हि-यावद्दलची माहीती.१ कॅरेटपेक्षा कमी वजनाचे शुद्ध खरे हिरे मुंबईत मिळण्याचे ठीकाण.

हि-यावद्दलची माहीती विस्तृत पणे हवी आहे १ कॅरेटपेक्षा कमी वजनाचे शुद्ध खरे हिरे मुंबईत मिळण्याचे ठीकाण. शिवाय सोन्याच्या कींमती वाढण्याचे मुख्य कारण काय? कींमती कमी केव्हा होवू शकतात

लेखनविषय: दुवे:

Comments

सोन्याच्या किंमती कमी होणार नाहीत

हिर्‍यांचे अनेक ब्रँडस् आहेत. तनिष्क, अस्मी इ. अस्सल हिरे विकणार्‍या अनेक पेढ्या आहेत. (गाडगीळ, पेठे, लागू बंधू हे मराठी सराफ विश्वसनीय आहेत.) मोठे सराफ हिरा खरेदी केल्यास त्याच्यासोबत अस्सलतेचे प्रमाणपत्र देतात. त्याचा उपयोग फेरखरेदीच्या वेळी होतो. पण सोन्याप्रमाणे हिरा हा रोकडसुलभ आणि सहजतेने फेरविक्री न होणारा आहे. म्हणजे तुम्ही शुद्ध सोन्याचे वळे घेऊन सराफाकडे गेलात तर तुम्हाला लगेच बाजारभावाने त्याची किंमत मिळते पण हिरा जेथून घेतला तेथेच परत द्यावा लागतो तोसुद्धा अधिक कॅरटचा मोठा हिरा घेणार असाल तर. उत्तम मोठा हिरा २५००० रुपयांच्या खाली मिळत नाही. (छोटे हिरे मात्र स्वस्त असतात.)
हिर्‍याची किंमत चार 'सी' निकषावर ठरते ( १) कट - पैलू २) कॅरट - वजन ३) क्लॅरिटी - निर्दोषता ४) कलर - छटा
उत्तम हिरा बहुपैलूंनी युक्त, अधिक कॅरटचा, तेजस्वी, आत भेग नसलेला आणि एकाच रंगाची नीतळ छटा दाखवणारा असतो. निष्णात पारखी केवळ नजरेने हिर्‍याचे मोल जाणतात. पण हिर्‍याची अस्सलता शास्त्रीयदृष्ट्या पाहायची असेल तर अल्ट्रा-व्हायोलेट चाचणी करतात.
जगातील सर्वोत्तम हिरे दक्षिण आफ्रिकेतल्या खाणींतून मिळतात. हिरा हे रत्न आहे. हौसेबरोबरच भारतीय लोक ज्योतिषशास्त्रातील ग्रहपीडा शांतीचा उपाय म्हणूनही सोन्याच्या अंगठीत हिरा धारण करतात. हिरा हे शुक्र ग्रहाच्या अमलाखाली येणारे रत्न आहे. हिरा धारण केल्यास लक्ष्मी घरात नांदते व ऐश्वर्य लाभते, अशी समजूत आहे.

सोन्याच्या किंमती वाढण्याचे कारण जगभरची आर्थिक अनिश्चितता आहे. सोने अडीअडचणीला कधीही मोडून पैसे उभे करता येत असल्याने लोकांचा कल घरात सोने साठवण्याकडे असतो. जेव्हा जगात आर्थिक पेचप्रसंग येतो व कुठल्याच चलनाची घसरण रोखता येत नाही अशावेळी सोने आणि स्वीस चलन यातील गुंतवणूक वाढते आणि त्यांचे मूल्यही वधारते. भारतात सोन्याला लग्नसराईमुळे कायम मागणी असते. भारतीय महिलांचे अलंकार प्रेम पाहाता व सध्याची अस्थिर आर्थिक स्थिती पाहाता ही मागणी नजिकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. जोडीला महागाई वाढते आहे. त्यामुळे सोन्याचे भाव तोळ्याला २२ हजार रुपये व चांदी किलोला ४५००० रुपयांपर्यंत वधारु शकेल, असा सराफांचा अंदाज आहे.
सोन्याच्या किंमती कमी होत नाहीत. त्यात वर्षभर किरकोळ चढ उतार सुरु असतात. पितृ पंधरवड्यात् अशुभ काळामुळे सोने खरेदी किंचित मंदावते व भाव कमी होतात. पण अलिकडे हुशार लोक याच काळात सोने खरेदी करतात आणि पुढे दसरा-दिवाळीच्या सुमारास किंमती वधारतात तेव्हा विकून फायदा कमावतात.
गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडवा हे तीन पूर्ण मुहूर्त व अक्षय्य तृतिया हा अर्धा मुहूर्त असे आपल्याकडे साडेतीन मुहूर्त आहेत. त्याखेरीज वर्षातून येणारे तीन-चार गुरुपुष्य योगही सोने खरेदीला आदर्श मानले जातात. त्यामुळे या आठ दिवशी किमान एक ग्रॅम तरी सोने खरेदी करण्याचा अनेकांचा परिपाठ असतो. त्यानिमित्त मुलाबाळांच्या लग्नासाठी थेंबे थेंबे तळे साचत जाते. म्हणून या दिवशी सोन्याच्या किंमती कायम चढ्या असतात.
भारताची सोन्याची मागणी जास्त आहे आणि त्या मानाने होणारा पुरवठा कमी आहे. त्यामुळे येथे सोने हे कायम विनिमयाचे साधन राहिले आहे. काळा पैसा सोन्यात जिरवता येत असल्याने तेही एक आकर्षण असते.

सारांश - सोन्याच्या किंमती कमी होणार नसून सध्यापेक्षाही जास्त पातळीला जातील. तेव्हा एसाआयपी, रिकरिंग, बचत प्रमाणपत्रे, शेअर याप्रमाणेच सोनेही थोडे थोडे साठवत राहणे फायद्याचे असते.

 
^ वर