योगायोगांवर बोलू काही ....

ज्याच्या आयुष्यात योगयोग नाहीत असा मनुष्य शोधून सापडणार नाही. आपण आपल्या व इतरांनी सांगितलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या योगायोगांकडे पाहिलं तर योगायोगाचे अनुभव खालील प्रकारांत मोडतात असं आढळून येतं.
१) एखादी गोष्ट अमुक वेळी व्हावी असं वाटणं नी त्याच वेळी ती तशी होऊ शकत नाही याबद्दल खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे ती विसरून गेल्यावर अचानक तीच गोष्ट पाहिजे तशी पाहिजे त्यावेळी होणं.
२) एखादा फजितीचा प्रसंग समोर दिसणं, काय करावं ते न सुचणं नी त्यावेळी विचार न करता केलेल्या धडपडीमुळे त्यातून वाचणं.
३) एखादा पदार्थ खायची इच्छा होणं नी थोड्याच वेळात ती अनपेक्षितपणे पूर्ण होणं.
४) एखाद्या बाबतीत आपल्याकडे असलेली चुकीची माहिती बरोबर माहितीपेक्षा अधिक फायद्याची ठरणं.
५) कुठलीही फारशी अपेक्षा न बाळगता केलेला एखादा क्षुल्लक प्रयत्न मोठ्या फायद्याचा ठरणं.

संबंधित व्यक्तींकडून योगायोगाचा जो तपशील सांगितला जातो त्यावरून योगायोगापूर्वी त्या व्यक्तीच्या शारीरिक/मानसिक स्थितीच्या बाबतीत खालीलपैकी काही गोष्टी दिसून येतात. कदाचित योगायोगासाठी ती पार्श्वभूमी आवश्यक असावी.
१) इच्छा तीव्र असते तर कधीकधी इच्छेचा संपूर्ण विसर पडलेला असतो.
२) जवळ असलेल्या (चुकीच्या अथवा बरोबर) माहितीच्या आधारावर यथाशक्ति प्रयत्न चालू असतात.
३) मनावर अगदी थोड्या वेळाकरता कमालीचा ताण येऊन गेलेला असतो.
४) पुरेसं कारण नसताना काही न ठरवलेल्या कृती केल्या जातात.
५) काही बाबतीत निरिच्छपणा असतो.
६) प्रतिकूल परिणाम स्वीकारायची तयारी झालेली असते.

खालील पूर्वअटींची पूर्तता केल्यास योगायोगासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार होऊ शकेल असं वाटतं:
१) पक्का निर्धार करणे
२) असलेल्या माहितीच्या आधारानी कृती सुरू करणं; कृती सुरू करण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण व बिनचूक माहिती असलीच पाहिजे असा आग्रह न धरणं.
३) मनावरचा ताण जाणीवपूर्वक सहन करणं.
४) ठरवलेल्या कृतींबरोबरच आतला आवाज सांगेल त्याही कृती (फारसं विश्लेषण न करता) करणं.
५) अपयश आल्यास काय करायचं त्याचा आराखडा तयार ठेवणं.

आश्चर्यकारक सुखद योगायोग प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवे असतात. विशेषतः प्रयत्नांच्या फलद्रूपतेविषयी खात्री नसेल तर! पण वर सांगितलेल्या पूर्वअटींची पूर्तता करून आपल्याला पाहिजे तेव्हा आवश्यक ती पार्श्वभूमी तयार करून योगायोगाचे अनुभव घेता येतील असं वाटतं. (मग कदाचित त्यांना योगायोग म्हणता येणार नाही).

तुम्हाला काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

नकोसा झालेला विषय?

सदर चर्चाप्रस्तावावर आत्तापर्यंत प्रतिसाद ० ; वाचनसंख्या १३४, म्हणजे फारशी समाधानकारक नाही. बहुधा हा प्रस्ताव लिहीपर्यंत एवढ्यातल्या एवढ्यात 'उपक्रम'वर नशीब, योगायोग, अंधश्रद्धा, विज्ञान, यांच्याशी संबंधित विश्लेषणात्मक लिखाण जरा ज्यास्तच झाल्यामुळे सध्यातरी तसं लिखाण उपक्रमींना नकोसं झालं असावं असं दिसतंय.

हे लिहिण्यामागे एक उद्देश प्रतिसादांचा भोपळा फोडण्याचा होता हे यापुढील वाचकांच्या (कोणी निघालेच तर) लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

 
^ वर