माणूस लिहितो कशासाठी?

माणूस लिहितो कशासाठी? एक स्वतःसाठी. दोन सगळयांसाठी. पूर्णपणे स्वतःसाठी ते असतं जे त्याच्या मनात दाटत असतं, तो गुदमरत असतो आणि असह्य होतं म्हणून ते व्यक्त करण्यासाठी तो लिहितो. या लिखाणाची त्याला प्रतिक्रिया वाचकांकडून आली नाही आली, चांगली मिळाली नाही मिळाली काही फरक पडत नाही. कारण कुणीतरी वाचावं म्हणून ते लिहिलेलंच नसतं. दुसरं सगळ्यांसाठी म्हणजे मित्रपरिवार, जवळचे लोक आणि अनोळखी वाचक यांसाठी ते लिखाण असतं ज्यावर मिळालेल्या प्रतिक्रियेने लेखक सुखावतो किंवा दुखावतो. म्हणजे जशी प्रतिक्रिया येते तसं. माझ्याही लेखांच्या, कवितांच्या प्रतिक्रिया मला प्रेरणा देतात. चांगलं लिहिण्यासाठी, चुका सुधारण्यासाठी. असं लिहितानाच मुळी प्रतिक्रियांचा किंवा वाचकांना भिडावं आवडावं असं लिहिण्याचा प्रयत्न असतो. आणि भाषेत वाक्प्रचार, अलंकार हे यथायोग्य पणे आपल्या भावना शब्दात मांडता याव्यात यासाठीच असतात.

कुणी तरी म्हटलं आहेच की जो कवी असं म्हणतो की मी फक्त स्वतःसाठी लिहितो तो कुठेतरी स्वतःशी प्रतारणा करत असतो. कारण तुम्ही एकदा तुमचं साहित्य जनतेसमोर किंवा मित्रांसमोर आणलं की चांगलं लिहीत राहण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर येतंच. उस्फूर्त साहित्याला थोडया वास्तवतेच्या भानाची जोड दिली की वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणं शक्य होतं. तुमची कविता त्याला त्याचीच कहाणी वाटू लागते. तीच तुमची दाद असते आणि पोचपावतीही. सुजाण रसिकांच्या काळजाला हात घालणं कुणाला इतकं सोप्पं वाटत असेल तर ते चूक आहे. आणि त्याच वेळी आपलं लेखन सगळ्यांनाच आवडेल असं वाटणंही चूक आहे. कारण त्यात वाचकाच्या आवडीनिवडीचाही भाग असतोच की. तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला सुचेल तेच लिहून वाचकांच ॠण फेडणं यात लेखकाच्या लेखनाच सार्थक आहे. अपेक्षा वाढतात हे खरंच आहे पण अपेक्षा निर्माण केल्यावर त्या पूर्ण करायला नकोत का? अता तुम्ही म्हणाल की मग असं सारखं तोच दर्जा टिकवणं कसं जमेल? यावर थांबणे हा उपाय आहे. जोपर्यंत दमदार आणि कमीत कमी स्वतःला (मनापासून) आवडेल असं काही सुचत नाही तोपर्यंत थांबावं. सुरेश भट ज्याला थांबता येत नाही तो खरा कवी नव्हे म्हणतात ते यासाठीच. कारण नाहीतर तुम्ही अपेक्षांच्या पुरात वाहून जाल. तुम्हीही आणि तुमचे लेखनही.

तुमचं काय मत आहे?

(साक्षर) अभिजित

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

आपल्याशी पुर्णपणे सहमत....


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

मी कशासाठी लिहितो?

एका वाक्यात - तेही इंग्रजी सांगायचे तर 'बिकॉज आय कान्ट हेल्प इट!'
सन्जोप राव

माझं मत..

असं लिहितानाच मुळी प्रतिक्रियांचा किंवा वाचकांना भिडावं आवडावं असं लिहिण्याचा प्रयत्न असतो.

Good!

कारण तुम्ही एकदा तुमचं साहित्य जनतेसमोर किंवा मित्रांसमोर आणलं की चांगलं लिहीत राहण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर येतंच.

असहमत! माणसाने त्याला वाटेल ते, चाहेल ते, लिहीत जरूर राहावं. ते चांगलं आहे की वाईट, किंवा चांगलं लिहीत राहण्याच्या उत्तरदायित्वाचा वगैरे मुळीच विचार करू नये असं मला वाटतं. चांगलं की वाईट हे वाचकांना ठरवू द्यावं. ज्यांना आवडेल ते "चांगलं" म्हणतील, ज्यांना आवडणार नाही ते "वाईट", किंवा "चांगलं नाही", असं म्हणतील आणि फार फार तर पुन्हा वाचणार नाहीत!

उस्फूर्त साहित्याला थोडया वास्तवतेच्या भानाची जोड दिली की वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणं शक्य होतं.

काहीसा सहमत!

आणि त्याच वेळी आपलं लेखन सगळ्यांनाच आवडेल असं वाटणंही चूक आहे. कारण त्यात वाचकाच्या आवडीनिवडीचाही भाग असतोच की.

Exactly! त्यामुळे आपल्या मनासारखं स्वान्तसुखाय लिहीत राहावं इतकंच मी म्हणेन. कुणाला आवडल्यास उत्तम, न आवडल्यास फारच उत्तम!! ;)

तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

स्वत:साठी आणि इतरांसाठीही!

मुळात एखादा माणूस आपल्याला जे म्हणायचे आहे ते लेखी स्वरुपात का मांडतो ह्याचा विचार व्हायला हवाय.
माझ्या स्वत:च्या बाबतीत मी हे सांगू शकेन की आपल्याला आलेला अनुभव इतरांच्यात वाटावा(बरेचसे मोठे लेखकही हेच करतात....लेखनाच्या दर्जाबाबत नसले तरी ह्या एका बाबतीत माझी आणि त्यांची कुंडली जमतेय हेही नसे थोडके!). त्यात इतरांना सहभागी करून घ्यावे असे वाटले म्हणून लिहायला लागलो. हे अनुभव वाचून काही लोकांना त्यांच्या गतस्मृतीत डोकावून बघावेसे वाटले तरी लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटते. मात्र आपल्या लिखाणावर बरा/वाईट अभिप्राय आलाच नाही किंवा त्याची दखलच घेतली गेली नाही तर वाईट जरूर वाटते.तरीही लिहिण्यामागचा एक हेतू स्वान्तसुखाय असावा असे वाटते ;म्हणजे मग जो देगा(अभिप्राय) उसका भला आणि जो नही देगा (अभिप्रायच हो ...वाचूनही) उसका भी भला आणि अजिबातच दखल कुणी घेतली नाही तरी त्यांचे ही भलेच होवो ('पुराणिक बुवांनी पुराण सांगत जावे.कुणी ऐकायला आहे अथवा नाही ह्याची काळजी करू नये'!)अशी धारणा मनात बाळगावी अशा मताचा मी आहे. तरीही केवळ लोकांना अमूक एक पद्धतीचे लेखन आवडते म्हणून मी असेच लिहिले पाहिजे हे म्हणणेही तितकेसे सुसंगत वाटत नाही. अर्थात असे लिहिण्याला आक्षेप नाही परंतू पाठिंबाही नाही. म्हणजेच ज्याला जे आणि जसे जमेल तसे त्याने लिहावे. कुणाला आवडले तर छानच आहे. नाही आवडले तरी आपले मन मोकळे होते हेही नसे थोडके.
त्यातून कुणाला काय आवडेल आणि आवडणार नाही ह्याचे ठोकताळे बांधता येत नाहीत(काही मोजक्या लोकांना ते जमते म्हणुनच ते लोकोत्तर ठरतात...असो) त्यामुळे 'गुरुदेव म्हणाले लिही!म्हणून लिहिले!' इतक्या सहजतेने लिहावेसे वाटले तर लिहावे.लिहिल्याशिवाय तरी कसे कळणार की आपण कसे लिहितो?तेव्हा लिहित राहा!

१००% सहमत !

१००% सहमत !

मानवाने आपले विचार ईतरापर्यंत पोहचवण्यासाठी विविध कला सुजाण केल्या त्यातील एक लेखन कला !
माझे एक मत आहे एक विचार आहे जर आपल्याला काही बोलायचे आहे अथवा लिहायचे आहे ते बिनधास्त लिहावे / बोलावे !
कोणास आवडो अथवा ना आवडो !

कर्म करत जा फळाची अपेक्षा नको - गीता नूसार

लेखन करीत जा प्रतिसादांची अपेक्षा नको - अनुभवा नूसार !

राज जैन

 
^ वर