विनासायास कमाई होते. या नव्या लसी औषध दुकानदारांमार्फत न विकता औषध कंपन्या थेट डॉक्टरांना चांगला डिस्काऊंट देऊन विकतात. डॉक्टरांनी लस टोचण्याचे शुल्क व औषध-विक्रीवर दुकानदारांना मिळणारा नेहमीचा 15% नफा घेणे ठीक आहे. पण अनेक डॉक्टर्स त्यापेक्षा जास्त शुल्क आकारून  नफेखोर औषध-कंपन्यांच्या पंगतीला जाऊन बसतात. बहुसंख्य रुग्णांना लसीची किंमत माहिती नसल्याने व पालक असहाय्य असल्याने या नव्या लसींबाबत पालकांना अकारण किती भुर्दंड बसतो ते सोबतच्या तक्त्यावरून लक्षात येईल. 'डॉक्टरांची लसीकरणाबाबतची कन्सल्टेशन फी' असे म्हणून या जादा फीचे समर्थन केले जाते. पण प्रत्यक्षात लसीबाबत दरवेळी सल्लामसलत होत नाही.  मुळातच लसीच्या छापील वेळापत्रकानुसार 'ज्याला परवडेल त्याला'  या 'तत्त्वा' नुसार या लसी दिल्या जातात.  हे सर्व लक्षात घेता डॉक्टरांच्या संघटनांनी भूमिका घ्यायला हवी की डॉक्टरांनी वेष्टनावर छापलेल्या  पेक्षा जास्त किंमत आकारू नये; 'कन्सल्टेशन'ची वेगळी पावती द्यावी. दुसरे म्हणजे डॉक्टरांना मिळणाऱ्या डिस्काऊंटचा पालकांना फायदा करून देण्याचे काम डॉक्टरांच्या संघटना, धर्मादाय इस्पितळे यांनी करावे. ही अपेक्षा अवाजवी आहे का?

    पालकांना अकारण पडणारा भुर्दंड

क्रमांक

 

लसीचा प्रकार

 

डॉक्टरांना पडणारी
किंमत (रु.)

 

वेष्टनावर लिहिलेली
किंमत (एम.आर.पी.) (रु.)

 

पालकांकडून घेतले जाणारे शुल्क (रु.)

 

1)

 

वेदनारहित, डी.पी.टी.लस

 

717

 

1220

 

1300

 

2)

 

हेपॅटायटिस बी

 

32

 

45

 

100

 

3)

 

हिब मेंदूज्वर

 

245

 

410

 

550 ते 600

 

4)

 

पेंटॅ लस (बिनदुखरी ट्रिपल + हेप.बी+हिब मेंदूज्वर)

 

1308

 

1735

 

2000 ते 2600

 

5)

 

पोलिओ इंजेक्शन

 

250

 

395

 

400 ते 600

 

6)

 

गोवर

 

36

 

45

 

250 

 

7)

 

गोवर, गालगुंड, रुबेला (MMR)

71

 

87

 

400 

 

8)

 

हेपॅटायटिस ए

 

795

 

906

 

1000

 

9)

 

कांजिण्या

 

1055

 

1430

 

1500

 

10)

 

रोटा डायरिया

 

807

 

999

 

1500

 

11)

 

न्युमोनिया

 

3070

 

3801

 

4000 ते 7500

 

12)

 

फ्लूविरोधी

 

449

 

580

 

1500

 

 

-------------------------------------------------------------------------------लोकसत्ता मधे पुर्वप्रकाशित

लेखनविषय: दुवे:

Comments

पैशाचा हावरेपणा कमी करणारी लस शोधून काढायाला हवी.

वाईट गोष्टीवर हल्ला करायचा असेल तर तो गमिनिकाव्यानेच करायला हवा. 'आर्थिक लफडेबाजी' बाबतीत सामान्य जनता आवाज उठवू शकत नाही. लसींच्या नावाने जास्त पैसा उकळला जातोय, हे कळूनही कोणीही त्या विरोधात बोलणार नाही. आपल्या बाळाला काहि झाले तर...? हा प्रश्न नेहमीच सतावत राहिल. त्या ऐवजी, 'फक्त ज्या लसी अनावश्यक आहेत, व ज्या आवश्यकता असेल तेंव्हाच व त्याच बाळांना दिल्या जाव्यात' ह्या बाबी लोकांसमोर यायला हव्यात.

कारण देशातील बहुसंख्य लोक हे मध्यमवर्गीय आहेत. त्यातील शहरातील मध्यमवर्ग जसा वागतो तसाच ट्रेंड सगळीकडे पसरतो. शहरातील मध्यमवर्गीय हे बहुतेककरून नोकरी पेशातील आहेत. व त्यांना औषधाची बिले ते ज्या आस्थापनात काम करतात, तिथून त्याचे पैसे मिळतात.

दुहेरी कावा

केवळ लसींचा अनाठायी वापर करण्याचेच नव्हे, तर देशातील लस उत्पादक कारखाने बंद करून परदेशी कंपन्यांचे उखळ पांढरे करण्याचाही डाव सरकारने राबविला आहे. आरोग्य सेनेने मागे याविरोधात आवाज उठविला होता, त्याची एक बातमी दिली होती. आरोग्य सेनेकडे माणसं नाहीत व इतरांना गम्य नाही, असा हा मामला आहे. जन आरोग्य अभियानाने मागे असे चांगले मुद्दे उलले होते. पण दुर्दैवाने पुढे काही घडत नाही.

वाईट वाटले

विषय चिंताजनक आहे. मात्र समजा ही आकडेवारी अगदी सगळ्यांपर्यंत पोचली तरी यासंबधी लोकांचा दबाव येणे कठीण आहे. कारण आकडे फसवे असावेत.. म्हणजे खोटे नव्हेत पण जी मुले लशीमुळे पांगळीबनत आहेत ती समाजाच्या कोणत्या गटातील आहेत? जर तो गट विस्कळीत (असंघटीत) असेल तर या प्रश्नावर सध्याच्या व्यवस्थेत आपणहून विचार होणे / निर्णय होणे दिसत नाहि.

खरंतर अश्यावेळी सामाजिक संस्थांची गरज आहे. ह्या प्रश्नावर जनहित याचिका, राष्ट्रपतींना निवेदन वगैरे मार्गांनी अधिक परिणामकारक लढा देता येईल असे वाटते.

अवांतरः लस नाहि पण ड्रग्जमुळे विविध चार व्यक्तींचे बदलल्या आयुष्यावाचा Requiem for a Dream (2000) हा बर्स्टिनबाईंचा अतिशय सुंदर अभिनय असलेला चित्रपट आठवला. यात ह्या बाईंचे डायटिंगसाठीच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे / त्यातील असलेल्या ड्रग्जमुळे तसेच एकटेपणा यांच्या एकत्रपरिणामामुळे बदलेले जीवन आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

विचार करण्यालायक - अधिक माहिती मिळाल्यास हवी

विचार करण्यालायक - अधिक माहिती मिळाल्यास हवी.

(www.npspindia.org वर माहिती सहज मिळाली नाही.)

लसीकरण

लसीकरण या विषयावर उलट सुलट वाचायला मिळते. काहीजण कुठल्याही लसीकरणाविरुद्ध असतात. ते लसीकरणाचे तोटे सांगत असतात. पोलिओ लसीकरणाविरुद्ध याविषयी जास्त वाचायला मिळते. http://www.whale.to/vaccines/chatterjee.html
http://www.skepdic.com/antivaccination.html. पोलिओ लसीकरण मोहिम ही ग्राहकांसाठी पूर्णपणे फुकट असल्याने त्यवर व्यावसायिकतेच्या गैरप्रकाराचा आरोप फारसा असू नये.

वरील लेख लसीकरणाच्या पूर्णपणे विरुद्ध नाही. हा लेख लोकसत्तेत आला होता तेव्हा मी संकेतस्थळाला भेट देऊन काही माहितीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला होता पण फारसे काही हाती लागले नाही. पोलिओच्या प्रादुर्भावाचा नकाशा मात्र भावला. लसीकरणाचे निश्चित तोटे असतात. त्यापैकी काही प्रत्येकाला भोगावे लागतात तर काही, काही काही जणांना. एक गेमथिअरीतील उदाहरण याबाबतचे आहे. समजा असा रोग उद्भवला की ज्यामुळे समाजातील ५० टक्के लोक मृत्युम्हुखी पडणार आहेत. त्यावरची लस घेतली तर समाजातील १० टक्के लोक मृत्युमुखी पडतील (लसीमुळे). तर अशाची लसीकरण मोहिम राबवावी का?

आता व्यावसायिकतेबद्दल. दिलेल्या तक्त्यातील माहिती वाचली तर. साधारण २० ते ४० टक्के विक्रेत्याचे मार्जिन दिसते. अशा पद्धतीच्या अन्य वस्तुंमधे (कमी उलाढालीतल्या) अशीच आकडेवारी दिसते. (पुस्तक विक्रेत्यास ३०-४० टक्के मिळतात.) त्यामुळे हे आकडे चिंताजनक नाहीत.

प्रमोद

लसीन्चा वापर्

माझा लेख अर्थातच लसीकरणाच्या विरुद्ध नाही.
मी npsp.org या सन्केत् स्थलाला आत्ताच् भेत् दिली. तिथे २००९ व २०१० ची आकदेवारी आहे.
मार्जिन जास्त् आहे असे मी म्हतलेले नाही. कम्पन्या थेत् dr.ला लस विकतात. त्यामुले अकारन लस देन्यात dr. ना रस निर्मान होतो असे माझे म्हनने आहे.
अनन्त

स्वागत

उपक्रमावर स्वागत.
असेच लेख/प्रतिसाद येत राहोत.

बाकी.
तुमचा लेख लसीकरणाविरुद्ध नाही हे मान्य.

डॉक्टरीपेशातल्या आमिष/सहेतुक सल्ले या प्रकाराला वाचा फोडता आहात याबद्दल धन्यवाद.

प्रमोद

स्वागत

उपक्रमावर स्वागत.
असेच छान लेख आता थेट तुमच्याकडूनच येवोत :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कोणतीही सर्कारी लस फुकट कशी?

पोलिओ लसीकरण मोहिम ही ग्राहकांसाठी पूर्णपणे फुकट असल्याने त्यावर व्यावसायिकतेच्या गैरप्रकाराचा आरोप फारसा असू नये.

-ग्राहकांसाठी फुकट असली तरी सरकारचा पैसा या मोहिमेवर खर्च होत असणारच.
सरकारचा म्हणजे कुणाचा पैसा?
(भारतात सरकारी कार्यक्रम राबवून आपल्या तुंबड्या भरण्याची पद्धत आता जुनी झाली.
नवा संदर्भ : एकोणविसाव्या राष्ट्रकुल स्पर्धा - कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे कॉमनली वेल्थ मिळवण्याचा राजकारण्यांचा गेम आहे.)

व्यावसायिकतेचा गैरवापर

-ग्राहकांसाठी फुकट असली तरी सरकारचा पैसा या मोहिमेवर खर्च होत असणारच.
सरकारचा म्हणजे कुणाचा पैसा?

मी फक्त व्यावसायिकतेच्या गैरवापराबद्दल लिहिले होते. सरकारी वा इतर पैशांच्या अपहाराबद्दल नाही.
तुमच्या मुद्याशी सहमत.

प्रमोद

सिरिअस-फालतू

जे रोग झाल्यास होणारे परिणाम सिरिअस असतात. शारिरिक/मानसिक अपंगत्व किंवा मृत्यू, अशाच लशी द्याव्यात. उदा पोलिओ, मेनिंजायटिस. बाकीच्या लशी उदा गोवर, कांजिण्या, फ्लू, हेपॅटायटिस ए या नाही दिल्या तरी चालतील.

तसेही हे वारेमाप लशी टोचण्याचे प्रमाण श्रीमंत वर्गातच असावे. हे चांगलेच आहे. संपत्तीचे अभिसरण होते म्हणे. ;)

मागच्या वर्षी स्वाईन फ्लूवरच्या चर्चेत धनंजय यांनी सांगितले होते की दरवर्षी येणार्‍या फ्लूचा विषाणू वेगवेगळा असतो. मग लस अनमानधपक्याने बनवलेली असते. ती घेण्यात काही अर्थ नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

असहमत

गोवर हा बर्‍यापैकी मारक रोग आहे.
कांजिण्यांची लस बालपणात आणि पुढे पुन्हा प्रौढ वयात घ्यावी. (प्रौढवयात घेण्याचा फायदा : "नागीण" [हर्पीस झॉस्टर] रोगाचा प्रतिबंध होतो.)

हेपॅटाइटिस बी ची लस टोचण्यालायक आहे, असे वैयक्तिक गणित मी केले आहे. (यात माझी आर्थिक स्थिती/लसीची किंमत लक्षात घेतलेली होती.) मात्र पूर्ण समाजासाठी हेपॅटायटिस बी ची लस फायद्याची आहे की नाही, याबद्दल गणित करून बघायला पाहिजे. (हेपॅटाइटिस ए आणि ई वगैरेंबद्दल [मला] अधिक माहिती गोळा करायला हवी.)

वार्षिक फ्लू भारतात अतिशय मोठ्या प्रमाणात बालके मारतो, असे मला वाचलेल्या आकड्यांवरून वाटते. ते बालमृत्यू (अन्य गरजांच्या मानाने) परवडत असल्याकारणाने कदाचित फ्लूची लस भारतात नाही दिली तर चालेल - परंतु आर्थिक गणित काळजीपूर्वक केलेले असणे बरे.

"फ्लू लस अनुमानधपक्याने बनवतात" हे वाक्य काळजीपूर्वक गणितात घेतले पाहिजे - अनुमान चुकण्याची संभवनीयता किती आहे, याचा अनुभव गेली कित्येक वर्षे आहे. चुकलेल्या अनुमानांचा खर्च हिशोबात घेणे शक्य आहे.

(वैद्यकातली सर्व निदाने अनुमानधपक्याने होतात. मात्र त्यातून "वैद्यकाच्या निदानाप्रमाणे औषधोपचार करू नये" असा निष्कर्ष काढला, तर युक्तिवादात अतिव्याप्तीचा दोष येतो.)

+१

बरोबर.

नक्की कोणता रोग मारक आहे ते माहिती नाही. गोवर सिरिअस वाटला नाही कारण कुठल्यातरी लहान बालकाला गोवर झाला आहे हे वाक्य बर्‍यापैकी फ्रीक्वेंट ऐकायला येते. आणि कुणाचा त्यात मृत्यू झाल्याचे मात्र कधी ऐकले नाही.

हेपॅटायटिस अ = सामान्य कावीळ हा सहसा दूषित अन्नावाटे होतो पण तो सहसा बरा होतो. हेपॅटायटिस बी मात्र बरा होत नाही. म्हणून त्याची लस देणे योग्य.

गणित करणे आवश्यक.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

उलट

ब कावीळ रक्तातूनच होते. ती मुलाला होण्याची भीती (थॅलेसिमिया, इ.) असेल तरच लस द्यावी असे वाटते.

हम्म!

वर थत्त्यांनी म्हटल्याप्रमाणे कांजिण्या, फ्लू, हेपॅटायटिस ए वगैरेंच्या लशी देण्याची काय आवश्यकता असते ते कळत नाही. माझ्या मुलीला या सर्व लशी देऊ नयेत अशी मी डॉक्टरांशी हुज्जत घातली होती आणि दिल्या नव्हत्या. पैकी तिला कांजण्या आणि फ्लू होऊन गेला आहे.

परंतु कांजण्यांची लस दिल्याशिवाय शाळेत प्रवेश नाही असा फतवा या वर्षी निघाला आणि आता अधिक हुज्जत घालण्यास वेळ नसल्याने ही लस द्यावी लागली. असो.

कल्पित वास्तवात बदलतंय का?

अलिकडच्या काही वर्षांपासून घडत असलेल्या घटना वाचून 'कल्पित हे वास्तवात बदलतंय का? '( Is fiction turning into facts?) हा प्रश्न पडू लागतो. रॉबिन कुक, आर्थर हॅली या लेखकांच्या कादंबर्‍या आठवायला लागतात. १०० वर्षांपूर्वी धुमाकुळ घालणारा आणि मधल्या काळात नामशेष झालेला प्लेगचा विषाणू सुरतसारख्या शहरात एकाएकी कुठून उपटतो? पावसाळा आला की साथीचे रोग येतात, हे तर सर्वांना माहीत आहे, पण या साथी इतक्या वेगाने महानगरांना वेठीस कशा धरतात? कंपन्या, डॉक्टर, औषध कंपन्या, रुग्णालये यांना बल्क बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कशा उपलब्ध होतात? मॅड काऊ डिसीज, बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू, सेरेब्रल मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस असले रोग थैमान का घालू लागतात? हे सगळे आताच का उपटते आहे? दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत हा असला उद्रेक का बघायला मिळत नव्हता? भारतातील प्रचंड ग्राहक बाजारपेठ लक्षात घेता आपण कुणाचे टेस्टिंग ग्राऊंड तर ठरत नाही ना?

लेखाचा विषय

महत्वाचा आहे. मधे लशीकरणामुळे एडीडी होण्याची शक्यता वाढते असा एक प्रवाद पाश्चात्य देशात चर्चेत होता. कृपया या विषयावर अजुन माहीती द्या.

दुवा १

दुवा २

लसजन्य आजार

लसजन्य आजारात ऑटिज्म असतो का? डॉक्टर मंडळींनी यावर प्रकाश टाकावा.
याच बाबत उलट सुलट प्रचार चालु आहे. कुठल्याही लशीत पारा असतो (?) आणि ऑटिज्म असलेल्या लोकांमधे (?) पार्‍याचे प्रमाण जास्त असते. या दोन संकल्पनांवर हा तर्क आधारित आहे. लसीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते (उदा. पोलिओ) की त्यातील काही जणांना हा रोग झाला (आणि होणारच होता) तर रोगाचे कारण लस धरावे का?

http://edition.cnn.com/2010/HEALTH/02/02/lancet.retraction.autism/index....
http://en.wikipedia.org/wiki/Causes_of_autism

हे दोन दुवे अधिक माहिती देतात.

प्रमोद

धन्यवाद

माहितीपूर्ण लेख.

लसजन्य आजार

माहितीपूर्ण लेखबद्दल घाटपांडे आणि फडके यांचे आभार.

सध्या बाजारात स्वाइनफ्लूची लस आलेली आहे. मागल्या वर्षी होती की नाही माहीत नाही. डॉक्टरकडे माणशी दोनशे रुपये देऊन नाकमध्ये थेंब टाकले जातात,
या लसीबद्दल, तिच्या उपयोगीत्वाबद्दल काही माहिती असल्यास सांगावी.
लसीमुळे होणारा तोच आजार, जसे वरील लेखात पोलीओ, या प्रकाराबद्दल अधिक माहीती द्यावी. स्वाईनफ्लूच्या लसीनेसुद्धा असेच काही होण्याची शक्यता आहे का/किती आहे ?

स्वाईन फ्लु लस

सर्वांनी स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस अवश्‍य घ्यावी आणि आजारापासून स्वतःचा आणि पर्यायाने सर्व समाजाचाच बचाव करावा. इंजेक्‍शनची ९० ते ९५ टक्के तर नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची परिणामकारकता ८०-८५ टक्के आहे.
असे सांगणारा दै. सकाळ मधील डॉ शिशिर मोडक यांचा लेख इथे वाचा.
प्रकाश घाटपांडे

स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस व इतर उपाय

स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस व इतर उपाय यावर मी सकाल ला लेख पाथवला आहे. १-२ दिवसात यावा.
अनन्त फदके

इथे लेख देता येईल का?

सकाळ दररोज वाचावासा वाटेलच याची खात्री नसते. तुमचा लेख इथे द्या म्हणजे दररोज सकाळ तपासण्याची शिक्षा भोगावी लागणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दै.सकाळ

आजच्या दैनिक सकाळ मधे डॉ अनंत फडके यांचा स्वाईन फ्लू च्या लशीवर लेख आहे. ईसकाळला लिंक काहि सापडली नाही
प्रकाश घाटपांडे

 
^ वर