भारतीय व्यापार-सुत्र
"माझा असा अंदाज आहे ते दोघेही (भारत आणि चीन) एकत्र परंतू पूर्ण स्वतंत्र मार्गाने प्रगती करतील. मात्र दोघांसाठी एक गोष्ट नक्की आहे की दोघांनाही त्यांच्या संस्कृतीशी नाळ पुनर्स्थापित केल्याशिवाय प्रगती करणे शक्य नाहि. दोघांना हा आत्मविश्वास जागवणे गरजेचे आहे/असेल की ते भारतीय म्हणून अथवा चायजनिज म्हणून हे करू शकतात. त्यांना पाश्चिमात्यांकडून भरपूर शिकायला मिळाले आहे, मात्र त्यांनी त्यांचे अनुकरण करण्याची गरज नाहि, किंवा त्यांनी पाश्चिमात्यांच्या (व्यापार)पद्धतीची भारतीय किंवा चायनिज धाटाणीची प्रत काढू नये. पाश्चिमात्य पद्धत ही दिवाळखोरीत गेलेली आहे. ती माणसाच्या 'माणूस' म्हणून होणार्या प्रगतीकडे हवे तसे लक्ष देत नाहि." -- पीटर सेन्ज, लेखकः 'फिफ्थ डिसिप्लिन'
अश्या दमदार वाक्याने सुरूवात झालेला एक नवा कोरा कार्यक्रम माझ्या पाहण्यात आला. वाक्याबरोबर सर्फिंग करणारा रिमोटही थांबला आणि पुढच्या अर्ध्यातासात "देवदत्त पटनायक" या व्यक्तीच्या वेगळ्या दृष्टीकोनाने मनावर गारूड केलं. फ्युचर ग्रूपचा "चिफ बिलीफ ऑफिसर" अशी अजब बिरूदावली मिरवणारा हा वक्ता जेव्हा "व्यापर करण्यासाठी स्वतःची अशी भारतीय पद्धत आहे का?" ह्या मुलगामी प्रश्नाचा शोध घ्यायला सुरूवात करतो तेव्हा प्रेक्षक त्याच्या बरोबर एका संपूर्ण वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करायला लागतो.
तर भारतीय व्यापार सुत्रावर आधारीत असा हा नवा कोरा कार्यक्रम आहे सी.एन्.बी.सी. टिव्ही१८ या वाहिनी वरचा "बिझनेस सुत्र"! भारतीयांची विचार करण्याची पद्धत आणि पाश्चिमात्यांची विचार करण्याची पद्धत यावर तो रोचक भाष्य करतो. भारतीय पैराणिक कथा आणि भारतीय आचार विचार पद्धती यांची सांगड तो उत्तरोत्तर घालु पाहतो. विष्णू, शंकर, वेगवेगळ्या देवींना वेगवेगळ्या रूपकांच्या स्वरूपात समोर आणतो, आणि मग प्रेक्षकाला लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा ह्या 'तीन देवींयाँ' न राहता भारतीय व्यापारातील तीन चलने भासू लागतात. देवदत्त पुढच्या भागांमधे नेतृत्त्व गुण, विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग वगैरे गोष्टीवर वेगळे विचार मांडतो. इथे त्याचे विचार किती बरोबर/ किती चूक हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल पण त्याचे हे वेगळ्या वळणाचे विचार तुम्हालाहि गुंतवून ठेवतील असे वाटते.
या कार्यक्रमाचे भाग तूनळीवरही बघता येतील. हा कार्यक्रम दर शनिवारी रात्री १०:३० वाजता लागतो.
तर हा चर्चाप्रस्ताव सूरू करण्याचे दोन मुख्य उद्देश होते त्यातील एक म्हणजे या वेगळ्या धाटणीच्या / विचारसरणी समोर आणणार्या कार्यक्रमाची ओळख करून देणे आणि दुसरे म्हणजे या अनुशंगाने भारतीय व्यापारपद्धतीवर चर्चा घडवणे. यासाठी पुढील मुद्द्यांवर तुमची मते मांडावितः
१. पाश्चात्य पद्धत ही व्यापाराची उपलब्ध असलेल्या पद्धतींपैकी सर्वोत्तम पद्धत वाटते का? नसल्यास इतर कोणते मॉडेल अधिक चांगले वाटते आणि त्यात काय वेगळे आहे?
२. भारतीयांना स्वतःची पूर्णपणे वेगळी व्यापारपद्धत सूरू करणे तुम्हाला आवश्यक वाटते का?
३. सध्याच्या भारतीय व्यापारपद्धतीत तुम्हाला कोणते फायदे दिसतात? कोणते तोटे दिसतात? व भारतीय पद्धतीत, पाश्चिमत्य पद्धतीत व चायनिज पद्धतीत काय वेगळे आहे?
४. तुम्हाला जर भारतीय व्यापार धोरण ठरवायला दिले तर तुमचे धोरण "ढोबळ" पणे कसे असेल?
५. याशिवाय इतर प्रासंगिक मुद्दे.
इथे कृपया सरकारचे आताचे धोरण चर्चेत येणे स्वाभाविक असले तरी त्यावरील राजकिय टिपण्या करू नयेत. एखाद्या पक्षाला नावे ठेवणे/प्रशंसा करणे वगैरे मधे चर्चा न भरकटवता भारतीय म्हणून विचार मांडावेत
Comments
रोचक, प्रश्न समजले नाहीत
पाश्चात्य व्यापारपद्धत म्हणजे नेमके काय?
आमच्या गावात शनवारच्या बाजारात भाजीवाले/वाल्या ओरडून आपला माल उत्कृष्ट असल्याची जाहिरात करतात. मग गिर्हाईक गाड्यापाशी येऊन माल तपासतो. किमतीबाबत थोडीफार घासघीस होते. "शेजारच्या गाड्यावर अमुक किंमत आहे/शेजारच्या गाड्यावरच्या शिळ्या मालापेक्षा माझा माल ताजा आहे" अशा प्रकारची मूल्य/किंमत तुलना होते. किंमत ठरते. तराजूवर भाजी तोलली जाते. पैशांच्या बदल्यात भाजी मिळते.
ही भारतीय व्यापाराची पद्धत अतिशय जुनी असावी. गाड्यावर साईबाबाच्या फोटोची किंवा सेक्रेड हार्ट ऑफ जीझसची प्रतिमा असली, तरी व्यवहार साधारण तसाच होतो.
पश्चिमेतही टीव्हीवर जाहिरात-तुलना-किंमतीबद्दल विमर्श-भाव ठरवणे-पैसे/मालाची अदलाबदल अशाच प्रकारचा व्यापार होताना मी बघितलेला आहे.
तूनळीवर चित्रफीत बघून हे कोडे सोडवायचा प्रयत्न करतो...
- - -
प्रथम चित्रफीत : दृष्टांतकथा = सिकंदर आणि त्याला भेटलेला "जिम्नोसोफिस्ट" साधू
माझे मत - भंकस.
सिकंदराच्या तत्त्वज्ञानात म्हणे एकच जन्म होता, आणि त्याला भेटलेल्या साधूच्या तत्त्वज्ञानात अनेक जन्म होते. म्हणून सिकंदराला या आयुष्यातच घाईघाईने खूप यश मिळवायचे होते, साधूला अगणित काळ होता, कसलीच घाई नव्हती. हा पाश्चिमात्यांमध्ये आणि सिकंदरामध्ये फरक.
माझ्या मते हा दृष्टांत म्हणजे सफरचंदे आणि संत्री.
सिकंदरासारखा पुरुराजा होता, अन्य राजे होते. युद्धे वगैरे करायचे. यश वगैरे याच आयुष्यात मिळवायचे. त्यासाठी प्राण पणाला लावून प्रयत्न करायचे. पाश्चिमात्य राजाच्या मानसिकतेची तुलना पौर्वात्य राजांशी केली पाहिजे. पौर्वात्य साधूची तुलना पाश्चिमात्य सॉक्रेटिसाशी वगैरे केली पाहिजे. "मेलो तर मेलो" म्हणून शांतपणे विष प्याला. यश मिळालेच पाहिजे अशी कुठली घाई नाही. (त्याच प्रमाणे पाश्चिमात्य शेतकर्याची तुलना करायची असेल तर पौर्वात्य शेतकर्याशी करायला पाहिजे, वगैरे... पण ते या चित्रफितीत नाही.)
पुढे बुवा म्हणतो की "नेमका किती नफा-दर योग्य" हा कूटप्रश्न आहे. आहेच मुळी. पण हा प्रश्न भारतीयांना वेगळा पडतो आणि पाश्चिमात्यांना पडत नाही - असे काही आहे काय?
- - -
ऋषिकेश म्हणतच असतील, तर चित्रफितीचा पुढचा भाग बघतो. परंतु त्यांनी या विचारसरणीतले मौलिक नाविन्य पुन्हा थोडे समजावून सांगावे, ही विनंती.
धन्यवाद
धन्यवाद. लेखात म्हटल्याप्रमाणे देवदत्त यांची मते न पटणारी असु शकतात / इथे त्याचे विचार किती बरोबर... किती चूक हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल (मलाही सगळे पटले आहे असे नाहिच) व त्यावर ज्यांची इच्छा आहे त्यांनी वेगळी चर्चा सूरू करावी. पण त्यानिमित्ताने केवळ पाश्चिमात्यांच्या विचारसरणीपेक्षा काहि वेगळे विचार / व्यापारपद्धती उपक्रमींना माहित आहेत का? असल्यास त्या कोणत्या? त्यात वेगळे काय आहे? त्याचे फायदे/तोटे कसे होतील वगैरे प्रश्नांसाठी हा चर्चाप्रस्ताव आहे
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
पण हाच प्रश्न समजलेला नाही...
होय पण... वरील प्रश्नच मला समजलेले नाहीत. पाश्चिमात्यांची व्यापार-विचारसरणी अशी वेगळी कुठली आहे? त्यावेगळी विचारसरणी सांगण्यासाठी त्या विचारसरणीची चौकट तरी मला माहिती हवी. व्यापार म्हणजे कुठलातरी आदान-प्रदान व्यवहार अशी व्याख्याच असेल ना? शिवाय तसा व्यवहार करण्यात वेळ खर्च होतो, तर व्यापारी जीवितार्थ चालवत असेलच ना? म्हणजे आदान-प्रदान केल्यावर काही शिल्लक/मिळकत = नफा राहातच असणार. हा व्याख्येतच आला ना? मग कुठल्याही देशात आदान-प्रदान-नफा-तोटा या तत्त्वाशिवाय "व्यापार" शब्द निरर्थक वाटतो.
सर्व मानवी व्यवहार आदान-प्रदान-नफा-तोटा यांचे नसतात, हे खरे. उदाहरणार्थ आई-बापाने बाळाचे केलेले संगोपन. यात "नफा", "आदान", "प्रदान" हिशोब लावता येत नाही. लावूच नये. पण याला "व्यापारविषयक" चर्चेत आणले तर चर्चेचे क्षेत्र बेसुमार होईल. "व्यापार" म्हणजे "सर्व मानवी व्यवहार" नव्हे, अशी कुठलीतरी मर्यादा असलेली बरी.
खरेच - तुम्ही म्हणता तर मला देवदत्त यांच्या चूक-बरोबर बद्दल अवांतर चर्चा करायची नाही. पण मग देवदत्तांची चित्रफीत बाजूला ठेवून, तुमचे प्रश्न अधिक समजावून सांगावेत. थोडक्यात :
पाश्चिमात्यांचे व्यापारसूत्र कोठले? (म्हणजे त्यावेगळे माझ्या माहितीतले सूत्र आठवता येईल.)
(एकदा का असे कुठले सूत्र सापडले की पुढील चर्चाप्रश्न मग आपोआपच विचारात घेता येतील. वेगळे काय आहे? फायदे काय आहेत? तोटे काय आहेत?)
आडवळण
मी अर्थतज्ञ / व्यापारतज्ञ नाहि. मात्र सगळ्यांचे प्रतिसाद वाचल्यानंतर पुन्हा एकदा पहिल्यापासून विचार केला. त्यातून काहि बाबी मनात आल्या तसेच काहि प्रश्न मनात आले: (पुढील प्रतिसाद पूर्ण नाहि तरी बरेचसे विषयांतर आहे. मुळ विषय थेट कोणालाच न पटल्याने नपेक्षा काहिशा आडवळणाने जर मुळ विषयापर्यंत पोचता आले तर पाहतो)
भारतात पैशाइतकेच, मानवी भावनांना महत्त्व दिले जाते. तर पाश्चिमात्यांकडे व्यापार-आदान-प्रदान करण्याचे कारण हे केवळ 'आर्थिक' नफा कमावणे यासाठीच होतो. सध्याच्या व्यापार करण्याच्या पद्धतीमधे तुमचा पैसा किती आहे? तुम्ही आदान-प्रदान केल्यावर तो किती झाला? व निव्वळ नफा तोटा काय? याचाच विचार होतो (अर्थात पैशात थेट चलनाबरोबर, इतर अप्रत्यक्ष पैसा, गुंतवणूक, ऍसेट्स वगैरे आलीच). मात्र ह्या पद्धतीत भावनिक 'गुंतवणूक' किती व त्याचा फायदा किती याचे कॅल्युलेशन केले जाते का? तर नाहि. तो नफा मोजण्यासाठी कोणती एकके / इंडेक्स नाहित.
एक उदा. पटकन् डोक्यात आले ते देतो (कदाचित बेस्ट फिट उदा. नसेल) : "चीन ने पाकिस्तानला अणुभट्ट्या विकल्या" या व्यापाराकडे कितीजण "फक्त / निव्वळ आर्थिक व्यापार" म्हणून बघु शकतात. जर त्यापलिकडे पाहायचं तर पाकिस्तानला व चीनला होणारा "एकूण नफा" कसा मोजायचा? दुसरे उदा. म्हणजे एखाद्या उच्चपदस्थाला एखाद्या कारकूनाने आयत्यावेळी सुटे पैसे नसताना १००रु. दिले. त्या उच्चपदस्थाच्या डोक्यात कारकून चांगली व्यक्ती आहे हे कायमचं राहिलं आणि त्याने कारकुनाला त्याचे पैसे परत केले नाहि तरी त्याला आपण फायद्यात आहोत असे वाटते. हे गणित कसे सोडवायचे?
भारतातील सवयी बघितल्या तर मात्र नफा हा नेहमी पैशात मोजला गेलेला नाहि. पाश्चात्यांपेक्षा भारतीय संस्कृतीमधे पैशाइतकेच महत्त्व भावनिक "गुंतवणूकीला" दिले जाते आणि हे तुम्ही आम्हीदेखील नकळत करतो (पाश्चात्य व्यापारात भावनिक गुंतवणूकीला फारसे स्थान देत नाहित) असा आतापर्यंतचा तरी स्वानुभव आहे.
तेव्हा असं वाटतं की एकूणच व्यापारपद्धतीमधे, विविध गणनेमधे सुधारणा करण्यास वाव आहे.
याशिवाय अंतर्गत व्यापारात / व्यवस्थापनात (जसे मालक-कर्मचारी यांच्यातील व्यापार, दोन कर्मचार्यांमधला व्यापार वगैरे) तर माझ्यामते सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीची गरज आहे. पण ते पुन्हा कधीतरी :)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
हा फरक नसावा
"भावनेला महत्त्व नसते" असे पाश्चिमात्त्यांत नसावे.
हे ठीक वाटत नाही. पण तसे कोणाला वाटत असल्यास वस्तुनिष्ठपणे असिद्ध कसे करावे? हा प्रश्न पडलेला आहे. प्रयत्न करतो. "पाश्चिमात्य" मध्ये विशेषतः संयुक्त राज्यांतली उदाहरणे दिलेली आहेत.
१. नोकरी/व्यावसायिक अभ्यासक्रम शोधताना "केवळ पगार पाहू नका, आवड-निवड, विषयात रस लक्षात घ्या" अशा प्रकारचा सल्ला पश्चिमेतल्या विद्यार्थ्याना सल्लागार हमखास देतात. विद्यार्थी फक्त पगाराचा आकडा बघूनच नव्हे, तर आवडीच्या दृष्टीने निवड करताना मला भेटलेले आहेत. "आवड" ही मोजमापाच्या दृष्टीने कठिण असलेली बाब असते - म्हणजे तुमच्या प्रतिसादाच्या अर्थाने "आर्थिक"पेक्षा वेगळी. (आर्थिक = सध्याच्या व्यापार करण्याच्या पद्धतीमधे तुमचा पैसा किती आहे? अशी व्याख्या तुमच्या प्रतिसादातून घेतलेली आहे. प्रतिसादापुरती मला ती व्याख्या मान्य आहे.)
२. पाश्चिमात्य कायदेव्यवस्थेमध्ये "नुकसान कधीकधी आर्थिक नसते, मात्र ते लक्षात घ्यावे लागते" ही संकल्पना चांगलीच रुजलेली आहे. याला "नॉन-एकोनॉमिक डॅमेज" म्हणतात. यात pain, suffering, loss of companionship, consortium (love of spouse) हे प्रकार येतात. "नोकरी जाणे, पगारी कामाचा वेल वाया गेल्यामुळे पगार न मिळणे..." वगैरे आर्थिक नुकसानच मानले जाते. ते वेगळे. पाश्चिमात्यांना बिगर-आर्थिक मूल्य कळते, याचा हादेखील वस्तुनिष्ठ पुरावा मानावा.
३. "मानवी विकास निर्देशांक" - जीडीपी पेक्षा वेगळी मूल्ये मोजण्यासाठी "ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स" या मोजमापाचा पुरस्कार काही लोक करतात. या गणिताच्या जनकांपैकी कित्येक भारतीय उपखंडातले आहेत खरे. मात्र ते मोजमाप वेगवेगळ्या देशांमध्ये तुलता काय दिसते? पाश्चिमात्य देशांत बिगर-थेट-पैशाचा विकासही भारतापेक्षा अधिक झालेला दिसतो.
या सर्व विकासात धोरणे येतातच. पश्चिमेतही धोरणांना बिगर-थेट-पैसा अशा विकासाची चाड असल्याचा हा वस्तुनिष्ठ पुरावा आहे.
- - -
अशा प्रकारचे "स्ट्रॅटेजिक विश्लेषण" पश्चिमेतील राजकारणी आणि सेनानी दररोज करतात. चुकतात कधीकधी. पण भारतीय-चिनी लोकही चुकतात कधीकधी.
चांगले मत (गुडविल) महत्त्वाचे असते, याची माहिती पाश्चिमात्य व्यापार्यांना चांगली असते. त्याबद्दल ते विचारही करतात.
भारतातही "काही हिशोब पैशातच केले जाऊ शकतात" असा विचार कित्येकदा ऐकलेला आहे. उदाहरणासाठी या दोन मराठी म्हणी बघू :
- असतील शिते तर नाचतील भुते. (अन्न-वगैरे आर्थिक लाभ असल्यास मैत्री/नाती जोपासली जातात.)
- सगळी सोंगे आणता येतात, पण पैशांचे सोंग आणता येत नाही. (काही व्यवहार पैशांतच करता येतात.)
तुमचा स्वानुभव असेल तर त्याचा प्रतिवाद शक्यच नाही. पण तुमचा अनुभव सामान्यीकृत करता येत नाही, असे मला वाटते. वर स्वानुभव नसलेली, मला-तुम्हाला सम-समान तपासता येणारी प्रमाणे दिलेलीच आहेत. पाश्चिमात्य लोकही भावनेला महत्त्व देतात, असे दिसते. (तुम्ही काही मोजमापाचे शब्द वापरता, ते अलंकारिक असावेत : भारतीय संस्कृतीमधे पैशाइतकेच "५०%=५०%" महत्त्व भावनिक "गुंतवणूकीला"; आणि पाश्चिमात्यांकडे व्यापार-आदान-प्रदान करण्याचे कारण हे केवळ =१००% 'आर्थिक' नफा कमावणे यासाठीच होतो. अलंकारिक नसल्यास : हे मोजमाप कसे करावे? समजा भारतात आर्थिकःभावनिक = ५०:५० आणि पश्चिमेत आर्थिकःभावनिक = ६०:४०, असा तुमचा मुद्दा आहे. तुमची उदाहरणे तशी नाहीत, पण बेनिफिट ऑफ डाऊट घेऊया. पण हे तपासणार कसे? बंधुभगिनीप्रेम बघूया. आपण होऊन भारतात लोक भावा-बहिणीला मोठा वाटा देत असतील, तर भारतातल्या अधिक वाट्याची रक्कम = बंधुभगिनीप्रेमाचे महत्त्व असे काही म्हणता येईल. मात्र आमच्या एका नाते-कुटुंबात भाऊबंदकीने एकाने इस्टेट गिळंकृत केली - भारतात! पैशासाठी भावना बळी. माझे हे अतिरेकी "स्वानुभव"-उदाहरण सोडा. सरासरी इस्टेट-वाटण्यांमध्ये जर भारतात पश्चिमी देशापेक्षा अधिक सलोखा असतो का? याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? काही वस्तुनिष्ठ प्रमाणे आहेत का?)
सहमत. पण हे वाक्य सर्वत्र-सत्य असे वाक्य आहे. या चर्चेत त्या वाक्याचे काही वैशिष्ट्य नाही.
ठिक
जर एकूण चर्चेचा सूर बघितला तार् भारतीय/चायनिज लोकांची व्यापार करण्याची पद्धत ही पाश्चिमत्यांसारखीच आहे असे सांगणारा. तेव्हा चर्चाप्रस्तावातील मुद्दा क्रमांक ३ (३. सध्याच्या भारतीय व्यापारपद्धतीत तुम्हाला कोणते फायदे दिसतात? कोणते तोटे दिसतात? व भारतीय पद्धतीत, पाश्चिमत्य पद्धतीत व चायनिज पद्धतीत काय वेगळे आहे?) हा गैरलागू ठरतो.
ठिक.
याशिवाय तुम्ही वरील प्रतिसादात दिलेली उदाहरणे ही पाश्चिमात्य मंडळी भावनेचा विचार करतात का हे दाखवण्यास पुरेशी आहेत. मात्र व्यापार करतानाही ह्या बाबी मोजल्या जात नाहित. यासाठी तुम्ही "पण हे तपासणार कसे? " हा प्रश्न विचारता आणि तो बरोबरच आहे. म्हणजे पाश्चात्य व्यापारपद्धतीमधे (जी आपणही वापरतो) हा दोष आहे असे म्हणता येईल का? जर होय तर मग आपोआप मुळ चर्चा विषयातले १ व २ मिळून पुढील प्रश्न तयार होतो:
सध्या उपलब्ध असलेली पद्धत (जिला मी पाश्चात्य समजतो /समजत होतो) ही व्यापाराची उपलब्ध असलेल्या पद्धतींपैकी सर्वोत्तम पद्धत वाटते का? नसल्यास इतर कोणते मॉडेल अस्तित्त्वात आहे का? असल्यास कोणते अधिक चांगले वाटते आणि त्यात काय वेगळे आहे? नसल्यास भारतीयांना वेगळी व्यापारपद्धत सूरू करणे तुम्हाला आवश्यक वाटते का?
बाकी बहिण भवांच्या इस्टेटीच्या वाटण्यात भाऊ बहिणीवर अन्याय करतो का हा मुद्दा नसून तो अन्याय केल्यानंतर केवळ आर्थिक विचार केल्यास तो फायद्यात आहे मात्र तिचे प्रभावक्षेत्र, इतर नातेवाईकांत तीची प्रतिमा, तीची इतर शक्ती वगैरे विचारात घेतले तर ही फसवणूक भावाला कदाचित तोट्यातही घालु शकते व ते गणित सध्याच्या व्यापारपद्धतीत नाहि.
अजून एक शंका: पाश्चात्यांशी संबंध यायच्या आधी भारतीय जो व्यापार करत तो एकमेकांची गरज भागावी म्हणून की खास नफा कमावण्याच्या दृष्टीकोनातून होत असे?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
माझा एक रुपया (२ सेंटस)
हो. ती टिकली म्हणजे सर्वाधिक फायदा (आर्थिक, भावनिक, पारमार्थिक, वाटेल तो) तिच्यातच होतो.
असे कसे? गुडविल वगैरे मुद्यांचा विचार केला जातो.
किती पूर्वी? ग्रीक-भारत व्यापार? की आर्य भारतात येण्यापूर्वी? ;)
सांगता येत नाही, पण काही निर्देश मिळतात
परिणाम करतात, ते मोजले जाऊ शकतात. म्हणजे एखादा बॉस गोड-मनमिळाऊ कर्मचार्याला बढती देतो, सुटीचा दिवस लवकर मंजूर करतो... बढतीची रक्कम, सुटी मंजूर करण्यास केलेला कमी-विलंब - असले परिणाम मोजले जाऊ शकतात. कधीकधी पैशांच्या एककात, कधी वेळेच्या एककात...
मला वाटते तुम्हाला म्हणायचे आहे, "मला हवे तितके स्पष्ट आकड्यात हे परिणाम मोजत नाहीत". शक्य आहे. हा दोष असेल, हेसुद्धा शक्य आहे. मात्र
"किती स्पष्ट मोजमाप हवे?",
"एकत्रित मोजमाप हवे का?",
"असे स्पष्ट मोजमाप असल्यास ते पुरेसे उपयुक्त असे मी कधी म्हणेन?",
"उपयुक्त - म्हणजे अशा मोजमापाचा उपयोग व्यवहारात मी कसा करेन?"
अशा प्रश्नांवर विचार केल्यास ही चर्चा पुढे जाऊ शकेल.
(उदाहरणार्थ : AAA दर्जाचे बाँड सुरक्षित मानले जातात. त्यातल्या त्यात सुद्धा काही लोक सर्वाधिक व्याज देणार्या बाँडमध्ये गुंतवणूक करत नाहीत, तर सिगारेट-दारू-जुगार-शस्त्रास्त्र-कंपन्या सोडून अन्य AAA दर्जाच्याच बाँडमध्ये गुंतवणूक करतात. व्याजदराचा जो फरक आहे, त्या दरात त्या लोकांची समाजाबद्दल जाणीव मोजता येते. मी स्वतः अशा व्यक्तींनी घेतलेला व्याज-घाटा निर्व्यसनी-समाज-किंमत समजून स्वतः गुंतवणूक करेन.. वगैरे. हे झाले फक्त उदाहरण. प्रश्नावर विचार तुम्ही तुमच्या मतीनेही करायचा आहे.)
माहीत नाही. पण वरील निर्देश-प्रश्नांच्या उत्तरात आपल्याला आपल्या नीतिमत्तेबद्दल विश्लेषण मिळेल. मग "सर्वोत्तम" शब्दाचा अर्थ लागेल.
अन्य पद्धती उपलब्ध आहेत का? पुन्हा सांगता येत नाही. "तेही वापरतात आणि आपणही वापरतो" म्हटल्यास व्याख्येतच सर्वसमावेशकता येते. सर्वसमावेशकापेक्षा अन्य असे काही असूच शकत नाही. मात्र आपण आणि तेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करतो. बहुधा यातील काही व्यवहार तुम्ही "हल्लीचा-व्यापार" रकान्यात योजता, अन्य व्यवहार "हल्ली-नाही-पण-आवडेल-असा-व्यापार" या रकान्यात योजता. ते रकाने तुम्हीच भरले पाहिजेत. उदाहरणार्थ "बॉसला १०० रु उसने देणारा कारकून" हा तुमच्या दृष्टीने "हल्लीचा व्यापार" नाही - पण "वेगळा व्यापार" आहे. मला हे वर्गीकरण नीट समजलेले नाही - माझ्या मते तसे वागणे "हल्लीचा व्यापार"मध्येच येते. पण अधिक विस्ताराने तुम्ही निश्चित समजावू शकाल. मग कारकुनाचे समयसूचक वागणे तुमच्या "हल्लीचा व्यापार" रकान्यात अधिक यावे, असे तुमचे मत तुम्ही सांगू शकाल. यातून कुठले व्यवहार सुधारतील, ते स्पष्ट होईल. वगैरे.
हे वेगळे करून सांगता येत नाही. वसाहत/यंत्रयुगीन पाश्चात्त्यांच्या आगमनापूर्वीही सुती आणि रेशमी वस्त्रे दोन्ही उपलब्ध होती. रेशमी वस्त्रे श्रीमंत लोक वापरत आणि त्यातून कोष्ट्याला नफा अधिक मिळे. रेशमी वस्त्रे चकचकीत-सुंदरही दिसत. आता कोष्टी श्रीमंत लोकांच्या अधिक-उच्च सौंदर्यदृष्टीची गरज पुरवण्यासाठी रेशमी वस्त्र विणत/महागात विकत, की नफ्यासाठी? हे वेगळे करून कसे सांगणार?
मात्र एक निर्देश मला मिळतो : भारत-प्रदेशात काही हजार वर्षांपासून सोन्या-चांदीची नाणी चलनात आहेत. या नाण्यांत गरजेच्या-पेक्षा-अधिक-झालेला नफा हिशोबात ठेवता येतो. 'अ'ने 'आ'ची गरज भागवली, 'आ'ने 'अ'ची गरज भागवली, तर मग ते मूल्यवान सोन्याचे नाणे कोण कोणाला देणार? माझ्या मते, फार पूर्वीच्या काळीसुद्धा भारतात गरजेपेक्षा अतिरिक्त किंमत ज्या लोकांना मिळवता येत असे, ते लोक नफ्याकरिता-नफा घेत.
आणखी एक निर्देश : एकनाथाची एका-पैच्या-चुकीची कथा. या कथेतून असा बोध देतात : पै-पैला महत्त्व नसते, हे कळण्यासाठी संततुल्य मनन लागते. ही गोष्ट प्रचलित झाली त्या काळात (म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी) संत-नसलेल्या-श्रोत्यांना पैशांच्या गणितात संपणार्या हिशोबाचे महत्त्व जाणवत असे. ते महत्त्व एकनाथासारख्या महापुरुषाने संतत्वाने टाकून देईल, हे श्रोत्यांसाठी अचाट होते.
बघा - तुम्हाला "सध्याच्या व्यापारपद्धती"बद्दल काही विवक्षित कल्पना आहेत. (माझ्या मते सध्याच्या व्यापारात हे विचारात घेतले जाते. बहिणीची परिवारात शक्ती असेल, पत असेल तर भाऊ अन्याय करायला घाबरेल. अशा प्रकारची लोककथा प्रसिद्ध आहे.) या ठिकाणी कुठल्यातरी प्रकारे तुम्ही मनात हिशोबही केलेला आहे : "भावाला कदाचित तोट्यात घालू शकते". तुमच्या मनातला हाच हिशोब तुम्ही विस्ताराने सांगितला, तर तुमच्या प्रश्नचे उत्तरही विशद होईल. अशा प्रकारचा हिशोब न केल्यामुळे एखाद्या "हल्लीच्या-व्यापार्या"चा तोटा झाला, ते खरेखुरे उदाहरण तुम्ही देऊ शकाल. (आमचे इस्टेट-गिळंकृत नातेवाईक मात्र मजेत आहेत, बाकी नातेवाईक त्यांच्याकडे येऊन-जाऊन संबंध ठेऊन आहेत... ज्यांना गंडवले ते दीर्घकालिक तोटा वगैरे करू शकले नाहीत. गंडवणार्यांनी हिशोब नीट केला म्हणायचा.) असा हिशोब करून फायदा झाला अशा "वेगळ्या-व्यापार्या"चे खरेखुरे उदाहरण देऊ शकता. वगैरे.
स्वाभ्यास?
भारतीय आणि पाश्चात्य व्यापारपद्धतींच्या व्याख्या, वर्णने, फरक, इ. ची माहिती कोठून मिळविणे अपेक्षित आहे? यूट्यूब बघण्यापेक्षा तुम्ही सारांश दिल्यास बरे होईल. बिग बझार तर काही 'वेगळ्या' प्रकारे व्यापार करताना दिसत नाही!
तुटपुंजे वाचन आणि पूर्वग्रहावर आधारित माझा निष्कर्ष आहे की हा अजून एक भंपक स्वमदत गुरू आहे.
विनंती
त्या मालिकेतही विषय नुकताच सूरू झाला आहे (कालच ४था भाग झाला) तेव्हा तिथेही चर्चा/मुलाखत उत्तराला निष्कर्षाला पोहोचलेली नाहि. तेव्हा अजूनही देवदत्त यांचे पूर्ण म्हणणे समजलेले नाहि. ही चर्चा देवदत्त केवळ यांच्या मॉडेलवर करायची नसून त्याचबरोबर पाश्चात्यांनी रूढ केलेल्या (खरेदी-विक्री-नफा-नुकसानकेंद्रित) पद्धतीबाहेर इतर कोणती पद्धत वापरणे हिताचे आहे का वगैरे अंगाने करायची आहे.
इथे त्यातील भाग सहज देता येईल मात्र दिला नाहि कारण देवदत्त यांची कथनाची पद्धत प्रभावी आहेच शिवाय भाषांतर करताना / सारांश देताना एखादे वाक्य माझ्याकडून पुढे मागे लिहिले जाईल आणि चर्चा वेगळ्याच दिशेने जाईल अशी भिती वाटते. तेव्हा जर शक्य असेल तर निदान पहिल्या भागातील पहिल्या सेगमेंटची (~७ मिनीटे) बघा रोचक वाटल्यास पुढे बघा ही विनंती
(ते न बघताही वरील प्रश्नांचा उत्तर देतण्याचा प्रयास करता येईल मात्र आपल्यातही ही विक्रीप्रधान पद्धत इतकी रुजली आहे की त्याबाहेर आपोआप विचार करणे कठीण वाटते)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
त वरून ताकभात
भिकारचोट माणूस आहे. टॉरंट बंद करून यूट्यूबफीत बघितली, बँडविड्थ वाया गेली. साले हे आधुनिकोत्तरवादी फुटत का नाहीत? घंट्याची प्रभावी कथनशैली! ती तर शुद्ध आणि अप्रामाणिक बुलशिट आहे. यापेक्षा नाडीवाले चांगले.
असेच वाटते
भारतीय आणि पाश्चात्य व्यापारसूत्रांमध्ये काही फरक असावेत असे वाटत नाही. मागील वर्षी सिन्सिनाटीमध्ये असताना आठवड्याचा भाजीबाजार फिंडले मार्केटमध्ये (थेट शेतकऱ्यांकडून खरेदी) करायचो. पिंपरी/चिंचवडचे भाजीमार्केट आणि फिंडले मार्केट या दोहोंमध्ये मला काही फरक आढळला नाही. (चिंचवडचे भाजीमार्केट त्यातल्या त्यात स्वच्छ आहे असे म्हणता येईल.)
बाकी बिग बझार/डी-मार्ट/स्पेन्सर्स आणि वालमार्ट/क्रोगर/बिग्ग्ज यांच्या व्यापारविषयक धोरणांमध्ये काही फरक असावा असे वाटत नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
भोंदुगिरी
व्हिडिओ गंमतीदार आहे. नेहमीप्रमाणे 'यशाची हाव वाईट' हा सरसकट संदेश शेवटी आलेला दिसतो. यश का वाईट आहे हे काही तो मनुष्य सांगत नाही (फक्त् भाग १ पाहिला आहे), किती यश? असा प्रश्न विचारतो. ह्याची पातळी जर ठरवायची असेल् तर् मनुष्य ठरवु शकतो. (त्यामुळे नथिंगनेसच हवे असे नाही)
वरील प्रतिसादांतील् मतांशी सहमत आहे, भोंदुगिरीच वाटते. (भाग १ चा निष्कर्ष)
-Nile
चीफ बिलिफ ऑफिसर
चीफ बिलिफ ऑफिसर असे काही पद असते हे मी या आधी कधी ऐकलेले नव्हते. :-) मुद्दाम शोध घेतल्यावर हे दुवे मिळाले. ;-) निदान हे तरी अस्सल भारतीय आहे असे वाटते. ;-)
हा मनुष्य मायथॉलॉजिस्ट आहे तिथपर्यंत ठीक पण पुढे त्याचा वर्तक-ओक बनला आहे कारण उपलब्ध गोष्टींतून आपल्याला सोयिस्कर अनुमाने काढायचा या लोकांचा धंदा आहे. अलेक्झांडरची गोष्ट ही अशीच. अलेक्झांडरला नंगा साधू भेटला आणि तो आकाशाकडे बघत होता वगैरे वगैरे ठीक (खरे तर तसे काही प्लुटार्कने लिहिल्याचा संदर्भ मला मिळालेला नाही. नंग्या साधूंच्या प्रसिद्ध गोष्टीत १० नंगे साधू अलेक्झांडर पकडून आणतो कारण ते आजूबाजूच्या गणराज्यांना चिथवतात असा त्याला संशय असतो. तो त्यांना प्रत्येकी १ प्रश्न विचारतो आणि ज्याचे उत्तर सर्वात वाईट असेल त्याला देहदंडाची शिक्षा देईन असे सांगतो. असो, गोष्ट पुढे महाभारतातील यक्षप्रश्नांप्रमाणे जाते आणि अलेक्झांडर कोणालाही देहदंड देत नाही. प्लुटार्कने महाभारत वाचले होते आणि कथा रचली होती अशी मला दाट "शारदीय" शंका आहे. ;-)) पण ते एक जन्म, अनेक जन्म वगैरे आवाक् करणारे आहेत. या माणसाची स्वतःची कल्पनाभरारी.
भारत गेली हजारो वर्षे पाश्चात्यांशी व्यापार करतो आहे. समान सूत्रे असल्याशिवाय व्यापार कसा शक्य होईल? :-) ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांपासून (स्टॉक, डिविडंड् वगैरे) पुढे सुरु करावयाचे झाल्यास त्यापूर्वीच्या इतिहासाचे दाखले अनावश्यक आहेत.
व्यापारी सूत्रे
माझी श्री ऋषीकेश यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी सीएनबीसी या चॅनेलवरचे कार्यक्रम बघणे थांबवावे. या चॅनेलवरचे कार्यक्रम तद्दन बोगस व दिशाभूल करणारे असतात असा बर्याच लोकांचा अनुभव आहे. अमेरिकेत तर पैसे घालवायचे असले तर ही चॅनेल सांगते त्याप्रमाणे गुंतवणूक करा असे म्हटले जाते.
चन्द्रशेखर
काही कार्यक्रम चांगले
उदयन मुखर्जीचे एक दोन कार्यक्रम मला आवडतात. सीएनबीसीची शिरीन भानही आवडते. :-) तिच्यासाठी मी यंग टर्क्स हा तद्दन बोगस कार्यक्रम मन लावून पाहतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सुधारणा
>>बोगस कार्यक्रम मन लावून पाहतो
'मन लावून' ऐवजी 'टक लावून' अशी सुधारणा करावी का?
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)
टक टका टक
हम्म. उपक्रमावर आल्यापासून तुम्हीही शाब्दिक निटपिकिंग शिकलात वाट्टं. (हघ्या).
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शिरीन भान ह्यांचा आहार व व्यायाम काय?
सीएनबीसी मधल्या बायांनी एकंदर स्वतःला छान सांभाळले आहे. शिरीन भान ह्यांचा आहार व व्यायाम याबद्दल अधिक माहिती कोणी देईल काय? महिला सदस्यांना फायदा होऊ शकेल असे वाटते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
स्टोरीबोर्ड
शीरीन एक एंकर म्हणून मलाही आवडते. तिचे व्यक्तिमत्व नक्किच लोभसवाणे आहे :) मात्र यंग टर्क अगदीच काही खराब कार्यक्रम् वाटत नाही. स्टोरीबोर्ड ही चांगला कार्यक्रम् आहे.
जयेश
सीएनबीसीपेक्षा
भारतातील बिझनेस न्यूज चॅनेल्समध्ये एनडीटीवी प्रॉफीट आणि यूटीवी-ब्लूमबर्ग त्यातल्या त्यात बरे वाटते. सीएनबीसीवाले आता बोअर झाले.
पण हल्ली टीवीच लावावासा वाटत नाही त्याबाबत काय करावे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
कार्यक्रम बघितला नाही
मूळ सारांश व त्यानंतरचे प्रतिसाद पाहून हा कार्यक्रम बघावासा वाटला नाही. तेव्हा माझे विचार त्याच मर्यादेत घावे.
मुळात पौर्वात्य - पाश्चिमात्य अशा रुंद पट्ट्यांमध्ये मानवी मनोवृत्तींची विभागणी करणं हेच राशीभविष्यासारखं वाटतं. व्यापार तंत्रांमधला, पद्धतींमधला सध्याचा फरक म्हटलं तर ठीक आहे. एकोणिसाव्या शतकात पौर्वात्य मन वेगळं आहे असं सर्रास म्हटलं जायचं. ही कविकल्पना व विज्ञान वा तंत्रज्ञान यात गल्लत आता होऊ नये.
मात्र धनंजय यांचं खालचं विधान पटलं नाही.
माझ्या मते सर्वच अर्थशास्त्राच्या अधिपत्याखाली आलं पाहिजे. त्यासाठी नफा म्हणजे काय याची व्याख्या बदलावी लागेल. निव्वळ पैसा, वस्तु या एककांमध्ये मोजणी न होता आत्ताचा आनंद व भविष्यातला आनंद, त्यासाठी आत्ताचा धोका व भविष्यातला धोका अशा देवाणघेवाणीचं व्यवहारशास्त्र व्हायला हवं. धनंजयना अपेक्षित मर्यादित विचार हा त्या शास्त्राचा एक विशेष भाग म्हणून असू शकेल.
हे असलं तरी कुठच्या तरी देशाची, वंशाची अशी आपली अंगभूत, अपरिवर्तनीय विचारसरणी असते हे पटत नाही. मला दिसलेल्या दोन देशांत अशा फरकांपेक्षा साम्यच अधिक दिसलेली आहेत.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
व्यापार अर्थशास्त्रापेक्षा, अर्थशास्त्र जीवनापेक्षा मर्यादित
कोणाला अजूनपर्यंत मूळ विषय पटलेला नाही, म्हणून विषयाला हा फाटा फोडण्यात मला फारसे काही वावगे वाटत नाही. ऋषिकेश यांच्या चर्चेत "व्यापार" शब्दाच्या अर्थाच्या व्याप्तीबद्दल विचारणा आहे : "व्यापाराच्या सूत्रात मानव्य मूल्ये आहेत की नाहीत?" अशी. त्यामुळे हा फाटा पुरता अवांतरही नाही.
- - -
राजेश यांचा मुद्दा तसा मूलभूत आहे, त्या मानाने हा उपप्रतिसाद उथळ आहे.
थोडक्यात माझे वाक्य "ही चर्चा सर्व-मानवी-व्यवहार पेक्षा मर्यादित असावी, नाहीतर बँडविड्थ पुरणार नाही" असे वाचावे.
- - -
"व्यापार" (कॉमर्स) या संकल्पनेची व्याप्ती "अर्थशास्त्र" (इकोनॉमिक्स)पेक्षा कमी असण्यात काहीतरी सोय असावी. उदाहरणार्थ - काही देशात कॉमर्स/व्यापार मंत्रालय" (संयुक्त राज्यांमधील मंत्रालयाचा दुवा भारतामधील मंत्रालयाचा दुवा) असे वेगळे असते. मात्र पूर्ण राष्ट्रामधील शासकीय-मानवी व्यवहारांवर अधिकार असलेला अर्थमंत्री/पंतप्रधान/राष्ट्रपती वगैरे असतो. या व्यवस्थेवरून असे वाटते : मानवी व्यवहारांपैकी काही मर्यादित व्यवहारांना "व्यापार" म्हणून वेगळे काढण्यात काहीतरी सोय असावी. अशी प्राथमिक कल्पना तरी करून घेता यावी. (तसे मर्यादित खाते वेगळे काढण्यात तोटा आहे, असे जो म्हणतो, सिद्धता करायची जबाबदारी त्याच्यावर पडते. शिफ्ट ऑफ बर्डन ऑफ प्रूफ.)
शिवाय वरील प्रतिसादात "अर्थशास्त्र" म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे? इंटर्नेटवर अशी काही व्याख्या सापडते : "a social science concerned chiefly with description and analysis of the production, distribution, and consumption of goods and services". जर या व्याख्येचा अर्थ "सर्व मानव व्यवहार" असा करायचा असेल, तर ही व्याख्या फाजिल लांबलचक वाटते. "सोशल सायन्स ऑफ [ह्युमन] इन्टरॅक्शन्स" असे काही म्हणून चालले असते. मला असे वाटते, की समाजात "अर्थशास्त्र" हा शब्द सुद्धा काही मर्यादित व्याप्तीतच वापरला जात असावा. तुम्ही म्हणता ती "सर्व व्यवहारांचे विश्लेषण" संकल्पनासुद्धा बहुधा उपयोगी आहे. मात्र त्यासाठी सध्याचा "अर्थशास्त्र" शब्द वापरला तर वाचकांचा गोंधळ होईल. नवीन शब्द घडवून वापरला पाहिजे.
माझ्या एका जुन्या पाठ्यपुस्तकात "अर्थशास्त्र" शब्दाची अशी कुठली व्याख्या होती : "मर्यादित साधनसामग्रीच्या व्यवस्थेचे विश्लेषण करणारे शास्त्र". ही व्याख्या मला आवडते. माझ्याकडे काळ मर्यादित आहे, आणि त्याची व्यवस्था मी लावतो. काही काळ एकट्यानेच - विना-इन्टरॅक्शन - खर्च होतो, त्याचेही विश्लेषण करता येते. एक-व्यक्तिक मायक्रो-इकोनॉमिक विश्लेषणे "अर्थशास्त्र"च्या या व्याख्येत सामावतात, ते योग्यच आहे.
- - -
काही-काही बाबतीत मानवी व्यवहारांच्या विश्लेषणाची अपेक्षित फलिते वेगळी असतात.
उदाहरणार्थ : "लता मंगेशकर यमनात शुद्ध गांधार लावते तो मला सुंदर वाटतो, मात्र गुलाम अलीने 'हंगामा' मध्ये लावलेला वेगळा गंधार त्या संदर्भात मला भावतो". या आत्ताचे (डेटाचे) विश्लेषण कसे करावे?
दोन कलाकारांचे आणि माझे परस्पर व्यवहार "नफा"ची व्याख्या बदलून सांगता येतील खरे. वाटल्यास यमनाचा पूर्ण इतिहास आणि कानड्याचा पूर्ण इतिहास "एन्टर्टेनमेन्ट इंडस्ट्रीच्या" देवाणघेवाणीतून सांगता येईल. मग कदाचित स्पष्ट करता येईल, की त्या दोन गांधारांची श्रुती वेगवेगळी कशी काय आहे.
पण असे विश्लेषण करण्याऐवजी लोक वेगळेच काही विश्लेषण करताना आपल्याला दिसतात. म्हणजे संगीताच्या शास्त्रानुसार. "नफ्या"चे मूलभूत स्पष्टीकरण त्यांना मुळी नकोच असते. त्यांच्या वर्णनातली स्पष्टीकरणे वेगळीच काही असतात. या प्रकारचे विश्लेषणही करण्यालायक असते, अशी माझी प्राथमिक कल्पना आहे. गांधारांच्या वेगवेगळ्या श्रुती सांगताना कलाकार-आस्वादक व्यवहारातल्या "नफा" तत्त्वाची व्याख्या रुंदावून विश्लेषण करावे असे जो म्हणतो, सिद्धतेची जबाबदारी त्याच्यावर पडते. (पुन्हा शिफ्ट ऑफ बर्डन ऑफ प्रूफ.)
आता समजा त्या व्यक्तीने "शिफ्ट ऑफ बर्डन ऑफ प्रूफ" अमान्य असेल तर काय होईल. ते स्वातंत्र्य आहेच. मात्र मर्यादित व्यापार मंत्रालय चालूच राहील. आणि "नफा"-विश्लेषणाशिवाय शास्त्रीय संगीत चर्चा चालूच राहील. अशा प्रकारे "मर्यादा आहेत" हे तत्त्व व्यवहारात कायम राहील.
- - -
व्यापार
वृषण अडकून मरणार्या माकडाच्या कथेत व्यापार हा शब्द कृती या अर्थाने आहे.
जनुकांच्या दृष्टिकोनातून हा व्यापारच!
यात तुमची कोणतीच 'कृती' नाही, कलाकारांची कृती तर नक्कीच व्यापार आहे. म्हणून यास व्यापार न म्हणणे योग्य वाटते.
जनुकांचा दृष्टिकोन - काव्यात्मक अलंकार?
"जनुकांचा दृष्टिकोन" - हा काव्यात्मक अलंकार आहे ना?
(दृष्टी शब्दाचा नेहमीचा अर्थ घेतला तर) जनुकांना दृष्टीही नसते आणि त्यामुळे दृष्टिकोनही नसतो. अर्थशास्त्रात "एजंट" असा असावा लागतो. म्हणजे हेतुपूर्वक निवड आणि कृती करू शकणारे एकक. जनुकांपाशी हे गुणधर्म असल्याचे/मानल्याचे मला माहीत नाही. (काव्यात्मक अलंकार असल्यास ह. घेतो.)
मी सांगितलेल्या उदाहरणा अंतर्गत लता मंगेशकर आणि गुलाम अली हे कलाकार एकमेकांशी थेट व्यापार करत नाहीत. बहुधा माझ्याशी व्यापार करत आहेत. सामान्यपणे गाणे ऐकण्यासाठी ऐकणारे त्यांच्या फिती/तबकड्या/जलशाची तिकिटे विकत घेतात. गाणे ऐकण्याची आणि जोखण्याची माझी कृती ही कृतीच आहे. मित्राने आग्रहाने गाणी मोफत ऐकवली, तरी ऐकून आस्वाद घेणे ही कृतीच आहे. गांधाराच्या विविध श्रुतींचे विश्लेषण व्यापार-चौकटीत करू नये असे माझेही मत आहे, पण "ऐकणे ही कृती नाही" हे तुमचे स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही.
व्यावसायिक गायक (लता मंगेशकर आणि गुलाम अली) तुमच्या मते व्यापार करत आहेत. मला हे मान्य आहे. व्यापार म्हणून विश्लेषण करून त्या-त्या गाण्यांमधल्या गांधारांच्या वेगवेगळ्या श्रुतींचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल? "लोक तिकिटे-तबकड्या विकत घेतात म्हणून गायक तसे-तसे गायले" हे व्यापारी स्पष्टीकरण बहुधा योग्य आहे. पण समाधान झाले नाही. याहून वेगळे समाधान मिळावे असे लोकांचे कुतूहल असते, हे माझे निरीक्षण तुम्हाला अमान्य आहे का?
रूपक
विज्ञानात सारेच सिद्धांत हे मॉडेल म्हणजे रूपकच असतात. सेल्फिश जीन हा शब्दप्रयोग केवळ एक अलंकार असल्याचा दावा डॉकिन्सने तीस वर्षांपूर्वी बहुदा भीतीपोटी केला असावा.
"मेंदू हेतुपुरस्सर निवड करतो पण जनुके मात्र यःकश्चित रसायने आहेत" हा दावा तर निराधार आहे. किंबहुना सगान, पॉपर यांनी तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेलाही 'विचारशक्ती' हे रूपक वापरले आहे. म्हणजे असे की मेंदूत (उजव्या?) येणारी प्रतिभा आणि जनुकांतील म्यूटेशन हे दोन्ही 'विनाकारण', अतर्क्य अशा यदृच्छेने येतात. (यदृच्छेच्या विरोधक असलेल्या पूर्वनियोजिततावादाच्या भाषेत त्या 'कारणा'ला 'नियंत्रणाबाहेरील, निरीक्षण नसलेली परिस्थिती' असेही म्हणता येईल.) तर्काच्या आणि निरीक्षणांच्या कसोटीवर टिकणार्या विचारांना मेंदू (डावा?) जपून ठेवतो तर बाकीच्या विचारांना मागे सारतो (एक्स्टिंक्शन नाही पण तात्पुरता नाकारलेला अभ्युपगम म्हणून!) हेच वर्णन उत्क्रांतीलाही लागू आहे. येथे जनुक हा काही नश्वर, रासायनिक 'इन्स्टंस' नसून एक पोटेंशिअली अमर, अशरिरी अशी 'माहिती' आहे.
(ऐकण्यासाठी) वेळेचे नियोजन करणे ही वैचारिक कृती आहे आणि त्याचाही विचार केला तर संगीत-आस्वाद हाही एक व्यापारच आहे.
संगीत निर्मितीशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर त्याचे नियम 'कोणत्या ध्वनिलहरींचे मिश्रण कोणत्या प्रकारचा आनंद देते' याच्या निरीक्षण, अनुभव आणि ठोकताळ्यांवर आधारित आहेत असे म्हणता येईल. म्हणजे मिश्रण करणे ही कृती आणि आनंद हा लाभ! (बहुदा तुमचे संगीतशास्त्राचे उदाहरण मला समजलेले नाही.)
बापरे - अशरीरी माहिती :-) !
बापरे - अशरीरी माहिती :-) !
म्हणजे अशरीरी "आत्मा" असतो त्याचे हे रूपक आहे का?
ह. घ्या. - या चर्चेचे क्षेत्र/ फुटलेले फाटे असे आहेत, की शब्दांचे अर्थ धूसर होत चाललेले आहेत. या बाबतीत शब्दांच्या व्याख्या वगैरे नेमक्या सांगून पुढे कधी चर्चा करता येईल.
भारतीयांना स्वतःची पूर्णपणे वेगळी व्यापारपद्धत?
खूप चांगले प्रश्न आणि त्यावरील चर्चा. मी तुम्ही संदर्भलेली फित पाहिली नाही आणि मला तुमच्या "भारतीयांना स्वतःची पूर्णपणे वेगळी व्यापारपद्धत" आहे की नाही, असे असते की नसते, कशी असावी वा नसावी ह्या मध्यवर्ती कल्पनेला धरुन प्रतिसाद द्यायचा आहे. प्रतिसाद देतांना भारतीय व्यापाऱ्यांची एक परंपरागत पद्धत आहे (किंवा असावी) व ती इतरांपेक्षा नैतिक, आधुनिक, असावी की कसे, असे तुमच्या प्रश्नांत गढले गेले आहे, असे मी समजतोय.
भारतातील वेगवेगळे कालखंड संदर्भ-
१. प्राचीन (-५००० ते ० वर्षे)- महाभारत, सिंधूनदी खोऱ्यातील मानवीवस्ती (मोहेंजोदरो), चाणक्याचे (कौटील्यिय) अर्थशास्त्र (http://www.khapre.org/portal/url/keywords/नीतिशास्त्र.aspx) (http://books.google.co.in/books?id=K_CCZGzSw_AC&printsec=frontcover#v=on...), व्यवहाराला गणित, भाषा लागते हे गृहीत धरुन त्याकाळी विकसीत झालेले ज्ञान
२. ऐतिहासिक (० ते २१०० वर्षे)- सातवाहन साम्राज्य, नाणेघाट, विजयनगर साम्राज्य, इतर संस्थाने, ब्रिटीशराज्य व आताचा भारत
३. दुसऱ्या महायुद्धात भीषण टंचाई असतांना भारतीय व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी व काळाबाजार
युरोपातील कालखंड-
१. फ्रेंच व इतर क्रांत्या, आर्थिक व्यवहारावरील नुकतेच वाचलेल्या एका पुस्तकातून मिळालेले संदर्भ, औद्योगिक क्रांती (१७८० च्या आसपास स्थापन झालेला स्टील कारखाना स्वीडनमधे आहे- http://www.ovako.com/index.asp?r=277)
२. पहिले आणि दुसरे महायुद्ध ह्यावरील अनेक संदर्भ- मानवी भावना, व्यवहार, ई
३. अनेक अर्थतज्ञांनी लिहिलेली पुस्तके (संदर्भ- अच्युत गोडबोले ह्यांचे "अर्थात")
अमेरीका खंड-
१. यादवी, बोस्टन टी-पार्टी, युरोपातील लोकांनी नामशेष केलेले मुळची संस्कृती ह्याबद्दलच्या पुस्तकातून लक्षात राहीलेले अनेक संदर्भ,
२. रुट नावाच्या पुस्तकातून लक्षात राहीलेले अनेक संदर्भ
अशी सगळी विदागारं हेच सांगतात की व्यापारात दोनच व्यक्ती असतात- घेणारा व देणारा. घेणाऱ्याला ते हवे असते म्हणून तो घेतो. (मग ती गरज कोणत्याही लेबलाखाली आली तरी पुरते). ह्यांच्यातील व्यवहाराला व्यापार म्हणले तर असा व्यापार अनादीकाळापासून पृथ्वीच्या पाठीवर सगळीकडे चालू आहे. द्युतातून द्रौपदीला पणाला लावणे काय, आणि युरोपातील गुलामांचा, स्त्रीयांचा व्यापार काय, एकच पातळी.
अनेक अर्थतज्ञांनी लिहिलेली पुस्तके (संदर्भ- अच्युत गोडबोले ह्यांचे अर्थात) अर्थात मधील संदर्भ पाहता सध्या जगभर जे "इकॉनॉमीक्स" वापरले जातेय ते बळी तो कान पिळी तत्वावर चालू आहे. पण संशोधन, प्रारुपे, संस्थात्मक कार्ये ह्यांच्या माध्यमातून भारताबाहेरच व्यवसायाला आधुनिक रुप आले आहे असे म्हणता येईल. ते रुप एखाद्या भारतीय पारंपारीक व्यापारापेक्षा निकस आहे असा दावा जर केला जात असेल, तर ते पटणे अवघड आहे.
विविध व्यापार पद्धती
व्यापार म्हणजे एखादी वस्तु विकत घेऊन त्याची पुनर्विक्री करणे असा मी घेतो. (वस्तु म्हणजे सेवा देखील) वस्तु स्वतः उत्पादन करून विकणे नाही व्यापारात येत नाही.
व्यापारात भारतीय पाश्चिमात्य अशा वेगळ्या पद्धती नसाव्यात. पण व्यापारात वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही उदाहरणे खालील प्रमाणे.
आदिवासी (बार्टर) पद्धतः म्हणजे मूल्य रुपयात न चुकवता ते दुसर्या वस्तुत चुकवणे. बहुतेक देशात अशा पद्धतीला मान्यता नाही. याचे कारण कर हा किमतीवर लावला जातो.
रोख पद्धतः सर्व व्यवहार रोखीत करायचा. यात नन्या लोकांशी व्यवहार करता येतो.
उधार पद्धत: उधारी मान्य म्हणजे माहितीच्या माणसांबरोबर व्यापार.
एकच दामः किंमत पूर्वनियोजित आणि घासाघीस नाही.
घासाघीस पद्धत : प्रत्येक वस्तुची किंमत जास्त सांगायची मग त्यावर घासाघीस करायची. यात नेहमीच्या व्यापार्यांना फायदा असतो. नवशिका मात्र मार खातो.
डिस्काउंट पद्दतः ही पद्दत घासाघीस पद्धतीचा एक प्रकार आहे. पण हा डिस्काउंट पुस्तकात येत नसेल तेव्हा.
सचोटी पद्धतः म्हणजे नफ्याचे प्रमाण अमुक टक्के (बाजारात मान्य ते) हे नक्की करून केलेला प्रकार. यात माल नेहमी खपाचा लागतो व नाशवंत नसावा लागतो. येथे गुडविल कमावले जाते
हात मारणारी पद्धत : सचोटी पद्धतीच्या विरुद्ध, बाजारभावाचा वा कमतरतेचा फायदा घेणे.
लिलाव/बोली पद्धतः जास्त संघटीत थिकाणी शेयर बाजारासारखे कमॉडिटीज मार्केट असते. तिथली पद्धत ही खुली बोली ची असते.
व्यापारात बरेचदा विश्वास लागतो. कारण माल पुरेपुर मिळणे, योग्य प्रतीचा असणे हे ताबडतोब तपासणे कठीण असते. म्हणून काही जण अगदी विस्तारित कुटुंबाशी वा जातीशी व्यवहार करतात. याला कौटुंबिक/जातीय जाळे म्हणता येईल. ही पद्धत पण सर्वदूर आहे. कित्येकदा याला भ्रारतीय पद्धत मानली जाण्याची रीत आहे.
माझ्या मते या सर्व पद्धती एकत्रितपणे नांदतात. यातील कुठली चांगली/सर्वोत्तम हा भेदाभेद कसा करता येईल.
अरे हो असलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत देण्याची पद्धत राहून गेली.
प्रमोद
व्याख्या
एखादी वस्तु विकत घेऊन ती पुन्हा विकल्यास ती वस्तु बदललेली नसेल काय? उदा. तयार कपडे विकणे.
तयार कपडे विकण्याआधी एक मोठी साखळी आहे आणि प्रत्येक टप्प्यावर काहीतरी मूल्यसंवर्धन (वॅल्यु ऍडिशन) होत आहे. कापूस विकल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून कापड बनवणारा व्यावसायिक त्या कापडाची विक्री करतो तेव्हा तो कापूस, त्यानंतर करावी लागणारी वाहतूक, कापड निर्मीती या विविध सेवांना एकत्रितपणे विकत असतो. तसेच तयार कपड्याच्या विक्रेत्याविषयी सांगता येईल. तयार कपड्याचा विक्रेता तयार कपडे, त्या कपड्याची उत्पादकापासून वाहतूक, विकली जाईपर्यंत त्या कपड्याची राखलेली निगा या वस्तुंची/ सेवांची विक्री करत असतो. यातील काही सेवा त्याने स्वत: पुरवलेल्या असतात. तेव्हा तुम्ही सांगितलेल्या व्यापाराच्या व्याख्येनुसार कुठल्या वस्तुच्या विक्रीस व्यापार समजले जावे हे कळत नाही.
सहमत
आणि सेवा ही बहुधा स्वतः उत्पन्न करून विकलेली खूपदा दिसते.
त्यामुळे वरील व्याख्या अधिक स्पष्ट हवी. सहमत आहे.
नाहीतर दिलेल्या यादीशी बराचसा सहमत आहे.
- - -
(सचोटी विरुद्ध हात मारणे वेगळ्याच अक्षावर आहे, तो अक्ष वेगळा काढता...)
बार्टर वि. बाकी-सर्व पद्धती या दोन शाखा आहेत.
बाकी-सर्व मध्ये रोख विरुद्ध उधार-वगैरे अशा शाखा आहेत.
- - -
एक-किंमत, घासाघीस, लिलाव वगैरे बहुधा तत्त्वतः एकच पद्धत आहे. ते असे.
एक-किंमत पद्धत विचारात घेऊया : अतिशय लहानपणी (माझी स्मृती मागे जाते तोपर्यंत) आठवले, तर अशी कुठली किंमत ठरवलेली मला आठवत नाही. अशी कुठली किंमत शाळेत शिकवलीही नाही. त्यामुळे आजकाल जेव्हा बाजारात जातो, आणि "सब माल १० रुपया" अशी दुकाने मला दिसतात; ती किंमत विक्रेता-गिर्हाइकांनी मिळून "सोयिस्कर" म्हणून ठरवलेली असते. म्हणजे अप्रत्यक्ष रूपाने घासाघीस/लिलावच केलेला आहे.
घासाघीस म्हणजे सुद्धा लिलावच. "कोथिंबिरीची जुडी १५ ऐवजी १२ रुपयांना दे, नाहीतर दुसर्या गाड्यावर १२ रुपयाला जुडी आहे, तिथून विकत घेतो" = वेगवेगळ्या गाड्यांनी केलेला रिव्हर्स-लिलाव. (लिलाव आणि प्रति-लिलाव यांच्यात काहीच तात्त्विक फरक नाही.)
किंवा "लिलाव म्हणजे घासाघीसच" असे म्हणा.
सहमत व आणखी
बार्टर, रोख व उधार पद्धत या विनिमयाच्या (एक्सचेंजच्या) पद्धती आहेत, व्यापाराच्या (ट्रेडच्या) नाही.
सेवेचा व्यापार
सेवेचा व्यापारः कमी होत असला तरी होताना दिसतो. काही ट्वॅवल एजंट स्वतःच्या नावावर बिल देतात मात्र प्रत्यक्ष सेवा देणारा दुसराच असतो.
एकच किंमत, घासाघीस आणि लिलाव या प्रत्यक्ष बाजारात विभिन्न पद्धती आहेत. या तिन्ही पद्धती मागणी-प्रुरवठा तत्वाने एकच असतील तरी. एकंदर बाजार पाहिला तर किंमत ठरवण्याची पद्धत ही विशिष्ठ व्यवहारात फरक करते.
एकच किंमत लावणारे बरेच असतात. बाजारभावाप्रमाणे, मागणी प्रमाणे किमतीत चढउतार होत असतील. पण घासाघीस करण्यास त्यांचा स्पष्ट नकार असतो. सचोटीने व्यापार करण्याच्या पद्धतीच्या हे जवळ जाते.
कंपनीच्या दुकानात (जिथे माल विकणारे नोकर असतात) असे घडते.
घासाघीस पद्धत ही वेगळी. काही जण त्याला एक खेळ समजतात. यातही गुप्त घासाघीस म्हणून एक उपप्रकार आहे. घाऊक भाजी बाजारात, हातावर रुमाल टाकून केवळ हाताच्या खुणांनी ही केली जाते. घासाघीस उघड झाली तर पुढचा गिर्हाईक त्याच भावापासून घासाघीस करायला लागतो. घासाघीस पद्धत ही सर्वसामान्य पणे असंघटीत (अनऑर्गनाइज्ड) क्षेत्रात वापरली जाते. त्याच बरोबर मोठ्या किमतीच्या व्यवहारात वापरली जाते.
लिलाव पद्धती ही सर्वात विवेकी (रॅशनल) पद्धती समजली जाऊ शकते. मागणी प्रुरवठा यांचे गणित इथे कदाचित पक्के जुळत असावे.
या तिनही पद्धती एकाच वेळी एकाच ऑपरेटरने वापरलेली नसते. म्हणून त्या वेगळ्या पद्धती.
प्रमोद
किमंत वृद्धी
किंमत वृद्धी हा प्रकार उत्पादनात मोडतो असे माझे मत आहे.
मात्र हे बरेच धुसर आहे. म्हणजे घाऊक व्यापार्याकडून माल घेऊन तो सुटा करुन बाजारात विकणे, निवडून विकणे वगैरे गोष्टी व्यापारात मोडतात (माझी व्यापाराची व्याख्या ही तात्वीक नसून अनुभवातली आहे.)
उत्पादन नेहमीच कुठूनतरी कच्चा माल घेणे त्यावर प्रक्रिया करणे व विकणे या स्वरुपाचे असते. शेतकरी/विणकर हा उत्पादक तर त्याच्या कडून माल घेणारा व्यापारी अशी ढोबळ व्याख्या केली जाते.
किती टक्के किंमत वृद्धी होते वा किती मजुरी दिली जाते यावर ते अवलंबून असावे.
प्रमोद
मूल्यवर्धन
उत्पादन नेमके कशाचे होत आहे? तयार कपडे विकतांना रिटेल विक्रेता त्यात काहीच मूल्यवर्धन करीत नाही काय? हा विक्रेता काहीतरी सेवांचे उत्पादन (कपड्याच्या उत्पादकापासून माल बाजारपेठेपर्यंत आणणे, ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार कपडे स्टॉकमध्ये ठेवणे वगैरे ) करत असतोच. अनेक सुट्या वस्तु/ सेवा एकत्रित केल्यानंतर ग्राहकापर्यंत वस्तु/ सेवा पोहोचते. तेव्हा काटेकोरपणे पाहील्यास ग्राहकापर्यंत वस्तु पोचण्याच्या प्रत्येक टप्प्यात उत्पादन सुरू असते. (तुम्ही उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग समजत आहात काय? मग शेतीला उत्पादनात वर्गीकृत करण्यात अडचणी निर्माण होतात.)
आपला व्याख्या देण्याचा प्रयत्न स्तुत्य वाटला. पण अनुभवातील व्याख्या आणि तात्त्वीक व्याख्या यातला फरक मला समजला नाही.
असे ढोबळ वर्गीकरण केले जाते हे मान्य आहे. शेतकरी शेती करतो (ऍग्रीकल्चर). वीणकर कापड विणतो (मॅन्युफॅक्चरिंग), तयार कपड्याचा विक्रेता कपडे विकतो (सर्विसेस) असे वर्गीकरण त्यामानाने सोपे आहे. अर्थशास्त्रातील प्रचलित व्याख्या वापरल्यास या प्रक्रियेतील प्रत्येक जण व्यापारात (ट्रेड) गुंतलेला आहे. उत्पादक, व्यापारी या ढोबळ व्याख्या वापरल्यास मात्र माझा गोंधळ उडतो.
एकूणातच ही चर्चा शब्दांच्या अर्थांबाबत एकमत नसल्याने लांबत आहे. तेव्हा यापुढे मराठी संज्ञांसोबत कंसात इंग्रजी शब्द दिल्यास संवाद सुलभ होईल.
अनुभवातली व्याख्या
तात्विक व्याख्या काटेकोर असावी लागते. या व्याख्येचे तसे नाही.
व्यापारी (माझ्या माहितीतले) आपल्या व्यवसायाकडे कसे बघतात यावर माझी ही व्याख्या अवलंबून आहे. अर्थात शब्दकोशात दोनतीन व्याख्या असतीलच.
मूल्यवर्धन म्हणजे उत्पादन हे तत्वाप्रमाणे बरोबर आहे. माल विकताना नुसते हसून बघण्याने,आदबीने वागण्याने मूल्यवर्धन होते. पण व्यापारी मात्र त्याला आपली कला समजतो.
ढोबळ भाषेत ५ -१० टक्यापर्यंत मूल्यवर्धन गणले जाऊ नये. यातील टक्केवारी काही कोणी काटेकोरपणे लिहू शकणार नाही.
शब्दांच्या अर्थाबाबत कधी कधी मी फजी लॉजिकच्या बाजुचा होतो. (काटेकोरपणा करण्यास कष्ट लागतात ते घेण्याची तयारी नाही.)
प्रमोद
दलाली
दलाली सेवेसच तुम्ही व्यापार म्हणत आहात काय?
नाही
दलालीत माल विकत घेतला जात नाही आणि विकला जात नाही.
प्रमोद
भारतीय पद्धत
हे नवीन आहे. जरा अधिक विस्ताराने सांगता येईल का?
आगाऊ धन्यवाद.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
भारतीय पद्धत
तुमची विनंती भारतीय पद्धतीबद्दल विस्तारीकरणाबाबतेची दिसते म्हणून त्याबद्दल.
भारतात काही जाती विशिष्ट प्रकारच्या व्यापारात गुंतलेल्या दिसतात (स्टेशनरी, हार्डवेयर, साव़कारी, उपहारगृहे, किराणा या सर्वांसाठी वेगवेगळ्या जाती/जमाती दिसतात.) उत्पादनावर वा सेवावर आधारित जात हा जसा प्रकार आहे त्यातलाच हा दुसरा प्रकार. पूर्वीच्या काळी जेव्हा संपर्काची साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा वेगवेगळ्या बाजारपेठातून एकाच विस्तारित कुटुंबातील व्यक्ति कार्यरत असायच्या. एकमेकापासून स्वतंत्र पण सचोटीवर आधारलेले व्यापार ते एकमेकात करत असत. (हे सर्व माझे कयास आहेत.) सावकारीत (खरेतर योग्य शब्द बँकिंग) हुंडी (आजकालचा इतिहास जमा होत जाणारा डिमांड ड्राफ्ट) वटवणे हे एक विश्वास सचोटीचे उदाहरण. एके काळी कुणातरी महाराष्ट्रातल्या सावकाराची हुंडी इस्तांबुल मधे वटायची अशी त्याची ख्याती होती. म्हणजे त्या सावकाराची निशाणी ओळखणारे (वा कुटुंबातले) तिथे होते असे दिसते.
असे असणे फक्त भारतासाठीच लागू होते का? मला असे वाटते की नाही. युरोपात ज्यु लोकांची सावकारीत मक्तेदारी होती हे त्याविरुद्धचे उदाहरण. दुसरे असे की संपर्क व्यवस्था सुधारल्यावर अशा मक्तेदारीची गरज कमी होत जाते. विस्तारित कुटुंब व्यवस्स्थेतील व्यापार आणि कंपन्यांच्या चेन मधील व्यापार यात कंपन्या वरचढ दिसतात. मागासलेल्या ठिकाणी (भारतासाऱख्या) हे टिकून आहे. तर पाश्चिमात्य देशात मॉम-पॉप स्टोर्स चा अंत होत चालला आहे. या व्यवस्थेला भारतीय म्हणण्याचा प्रघात म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती, ठरवून केलेले विवाह (अरेन्जड), वैवाहिक नितीमत्ता यांना भारतीय म्हणण्यासारखे आहे. हे सर्वत्र होते काही ठिकाणी त्याचा नायनाट झाला आहे. भारतात झाला नाही.
मी तुनळीवरचा कार्यक्रम पाहिला नाही. पण मॅनेजमेंट गुरु हे काहीतरी (च) संकल्पना करुन विकणारे असतात असे माझे मत आहे. 'मॅनेजमेंट' एम्.बी.ए. वगैरेबद्दल मला आस्था नाही. कुणी माणूस भारतीय व्यापारी मूल्यांबद्दल बोलतो तेंव्हा तो असेच काहीसे बोलणार असे मला वाटले म्हणून हे लिखाण.
प्रमोद
काय ध्यान आहे...
हा देवदत्त पटनाईक टेड इंडीयावर एकदा दिसला होता. तुमच्या विनंतीवरुन पुन्हा एकदा यूट्यूबवर पाहिला. कशानेही पटकन इतके प्रभावित होऊ नका हो. ते सर्प दृष्टी गरुड दृष्टी वगैरे सुरू झाल्यावर माझा तरी पेशन्स संपला बुवा. बोलबच्चनगिरी करुन सामान्य लोकांना मूर्ख बनवणार्या बालाजी तांबे, शरद उपाध्ये वगैरे यादीत आणखी एकाची भर पडली.
(यूट्यूबला तूनळी म्हंटले की मला शिसारी येते)
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
वेगळेपण
यशाच्या रस्त्यावर आपण मागे राहिलो आहोत ही वस्तुस्थिती सहन होत नाही तेव्हा आपण यशस्वी झालेल्या पाश्चात्यांसारखे हरामखोर नाही. आपली जगण्याची पद्धत वेगळी आहे, अधिक उच्च प्रकारची आहे असे सांगून दुखावलेल्या अहंकारावर फुंकर घातली जाते.
आमची पद्धतच वेगळी आहे असे म्हणण्याच्या कसरतीतून भारताची व्यापाराची पद्धत वेगळी- उच्च - मानवी भावनांना वाव ठेवणारी आहे असे आर्ग्युमेंट आलेले आहे.
(आपल्या आयुर्वेदाला रोगनिवारणात म्हणावे तेवढे यश येत नाही हे मान्य करणे टाळण्यासाठी आयुर्वेद ही नुसते रोगनिवारण शास्त्र नाही संपूर्ण जीवनपद्धती आहे असा दावा केला जातो- इथून पळावे आता).
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)
सहमत आहे
थत्त्यांनी नेमक्या शब्दात दुखरी नस पकडली आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
+
भौतिक सुखे - अध्यात्मिक प्रगती हे आर्ग्युमेंटही त्याच प्रकारचे. :(
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)